“कोण म्हणतं तुम्हाला हातात चंद्र घेता
येत नाही? आज जेव्हा मखमली आकाशात चंद्र उगवेल
चांदण्या चमकू लागतील, तुमच्या खिडकीतून बाहेर
पाहा, त्यानंतर तुमचा हात उंच करा व तुमची
बोटे त्या तेजोवलयाच्या भोवती ठेवा.
अगदी बरोबर हे किती सोपं होतं!” ………व्हेरा नझारियन
व्हेरा नझारियन ही एक अमेरिकी-रशियन लेखिका असून काल्पनिक, वैज्ञानिक कादंबऱ्या
व इतर “नवलाईच्या
कादंबऱ्या” लिहीते, ज्यामध्ये मिथ पंक, ऍन आर्टिस्ट यांचा
समावेश आहे, नॉरिलाना बुक्स ही तिची प्रकाशन संस्था आहे. तिच्या वरील अवतरणामध्ये तिने आकाशाच्या अदभुतपणाचे वर्णन केले आहे, मात्र ती काल्पनिक नाही तर
निसर्गाची जादू आहे जी आपल्यापैकी कुणीही आपल्या खिडकीतून अनुभवू शकतो. मात्र विशेषतः पुण्यासारख्या महानगरात राहणाऱ्या लाखो लोकांसाठी “स्वतःचं आकाश” केवळ कल्पनेतच उरले आहे. नेहमीप्रमाणे बरेच जण
विचार करत असतील की हा विषय कुठल्या दिशेने चालला आहे, अलिकडेच मी माझ्या बहिणीशी गप्पा मारत होतो. पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत तिची
एक चांगली सदनिका आहे, तरीही ती बदलण्यासाठी माझ्या मागे लागली आहे, त्यासाठी ती
मला फक्त एवढेच म्हणाली की, “संज्या, मला मोठी गच्ची असलेली
सदनिका हवी आहे जिथून मला आकाश पाहता येईल!. एवढ्या एकाच कारणासाठी मला माझी सदनिका बदलायची आहे कारण
तिथे चांगल्या ठिकाणापासून ते सुखसोयींपर्यंत सर्व काही आहे मात्र आकाश दिसत नाही!” तिच्या शब्दांमुळे नाही तर आकाशाविषयीच्या तिच्या
भावनांमुळे माझे विचारचक्र सुरु झाले. आकाश दिसणे हे एखाद्या
घरासाठी इतके महत्वाचे आहे का? आम्ही अशा एका ठिकाणाहून
आलो आहोत जेथे अपार्टमेंट, संकुल वगैरे ऐकिवातच नव्हते व बहुतेक घरे एक मजली होती
व त्यातून आकाश नेहमी दिसायचे, मग ते अंगणातून असेल
किंवा परसातून असेल किंवा घराच्या गच्चीतून असेल! मला इथे प्रामाणिकपणे
सांगावेसे वाटते की मला “आंगण” किंवा “सज्जा” या शब्दांना समानार्थी
शब्द सापडले नाहीत, केवळ स्थापत्यशास्त्राच्या भाषेत ते समजावून सांगण्यापेक्षाही एखाद्या
व्यक्तिने ते अनुभवावे लागतात! या जागांमुळे आकाश नेहमी
तुमच्या नजरेच्या टप्प्यात असायचे, मला माझे बालपण आठवते व मी आकाशाखाली किती वेळ
घालवला हे जाणवते! मी पुण्यासारख्या महानगरामध्ये नक्कीच या गोष्टीला मुकतो व
या गोष्टीला मुकणारा मी एकटा नाही. आपल्यापैकी
बहुतेकांच्या लहानपणी स्वच्छ सूर्यप्रकाशात आकाशाकडे बघत राहण्याच्या आठवणी असतील,
विस्तीर्ण निळाशार आकाशातून पांढऱ्या धुराची रेघ सोडत जाणाऱ्या जेट विमानामुळे उत्तेजित
झाल्याचे आठवत असेल, अशा व्यक्तिंना नक्कीच आकाशाची आठवण येत असेल! आता आपण दिवस रात्र
काँक्रिटच्या किंवा काचेच्या भिंतीमध्ये असतो, कृत्रिम प्रकाश आपल्या सेवेसाठी असतो
व आपल्याला आपल्या खिडकीतून बाहेर डोकविण्यासाठी व आकाश पाहण्यासाठी क्वचितच वेळ
मिळतो, त्यामुळे आपल्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन काही वेळ आकाशाखाली घालवणे तर दूरच! मला खरोखर इथे वाचकांना व माझ्या मित्रांना एक प्रश्न
विचारावासा वाटतो की तुम्ही जिथे राहता किंवा काम करता त्या इमारतीच्या गच्चीवर
तुम्ही शेवटचे कधी गेला होता व दिवसा किंवा रात्री एक तासभर फक्त आकाश न्याहाळले? मला खात्री आहे की
आपल्यापैकी बहुतेकांना हे आठवायला अतिशय वेळ लागेल, मी सुद्धा असे क्वचितच करतो व
माझ्या कार्यालयाला लागून तसंच माझ्या घरातल्या अभ्यासिकेला लागून एक लहानशी गच्ची
आहे, त्यामुळे मी थोडासा वेळ आकाशाखाली घालवतो! त्यातून मला काय मिळते
हे शब्दातून व्यक्त करता येणार नाही, ते अनुभवले पाहिजे! मला असे वाटते की हे आकाश पाहायला मिळावे यासाठीच घरात लहानशी का होईना पण एक
गच्ची अतिशय महत्वाची आहे! आधुनिक जीवनशैलीमध्ये, आपले वैयक्तिक घर व खाजगी गच्ची
मिळणे शक्य नाही मात्र आपल्याकडे बाल्कनी व घराला जोडून गच्ची असू शकते जिथून
आपल्याला आपले आकाश पाहता येते. तरीही इमारतीच्या
रहिवाशांसाठी एक सामाईक गच्ची असली पाहिजे जी सर्वांसाठी कायदेशीरपणे तसेच
नैतिकपणे खुली असली पाहिजे! माझ्या लहानपणी आम्ही उन्हाळ्यात गच्चीवर झोपत असू, आम्ही जुन्या
गावात राहत होतो जिथल्या गच्च्या सामाईक असत, त्यामुळे मित्रांशी गप्पाटप्पा मारत
व भुताखेतांच्या गोष्टी करत आकाशाखाली झोपणे यात खरोखर गंमत होती! ते खऱ्या अर्थाने सामुदायिक जीवन होते व त्या जीवनाचा छप्पर किंवा गच्ची आणि
आमचे आकाश हा महत्वाचा भाग होता!
काळाच्या ओघात घराच्या रचनेसंबंधीच्या संज्ञा कशा
बदलत गेल्या हे पाहणेही अतिशय रोचक आहे मात्र या जागांचा वापरही बदलला आहे का? नाही, असे मला स्वतःला वाटते. मी वीस वर्षांहून अधिक
काळ घर बांधणीशी संबंधित आहे, विविध आकारांची व वेगवेगळ्या गरजांनुसार घरे बनवताना
काही गोष्टी मात्र अजिबात बदललेल्या नाहीत. किंमती वाढताहेत, जागा
कमी होतेय, नियमांचाही परिणाम होत असतो व काही वेळ आपल्याला असे वाटते की
नियोजनातील एखादा घटक नामशेष होत चालला आहे किंवा मागे पडलाय मात्र तो तात्पुरता
परिणाम असतो. शेवटी मानवी सभ्यता निर्माण झाल्याच्या काळापासून माणसाच्या
त्याच्या घराविषयीच्या गरजा फारशा बदललेल्या नाहीत.
एका घरात तुम्हाला सुरक्षित, खुशाल व शांत वाटले पाहिजे तसेच ते दिसायलाही चांगले असले पाहिजे. आता टिकाऊ साहित्य, कुलुपे, दरवाजे इत्यादी वापरुन आपण घर सुरक्षित बनवू शकतो मात्र ते शांत व सुंदर कसे बनवायचे, म्हणजेच बाहेरील व्यक्तिंना ते कसे सुंदर दिसेल. इथे बांधकाम व्यावसायिकांना तसेच रचनाकारांना घर निसर्गाला अधिक पूरक बनविण्याचे महत्व समजू लागते, घरात राहणाऱ्यांना त्यातून शांतता मिळावी यासाठी तो एक खात्रीशीर मार्ग आहे, आपल्याला असे एक ठिकाण हवे असते की जेथून आपण असुरक्षित न वाटता निसर्गाशी एकरुप होऊ शकू, अशा वेळी “सज्जा” किंवा जिला आपण बाल्कनी म्हणतो ती समोर येते. मात्र नेमकेपणाने सांगायचे झाले तर ती बाल्कनी नाही; ती वरच्या मजल्यावर मुख्य घराला जोडून खुली जागा असते जिथून मोकळे आकाश पाहता येते जिथे तुम्ही खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सान्निध्यात येता. ही खोलीला जोडून गच्ची असते इमारतीच्या छतावर नाही.
मध्य भारतामध्ये उन्हाळ्यात अतिशय उष्णता असते तिथे सज्जाला “गवाक्ष” म्हणजे बहुतेकवेळा दगडावर कोरलेली नक्षीदार जाळी लावलेली असते. यामुळे दोन हेतू साध्य होतात, एक म्हणजे उष्ण झळांपासून संरक्षण होते व दुसरे म्हणजे सज्जा कुणालाही दिसतही नाही, त्यामुळे घरातील बायका रहदारीतून येणाऱ्या जाणाऱ्यांचा किंवा आजूबाजूचा त्रास न होता ती वापरु शकतात. बऱ्याच हवेली किंवा वाड्यांना तळ मजल्यावर मध्यभागी चौक असे मात्र त्यालाही मर्यादा होत्या कारण तिथून आकाश दिसायचे मात्र उंच सज्जावर मिळते तशी वाऱ्याची झुळूक किंवा आजूबाजूचे दृश्य पाहायला मिळत नसे. अशा सुरक्षित सज्जाचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जयपूरचा हवामहल! विविध मजल्यांवर प्रत्येक सज्जाचे संरक्षण करण्यासाठी लाल दगडाची नक्षीदार जाळी बसविण्यात आली आहे ज्यामुळे अतिशय सुंदर दर्शनी भाग तयार झाला आहे. उत्तर भारतामध्ये अशा सज्जा प्रत्येक मजल्यावर तयार केल्या जातो म्हणजे तुम्हाला कोणत्याही मजल्यावरुन सुंदर दृश्य दिसून शकते व हवेची झुळूकही मिळते. अनेक हवेल्या आजही दिमाखात या सज्जा व योग्य ठिकाणी त्यांचे रक्षण करणाऱ्या जाळ्या मिरवतात. बऱ्याचदा खिडकीसारखे ठिकाण तयार केले जाते जिथे तुम्ही बसून आजूबाजूचे दृश्य पाहू शकता. युरोपातही पुरातन काळापासून घर बांधताना बाल्कनी किंवा वरांडा नावाने अशा जागा तयार केल्या जात असत. बऱ्याचदा अशी ठिकाणे “बोगनवेलींसारख्या” शोभेच्या वेलींनी सुशोभित केली जातात, ज्यामुळे रंगीबेरंगी परिणाम मिळतो. किंबहुना अनेक कुटुंबामध्ये अशा ठिकाणी सकाळची न्याहारी किंवा रात्रीचे जेवण घ्यायची परंपरा आहे, ज्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात निवांतपणा मिळतो.

एफएसआय व बहुमजली इमारतींच्या नंतरच्या काळात बाल्कनी हा शब्द रुढ झाला त्याची संकल्पना सज्जासारखीच असली तरी बऱ्याच ठिकाणी आकाराच्या बाबतीत त्याची चुकीची अंमलबजावणी केली जाते, ती केवळ चार फूट असल्यामुळे तुम्हाला हालचाल करायला फारशी जागा उरत नाही तसेच आजूबाजूचे दृश्यही मर्यादित दिसते. जागेच्या कमतरतेमुळे बाल्कनीची जागाही खोलीतच घेण्यात आली. त्यामुळे पुन्हा रचनाकारांना तुमचे स्वतःचे मोकळे आकाश कसे द्यायचे प्रश्न सतावू लागला व यातूनच जोडलेली गच्ची ही संकल्पना पुढे आली. अनेक जणांना वाटत असेल की ती विकासकांसाठी कमाईची आणखी एक संधी असते, मात्र मला असे वाटते की तुमच्या घराच्या आकाराच्या तुलनेत एक जागा असली पाहिजे जिथून मोकळे आकाश किंवा आजूबाजूचा परिसर दिसला पाहिजे, कारण अशाच ठिकाणी तुम्ही चार भिंतींच्या बंधनातून मुक्त होता व या मोकळेपणामुळे तुमचे मनही निसर्गासाठी खुले होते. ज्या घरात तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात येण्यासाठी जागा नाही ते कसले घर! दुर्दैवाने मी अशा गच्च्या विचित्र प्रकारे झाकल्या गेल्याचे किंवा बंद केल्याचे पाहिले आहे, त्यामुळे त्यांचा मूळ उद्देशच अपयशी होतो, तसेच संपूर्ण इमारतीचे सौंदर्य खराब होते. लोक सुरक्षेच्या नावाखाली लोखंडी पत्रे किंवा फायबरचे पत्रे किंवा लोखंडी गज वापरतात व हा भागही बंद करायचा प्रयत्न करतात. सुरक्षेच्या नावाखाली लोक जेव्हा या लोखंडी गजांच्या भयंकर रचनांनी घराला लागून असलेली गच्ची बंदिस्त करतात तेव्हा ते पाहताना अतिशय त्रास होतो. मी रहिवाशांच्या सुरक्षेच्या विरुद्ध नाही, मात्र शेवटी सुरक्षा ही आपल्या मनात असते, ती व्यवहार्य मार्गाने मिळवता येते हे आपण समजून घेतले पाहिजे. अशा जोडून असलेल्या लहान गच्च्या झाकून आपण स्वतःला आकाशाला आपल्यापासून दूर करतोय हे आपण विसरतो! अर्थात प्रति चौरस फूट दर आकाशाला भिडलेले असताना नागरिकांना दोष देऊ शकत नाही, प्रत्येक चौरस इंच महत्वाचा असतो व या बंदिस्त भिंतींविरुद्धच्या या स्पर्धेत आकाश हरते हे सत्य आहे.
आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे आपल्या भोवती वाढत असलेले काँक्रिटीकरण, या
प्रक्रियेत केवळ माणसांना नाही तर इतर सजीवांनाही निवारा व सुरक्षित ठिकाण हवे आहे
हे आपण विसरतो, आपल्या घरासाठी आपण आपल्या आजूबाजूच्या अनेकांना विस्थापित करत
आहोत! तुम्ही पुण्यात किंवा इतर
कोणत्याही वाढत्या शहरात पाहिले असेल की पूर्वी भारद्वाज, साध्या चिमण्या, बुलबुल,
मैना व अगदी फुलपाखरे यासारखे असंख्य पक्षी दिसायचे, मात्र आता आपल्याला हे पक्षी दिसत
नाहीत. याचे साधे कारण म्हणजे त्यांच्यासाठी अशी जागाच उरलेली
नाही की जिथे ते थोडावेळ विश्रांती घेऊ शकतात, जिथे त्यांना अन्न व पाणी
नैसर्गिकपणे उपलब्ध असेल. ते त्यांची घरटी विटांच्या भिंतींवर किंवा काँक्रिटच्या
स्लॅबवर किंवा आपल्या दर्शनी भागात बसविलेल्या काचेच्या तावदानांवर बांधू शकत
नाहीत! अशा वेळी आपण थोडेसे लक्ष दिले व मदत केली तर या सज्जांवर
त्यांना अन्न व पाण्यासाठी एक चांगले ठिकाण मिळू शकेल. अशाप्रकारे आपण जैवविविधतेला हातभार लावू, पक्षांसाठी थोडे
पाणी व अन्न ठेवा, थोडी रोपे लावा व काय फरक पडतो ते पाहा! मी माझ्या कार्यालयातील खोलीला जोडून असलेल्या एका लहानशा गच्चीवर हा अनुभव
घेतला आहे. मी सुरुवातीला केवळ पाण्याचा वाडगा ठेवू लागलो, दररोज
दुपारी तिथे अंघोळीसाठी व पाणी पिण्यासाठी पक्षांचा मेळावा भरतो व त्यांच्याकडे
नुसते पाहात राहण्यानेही माझे मन प्रसन्न होते, दररोज या पक्ष्यांमध्ये एका नव्या
पक्षाची भर पडते त्यामुळे त्यांचा मेळावा अधिक रंगीबेरंगी होतो.
मित्रांनो तुमच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढा व तुमच्याकडे सुदैवाने
“सज्जा” असेल तर तिथे काही वेळ घालवा, दिवसातील या काही मिनिटांमुळे तुमच्या
आयुष्यात किती फरक पडतो ते पाहा! आपण आपल्या घरात व
आजूबाजूला असलेल्या अशा जागांचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे व ज्या हेतूने त्या
बनविण्यात आल्या आहेत त्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अलिकडेच मी वास्तुविद्याविशारद व जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य
श्री. राजीव मिश्रा यांचे अतिशय सुंदर वाक्य वाचले, तेच इथे देतोय;“चंद्रप्रकाशाने संपूर्ण आभाळ व्यापलेले असते; मात्र ते तुमची खोली किती व्यापेल हे तिच्या खिडक्यांवर
अवलंबून असते”! माझ्या मते या वाक्याचा
अर्थ असा होतो की आकाश अथांग आहे व त्याने पृथ्वीला वेढलेले आहे, त्यामुळे आपण
सगळे त्याला पाहू शकतो; केवळ त्याकडे पाहण्यासाठी आपल्याला स्वतःचे एक माध्यम हवे
असते! आणि आपली गच्ची यापेक्षा उत्तम मध्यम कोणते
असते ! अशा गच्चीवर निवांतपणे
बसा, तिथे काही आरामदायक क्षण अनुभवा, गरम चहाचे घोट घ्या, उगवता सूर्य पाहा किंवा
कठड्याच्या गजांना पकडून पहिल्या पावसात चिंब भिजून मॉन्सूनचे स्वागत करा, एखाद्या
उबदार दुपारी खुर्चीत बसून परिकथांचे पुस्तक वाचा व काही वेळा अंधार असताना
दूरवरील तारे पाहा व त्यांचे आकार ओळखण्याचा प्रयत्न करा! शेवटी घर म्हणजे केवळ
काँक्रिटची एक स्लॅब, चार भिंती व महागडी अंतर्गत सजावट विकत घेणे नाही; तर या भिंतींमधून बाहेर पडुन असणारे तुमचे आकाश म्हणजेच खरे घर व ते खरच मोफत
मिळते!
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment