Saturday, 5 January 2013

नवीन वर्षं आणि सामान्य माणसाच्या घराचा अजेंडा


 
 
 
 
 
 

जग जिंकून आत्मा हरवू नका व सोन्या-चांदीपेक्षा शहाणपण अधिक चांगलं बॉब मार्ली.
मित्रांनो नवीन वर्षं आलं आहे, नवीन वर्षाच्या संकल्पाविषयी विचार करताना वर्तमानपत्रातल्या वरील अवतरणानं माझं लक्षं वेधून घेतलं! ते विधान किती कळकळीनं करण्यात आलं आहे याविषयी अधिक विचार करत असताना मला जाणवलं की तोच नवीन वर्षाचा संकल्प करता येईल. आपल्याला नवीन वर्षात कोणत्या बातम्या ऐकायला मिळाल्या तर, महिलांसंदर्भात गैरवर्तनाचे गुन्हे, रस्त्यावरील अपघात, भ्रष्टाचार, खून, एखादा प्राणी किंवा पक्षी नामशेष होत असल्याची घोषणा, पेट्रोल किंवा डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ, जीवनावश्यक वस्तूंचे सातत्याने वाढते दर, सगळीकडे होणारी वृक्षतोड, अवैध बांधकामे! हुश्श्.... नकारात्मक गोष्टींची यादी रामायणातल्या हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच आहे! अशा वेळी मला प्रश्न पडला की माझा संकल्प काय असावा व परिस्थिती इतकी निराशाजनक असताना केवळ एका व्यक्तीमुळे कितीसा फरक पडेल? त्याशिवाय अशा गोष्टींशी संबंधित व्यक्तिंचा संकल्प काय असावा यासाठी मी एकट्यानं का विचार करावा? जेव्हा थोडा कल्पना विलास करायचा असतो, तेव्हा मानवी मन खरोखर पेचात टाकतं! तर रिअल इस्टेट व शहरासंबंधी आपल्या आसपास काम करणारी विविध माणसं व संस्था यासंदर्भात माझा कल्पना विकास मी सांगणार आहे
 सर्वप्रथम आपले राजकारणी किंवा या शहराचे शासनकर्ते, त्यांनी असं ठरवलं की या वर्षी ते शहराला प्राधान्य देतील व स्वतःच्या संपत्तीला नाही. शहराच्या विकासासंबधी कोणताही निर्णय घेताना शहराच्या भविष्याचा विचार करुन घेतला जाईल व प्रत्येक पक्ष मतभेद बाजूला ठेवून हा निर्णय, सामायिक कार्यक्रम म्हणून स्वीकारतील. कचरा, वाहतूक, पाणी पुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन यासारख्या विषयांवर सर्व पक्ष एकत्र येतील व कोणताही कायदा किंवा धोरण एकत्रितपणे बनवले जाईल, कारण शहर टिकले तरच पक्ष टिकेल. सर्व पक्ष, घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरी प्रशासनावर व्यवस्थित लक्ष ठेवतील व संघटितपणे काम करतील. ते निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने लक्षात ठेवतील व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील व ते करत असलेले प्रयत्न जनतेपुढे ठेवतील, ज्यांचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल. ते अवैध बांधकामांना, रस्ते, पदपथ किंवा सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणांना पाठिंबा देणार नाहीत व ती हटवण्यासाठी प्रशासनास मदत करतील. मला असं वाटतं आपल्या राजकीय नेत्यांनी एवढं जरी ठरवलं व त्याचं पालन केलं तर हे शहर राहण्यासाठी अधिक चांगलं ठिकाण होईल. अनेक राजकारण्यांना हे आवडणार नाही मात्र त्यांनी स्वतःच्या भूतकाळाचं अवलोकन केलं तर जनतेच्या नजरेत आपली काय प्रतिमा आहे हे जाणवेल.
त्यानंतर येतात नागरी संस्था व विविध सरकारी संस्थांचे प्रशासन. यामध्ये महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर सर्वेक्षण कार्यालय, नगर रचना, एमएसईडीसीएल म्हणजे एमएसईबी, शहर विकास मंत्रालय व अगदी आपली न्यायव्यवस्था म्हणजे न्यायालये. या सर्व संस्था नवीन वर्षात लोकांच्या सेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतील व केवळ कायद्याचे पालन करुन, टोलवा टोलवी करणार नाहीत. या संस्था विकास योजनांची अंमलबजावणी करताना राजकीय दबावापुढे गुडघे टेकणार नाहीत असा निर्णय घेतील व त्यांच्या टेबलावर येणारे काम रोजच्या रोज संपवतील. त्या खुल्या मनाने व सामान्य माणसाच्या हितासाठी धोरणे बनवतील, केवळ वैयक्तिक फायद्याचा विचार करणा-या मूठभर व्यावसायिक व शासनकर्त्यांसाठी नाही. सद्यस्थितीत अनावश्यक असलेले, अतिशय जुने कायदे बदलण्यात त्या लवचिकता दाखवतील उदाहरणार्थ निवासी विभागातील जमीनींसाठीही बिगर-कृषी जमीनीचा दाखला मागणे. त्या त्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करतील लोकांनी त्यांच्याकडे जाण्याऐवजी त्या लोकांपर्यंत पोहोचतील. त्या केवळ प्रतिक्रियात्मक होण्याऐवजी पूर्वसक्रिय होतील व त्यांच्या धोरणांविषयी व्यावसायिक व स्वयंसेवी संघटनांना काय म्हणायचं आहे हे ऐकून घेतील व त्यांनी सुचवलेले बदल खुल्या मनाने स्वीकारतील. त्या शहरातील विविध विकास योजनांसंबंधी त्यांची आश्वासने पूर्ण करतील. केवळ आयटी पार्क किंवा विशेष आर्थिक क्षेत्र किंवा वसाहतींसारख्या प्रकल्पांना मंजुरी देण्याऐवजी, सार्वजनिक वाहतूक, परवडण्यासारखी घरे अशा पायाभूत सुविधा मजबूत करतील. त्या प्रत्येक फाइल व प्रस्तावाविषयी पारदर्शकता राखतील व त्या कुणालाही पाहता याव्यात यासाठी ऑन लाईन उपलब्ध करुन देतील. त्या सामान्य जनतेसाठी एक वेळ राखून ठेवतील व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या वेळात अधिकारी उपलब्ध राहतील. हे सगळं एखाद्या दिवास्वप्नासारखं वाटतंय? पण असं स्वप्न पाहण्यात काहीच अडचण नाही. न्यायालयांनी दिवाणी खटले युद्ध पातळीवर निकाली काढायचं ठरवलं व अनेक दिवस पडून असलेल्या खटल्यांमध्ये योग्य व्यक्तिंना योग्य वेळी न्याय दिला तर त्यांना न्यायव्यवस्थेविषयी विश्वास वाटेल. लोक कायद्याचा धाक व आदर वाटून त्याचे पालन करतील.
त्यानंतर रांगेत आहेत या शहरातील विकासक/बांधकाम व्यवसायिक. हा समुदाय केवळ श्रीमंतांसाठी घरे बनवण्याऐवजी, समाजाच्या प्रत्येक घटकाला परवडतील अशी घरे देण्याची जबाबदारी स्वीकारेल. ते केवळ सर्व सुविधांनी युक्त मोठी घरेच नाही तर लहान घरेही बनवतील, घरांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवण्याऐवजी ते योग्य नफा मिळेल असे माफक दर ठेवतील. ते बांधकामाच्या सर्व कायद्यांचे पालन करतील व शहराच्या पर्यावरणाचे जतन करण्यासाठी पूर्वसक्रिय होऊन प्रयत्न करतील. ते सामाजिक तसंच पर्यावरणविषयक जागरुकता निर्माण करण्याच्या उपक्रमांमध्ये योगदान देतील व ग्राहकांना त्याची जाणीव करुन देतील. सर्वात महत्वाचे म्हणजे विकासक ग्राहकांशी पारदर्शकपणे व्यवहार करतील व घराची विक्री करताना दिलेल्या आश्वासनांचे पालन करतील. ते राजकारणी व प्रशासकीय अधिका-यांशी चुकीच्या गोष्टींसाठी हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतील व त्याऐवजी आपल्या आर्थिक तसंच जनसंपर्काच्या ताकदीद्वारे दबावगट तयार करुन तो समाजोपयोगी धोरणे तयार करण्यासाठी वापरतील. नवीन वर्षात बांधकाम व्यावसायिक त्यांनी समाजासाठी केलेल्या चांगल्या कामांसाठी नाव व प्रसिद्धी मिळवण्याचा निर्णय घेतील व त्याचे पालन करतील. आता इथेही बरेच जण म्हणतील की आम्ही आधीपासूनच त्याचे पालन करत आहोत, मात्र सुधारणा करायला नेहमीच वाव असतो! प्रत्येत सामान्य माणसाला घर मिळावे यासाठी या क्षेत्राकडून शहराच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या शहराने विकासकांना भरपूर उत्पन्न दिले आहे व नवीन वर्षात ते आपल्या कामाद्वारे हे शहर अधिक चांगलं बनवण्याचा निर्णय घेऊन, त्याची किमान काही अंशी परतफेड करायचा निर्णय घेतील.
त्यानंतर येतात विविध नागरी समस्यांसंदर्भात काम करणा-या स्वयंसेवी संस्था उदाहरणार्थ, वाहतूक, वृक्षसंवर्धन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, माहितीचा अधिकार इत्यादी. स्वयंसेवी संस्था योग्य हेतूसाठी लढण्याचा निर्णय घेतील व केवळ सरकारच्या प्रत्येक धोरणाला विनाकारण विरोध करणार नाहीत. त्या व्यावसायिकांकडून तसंच विविध व्यावसायिक संघटनांकडून सूचना स्वीकारतील, ते केवळ पैसे कमावत असल्याचा आरोप करणार नाहीत. स्वयंसेवी संस्था नेमक्या समस्यांवर बोट ठेवून, त्यावर व्यवहार्य तोडगा सुचवतील.
अगदी माध्यमंही नवीन वर्षाच्या या संकल्पामध्ये सहभागी झाली, एखादी व्यक्ती कोणत्या पक्षाशी किंवा व्यावसायिक संस्थेशी संबंधित आहे याचा विचार न करता तटस्थपणे योग्य गोष्टींचे समर्थन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला! त्यांनी केवळ तथ्य छापण्याचा निर्णय घेतला, ते देखील विषयाच्या मूळाशी जाऊन, केवळ टेलिफोनवरील मुलाखती व गुगलवर शोध घेऊन नाही! आपलं उत्पादन अधिकाधिक वाचनीय कसं होईल याचाच विचार न करता, सामान्य माणसाला परिस्थितीची जाणीव करुन देण्याचा व व्यावसायिकांच्या मदतीने योग्य मार्ग दाखवण्याचा निर्णय घेतला.
सर्वात शेवटी सामान्य माणूस जो स्वतःसाठी घर शोधत होता, त्याला जाणीव झाली की वरील सर्व संस्थांनी त्याच्यासाठी एवढ्या चांगल्या गोष्टी करायचं ठरवल्यानंतर त्याला दैनंदिन गरजांसाठी काहीही ठरवायची गरज नाही! आतापर्यंत अशी परिस्थिती कधीच आली नव्हती कारण गेली अनेक वर्षं गरीब सामान्य माणसाला त्याचा नवीन वर्षाचा संकल्प स्वतःच ठरवावा लागायचा, कारण वरील कोणतेही घटक त्याच्या गरजांचा विचार करत नव्हते. त्यामुळे आता तो समाजासाठी काही तरी रचनात्मक करु शकतो व आपल्या कामाद्वारे परिसर चांगला बनवू शकतो. शेवटी एक चांगला समाज म्हणजे काय? चांगला समाज म्हणजे जिथे लोक आधी इतरांचा व नंतर स्वतःचा विचार करतात! मात्र त्यासाठी आपल्याला असं वातावरण निर्माण करायची गरज आहे ज्यात सामान्य माणूस इतरांविषयी विचार करेल.
आपण नवीन वर्षात अधिक चांगला समाज घडण्याशिवाय इतर कोणत्या संकल्पाचा विचार करु शकतो? त्यामुळेच नवीन वर्षाच्या संकल्पाविषयी थोडा कल्पना विलास करताना मी देखील हेच केलं!
-









https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif

No comments:

Post a Comment