संवादातूनच
समाज निर्माण होतो, संवाद म्हणजेच एकमेकांना समजून घेणे, जवळीक व परस्परांचा आदर...
रोलो मे
या महान
अमेरिकी मानसशास्त्रज्ञाने कोणताही समुदाय एकजूट राहण्यामागचे यश अतिशय समर्पक शब्दात
सांगितले आहे व नुकतेच आमच्याच
एका पूर्ण झालेल्या अष्टगंध या प्रकल्पामध्ये गणेशोत्सव स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाच्यावेळी
मी याचा अनुभव घेतला. एखादा उत्सवही कसा चमत्कार करु शकतो, हे यातून मला कळले व पुण्याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर इथे
गणेशोत्सव दिवाळीपेक्षाही उत्साहात साजरा होतो. हा सण
केवळ गोडधोड बनवून आप्तेष्ठांसोबत मौजमजा करायचा नाही, तर हा सण म्हणजे समाजातल्या
प्रत्येक घटकाने एकत्र येण्याचे व्यासपीठ झाले आहे व अशाच प्रसंगांमधून एकत्र येणाऱ्या
लोकांमुळेच एक सुदृढ समाज बनतो!
अष्टगंध
हा केवळ तीस सदनिकांचा
लहान प्रकल्प आहे, गणेशोत्सवामध्ये त्यांच्यासोबत शेजारची रो हाउसही सहभागी झाली होती. या
छोटेखानी सोहळ्यात, संकुलाच्या सचिवांनी माझे स्वागत केले व अशाप्रकारे पहिल्यांदाच
संयुक्तपणे उत्सव साजरा करत असल्याची माहिती मला दिली, तीन इमारतींपैकी एकीच्या पार्किंगमध्येच
मंडप घालण्यात आला होता. सात दिवस त्यांनी नागरिकांसाठी
विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्या सर्व वयोगटातील मुले, महिला, पुरुष यांच्यासाठी
होत्या. मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये झाडांचे महत्व
असा पर्यावरणाची जाणीव निर्माण करणारा विषय देण्यात आला होता, याशिवाय फॅन्सी ड्रेसचेही
आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी पाककला व
रांगोळी स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संकुलातील काही तरुण मुलांनीच हे सर्वकाही
आयोजित केले होते व त्यांना काही ज्येष्ठ सदस्यांनी मदत केली. या
सोहळ्याची सांगता सर्व सहभागिंना पारितोषिक देऊन, मुलांचे नृत्य व त्यानंतर दुपारचे
जेवण अशाप्रकारे झाली. हा अतिशय साधा व घरगुती
सोहळा होता, त्यामध्ये कोणतीही आरास किंवा दिव्यांचा झगमगाट नव्हता. पार्किंगमध्ये
मुलांनीच तयार केलेल्या मंचावर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती, बाजूच्या भिंती
रंगीत कापड व फुलांनी झाकण्यात आल्या होत्या. माझ्या
मते यातच कार्यक्रमाचे यश दडलेले होते, कारण संपूर्ण घरगुती सजावट व एकूण वातावरणामुळे सगळेजण सहज वावरत होते. खरंतर असे उत्सव पुण्यात सगळीकडेच दिसतात,
त्यात विशेष असे काही नाही, कारण पुण्यात हजारो गृहसंकुलांमध्ये अशाप्रकारे गणेशोत्सव
साजर होत असेल. या गणेशोत्सवामध्ये आणखी अशाच एका इमारतीमधील
कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. माझा मित्र राहात असलेल्या त्या इमारतीमधील
रहिवाशांनी मला आमंत्रित केले होते, तिथे मी कान्हा जंगलाविषयी स्लाईड शो सादर केला.
तिथे पाच ते पंच्याहत्तर वयोगटातील तीसएक मंडळी जमली होती! माझ्यासाठीही
तो एक नवीन अनुभव होता. ज्या उत्साहाने व आनंदाने
ते उत्सवात सहभागी झाले होते ते पाहणे एक सुखद अनुभव होता आणि सार्वजनिक गणोशोत्सवातून
हेच अपेक्षित आहे, लोकमान्य टिळकांनी शंभराहून अधिक वर्षांपूर्वी यासाठीच त्याची सुरुवात
केली. आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की सार्वजनिक गणेशोत्सवातून लोकसंग्रह हा हेतू मागे
पडत चाललाय व दिवसेंदिवस त्याचे स्वरुप अधिक व्यावसायिक होत आहे, तो केवळ काही मूठभर
कार्यकर्त्यांचा मेळावा समजला जाऊ लागला आहे. अशावेळी या इमारतींमधल्या नागरिकांनी
एकत्र येऊन केलेल्या छोटेखानी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे हा हृद्य अनुभव होता. या
कार्यक्रमांना ख-या अर्थाने सामाजिक कार्यक्रम म्हणता येईल. माझ्या भावनांविषयी सांगायचे
झाले तर, आपण पूर्ण केलेल्या इमारतीच्या नागरिकांनी आपल्याला बोलावणे व काही चांगले
काम केले म्हणून सन्मानित करणे याशिवाय एखाद्या बांधकाम व्यावसायिकासाठी अभिमानाची
बाब कोणती असू शकते! या व्यवसायामध्ये बांधकाम
व्यावसायिक व ग्राहक यांच्या नात्यातील कटुता पाहता असे दृश्य विरळच!
आपल्यापैकी
बरेचजण आजकाल अभिमानाने सांगतात आमचे शेजारी कोण आहेत हे आम्हाला माहिती नाही, मग शेजारच्या
घरात काय बरेवाईट चालले आहे हे कसे माहिती असणार. पुणे
राज्याची सांस्कृतिक राजधानी असल्याचे बिरुद मिरवते, एकेकाळी वाड्यांचे शहर म्हणून
ओळखल्या जाणा-या या शहरात कोठल्या घरात
कोठली भाजी बनते आहे हे सुद्धा परिसरात सर्वांना माहिती असायचे, एकाच गल्ली-बोळात
राहणा-या कुटुंबामध्ये असे प्रेम व जिव्हाळ्याचे नाते होते. मात्र
आता माझ्याकडे सदनिका आरक्षित करण्यासाठी जी जोडपी येतात, त्यांना आपले शेजारी कोण
आहेत वगैरे माहितीत काहीही रस नसतो. त्यांना
केवळ सदनिकांमध्ये कोणत्या सोयी-सुविधा आहेत व त्यांचे तपशील हवे असतात, इमारतीमध्ये
इतर कोण राहायला येणार आहे हे त्यांना जाणून घ्यायचे नसते! हे
त्यांचे आयुष्यभराचे शेजारी होणार असतात मात्र सुरुवातीपासून त्यांच्याविषयी एवढे अज्ञान
असते! एक
विकासक म्हणून आमचे कर्मचारीही त्यांना ही माहिती देण्याची तसदी घेत नाहीत हे देखील
सत्य आहे.
आपले जीवन आधीच यांत्रिक झाले आहे व उपकरण केंद्रित होत चालले
आहे; वॉट्सऍप, चॅट व एफबीमध्ये परस्पर संवाद हरवत
चालला आहे. अशावेळी एकत्र राहणा-या व्यक्तिंमधला परस्पर
संबंधांचा कमकुवत होत चाललेला धागा गणेशोत्सवासारख्या उत्सवांनी मजबूत होऊ शकतो. मी जाणीवपूर्वक
एकत्र राहणा-या असा शब्द वापरला आहे, एकत्र जगणा-या असा नाही कारण या दोन्हींमध्ये
मोठा फरक आहे. एकत्र राहताना तुम्ही केवळ शरीराने एकत्र असता,
मात्र जेव्हा तुम्ही एकत्र जगता तेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला राहणा-या लोकांचाही
विचार करता. तुम्ही इतरांच्या समस्यांविषयी काळजी करता
व त्यांच्या आनंदात सहभागी होता. तुम्ही तुमच्या शेजा-यांना
मदत करता व बदल्यात ते देखील तुम्हाला जीवनातील प्रत्येक प्रसंगी पाठिंबा देतात, यालाच
एकत्र जगणे म्हणतात!
रिअल
इस्टेट विकासक म्हणून मला नेहमी प्रश्न पडतो की घर कशाने बनते, आपण ज्या इमारती बांधतो
त्यामधून, किंवा त्यामध्ये राहणा-या लोकांनी किंवा आपण ज्या सोयी-सुविधा देतो त्यामुळे? घर
नेमके कशाने बनते? माझ्या मते मला अष्टगंधच्या
गणेशोत्सवात त्याचे उत्तर सापडले, जेथे सर्व नागरिक वय, प्रतिष्ठा इत्यादी ऐहीक गोष्टींचा विचार न करता उत्सवासाठी एकत्र आले
व या बंधुभावातूनच घर तयार होते. घर म्हणजे केवळ चार भिंती,
आणि एखाद्या व्यक्तिच्या पसंतीची अंतर्गत सजावट नव्हे, तर ती आपण आपल्याभोवती बांधलेल्या
काँक्रिटच्या भिंतींना भेदून पलीकडे जाणारी भावना असते, जिची आपण आपल्या सभोवताली
राहणा-या लोकांशी देवाणघेवाण करतो व त्यालाच आपण शेजारही म्हणतो! आणि
असे असेल तरच आम्हाला अभिमानाने नमूद करता येईल की आमच्या सोसायटीतील लोक घरांमध्ये
राहतात, केवळ आलिशान सदनिकांमध्ये नाही!
आपल्या
आजूबाजूला अशा अधिकाधिक अष्टगंध सोसायटी तयार व्हायला हव्यात, यातूनच समाजाचे चांगले
भविष्य घडणार आहे. गणेशोत्सवासारख्या उत्सवातून
“तुझे व माझे ” ही भावना जाते व “आमचे” ही
भावना निर्माण होते! विकासकाच्या भूमिकेतून
आपण अशा कार्यक्रमांना अनेक प्रकारे पाठिंबा देऊ शकतो, त्यात आर्थिक मदत हा भाग आहेच,
ती दिली तर त्याचे स्वागतच आहे मात्र त्याशिवायही आपण आपल्या मार्केटिंग चमूस आपल्या पूर्ण झालेल्या प्रकल्पातील नागरिकांमध्ये
या संकल्पनेचा प्रसार करण्यास सांगू शकतो. केवळ
इमारत बांधल्यानेच नाही तर अशा बंधुभाव वाढवणा-या संकल्पनांचा प्रसार करुनच आपण ख-या
अर्थाने प्रवर्तक होऊ शकू! या दिशेने कुणीतरी पाऊल
उचलण्याची गरज आहे. लोक एकत्र आले, त्यांच्यात
संवाद होऊ लागला की सोसायटीच्या देखभाल किंवा व्यवस्थापन खर्चासारख्या गुंतागुंतीच्या
समस्या सोडवल्या जाऊ शकतात. हे पहिले पाऊल टाकण्यासाठी
गणेशोत्सवाशिवाय दुसरे चांगले निमित्त कोणते असू शकते! रोलो
मे याने म्हटल्याप्रमाणे, आपण बांधलेल्या इमारतींमध्ये ही संस्कृती निर्माण करण्याची
जबाबदारी विकसक म्हणून आपली आहे. असे झाले तरच आपण स्वतःला
अभिमानाने विकसक म्हणू शकू, नाहीतर आपण केवळ काँक्रिटच्या इमारती बांधणारी यंत्रे होऊ,
त्यातून पैसे कमवू व सरतेशेवटी आपल्याच हातून समुदाय, समाज यासारख्या संकल्पना नष्ट
होतील, अशावेळी गणपतीबाप्पाही आपल्या समाजाला
तारु शकणार नाहीत!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment