22 डिसें 76 – 10 एप्रिल 25
आरती, तिच्या जीवनाची क्वीन!
“जंगल दयाही जाणत नाही अथवा द्वेषही”… जिम कॉर्बेट.
विशेष म्हणजे या अवतरणाचे लेखक, महान जिम कॉर्बेट यांनीही याच महिन्यात 19 एप्रिलला अखेरचा श्वास घेतला परंतु जवळपास सत्तर वर्षांपूर्वी म्हणजे 1955 मध्ये. मी माझ्या अनेक लेखांसाठी जिम यांची अवतरणे वापरली आहेत, परंतु मला कधीही असे वाटले नव्हते की वरील अवतरणामध्ये जीवनाचे जे तत्वज्ञान मांडले आहे त्याचा समावेश असलेल्या लेखासाठी मला हे अवतरण वापरता येईल. जिम हे ब्रिटीश नागरिक होते तरीही ते आजकालच्या तथाकथित देशभक्तांपेक्षा जास्त देशी (भारतीय) होते व त्याचा एक पुरावा म्हणजे, ते त्यांच्या पुस्तकांमध्ये तसेच बोलतानाही नेहमी जंगल असा उल्लेख करत असत, ‘फॉरेस्ट’ असा नव्हे. मी जिमच्या शब्दात जंगलांविषयीचे व्यावहारिक तत्वज्ञान वापरण्याचे (अनेकांना कदाचित हे फार क्रूर वाटेल) कारण म्हणजे, जंगल बेल्सच्या (www.junglebelles.in) संस्थापकांपैकी एक व आमची अतिशय जिवलग मैत्रीण, आरती कर्वे हिचे जाणे. जंगल बेल्सची आणखी एक संस्थापक व मैत्रीण असलेल्या हेमांगीमुळे माझी आरतीशी तशी अलिकडे म्हणजे बरोबर दहा वर्षांपूर्वी, याच महिन्यात (एप्रिल 2015) कॉर्बेटच्या जंगलाच्या सहलीमध्ये भेट झाली, व ती गेली देखील याच महिन्यात; एप्रिल, आरती व जिम कॉर्बेट हा एक विचित्र योगायोगच म्हणावा लागेल. किंबहुना हा वन्यजीवनामुळे तयार झालेला एक सच्चा बंध होता, माझ्यामध्ये वन्यजीवनाविषयी ओढ (म्हणजे खरेतर वेड) निर्माण करण्यात जिम कॉर्बेटची भूमिका अतिशय मोठी आहे!
असे पाहिले तर, प्रत्येकाच्याच आयुष्यात दररोज कुणीतरी जन्म घेते व कुणाचातरी मृत्यू होतो हे जंगलाने मला शिकवले आहे. तिथे प्रत्येक गोष्ट एका शब्दाभोवतीच फिरत असते तो म्हणजे ‘आज जगणे’, हाच जंगल व आपल्या तथाकथित सुसंस्कृत समाजातील फरक आहे. ज्ञान व बुद्धिमत्तेमुळे आपण जीवनाच्या वास्तवापासून स्वतःला तोडून टाकले आहे व म्हणूनच आपल्या आयुष्यात जेव्हा एखादी दुःखद घटना घडते तेव्हा त्यातून सावरायला आपल्याला वेळ लागतो व आरतीचे जाणे ही आमच्यासाठी अशीच एक घटना होती. मी जंगलाच्या नियमांचे पालन करत असल्यामुळे माझा कधीच भावनातिरेक होत नाही व आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन नेहमीच व्यावहारिक राहिला आहे याचा मला अभिमान वाटायचा, या माझ्या स्वभावामुळे मी निश्चितच माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये फारसा लोकप्रिय नाही, हे नेहमी असेच राहिले आहे. परंतु आरतीच्या जाण्यामुळे मात्र मी कधी नव्हेतो थोडा नक्कीच हादरलो. जेव्हा हेमांगीने आम्हा वन्यप्रेमी मित्रांना (जंगलांमध्ये भटकंती करणाऱ्या पाच मित्रांचा गट) सांगितले की त्या कॉर्बेट्च्या सहलीमध्ये तिची एक अतिशय जिवलग मैत्रिणही येणार आहे जी अमेरिकेतून भारतात परत आली आहे व तिलाही आपल्यासोबत यायचे आहे, तेव्हा आम्ही सर्वांनीच त्यासाठी सहमती दर्शवली. आरतीचे मूळची सातारची, जे पुण्याच्या तुलनेने लहान शहर (मी विदर्भातला आहे) आहे व सामान्यपणे लहान शहरांमधून पुण्यात आलेली मुले जरा बुजरी असतात किंवा पुणेकरांसोबत वावरताना त्यांना कुठेतरी कमीपणाची भावना वाटते (यात काहीच आश्चर्य नाही), परंतु आरतीमध्ये मात्र त्याचा लवलेशही नव्हता. हे म्हणजे एखाद्या वाघीणीला तुम्ही कोणत्याही जंगलात ठेवा तिला फक्त एक गोष्ट माहिती असते, ती म्हणजे राज्य करणे, आरतीही तशीच होती. आम्हाला (म्हणजे मला) त्याची पहिली झलक मिळाली, जेव्हा ती आमच्यासोबत सहलीसाठी येणार आहे हे कळले तेव्हा तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली (तेव्हा इन्स्टाग्राम नव्हते) व तिने ती सहा महिने स्वीकारली नव्हती व कॉर्बेटच्या सहलीनंतरच तिने माझी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली, ती अशीच रोखठोक होती. सुरुवातीला ती बाहेरच्या लोकांना फार गर्विष्ट वाटत असे परंतु एकदा तिच्याशी ओळख झाल्यानंतर ती माणूस म्हणून किती चांगली होती हे तुम्हाला कळत असे. तिने जाणीपूर्वक तिच्या मनाच्या किल्ल्याभोवती अशी तटबंदी निर्माण केली होती, म्हणजे कुणीही सोम्या-गोम्या तिच्या संपर्कात येऊन तिचा वेळ वाया घालवणार नाही. त्या सहलीनंतर, आरती आम्हा वन्यप्रेमींच्या गटाचा अविभाज्य भाग झाली व त्यातूनच हेमांगीसोबत जंगल बेल्सची स्थापना केली, ज्यामध्ये माझाही थोडाफार हातभार आहे.
तिने इथे भारतामध्ये आठ अतिशय सुंदर वर्षे घालवली, ज्यामध्ये आम्ही अनेकदा जंगलांना भेट दिली, पार्ट्या व कार्यक्रमांना हजर राहिलो, दोन वर्षांपूर्वी कौटुंबिक कारणांमुळे तिला पुन्हा अमेरिकेला जावे लागले, परंतु ती मनाने इथेच होती. तिची शेवटची सहल जेमतेम चार महिन्यांपूर्वी झाली होती व तिचा व माझा वाढदिवसही डिसेंबरमध्ये एकाच आठवड्यात असतो, आम्ही तोदेखील साजरा केला व जंगलाच्या पुढील सहलीसाठी परत येण्याचे आश्वासन देऊन ती गेली. तसेच, तिचा 50वा वाढदिवस अमेरिकेमध्ये साजरा करण्यासाठी तिने इतके आग्रहाचे आमंत्रण दिले होते की आमच्या गटातील दोन सदस्यांना, तिच्या आग्रहास्तव अमेरिकेचा व्हिसा मिळवणे भाग पडले, लोकांना आपल्या इच्छेनुसार वागायला लावण्यात ती पारंगत होती! त्यानंतर फेब्रुवारीमध्ये तिला कर्करोग झाल्याचे मला समजले, परंतु ती सकारात्मक होती व त्यातून बाहेर पडू असा विश्वास तिला वाटत होता. आम्हालाही तिची विजिगिषू वृत्ती माहिती होती व ती ही लढाईदेखील जिंकेल अशी आम्हाला खात्री होती. परंतु 10 एप्रिलला अनिरुद्धचा (तिचा नवरा (माझा अतिशय जिवलग मित्र)) तिच्या मोबाईल क्रमांकावरून आमच्या ग्रूपवर मेसेज आला, “आरतीला देवाज्ञा झाली”. जंगलामध्ये सतत वावरल्यामुळे व बांधकाम व्यवसाया सारख्या प्रोफेशन मध्ये जन्म काढल्याने जीवनाविषयी अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन असलेला मी, त्याक्षणी जीवनाच्या अशा कठोरपणामुळे क्षणभर बधीर झालो!आरतीच का, इतक्या लवकर का, ती इतकी तंदुरुस्त असूनही तिला असे का व्हावे, इतक्या झटपट का संपावे, तिची काय चूक होती, व इतरही अनेक प्रश्न होते, ज्यामागे काहीच तर्क नाही व ज्यांची उत्तरेही नाहीत हे मी जाणतो, परंतु तरीही ते मला भेडसावत राहतात व म्हणूनच जिम यांचे अवतरण वाचकांसाठी नाही तर माझ्यासाठी आहे. आयुष्य म्हणजे जंगल व दया, द्वेष (क्रूरपणा), क्षमा ,शांती हे सर्व शब्द आपण आपल्या हतबल झालेल्या मनाला समजावण्यासाठी तयार केलेले असतात व केवळ मृत्यू हेच सत्य आहे व कोणत्याही दिवशी तो कुणाचाही होऊ शकतो, हेच जंगल आपल्याला सांगते. सर्वात सशक्त व सर्वात सुंदर हरिण सुद्धा वाघाचे भक्ष्य ठरू शकते, तर एखादा कमजोर व कुरूप प्राणी शिकाऱ्याच्या तावडीतून निसटून जाऊ शकतात, याचे कारण केवळ तो दिवस त्यांचा नव्हता एवढे साधे, सोपे आहे. त्याचवेळी वाघाला त्याच दिवशी दुसऱ्या वाघाशी झालेल्या झटापटीत इजा होऊ शकते किंवा शिकारीदरम्यान एवढी इजा होऊ शकते की त्याचा भुकेमुळे जीव जाऊ शकतो कारण त्याला शिकार करणे शक्य नसते, हेदेखील जंगलामध्येच होते. सोप्या शब्दात सांगायचे तर, तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत शक्य तितक्या उत्तम प्रकारे आयुष्य जगायचे असते व आरती तशीच जगली व ती जाणीव घेऊनच गेली, अर्थात मला अजूनही हे तत्वज्ञान पचनी पडत नाही. ती एक अतिशय उत्तम आई, पत्नी तसेच गृहिणी होती, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, कारण तुम्ही तुमच्या अटींवर आयुष्य जगत असताना या सर्व भूमिका चोख पार पाडणे अतिशय महत्त्वाचे असते, जे अनेकांना साध्य होत नाही! आरतीचे असे जाणे खरंतर आम्हा सगळ्यांना एक जीवनाविषयक इशाराच आहे जो तिने स्वतः जगून आणि अचानक जाऊन आपल्याला दिलाय!!
आयुष्य भरभरून जगावे यावर आरतीचा दृढ विश्वास होता व ही गोष्ट तुम्ही शिकू शकत नाही, असा दृष्टिकोन जन्मतःच असावा लागतो, जो तिच्याकडे होता. तिला क्वचितच कुणी निराश किंवा दुःखी पाहिले असेल. अर्थात जंगल बेल्स किंवा जंगलातील सफारींव्यतिरिक्त तिच्याशी इतरत्र संपर्क व्हायचा नाही, तरीही वॉट्सॲपवर ग्रूपमध्ये जो काही संवाद होत असे, त्यावरून मी हे ठामपणे सांगू शकतो, कारण एखादे इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर त्याचे कौतुक करण्यासाठी तुम्ही कवी असण्याची गरज नाही. म्हणूनच आयुष्य जगण्याविषयी बोलायचे झाले तर आरतीही तशीच होती! तिला म्हातारे होणे या कल्पनेचा अतिशय तिटकारा होता व आमच्या पार्ट्यांमध्ये ती याविषयी बोलायची, पण मला हे माहिती नव्हते की ती शब्दशः याप्रमाणेच जगेल व स्वतःला किंवा जगाला आपण शरीराने म्हातारे होत असल्याचे पाहावे न लागता निघून जाईल. मला दुःखी चित्रपट अजिबात आवडत नाहीत (व आवडायचे नाहीत) ज्यामध्ये चित्रपटाच्या नायकाचा मृत्यू होतो व म्हणूनच मी "आनंद" पाहिला नव्हता कारण त्यामध्ये राजेश खन्नाचा कर्करोगामुळे मृत्यू होतो. तरीही त्यातील संवाद (चित्रपटप्रेमी असल्यामुळे मला त्याचे कौतुक वाटते), “बाबू मोशाय, जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये,” आज मला आठवला. या संवादाचा अर्थ मला तेव्हा उमगला नव्हता कारण लंबी आणि बडी (म्हणजे लांब व मोठी) हो दोन्ही शब्द आयुष्याच्या बाबतीत वापरताना काय फरक आहे, दोन्ही सारखेच तर आहेत असे वाटत असे. अर्थात, आरतीसारख्या मित्रांसोबत जगताना मला तो फरक समजला, काहीवेळा आयुष्य तुम्हाला व्यावहारिक धडे इतक्या निर्दयीपणे शिकवत असते. हे शब्द जर आरतीपर्यंत पोहोचले तर ती जिथे कुठे असेल तिथून हसून म्हणेल, “संजयमोशाय, किमान आता तरी तुला लंबी जिंदगी आणि बडी जिंदगी (दीर्घ आयुष्य व मोठे आयुष्य) यातला फरक कळला असेल”! आरती, मी फक्त एवढेच म्हणू शकतो की, तू नेहमीच आयुष्यापेक्षा मोठी होतीस व असशील. मी तुझ्यासाठी काहीही इच्छा करणार नाही, कारण एक म्हणजे तू कधीही इतरांच्या नव्हे तर स्वतःच्याच इच्छेने जगलीस व दुसरे म्हणजे, मला माहितीय की त्या जगात सुद्धा तू इतरांच्या इच्छेने नव्हे तर स्वतःच्याच इच्छेने जगशील; त्यामुळे तसेच कर मैत्रीणी, मी अजिबात दुःख करणार नाही कारण तुझ्या जाण्यावर आम्ही दुःख करत राहणे तुला आवडणार नाही, किंबहुना तुझे जाणे सुद्धा साजरे केले तर तुला आनंद होईल, ती तुझ्यासाठी सर्वोत्तम आदरांजली असेल, जे आम्ही नेहमी करत राहू!
फॉरेस्टर्स: संजय, हेमांगी, सलील, संगीता व शिल्पा...
🐾🌱
No comments:
Post a Comment