इंडियन क्रिकेटटीम, मायदेशात व्हाईट वॉश आणि आयुष्याचा धडा !
“बहुतेक पुरुषांसाठी अपयशाचे कारण यशस्वी होण्याची क्षमता नसणे हे नसते तर यशस्वी होण्याचा निर्धार नसणे हे असते” ...मी.
“ केवळ एका मालिकेतील पराभवामुळे तुम्हाला दळभद्री म्हणता येणार नाही हे मान्य आहे, पण!! आपण कधीही खेळाच्या एखाद्या विशिष्ट स्वरूपावर लक्ष केंद्रित करण्यावर विश्वास ठेवला नाही व त्याचा परिणाम हा असा झाला!! आपला कसोटीचा संघ वेगळा असला पाहिजे व त्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देऊ नये, त्या तोट्यातून भरपाईसाठी त्यांना विशेष पैसे द्या, नाहीतर ते फक्त टी२० विजेतेच राहतील. आपण ३रा कसोटी सामनाही हारलो हे चांगले झाले कारण आपला पराभव होईल हे अपेक्षितच होते. आपण ३री कसोटी जिंकलो असतो तर, आपण पुन्हा केवळ त्या विजयाचेच कौतुक केले असते व पहिले २ पराभव विसरून गेलो असतो. त्याचप्रमाणे, जर एका कसोटीतील खराब कामगिरीमुळे जर केएल राहुलला संघामध्ये स्थान दिले जात नाही, तर रोहित व विराटलाही तेच निकष का लागू होत नाहीत?? खरे तर भारतीय संघाला तो सध्या कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्यक्षात कोणत्या स्थानी आहे हे जगाला दाखवून दिल्याबद्दल शाबासकीच दिली पाहिजे!!”
मला खात्री आहे की बहुतेक वाचकांना वरील परिच्छेद व अवतरणाचा अर्थ समजला असावा जे मी व्हॉट्स ॲप ग्रूपवरील चॅटमध्ये लिहीली होती (तसेच त्यातील विचारही माझेच होते). माझ्या अवतरणासाठी काही प्रकाशनहक्क वगैरे नाहीत, त्यामुळे वाचक मुक्तपणे त्यांचा पुन:वापर करू शकतात, अर्थात मला खात्री आहे फारसे कुणी तसे करणार नाही, त्यामुळे असो! हा विनोद होता व एक पीजे विनोद होता, परंतु किवींविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाचे जे काही झाले ते म्हणजे एखाद्याला छळ करून मृत्यु देण्यासारखे होते. मी हे अशा शब्दांमध्ये मांडताना अतिशयोक्ती करतोय असे तुम्हाला वाटत असेल तुम्ही खऱ्या अर्थाने भारतीय संघाचे चाहते (म्हणजे मूर्ख) आहात. भारतीय क्रिकेट संघ हा भारताचा अधिकृत क्रिकेट संघ जरी असला तरी तो बीसीसीआयचा आहे, देशाचा नव्हे (कृपया बीसीसीआय म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी गूगल करा) !
एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, की हा लेख क्रिकेटविषयी आहे (त्यातून मी काय शिकलो) व ज्यांना क्रिकेटमध्ये रस नाही किंवा जे क्रिकेटचा तिरस्कार करतात ते वाचन थांबवू शकतात. मी क्रिकेटची पूजा किंवा क्रिकेटचा उदोउदो करत नाही माझ्यासाठी हा केवळ एक असा खेळ आहे जो या देशातील बहुतेक लोक खेळू शकतात व समजून घेऊ शकतात. म्हणूनच शक्य असेल तेव्हा मला या खेळाचे विश्लेषण करायला आवडते, कारण इतर कोणत्याही खेळाप्रमाणे त्यातून आपल्याला जीवनाविषयी कितीतरी गोष्टी समजतात. करोडो भारतीय हा खेळ खेळत असल्यामुळे हे एक लोकांना जोडण्याचे सर्वोत्तम साधन सुद्धा आहे. म्हणूनच हा लेख क्रिकेटविषयी असला तरीही तो जीवनाविषयीच्या व अशा गोष्टींबाबत आपल्या दृष्टिकोनाविषयी अधिक आहे. तुम्हाला अजूनही लेखाचे वाचन थांबवायचे असेल, तर तो तुमचा निर्णय आहे. अलिकडेच भारतीय संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका तीन-शून्याने हरला म्हणजे म्हणजेच दणकून पराभव झाला, असे आपल्या संघाच्या नव्वद वर्षांच्या इतिहासात (स्वातंत्र्यपूर्व १५ वर्षांचा काळ पकडून) पहिल्यांदाच घडले. त्यामुळेच हा पराभव अशा संघाकडून स्वीकारावा लागला जो भारतीय संघाला आत्तापर्यंत भारतामध्ये कधीच पराभूत करू शकला नव्हता. म्हणूनच हा दणदणीत पराभव होता व तोदेखील अतिशय अपमानास्पद पद्धतीने झालेला. मी विश्लेषण करण्यापूर्वी (माफ करा, माझे मत मांडण्यापूर्वी) अलिकडच्या काळामध्ये दोन्ही संघांची कामगिरी अशी होती की, न्यूझिलंडचा संघ, आपल्या शेजारील देशासोबत म्हणजे श्रीलंकेसोबत खेळलेल्या कसोटी मालिकेतील दोन्ही कसोटी हरला होता.तर भारतीय संघाने टी२० विश्वचषक जिंकला होता त्यासोबत बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील एक सामना हरायला येऊन सुद्धा ती मालिका २-० अशी जिंकली होती. या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्याचे भारतीय संघाने अनेक विश्व विक्रम मोडले होते. थोडक्यात सांगायचे झाले, तर न्यूझिलंडचे मनोधैर्य खालावलेले होते, तर भारतीय संघ जेव्हा कसोटी मालिका सुरू झाली तेव्हा यशाच्या लाटेवर स्वार होता. त्याचवेळी न्यूझिलंडची याआधीची कामगिरीही फारशी अनुकूल नव्हती. त्यांच्या व्यवस्थापनाला जर कुणी सांगितले असते की त्यांचा संघ भारतीय संघाचा 3-0 असा पराभव करेल तर त्यावर त्यांचाही विश्वास बसला नसता. तरीही न्यूझिलंडने भारतीय संघासारख्या विक्रमी काळासाठी अजिंक्य राहिलेल्या (बारा वर्षे) संघाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला, हा माझ्या लेखाचा विषय आहे! कारण कोणत्याही घटनेमागचे कारण जाणून घ्यायला मला अतिशय आवडते, विशेषतः पराभवाच्या बाबतीत व हा सर्वार्थाने निश्चितच मोठा पराभव होता.
मला खात्री आहे की अनेक क्रिकेट पंडित (आपल्या देशामध्ये प्रत्येक घरामध्ये/कार्यालयामध्ये तुम्हाला एक सापडेल) या पराभवाविषयी त्यांचा तर्क मांडत असतील. परंतु सुदैवाने ज्या दिवशी आपण मालिकेतील शेवटचा सामना हरलो, पुढील दोन दिवस सर्व वृत्त माध्यमांना दिवाळीमुळे सुट्टी होती. त्यानंतर अमेरिकेतील अध्यक्षपदीय निवडणूक होती, त्यामुळे माध्यमांच्या धुलाईपासून (म्हणजेच टीकेच्या भडिमारापासून) भारतीय संघ वाचला. भारतीय संघाच्या धुलाईमध्ये सर्फ/निरमाचा (म्हणजे काय हे गूगल करा) समावेश करण्यासाठी मी हा लेख लिहीत नाही, तर मला फक्त स्वतःसाठी तसेच माझ्या मुलांसाठी, तरुणांसाठी व माझ्या कंपनीसाठी याचे विश्लेषण करायचे आहे, जर त्यांना त्यातून शिकायची इच्छा असेल तर! सर्वप्रथम सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, कोणत्याही खेळामध्ये एक विजेता असतो व एक पराभूत होतो. अगदी जगातील सर्वोत्तम खेळाडूही , GOAT (Greatest of all time) प्रत्येक वेळी जिंकू शकत नाहीत. याला माईक टायसनसारख्या खेळाडूंचा दुर्मिळ अपवाद होता जेव्हा तो त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होता, परंतु त्याची कारकिर्दही कशी संपली हे आपण जाणतो. त्यामुळेच, एखादा क्रिकेट संघ जेव्हा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचतो तेव्हा तो जवळपास विश्वविजेता झालेलाच असतो, त्यानंतर तो संघ टी२०चा विश्वचषक जिंकतो व त्यानंतर लगेच एका संघाला कसोटी क्रिकेट मालिकेमध्ये मोठ्या फरकाने पराभूत करतो, परंतु पुढील काही आठवड्यातच तो अशा एका संघाकडून पराभूत होतो जो क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये आपल्याहून कमी दर्जाचा आहे, हाच माझ्या लेखाचा विषय आहे. या पराभवातून आपल्याला अनेक गोष्टी समजतात व त्यातील एक म्हणजे तुम्ही खेळाचा कोणता प्रकार कश्या पद्धतीने खेळत आहात हे समजून घेणे.
सर्वप्रथम, न्यूझिलंडचा संघ हा व्यावसायिकांचा आहे व त्यांचे खेळाडू अतिशय तंदुरुस्त आहेत. दुसरा व या पराभवाचा सर्वात महत्त्वाचा पैलू व जो कोणत्याही व्यवसायालाही लागू होतो तो म्हणजे जर तुम्हाला अशा दारुण पराभवाला सामोरे जायचे नसेल तर आता बीसीसीआय व भारतीय संघाने क्रिकेट या खेळाच्या तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये फरक केला पाहिजे.
तुम्ही गाढवाला कितीही प्रशिक्षण द्या व त्याला तंदुरुस्त ठेवा पण ते कधीही घोड्यांविरुद्ध डर्बी स्पर्धा जिंकू शकणार नाही. मी भारतीय संघाला गाढवांचा कळप म्हणतोय असा समज कृपया करून घेऊ नका, परंतु निवडकर्ता व बीसीसीआय मात्र नक्कीच गाढव असल्याचे प्रूव्ह करत आहेत. आता हेच उदाहरण पाहा, तुम्ही १०० मीटरच्या विजेत्याला केवळ १०० मीटरची स्पर्धा मैदानी खेळांमध्ये सर्वोच्च अर्थात त्यांची ‘बाप’ मानली जाते म्हणून मॅरेथॉन स्पर्धा जिंकायला सांगू शकता का? किंवा, तुम्ही एखाद्या कमी वजन किंवा हलक्या वजन गटातील मुष्ठियोद्ध्याला जो या गटातील विजेता आहे, त्याला अधिक वजन गटातील मुष्ठियोद्ध्याविरुद्ध लढण्यास सांगू शकता का? याचे उत्तर नाही असे आहे व १०० मीटरच्या धावण्याच्या स्पर्धेतील विश्वविजेता असो किंवा हलक्या वजन गटातील मुष्ठियोद्धा असो या दोघांच्या बाबतीत काही अडचण नाही परंतु तुम्ही खेळाचे स्वरूप बदलता तेव्हा तो खेळही वेगळा होतो. याच कारणामुळे राफेल नदाल व कार्लोस अल्कराझ हे टेनिसमधील स्पॅनिश सर्वोत्तम वैयक्तिक खेळाडू आहेत, परंतु एकत्रपणे दुहेरीचा खेळ खेळताना ते देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकले नाहीत कारण दुहेरीतील खेळासाठी वेगळी कौशल्ये, मानसिकता व प्रवृत्ती लागते. एकाच खेळाचे परंतु वेगवेगळ्या प्रकारातील विजेते असल्यामुळे त्यांच्यामध्ये कदाचित या गुणांचा अभाव असू शकतो. भारतीय संघाचेही असेच आहे, आपल्या संघाचे अलिकडच्या काळामध्ये मर्यादित षटकांच्या खेळावर प्रभुत्व झाले आहे. २० षटकांवरून ५० षटकांमध्ये होणारा बदल फारसा मोठा नसतो. परंतु जेव्हा तुम्हाला दिवसाला ९० षटके ती सुद्धा पाच दिवसांसाठी खेळायची असतात, क्षेत्ररक्षणात काहीच निर्बंध नसतात तेव्हा याच खेळाचे स्वरूप अचानक ३६० अंशांनी बदलते ज्यासाठी हा भारतीय संघ तयार नाही. आपल्याला हे वेळोवेळी दिसून आले आहे, तरीही आपण मात्र त्यामागचे खरे कारण स्वीकारण्यास तयार नाही, हा माझ्या लेखाचा विषय आहे. याच कारणामुळे, अलिकडच्या वर्षांमध्ये आपण दोन वेळा क्रिकेटच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो आहोत व दोन्ही वेळा आपण त्या हरलो आहोत. त्यापैकी एका सामान्यातील प्रतिस्पर्धी न्यूझिलंडच होता. आपण अतिशय सहजपणे भूतकाळ विसरतो, आपल्या देशाची हीच समस्या आहे व भारतीय संघ भूतकाळ विसरण्याच्या या नियमाला अपवाद नाही !
या खेळाचे हेच तत्व अनेक व्यावसायिकांनासुद्धा (म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांनाही, असे वाचावे) लागू होते, कारण जेव्हा त्यांना व्यवसायाच्या एका स्वरूपामध्ये यश मिळते, मग त्यांना असे वाटू लागते की त्यांच्याकडे मिडासचा स्पर्श आहे व त्यांनी कोणताही व्यवसाय सुरू केला तरी त्यांना यश मिळेलच व त्यानंतर काय होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण एक व्यक्ती म्हणूनदेखील हे शिकले पाहिजे व स्वीकारले पाहिजे की आपल्या जीवनामध्ये मग ते करिअर असेल किंवा आपण कोणतीही भूमिका पार पाडत असू, पहिले आपण आपली बलस्थाने समजून घेतली पाहिजेत व त्यावर कायम राहिले पाहिजे. अर्थात त्याचा अर्थ सुधारणा करूच नये असा अर्थ होत नाही, याचा अर्थ आपले सगळ्याच गोष्टींचे तज्ज्ञ आहोत असा विचार करू नये, नाहीतर आपला सपशेल पराभव झाला म्हणूनच समजा व तो अतिशय त्रासदायक असतो. अशा पराभवामुळे केवळ त्रासच होतो असे नाही तर आपले मनोधैर्यही खालावते व विश्वविजेते असूनही अशा मानसिक स्थितीतून बाहेर पडणे अवघड जाते. भारतीय संघ हे आधीच अनुभवत आहे कारण ऑस्ट्रेलियातील गेल्या दोन मालिका जिंकूनही, न्यूझिलंडविरुद्धच्या या दारुण पराभवामुळे आता तेथील पुढील मालिकाही हरल्यातच जमा आहेत असा अंदाज लोक आतापासूनच लावत आहेत. तुमच्या अहंकारामुळे तुमचे हसे होऊ शकते, कुणालाही न्यूझिलंडच्या संघाविरुद्ध एवढा दारुण पराभव होईल असे वाटत नव्हते, तरीही तो झाला हा माझ्या लेखाचा विषय आहे !
आता असे सल्ले व सूचना दिल्या जातील की ज्येष्ठ खेळाडूंना अधिक घरगुती क्रिकेट खेळायला लावा (यातही भेदभाव केला जातो सगळ्याच खेळाडूंना का नको), परंतु त्याच्यामुळे समस्या सुटणार नाही कारण आपण इथे खेळाचे दोन प्रकार एकत्र करण्याची चूक करत आहोत. १०० मीटरच्या स्पर्धेतील विजेत्याने मॅरेथॉनसाठी कितीही जोरदार सराव केला तरीही, दोन्ही स्पर्धांसाठीच्या मूलभूत गरजा वेगवेगळ्या असल्यामुळे, आज ना उद्या येणारा निकाल स्वाभाविकच असेल तो म्हणजे दारूण पराभव! १०० मीटरच्या स्पर्धेसाठी ताकद स्नायूंमधून येते व अगदी थोड्याशा कालावधीमध्ये तुम्हाला ती ताकद वापरावी लागते. म्हणूनच १०० मीटरच्या स्पर्धेमध्ये खेळाडूंची शरीरयष्टी दणकट, सशक्त व मजबूत असते. परंतु मॅराथॉनसाठी तुम्ही स्नायूंच्या वजनाचा भारही सहन करू शकत नाही. यातील खेळाडू सडपातळ परंतु लवचिक असला पाहिजे व त्याला ताकद पुरविणे दीर्घकाळ वापरावी लागते, तसेच काही ताकद शेवटच्या टप्प्यामध्ये इतरांना पराभूत करण्यासाठी राखून ठेवावी लागते जे अंतिम रेषा दिसू लागेपर्यंत गटानेच धावत असतात, कसोटी क्रिकेटमध्येही अगदी असेच असते. तुमच्यापैकी ज्यांनी हे कसोटी सामने पाहिले असतील (अजूनही असे काही आहेत) त्यांना आठवत असेल तर तिसऱ्या कसोटी सामान्याच्या शेवटच्या दिवशी, भारतीय संघाला मालिकेमध्ये तीन-शून्याने पराभव टाळण्यासाठी केवळ १४६ धावांची गरज होती आणि सामन्याचे 2 दिवस बाकी होते. खेळपट्टीवर चेंडू वळत होता हे मान्य केले तरीही याच खेळपट्टीवर न्यूझिलंडने अधिक धावा केल्या व तुम्ही विश्वविजेता होण्याची स्वप्ने पाहत असंता तेव्हा तुम्ही कारणे देऊ शकत नाही, बरोबर? त्या डावामध्ये आपला कप्तान पहिल्या सलग दोन चेंडूंवर चुकला (बीट झाला) व तिसऱ्या चेंडूमध्ये त्याने फलंदाजीच्या रेषेपुढे येत आक्रमक पद्धतीने बॅटने चेंडू टोलवला. त्या चेंडूवर त्याला चार धावा मिळाल्या असल्या तरीही यातून तीन गोष्टींचा अभाव दिसून आला, एक म्हणजे तो खेळत असलेला खेळ, ते देखील कप्तान म्हणून समजून घेण्याची क्षमता नसणे, दुसरे म्हणजे गेल्या काही डावांमधील अपयशाचे वैफल्य (नैराश्य) लांब ठेवता न येणे व तिसरे म्हणणे जिंकण्यासाठी उतावीळ होणे. तो फटका पाहिल्यानंतर मी सामना पाहणे थांबवले कारण पुढे काय होणार आहे हे मला माहिती होते व लगेचच आपली स्थिती जेमतेम तीस धावांवर साधारण पाच गडी बाद अशी झाली होती.
अर्थात, एका फटक्याच्या निवडीमुळे आपला कप्तान वाईट खेळाडू ठरत नाही परंतु यातून दिसून येते की तो व या संघातील अनेक खेळाडू कसोटी सामन्यांसाठी योग्य त्या मानसिक तयारीत नाहीत. तुम्ही जेव्हा एखादा खेळ खेळता किंवा व्यवसाय चालवता तेव्हा तुमचे मन त्या खेळाच्या मूलभूत बाबींसाठी तयार असले पाहिजे. हे आपोआप होत नाही, तुम्ही अगदी महान खेळाडू असाल तो कदाचित याला अपवाद असतो मात्र तुम्हाला प्रशिक्षण व प्रचंड सरावाची गरज असतेच व खेळाच्या त्या विशिष्ट प्रकारावर किंवा व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचीही गरज असते. भारतीय संघाने यातील काहीच केले नाही म्हणजेच खेळाच्या या प्रकारासाठी सराव किंवा व्यावसायिक दृष्टिकोन नव्हता व परिणामी तीन-शून्यने पराभव स्वीकारावा लागला. खरे सांगायचे, मी या पराभवामुळे दुःखी झालो कारण मी या खेळाचा निस्सीम चाहता आहे परंतु आपण ज्याप्रकारे हारलो त्यामुळे मी अधिक दुःखी झालो, पराभवापेक्षाही आपल्याला काळ्या दगडावरची रेघ वाचता आली नाही हा माझ्या लेखाचा विषय आहे. परंतु यामुळे जो काही परिणाम झाला त्याविषयी मला आनंद आहे कारण कुठेतरी कुणीतरी या पराभवातून शिकेल, जसा मी शिकलो व मी निश्चितच स्वतःला व माझ्या ऑफिसच्या सहकाऱ्यांना आगामी सामान्यांसाठी सज्ज करेन मग ते आयुष्यातील असोत किंवा व्यवसायातील! मला खात्री आहे की, भारतीय संघानेही त्यांचा धडा घेतला असावा, पण आयुष्य म्हणजे केवळ धडा घेणे नाही तर त्या धड्यांमधून स्वतःमध्ये योग्य ते बदल करणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. भारतीय संघातल्या खेळाडूंनो, एवढे सांगून तुमचा निरोप घेतो, आमचे तुमच्यावर अतिशय प्रेम आहे (आणि हो, स्वतः पराभव पत्करून आम्हाला एवढा विशेष धडा शिकवण्यासाठी तुमचे आभार ) !
-
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स
www.sanjeevanideve.com / www.junglebelles.in
No comments:
Post a Comment