Wednesday 6 November 2024

रतन टाटा नावाची शाळा !!

                                       









रतन टाटा नावाची शाळा!!

प्रत्येक वस्तूंची एक योग्य किंमत असते, ते दिसल्यानंतरच तुम्हाला त्या वस्तूंचे मोल मिळते.” वॉरन बफेट

जेव्हा आव्हानांना तोंड द्यावे लागले, तेव्हाच धाडसी नाविन्यपूर्ण तोडगे निघतात. जर आव्हानेच नसतील, तर साध्या मार्गानेच जाण्याची आपली प्रवृत्ती असते” … रतन टाटा.

तुम्हाला जेव्हा आफ्रिका व आशियाच्या काही भागातील कमालीचे दारिद्र्य दिसते, तुमच्याभोवती भुकेली व कुपोषित मुले दिसतात, व तुम्ही अगदी खुशालीने व ऐषोआरामात जगत आहात याची जेव्हा जाणीव होते, तेव्हा मला असे वाटते एखादी असंवेदनशील, कोडगी व्यक्ती असेल तरच तिला या बाबत आपण काही तरी करावे असे वाटणार नाही”… रतन टाटा.

आपल्यामागे काही शाश्वत कंपन्यांचा समूह सोडून जावा असे मला वाटते ज्या नैतिकता, मूल्ये याबाबत उल्लेखनीय काम करतील व आपल्या पूर्वजांनी जे माघारी ठेवले आहे ते कार्य सुरू ठेवतील”… रतन टाटा

जेव्हा आपल्या नजरेतून

 श्री. रतन टाटा असा लेखाचा विषय असतो तेव्हा श्री. बफेट यांच्याशिवाय मला अधिक चांगल्याप्रकारे मार्गदर्शन कोण करू शकेल. मी या दोघांची तुलना करत नाहिये कारण केवळ एखादा मूर्खच चंद्र व सूर्याची तुलना करेल, दोन्ही आपापल्या जागी सर्वोत्तम व वैशिष्ट्यपूर्ण आहेत, जशी ही दोन नावे आहेत. परत हा तर्क वापरला तर श्री. बफेट व श्री. टाटा, पूर्णपणे वेगळ्या जगात राहात होते मात्र जसा सूर्य आपला दिवस उजळून टाकतो तर चंद्र आपल्याला रात्री प्रकाश देतो, परंतु ते दोन्ही एकाचवेळी या जगात असू शकत नाहीत, तरीही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा प्रकाश सतत असतो, त्याचप्रमाणे या दोघा प्रज्ञावंतांचे शब्द आपल्याला मार्गदर्शन करत असतात. सध्या आपल्या राज्यामध्ये निवडणुकांचे बिगुल वाजले आहे व बहुतेक लोकांनी श्री. रतत टाटा यांच्या निधनाबद्दल त्यांच्या समाज माध्यमांवरून आदरांजली वाहून आदर व्यक्त करून झाला आहे (?) असो, यापैकी बहुतेकांना रतन टाटा १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत जिवंत होते हे त्यांच्या इन्स्टाग्राम/फेसबुक खात्यावरून किंवा वॉट्सॲपच्या चॅटबॉक्सवरून समजले व जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी आली त्यानंतर त्यांनी आदरांजली वाहिली. अनेक चौकांमध्ये (कोपऱ्यांवर) गणपती/दुर्गा मंडळांमध्ये श्री. रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले. त्या दिवशी आपल्या पंतप्रधानांपासून ते बॉलिवुडच्या तारे-तारकांपर्यंत प्रत्येकाने त्यांच्या फेसबुक/इन्स्टाग्रामवर श्री. रतन टाटांविषयी काही ना काही लिहीले व ज्यांचे या समाज माध्यमांवर खाते नाही (अजूनही असे काही लोक आहेत) त्यांनी त्यांच्या वॉट्सॲपच्या ग्रूपमध्ये श्री. टाटांविषयी संदेश पाठवले, तो दिवस संपला व श्री. रतन टाटा यांचा जीवनप्रवासही संपला! आता तुम्ही म्हणाल, तू पण हे लिहितोच  आहेस ना, मग तू सुद्धा ज्या लोकांना हसतो त्यांच्यात सामील झालास. तुम्ही असा विचार करत असाल तर ते खरे आहे, आणि तुम्ही काय विचार करावा यावर माझे नियंत्रण नाही. मी हा लेख केवळ श्री.रतन टाटा यांना आदरांजली म्हणून लिहीत नाहीये तर त्यांनी (म्हणजे टाटा समूहाने) मला जे काही शिकवले ते माझ्या मुलांपर्यंत व माझ्या कामातील सहकार्‍यांना, तसेच स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी इच्छुक असलेल्या कुणापर्यंतही पोहोचवण्यासाठी हे लिहीत आहे.

मला सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते, मी श्री. रतन टाटा यांच्याविषयी जे काही सांगत आहे ते मी त्यांच्याविषयी बातम्यांमधून जे वाचले, समाज माध्यमांमध्ये त्यांची जी भाषणे ऐकली आहेत, तसेच एक व्यवसाय समूह म्हणूनच नव्हे तर एकूणच समाजासाठी टाटा समूहाच्या योगदानाविषयी मी जे काही वाचले आहे त्या आधारावर लिहीले आहे. मी कधीही श्री. रतन टाटांना पाहिलेले नाही, त्यांच्या कोणत्याही व्यवसायासाठी काम केलेले नाही, त्यामुळे महाभारतामध्ये ज्याप्रमाणे एकलव्य द्रोणाचार्यांकडून शिकला (कृपया गूगल करा) त्याचप्रमाणे मीदेखील श्री. टाटांकडून काय शिकलो ते शेअर  करीत आहे. मी इथे केवळ एक तुलना केलेली आहे, श्री. टाटा हे अनेक बाबतीत द्रोणाचार्य आहेत परंतु मी अगदी १% देखील एकलव्यासारखा नाही, परंतु मी प्रयत्न नक्की केला एवढेच मी म्हणू शकेन. मी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या किंवा पाठवण्यात आलेल्या संदेशांचा महापूर पाहात होतो. त्यामध्ये काही जणांनी अगदी इथपर्यंतही लिहीलेले होते की श्री. रतन टाटा यांनी ताजमहाल हॉटेल बांधले व त्यांना दत्तक घेण्यात आले होते व अजूनही बरेच काही लिहीण्यात आले होते. श्री. रतन टाटांनी पहिले ताज महाल हॉटेल बांधले नाही तर ते जमशेदजी टाटा यांनी बांधले. श्री. रतन टाटा यांनी ताज हॉटेलची नवीन इमारत जी जुन्या हॉटेल शेजारीच उभी आहे ती बांधली असेल.    श्री. रतन टाटा यांना टाटा कुटुंबामध्ये दत्तक घेण्यात आले नव्हते तर त्यांच्या वडिलांना दत्तक घेण्यात आले होते. परंतु याची फिकीर कोण करते, कारण लोक श्री. रतन टाटांना त्यांची आदरांजली वाहण्यात तसे संदेश इतरांना पाठवण्यात व्यग्र होते. प्रत्येकालाच ते करायचे होते कारण टाटा हा ब्रँडच तसा आहे, हा माझ्या लेखाचा विषय आहे. मी या लेखाच्या सुरुवातीलाच श्री. रतन टाटा यांची तीन अवतरणे वापरली, ज्यातून ते एक व्यक्ती म्हणून कसे होते व तुम्ही त्यांच्याकडून किती शिकू शकता हे तुम्हाला कळलेच असेल. खरेतर तेवढेही पुरेसे आहे पण असो....

टाटा उत्पादनांविषयी समजलेली एक गोष्ट ज्याची आपल्याला कधी जाणीवही होत नाही ती मला तुम्हाला आज सांगाविशी वाटते. माझी टाटा या नावाशी पहिली ओळख शालेय जीवनात झाली. मुंबई ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ माझ्या खामगावच्या घरासमोरून जात असे, त्यावरून ये-जा करणाऱ्या ट्रकवर इंग्रजीमध्ये “T” हे अक्षर कोरलेले असे. नंतर ते अक्षर म्हणजे टाटा हि माझी पहिली ओळख, आणि मग आपण जे मीठ खरेदी करतो ते सुद्धा टाटाच बनवितात, हे समजले, ती फक्त सुरुवात होती. मी आयुष्याच्या मार्गावर माझा प्रवास सुरू केला, तशी माझी अनेक टाटा ब्रँड व उद्योगांशी ओळख झाली. त्याकाळी त्यातले फार कमी मला परवडू शकत होते व ताज हॉटेलसारख्या ब्रँडविषयी तर मी फक्त वाचतच राहिलो. मी टाटा ब्रँड खरेदी करू शकत असो किंवा नसो, एक गोष्ट मात्र तशीच राहिली त्यांची ग्राहक व सेवेप्रती असलेली बांधिलकी, जी सर्वोच्च आहे. मी रतन टाटांविषयी पहिल्यांदा वाचले जेव्हा ९०च्या दशकात टेल्कोमधील (स्वयंचलित वाहने तयार करणारी टाटा समूहातील एक कंपनी) कामगारांचा कुप्रसिद्ध संप झाला होता. त्यावेळी आम्ही नुकतेच अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडलो होतो व टेल्कोमध्ये नोकरी मिळणे म्हणजे एच१बी व्हिसा (कृपया गूगल करा) मिळवण्यासारखे होते. मी स्थापत्य अभियंता असल्यामुळे मला टेल्कोमध्ये नोकरी कधीही मिळणार नाही हे मला माहिती होते, तरीही स्थापत्य अभियंत्यांसाठी टाटा हायड्रो व टाटा पॉवरचे पर्याय होते, अर्थात तेथे प्रवेश मिळणेही तितकेच अवघड होते. त्यानंतर मला समजले की टाटांच्या मालकीचे धरणही आहे व त्यामुळे माझा कंपनीसाठीचा आदर अधिकच वाढला, कारण धरण कुणाच्या मालकीचे असते! त्यानंतर मी श्री. रतन टाटा व ब्रँडविषयी आणखी वाचायला सुरुवात केली व दोन्हींमुळेही मी अक्षरशः थक्क झालो होतो. कारण एका कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या एका माणसाला पैसे कमवण्यासोबतच समाजही घडवायचा होता, ज्यासाठी आपल्या देशातील व्यावसायिक ओळखले जात नाहीत! टाटांनी सुरू केलेल्या संस्थांची यादी इथे देत आहे, त्यापैकी काही संस्था या अजूनही त्यांच्याद्वारेच चालवल्या जात आहेत …

•             टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च

•             टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस

•             टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर

•             टाटा मेडिकल सेंटर

•             टाटा मेमोरियल सेंटर

•             टाटा रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर

•             टाटा थिएटर

•             टेरी स्कूल ऑफ ॲडव्हान्स स्टडीज

•             स्कूल ऑफ मिडीया अँड कल्चरल स्टडीज

•             सर दोराबजी टाटा अँड अलाईड ट्रस्ट्स

•             सर रतन टाटा ट्रस्ट

•             इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स

•             होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, विशाखपट्टणम्

•             द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट

मी जाणीवपूर्वक ही नावे त्यांच्या लिंकसोबत दिली आहेत म्हणजे कुणालाही या संस्थांविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर तो/ती संबंधित लिंकवर क्लिक करून तसे करू शकतात (माझ्यासारखे अजूनही काही वेडे आहेत). वरील संस्थांवर एक नजर टाकली तर तुम्हाला टाटांचे योगदान व रतन टाटा का महान आहेत हे समजेल. अर्थात, यापैकी अनेक संस्था या श्री. रतन टाटा यांनी सुरू केलेल्या नव्हत्या परंतु उत्तराधिकारी म्हणून किंवा नेतृत्व करत असताना त्यांनी केवळ या संस्थांचे कामकाज व्यवस्थित चालेल हेच पाहिले नाही तर त्यांचा विस्तार व्हावा यासाठी प्रयत्नही केले, तसेच काही नवीन संस्थांची सुरुवातही केली. ही अतिशय मोठी गोष्ट आहे कारण आपल्यापैकी कितीजण विशेषतः समाजासाठी पैसे खर्च करण्याच्या बाबतीत आपल्या पालकांचा वारसा पुढे चालवतात, या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला रतन टाटांचा लोक का आदर करतात हे समजेल.

अनेक वर्षे सरली व माझ्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात माझ्याकडे जे काही मर्यादित अधिकार होते त्यामध्ये मी रतन टाटांचे दोन प्रकारे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे आधी तुमचे काम तुम्हाला शक्य तितके जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे करण्याचा प्रयत्न करा व त्यातून पैसे कमवा जे कदाचित इतरांच्या तुलनेत कमीही असतील व दुसरे म्हणजे तुम्हाला शक्य आहे त्याप्रकारे समाजाला काहीतरी परत देण्याचा प्रयत्न करा. या प्रयत्नातूनच मी TERI, म्हणजे द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूटच्या संपर्कात आलो जी आधी टाटा एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट होती. कल्पना करा जेव्हा ऊर्जा, प्रदूषण, पर्यायवरण यासारख्या संज्ञा माहिती असणारे फारसे लोक नव्हते त्या काळात टाटांनी ही संस्था स्थापन केली, जी पूर्णपणे पारंपारिक ऊर्जा संवर्धनासाठी समर्पित आहे. एक लक्षात ठेवा उपदेश किंवा व्याख्यान देणे सोपे असते परंतु तुमच्या प्रयत्नांची कुणी दखलही घेत नसताना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून अशी संस्था उभारणे हे सीमेवर ज्या लोकांना तुम्ही ओळखतही नाही त्यांच्यासाठी लढण्यासारखे आहे, याचसाठी रतन टाटा महान आहेत. मी जेव्हा माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला व थोडेफार पैसे कमावले तेव्हा मला टाटांच्या सेवांपैकी काही उपभोगता आल्या ज्याविषयी मी कधी स्वप्नही पाहिले नव्हते व ताज हॉटेलमध्ये जाणे त्यापैकी एक होते. तेथे मला जाणीव झाली की, तेथे ऐवळ ऐषोआरामाला महत्त्व नाही कारण तुम्ही उत्तमोत्तम वस्तू खरेदी करू शकता व अतिशय सुंदर सजवलेले हॉटेल बांधू शकता परंतु तिथे दिली जाणारी सेवा व तुमच्या ग्राहकाला तो विशेष आहे अशी जाणीव करून देणे हे ताज हॉटेलचे वेगळेपण आहे, हाच टाटांचा स्पर्श आहे, याची जाणीव होऊ लागली. त्याचवेळी समाज माध्यमांचे आगमन झाले होते व इथेही श्री. रतन टाटा सार्वजनिक व्यासपीठांना ज्याप्रकारे सामोर जात (म्हणजे वापर करत) त्यातून त्यांचे वेगळेपण दिसून येते. बहुतेक बड्या व्यक्ती बातम्यांमध्ये राहण्यासाठी वादग्रस्त विधाने करून समाज माध्यमांचा वापर करत श्री. रतन टाटा यांनी कधीही कुणाविषयीही अशाप्रकारची विधाने केली नाहीत, याला अपवाद फक्त एकच तो म्हणजे जेव्हा त्यांनी श्री. मुरेश अंबानी यांच्या गगनचुंबी घराविषयी केलेली टिप्पणी व त्यातून त्यांची मानवीय बाजूच दिसून येते. याबाबत टेल्कोच्या कारखान्यातील उपाहारगृहामध्ये एक किस्सा अतिशय प्रसिद्ध आहे. श्री. रतन टाटा जेव्हा या कारखान्याला भेट देत तेव्हा ते कामगारांसोबत त्यांच्या उपाहारगृहामध्येच जेवत, जिथे एक फलक लावलेला होता, “आमचे कामगार जे जेवतात तेच आमचे अधिकारीही जेवतात”. माझे शब्द अगदी नेमके नसतील परंतु त्याचा आशय हाच होता, पाय नेहमी जमीनीवर ठेवा व संघटनेमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण करू नका ज्यामुळेच प्रामुख्याने आज आपला समाज अस्वस्थ आहे, हे जात, पैसा, पद, धर्म अशा अनेक स्वरूपाचे अडथळे आहेत, जे श्री. रतन टाटांनी कधीही जुमानले नाहीत.

