ताडोबाच्या
सुपर मॉम्स, भाग 2, जुनाबाई !
“भगवान हर जगह नही होता है, इसीलिए तो उसने माँ को बनाया”… बॉलिवुड चित्रपट “मॉम”
( देव सगळीकडे असू शकत नाही म्हणून त्याने आईला बनवले )
जेव्हा लेखाचा विषय आई हा असतो तेव्हा लेखाची सुरुवात करण्यासाठी आपल्या बॉलिवुड चित्रपटांपेक्षा आणखी चांगले काय असू शकते आणि माझ्याकडे संवाद निवडण्यासाठी कितीतरी पर्याय होते. तरीही मॉम या चित्रपटातील वरील संवाद या लेखासाठी अतिशय चपखल आहे असे मला वाटले व ताडोबातील सुपर मॉम या लेखमालेतील दुसरा भाग सादर करताना मला अतिशय आनंद होतोय. ज्यांनी या मालिकेतील आधीचा भाग वाचलेला नाही त्यांच्यासाठी सांगतो की ताडोबातील वाघीणींना मी (अनेक वन्यजीवप्रेमींच्या वतीने दिलेली) एक प्रकारची मानवंदना दिली आहे ज्या खरेतर ताडोबातील सुपर मॉम आहेत. ही लेखमाला म्हणजे या वाघीण मातांचा प्रवास किती खडतर असतो हे लोकांना समजावे यासाठीचा प्रयत्न आहे. योगायोगाने मॉम चित्रपटातील प्रमुख व्यक्तीरेखा हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांनी साकारली होती व प्रसिद्धीला येण्यापर्यंतचा त्यांचा प्रवासही थोड्याफार प्रमाणात ताडोबातील सुपर मॉमसारखाच खडतर होता. त्याच वेळी मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की माझ्या लेखामध्ये काळवेळ, ठिकाणांचे, तसेच वंशावळीविषयीचे संदर्भ यासंदर्भात त्रुटी असू शकतात कारण मी कोणी वन्यजीवन किंवा ताडोबाच्या जंगलाचा संशोधक नाही. मी निव्वळ एक पर्यटक आहे ज्याला जंगलांविषयी इतर पर्यटकांपेक्षा थोडे अधिक माहिती आहे. त्याचप्रमाणे माझ्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या पार्श्वभूमीमुळे मी जे काही पाहतो व ज्याचे निरीक्षण करतो त्याला तर्काची जोड देऊ शकतो. ही लेखमाला ताडोबाचा (जे आधीच प्रसिद्ध आहे) किंवा काही विशिष्ट वाघांचा किंवा एकूणच वाघांच्या प्रजातीचा उदोउदो करण्यासाठी नाही तर एकूणच या उमद्या प्राण्याचे महत्त्व व त्याची केवळ स्वतःच्याच संवर्धनामध्ये नव्हे (म्हणजे टिकून राहण्यामध्ये) तर हजारो लोकांचे जीवनमान सुधारण्यामध्ये तसेच पूर्ण वन्यजीवनाचे भवितव्य सुरक्षित करण्यामध्ये किती महत्त्वाची भूमिका आहे हे लोकांना समजावे यासाठी हा लेखप्रपंच आहे !
इथे, अनेक जण विचारतील हे जरा अतिशयोक्तीपूर्ण वाटत नाही का, कारण काही वाघ (म्हणजे वाघ प्रत्यक्षपणे) स्वतः संवर्धनाचे एवढे मोठे काम कसे करू शकतात. किंबहुना ताडोबासारख्या ठिकाणी वाघांचे तसेच वन्य संवर्धन यशस्वी होण्यासाठी आपण माणसेच जबाबदार नाही का, व त्यासाठी माणसांची पाठ थोपटायला नको का? अशा सर्व लोकांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की वाघांवर ही वेळ कुणी आणली, वन्यजीवनाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची वेळ कुणामुळे आली, माणसांमुळेच, बरोबर? म्हणूनच, आपण वाघांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत असू तर काही महान करत नाही, कारण आपण आपलीच पापे धुण्याचा प्रयत्न करत आहोत. खरे श्रेय या माता असलेल्या वाघिणींचे आहे ज्या माणसांच्या प्रयत्नांशी जुळवून घेत आपल्याला वन्यजीवन संवर्धनाचे प्रयत्न करण्यासाठी मदत करत आहेत, हे लोकांना माहिती असले पाहिजे, म्हणूनच हा लेख लिहीत आहे. मला सुदैवाने (म्हणजेच नशीबाने) अनेकदा ताडोबाला भेट देण्याची व या मातांचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली कारण त्यामुळे मला त्यांच्या योगदानाची व प्रयत्नांची केवळ जाणीवच झाली नाही तर मला वन्यजीवनाविषयी किंवा एकूणच जीवनाविषयी बरेच काही शिकता आले व वन्यजीवन संवर्धनासाठी सहजीवनाचे महत्त्व समजून घेता आले. यापैकी काही वाघिणींना मी दशकभरापासून पाहात आलो आहे व लहान बछड्यांपासून ते बछड्यांची आई होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास पाहिला आहे व तो अद्भूत आहे व त्यातील काही क्षण कायमस्वरूपी माझ्या स्मरणात राहतील. म्हणूनच एकप्रकारे या सर्व वाघिणींना ही माझी वैयक्तिक मानवंदनाही आहे. मी त्यांचा उल्लेख सुपर मॉम असा करतो, कारण आई होण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांची सेवा व त्याग उल्लेखनीय असतो. त्याग हे मातृत्त्वाचेच दुसरे नाव आहे, परंतु त्यांच्या त्यागाचे कौतुक करण्यासाठी आपण काय करत आहोत, हा प्रश्न मी स्वतःला विचारला व म्हणूनच ही लेखमाला लिहिण्याचे ठरविले. या बहुतेक वाघिणींमध्ये त्या वाघाच्या कुळातील आहेत याव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट सामाईक आहे, ती म्हणजे त्यांना स्वतःच्या अस्तित्वा आणि जागेसाठी द्यावा लागणारा लढा! यासाठी आधी त्यांना स्वतःच्या आईसोबत व नंतर मोठे झाल्यानंतर त्यांच्या भावंडांसोबत झगडावे लागते व त्याशिवाय माणसांसोबत जागेसाठी सतत झगडा सुरूच असतो व तो दिवसेंदिवस अधिक खडतर आणि क्रूर होत चालला आहे व तरीही त्या स्वतःच्या तसेच वन्यजीवनाच्या अस्तित्वासाठी सुरू असलेला लढा सोडण्यास तयार नाहीत, म्हणूनच त्या सुपर मॉम ठरतात! अशीच एक सुपर मॉम आहे जूनाबाई, वाघीण !!...
मदनापूर एक्सप्रेस, सुपर मॉम जुनाबाई !
साधारण सात वर्षांपूर्वी एका तरुण वाघीण आणि तिच्या पाठोपाठ चालत असलेली चार गोंडस बछडी असे एक छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले होते (त्या काळी फक्त फेसबुक होते) व छायाचित्रकाराने त्यास अतिशय समर्पक मथळा दिला होता, "मदनापूर एक्सप्रेस"! त्यादिवशी ताडोबाच्या कोलारा बाजूकडील अभयारण्याने वन्यजीव प्रेमींच्या जगात प्रवेश केला (म्हणजे वाघांची छायाचित्रे काढणाऱ्यांच्या). तोपर्यंत ताडोबा म्हणजे केवळ मोहार्लीकडील बाजू (हे ताडोबाच्या पहिल्या प्रवेशद्वारांपैकी एक आहे) असेच समीकरण होते. अनेक लोकांना माहितीही नव्हते की अभयारण्यामध्ये कोलारा/चिमूरच्या बाजूनेही प्रवेश करता येतो व इथेही वाघ दिसून येतात, ज्यासाठी बहुतेक लोक इथे भेट देतात. त्याचवेळी मदनापूर व कोलारा बफर क्षेत्रेही उघडण्यात आली. स्थानिक गावातील एका वृद्ध (जुना) स्त्रीवरून (बाई) तिथल्या वाघिणीला जुनाबाई हे नाव देण्यात आले होते. त्या महिलेला त्या जंगलातील कुणा वाघाने मारले असावे असे मानले जाते. हा जंगलाचा पट्टा आता या वाघिणीचे क्षेत्र झाले आहे, आता तिची अनेक बछडी जंगलाच्या जैवविविधतेचा भाग आहेत. गेल्या जवळपास आठ वर्षांपासून ती कोलारा/मदनापूर/पळसगाव बफर क्षेत्राची (ही गाभा क्षेत्राला अगदी लागून असलेली गावे आहेत) अनभिषिक्त राणी आहे. तिचे काम सोपे नाही, कारण एकीकडे हा मानवी वसाहतींनी बराच गजबजलेला भाग आहे तर दुसरीकडे जंगलाचा हा भाग म्हणजे नर वाघांसाठी ताडोबाच्या गाभा क्षेत्रातून बाहेरील जंगलांमध्ये जाण्यासाठीचा मार्ग आहे. एखाद्या वाघाच्या हद्दीमध्ये अधिकार क्षेत्रावरून होणाऱ्या लढाईत अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातून बाहेर काढण्यात आलेले नर वाघ बहुतेक वेळा जंगलाच्या या बफर क्षेत्रामध्ये आसरा घेतात, तसेच ज्या नवीन वाघांना जागेच्या शोधात ताडोबाच्या गाभा क्षेत्रात प्रवेश करायचा असतो तेही याच मार्गाने जातात व या पट्ट्यावर जुनाबाईचे राज्य आहे. मी अतिशय नशीबवान आहे की गेल्या पाच वर्षांपासून मला जुनाबाईला पाहण्याचा योग येत आहे व ती ज्याप्रकारे वेगवेगळ्या नर वाघांना तसेच माणसांना समोरे जाते ते कौतुकास्पद आहे. एकीकडे तिला नव्या नर वाघांशी जुळवून घ्यावे लागते व दुसरीकडे माणसांपासून सुरक्षित अंतर ठेवून राहावे लागते जे जंगलाच्या बफर क्षेत्राच्या या भागामध्ये मोठ्या संख्येने आहेत. नर वाघांबाबत असलेली अडचण म्हणजे वाघिणीला एखाद्या दुसर्या वाघापासून झालेली बछडी असतील व तो वाघ त्या जंगलातून निघून गेला तर नवीन नर वाघ वाघिणीच्या आधीच्या बछड्यांना मारून टाकण्याचाच प्रयत्न करतो जे कुठल्याही आईसाठी अतिशय वेदनादायी असते. परंतु निसर्ग असाच असतो, काहीवेळा जरा निर्दयी. जुनाबाईच्या क्षेत्राचे भौगोलिक स्थान असे आहे की तिथे सातत्याने नवीन वाघांची ये-जा सुरू असते, तरीही ती बऱ्याच बछड्यांना वाढवू शकली आहे जी ताडोबासाठी खऱ्या अर्थाने भेट आहे. माणसांना तोंड देण्याविषयी बोलायचे झाले, तर ती आता त्याला सरावली आहे, या जंगलांमध्ये वाघांसोबत राहणाऱ्या माणसांपासून जुनाबाई कसे अंतर राखून राहते हे पाहणे खरोखरच हृद्य असते (ते बफर क्षेत्र असल्यामुळे येथे माणसाच्या वावराला परवानगी असते). मी अनेकदा स्थानिक गुराखी (मेंढपाळ) त्यांची गुरेढोरे घेऊन जंगलातील रस्त्यांवरून घेऊन जाताना पाहिले आहे किंवा ते त्यांच्या शेळ्या-मेढ्या चरत असताना त्यांची राखण करत बसलेले असतात. त्यांच्या अवती-भोवती असलेल्या झुडुपांमध्येच जुनाबाई विश्रांती घेत आहे याची त्यांना जाणीवही नसते, परंतु ती अतिशय सतर्क असते व त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असते. ज्या क्षणी हे मेंढपाळ अथवा गुराखी जंगलातून बाहेर जातात किंवा त्यांच्या गुराढोरांना बफर क्षेत्राच्या दुसऱ्या भागात घेऊन जातात, त्यांच्या मागे ती सावकाश झुडुपांमधून बाहेर येते व तिच्या अन्नाचा शोध सुरू करते किंवा तिच्या हद्दीवर खुणा करू लागते. त्याचप्रमाणे, मी जुनाबाईला तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी किंवा तत्सम दैनंदिन कामांसाठी जंगलामध्ये आलेल्या किंवा दुसरीकडे जाण्यासाठी या रस्त्यांवरून जात असलेल्या गावातील महिलांना तोंड देतानाही पाहिले आहे. असे असले तरीही ती कधीही त्यांना अचानक या महिलांच्यासमोर रस्त्यावर येऊन किंवा त्यांच्या वाटेत येऊन त्यांना कधीही घाबरवत नाही. जुनाबाई इतकी वर्षे टिकून आहे कारण माणसे आता तिच्या आयुष्याचा भाग असल्याचे व त्यांच्यावर हल्ला केल्याने तिचे किंवा तिच्या बछड्यांचे भले होणार नाही हे तिला माहिती आहे. ती माणसांवर नजर ठेवून असते परंतु त्यांच्यापासून एक सुरक्षित अंतर राखून ती त्यांच्या असण्याचा आदर करते व हा अनुभव अतिशय सुखावणारा आहे. त्याचवेळी जेव्हा जंगलात एखादा नर वाघ असतो, तेव्हा ती तिच्या बछड्यांना जंगलाच्या एका भागात ठेवते व नर वाघाला भुलवून जंगलाच्या दुसऱ्या भागात नेते जेणेकरून तो त्यांचा पिता नाही अशी बछडी सुरक्षित राहू शकतील!
त्याचवेळी जेव्हा ती तिच्या बछड्यांसोबत असते तेव्हा ती अतिशय सतर्क असते व सतत सावध नजर ठेवून असते. माझ्या अलिकडच्या सफारीमध्ये मला तिचे हे कौशल्य अतिशय जवळून पाहता आले. आम्ही एका ठिकाणी वाट पाहत असताना, जुनाबाई दाट झुडुपांमध्ये विश्रांती घेत होती व तिची दोन लहान बछडी तिच्या अवती-भोवती होती. त्या झुडुपांमध्ये एका लहानशा झरोक्यातून आम्ही तिला पाहू शकत होतो. ज्या वाघिणीची बछडी आहेत ती शक्यतो अशाच जागा निवडते म्हणजे ती शिकारीसाठी गेली असताना त्यांना लपवून ठेवू शकते. स्वतःसाठी व बछड्यांसाठी रात्रभर शिकार करून ती थकून गेली असावी व ती शिकारीला गेली असताना, मागे सोडलेल्या बछड्यांचे रक्षण करण्याचा ताण सतत असतोच, म्हणूनच या आई असलेल्या वाघिणींसाठी विश्रांती हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. बछडी पूर्णपणे जागी होती व खेळण्याच्या मनस्थितीत होती तर जुनाबाई गाढ झोपलेली होती. आम्ही आजूबाजूला असल्याची तिला जाणीव होती, परंतु आमचा तिच्या बछड्यांना धोका नसल्याचेही ती जाणून होती. त्यामुळेच ती निश्चिंतपणे झोपलेली होती व ती उठते का व बछड्यांना घेऊन जवळपासच्या पाणवठ्यावर जाते का याची आम्ही वाट पाहात होतो. अशा प्रसंगी केवळ संयमच आवश्यक असतो कारण वाघ सलग काही तास झोपू शकतो ज्यामुळे तुम्ही वैतागू शकता. परंतु आता या वाट पाहण्याच्या या खेळाचे आम्ही आता अनुभवी खेळाडू झालो आहोत, त्यामुळे वेळ हळूहळू पुढे जात होता. अचानक थोड्या अंतरावर आम्हाला इतर प्राण्यांचे इशारा देणारे क्षीण आवाज ऐकू आले व जंगली कुत्र्यांचे आवाजही ऐकू येत होते. जुनाबाई ताडकन तिच्या पायांवर उभी राहिली, जणू काही ती झोपलीच नसावी. एका झटक्यात ती रस्त्यावर आमच्या जिप्सीच्या पुढ्यात उभी होती व तिच्या बछड्यांना सुरक्षित जागेवरून न हालण्याच्या सूचना देत होती. तिचे डोळे काही धोका आहे का याची पडताळणी करण्यासाठी संपूर्ण परिसराची छाननी करत होते, वाघांना जंगली कुत्र्यांचा धोका असतो. तिचे कान टवकारलेले होते व ते अगदी बारिकशा आवाजाचाही वेध घेत होते जेणेकरून जंगली कुत्र्यांचा आवाज कोणत्या दिशेने येत आहे याचा अंदाज लावता येईल. तिने या संपूर्ण जागेला वळसा घालण्याचे ठरवले व ती निघून गेली, मी अत्यंत तत्परतेने उत्तम प्रकारे आपले कर्तव्य बजावणारी सुपर मॉम पाहिली होती!!. ती जवळपास तासभर झोपलेली होती व ती कधी उठेल याचा काही भरवसा नव्हता. जंगली कुत्र्यांचा अस्पष्टसा आवाज ऐकूनही तिच्या बछड्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी ती क्षणार्धात ताडकन उठली व आपला थकवा बाजूला ठेवत संपूर्ण परिसराचा फेरफटका मारून आली व धोक्यास स्वतः तोंड देण्यासाठी सज्ज होती. जंगली कुत्री ही वाघांची कट्टर शत्रू असतात व ते झुंडीने हल्ला करत असल्यामुळे वाघालाही इजा करू शकतात. तरीही तिच्या बछड्यांसाठी जुनाबाई त्यांच्याशी दोन हात करायला सज्ज होती. जंगलामध्ये आता जुनाबाई या वृद्धेच्या नावे एक मंदिर आहे, व आपली ही सुपर मॉम अनेकदा येथे घुटमळताना दिसते. म्हणूनच तिचे नामकरण जुनाबाई वाघीण असे करण्यात आले आहे. जुनाबाईच्या कुळाविषयी सांगायचे झाले तर ती ताडोबातील आणखी एक सुपर मॉम छोटी मधू हिची मुलगी असल्याचे काही जण म्हणतात जिचे सध्या जुनोना बफर क्षेत्रावर नियंत्रण आहे. तर काही जण म्हणतात की ती ताराची मुलगी आहे. ताडोबातील सुपर मॉमविषयीच्या लेखमालेतील याआधीच्या लेखामध्ये मी छोटी मधूविषयी लिहीले आहे, अर्थात कुणीही या माहितीची खात्री करू शकत नाही व अनेकजण असेही म्हणतात की हे क्षेत्र रिक्त असल्यामुळे जुनाबाईने बाहेरून येऊन त्यावर ताबा मिळवला. परंतु एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे जुनाबाई आणखी एका सुपर मॉमची आई आहे, या वाघिणीचे नाव आहे विरा जी जुनाबाईच्या हद्दीला लागून असलेल्या जंगलामध्ये राज्य करते, ज्याला बेलारा असे म्हणतात. तिला दोन धिटुकली बछडी आहेत, त्यामुळे जुनाबाई आधीच सुपर आजी झाली आहे !
जुनाबाईसारख्या वाघिणींनी वन्य पर्यटनासाठी आणखी एक गोष्ट,खुप चांगली केली आहे ती म्हणजे त्या त्यांच्या बछड्यांसाठी सुपर मॉम आहेत त्याचसोबत त्या माणसे व जंगलांमध्येही आरामशीरपणे वावरतात. म्हणूनच बहुतेक त्यांची बछडी जेव्हा मोठी होतात तेव्हा ती माणसांना बुजत नाहीत किंवा घाबरत नाहीत. त्यामुळे पर्यटकांनाही त्यांना पाहताना मजा येते, जे वन्य पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे व यामुळेच जगभरातील पर्यटकांमध्ये ताडोबा अतिशय लोकप्रिय आहे. असे करत असताना, अप्रत्यक्षपणे जुनाबाई (व तिच्यासारख्या इतरही वाघिणी) अनेक स्थानिक गावकर्यांचीही आई झालेली आहे. ती तिच्या बछड्यांसोबत मदनापूर/कोलारा बफर क्षेत्रात दिसून येत असल्यामुळे तिथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे व येथील अनेक कुटुंबांसाठी तो उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. याच कारणाने जुनाबाई ताडोबातील सर्वोत्तम सुपर मॉमपैकी एक आहे व तिचा कार्यकाळ मोठा असावा याच शुभेच्छा मी तिला देतो.
अर्थात जुनाबाईसारख्या सुपर मॉमसाठीही बछड्यांना वाढविण्याचे काम दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे कारण वाघांची संख्या वाढत आहे व जागा तेवढीच आहे किंबहुना कमी होत चालली आहे. यामुळे क्षेत्रासाठी वारंवार लढाया होऊ लागल्या आहेत व यामध्ये दुसऱ्या नर वाघांपासून झालेले बछडे बळी पडतात. हे जंगल मोठे आहे, परंतु एवढेही मोठे नाही की एक आई तिच्या बछड्यांना सगळ्यांच्या नजरांपासून वाचवू शकेल. सरतेशेवटी काही बछडी इतर वाघांकडून मारली जातात. एवढ्यातच जुनाबाईची एक साधारण वयात आलेली बछडी दुसऱ्या वाघिणीने मारली. आपण जुनाबाईसारख्या सुपर मॉमना शक्य तेवढी जागा देऊ शकतो व त्यांच्या जीवनात कमीत कमी अडथळा आणू शकतो. त्यासाठी वन्यजीवन पर्यटन महत्त्वाचे आहे, कारण तरच जुनाबाई भोवती असलेल्या स्थानिकांची तिने त्यांचे एखादे जनावर किंवा मेंढी मारले तर त्यांची हरकत नसेल. कारण तिला जगण्यासाठी हे करणे आवश्यक असल्याचे ते जाणतात व जुनाबाईच्या जगण्यावर त्यांचेही जगणे अवलंबून आहे, म्हणूनच सुपर मॉम जुनाबाईला उदंड आयुष्य लाभो !
वाघीण जुनाबाईची जादूच अशी आहे की मी तिच्यासोबत आणखी दोन किंवा तीन सुपर मॉमविषयी लिहीण्याचा विचार केला होता, परंतु मी जेव्हा लिहीण्यास सुरुवात केली तेव्हा तिनेच संपूर्ण जागा व्यापली. मला तुमच्या वाचनाच्या संयमाची परीक्षा घ्यायची नाही त्यामुळे ताडोबातील आणखी काही वाघिणी म्हणजेच सुपर मॉमविषयी लेखमालेतील पुढील लेखात जाणून घेऊ, असे आश्वासन देऊन निरोप घेतो...!
खालील लिंकवर तुम्ही आणखी काही क्षण पाहू शकता...
https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72177720321143099/
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स