Sunday, 13 October 2013

वैशाली, रुपाली आपल्या सामाजिक वारसा असणाऱ्या जागा








मला भटकंती करायला आणि शहरात काय आहे हे पहायला आवडते                              …एस्टेला वॉरेन

एस्टेला वॉरेन ही एक कॅनडीयन अभिनेत्री, माजी फॅशन मॉडेल आणि माजी आंतरराष्ट्रीय सिंक्रोनाइज्ड जलतरणपटूही आहे, व्यवसायाच्या निमित्ताने तिने जगभरात प्रवास केला आहे! प्रवास करणे ही नैसर्गिक मानवी प्रेरणा आहे त्यामुळे ती लाखो लोकांच्या मनातले बोलली आहे. माणसाला नेहमी नवी ठिकाणे पाहायची उत्सुकता असते व अनेक गोष्टींच्या शोधात विविध ठिकाणी जावेसे वाटते. काही जण केवळ करायचा म्हणून प्रवास करतात, काही जण नवीन ज्ञान मिळविण्यासाठी करतात, काही पैसा मिळवण्यासाठी करतात व काही स्वतःचा शोध घेण्यासाठी प्रवास करतात! कारणे कोणतीही असली तरी माणूस हा प्रवासी आहे व त्याच्या उत्साहातूनच नव्या नव्या शहरांचा शोध लागतो.

नेहमी असे म्हणतात की एखादे शहर त्यातील माणसांनी व तिथल्या ठिकाणांनी ओळखले जाते! स्वाभाविकपणे आपण एखाद्या शहराचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात पहिल्यांदा विचार येतो तो तिथल्या माणसांचा व तिथल्या प्रसिद्ध ठिकाणांचा! कारण कोणत्याही शहराची प्रतिमा किंबहुना चेहरा ही माणसे किंवा ठिकाणे ठरवत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर लंडनची माणसे बाहेरील कुणाशीही खडूसपणे वागतात, तिथल्या एखाद्या ठिकाणाचा विचार करायचा झाला तर आपण हाईड पार्कचा विचार करतो. आपण जेव्हा न्यूयॉर्कचा विचार करतो तेव्हा इतरांकडे दुर्लक्ष करण्याचा अमेरिकी गर्विष्टपणा आठवतो, टाईम स्क्वेअर आणि तिथली मौजमजा आठवते. पॅरिसचा विचार केल्यावर फ्रेंच लोकांचा निवांतपणा व आयफेल टॉवर आठवतो. आपल्या महान देशाबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीचा विचार केल्यावर तर रस्त्यावरची मुजोर भाषा, पालिका बजार किंवा जामा मस्जिद आठवते. चेन्नई असेल तर रजनीकांत, लुंगी, इडली सांबार आठवतो, कोलकाता असेल तर बंगाली मिठाई आणि हावडा ब्रिज आठवतो! आता वर उल्लेख केलेल्या शहरांऐवढे पुणे मोठे नाही, मात्र पुणेकर जगभरात पोहोचले आहेत. तसेच आयटी उद्योग असो, ऑटोमोबाईल उद्योग असो किंवा शैक्षणिक सुविधा असोत या सर्व क्षेत्रांमध्ये पुण्याने जागतिक नकाशावर आपले स्थान निर्माण केले आहे. तर मग आपण पुण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय आठवते? सगळ्यात आधी आठवतो तो पुणेरी बाणा जो ब्रिटीशांपेक्षा तसूभरही कमी नाही, अमेरिकी लोकांप्रमाणेआम्ही सर्व जाणतो ही गुर्मी आणि त्यावर विनोदाची पखरण, चितळे बंधूंनी ग्राहकाचा कसा अपमान केला याचे किस्से, ऐतिहासिक शनिवारवाडा आणि वैशाली-रुपाली आवर्जुन आठवतात!

पुणेकर असण्यासाठी हा शेवटचा निकष मला बुचकळ्यात पाडतो, कारण शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे, चितळे बंधू मिठाईवाल्यांचा स्वभाव पुणेरी माणसाचा स्वभाव दर्शवतो, पण मग वैशाली-रुपालीमध्ये असे काय आहे की तो पुण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे? जगन्नाथ शेट्टी हे दाक्षिणात्य नाव पुण्याचा वारसा कसे झाले? पुण्याच्या या वारशाबद्दल अनेक विनोद व किस्से प्रसिद्ध आहेत. ज्या मूठभर लोकांना वैशाली-रुपाली काय आहे हे माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो, ही काही जुळ्या बहिणींची नावे नाहीत, तर पुण्याच्या मध्यवर्ती भागातील फर्ग्युसन रस्त्यावरील दाक्षिणात्य पदार्थांची उपहारगृहे आहेत. मात्र अस्सल पुणेकरांसाठी ही स्मारके आहेत व त्यांच्या शहराच्या वारशाचा अविभाज्य भाग आहेत, या दोन्ही उपहारगृहांचे त्यांच्या जीवनातील महत्व अनन्यसाधारण आहे! असे म्हणतात की पुणेकर केवळ दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे वैशाली-रुपालीत जाणारे व दुसरे म्हणजे तेथे न जाणारे ! पुण्याच्या एकूणच प्रतिमेत वैशाली-रुपाली, जगन्नाथ शेट्टी व त्यांच्या चमूचे महत्व किंवा त्यांची लोकप्रियता किती आहे हे समजावून सांगण्यासाठी हा किस्सा पुरेसा आहे.

साधारणतः १९५० साली उघडण्यात आलेली ही उपहारगृहे आज तेव्हा किशोरवयीन असलेल्यांच्या तिस-या पिढीला सेवा देत आहेत, ही पिढी आज आजोबा-आजी झाली आहे व आजही आपल्या नातवंडांसोबत इथल्या चवीचा आणि वातावरणाचा आनंद घेते! असे म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात मात्र या दोन्ही उपहारगृहांनी विशेषतः वैशालीने अनेकांसाठी त्यातल्या स्वर्गाची भूमिका बजावली आहे व आजही हा परिपाठ सुरु आहे! कॉलेजमध्ये जाणा-या अनेक तरुण-तरुणींनी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पहिला चहा किंवा कॉफी वैशालीतच प्यायली आहे व इथल्या वेटरनी कित्येकांच्या जोड्या जुळविण्यास मदत केली आहे. आपल्या खास मित्राला किंवा मैत्रिणीला लाजत-बुजत पहिल्यांदा घेऊन येणा-यांचे व त्यानंतर तेच लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आल्यावर इथल्या वेटरनी त्यांचे वर्षानुवर्षे स्वागत केले आहे! पुण्यातले बरेचसे प्रसिद्ध नागरिक सांगतात की ते जेव्हा काही कामाच्या निमित्ताने किंवा सुटीसाठी बाहेरगावी जातात, तेव्हा परत आल्यानंतर आपल्या घरी जाण्याआधी पहिले काम म्हणजे वैशालीला भेट देणे आणि एक कप चहा पिणे! मी स्वतःदेखील माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून म्हणजे २५ वर्षांपासून वैशालीचा करिश्मा अनुभवलाय; इथेही वैशाली आणि रुपालीचे चाहते असे दोन गट आहेत, आणि अशाप्रकारे विभागले जाण्यासाठी त्यांची आपापली कारणे आहेत. काहीजणांना रुपालीचा सांबार आणि कॉफी जास्त आवडते तर काही जणांना वैशालीचा चहा आणि तिथले वातावरण अधिक भावते. माझ्याविषयी बोलायचे झाले तर मी वैशालीकर आहे, मात्र दोन्ही जागांना असलेले वलय मला आवडते व एखाद्या निवांत रविवारी रुपालीच्या सांबाराच्या चवीचाही आस्वाद घेतो! मी कॉलेजमध्ये असताना घरुन मोजकेच पैसे मिळायचे, त्यामुळे वैशालीत जाणे ही चैन होती, जी मला काही महिन्यांतून एखादेवेळीच परवडायची. मात्र तेव्हा या दोन्ही ठिकाणी जाण्यात जी मजा होती ती आजही कायम आहे, आज मी तिथे रोज जाऊ शकत असलो तरीही.

ज्या शहराला त्याची संस्कृती व समाजजीवनाचा अभिमान वाटतो त्यात अशी ठिकाणे असणे आवश्यक आहे, किंबहुना ती आपल्या समाजाचा कणा आहेत. कारण अशी ठिकाणे नसतील तर लोक कुठे एकत्र येतील? इथल्या टेबलांवर एक नजर टाकली आणि जमलेल्या टोळक्यांच्या चर्चा ऐकल्या तर पुणे सांस्कृतिक राजधानी का आहे हे समजेल, हा उत्साहाने सळसळत्या वातावरणाचा एक भाग आहे! इथे एकीकडे जोडप्यांच्या प्रेमळ गुजगोष्टी सुरु असतात, तर दुसरीकडे जागतिक अर्थकारणावर चर्चा झडत असतात, इथे कोणत्याही विषयाला मनाई नाही, तुम्हाला इथे विविध क्षेत्रातली ख्यातनाम, उच्चपदस्थ मंडळी अशा चर्चांमध्ये आपली बाजू मांडताना दिसतील! मग त्यामध्ये कल्याणी, भोसले, पवार, बजाज आणि अगदी ठाकरेही असू शकतात! शहरातील उच्च पदस्थ अधिकारी, व्यावसायिक, राजकीय तसेच सामाजिक नेते, स्वयंसेवी संस्थांचे चालक सर्वजण वैशाली-रुपालीचा एक भाग आहेत व आपल्या उपस्थितीने या ठिकाणाच्या प्रसिद्धीचे वलय आणखी दैदिप्यमान करतात! अनेक गट दिवसाची सुरुवात वैशालीने करतात व त्यांची ठरलेल्या वेळी टेबल ठरलेली असतात. केवळ भेटीगाठींसाठीच नाही तर व्यावसायिक बैठकींसाठीही हे ब-याच जणांचे आवडते ठिकाण आहे. आता एखाद्याला प्रश्न पडेल की एवढी वर्दळ असताना व्यावसायिक बोलणी कशी करता येईल, मात्र ती होते हे खरे आहे.

एखाद्याला वाटेल की त्यात काय एवढेसे, भारतात प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टीविषयी आपले मत व्यक्त करायला आवडते, त्यामुळे त्यांच्यासाठी अशा जागा सगळीकडेच असतात, तर वैशाली-रुपालीचे वैशिष्ट्य काय? ब-याच जणांना हा प्रश्न पडत असेल, मात्र मला वाटते की कोणत्याही जागेचा लौकिक एका दिवसात तयार होत नाही. जवळपास सहा दशके ही उपहारगृहे केवळ दाक्षिणात्य पदार्थच देत नाहीत तर लोकांना एकत्र येण्यासाठी व गप्पागोष्टी करण्यासाठी एक जागाही देतात. या ठिकाणच्या प्रत्येक गोष्टीत सातत्य आहे, तेच याचे वैशिष्ट्यही आहे! याचे सगळे श्रेय जाते जे त्यांचे कर्तेधर्ते जगन्नाथ शेट्टी यांना. त्यांनी काही हॉवर्ड विद्यापीठातून पदवी घेतलेली नाही किंवा जगभरात आपल्या उपहारगृहांची साखळी तयार करण्याची त्यांची महत्वाकांक्षा नाही. केवळ या दोनच उपहारगृहांवर ते खुश व समाधानी आहेत, पूर्ण समर्पणाने त्यांचे व्यवस्थापन करतात. या समर्पणातूनच सेवेत सातत्य राखता येते व तेच वैशाली-रुपालीच्या यशाचे गमक आहे! इथे जे पदार्थ मिळतात ते देणारी व इथल्यापेक्षाही चांगला दर्जा असलेली उपहारगृहे या शहरात असतीलही कदाचित. मात्र इथे केवळ तुम्हाला इडली, डोसा, सांबार मिळत नाही तर इथे तुम्ही एका संस्कृतीचा भाग बनता, व इथे भेट देणा-या प्रत्येक व्यक्तिला हे जाणवते. स्वच्छता, तत्पर सेवा, पदार्थांची चव कायम राखणे, इथे सर्व काही चोख आहे, जगन्नाथ शेट्टी यांनी जातीने लक्ष घालून केवळ उपहारगृहे उभारलेली नाहीत तर एक यंत्रणा विकसित केली आहे, इथले कर्मचारी त्याचा एक भाग आहेत. इथले स्वैपाकी असोत किंवा सफाई कामगार, प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न असल्याचे तुम्हाला दिसून येईल. कोणत्याही माध्यमात एकही जाहिरात न देता वैशाली-रुपाली यशस्वी करण्यामागचे रहस्य जाणून घेण्यासाठी शेट्टींना अनेक संस्थांनी आमंत्रित केले. माझे त्यांच्याशी घरोब्याचे संबंध आहेत हे माझे भाग्य आहे. असेच एकदा निवांतपणे बोलताना त्यांनी सांगितले होते की, त्यांना कुणीतरी प्रश्न विचारला की वैशालीमध्ये एकही कामगार संघटना कशी नाही? त्यांनी उत्तर दिले, कोण म्हणते आमच्याकडे कामगार संघटना नाही? संघटना आहे व मीच त्या संघटनेचा नेता आहे! पट्टीचा व्यवस्थापन गुरुही असे उत्तर देऊ शकला नसता, कारण हे केवळ विद्वत्तापूर्ण उत्तर नाही तर सत्य आहे! ते त्यांच्या कामगारांची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतात, मग मुलांचे शिक्षण असो किंवा त्यांचे औषधपाणी, सर्वकाही आधीच पूर्ण झाल्याने त्यांना मागण्या कराव्याच लागत नाहीत! त्यांनी मला एकदा सांगितले होते की कप बश्या इत्यादी साधनांचे नुकसान झाले तरीही ते व्यवस्थापक किंवा वेटरचे पैसे कापत नाहीत, व त्यांनी सर्व कर्मचा-यांना सांगितले आहे की ग्राहकांशी कधीही हुज्जत घालू नका, ते जे सांगतील ते हसून मान्य करा! तुम्ही वैशालीमध्ये याचा अनुभव घेऊ शकता, याची छोटीशी परीक्षा पाहायची असेल तर मसाला डोसा मागवा व तो आल्यानंतर मी साधा डोसा मागवला होता असे वेटरला सांगा! दुस-या कोणत्याही हॉटेलमध्ये तो मसाला डोसा परत घ्यायला नकार देईल, मात्र वैशालीत नाही; वेटर तुमच्याकडे पाहून नम्रपणे हसेल, मसाला डोसा घेऊन जाईल व साधा डोसा आणून देईल! वैशाली-रुपालीचा हा पैलू मी आवर्जुन इथे नमूद केला आहे कारण, आपण एखाद्या यंत्रणेचे यश पाहतो, मात्र त्या यशाच्या कारणांचे क्वचितच विश्लेषण करतो व मान्य करतो, त्यामुळे त्यातून काही शिकणे किंवा स्वीकारणे हे तर दूरच!
अलिकडेच जगन्नाथ शेट्टी यांना ऐंशी वर्षे पूर्ण झाली म्हणून वैशालीत एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व शहरातील सगळी दिग्गज मंडळी त्याला हजर होती. अनेकांच्या या ठिकाणाविषयीच्या आठवणी वृत्तपत्रात छापून आल्या होत्या. एखादे ठिकाण शहराला यापेक्षा अधिक काय देऊ शकते? मी नेहमी विचार करतो की एखाद्या ठिकाणाचे यश नेमके कशात असते. पैसे कमावण्यात, किंवा दुस-या लोकांनी त्याची नक्कल करण्यात किंवा तिथे किती माणसे येतात यामध्ये असते? एखादे ठिकाण काय मिळवू शकते? मला असे वाटते की वैशाली-रुपालीचे जे सध्या स्थान आहे त्यातच याचे उत्तर आहे. ही दोन्ही ठिकाणे एखाद्या जिवंत पात्राप्रमाणे आहेत, लोक त्यांना एक जिवंत व्यक्तिमत्व म्हणून ओळखतात, त्यांच्या यशाची याशिवाय दुसरी व्याख्या काय होऊ शकते!
सध्याच्या मॅकडोनल्ड व केएफसीच्या जमान्यात, जगभरातल्या चवी, उत्तम वातावरण असलेल्या उपहारगृहांशी स्पर्धा असताना, वैशाली-रुपाली दिमाखात उभ्या आहेत व त्यांनी स्वतःची ओळख (ब्रँड) तयार केलीय! पुणेकरांसाठी वैशाली, रुपाली केवळ उपहारगृहे नाहीत जिथे ते जेवू शकतात व लोकांना भेटू शकतात, तर या दोन्ही ठिकाणांना भेट देणे म्हणजे एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटण्यासारखे आहे, ज्यांच्यासोबत ते काही जिव्हाळ्याचे क्षण निवांतपणे घालवू शकतात! आपल्याकडे अशी ठिकाणे आहेत हे आपले भाग्य आहे, त्यांचे जतन करणे व त्यांना अजरामर करणे ही समाजाची जबाबदारी आहे, तरच अशी ठिकाणे आपल्याजवळ असण्यासाठी आपण लायक होऊ! या शहराला आपल्या हक्काचे वैशाली आणि रुपाली देणा-या जगन्नाथ शेट्टी व त्यांच्या चमूसाठी तोच मानाचा मुजरा होईल!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स



Wednesday, 2 October 2013

वीज आणि रिअल इस्टेट
























आत्मा काय असतो? तो वीजेसारखा असतो- तो नक्की काय असतो ते आपल्याला माहित नसते, पण ही शक्ती खोली प्रकाशित करू शकते – रे चार्ल्स

रे चार्ल्स रॉबिन्सन अमेरिकी गायक-गीतकार, संगीतकार होता आणि; तो आत्मिक संगीतप्रकाराचा निर्माता होता आणि त्याच्या विचारांवरूनच कळते तो एक चांगला विचारवंतही होता! आणि बांधकाम व्यवसायामध्ये अनेक विकासकांना या इतक्या महत्त्वाच्या घटकाबद्दल, वीजेबद्दल त्याचे मत पटत  नक्कीच असेल! त्यात त्यांचाही काही दोष नाही कारण अनेक अनुभवी स्थापत्य अभियंत्यांना  सुद्धा विद्दुतशास्त्राविषयी फारशी माहिती नसते, याचे कारण दुहेरी असू शकते, एकतर हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा विषय नसतो आणि दुसरे म्हणजे सध्याच्या वेगवेगळ्या भागात काम करण्याच्या पद्धतीमुळे, बहुतांश स्थापत्य अभियंते कामाच्या ठिकाणी विदयुतविषयक कामे हि त्यांच्या कामाचा भाग आहे, असे मानतच नाहीत.

दीर्घ काळापासून आपल्या देशाने जगण्याच्या तीन मुख्य गरजा असल्याचे स्वीकारले आहे आणि त्या आहेत, रोटी, कपडा और मकान म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा; या तीन गोष्टी आपल्या सुसंस्कृत जगण्याचे तीन निकष मानले जातात, त्याशिवाय आयुष्य पूर्ण होऊच शकत नाही! अलिकडे या निकषांमध्ये आणखी एका गोष्टीची भर घालण्याची गरज निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे वीज! विचार करा, एखाद्याकडे तिन्ही गोष्टी आहेत, म्हणजे रोटी, कपडा आणि मकान पण वीज नाही आणि आपण कल्पना करू शकतो की या चौथ्या निकषाशिवाय आयुष्य किती खडतर होऊन जाईल!  दुर्दैवाने बांधकाम व्यवसाय आणि सरकार, ज्यांनी पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत, त्यांनी नेहमीच या महत्त्वाच्या निकषाकडे दुर्लक्ष केले आहे अन्यथा आज आपण या विषयावर चर्चा केली नसती. आजूबाजूला पहा आणि तुम्हाला दिसेल की विशेषतः गावांमध्ये आणि खेड्यांमध्ये बहुतांश विनोद हे एमएसईबीवर, आपल्या सरकारी विद्युतपुरवठा संस्थेवर केलेले असतात. मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद असा फुलफॉर्म करण्यापासून या विद्युतपुरवठा सेवेवर अनेक विनोद केलेले आढळून येतील. विनोद बाजूला सोडला तरी अशा विनोदांना मिळणारी लोकप्रियता सर्वसामान्यांचे आयुष्य विजेवर किती अवलंबून आहे, हेच दर्शवते.
विशेषतः शहरी जीवनात आपण विजेवर खूप अवलंबून असतो, नपेक्षा तिचे गुलाम असतो. आपले मोबाईल चार्ज करण्यासाठीही आपल्याला विजेची गरज भासते. बांधकाम व्यवसाय वाढत आहे कारण वाढत्या लोकसंख्येला घरांची गरज आहे, आणि या घरांना विजेची गरज आहे ही वस्तुस्थिती आहे. आपल्याकडे विद्युत पुरवठ्याची कमतरता आहे आणि उपलब्ध असलेला प्रत्येक युनिट नेमकपणाने आणि काळजीपूर्वक वापरावे  लागतो. विजेचा विषय असतो, तेव्हा दोन पैलूंकडे लक्ष द्यावे लागते आणि ते म्हणजे सुरक्षा आणि बचत! सामान्य माणसाला विजेबाबत फारसे काही कळत नाही, त्यामुळे साहजिकच तिचा वापर करताना अपघात होण्याची शक्यता असते आणि आपला अपघातांचा इतिहास असे सांगतो की त्यापैकी बहुसंख्य जीवघेणे असतात. तुम्ही आगींच्या इतिहासाचा अभ्यास केला तर व्यावसायिक किंवा रहिवासी इमारतींना आग लागण्यामागे मुख्य कारण हे इलेक्ट्रीक वायरिंग वाईट दर्जाचे असल्याचे दिसते आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होते आणि लक्षात घ्या वीज ही फार निर्दयी गोष्ट आहे असते! वायरिंग चुकीचे किंवा सदोष असेल तर तिथे दयामाया नसते आणि आपण तारा आणि बटणांसारख्या प्राथमिक गोष्टींमध्ये बचत करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याच्या कैकपट गमावू शकतो. तरीही अनेक विकासक निव्वळ दुर्लक्षापोटी बांधकामामध्ये इलेक्ट्रिकल सामानाच्या दर्जामध्ये तडजोड करतात ही वस्तुस्थिती आहे.

नपेक्षा तुम्ही बांधकाम व्यवसायातला कल पाहिला, तर काही अपवाद वगळता, बहुतांश बिल्डर्स विजेशी संबंधित संपूर्ण काम आउटसोर्स करतात, त्यामुळे त्यांचे या कामाच्या दर्जावर काही नियंत्रण राहत नाही. त्यांना असे वाटते की, आउटसोर्स केल्यामुळे वायरिंगच्या कामाच्या जबाबदारीपासून मुक्ती मिळते पण हा चांगला मार्ग नाही. तुम्ही आउटसोर्स केले तरी विद्युतकामाचे विशेष तपशील आणि डिझाईन याबद्दल तुम्ही आग्रही असले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तांत्रिकदृष्ट्या पात्र नसला तर उत्तम उपाय म्हणजे तुमच्या प्रकारच्या प्रकल्पांचा अनुभव असलेला इलेक्ट्रिकल कन्सल्टन्ट नेमणे. बांधकाम व्यवसायाबद्दल आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे ते ज्ञानी क्वचितच ओळखतात, त्याचा आदर करणे तर दूरच राहिले! या परंपरेला जागूनच क्वचितच एखादा बिल्डर इलेक्ट्रिकल कन्सल्टन्टची नेमणूक करतो आणि बहुतांश जण इलेक्ट्रिक कंत्राटदाराच्या सल्ल्याने काम करतात, अनेकदा हा कंत्राटदारच तांत्रिकदृष्ट्या पात्र नसतो! हा कल बदलत आहे आणि अनेक मोठ्या प्रकल्पांसाठी विशेष इलेक्ट्रिकल कन्सल्टन्ट नेमले जातात, ते पात्र असतात आणि त्यानुसार संपूर्ण वायरिंगचे काम करतात. पण हे प्रमाण फार कमी आहे.
इलेक्ट्रिकल कन्सल्टन्ट केबल आणि वायरच्या आकारानुसार सुरक्षित डिझाईनच तयार करतात असे नाही तर ते विद्युतगळतीही रोखतात. कंत्राटदार तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसला तर सदोष आकाराच्या केबल निवडू शकतो, भविष्यात होऊ शकणाऱ्या अपघातांचे ते एक मुख्य कारण असू शकते.  तसेच वायरिंगची आकृती, केबलचा मार्ग आणि वर्कमॅनशिपचे तपशीलही महत्त्वाचे असतात. तसेच सर्व वायरिंगसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिकल लेआउट आखणे आवश्यक असते. यामुळे विद्युतकाम तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण होईल आणि बिल्डिंग कोणत्याही अपघातापासून सुरक्षित राहील. यामुळे विजेच्या वापरातही बचत होईल, कारण विशिष्ट जागेसाठी किती प्रकाश आवश्यक आहे याचा अभ्यास आवश्यक असतो आणि ते जागेचे उद्दिष्ट किंवा वापर यासारख्या विविध निकषांवर अवलंबून असतो. सारख्याच क्षेत्रफळासाठी व्यावसायिक इमारतींमध्ये प्रकाशाची वेगळी गरज असेल आणि रहिवासी इमारतींमध्ये वेगळी. कन्सल्टन्ट इमारतीच्या इलेक्ट्रिकल डिझाईनिंगचे असे सर्व पैलू लक्षात घेतो. आपल्या देशात ऊर्जा महाग आहे आणि ती नेमकेपणाने वापरली पाहिजे आणि त्यासाठी इलेक्ट्रिकल वायरिंगचे योग्य डिझाईनिंग आवश्यक आहे.
विजेच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे एमएसईडीसीएलबरोबर, म्हणजे एमएसईबीच्या अधिकाऱ्यांबरोबर संबंध ठेवणे, कारण राज्यात वीज या संस्थेमार्फतच मिळते. आज मंडळावर (एमएसईबीचे लोकप्रिय नाव) समाजाच्या सर्व घटकांना वीजपुरवठ्याच्या मोठ्या मागणीची पूर्तता करण्याचा खूप दबाव आहे. स्रोत मर्यादित आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभ्या करण्याचा खर्च प्रचंड मोठा आहे. यामुळे पुरवठा विरुद्ध मागणी या समीकरणावर फरक पडतो, विशेषतः पुण्यासारख्या शहरांमध्ये आणि तुम्हाला प्रतिमीटर विद्युत दर खर्चावरून अधिकारी आणि विकासकांदरम्यान संघर्ष होताना दिसेल! इथे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरची भूमिका महत्त्वाची असते कारण अनेक कन्सल्टन्ट एमएसईबीकडून लोड मंजूर करून घेण्याची जबाबदारी घेत नाहीत. सध्या कोणत्याही प्रकल्पासाठी लोड मंजुरीचे निश्चित नियम नाहीत, पण ते क्षेत्रफळाप्रमाणे वीजेच्या उपलब्धतेनुसार आणि त्या भागात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांप्रमाणे बदलतात. बांधकाम उद्योगासाठी ही खचितच निरोगी स्थिती नाही. कारण, विद्युतपुरवठ्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबत पारदर्शकता नसते आणि त्याचा अंतिम फटका फ्लॅटच्या मालकालाच बसतो, कारण त्यालाच सर्व खर्च पेलावा लागतो. इलेक्ट्रिकल कंत्राटदारांच्या संघटनेने पुढाकार घ्यावा आणि लोड मंजुरीच्या नियमांबाबत सौहार्दाने उपाय शोधण्यासाठी मंडळ व विकासकादरम्यान पूल बनावे. एखाद्या विशिष्ट भागात होऊ घातलेले प्रकल्प एकत्र येऊन त्या भागापुरता एमएसईबीचा पायाभूत सुविधांचा खर्च वाटून घेऊ शकतात आणि या ठिकाणी इलेक्ट्रिकल कंत्राटदार/कन्सल्टन्टची असोसिएशन महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तसेच लोड कॅलक्युलेशनसंबंधी आणि ती कशी करतात यासंबंधी खूप जागृतीची गरज आहे कारण अनेक विकास कंत्राटदाराच्या सांगण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि  ते सांगतील तसे करतात. या ठिकाणी कन्सल्टन्ट नक्की मदत करू शकतात कारण ते विद्युत कामाच्या दर्जावर देखरेखही ठेवू शकतात.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्युत कामासंबंधी स्थापत्य अभियंते किंवा साईट पर्यवेक्षकाचा दृष्टीकोन; असे दिसते की त्यांना विद्युतकामाबद्दल काहीही घेणेदेणे नसते. आतापर्यंतच्या शिक्षणामध्ये त्यांना वीजेसंबंधीचे फारसे ज्ञान मिळालेले नसते हे मान्य पण प्रत्येकाने चौकस असले पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजे तरच त्या गोष्टीचे ज्ञान मिळेल! इथेही बऱ्याच प्रशिक्षणाची गरज असते आणि इलेक्ट्रिकल कंत्राटदार तसेच कन्सल्टन्ट एखादा प्रशिक्षण वर्ग घेऊ शकतात. अखेर साईटच्या प्रमुखालाच साईटवरच्या कामाला मान्यता देणारा अंतिम अधिकार असतो.
आणखी एक दुर्लक्षित बाब म्हणजे ऊर्जाबचत करणाऱ्या उपकरणांच्या आणि त्यासंबंधीच्या तंत्रज्ञानाच्या जागृतीचा अभाव, कारण ही काळाची गरज आहे. पण इथेही दोन्ही बाजू म्हणजे कंत्राटदार तसेच विकासक या दोघांनाही पुरेशी माहिती नसते आणि वीजेचा मुद्दा आला म्हणजे आपण अजूनही पारंपरिक पद्धती आणि उपकरणांचा वापर करतो. ऊर्जाबचत करणाऱ्या एलईडीसारख्या वस्तूंसाठी परिपूर्ण वायरिंग नेटवर्क डिझाईनची गरज असते अथवा देखभालीचा खर्च फार जास्त वाढतो. तसेच बॅटरीवर चालणारी वाहने हा भविष्यकाळ आहे त्यामुळे आपल्या इलेक्ट्रिकल योजना डिझाईन करताना आपल्याला अशी वाहने चार्ज करण्यासाठी लागणारा लोड, तसेच चार्जिंगची सुविधा यांचाही विचार करावा लागणार आहे. तसेच इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत व बाह्य वायरिंगसाठी या सर्व योजनांची नोंद केली पाहिजे आणि रहिवाशांना दिली पाहिजे, म्हणजे कधी काही दुरुस्तीची वेळ आल्यास त्यांना समस्या येणार नाही. शेवटच्या वापरकर्त्यालाही या महत्त्वाच्या पैलूची माहिती असली पाहिजे आणि यासंबंधीचे विशिष्ट तपशील विकासकाला विचारून घेतले पाहिजेत, कारण ही बाब म्हणजे थेट इमारतीच्या सुरक्षेशी संबंधित आहे.
फक्त भरपूर इलेक्ट्रिक पॉइंट्स दिले म्हणजे आपण चांगले काम केले असे होत नाही, कारण उद्गारात म्हटल्याप्रमाणे त्याने फक्त खोल्या प्रकाशमान होतील पण आपल्याला या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे चेहरे आणि त्यांचे भविष्यही उजळवायचे आहे. तरच आपण म्हणू शकतो की, हो आम्हाला वीज ही संज्ञा कळली आहे!

संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स

Saturday, 21 September 2013

तुमचा माझा नाही गणपती हा आपला आहे !




















संवादातूनच समाज निर्माण होतो, संवाद म्हणजेच एकमेकांना समजून घेणे, जवळीक व परस्परांचा आदर... रोलो मे


या महान अमेरिकी मानसशास्त्रज्ञाने कोणताही समुदाय एकजूट राहण्यामागचे यश अतिशय समर्पक शब्दात सांगितले आहे व नुकतेच आमच्याच एका पूर्ण झालेल्या अष्टगंध या प्रकल्पामध्ये गणेशोत्सव स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाच्यावेळी मी याचा अनुभव घेतला. एखादा उत्सवही कसा चमत्कार करु शकतो, हे यातून मला कळले व पुण्याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर इथे गणेशोत्सव दिवाळीपेक्षाही उत्साहात साजरा होतो. हा सण केवळ गोडधोड बनवून आप्तेष्ठांसोबत मौजमजा करायचा नाही, तर हा सण म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाने एकत्र येण्याचे व्यासपीठ झाले आहे व अशाच प्रसंगांमधून एकत्र येणाऱ्या लोकांमुळेच एक सुदृढ समाज बनतो!

अष्टगंध हा केवळ तीस सदनिकांचा लहान प्रकल्प आहे, गणेशोत्सवामध्ये त्यांच्यासोबत शेजारची रो हाउसही सहभागी झाली होती. या छोटेखानी सोहळ्यात, संकुलाच्या सचिवांनी माझे स्वागत केले व अशाप्रकारे पहिल्यांदाच संयुक्तपणे उत्सव साजरा करत असल्याची माहिती मला दिली, तीन इमारतींपैकी एकीच्या पार्किंगमध्येच मंडप घालण्यात आला होता. सात दिवस त्यांनी नागरिकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्या सर्व वयोगटातील मुले, महिला, पुरुष यांच्यासाठी होत्या. मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये झाडांचे महत्व असा पर्यावरणाची जाणीव निर्माण करणारा विषय देण्यात आला होता, याशिवाय फॅन्सी ड्रेसचेही आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी पाककला व रांगोळी स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संकुलातील काही तरुण मुलांनीच हे सर्वकाही आयोजित केले होते व त्यांना काही ज्येष्ठ सदस्यांनी मदत केली. या सोहळ्याची सांगता सर्व सहभागिंना पारितोषिक देऊन, मुलांचे नृत्य व त्यानंतर दुपारचे जेवण अशाप्रकारे झाली. हा अतिशय साधा व घरगुती सोहळा होता, त्यामध्ये कोणतीही आरास किंवा दिव्यांचा झगमगाट नव्हता. पार्किंगमध्ये मुलांनीच तयार केलेल्या मंचावर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती, बाजूच्या भिंती रंगीत कापड व फुलांनी झाकण्यात आल्या होत्या. माझ्या मते यातच कार्यक्रमाचे यश दडलेले होते, कारण संपूर्ण घरगुती सजावट व एकूण वातावरणामुळे सगळेजण सहज वावरत होते. खरंतर असे उत्सव पुण्यात सगळीकडेच दिसतात, त्यात विशेष असे काही नाही, कारण पुण्यात हजारो गृहसंकुलांमध्ये अशाप्रकारे गणेशोत्सव साजर होत असेल. या गणेशोत्सवामध्ये आणखी अशाच एका इमारतीमधील कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. माझा मित्र राहात असलेल्या त्या इमारतीमधील रहिवाशांनी मला आमंत्रित केले होते, तिथे मी कान्हा जंगलाविषयी स्लाईड शो सादर केला. तिथे पाच ते पंच्याहत्तर वयोगटातील तीसएक मंडळी जमली होती! माझ्यासाठीही तो एक नवीन अनुभव होता. ज्या उत्साहाने व आनंदाने ते उत्सवात सहभागी झाले होते ते पाहणे एक सुखद अनुभव होता आणि सार्वजनिक गणोशोत्सवातून हेच अपेक्षित आहे, लोकमान्य टिळकांनी शंभराहून अधिक वर्षांपूर्वी यासाठीच त्याची सुरुवात केली. आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की सार्वजनिक गणेशोत्सवातून लोकसंग्रह हा हेतू मागे पडत चाललाय व दिवसेंदिवस त्याचे स्वरुप अधिक व्यावसायिक होत आहे, तो केवळ काही मूठभर कार्यकर्त्यांचा मेळावा समजला जाऊ लागला आहे. अशावेळी या इमारतींमधल्या नागरिकांनी एकत्र येऊन केलेल्या छोटेखानी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे हा हृद्य अनुभव होता. या कार्यक्रमांना ख-या अर्थाने सामाजिक कार्यक्रम म्हणता येईल. माझ्या भावनांविषयी सांगायचे झाले तर, आपण पूर्ण केलेल्या इमारतीच्या नागरिकांनी आपल्याला बोलावणे व काही चांगले काम केले म्हणून सन्मानित करणे याशिवाय एखाद्या बांधकाम व्यावसायिकासाठी अभिमानाची बाब कोणती असू शकते! या व्यवसायामध्ये बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्या नात्यातील कटुता पाहता असे दृश्य विरळच!

आपल्यापैकी बरेचजण आजकाल अभिमानाने सांगतात आमचे शेजारी कोण आहेत हे आम्हाला माहिती नाही, मग शेजारच्या घरात काय बरेवाईट चालले आहे हे कसे माहिती असणार. पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी असल्याचे बिरुद मिरवते, एकेकाळी वाड्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या या शहरात कोठल्या घरात कोठली भाजी बनते आहे हे सुद्धा परिसरात सर्वांना माहिती असायचे, एकाच गल्ली-बोळात राहणा-या कुटुंबामध्ये असे प्रेम व जिव्हाळ्याचे नाते होते. मात्र आता माझ्याकडे सदनिका आरक्षित करण्यासाठी जी जोडपी येतात, त्यांना आपले शेजारी कोण आहेत वगैरे माहितीत काहीही रस नसतो. त्यांना केवळ सदनिकांमध्ये कोणत्या सोयी-सुविधा आहेत व त्यांचे तपशील हवे असतात, इमारतीमध्ये इतर कोण राहायला येणार आहे हे त्यांना जाणून घ्यायचे नसते! हे त्यांचे आयुष्यभराचे शेजारी होणार असतात मात्र सुरुवातीपासून त्यांच्याविषयी एवढे अज्ञान असते! एक विकासक म्हणून आमचे कर्मचारीही त्यांना ही माहिती देण्याची तसदी घेत नाहीत हे देखील सत्य आहे. आपले जीवन आधीच यांत्रिक झाले आहे व उपकरण केंद्रित होत चालले आहे; वॉट्सऍप, चॅट व एफबीमध्ये परस्पर संवाद हरवत चालला आहे. अशावेळी एकत्र राहणा-या व्यक्तिंमधला परस्पर संबंधांचा कमकुवत होत चाललेला धागा गणेशोत्सवासारख्या उत्सवांनी मजबूत होऊ शकतो. मी जाणीवपूर्वक एकत्र राहणा-या असा शब्द वापरला आहे, एकत्र जगणा-या असा नाही कारण या दोन्हींमध्ये मोठा फरक आहे. एकत्र राहताना तुम्ही केवळ शरीराने एकत्र असता, मात्र जेव्हा तुम्ही एकत्र जगता तेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला राहणा-या लोकांचाही विचार करता. तुम्ही इतरांच्या समस्यांविषयी काळजी करता व त्यांच्या आनंदात सहभागी होता. तुम्ही तुमच्या शेजा-यांना मदत करता व बदल्यात ते देखील तुम्हाला जीवनातील प्रत्येक प्रसंगी पाठिंबा देतात, यालाच एकत्र जगणे म्हणतात!

रिअल इस्टेट विकासक म्हणून मला नेहमी प्रश्न पडतो की घर कशाने बनते, आपण ज्या इमारती बांधतो त्यामधून, किंवा त्यामध्ये राहणा-या लोकांनी किंवा आपण ज्या सोयी-सुविधा देतो त्यामुळे? घर नेमके कशाने बनते? माझ्या मते मला अष्टगंधच्या गणेशोत्सवात त्याचे उत्तर सापडले, जेथे सर्व नागरिक वय, प्रतिष्ठा इत्यादी ऐहीक गोष्टींचा विचार न करता उत्सवासाठी एकत्र आले व या बंधुभावातूनच घर तयार होते. घर म्हणजे केवळ चार भिंती, आणि एखाद्या व्यक्तिच्या पसंतीची अंतर्गत सजावट नव्हे, तर ती आपण आपल्याभोवती बांधलेल्या काँक्रिटच्या भिंतींना  भेदून पलीकडे जाणारी भावना असते, जिची आपण आपल्या सभोवताली राहणा-या लोकांशी देवाणघेवाण करतो व त्यालाच आपण शेजारही म्हणतो! आणि असे असेल तरच आम्हाला अभिमानाने नमूद करता येईल की आमच्या सोसायटीतील लोक घरांमध्ये राहतात, केवळ आलिशान सदनिकांमध्ये नाही!

आपल्या आजूबाजूला अशा अधिकाधिक अष्टगंध सोसायटी तयार व्हायला हव्यात, यातूनच समाजाचे चांगले भविष्य घडणार आहे. गणेशोत्सवासारख्या उत्सवातून तुझे व माझे ही भावना जाते व आमचे ही भावना निर्माण होते! विकासकाच्या भूमिकेतून आपण अशा कार्यक्रमांना अनेक प्रकारे पाठिंबा देऊ शकतो, त्यात आर्थिक मदत हा भाग आहेच, ती दिली तर त्याचे स्वागतच आहे मात्र त्याशिवायही आपण आपल्या मार्केटिंग चमूस आपल्या पूर्ण झालेल्या प्रकल्पातील नागरिकांमध्ये या संकल्पनेचा प्रसार करण्यास सांगू शकतो. केवळ इमारत बांधल्यानेच नाही तर अशा बंधुभाव वाढवणा-या संकल्पनांचा प्रसार करुनच आपण ख-या अर्थाने प्रवर्तक होऊ शकू! या दिशेने कुणीतरी पाऊल उचलण्याची गरज आहे. लोक एकत्र आले, त्यांच्यात संवाद होऊ लागला की सोसायटीच्या देखभाल किंवा व्यवस्थापन खर्चासारख्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. हे पहिले पाऊल टाकण्यासाठी गणेशोत्सवाशिवाय दुसरे चांगले निमित्त कोणते असू शकते! रोलो मे याने म्हटल्याप्रमाणे, आपण बांधलेल्या इमारतींमध्ये ही संस्कृती निर्माण करण्याची जबाबदारी विकसक म्हणून आपली आहे. असे झाले तरच आपण स्वतःला अभिमानाने विकसक म्हणू शकू, नाहीतर आपण केवळ काँक्रिटच्या इमारती बांधणारी यंत्रे होऊ, त्यातून पैसे कमवू व सरतेशेवटी आपल्याच हातून समुदाय, समाज यासारख्या संकल्पना नष्ट होतील, अशावेळी गणपतीबाप्पाही आपल्या समाजाला तारु शकणार नाहीत!



संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स



Tuesday, 17 September 2013

प्रिय रोहित , तुझी पहिली बाईक घेताना !

















तुम्ही बाईकवरुन पडाल याची काळजी केली तर तुम्ही त्यावर कधीही चढणार नाही..लांस आर्मस्ट्राँग

प्रिय रोहित, त्या महान व दुर्दैवी खेळाडूचे वरील विधान सायकल संदर्भात असले तरीही तुम्ही चालवता त्या प्रत्येक दुचाकीसाठी ते लागू होते! आज तुला तुझी स्वतःची पहिली बाईक मिळाली, तू नक्कीच त्याविषयी अतिशय उत्साही, आनंदी असशील व का नसावे! तू तुझ्या चकचकीत काळ्या  रंगाच्या सीबीआर २५० कडे पाहात होतास तेव्हा माझ्या बालपणीची काही दृश्ये मला आठवली…. त्यातील पहिले म्हणजे खामगाव नावाच्या छोट्याशा गावात मी १३ वर्षांचा असताना कुटुंबाने लुना खरेदी करायचे ठरविले तेव्हा वडिलांसोबत शोरुममध्ये गेलो होतो! तेव्हा लुना अतिशय लोकप्रिय होती व वडिलांना परवडेल अशी कदाचित एकमेव गाडी होती, ते डबल सीट चालवायला शिकले नसल्यामुळे ते शोरुममधून लुना चालवत आणत होते व त्यांच्यासोबत मी घरापर्यंत पळत आलो! मला ते पळणे अजूनही आठवत आहे, तुझ्या अब्बूंना म्हणजे आजोबांना कदाचित तो प्रसंग आता आठवतही नसेल! त्यानंतर अनेक वर्षे मी ती लुना साफ करत असे, ती स्टँडवर लावलेली असताना, बाबा आजूबाजूला नसल्यावर हळूच तिच्यावर बसत असे! मी १६ वर्षांचा असताना अभियांत्रिकीला प्रवेश घेतला व पुण्याला आलो, तेव्हा चालक परवान्याचे वय १८ वर्षे होते, त्यामुळे तेव्हा जुन्याच लेडीज सायकलने सगळीकडे फिरायचो व एक दिवस स्वतःची बाईक मिळेल अशी वाट पाहायचो. त्यानंतर १८ वर्षांचा झाल्यावर तीच घरातील जुनी लुना पुण्याला पाठवण्यात आली, तेव्हा मी अभियांत्रिकीच्या  तिस-या वर्षाला होतो. मला अजूनही आठवते आहे, माझी लुना महाराष्ट्र एक्सप्रेसने येणार होती व तिला आणण्यासाठी मी पावसाळ्यातील सकाळी पुणे रेल्वेस्थानकावर गेलो होतो. ती आली तेव्हा तिची टाकी रिकामी होती त्यामुळे सायकलिंग करत तिला जवळच्या पेट्रोल पंपावर नेले व तेव्हा पहिल्यांदा स्वतःच्या लुनामध्ये पेट्रोल भरण्याचा आनंद अवर्णनीय होता व आजही मला आठवते , सात रुपये पेट्रोल होते तेव्हा!

ते यामाहा, टीव्हीएस सुझुकी, हिरो होंडा व कावासाकी बजाज यांच्या पहिल्या पिढीतील बाईकचे युग होते; आमचे कॉलेज म्हणजे एमआयटी नव्या बाईकने फुलून गेलेले असायचे, व माझ्याकडेही एकदिवस अशी बाईक असेल असे स्वप्न मी दररोज बघायचो. ब-याचदा मी आणि मिलिंद हेडाऊ काका आम्ही कर्वेरोडच्या वा जे. एम. रोडच्या शोरुमच्या बाहेर उभे राहून नव्या बाईक न्याहाळत असू, पण मी माझ्या आईवडिलांकडे मला एखादी बाईक घेऊन द्या म्हणून कधीही हट्ट केला नाही कारण ते त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे याची मला कल्पना होती! माझ्या साथीदाराकडे कायनेटिक होंडा होती, मी ती देखील कधी चालवली नाही कारण चुकूनही माझ्यामुळे तिला अपघात झाला तर मी ती दुरुस्त करु शकणार नाही हे मला माहिती होते. यातली सर्वात चांगली बाब म्हणजे मला कोणत्याही किशोरवयीन मुलाप्रमाणे बाईकचे वेड होते मात्र माझ्याकडे एखादी नाही म्हणून मला कधीही वाईट वाटले नाही! पुण्यातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तेव्हाही  वाईट होती व बससाठी तासंतास वाट पाहावी लागायची, कारण घरुन मर्यादितच पैसे यायचे अशावेळी मित्रांसोबत चित्रपट पाहायचा असेल व बाहेर खायचे असेल तर ब-याचदा पेट्रोलला भरण्याला दुय्यम प्राधान्य दिले जायचे!

मला नोकरी लागली तेव्हा प्रिया स्कूटरच्या रुपाने मला पहिली व शेवटची बाईक मिळाली, व त्यावेळी सुद्धा माझ्याकडेही ती घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते व माझे आईवडिलही मला तेवढे पैसे पाठवू शकत नव्हते. त्यावेळी केदारच्या आईने म्हणजे शशी मावशीने मला माझी स्कूटर घेण्यासाठी कर्ज दिले व मला शेवटी माझी स्कूटर घेता आली, जी मिरवू शकत होतो! घरी ती स्कूटर असतांनाच माझे लग्नही झाले व ती स्कूटर आईच्या व माझ्या सुरुवातीच्या दिवसातील भटकंतीची साक्षीदार आहे! त्यानंतर मग मी कार घेतली, कामाचा ताण वाढल्यामुळे मग ड्रायव्हरही आला व अशा प्रकारे माझे बाईक चालविण्याचे स्वप्न व दिवस दोन्ही संपले!  
तू बाईक घेण्यासाठी शोरुममध्ये येण्यापूर्वी तिथे ठेवलेल्या बाईक पाहताना आज ती सगळी दृश्ये माझ्या डोळ्यासमोर पुन्हा उभी राहिली. मला माहिती होते की तुला काळ्या रंगाची बाईक हवी होती, त्यामुळे सागरसारख्या चांगल्या मित्राच्या मदतीने मी तशी सोय करु शकलो व तुम्ही जी मैत्री व नातेसंबंध जपता ती अशा वेळी लाख मोलाची ठरतात हे मला जाणवले. जीवनाच्या या टप्प्यावर मी असे म्हणत नाही की मी सगळे काही शिकलो आहे मात्र मी ब-याच गोष्टी पाहिल्या आहेत, चांगल्या व वाईट व त्या तुम्हाला सांगत आलोय आणि रोहन तुला कदाचित त्यांचे महत्व आता समजणार नाही मात्र कधीतरी नक्की समजेल.

लक्षात ठेव आज तुला मिळालेली बाईक एक जबाबदारीही आहे, तिच्यामुळे तू अशा थोडक्या भाग्यवान किशोरांच्या गटात समील झाला आहेस ज्यांना ज्या वयात जे हवे आहे ते त्याच वयात मिळाले आहे! तू कदाचित म्हणशील, त्यात काय एवढे, अनेक किशोरांकडे तुझ्यापेक्षाही चांगल्या बाईक आहेत, अगदी हार्ले डेव्हिडसनही आहे! मात्र  त्याच वेळेस लाखो मुलांकडे साधी सायकलही नाही, हे देखील सत्य आहे! त्यामुळे तू जेव्हा तुझी बाईक चालविण्याचा आनंद उपभोगत असशील तेव्हा जे तुझ्याएवढे भाग्यवान नाहीत त्यांची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे हे नेहमी लक्षात ठेव.

मी तुझा वडील आहे व चाळीशीच्या मध्यावर आहे म्हणून तुला सांगतो की वेग चांगला असतो मात्र धोकादायकही असतो, म्हणूनच काळजीपूर्वक बाईक चालव व इतरांच्या जिवाचीही काळजी घे. या शहरातील वाहतुकीची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे व आम्हाला तुझी काळजी वाटते एवढेच मला सांगायचे आहे!

लांस आर्मस्ट्राँगने म्हटल्याप्रमाणे, कधीही कोणतेही आव्हान अथवा जबाबदारी स्वीकारायला घाबरु नकोस, तरच त्यास सामोरे जाता येईल किंवा ते स्वीकारता येईल! सर्वात शेवटी तुझ्यासाठी अभिमानाची बाब असलेल्या बाईकचे स्वप्न मला पूर्ण करण्याची संधी दिलीस म्हणून मी तुझा आभारी आहे, खरेतर तुझ्या डोळ्यांनी मी माझेच स्वप्न पूर्ण होताना पाहात होतो! मजा कर आणि काळजी घे

बाबा



संजय देशपांडे