व्यावसायिक आघाडीवरही त्यांचा प्रवास सुलभ नव्हता, ज्यातून आपल्याला जाणीव होते की साम्राज्य जेवढे मोठे तेवढे त्याचे नेतृत्व करणाऱ्याचे सिंहासन अधिक काटेरी असते. या प्रवासात अनेक फटके बसले, मग १ लाख रुपयात उपलब्ध करून देण्यात आलेल्या कारमुळे म्हणजेच नॅनोमुळे झालेला तोटा व स्वयंचलित वाहनांच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ब्रँडना तोंड द्यावे लागण्यापासून ते टाटा निर्मित घरगुती वाहनांना ट्रक निर्मात्यांची कार म्हणून मारण्यात आलेले टोमणे असोत, परंतु रतन टाटांच्या नेतृत्वाखाली कंपनीने या टीकेला सर्वोत्तम प्रकारे तोंड दिले ते म्हणजे कामगिरीतून. याचवर्षी टाटाने पहिल्यांदाच घरगुती वाहनांच्या (कारच्या) विक्रीमध्ये सुझुकीला (मारुती) मागे टाकले आहे व हे यश एका रात्रीतून मिळालेले नाही, हे लक्षात ठेवा. त्याचवेळी इंग्लडचा अभिमान असलेल्या जॅग्वार व रेंज रोव्हर या कार कंपन्या आता भारतीय म्हणजे टाटांच्या मालकीच्या आहेत, एखाद्या कंपनीकरता यापेक्षा गौरवास्पद बाब कोणती असू शकते? नेतृत्वाच्या बाबतीत त्यांनी तरुण पिढीकरता वाट मोकळी करून देत ते आपल्या पदावरून निवृत्त झाले, परंतु हा निर्णय त्यांच्या अंगलट आला, त्यांनी हस्तक्षेप करून झालेले नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला व व्यवसाय म्हणजे काय हे जगाला दाखवून दिले. खरे तर यापैकी बहुतेक गोष्टी अनेक व्यासपीठांवर उपलब्ध आहे, तर मी श्री. रतन टाटा यांच्याकडून काय शिकलो, हा माझ्या लेखाचा गाभा आहे व ते मी मुद्द्यांच्या स्वरूपात देत आहे…

१.कोणतेही उत्पादन तयार करताना तुमचे शंभर टक्के प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागला तरीही.

२. पैसे जरूर कमवा परंतु ते योग्य कारणासाठी वापरण्यासही शिका.

३. तुम्ही व्यावसायिक आहात व तुमचा व्यवसाय नफ्यात चालवणे हे तुमचे काम आहे परंतु त्याहीआधी तुम्ही एक माणूस आहात.

४. यशाने तुम्हाला नम्र केले पाहिजे, तरच तुम्ही त्यासाठी योग्य आहात.

५. तुमचा ज्या मूल्यांवर विश्वास आहे त्यासाठी ठाम भूमिका घेण्यास घाबरू नका.

६. तुम्ही स्वतःचे चारित्र्य घडवले तरच तुम्ही दीर्घकाळ टिकणारा ब्रँड तयार करू शकता.

७. शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, (हे कालातीत ज्ञान आहे, परंतु अतिशय कमी लोक त्यानुसार जगू शकतात), तुम्ही किती संपत्ती कमावली यावरून तुम्ही कोण आहात हे ठरत नाही, तर तुम्ही काय मागे सोडून जाणार आहात, यावरून ते ठरेल !

मी आत्तापर्यंत जे काही लिहीले आहे त्याच्या १०% देखील मी प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवू शकलेलो नाही. परंतु मला खात्री आहे की श्री. रतन टाटांनी हे वाचले असते तर मला यातून जे काही समजले आहे ते जाणून घेतल्यानंतर त्यांना आनंद वाटला असता व मी प्रयत्न करत राहतो, मी हे माझ्या मुलांसाठी व सहकार्यासाठी लिहीत आहे! असो, ज्या देशामध्ये लोक अनेक दिवस लग्न सोहळे साजरे करण्यामध्ये किंवा एखाद्याच्या मृत्यूचा शोक करण्यामध्ये वाया घालवतात, तिथे श्री. रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर टाटा समूहातील कंपन्यांचे काम एका मिनिटासाठीही थांबले नाही, यालाच मी जगण्यातून व अगदी मृत्यूमधूनही आदर्श घालून देणे असे म्हणतो.  श्री. रतन टाटा यांच्याविषयी अनेक संदेश आले असतील (केवळ एक दिवसभर) परंतु नियमितपणे त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणे ही त्यांच्यासाठी सर्वोत्तम आदरांजली ठरेल, जी त्यांनाही आवडली असती, हे लक्षात ठेवा. माझ्या सहकाऱ्यांनो, एवढे सांगून निरोप घेतो!  

...

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स 

smd56812@gmail.com