मी जेव्हा काही क्षण समुद्र किना-यावर किंवा डोंगरांवर किंवा एखाद्या शांत जंगलामध्ये घालवतो, तेव्हा यासाठीच पर्यावरणाचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते …. बिल ब्रॅडली
विल्यम वॉरेन “बिल” ब्रॅडली हा अमेरिकन
हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट बास्केटबॉलपटू आहे, तो –होड्सचा विद्यार्थी व
तीन वेळा डेमोक्रॅटिक पक्षाचा न्यू जर्सीचा सिनेटरही होता. त्याने पर्यावरणाविषयी विशेषतः
जंगलांविषयी घेतलेली भूमिका सर्वज्ञात आहे! त्याने म्हटल्याप्रमाणे
मी देखील माझ्या स्वतःचे असे काही क्षण अनुभवण्यासाठी नेहमी जंगलात जातो. अशी प्रत्येक
सफर जंगल नावाच्या पुस्तकाचे आणखी एक पान वाचण्यासारखी असते व त्याच्या पुढील पानावर
काय असेल याची उत्सुकता आपल्याला कायमच असते! जंगलाची प्रत्येक सफर
करताना मला असेच वाटते. मी अलिकडेच मध्यप्रदेश वनविभागास कान्हा व पेंच
येथे काही तांत्रिक मुद्यासंदर्भात फ़ॊरेस्ट डीपार्टमेंटला मदत करण्यासाठी या जंगलांमध्ये
गेलो होतो. पेंच येथील जंगलात गेम रेंजर श्री. तिवारी यांच्यासोबत
एक फेरफटका मारत असताना एक अतिशय रोमांचक घटना घडली. आम्ही आरामात जंगलात फिरत होतो, तेव्हा जवळपास २०० चितळांचा
(ठिपकेदार हरिण) एक कळप रस्त्यावर चरत होता व आम्हाला काही
समजण्याच्या आत एक मोठी वाघीण अक्षरशः कळपाच्या मधुन आली, मात्र तिने त्यांच्याकडे पाहिलेही
नाही, ती आपल्याच नादात चालत सरळ आमच्या दिशेनी आली आणि जंगलात लुप्त झाली! क्षणभर आम्ही थक्क होऊन,
मंत्रमुग्ध होऊन पाहात होतो, इतके की मी माझा कॅमेरा उचलून छायाचित्रे घेण्याचेही विसरुन
गेलो! या अनुभवामुळे वाघ दिसण्याबाबतच्या माझ्या मतावर
पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले, की जेव्हा तुम्हाला वाघ दिसण्याची अपेक्षा नसते तेव्हा
तुम्हाला तो हमखास दिसतो!
उत्साहाच्या भरात मी शक्य तेवढी छायाचित्रे काढली व खोलीवर परतल्यानंतर
मी काय छायाचित्रे काढली हे तपासले. त्यानंतर वाघीण चितळांच्या कळपास ओलांडून जातानाचे
छायाचित्र मी घेतले होते, या छायाचित्राला पाहताच माझ्या मनात मथळा सुचला “मी माझ्या गरजांसाठी
जगते, हव्यासासाठी नाही” वाघीणीचे पोट भरलेले होते त्यामुळे तिला उगाच हरिणांना मारण्यात
रस नव्हता, इथेच निसर्गातील प्राणी मानवापेक्षा सरस ठरतात. आपण अन्न किंवा पैशामागे
लागतो, आपल्यापैकी ब-याच जणांसाठी काहीही पुरेसे नसते व आपल्या सभोवतालाच्या निसर्गाचा
-हास होण्याचे हेच मुख्य कारण आहे! आपल्याला जगण्यासाठी
आपल्या हव्यास पूर्ण होणे आवश्यक असते तर वाघासारख्या हिंस्त्र श्वापदालाही जगण्यासाठी
केवळ गरजा पूर्ण होणे आवश्यक असते! मी ही छायाचित्रे सँक्च्युरी
एशियाच्या फेसबुक पेजवरपण टाकली व त्याला वेगवेगळ्या प्रतिक्रियांद्वारे प्रचंड प्रतिसाद
मिळाला. फेसबुकवर किती लाईक किंवा डिसलाईक मिळाल्या
यावरुन एखाद्या गोष्टीचे किंवा कृतीचे यश मोजणा-या व्यक्तिंपैकी मी नाही, मात्र सँक्च्युरी
एशियाचे फेसबुक पेज केवळ वेळ घालविण्यासाठी किंवा मजा म्हणून तयार करण्यात आलेले नाही. वन्यजीवनातील काही सर्वोत्तम
क्षण, वन्यजीवन संरक्षणाच्या क्षेत्रातील ज्येष्ठांशी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी
हे अतिशय चांगले व्यासपीठ आहे! अशा लोकांकडून तुमच्या छायाचित्रावर काही प्रतिक्रिया मिळणे म्हणजे तुमची छायाचित्रे खरोखरच गांभिर्याने काढण्यात
आली आहेत याचीच पावती असते. यावेळी मी माझ्या सफारी विषयी नेहमीप्रमाणे लिहीण्याऐवजी, त्या छायाचित्रांवर देण्यात आलेल्या
प्रतिक्रियांबाबत माझ्या टिप्पण्या एकत्र केल्या आहेत! माझ्या अशा प्रकारच्या
पहिल्या टिपणीची (शेअर-अपची) सुरुवात पाहू...
मित्रांनो, नीरव, शांत पेंच जंगलात कामानंतर आरामात फेरफटका
मारत आहे, बुरबुर पाऊस पडतोय, इथली ताजी हिरवीगार हवा व उबदार सूर्यप्रकाशही अनुभवतोय. वाघ पाहण्यासाठी वेडावलेल्या
पर्यटकांच्या गोष्टी व जंगलातील कर्मचा-यांचे अनुभव ऐकतोय, आणि अचानक रस्त्यावर उभ्या
असलेल्या सुमारे २०० चितळांच्या कळपातून एक मोठी वाघीण आली, इकडे तिकडे न पाहता, सरळ आमच्या दिशेने चालत
आली! त्यावेळी चितळही शांत
होते, कोणीही धोक्याचा इशाराही दिला नाही! आम्ही सर्वच जण त्यामुळे
एवढे आश्चर्यचकित झालो की मी काही वेळ कॅमेरा उचलून छायाचित्रे काढण्याचेच विसरलो. त्या जंगलाच्या राणीच्या
चालीचा रुबाबच तसा होता! तुम्ही जेव्हा एका मोठ्या वाघीणीच्या साम्राज्यात,
तिला इतक्या जवळून, तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहता तेव्हा तो मोहिनी घालणारा अनुभव
असतो.... तुम्हाला असे वाटते की तिच्या शक्तिशाली हिरव्या
डोळ्यांच्या जादूने तुम्हाला बांधून ठेवले आहे, ती तुम्हाला तिच्या रस्त्यातून बाजूला
व्हायला सांगतेय व तुमच्याशी किंवा तुमच्या कॅमे-याशी तिला जराही घेणे देणे नाही! मी शेकडो वाघ पाहिले
आहेत, व महान जिम कॉर्बेटने म्हटल्याप्रमाणे, मला त्यातील प्रत्येक वाघ आठवतो कारण
प्रत्येक भेटीत काही तरी वेगळे पाहायला मिळते त्यामुळे ती अविस्मरणीय ठरते. जंगलाचा प्रत्येक पैलू
विशेष असतो, अगदी एखादा लहानसा कीटक किंवा एखादे जंगली फूलही तेवढेच महत्वाचे असते,
तरीही काही दृष्ये ही इतर दृष्यांपेक्षा वेगळी असतात, काही सर्वोत्तम असतात! ऑगस्टमध्ये गेल्या आठवड्यात
पेंचच्या जंगलातील हा अनुभव होता, तिथे वनविभागाला मदत करायला गेलो होतो. गेम रेंज
अधिकारी श्री. तिवारी यांचे काम खरोखर वाखणण्याजोगे आहे, ते अतिशय चांगले क्षेत्र अधिकारी
आहेत, माहिती देण्याबाबत ते नेहमी उत्साही असत. अशी दृष्ये व घटना पुन्हा पुन्हा या जंगलात खेचून आणतात, ज्यामुळे
त्या हिरव्या डोळ्यांची मोहिनी पुन्हा अनुभवता येईल, किमान माझ्याबाबतीत तरी असे घडते.
असे अनुभव सांगितल्याने जागरुकता निर्माण होते, ज्ञान मिळते
असे मला वाटते, त्यामुळे कुणाचा तरी फायदा होतो, व सरतेशेवटी निसर्गाला त्याचा लाभ
होतो, ही छायाचित्रे सर्वांना दाखविण्यामागचा उद्देश हाच आहे. वाघीण दिसायच्या थोड्याच वेळ आधी मी आणि श्री. तिवारी
चर्चा करत होतो की जंगल पर्यटनामधील विसंगती म्हणजे लोक जीवतोड
करुन वाघ शोधत असतात मात्र त्या उत्साहात जंगलाचे सौंदर्य अनुभवायचे विसरुन जातात! मात्र हा दुर्मिळ प्राणी
व त्याचे सौंदर्य यातच त्याचे उत्तर दडलेले आहे, तो सहजपणे दिसला असता तर त्यातली मजा
निघून गेली असती हे देखील तितकेच खरे आहे! अशा दृष्यांमधूनच आपल्याला
निसर्ग व त्याच्या वर्तनाविषयी अधिक माहिती समजते, खरं म्हणजे मला कॅमेरा काढायला क्षणभर उशीरच झाला होता. ती वाघीण अक्षरशः
त्या चितळांना ओलांडून आली व तिने त्यांच्याकडे एकदाही पाहिले नाही! आमच्यासाठी ते अविश्वसनीय
होते, मात्र चितळांना ते कदाचित माहिती असावे कारण त्यातल्या एकानेही धोक्याचा इशारा
दिला नाही! मी इतक्यावर्षांपासून जंगलात जात आहे, मात्र
दरवेळी काही तरी नवीनच अनुभव मिळतो व म्हणूनच कदाचित ती सर्वोत्तम शाळा आहे, प्रत्येक क्लासमध्ये काहीतरी नवीन शिकवणारी!
अगदी जंगलाचे अधिकारी सुद्धा म्हणाले की त्यांच्या इतक्या वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी वाघीण
चितळांच्या कळपातून चालत येत आहे व तरीही चितळ आरामात असल्याचे दुर्मिळ दृश्य पाहिलेले
नाही. मात्र अशाच प्रकारची
अनेक दुर्मिळ दृश्ये त्यांना दररोज दिसतात, कारण जंगलात नेहमी असे काही ना काही घडतच
असते!
आमच्यासारख्या नेहमी
जंगलात जाणा-या लोकांना मित्रमंडळी व कुटुंबियांकडून एक प्रश्न नेहमी विचारला जातो
की, “तिथे असे काय आहे ज्यामुळे तुम्ही वारंवार जाता?" त्याचे उत्तर या सर्वांपलिकडचे आहे! आम्ही दरवेळी काही तरी नवीन अनुभव घेऊन येतो व आम्ही
जेव्हा जंगलात प्रवेश करतो तेव्हा काय घेऊन परत येणार आहोत हे माहिती नसते! माहिती नसलेले जाणून
घेण्याची ही भावनाच आम्हाला जंगलात वारंवार यायला लावते, प्रत्येक वेळी वाघच असायला
पाहिजे असे नाही, अगदी फुलपाखरु किंवा एखादे जंगली फूल पाहणे देखील रोमांचक अनुभव असू
शकतो व ते जंगलासाठी तितकेच महत्वाचे आहेत. जंगलाविषयी वाटणा-या
या जिव्हाळ्यातूनच असे अविस्मरणीय क्षण मिळतात व यातूनच जंगल टिकण्याची आशा निर्माण
होते असे मला वाटते! केवळ जंगलात जाऊन त्याचे सौंदर्य न्याहाळणेच
महत्वाचे नसते तर आपली त्याच्याबाबतीत व जंगलाच्या यंत्रणेचा भाग असलेल्या प्रत्येकाच्या
बाबतीतली जबाबदारी त्याहून कित्येक पटींनी जास्त आहे. चला तर मग एकजूट होऊन काम करु व जंगलांमध्ये
वाघ व इतर प्रजातींना सुरक्षित करु!
मी दिलेल्या शब्दाला
जागत, आमचा संजीवनी ग्रुप वन्यजीव संरक्षणातील
आमची जबाबदारी पार पाडण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. नुकत्याच अशाच एका कार्यक्रमात
कान्हातील शाळेत जाणा-या मुलांना शाळेचे दप्तर व पाण्याची बाटली असे जवळपास १५० संच
वाटले. त्यापैकी बहुतेक मुले अभयारण्यात काम करणा-या
स्थानिक वाटाड्यांची तसेच बैगा आदिवासींची होती. एका छोटेखानी समारंभात आम्ही ते संच
कान्हा अभयारण्याच्या वाटाड्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींच्या हाती सुपूर्द केले. कान्हा अभयारण्याचे संचालक
श्री. जसबीर चौहानही त्याप्रसंगी उपस्थित होते. मित्रांनो मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे, आम्ही किती समाजकार्य
करत आहोत हे दाखविण्यासाठी मी ही माहिती येथे दिलेली नाही, मात्र यामुळे कुणाला तरी
प्रेरणा मिळू शकते व या चांगल्या हेतूला थोडासा हातभार लागू शकतो म्हणुन हे शेअरिंग आहे ! आपण केवळ मौज म्हणून
आपल्या मुलांसाठी आठवड्याच्या कोणत्याही दिवशी maa^लमध्ये जाऊन काहीही खरेदी
करत असतो, तो केवळ आपला हव्यास असतो, ती आपली गरज नसते, कान्हासारख्या ठिकाणच्या लोकांच्या
गरजा आपण विसरुन जातो. तिथे शाळेत
जाणा-या अनेक मुलांनी कधी दप्तरही पाहिलेले नाही! जंगलांचे संरक्षण करणे
ही केवळ एखाद्या विभागाची किंवा व्यक्तिची जबाबदारी नाही, ती आपल्या सर्वांची जबाबदारी
आहे. कोणती व्यक्ती कोणत्या क्षणी वन्यजीव संरक्षक बनेल काही सांगता
येत नाही, कारण ती एक मनस्थिती
आहे एखादे पद नाही!
मी फेसबुकवर टाकलेल्या छायाचित्रांचे तसेच आम्ही वन संरक्षणासाठी
करत असलेल्या कामाचे जे कौतुक झाले त्याविषयी मी माझ्या मुलांना उद्देशून काही तरी
लिहीले, या लेखाच्या शेवटी ते देत आहे …
प्रिय रोहित, रोहन, निखिल,
सँक्च्युरी-एशियासारख्या व्यासपीठावर एक साधेसे छायाचित्र प्रसिद्ध
केले आणि माझ्यावर प्रतिक्रिया आणि कौतुकाचा वर्षाव होतोय! चित्र खरोखरच अतिशय चांगले
आले हे मान्य असले तरीही ते मिळणे हे माझे फक्त नशीबच होते, मी केवळ थोडी तत्परता दाखवली, कॅमेरा
उचलला आणि ते दृश्य टिपले! सँक्च्युरी एशियाद्वारे घेतल्या जाणा-या वन्यजीव
छायाचित्र स्पर्धेत हे छायाचित्र पाठवावे असे त्यांचे म्हणणे आहे!
यातून मी शिकलो की तुमचा छंद हा तुमचा आनंदाचा ठेवाही असू शकतो! आपण जे करतो ते पूर्णपणे
समर्पित होऊन केले पाहिजे. तसे केले तर आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. सर्वात शेवटचे म्हणजे
मी हे सर्व कौतुकाच्या आशेने नाही तर माझ्या आनंदासाठी केले व त्यासोबत जे मिळाले तो
केवळ बोनस होता. मी या छायाचित्राचा निर्माता
आहे अशी हवा माझ्या डोक्यात जाऊ नये कारण मी केवळ पोस्टमनचे काम केले आहे, ज्याला चांगली
बातमी इतरांना कळविण्याचे भाग्य मिळाले! विशेषतः तुमच्यापर्यंत हे विचार पोहोचावेत म्हणून हे लिहीत आहे,
कारण एक दिवस तुम्हीही कदाचित अशा परिस्थितीत असाल, तेव्हा छायाचित्र काढणे नव्हे तर
अशा ठिकाणांचे संरक्षण करणे हे तुमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे लक्षात ठेवा!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment