Tuesday, 3 February 2015

गोष्ट एका स्वच्छ्तागृहाची !


























“तुमचा देश तुमच्यासाठी काय करु शकतो हे विचारु नका; तुम्ही तुमच्या देशासाठी काय करु शकता हे विचारा.” …जॉन एफ. केनडी

जॉन फित्झगेराल्ड केनडी, यांना लोक जॅक केनडी किंवा केवळ जेएफके म्हणून ओळखतात. जानेवारी १९६१ ते नोव्हेंबर १९६३ साली हत्या होईपर्यंत ते अमेरिकेचे ३५वे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. वयाच्या ४३व्या वर्षी, अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले ते दुसरे सर्वात तरुण (थिओडर रुझवेल्ट यांच्यानंतर) अध्यक्ष होते, व २०व्या शतकात जन्मलेले पहिले अध्यक्ष होते. आजतागायत, केनडी हे एकमेव रोमन कॅथलिक अध्यक्ष व पलित्झर पुरस्कार विजेते अध्यक्ष आहेत. जेएफके हे आजपर्यंतच्या सर्वात लोकप्रिय व सर्वात वादग्रस्त अमेरिकी अध्यक्षांपैकी एक असल्यामुळे त्यांची वेगळी ओळख करुन द्यायची गरज नाही. मात्र त्यांचे वरील विधान ऐतिहासिक तसेच प्रेरणादायी आहे; कारण सरकार किंवा देश नावाच्या व्यवस्थेकडून आपण जेव्हा काही अपेक्षा करतो तेव्हा आपलेही त्या व्यवस्थेप्रती काही कर्तव्य आहे हे आपण नेहमी विसरतो! त्यामुळे वरील अवतरण ख-या अर्थाने डोळे उघडते! आम्ही वर्षभरापूर्वी सुरु केलेल्या एका लहानशा उपक्रमासंदर्भात मला वरील विधान आठवले जो आता पथदर्शी मानला जात आहे व जेएफके यांचे विधान त्या उपक्रमाने सार्थ ठरवले आहे. आम्ही तीन वर्षांपूर्वी पुण्यातील एक सार्वजनिक स्वच्छतागृह दत्तक घेतले त्यासंदर्भात मी बोलत आहे.

मला प्रामाणिकपणे सांगावसं वाटतं की आम्ही जे काही केलं ते काही अतिशय महान होतं असं मला वाटत नाही किंवा त्यामुळे माध्यमांनी किंवा स्थानिक प्रशासकीय संस्था किंवा शासनकर्त्यांनी त्याची दखल घ्यावी असं नाही मात्र काही गोष्टी सहज घडतात. ते केवळ एका लहानशा कंपनीने चांगल्या हेतूने आपला समाज, आपला परिसर अधिक चांगला बनविण्यासाठी उचललेले एक पाऊल होते! ज्यांना याची पार्श्वभूमी माहिती नाही त्यांच्यासाठी थोडीशी आधीची माहिती किंवा फ्लॅशबॅक देतो …

चार वर्षापूर्वी मी खांद्याला दुखापत झाल्यामुळे नेहमीसारखं सकाळी बॅडमिंटन खेळू शकत नव्हतो, त्यामुळे मित्रांशी चहासोबत गप्पाटप्पा मारायला वैशालीत जात असे. माझ्या घरापासून ते एफसी रोडवरील वैशालीपर्यंत, मी कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौक ओलांडून जात असे. या ठिकाणचे एक सार्वजनिक स्वच्छ्तागृह अतिशय दयनीय अवस्थेत होती, त्या  स्वच्छतागृहाच्या  बांधकामाचीही तशीच अवस्था होती व वापरही तसाच होता; तिथून इतकी दुर्गंधी यायची की रस्ता ओलांडताना तिथून जावसंही वाटत नसे. रहदारीच्या वेळी त्या स्वच्छ्तागृहच्या बाजुने रस्ता ओलांडणं ही अतिशय मोठी अडचण होती. या परिसरातल्या रहिवाशांनाही मनपा कडे तक्रार करुन हे स्वच्छ्तागृह हटविण्याची मागणी केली होती कारण तिचा उपयोग होण्यापेक्षा ती जास्त त्रासदायकच ठरली होती! त्यामुळे एक दिवस मी त्यासंदर्भात काहीतरी करायचं ठरवलं. मी मनपा मधल्या माझ्या काही मित्रांना संपर्क केला व त्या स्वच्छ्तागृहाची इतकी वाईट अवस्था का आहे अशी विचारणा केली? अपेक्षेप्रमाणे, निधीची कमतरता, अपुरे मनुष्यबळ अशाप्रकारची कारणे देण्यात आली; म्हणून मी विचारले की मी तिची देखभाल केली तर? मला खात्री आहे की यामुळे मी वेडा आहे किंवा विनोद करतोय असंच त्यांना वाटलं असेल, मात्र मी गांभीर्याने बोलतोय असे म्हटल्यावर व माझा निर्धार पाहिल्यानंतर संबंधित अधिकारी म्हणाले की मला त्यासाठी अर्ज करावा लागेल कारण कुणा व्यक्तिने किंवा संस्थेने आतापर्यंत असे केलेले नाही; म्हणजे आत्तपर्यंत कुणीही स्वतःहून अचानक सार्वजनिक स्वच्छ्तागृह दत्तक घेण्यासारख्या विचित्र गोष्टीची विनंती केलेली नाही! 

मी तात्काळ माझ्या कार्यालयातून त्या सार्वजनिक स्वच्छ्तागृहाची मोफत, अगदी कोणती जाहिरातही न करता देखभाल करेन असा प्रस्ताव पाठवला! त्यावेळी मला माहिती नव्हतं की मी त्यासाठी काय व कसं करणार आहे, त्यामुळे मी माझ्या काही सहका-यांसोबत एक छोटीशी बैठक घेतली. माझ्या सहका-यांना त्यावेळी ही कल्पना म्हणजे बॉसच्या डोक्यातलं नवीन खूळ असंच वाटलं असेल मात्र त्यांनी मान्य केलं कारण शेवटी बॉस हा बॉस असतो! सार्वजनिक स्वच्छ्तागृह सुस्थितीत ठेवण्यासाठी आपण किमान तिची डागडुजी करुन तिथे एक पूर्णवेळ सफाई कर्मचारी ठेवू शकतो असे आम्ही ठरवले! मात्र असा अर्ज करुन जवळपास तीन महिन्यांनंतरही मनपाच्या अधिका-यांकडून काहीच उत्तर मिळाले नाही. मी रोज त्या स्वच्छ्तागृह वरुन चौक ओलांडून जात होतो, तिची देखभाल करण्याचा विचार दिवसेंदिवस बळकट होत चालला होता!

त्यानंतर एक दिवस एका कार्यक्रमात मला संदीप खर्डेकर व खासदार वंदना चव्हाण भेटल्या. सार्वजनिक वर्तनासंदर्भातील समस्यांविषयी अनौपचारिक चर्चेदरम्यान मी त्या सार्वजनिक स्वच्छ्तागृह संदर्भात केलेल्या अर्जाविषयी व मला मनपाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं सांगितलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते दोघे जण लगेच कामाला लागले व मला वंदना दीदींकडून कॉल आला की महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात याविषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. खासदारांनीच हस्तक्षेप केल्याने सूत्रे वेगाने हालली व मला श्री सुरेश जगताप, उप आयुक्त, घन कचरा व्यवस्थापन यांच्याकडून पत्र आले की आम्ही त्या स्वच्छ्तागृहाची देखभाल करु शकतो मात्र त्यावर कोणतीही जाहिरात करता येणार नाही तसेच मनपाचे प्रभाग पातळीवरील आरोग्य निरीक्षक वेळोवेळी त्याची तपासणी करतील. आम्ही त्या प्रभागाच्या नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांना संपर्क केला व त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आम्ही त्या स्वच्छ्तागृहाची प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी गेलो तेव्हा आणखी एक अडचण समोर आली; तिथे पाणी पुरवठाच होत नव्हता! मी माधुरी मॅडमना सांगितलं की मी एक लहानशी टाकी बसवू शकतो मात्र दररोज तिथे पाणी कुठून आणू, रोज टँकरनी पाणी आणणं अशक्य होतं. यावर त्या म्हणाल्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था होईल व त्यांनी खरंच आठवडाभरात ती केली. आता मूलभूत सगळ्या गोष्टी तिथे होत्या, व बांधकाम क्षेत्रातच असल्याने डागडुजी करणं फारसं अवघड नव्हतं. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात टाईल्स बसविणे, नळजोडणी, रंग-रंगोटी, सिन्टॅक्सची छोटी टाकी बसविणे इत्यादी कामे झाली.

आणखी एक गोष्ट म्हणजे, स्वच्छ्तागृहाच्या आजूबाजूची जागा व्यवस्थित वापरली गेली पाहिजे असे मला वाटत होते, कारण तिचे रुपांतर कचरापेटीत झाले होते व तिथे दारुच्या बाटल्यांपासून ते विविध प्रकारचा कचरा टाकला जायचा! म्हणून तिथे आम्ही फुलांचा वाफा फुलवायचं ठरवलं व पुन्हा जगताप सर व माधुरी मॅडमकडून परवानगी घेतली. आम्ही “रातराणी” सारखी फुलझाडे लावली म्हणजे तिच्या वासामुळे वातावरण आणखी चांगले वाटेल व त्याचा खरोखर उपयोग झाला. त्यानंतर आम्ही सफाई कर्मचा-याचा शोध घ्यायला सुरुवात केली, ज्याची फारसं आकर्षक नसलेलं काम करायची इच्छा असेल कारण त्याला सर्वप्रकारच्या लोकांना तोंड द्यावं लागणार होतं. आम्हाला एक शिक्षण सोडलेला मात्र चुणचुणीत मुलगा मिळाला, त्याला महिन्याला दहा हजार पगार द्यायचं ठरवण्यात आलं. आम्ही त्याला काम समजावून सांगितलं, साफसफाईसाठी साहित्य दिलं व थोडंसं प्रशिक्षणही दिलं. दर वीस मिनिटांनी तो स्वच्छ्तागृह स्वच्छ करेल तसंच लोकांनाही ते स्वच्छ ठेवण्याच्या व तिचा गैरवापर न करण्याच्या सूचना देईल असं ठरवण्यात आलं. यामुळे आणखी एक समस्या समोर आली की लोक त्याचं का ऐकतील? म्हणून आम्ही संबंधित अधिका-याच्या परवानगीने एक लहानसा फलक आतमध्ये लावला की या स्वच्छ्तागृहाची देखभाल संजीवनी करत आहे व इथल्या परिस्थितीसंदर्भात काहीही मदत हवी असल्यास आमच्या दोन कर्मचा-यांचे क्रमांक देण्यात आले होते. आम्ही स्वच्छ्तागृहाच्या बाजूने थोडी शोभेची झाडे लावली, त्यानंतर तिचा संपूर्ण चेहरा मोहराच पालटला.

मी मनपाला हे स्वच्छ्तागृह दत्तक घेण्याविषयी अर्ज केल्यापासून ते हे सर्व होईपर्यंत साडेचार महिने गेले, देखभालीपेक्षा दत्तक घेणे हा शब्दप्रयोग अधिक समर्पक वाटतो; व २८ जानेवारी १४ रोजी आम्ही सर्व संबंधितांच्या उपस्थितीत एका छोटेखानी समारंभाने सुरुवात केली. आम्ही त्याविषयी फारशी वाच्यता केली नाही कारण आधी हा प्रयोग कसा चालतोय ते पाहू मग आपण जे आश्वासन दिले ते आपल्याला पूर्ण करता येते का हे पाहू असा विचार केला! आम्ही तिथे एक प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी वही ठेवली जे लोकांना सुरुवातीला थोडे विचित्र वाटले कारण कोणत्याही सार्वजनिक स्वच्छ्तागृहा तुम्हाला सफाई कर्मचारी “तुम्हाला हे स्वच्छ्तागृह कसे वाटले” असे विचारताना दिसतो?” मात्र तिथल्या परिस्थितीविषयी तसेच आमच्या प्रयत्नांविषयी चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या व आमचा आत्मविश्वास वाढला! दिवस भुर्रकन उडून गेले व अचानक जानेवारीच्या दुस-या आठवड्यात १५ तारखेला मला आठवण झाली की या उपक्रमाला जवळपास एक वर्ष झालं आहे व मी संदीप खर्डेकर यांना संपर्क केला, ते म्हणाले हा वर्धापन दिन साजरा का करु नये? २८ जानेवारी १५ रोजी आम्ही सगळे त्या ठिकाणी जमलो त्यामध्ये पुण्याचे माननीय महापौर दत्ताजी धनकवडे, आमदार मेधा कुलकर्णी, वंदना ताई व माधुरी मॅडम व सुरेश जगताप असे सर्वजण उपस्थित होते. या परिसरातल्या दुकानदारांनी व नागरिकांनी आधी या स्वच्छ्तागृहाचा किती त्रास व्हायचा आणि आता ही किती चांगली सोय झाली आहे अशा प्रतिक्रिया नोंदवल्या व माझ्या मते हीच आमच्या कामाची खरी पावती होती. आता असा निर्णय घेण्यात आला आहे की ही योजना सगळीकडे राबवायची व अधिकाधिक लोकांना/कंपन्यांना पुढे येऊन यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. माझे मित्र विक्रांत वर्तक व आदित्य जावडेकर यांनी संयुक्तपणे महिलांच्या स्वच्छ्तागृहाच्या देखभालीचा खर्च उचलला आहे. या एका स्वच्छ्तागृहाच्या देखभालीसाठी महिन्याला एकूण १५,००० रुपये खर्च येतो असा आम्ही हिशेब काढला, मला विश्वास वाटतो की एवढा खर्च आपण नक्कीच देऊ शकू! या खर्चातून सफाईचं काम करणा-या मुलाला त्याचं शिक्षण पूर्ण करता येईल हे वेगळं सांगायला नको!

मित्रांनो आम्ही राबवलेल्या वेगळ्या उपक्रमाची जाहिरात करण्यासाठी मी ही माहिती इथे देत नाही; आम्ही केवळ आमच्या मनात जे आलं ते करत गेलो व आम्ही ते करु शकलो कारण आम्ही आमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकला. असं म्हणतात की एखाद्या घराचं स्वयंपाकघर तुम्हाला त्या घराची संस्कृती सांगतं; कोणत्याही शहरातील सार्वजनिक शौचालय तुम्हाला त्या शहराची संस्कृती सांगतं, आता आपल्या मनाला प्रश्न विचारून बघा की आपल्या शहराची संस्कृती काय आहे? आपण स्वतःला “पूर्वेचं ऑक्सफर्ड” किंवा “राज्याची सांस्कृतिक राजधानी” म्हणवतो व आपल्या सार्वजनिक शौचालयांची स्थिती पाहा; बहुतेकांची जशी परिस्थिती आहे ती आपल्यासाठी शरमेची बाब आहे! आपल्या शहराला भेट देणा-या कोणत्याही पाहुण्याची हिंमत झाली व त्याने सार्वजनिक शौचालय वापरलेच तर त्याचे आपल्या शहराविषयी काय मत बनेल? आपल्यापैकी अनेकांनी विदेशी प्रवास केला आहे व तिथल्या स्वच्छतेविषयी आपल्याला फार कौतुक वाटते, आपण कधी विचार केला आहे का की तिथे सार्वजनिक ठिकाणे कोण स्वच्छ ठेवते; दुसरे कुणी नाही तरच लोकच ती स्वच्छ ठेवतात! शेवटी लोक म्हणजे तरी कोण आपणच, जे इथे राहतो! जर आपणही योगदान देऊ शकत असू तर आपण प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर का अवलंबून राहायचं? एखादे दिवशी आपल्या घराची साफसफाई करणारा माणूस आला नाही तर आपण सरकारकडून कुणीतरी साफसफाई करण्यासाठी येण्याची वाट पाहात बसतो का? याचप्रकारे रस्ते, शौचालये किंवा कोणतीही सार्वजनिक ठिकाणेही आपलीच आहेत व ती चांगली व्हावीत यासाठी आपण नक्कीच योगदान देऊ शकतो. यामुळे किती रोजगार निर्मिती होईल हे सुद्धा पाहा, केवळ पुण्यातच अशी जवळपास आठशे सार्वजनिक शौचालये आहेत व ती अपुरीच आहेत हे सत्य आहे! आपण आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करण्यासाठी वाढदिवसांपासून ते लग्नांपर्यंत कितीतरी गोष्टींसाठी पैसे खर्च करतो मात्र आपण ज्या समाजाचा एक भाग आहोत त्यासाठी मात्र आपण थोडाफार खर्च करायला विसरतो! केवळ स्वच्छ्तागृहाची देखभालच नाही तर आपण तिथे जाण्याचा रस्ता दाखविणारे फलकही लावू शकतो. यामुळे अधिकाधिक लोकांना त्याविषयी समजेल व इकडे तिकडे घाण करण्याऐवजी ते त्या सुविधेचा वापर करतील! इथे शासनकर्त्यांकडून व स्थानिक प्रशासकीय संस्थांकडून एक लहानशी अपेक्षा आहे की त्यांनी अशा संकल्पनांना प्रोत्साहन दिले पाहिजे म्हणजे त्यांच्यावरील कामाचा भार थोडा कमी होईल. लक्षात ठेवा कोणतीही व्यवस्था सामान्य माणसाचे जीवन अधिक चांगले बनविण्यासाठी आहे व सामान्य माणूस स्वतः या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार असेल तर आणखी काय पाहिजे!

यावर्षी हे स्वच्छतागृह दत्तक घेण्याला तीन वर्षे पूर्ण झाली; पण ही केवळ एका स्वच्छ्तागृहाची गोष्ट झाली, मात्र ही प्रत्येक स्वच्छ्तागृहाची गोष्ट होऊ शकते; कोणताही प्रवास कितीही लांबचा असला तरी त्या दिशेने एक पाऊल उचलल्यावर तो सुरुच होतो. हा प्रवास करण्यापासून इतर कुणी नाही तर आपणच स्वतःला रोखून धरत असतो! त्यामुळे व्यवस्थेच्या नावाने बोटे मोडत बसण्यापेक्षा तिचा एक भाग व्हा, असे झाले तरच आपण एक समाज होऊ,  नाही तर आपण केवळ बिनडोक प्राण्यांचा एक कळप होऊ जो स्वतःच आपल्या भविष्याचा घात करेल; आता काय व्हायचं हे तुमच्या हातात आहे!


संजय देशपांडे
 smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स





Thursday, 29 January 2015

माझा आकाशाचा तुकडा !





















“कोण म्हणतं तुम्हाला हातात चंद्र घेता येत नाही? आज जेव्हा मखमली आकाशात चंद्र उगवेल चांदण्या चमकू लागतील, तुमच्या खिडकीतून बाहेर पाहा, त्यानंतर तुमचा हात उंच करा व तुमची बोटे त्या तेजोवलयाच्या भोवती ठेवा. अगदी बरोबर हे किती सोपं होतं!” ………व्हेरा नझारियन

व्हेरा नझारियन ही एक अमेरिकी-रशियन लेखिका असून काल्पनिक, वैज्ञानिक कादंबऱ्या व इतर “नवलाईच्या कादंबऱ्या” लिहीते, ज्यामध्ये मिथ पंक, ऍन आर्टिस्ट यांचा समावेश आहे, नॉरिलाना बुक्स ही तिची प्रकाशन संस्था आहे. तिच्या वरील अवतरणामध्ये तिने आकाशाच्या अदभुतपणाचे  वर्णन केले आहे, मात्र ती काल्पनिक नाही तर निसर्गाची जादू आहे जी आपल्यापैकी कुणीही आपल्या खिडकीतून अनुभवू शकतो. मात्र विशेषतः पुण्यासारख्या महानगरात राहणाऱ्या लाखो लोकांसाठी “स्वतःचं आकाश” केवळ कल्पनेतच उरले आहे. नेहमीप्रमाणे बरेच जण विचार करत असतील की हा विषय कुठल्या दिशेने चालला आहे, अलिकडेच मी माझ्या बहिणीशी गप्पा मारत होतो. पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत तिची एक चांगली सदनिका आहे, तरीही ती बदलण्यासाठी माझ्या मागे लागली आहे, त्यासाठी ती मला फक्त एवढेच म्हणाली की, “संज्या, मला मोठी गच्ची असलेली सदनिका हवी आहे जिथून मला आकाश पाहता येईल!. एवढ्या एकाच कारणासाठी मला माझी सदनिका बदलायची आहे कारण तिथे चांगल्या ठिकाणापासून ते सुखसोयींपर्यंत सर्व काही आहे मात्र आकाश दिसत नाही!” तिच्या शब्दांमुळे नाही तर आकाशाविषयीच्या तिच्या भावनांमुळे माझे विचारचक्र सुरु झाले. आकाश दिसणे हे एखाद्या घरासाठी इतके महत्वाचे आहे का? आम्ही अशा एका ठिकाणाहून आलो आहोत जेथे अपार्टमेंट, संकुल वगैरे ऐकिवातच नव्हते व बहुतेक घरे एक मजली होती व त्यातून आकाश नेहमी दिसायचे, मग ते अंगणातून असेल किंवा परसातून असेल किंवा घराच्या गच्चीतून असेल! मला इथे प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते की मला “आंगण” किंवा “सज्जा” या शब्दांना समानार्थी शब्द सापडले नाहीत, केवळ स्थापत्यशास्त्राच्या भाषेत ते समजावून सांगण्यापेक्षाही एखाद्या व्यक्तिने ते अनुभवावे लागतात! या जागांमुळे आकाश नेहमी तुमच्या नजरेच्या टप्प्यात असायचे, मला माझे बालपण आठवते व मी आकाशाखाली किती वेळ घालवला हे जाणवते! मी पुण्यासारख्या महानगरामध्ये नक्कीच या गोष्टीला मुकतो व या गोष्टीला मुकणारा मी एकटा नाही. आपल्यापैकी बहुतेकांच्या लहानपणी स्वच्छ सूर्यप्रकाशात आकाशाकडे बघत राहण्याच्या आठवणी असतील, विस्तीर्ण निळाशार आकाशातून पांढऱ्या धुराची रेघ सोडत जाणाऱ्या जेट विमानामुळे उत्तेजित झाल्याचे आठवत असेल, अशा व्यक्तिंना नक्कीच आकाशाची आठवण येत असेल! आता आपण दिवस रात्र काँक्रिटच्या किंवा काचेच्या भिंतीमध्ये असतो, कृत्रिम प्रकाश आपल्या सेवेसाठी असतो व आपल्याला आपल्या खिडकीतून बाहेर डोकविण्यासाठी व आकाश पाहण्यासाठी क्वचितच वेळ मिळतो, त्यामुळे आपल्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन काही वेळ आकाशाखाली घालवणे तर दूरच! मला खरोखर इथे वाचकांना व माझ्या मित्रांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही जिथे राहता किंवा काम करता त्या इमारतीच्या गच्चीवर तुम्ही शेवटचे कधी गेला होता व दिवसा किंवा रात्री एक तासभर फक्त आकाश न्याहाळले? मला खात्री आहे की आपल्यापैकी बहुतेकांना हे आठवायला अतिशय वेळ लागेल, मी सुद्धा असे क्वचितच करतो व माझ्या कार्यालयाला लागून तसंच माझ्या घरातल्या अभ्यासिकेला लागून एक लहानशी गच्ची आहे, त्यामुळे मी थोडासा वेळ आकाशाखाली घालवतो! त्यातून मला काय मिळते हे शब्दातून व्यक्त करता येणार नाही, ते अनुभवले पाहिजे! मला असे वाटते की हे आकाश पाहायला मिळावे यासाठीच घरात लहानशी का होईना पण एक गच्ची अतिशय महत्वाची आहे! आधुनिक जीवनशैलीमध्ये, आपले वैयक्तिक घर व खाजगी गच्ची मिळणे शक्य नाही मात्र आपल्याकडे बाल्कनी व घराला जोडून गच्ची असू शकते जिथून आपल्याला आपले आकाश पाहता येते. तरीही इमारतीच्या रहिवाशांसाठी एक सामाईक गच्ची असली पाहिजे जी सर्वांसाठी कायदेशीरपणे तसेच नैतिकपणे खुली असली पाहिजे! माझ्या लहानपणी आम्ही उन्हाळ्यात गच्चीवर झोपत असू, आम्ही जुन्या गावात राहत होतो जिथल्या गच्च्या सामाईक असत, त्यामुळे मित्रांशी गप्पाटप्पा मारत व भुताखेतांच्या गोष्टी करत आकाशाखाली झोपणे यात खरोखर गंमत होती! ते खऱ्या अर्थाने सामुदायिक जीवन होते व त्या जीवनाचा छप्पर किंवा गच्ची आणि आमचे आकाश हा महत्वाचा भाग होता!
 काळाच्या ओघात घराच्या रचनेसंबंधीच्या संज्ञा कशा बदलत गेल्या हे पाहणेही अतिशय रोचक आहे मात्र या जागांचा वापरही बदलला आहे का? नाही, असे मला स्वतःला वाटते. मी वीस वर्षांहून अधिक काळ घर बांधणीशी संबंधित आहे, विविध आकारांची व वेगवेगळ्या गरजांनुसार घरे बनवताना काही गोष्टी मात्र अजिबात बदललेल्या नाहीत. किंमती वाढताहेत, जागा कमी होतेय, नियमांचाही परिणाम होत असतो व काही वेळ आपल्याला असे वाटते की नियोजनातील एखादा घटक नामशेष होत चालला आहे किंवा मागे पडलाय मात्र तो तात्पुरता परिणाम असतो. शेवटी मानवी सभ्यता निर्माण झाल्याच्या काळापासून माणसाच्या त्याच्या घराविषयीच्या गरजा फारशा बदललेल्या नाहीत.

एका घरात तुम्हाला सुरक्षित, खुशाल व शांत वाटले पाहिजे तसेच ते दिसायलाही चांगले असले पाहिजे. आता टिकाऊ साहित्य, कुलुपे, दरवाजे इत्यादी वापरुन आपण घर सुरक्षित बनवू शकतो मात्र ते शांत व सुंदर कसे बनवायचे, म्हणजेच बाहेरील व्यक्तिंना ते कसे सुंदर दिसेल. इथे बांधकाम व्यावसायिकांना तसेच रचनाकारांना घर निसर्गाला अधिक पूरक बनविण्याचे महत्व समजू लागते, घरात राहणाऱ्यांना त्यातून शांतता मिळावी यासाठी तो एक खात्रीशीर मार्ग आहे, आपल्याला असे एक ठिकाण हवे असते की जेथून आपण असुरक्षित न वाटता निसर्गाशी एकरुप होऊ शकू, अशा वेळी “सज्जा” किंवा जिला आपण बाल्कनी म्हणतो ती समोर येते. मात्र नेमकेपणाने सांगायचे झाले तर ती बाल्कनी नाही; ती वरच्या मजल्यावर मुख्य घराला जोडून खुली जागा असते जिथून मोकळे आकाश पाहता येते जिथे तुम्ही खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सान्निध्यात येता. ही खोलीला जोडून गच्ची असते इमारतीच्या छतावर नाही.

मध्य भारतामध्ये उन्हाळ्यात अतिशय उष्णता असते तिथे सज्जाला “गवाक्ष” म्हणजे बहुतेकवेळा दगडावर कोरलेली नक्षीदार जाळी लावलेली असते. यामुळे दोन हेतू साध्य होतात, एक म्हणजे उष्ण झळांपासून संरक्षण होते व दुसरे म्हणजे सज्जा कुणालाही दिसतही नाही, त्यामुळे घरातील बायका रहदारीतून येणाऱ्या जाणाऱ्यांचा किंवा आजूबाजूचा त्रास न होता ती वापरु शकतात. बऱ्याच हवेली किंवा वाड्यांना तळ मजल्यावर मध्यभागी चौक असे मात्र त्यालाही मर्यादा होत्या कारण तिथून आकाश दिसायचे मात्र उंच सज्जावर मिळते तशी वाऱ्याची झुळूक किंवा आजूबाजूचे दृश्य पाहायला मिळत नसे. अशा सुरक्षित सज्जाचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जयपूरचा हवामहल! विविध मजल्यांवर प्रत्येक सज्जाचे संरक्षण करण्यासाठी लाल दगडाची नक्षीदार जाळी बसविण्यात आली आहे ज्यामुळे अतिशय सुंदर दर्शनी भाग तयार झाला आहे. उत्तर भारतामध्ये अशा सज्जा प्रत्येक मजल्यावर तयार केल्या जातो  म्हणजे तुम्हाला कोणत्याही मजल्यावरुन सुंदर दृश्य दिसून शकते व हवेची झुळूकही मिळते. अनेक हवेल्या आजही दिमाखात या सज्जा व योग्य ठिकाणी त्यांचे रक्षण करणाऱ्या जाळ्या मिरवतात. बऱ्याचदा खिडकीसारखे ठिकाण तयार केले जाते जिथे तुम्ही बसून आजूबाजूचे दृश्य पाहू शकता. युरोपातही पुरातन काळापासून घर बांधताना बाल्कनी किंवा वरांडा नावाने अशा जागा तयार केल्या जात असत. बऱ्याचदा अशी ठिकाणे “बोगनवेलींसारख्या” शोभेच्या वेलींनी सुशोभित केली जातात, ज्यामुळे रंगीबेरंगी परिणाम मिळतो. किंबहुना अनेक कुटुंबामध्ये अशा ठिकाणी सकाळची न्याहारी किंवा रात्रीचे जेवण घ्यायची परंपरा आहे, ज्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात निवांतपणा मिळतो.

एफएसआय व बहुमजली इमारतींच्या नंतरच्या काळात बाल्कनी हा शब्द रुढ झाला त्याची संकल्पना सज्जासारखीच असली तरी बऱ्याच ठिकाणी आकाराच्या बाबतीत त्याची चुकीची अंमलबजावणी केली जाते, ती केवळ चार फूट असल्यामुळे तुम्हाला हालचाल करायला फारशी जागा उरत नाही तसेच आजूबाजूचे दृश्यही मर्यादित दिसते. जागेच्या कमतरतेमुळे बाल्कनीची जागाही खोलीतच घेण्यात आली. त्यामुळे पुन्हा रचनाकारांना तुमचे स्वतःचे मोकळे आकाश कसे द्यायचे प्रश्न सतावू लागला व यातूनच जोडलेली गच्ची ही संकल्पना पुढे आली. अनेक जणांना वाटत असेल की ती विकासकांसाठी कमाईची आणखी एक संधी असते, मात्र मला असे वाटते की तुमच्या घराच्या आकाराच्या तुलनेत एक जागा असली पाहिजे जिथून मोकळे आकाश किंवा आजूबाजूचा परिसर दिसला पाहिजे, कारण अशाच ठिकाणी तुम्ही चार भिंतींच्या बंधनातून मुक्त होता व या मोकळेपणामुळे तुमचे मनही निसर्गासाठी खुले होते. ज्या घरात तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात येण्यासाठी जागा नाही ते कसले घर! दुर्दैवाने मी अशा गच्च्या विचित्र प्रकारे झाकल्या गेल्याचे किंवा बंद केल्याचे पाहिले आहे, त्यामुळे त्यांचा मूळ उद्देशच अपयशी होतो, तसेच संपूर्ण इमारतीचे सौंदर्य खराब होते. लोक सुरक्षेच्या नावाखाली लोखंडी पत्रे किंवा फायबरचे पत्रे किंवा लोखंडी गज वापरतात व हा भागही बंद करायचा प्रयत्न करतात. सुरक्षेच्या नावाखाली लोक जेव्हा या लोखंडी गजांच्या भयंकर रचनांनी घराला लागून असलेली गच्ची बंदिस्त करतात तेव्हा ते पाहताना अतिशय त्रास होतो. मी रहिवाशांच्या सुरक्षेच्या विरुद्ध नाही, मात्र शेवटी सुरक्षा ही आपल्या मनात असते, ती व्यवहार्य मार्गाने मिळवता येते हे आपण समजून घेतले पाहिजे. अशा जोडून असलेल्या लहान गच्च्या झाकून आपण स्वतःला आकाशाला आपल्यापासून दूर करतोय हे आपण विसरतो! अर्थात प्रति चौरस फूट दर आकाशाला भिडलेले असताना नागरिकांना दोष देऊ शकत नाही, प्रत्येक चौरस इंच महत्वाचा असतो व या बंदिस्त भिंतींविरुद्धच्या या स्पर्धेत आकाश हरते हे सत्य आहे.

आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे आपल्या भोवती वाढत असलेले काँक्रिटीकरण, या प्रक्रियेत केवळ माणसांना नाही तर इतर सजीवांनाही निवारा व सुरक्षित ठिकाण हवे आहे हे आपण विसरतो, आपल्या घरासाठी आपण आपल्या आजूबाजूच्या अनेकांना विस्थापित करत आहोत! तुम्ही पुण्यात किंवा इतर कोणत्याही वाढत्या शहरात पाहिले असेल की पूर्वी भारद्वाज, साध्या चिमण्या, बुलबुल, मैना व अगदी फुलपाखरे यासारखे असंख्य पक्षी दिसायचे, मात्र आता आपल्याला हे पक्षी दिसत नाहीत. याचे साधे कारण म्हणजे त्यांच्यासाठी अशी जागाच उरलेली नाही की जिथे ते थोडावेळ विश्रांती घेऊ शकतात, जिथे त्यांना अन्न व पाणी नैसर्गिकपणे उपलब्ध असेल. ते त्यांची घरटी विटांच्या भिंतींवर किंवा काँक्रिटच्या स्लॅबवर किंवा आपल्या दर्शनी भागात बसविलेल्या काचेच्या तावदानांवर बांधू शकत नाहीत! अशा वेळी आपण थोडेसे लक्ष दिले व मदत केली तर या सज्जांवर त्यांना अन्न व पाण्यासाठी एक चांगले ठिकाण मिळू शकेल. अशाप्रकारे आपण जैवविविधतेला हातभार लावू, पक्षांसाठी थोडे पाणी व अन्न ठेवा, थोडी रोपे लावा व काय फरक पडतो ते पाहा! मी माझ्या कार्यालयातील खोलीला जोडून असलेल्या एका लहानशा गच्चीवर हा अनुभव घेतला आहे. मी सुरुवातीला केवळ पाण्याचा वाडगा ठेवू लागलो, दररोज दुपारी तिथे अंघोळीसाठी व पाणी पिण्यासाठी पक्षांचा मेळावा भरतो व त्यांच्याकडे नुसते पाहात राहण्यानेही माझे मन प्रसन्न होते, दररोज या पक्ष्यांमध्ये एका नव्या पक्षाची भर पडते त्यामुळे त्यांचा मेळावा अधिक रंगीबेरंगी होतो.

मित्रांनो तुमच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढा व तुमच्याकडे सुदैवाने “सज्जा” असेल तर तिथे काही वेळ घालवा, दिवसातील या काही मिनिटांमुळे तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो ते पाहा! आपण आपल्या घरात व आजूबाजूला असलेल्या अशा जागांचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे व ज्या हेतूने त्या बनविण्यात आल्या आहेत त्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अलिकडेच मी वास्तुविद्याविशारद व जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य श्री. राजीव मिश्रा यांचे अतिशय सुंदर वाक्य वाचले, तेच इथे देतोय;“चंद्रप्रकाशाने संपूर्ण आभाळ व्यापलेले असते; मात्र ते तुमची खोली किती व्यापेल हे तिच्या खिडक्यांवर अवलंबून असते”! माझ्या मते या वाक्याचा अर्थ असा होतो की आकाश अथांग आहे व त्याने पृथ्वीला वेढलेले आहे, त्यामुळे आपण सगळे त्याला पाहू शकतो; केवळ त्याकडे पाहण्यासाठी आपल्याला स्वतःचे एक माध्यम हवे असते! आणि आपली गच्ची यापेक्षा उत्तम मध्यम कोणते असते ! अशा गच्चीवर निवांतपणे बसा, तिथे काही आरामदायक क्षण अनुभवा, गरम चहाचे घोट घ्या, उगवता सूर्य पाहा किंवा कठड्याच्या गजांना पकडून पहिल्या पावसात चिंब भिजून मॉन्सूनचे स्वागत करा, एखाद्या उबदार दुपारी खुर्चीत बसून परिकथांचे पुस्तक वाचा व काही वेळा अंधार असताना दूरवरील तारे पाहा व त्यांचे आकार ओळखण्याचा प्रयत्न करा! शेवटी घर म्हणजे केवळ काँक्रिटची एक स्लॅब, चार भिंती व महागडी अंतर्गत सजावट विकत घेणे नाही; तर या भिंतींमधून बाहेर पडुन असणारे तुमचे  आकाश म्हणजेच खरे घर व ते खरच मोफत मिळते!

संजय देशपांडे

 smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


Tuesday, 20 January 2015

पक्षी, पक्षीमित्र आणि बिल्डर्स !


























आपलं आयुष्य सुंदर क्राँकिटच्या भिंती नाहीत तर उडणा-या पंखांचे रंग बनवितात … संजय.

 मी इतकी वर्षं लिहीत असूनही आज पहिल्यांदाच एखाद्या विषयाची सुरुवात करण्यासाठी स्वतःचंच अवतरण वापरण्याचं धाडस करतोय. मी अर्थातच त्यासाठी माफी मागतो कारण मी कुणी महान तत्वज्ञ, प्रसिद्ध व्यक्ती किंवा विचारवंत नाही की माझ्या अवतरणांची मोठी यादी असावी. मात्र माझे उत्साही निसर्ग मित्र अनुज खरे यांनी जेव्हा मला १८व्या राज्य पक्षी मित्र संमेलनात व्याख्यान व सादरीकरणासाठी बोलावलं तेव्हा माझ्या सादरीकरणाची सुरुवात करताना माझ्या तोंडात हेच शब्द आले. मला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पक्षांशी संबंधित दोन महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचं भाग्य मिळालं; त्यातला बर्ड फेस्ट हा कार्यक्रम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झाला व राज्य पक्षी मित्र संमेलन जानेवारीच्या दुस-या आठवड्यात होतं. आता अनेक जणांना आश्चर्य वाटेल की त्यात काय तितकसं मोठं, जसे आकाश किंवा तारे निरीक्षक असतात, तसेच पक्षी निरीक्षक, त्यामुळे बर्ड फेस्टसारख्या कार्यक्रमांचं काय वेगळेपण आहे? दोन्हीही कार्यक्रमांमध्ये पक्षी संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणा-या अधिका-यांशी चर्चा तसंच पक्ष्यांविषयीच्या छायाचित्रांचाही समावेश होता. तर या छायाचित्र प्रदर्शनामधल्या प्रवेशद्वारापाशीच  असलेल्या  एका साध्याशा चिमणीच्या मोठ्या छायाचित्राने माझं लक्ष वेधून घेतलं. अनेक पाहुणे त्या चिमणीच्या छायाचित्रापाशी थांबत होते व “खरंच चिमण्या आजकाल दिसतच नाहीत” अशा अर्थाचं त्यांचं बोलणं मला ऐकू येत होतं! पुण्याच्या सामाजिक जीवनातले दिग्गज यावेळी उपस्थित होते त्यांनीही चिमण्यांसारखे सामान्य पक्षी दुर्मिळ होत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली. पीएमसीच्या आयुक्तांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, ते देखील शहरातून चिमण्या का नाहिशा होताहेत हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते! यातुनच माझं विचार चक्र सुरु झालं, समाजाचं सौंदर्य तुमच्या आजूबाजूला आढळणा-या विविध प्रकारच्या जीवांमुळे समृद्ध होतं ज्याला आपण जैव विविधता म्हणतो! आपलं शहर मात्र याच्या उलट्या दिशेनं प्रवास करतंय हे सत्य आहे.

या पार्श्वभूमीवर मी जेव्हा सादरीकरण करायला गेलो, तेही “पक्षी व बांधकाम व्यावसायिक” यासारख्या विषयावर तेव्हा श्रोते माझ्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यासाठी तयार होते, त्यातले बरेच जण माझ्याकडे “पक्ष्यांवर अत्याचार करणारा तो हाच” अशा नजरेने पाहात होते! मी वरील अवतरणाने माझ्या सादरीकरणाला सुरुवात केली. मी सुरुवातीलाच हे मान्य केलं की पक्षी संवर्धनाच्या बाबतीत बांधकाम व्यवसायिकांची जी भूमिका आहे त्यामुळेच आपल्याला ही अशाप्रकारची संमेलनं भरवावी लागतात! कुठेही काहीही चुकीचं होत असेल तर कुणावरतरी दोषारोप करणं सोपं असतं आणि विशेषतः समोर लक्ष्य बांधकाम व्यावसायिक किंवा विकासक असतील तर काम आणखी सोपं होतं! मात्र आपण जेव्हा वाघांच्या अस्तित्वाला धोका आहे असं म्हणतो तेव्हा आपण केवळ एका वर्गाला म्हणजे उदाहरणार्थ फक्त शिका-यांना दोष देतो का? याचं उत्तर अर्थातच नाही असे येईल, कारण वाघांच्या अस्तित्वासाठी जबाबदार असलेली संपूर्ण यंत्रणा त्यासाठी दोषी आहे व त्यामध्ये वन विभागाचा तसंच जंगलांच्या आजूबाजूला राहणा-या लोकांचा, वाघांच्या अभयारण्याभोवतीच्या विकासाशी संबंधित धोरणे व अशा शेकडो घटकांचा समावेश होतो जी वाघांचं भविष्य ठरवतात!
याचप्रमाणे चिमण्या किंवा बुलबुल किंवा मैना किंवा खंड्या यासारख्या पक्षांच्या सर्वत्र   आढळणा-या कोणत्याही प्रजाती घ्या त्या संपूर्ण यंत्रणेवर किंवा मग शहर किंवा गावाभोवताच्या वातावरणावर अवलंबून असतात. ज्याप्रमाणे शिकारी वाघांचे आयुष्य कठीण करतात, त्याचप्रमाणे बांधकाम व्यवसायिकही पक्षांचे आयुष्य अवघड करणारा केवळ एक दुवा आहे! मात्र हेच शिकारी बहुतेक जंगलाच्या आजूबाजूला राहणारे स्थानिक असतात व त्यांनी ठरवले तर ते वाघांचे संरक्षणही करु शकतात, याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिकही पक्षांचे संरक्षक होऊ शकतात! कारण बांधकाम व्यावसायिक कुणासाठी घर बांधतात? अर्थातच सामान्य माणसासाठी. आता हा सामान्य माणूस बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या इमारतीभोवती पक्षांसाठी काय सोय केली आहे हे विचारतो का? मला माझ्या पंचवीस वर्षांच्या काळात असे विचारणारा एकही ग्राहक भेटला नाही! त्यासाठी केवळ एखाद दुसरी इमारत नाही तर संपूर्ण शहराच्या पर्यावरणाचा ज्याला आपण नागरी विकास म्हणतो, पक्षांना डोळ्यामोर ठेवून विचार केला पाहिजे. कारण आपण जेव्हा म्हणतो हिरव्या किंवा निसर्गपूरक इमारती तेव्हा त्याचा अर्थ केवळ माणसांसाठी नाही तर त्यामध्ये आजूबाजूच्या संपूर्ण जैवविविधतेचा समावेश होतो, ज्याचा पक्षी एक अतिशय महत्वाचा भाग आहेत. आता पुन्हा अनेकजण म्हणतील की आजूबाजूला कितीतरी झाडे आहेत, यापेक्षा अधिक ते पक्षांसाठी काय करु शकतात? झाडे लावल्याने पक्षांची केवळ एक गरज पूर्ण होईल. पक्षांसाठी एक चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्याला पक्षांचे पूर्ण जीवन चक्र समजून घ्यावे लागेल. उदाहरणार्थ चिमणी किंवा बया यासारखे पक्षी स्वतःचे घरटे बांधू शकत नाही. चिमणी किंवा बुलबुलला मंगलोरी खापरांचे छप्पर किंवा वाड्यातील मातीच्या भिंतीमधील लहानशा फटीसारखी सुरक्षित जागा मिळाली तरच घरटे बांधता येते.  हे पक्षी अशा ठिकाणी वाळलेले गवत, गळलेली पाने किंवा तत्सम साहित्याने घरटे तयार करु शकतात केवळ त्यांच्या घरट्यासाठी त्यांना सुरक्षित आधार हवा असतो. तसंच त्यांना जवळपास पाण्याचा स्त्रोत व नवजात पिल्लांना भरविण्यासाठी अन्न हवे असते.

आता आपल्या आजूबाजूला पाहा, आपल्याला काय दिसतं? सगळीकडे क्राँकिटच्या भिंती, काचेची तावदाने, laa^न्स शोभेची सुंदर झाडे ज्यांना फळे नाहीत किंवा जवळपास धान्यांची शेते नाहीत विचार करा अशा परिस्थितीत ती बिचारी चिमणी कशी जगेल? तसेच पक्षांना मातीत अंग घुसळण्यासाठी माती हवी असते, आपल्या काँक्रिटच्या जंगलामध्ये आजाबाजूला अशा प्रकारची माती अतिशय कमी असते वा नसतेच त्यामुळे याबाबतीतही त्यांची गरज पूर्ण होत नाही. तसेच वाढते ध्वनी व वायू प्रदूषण हे देखील पक्षी शहरातून बाहेर जाण्याचे एक प्रमुख कारण आहे. पुण्यातल्या जवळपास चाळीस लाख वाहनांमधून निघणा-या आवाजाची उच्च पातळी, त्यातून निघणारा धूर चिमण्यांसारखे लहान पक्षी सहन करु शकत नाही. यात भरीस भर म्हणून वर्षभर आपल्याकडे लग्नसमारंभ किंवा कुणाच्या तरी जयंती नाहीतर पुण्यतिथीच्या मिरवणुका असतात त्यात डीजे व डॉल्बी यंत्रणा लावल्या जातात! अशा प्रसंगी त्यातून होणा-या गोंगाटामुळे पक्षीच काय माणसेही शहरातून दूर पळतील! त्याशिवाय अत्याधुनिक सौंदर्यदृष्टिने बांधलेल्या इमारतींमध्ये पक्षांना घरटे बांधण्यासाठी जागाच नसते; किंबहुना आपल्याला पक्षांच्या काड्या-चिंध्यांनी बांधलेल्या घरट्यांनी, त्यांच्या घाणीने किंवा सांडलेल्या अन्नाने आपल्या उंच इमारतींचे सौंदर्य बिघडवायचे नसते!  आपल्या शहरात दोन नद्या आहेत व अनेक नैसर्गिक ओढे आहेत मात्र सध्या त्यांची परिस्थिती कशी आहे? नद्यांचे मोठे नाले झाले आहेत; ओढ्यांवर समाजाच्या प्रत्येक घटकाने अतिक्रमण केले आहे किंवा त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे, त्यामुळे त्यावरील झाडे-झुडुपे नष्ट झाली आहेत! आता आपल्याला फक्त घार, कावळे व कबुतरे एवढेच काय ते पक्षी आपल्या तथाकथित विकसित शहरात पाहायला मिळतात! पुण्यामध्ये आपल्याकडे नाईक बेट किंवा आजूबाजूचा डोंगराळ परिसर आहे (त्याला सलीम अली पक्षी अभयारण्य असेही म्हणतात) मात्र वनविभाग किंवा स्थानिक संस्था दोघांकडेही तिथल्या झाडाझुडुपांचे संरक्षण करण्यासाठी पैसे नाहीत किंवा किमान या संस्था तसा दावा तरी करतात! त्यामुळे पक्षांसाठी कोणतेही हक्काचे ठिकाण नाही किंवा संपूर्ण शहरात पक्षांची काळजी कुणी करत नाही व आपण याला प्रगती किंवा विकास म्हणतो! त्यानंतर आपल्यासाठी पीएमसी, नागरी विकास विभाग, वास्तुरचनातज्ञ व रचनाकार असतात तसेच आपले घर आरामदायक बनविण्यासाठी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा असतात, मात्र बिचा-या पक्षांच्या घराविषयी कुणीही विचार करत नाही! आपल्याकडे उद्यान विभाग आहे मात्र तेवढेच पुरेसे आहे का कारण आजूबाजूला एवढी झाडे असूनही पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत हे सत्य आहे. अशा परिस्थितीत आपल्याला काय करता येईल व आपण काय करत आहोत हे दोन प्रश्न आहेत जे आपण पक्षांच्या बाबतीत स्वतःला विचारले पाहिजेत! दुर्दैवाने राज्यभरात, प्रत्येक गावात किंवा महानगरात पक्षांची अशीच परिस्थिती आहे.

खरंतर पक्षांच्या गरजा वर नमूद केल्याप्रमाणे अतिशय कमी असतात व आपल्या इमारतींची रचना करताना पक्षांचाही थोडासा विचार व काळजी केली पाहिजे.आपण ईमारती भोवतालच्या काही खुल्या जागांचे नियोजन करु शकतो जिथे घनदाट झाडी असेल, वेली व झुडुपे असतील म्हणजे पक्षांना घरटी बांधायला जागा मिळेल व कृमी तसेच कीटकांच्या स्वरुपात अन्न मिळेल. त्याशिवाय फळे धारण करणारी झाडे लावण्याचा तसेच काही पट्ट्यात माती उघडी ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. मळे व शेत जमीनींची जागा झपाट्याने इमारती घेत आहेत. म्हणूनच आपल्या घराला लागून असलेल्या गच्चीत आपण पक्षांच्या दाणा-पाण्याची व्यवस्था करु शकतो, सदनिकाधारकांनी रोज तिथे एका वाटीत थोडेसे धान्य व दुस-या वाटीत पाणी ठेवावे. यामुळे लहान पक्षांना अन्न व पाणी मिळेल, याचा नक्की उपयोग होतो हे मी माझ्या घराच्या तसंच कार्यालयाच्या गच्चीवर पक्षांसाठी ठेवलेल्या दाणा-पाण्यावरुन सांगू शकतो. दररोज किमान दहा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे दाणा-पाण्यासाठी येतात त्यामध्ये चिमण्या व बुलबुलचाही समावेश असतो! त्याशिवाय घराला लागून असलेल्या गच्चीमध्ये आपण जमीनीपासून सुरक्षित अंतरावर खेळती हवा असलेली कृत्रिम घरटी ठेवू शकतो; मात्र अशा ठिकाणी पक्षांना गोंगाट जाणवणार नाही, त्यांना सुरक्षित वाटेल याची काळजी घ्यावी. या ठिकाणी आजूबाजूला आपण लहान झुडुपे, फुलांचे वाफे किंवा अगदी कुंड्यांमध्येही झाडे लावू शकतो! आपण आपल्या इमारतींचे नियोजन करताना पक्षांवर संशोधन करणा-या पक्षिवैज्ञानिकांनाही सहभागी करुन त्यांच्या सूचना घेऊ शकतो. डॉ. सतिश पांडे यांनी यासंदर्भात आपल्याला काही सूचना दिल्या आहेत, उदाहरणार्थ सर्वात वरच्या मजल्यावरील गच्चीच्या सुरक्षा भिंतींमध्ये काही छिद्र ठेवता येतील ज्यामध्ये पोपट व तत्सम पक्षी त्यांचे घरटे बांधू शकतात. आम्ही ते केले आहे व अशा छिद्रांमध्ये पोपटाने घरटे बांधल्याचे दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तरुण पिढीला जागरुकता मोहिमेमध्ये सहभागी करुन घ्या त्यामुळे तिची ताकद वाढेल. गेल्या दिवाळीमध्ये आपण फटाकेविरोधी मोहीम शाळांमध्ये राबवली त्यामुळे फटाके उडविण्याचे प्रमाण कमी झाले, फटाक्यांमुळे पक्ष्यांना सर्वात जास्त त्रास होतो. आपण शाळकरी मुलांना आपल्या आयुष्यात पक्षांचं किती महत्व आहे याविषयी जागरुक करु शकतो व पक्षांचं संवर्धन करण्याच्या कामात त्यांनाही सहभागी करुन घेऊ शकतो.

 शहराचा विचार करता जलाशय, हरित पट्टे, जैवविविधता उद्याने ही केवळ विकास योजनेमध्ये कागदावरच नाही तर प्रत्यक्षात असली पाहिजेत. अशी ठिकाणांमुळे हे शहर मोकळा श्वास घेऊ शकतं तसंच विविध प्रकारच्या पक्षांना राहण्यासाठी जागा मिळते.प्रत्येक नागरिकाने अशा जागा जिवंत करण्यासाठी झटलं पाहिजे, विविध प्रकारच्या पक्षांची संख्या वाढणं हे शहरातल्या सुदृढ जैवविविधतेचं लक्षण आहे. माध्यमांनीही या बाबतीत अधिक सजग राहिलं पाहिजे कारण कोणताही पक्षी मेळावा किंवा पक्षी संमेलन एखाद्या वृत्तपत्राचा मथळा होऊ शकत नाहीत कारण पक्षी किंवा त्यांचं निरीक्षण करणा-यांभोवती प्रसिद्धीचं वलय नसतं हे समाजातलं एक दुःखद सत्य आहे!

बहुतेक व्यावसायिक संस्था फक्त विपणनासाठी पक्षी व हिरवळीची सुंदर छायाचित्रे वापरतात, मात्र हे चित्र प्रत्यक्षात साकारण्यासाठी व त्याचं रक्षण करण्यासाठी आपण काय करतो हे महत्वाचं आहे. मी अलिकडेच एका एफएम रेडिओ चॅनलवर कुठल्यातरी बांधकाम प्रकल्पाची जाहिरात ऐकली. त्यामध्ये सुरुवातीला वाहनांचा व यंत्रांचा गोंगाट ऐकू येतो व त्यानंतर पक्षांचा किलबिलाट ऐकवला जातो, या पार्श्वभूमीवर निवेदक तुम्हाला विचारतो, “सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला कोणता आवाज ऐकायला आवडेल?“ आपल्या शहरी जीवनामध्ये पक्षांचं महत्व समजून सांगण्यासाठी तसंच सदनिका विकण्यासाठीही हा संदेश अतिशय परिणामकारक होता!  

पण मित्रांनो आपण ज्या आकाशाखाली राहतो त्यात पक्षी निरनिराळे रंग भरतात, आपल्या कानांना त्यांच्या किलबिलाटाचं सुमधूरसंगीत ऐकता येतं; मात्र त्यासाठी त्यांना फक्त स्वतःची थोडीशी जागा हवी असते, ते आपल्यावर केवळ त्या जागेसाठी अवलंबून असतात. आपण आपल्या हव्यासापोटी त्यांच्या छोट्याशा जागेवरही अतिक्रमण करत आहोत, आपल्या तथाकथित ताकदीच्या जोरावर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय; मात्र लक्षात ठेवा चिमण्यांसारखे पक्षी नामशेष झाल्यानंतर आपण कितीही सशक्त व बुद्धिमान असलो तरीही आपल्याला त्यांना परत आणता येणार नाही! केवळ जाहिरातींमधला आवाज त्या बिचा-या पक्षांसाठी पुरेसा नाही, नाहीतर एक दिवस आपल्यासाठी फक्त पक्षांचे ध्वनीमुद्रित केलेले आवाजच उरतील, त्यादिवशी आपल्या आयुष्यातून सौंदर्य नाहीसं होईल, व या परिस्थितीसाठी केवळ आपणच जबाबदार असू!

संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स