Saturday, 11 June 2022

माझा वाघ दिवस; बांधवगड डायरी !!

 

























माझा वाघ दिवस; बांधवगड डायरी !!

नशीब तुम्हाला साथ देईल असे कधीही गृहित धरू नका, मात्र एखादा दिवस असा असतो की तुम्हाला नशीब तुमच्या बाजूने आहे याची जाणीव होते, अशावेळा मात्र नशिबाला जास्तीत जास्त फायदा करून घ्या

वरील शब्द माझेच आहेत व बांधवगढ राष्ट्रीय अभयारण्यातील दिवसभराच्या सफारीनंतर मी काढलेल्या छायाचित्रांवरून नजर टाकत असताना (तेथे अनेक छायाचित्रे काढली) व आम्हाला किती वाघ दिसले हे मोजत असताना माझ्या मनात हा विचार आला. मी जंगलात अनेक वाघ पाहिले आहेत (अर्थात ते कधीही पुरेसे नसते) व मला माहितीय निस्सीम वन्यजीवप्रेमी (म्हणजे वन्यजीवन छायाचित्रकार नाही तर अशा व्यक्ती ज्यांना वन्यजीवन समजले आहे व त्यांची संख्या खरोखर अतिशय कमी आहे) म्हणतील की केवळ वाघ म्हणजे जंगल नाही व तुम्ही वन्यजीवनाचा सर्वसमावेशक विचार केला पाहिजे व जंगलातील प्रत्येक प्रजाती तितकीच महत्त्वाची असते, वगैरे, वगैरे! मला अश्या कोणत्याही जंगलात भटंकती करायला आवडते, मग तिथे वाघ असोत किंवा नसोत हे पण खरे आहे. मात्र तुम्ही जेव्हा हे काळे-पिवळे पट्टे जंगलातील घनदाट हिरवाईच्या पार्श्वभूमीवर तुमच्या दिशेने चालत येताना (किंवा तुमच्यापासून लांब जाताना) पाहता तेव्हा काहीतरी वेगळेच घडते. तुमच्या अंगातील रक्त सळसळू लागते व वाघाच्या दर्शनाने केवळ तुमचाच उत्साह वाढतो असे नाही तर संपूर्ण जंगलाचेच स्वरूप बदलते, काही वेळा हरिणे व लंगूरांचे चित्कार ऐकू येतात, तर काहीवेळा निरव शांतता असते. सगळ्यांचे डोळे वाघावरच केंद्रित असतात, अशी या प्राण्याची ताकद आहे. मी अनेक जंगले पाहिली आहेत, मात्र मी कबूल करतो की मी आजही वाघ पाहिल्यानंतर स्तब्ध होतो, कारण मीही माणूसच आहे व मला याचा आनंद आहे. आणि मग तुम्हाला जेव्हा एका दिवसात बछड्यांसह २१ वाघ दिसतात (होय तुम्ही अचूक आकडा वाचला आहे, २१ वाघ), तेव्हा तुम्ही म्हणू शकता की एखाद्या वन्यजीव प्रेमी व्यक्तीसाठी किंवा कोणत्याही माणसासाठी यापेक्षा अधिक मोठा भाग्याचा दिवस असू शकत नाही, बांधवगढच्या जंगलातील माझा दिवस तसा होता.

माझा हा लेख त्या वाघांविषयी व मला त्यांच्याकडून काय शिकायला मिळाले याविषयी आहे, केवळ वाघ दिसण्याचे उदात्तीकरण करणे हा त्याचा हेतू नाही मग मला कितीही आनंद झालेला असू दे. आपण सगळे जण जाणतो जंगलात एकही वाघ दिसणे किती अवघड (तसेच त्यासाठी नशीबही लागते) असते. जर तुम्हाला एकाच दिवसात २१ वाघ दिसत असतील व तुम्ही त्यातूनही काही शिकणार नसाल तर तुम्ही खरोखरच मूर्ख आहात, नाही का? मी ज्या सफारीसाठी गेलो होतो ती पूर्ण दिवसाची होती, म्हणजे त्यामध्ये दुपारच्या वेळी अभयारण्यातून बाहेर जावे लागत नाही. म्हणजे तुम्हाला एकाच जिप्सीमध्ये साधारण चौदा तास अभयारण्यात भटकंती करता येते. पण मी तुम्हाला सांगतो मध्य भारतामध्ये भर उन्हाळ्यात हे काही फार आनंददायक काम नाही, तुम्ही निस्सीम वन्यजीवप्रेमी असल्याशिवाय तसेच तुम्हाला त्याचे दर परवडत असल्याशिवाय ते शक्य नाही कारण त्यासाठी सामान्य सफारीपेक्षा तब्बल दहापट अधिक पैसे चुकवावे लागतात. मात्र त्यामुळे तुम्हाला सर्व विभागांमध्ये जाता येते. म्हणजे उदाहरणार्थ बांधवगढमध्ये ताला, मगधी व खतौली या तीन स्वतंत्र प्रवेशद्वारांसह तीन विभाग आहेत, जे तुम्ही पूर्ण दिवसाच्या सफारीमध्ये पाहू शकता व वाघ दिसण्याच्या दृष्टीने ते अधिक फायद्याचे ठरते. मात्र जास्त तास मिळूनही, तसेच उपलब्धता असूनही तब्बल ८०० चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्र असल्यामुळे व चाळीसहून अधिक वाघ असले तरीही ते कुठेही असू शकतात. त्यामुळे ते दिसण्यासाठी नशीबाशिवायच संयम, थोडा तर्कसंगत विचार व जंगलांविषयीचे ज्ञानही आवश्यक आहे.

आम्ही ताला प्रवेशद्वारातून पहाटे ५.१५ वाजता प्रवेश करून सफारीला सुरुवात केली. पहिल्या दोन तासात फारसे काहीच नव्हते, कसलीही हालचाल नव्हती. आमच्या निराशेत भर घालण्यासाठी आभाळात काळे ढगही दाटून आले होते व हवामान अचानक थंड झाले. वाघ दिसण्याच्यादृष्टीने हा अपशकून होता, कारण गारव्यामुळे वाघ जेथे आहेत तेथेच आरामात असतात, त्यांना उघड्यावर किंवा पाणवठ्यावर यायची गरज वाटत नाही. मात्र आम्ही जेव्हा ताला विभागातून बाहेर पडून मगधी विभागात प्रवेश केला तेव्हा आम्हाला जिप्सींची रांग एका मोठ्या कुरणाभोवती उभी होती व याचाच अर्थ तिथे वाघ होता. तर तेथे स्पॉटी ही वाघीण व तिची मध्यम वयातील बछडी होती व गवतातून त्यांच्याकडे पाहणाऱ्यांशी लपंडाव खेळत होती, ते अतिशय अद्भूत दृश्य होते. सूर्य अजूनही ढगांच्या आडच होता व आम्ही अभयारण्यामध्ये येऊन जवळपास चार तास उलटून गेले होते. तेव्हा आणखी एक जिप्सी जवळ आली व आम्हाला एक तरूण वाघीण कजरी व तिची तीन महिन्यांची छोटीबछडी त्याच विभागामध्ये मात्र कुरणाच्या दुसऱ्या बाजूला दिसल्याचे सांगितले.

मी अलिकडे वाघाची एवढी लहान बछडी पाहिली नव्हती, म्हणूनच आम्ही कजरी वाघीण दिसते का याबाबत आमचे नशीब आजमावण्याचे ठरविले. कारण एवढी लहीन बछडी सांभाळत असताना वाघीण अतिशय काळजी घेते व तिचा संचार तुलनेने मर्यादित क्षेत्रात असतो मात्र ती कोणत्याही सजीव प्रजातींपासून लांब राहणेच पसंत करते जे अगदी स्वाभाविक असते. आम्ही साधारण सकाळी १०.३० वाजता तेथे पोहोचलो, आकाश अजूनही ढगाळच होते, वातावरण थंड होते, तेथेही काही वाहने वाघीणीची एक झलक दिसावी यासाठी वाट पाहात होती. आम्हाला एका गाईडने सांगितले की वाघीण त्याच भागामध्ये होती व आम्ही ज्या रस्त्यावर उभे होतो त्याला समांतर वाहणाऱ्या नाल्याजवळ असलेल्या झुडुपांमध्ये विश्रांती घेत होती. म्हणजे जवळच कुठेतरी बछड्यांचे दर्शन होण्याची तितकीच संधी होती.यामुळे आमचा मूड थोडा चांगला झाला व आम्ही त्याच जागी वाट पाहायचे ठरवले व अशी वाट पाहण्यात तासभर गेलावाघासाठी वाट पाहतानाची एक चांगली गोष्ट म्हणजे, तुम्ही वाट पाहात असताना आजूबाजूला अनेक गोष्टी घडताना पाहू शकता, उदाहरणार्थ तेंदूच्या झाडाखाली भारतीय पिटा (नवरंग) पक्ष्यांची जोडी दाणा टिपत असताना दिसली, मी त्यांची काही अतिशय उत्तम छायाचित्रे काढू शकलो. तसेच लंगूर म्हणजेच माकडांमुळे अतिशय छान मनोरंजन होते व आजूबाजूला वाघ असल्यास त्यांच्याविषयी इशारा देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असते, आपल्या तीक्ष्ण नजरेने ते झाडावरून दुरून सुद्धा वाघाला पाहू शकतात. सकाळचे १०.३० वाजले होते व बहुतेक जिप्सी परतीच्या मार्गावर होत्या कारण सकाळच्या सफारीसाठी ११ वाजता अभयारण्यातून बाहेर पडायची वेळ होती, त्यामुळे आता पूर्ण दिवसाच्या सफारीसाठी केवळ दोन जिप्सी उरल्या होत्या. प्रतीक्षा सुरूच होती व दुसरी जिप्सी इतर ठिकाणी काही दिसते आहे का (अर्थातच वाघ) हे पाहण्यासाठी निघून गेली, तरीही वाघीण तिथेच असल्याच्या माहितीवर विश्वास ठेवून, आम्ही तिथेच वाट पाहायचे ठरवले. आता १२ वाजले होते व सुदैवाने ढग पांगून आकाश निरभ्र झाले होते व सूर्य डोक्यावर आला होता व आम्हाला एक हरिण नाल्याच्या दिशेने पाणी पिण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक जाताना दिसले, जेथे वाघीण जांभळाच्या झाडाच्या सावलीत विश्रांती घेत होती. हे एका अर्थाने चांगलेच होते कारण यामुळे वाघीणीची झोपमोड होईल व ती उठेल व त्यामुळे आपल्याला तिचे दर्शन होईल असा विचार आम्ही केला व वाट पाहिली. हरिणाला वाघीण दिसली नाही मात्र त्याला तिचा वास आला असावा व ते अतिशय घाबरत होते हे आम्हाला दिसत होते (व समजतही होते). एखाद्या स्लो-मोशनमध्ये सुरू असलेल्या चित्रपटाप्रमाणे वाटावे अशाप्रकारे हरिण जलाशयाच्या दिशेने जात होते व जांभळाच्या झाडापासून साधारण ३० फूट अंतरावर हरिणाला वाघीण दिसली व त्याने इशारा दिला यामुळे वाघीणीला जाग आली व ती झुडुपांबाहेर आली व हरिण पळून गेले. आम्ही मात्र आमचे कॅमेरे सरसावून उभे होतो. कजरी वाघीण संथ पावले टाकत उघड्यावर आली, तिच्या मागे धावत तिची तीन छोटी बछडी आली ज्यांना ती रस्ताच्या पलिकडे असलेल्या गुहेत घेऊन चालली होती, जेथे आम्ही उभे होतो. मागे तीन बछडी धावत असताना वाघीण शिकार करणे किंवा मारणे शक्य नव्हते व त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणे तिच्यासाठी महत्त्वाचे होते व तेथे आम्हाला जंगलामध्ये आपल्या बछड्यांची अतिशय उत्तम काळजी घेणारी आई पाहायला मिळाली!

या उत्साहात आम्ही सकाळपासून सात तास जिप्सीमध्ये बसण्याचा वैताग व थकवा सगळे विसरून गेलो व आम्ही खतौली विभागामध्ये तपासण्याचे ठरवले, जेथे सहा वाघांचे कुटुंब दिसल्याचे समजले होतो त्यातील मादीचे नाव रा वाघीण व नराचे नाव बजरंग वाघ असे होते. इथेही हे कुटुंब गवताच्या पट्ट्यात विश्रांती घेत होते ज्यामुळे ते दिसणे अशक्य होते, मात्र तरीही आम्ही वाट पाहायचे ठरवले. या ठिकाणी एका लहान नदीच्या काठावर व तिच्या प्रवाहाच्या वरच्या दिशेने साधारण १०० मीटरवर राज्य महामार्गावर एक पूल होता व आम्ही जिथे ठिकाणी उभे होतो तिथे आम्हाला महामार्गावर धावणाऱ्या कार दिसत होत्या व अचानक एक नर वाघ गवतातून बाहेर आला व पाणी पिऊ लागला व त्याने आम्हाला उत्सुकतेने पाहिले व आमच्याकडे पाठ करून झोपून गेला. आणखी एक तास गेला व आता दुपारचे ३ वाजले होते व पुन्हा आमचे नशीब चमकले व एक मोठा रानगवा हिरवे गवत चरत वाघाच्या दिशेने आला. वाघाचे उर्वरित कुटुंब अजूनही झुडुपांमध्ये लपलेले होते व तो भलामोठा रानगवा हळूहळू चालत वाघापासून लांब गेला व जेथे बछडी व मादी झोपलेली होती त्या भागात त्याने प्रवेश केला. रानगव्याच्या आगमनाची कुणकुण लागताच ती सर्व बाहेर आली व एकेक करून नर वाघाच्या भोवती बसली. बछडी आजूबाजूला उड्या मारत होती तर वाघ-वाघीणीचे जोडपे झोपलेले होते, ते अतिशय सुंदर दृश्य होते व एकप्रकारे अशी दृश्येच संपूर्ण वन्यजीवनासाठी आशाच आहेत, असा मी मनातल्या मनात विचार केला. त्यानंतर आणखी एक नाट्यपूर्ण घटना घडली, साधारण मोठ्या लॅब्रेडोर कुत्र्याच्या आकाराचा, जेमतेम सहा महिन्यांचा वाघाचा बछडा त्या रानगव्यावर झेप घेण्याच्या बेतात होता, त्याविषयी मी माझ्या पुढीललेखात लिहीन.

त्यानंतर आम्ही जंगलाच्या खतौली विभागातील इतर भाग पाहायला सुरूवात केली व या कुटुंबापासून थोडे लांब गेलो. एका वळणावर आमच्या चालकाने अचानक ब्रेक लावला व ओरडला, साहेब, पाहा रस्त्यावर वाघ आहे, आश्चर्य म्हणजे, साधारण १०० मीटरवर एक साधारण मध्यम वयाचा नर वाघ रस्त्याच्या मधोमध उभा होता व त्याच्या आगमनाचा इशारा देणाऱ्या हरिणांचे चित्कार ऐकू येत होते. आमची जिप्सी पाहून, तो वाघ रस्त्याला लागून असलेल्या झुडुपांमध्ये शिरला व तिथे धापा टाकत वाट पाहात होता, तो शिकारीसाठी गेला होता व दमलेला होता हे आम्हाला दिसत होते. गाईडने आम्हाला सांगितले की तारा (गाईडने आम्हाला त्याचे सांख्यिक नाव म्हणजेच प्रत्येक वाघाला दिला जाणारा एक क्रमांक सांगितला, मात्र मी त्यांना त्यांच्या नावानेच संबोधतो कारण ज्यामुळे त्या वाघांशी एक भावनिक नाते निर्माण होते) नावाच्या वाघिणीच्या तीन बछड्यांपैकी तो एक होता. ती दुसऱ्या एका नर वाघासाठी बछड्यांना सोडून निघून गेली व आता हे बछडे दोन वर्षांचे झाले आहेत व आपले आयुष्य जगत आहेतत्याचे रिकामे पोट व धापा टाकणारा चेहरा बघून तो किती भुकेला व दमलेला असावा हे मला जाणवत होते व त्या वाघाची मला दया आली कारण आपणहून शिकार करण्याऐवढे त्याचे वय नव्हते तरीही त्यांना शिकार आणून खाऊ घालण्यासाठी कुणीही नव्हते कारण तो एक वाघ आहे व वाघ असण्याचा हा एक शापच आहे, नाही का?  

त्या बछड्याला स्वतः शिकार करण्यासाठी सोडून आम्ही पाणवठ्याकडे निघालो व तिथे आम्हाला एक जिप्सी दिसली (दुसरी पूर्ण दिवसभराच्या सफारीसाठी आलेली). त्यामध्येही कॅमेरे पाणवठ्याच्या दिशेने रोखलेले होते. पाणवठ्यावर कोण आहे याची ती स्पष्ट खूण होती. एक मोठा नर वाघ, ३० फूट खोल दरीतील तळ्यात निवांत पहूडला होता. त्याचे फक्त डोके पाण्याबाहेर होते. गाईडने आम्हाला सांगितले की या छोटा भीम नावाच्या वाघाने जवळपासच शिकार केलेले होती व जेवण झाल्यानंतर गारव्यासाठी पाण्यात बसला होता. वाघ कच्चे मांस खातात, त्यामुळे त्यांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण होते. त्याशिवाय मे महिन्यात बाहेरही अतिशय उष्णता असते, म्हणून जवळच्याच पाणवठ्यावर विसावा घेणे आवश्यक ठरते. अशा परिस्थितीत ते तासन् तास पाण्यामध्ये बसून राहू शकतात. छोटा भीमची छायाचित्रे काढल्यानंतर, हा दिवसभरात आम्ही पाहिलेला १७ वा वाघ (बछड्यांसह) होता अशी आम्हाला जाणीव झाली व आम्ही अतिशय रोमांचित झालो होतो कारण कोणत्याही जंगलात एवढे वाघ एकाच दिवशी दिसणे ही काही लहान गोष्ट नाही.

आता, सूर्य मावळतीला लागला होता व आमच्या गाईडने काही भेट न दिलेल्या जागा पाहण्याचे ठरवले. तो आम्हाला मुख्य रस्त्यापासून विरुद्ध दिशेला वळून डोंगरमाथ्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घेऊन गेला. मी जिप्सीमध्ये मधल्या सिटवर बसलो होतो व आमची जिप्सी दुतर्फा झाडांमुळे तयार झालेल्या मंडपातून जात असताना मला वळणावर एका झाडाच्या बुंध्यापाशी एक वाघीण दिसली, ती सरळ आमच्याकडेच पाहात होती. चालकाने गाडीचा ब्रेक लावला व आमच्याकडे वळून विचारले, साहेब, गाडी पुढे घेऊ का म्हणजे आणखी व्यवस्थित दिसेल?व हळूहळू पुढे जाऊ लागला. मी त्याला कुजबुजत (किंबहुना अस्पष्टपणे ओरडलोच) अबे, और कहाँ आगे लेगा यही रुक (म्हणजे जिप्सी पुढे कुठेही नेऊ नकोस, आपण जेथे आहोत तिथेच थांब). तरीही तो पुढे जाण्याचा आग्रह करत होता, मला अक्षरशः त्याचे खांदे धरून त्याला थांबवावे लागले. मग मला जाणवले की त्याला वाघीण दिसलीच नव्हती कारण त्याच्या बाजूला असलेली झाडे आड येत असल्यामुळे त्याला ती दिसत नव्हती. तर तो त्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेने बसलेल्या आणखी दोन वाघीणी दाखवत होता, तर गाईड चौथा वाघ दाखवत होता. हे दारा नावाच्या वाघीणीचे कुटुंब होते ज्यामध्ये जवळपास वयात आलेले वाघाचे बछडे होते व ते सगळेच आम्ही अचानक समोर आल्यामुळे तितकेच आश्चर्यचकित झाले होते व आमच्याकडे पाहात होते. हळूहळू वाघ आमच्या मागे असलेल्या नदीच्या दिशेने चालू लागले व आम्हीही परतीला लागलो. दरम्यान आणखी एक जिप्सी आली, ज्यात काही विदेशी पर्यटक होतेपर्यटकांनी आमच्या मागे असलेले वाघ पाहिले नव्हते व आम्ही परतत आहोत असे त्यांना वाटले. मी जेव्हा त्यांच्याकडे हात हलवून त्यांना सांगितले की जिथे आहात तिथेच थांबा, तेव्हा त्यांना जाणीव झाली व एका पाठोपाठ एक चार वाघ जंगलातून उघड्यावर येताना पाहून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. मला वाघांपेक्षाही त्या पर्यटकांचे चेहरे पाहून गंमत वाटली असे ते दृश्य होते, ते त्यांच्या देशात जाताना आपल्यासोबत अश्याच सुंदर आठवणी घेऊन जातील!  आम्हाला त्या वयात आलेल्या बछड्यांची नदीमध्ये विविध प्रकारे छायाचित्रे घेता आली, तर वाघीण थोड्या अंतरावर पाण्यात निवांतपणे पहुडली होती.

आमचे घड्याळ आता अभयारण्यातून बाहेर पडायची वेळ झाली आहे असे आम्हाला सांगत होते व त्यानंतर आम्हाला जाणीव झाली की आम्ही जंगलामध्ये १४ तास घालवले व एकाच दिवसात २१ वाघ पाहिले, हा कदाचित एक विक्रम असू शकतो असे आमचा गाईड म्हणाला.तो विक्रम आहे किंवा नाही हे मला माहिती नाही मात्र त्या दिवशी नशीबाची साथ होती. त्याला थोडा संयम व थोडा तर्कसंगत विचार यांची जोड असेल तर तुम्ही त्याचा जास्तीत जास्त लाभ करून घेऊ शकता, हे मी आज जंगल नावाच्या शाळेमध्ये शिकलो. वाघ हा भारतीय जंगलांचा राजा आहे, मात्र त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो काही विशिष्ट सवयी असलेला प्राणी आहे यामुळे इतर प्राण्यांच्या तुलनेत तो अधिक असुरक्षित असतो. आणि जंगलात त्याला कुणाची भीती नसते. संपूर्ण दिवसभर मी विविध वयाचे वाघ पाहात होतो व त्यामुळे वाघ जंगलात कशाप्रकारे वावरतात याविषयी अधिक चांगली दृष्टी किंवा त्यांचे निरीक्षण करायची संधी मिळाली. तो एक अतिशय संस्मरणीय अनुभव होता व तो मी सदैव जतन करून ठेवेन, मला असे वाटते त्या दिवशी मला मिळालेला तो सर्वोत्तम ठेवा होता. त्या समाधानाच्या भावनेनेच (थक्क करून टाकणाऱ्या) मी अभयारण्यातून बाहेर पडलो. पुढील दोन दिवस मला आणखी काही वाघ व अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळाली. त्याविषयीपुढील लेखात अधिक लिहीन.

संजय देशपांडे      

संजीवनी डेव्हलोपर्स

ईमेल आयडी - smd156812@gmail.com

 

 







No comments:

Post a Comment