Monday, 19 November 2012

दिवस साजरा करताना ("Celebrating a Day")



 
 
 
 
 

तुम्हाला जी गोष्ट जास्तीत जास्त अनुभवायची आहे ती साजरी करा...थॉमस जे. पीटर
एखाद्या गोष्टीचे महत्व पटण्यासाठी आपल्याला एखाद्या विशिष्ट दिवसाची काय गरज आहे? वरील अवतरण पाहिल्यानंतर माझ्या मनात हा प्रश्न नेहमी येत; विशेषतः सकाळने नुकताच बस दिवस आयोजित केला होता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र असा एखादाच बस दिवस साजरा होणं हे आपल्या यंत्रणेचं इतर ३६४ दिवशी अपयश नाही का? आपण कधी त्याचा विचार केला आहे का? आपल्याकडे मनपा प्रशासन, वाहतूक पोलीस, आरटीओ, लोकप्रतिनिधी व अशा अनेक संघटना आहेत ज्या आपल्या शहराच्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेला सहाय्य करु शकतात. असे असताना सकाळसारख्या वृत्तपत्राला या विषयाचा पाठपुरावा करावा लागावा अशी वेळ किंवा परिस्थिती आपण येऊच का देतो?  त्यानंतर राज्य सरकार आहे व केंद्रसरकारच्या जेएनएनयूआरएमसारख्या योजनांतर्गत मिळणारा निधी आहे! हे सर्व लोक अंध आहेत का?
इथे मला अकबर बिरबलाची एक गोष्ट आठवतेय. एकदा अकबराने आपल्या दरबारात एक प्रश्न विचारला, “ दिल्लीमध्ये किती अंध लोक आहेत? प्रत्येकाने विचार करायला सुरुवात केली व विविध अंदाज सांगीतले मात्र बिरबल शांत होता. तो म्हणाला तो दुस-या दिवशी उत्तर देईल.
दुस-या दिवशी सकाळी तो दरबारात गेला नाही व दिल्लीच्या मुख्य चौकात एक खाट दुरुस्त करायला बसला, त्यासोबत एक वही व लेखणी होती. बिरबल दरबारात न आल्यामुळे अकबराने तो कुठे आहे असे विचारले, तो काय करत आहे हे समजताच त्याने प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहायचं ठरवलं. बिरबलाला रस्त्याच्या मध्येबसून खाट दुरुस्त करताना पाहून अकबर आश्चर्यचकित झाला व त्याने विचारल, बिरबला तू काय करत आहेस?” तो प्रश्न ऐकून बिरबलाने आपल्या वहीत नोंद केली आणखी एक आंधळा”! अकबरला बिरबलाच्या कृतीतून त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं त्यानं हसत हसत त्याला परत दरबारात नेलं.
दुर्दैवानं आपल्याकडे सकाळसारख्या वृत्तपत्राच्या स्वरुपात बिरबल आहेत मात्र त्याचं उत्तर समजणारे अकबर नाहीत. बस दिवसाला प्रचंड पाठिंबा मिळाल्यानंतर दुस-या दिवसापासून रस्त्यावर पुन्हा तीच परिस्थिती होती. इथे मी बस दिवस किंवा त्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न याविषयी शंका घेत नाही. मात्र कधीपर्यंत आपण असे दिवसच साजरे करत बसणार आहोत, असा प्रश्न मला या शहराला व शासनकर्त्यांना विचारावासा वाटतो. सर्वजण एकत्र आले व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यासारख्या चांगल्या हेतूसाठी काही पावले उचलली तर किती बदल होऊ शकतो हे या शहराला व नागरिकांना दाखवून देण्यासाठी आपण बस दिवस साजरा केला. त्यादिवशी अनेक प्रसिद्ध नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास केला. त्यादिवशी त्यांची छायाचित्रे काढली गेली, बसमधील किंवा बस थांब्यावरील छायाचित्रांनी फेसबुक व ट्विटरवर गर्दी केली होती. याला आता जवळपास एक महिना होऊन गेला आहे मात्र किती जणांनी आठवड्यातून किमान एकदा तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे प्रवास करायला सुरुवात केली आहे? आधीपासूनच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे प्रवास करणा-या प्रवाशांसाठी पीएमपीएमएलची सेवा सुधारली का? त्या दिवशी या सेवेने उत्पन्नाचा उच्चांक गाठला. मात्र बस दिवसाला जशी सेवा दिली तशीच सेवा नेहमी देण्यासाठी व अधिकाधिक प्रवासी मिळवण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. यावर काय करायचे? आणखी एक बस दिवस साजरा करायचा किंवा तो प्रत्येक आठवड्याला साजरा करायचा व अशा कारणासाठी आपल्याला सकाळची काय गरज आहे? दुसरी कोणतीही सार्वजनिक संस्था किंवा या शहराच्या नागरिकांना चांगल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये काही स्वारस्य नाही का?
काही तरी विशेष साजरं करण्याचा जर विचार झाला तर या शहराला आणखी असे कितीतरी दिवस साजरे करायला हवेत उदाहरणार्थ शून्य कचरा दिवस, पाणी बचत दिवस, वीज बचत दिवस, झाडे वाचवा दिवस, पक्षी वाचवा दिवस अशी यादी वाढतच जाईल. सुरुवात करायची झाली तर शहरातील अनेक रस्त्यावर व कोप-यांवर ओसंडणा-या कचाराकुंड्या आहेत, यासाठी आपणच जबाबदार आहोत. हा कचरा कुठे जातो याचा आपण कधी विचार केला आहे का? उरळीचे गावकरी वारंवार तिथल्या कचरा डेपोविरुद्ध आंदोलन करतात व संपूर्ण कचरा संकलन व्यवस्था कोलमडते. वृत्तपत्रांमध्ये मोठमोठे मथळे येतात व संपूर्ण शहरभर कचरापेट्या ओसंडू लागतात व अचानक आपल्याला वाढत्या कच-याचा धोका लक्षात येतो. तो कमी करण्याविषयी व कच-याचा निचरा करण्यासाठी नवीन जागेची तसेच त्याचे विघटन करण्यासाठी नव्या यंत्रणेची तरतूद करण्याविषयी बोलले जाते. आदरणीय महापौर किंवा आयुक्त उरळीच्या गावक-यांना काहीतरी आश्वासन देतात व आंदोलन मागे घेतले जाते व आपण पुन्हा आनंदाने आणखी कचरा तयार करण्याच्या कामाला लागतो! त्यामुळे कचरा कमी करण्याच्या कामी आपण आपले काय योगदान देऊ शकतो हे विचार करायची व शून्य कचरा दिवस साजरा करायची वेळ आता आली आहे!
त्यानंतर येते पाणी, पुणेकर पूर्वी अभिमानाने म्हणायचे आम्हाला पाणी साठवून ठेवावं लागत नाही, ते दिवस आता गेले. दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या व पाण्याचे मर्यादित स्रोत यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत जाणार आहे. एक व्यक्ती म्हणून आपण यासाठी काय करत आहोत?काही दिवसांपूर्वी पाऊस कमी पडल्याने मनपाने पाणी पुरवठ्यात कपात करण्याची घोषणा केली व ती आजही सुरुच आहे. मनपा व जलसिंचन विभागामध्ये पाण्याच्या हिश्श्याविषयी वाद सुरुच राहील, मात्र मला त्याचे काय?” असा अनेक पुणेकरांचा दृष्टीकोन असतो! आपल्यापैकी प्रत्येकाने आपण किती पाणी वापरतो याचे विश्लेषण करायला हवे व जास्तीत जास्त पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळेच पाणी वाचवा दिवस साजरा करायची गरज निर्माण होते!
विजेच्या बाबतीत म्हणाल तर मुंबईनंतर वीजकपात नसलेल्या शहरांमध्ये पुण्याचा दुसरा क्रमांक लागतो व अखंड वीजपुरवठा म्हणजे आपल्याला आपला जन्मसिद्ध हक्क वाटतो! एअर कंडिशनरच्या विक्रिचा आकडा पाहा म्हणजे तुम्हाला हे समजेल. आपण पाणी तापवण्यासाठी गिझर वापरतो, बिल्डरने दिले नसल्यास इमारतीमध्ये सौर उर्जेवर चालणारे वॉटर हिटर्स बसवण्याचा विचार करत नाही. आपल्याला अधिकाधिक लाईट पॉईंट्स हवे असतात व वीज बिलातल्या युनिट्सचा आपण फारसा विचार करत नाही कारण आपल्या इतर खर्चांच्या तुलनेत हा खर्च अगदी किरकोळ असतो. आपण वाचवलेल्या एक-एक युनिट वीज शेजारच्या गावातल्या
गावक-याला मिळू शकते किंवा ही वीज तयार करण्यासाठी जाळल्या जाणा-या कोळशात बचत होऊ शकते, असा विचार आपण क्वचितच करतो. शॉपिंग मॉलमध्ये दिव्यांचा झगमगाट असतो, आयपीएलसारखे लोकप्रिय क्रिकेट सामनेही लाखो वॅट दिव्यांच्या प्रकाशझोतात खेळले जातात! मी काही परोपकारी मनुष्य नाही मात्र आपण वीज वाचवण्याचा विचार केला नाही तर कोण करेल? कोणतीही सरकारी संस्था या पातळीवर गांभीर्याने प्रयत्न करताना दिसत नाही व अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर अधिक वाढावा यासाठी कोणतेही धोरण नाही. मराविमचा एका अधिकारी मला  अनेक दिवसांपूर्वी म्हणाला होता, महानगरांमधील लोकांनी वीजेचा वापर कमी करावा असे आम्हाला अजिबात वाटत नाही, त्यांच्याकडून चांगले पैसे मिळतात? या ग्राहकांकडून वाचवलेली वीज कुणाला दिली जाणार आहे तर शेतक-यांना, जे या वीजेसाठी एक पैसाही देत नाहीत!” मराविम म्हणजेच आताच्या एमएसईडीसीएलसाठी हे योग्य धोरण असले तरी आपण त्यासाठी कोणती किंमत मोजत आहोत? वीजेच्या बाबतीत आपल्याला मागणी व पुरवठा यांचं संतुलन साधायचं आहे, हाव आणि पुरवठा यांचं नाही! त्यासाठीच आता वीज बचत दिवस साजरी करायची वेळ आली आहे!
वृक्षतोड मोठ्या झपाट्यानं होतेय, मी एखाद्या स्वयंसेवी संस्थेसारखं बोलत नाही, मात्र इमारती, रस्ते, सांडपाणी/पाणी प्रक्रिया प्रकल्प, क्रीडांगणे बांधण्यासाठी वृक्षतोड करावीच लागते. मात्र नवीन झाडे लावण्याचे किंवा ती जगवण्याचे काय? वृक्ष मोजणीमुळे सध्या किती झाडे आहेत हे समजेल मात्र गेल्या दहा वर्षात किती झाडे कापली गेली, किती नवीन लावली गेली, त्यातली किती जगली व जोमाने वाढत आहेत याची मोडणी आपण का करत नाही? शहरातल्या १५ दशलक्ष वाहनांमुळे होणा-या प्रदूषणावर जास्तीत जास्त झाडे लावणे हेच उत्तर आहे व आपण त्यासाठी काय करत आहोत? ही झाडेच अनेक पक्षांचे घर आहे जे देखील या शहराचे नागरिक आहेत. ते बेघर होत आहेत व वृक्षतोड अशीच सुरु राहीली तर अनेक प्रजाती नष्ट होतील हे कटू सत्य आहे! आपण वृत्तपत्रांमध्ये रोज वृक्षारोपणाच्या बातम्या बघतो मात्र त्या झाडांचे पुढच्या वर्षीपर्यंत काय होते हे सर्वांना माहिती आहे! अनेक स्वयंसेवी संस्था वृक्षारोपण व जैव-विविधतेचे संरक्षण करण्यासाठी अतिशय चांगले काम करत आहेत मात्र आपल्यापैकी किती जणांनी त्याविषयी किमान जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे व मदतीचा हात पुढे केला आहे, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा! अशा स्वयंसेवी संस्थांना निधीची नेहमीच कमतरता असते आपल्याकडे घोड्यांची शर्यत किंवा एखाद्या कलाकाराचा कार्यक्रम अशांवर लाखो रुपये खर्च करणारे नागरिक आहेत मात्र जेव्हा निसर्गासाठी खर्च करायची वेळ येते तेव्हा आपला खिसा रिकामा असतो; निसर्ग संरक्षणाच्या क्षेत्रात काम करणा-या अनेक लोकांना येणारा हा अनुभव आहे. प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा मी किमान एक तरी झाड लावले आहे का व मोठे केले आहे का? त्यासाठीच वृक्षारोपण व शहरातील पक्षी वाचवा दिवस साजरा करण्याची गरज आहे!
आपण कोणकोणते दिवस साजरे करायची गरज आहे याची ही केवळ काही उदाहरणे आहेत, मात्र प्रत्येक वेळी असे काही उपक्रम हाती घेण्यासाठी आपल्याला सकाळ किंवा कोणत्याही माध्यमाची गरज आहे का? याचे उत्तर होय असल्यास प्रत्येक व्यक्ती, संस्था, विविध व्यावसायिक संघटनांसाठी ही लाजीरवाणी बाब आहे. कारण याच शहराने त्यांची भरभराट केली आहे त्यामुळे जीवनाच्या या विविध पैलूंची नागरिकांना जाणीव करुन देण्यात त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. बरेच जण असा प्रश्न विचारतील की रिअल इस्टेट क्षेत्राची यात काय भूमिका आहे? घरे बांधतांना आपण वृक्षारोपणही करत आहोत का याचा विचार केला पाहिजे. आपण जेव्हा स्वतःला विकासक म्हणवतो तेव्हा आपण विचार केला पाहिजे की आपण नेमका कशाचा विकास करत आहोत? सोसायटी बांधणे म्हणजे चार भिंती बांधणे नव्हे तर एक पर्यावरण तयार करणे, ज्याच्या त्या चार भिंती एक भाग आहेत! त्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा व स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. स्वतःच असा एखादा दिवस साजरा करायची सुरुवात केली पाहिजे, हा प्रवास लांबचा आहे ज्याची सुरुवात आधीच करायला हवी होती! मात्र चांगल्या कारणासाठी उशीरा का होईना सुरुवात करणे महत्वाचे व वरील अवतरणात म्हटल्याप्रमाणे आपण जो हेतू (दिवस) साजरा करत आहोत त्याचा आनंद उपभोगता आला पाहिजे. असे झाले तरच आपल्याला आपण सकाळने आयोजित केलेल्या बस दिवस कार्यक्रमात सहभागी झालो असे म्हणता येईल!
नेतृत्व करणारे असले तरीही त्या मार्गावरुन जे वाटचाल करतात त्यामुळेच तो हेतू ख-या अर्थाने यशस्वी होतो. एक नागरिक म्हणून या शहराप्रती आपले किमान एवढे तरी कर्तव्य आहे!
संजय देशपांडे
 संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!
 

संजीवनीची सामाजिक बाजू    http://www.flickr.com/photos/65629150@N06/sets/72157628805700569/

शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा

http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx





https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif





No comments:

Post a Comment