Friday, 23 August 2013

काहीतरी वेगळेपण असलेले घर



















नद्या, डबकी, तळी व ओढे त्यांची नावे वेगवेगळी आहेत, मात्र त्या सगळ्यांमध्ये पाणीच असते. धर्मांचेही तसेच आहे त्या सर्वांमध्ये सत्य आहे... मुहम्मद अली.
मुहम्मद अली या मुष्ठीयोद्ध्याने जो पुढे तत्ववेत्ताही झाला, त्याने विविध धर्मांची तुलना करण्यासाठी वरील विधान केले आहे, मात्र ते रिअल इस्टेटसाठीही तेवढेच लागू होते! आपण दररोज आजूबाजूला नवनवीन प्रकल्पांची सुरुवात झाल्याचे व त्याच्या विपणनासाठी लढविल्या जाणा-या विविध क्लुप्त्या पाहतो. त्यात काही चुकीचे नाही कारण आपण आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग केले नाही तर आपल्याला ते विकता कसे येईल; मात्र ही उत्पादने ज्या पद्धतीने प्रदर्शित केली जातात त्यातच खरी गंमत आहे! जसे दर आठवड्याला नवीन चित्रपट प्रदर्शित होतो व निर्माता त्याचे उत्पादन कसे वेगळे आहे हे समजावून देण्याचा प्रयत्न करत असतो! प्रत्येक चित्रपट निर्माता/दिग्दर्शक विविध व्यासपीठांवर त्यांचा चित्रपट नेहमीपेक्षा कसा हटके आहे व प्रेक्षकांनी तो का पाहावा हे सांगत असतो!

सध्या रिअल इस्टेटमध्येही कोणताही नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी अशाच प्रकारे प्रचार करण्याचा कल आहे! आता आपल्याकडे विविध क्षेत्रातल्या प्रसिद्ध व्यक्ती प्रकल्पाच्या ब्रँड A^ म्बेसिडर  असतात. त्या एखाद्या विशिष्ट प्रकल्पाशी का संलग्न झाल्या व तो प्रकल्प ग्राहकांच्या दृष्टीकोनातून कसा वेगळा आहे व अशा गोष्टींविषयी त्यांची मते सांगतात. विकासक अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात ज्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर प्रकल्पांमध्ये नसल्याचा व त्यांचा प्रकल्प इतरांपेक्षा अनोखा व वेगळा असल्याचा त्यांचा दावा असतो.
रिअल इस्टेटमध्ये काही वर्षांपूर्वी ८०-९०च्या दशकात काय परिस्थिती होती हे पाहू, या काळामध्ये गृहबांधणीत अनेक बदल होत होते, कारण ८०च्या दशकाच्या शेवटपर्यंत लहान आकाराचे प्रकल्प असायचे व त्यांच्या आकारात व शहराची वाढ फारशी झालेली नव्हती. त्याचवेळी ग्राहकांसाठी मर्यादित पर्याय होते व वेगळेपणाची गरज नव्हती. ९०च्या दशकापासून ग्राहक अधिक जागरुक झाले व त्यांची जीवनशैली बदलू लागली. समाजामध्ये आता समृद्धी आहे, लोकांच्या हाती अधिक पैसा आहे, यामुळे त्यांची जीवनशैली बदलली आहे, तसेच जीवनातील गरजाही बदलल्या आहेत. आता काळ बदललाय, आपल्याला सगळ्या सुविधा हाताच्या अंतरावर हव्या आहेत! आपल्याला सकाळचा फेरफटका मारण्यासाठी रस्त्यावर जायचे नाही, कारण तिथे वाहने व प्रदूषणामुळे चालण्यासाठी आरोग्यदायी परिस्थिती नाही, ब-याच ठिकाणी पादपथांवर अतिक्रमणे झाल्याचे दिसते व आपल्याकडे वेळही कमी असतो. त्यामुळेच गृहसंकुलातच जिम व जॉगिंग ट्रॅकसारख्या सुविधा दिल्या जाऊ लागल्या. पूर्वी पोहणे केवळ उच्चवर्गीयांसाठी असलेली चैन मानली जायची, जी त्यांना स्वतःच्या स्विमिंग पुलमध्ये किंवा पंचतारांकित हॉटेलांमध्ये पूर्ण करता यायची. सर्वसाधारण जनतेसाठी सार्वजनिक स्विमिंग पुल हा एकमेव पर्याय होता, जो सभ्य मध्यमवर्गीय कुटुंबांना वापरता येत नाही व म्हणूनच स्विमिंग पुल असलेल्या वसाहती किंवा प्रकल्प उभारले जाऊ लागले. त्याप्रमाणे क्लब हाउस व जिमच्या सुविधा दिल्या जाऊ लागल्या. हळूहळू यात काहीच नाविन्य राहिले नाही, त्यामुळे विकासकांना त्यांच्या घरांसाठी काहीतरी अधिक वेगळे शोधण्याची गरज वाटू लागली. वाचनालय किंवा ध्यानधारणेसाठी खोली किंवा योगासनांसाठी खोली अशा विविध सुविधा स्विमिंग पुल व जिमसोबत द्यायला सुरुवात झाली. ग्राहक आता जगभरात फिरत असल्याने ते विकसित देश पाहून आलेले असतात, त्यामुळेच इथल्या बांधकामांमध्ये विदेशी वास्तुविशारदांची मदत घ्यायला सुरुवात झाली. आता आपण आपल्याकडे सिंगापूर किंवा दुबईत स्थित वास्तुविशारद कंपन्यांनी तयार केलेले प्रकल्प पाहू शकतो. या कंपन्यांच्या गाठीशी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करायचा अनुभव असल्याने विकासकाला त्यांच्या मदतीने काही नवीन संकल्पना सादर करता येते.

सध्या डिझायनर घरे व डिझायनर प्रकल्पांचा जमाना आहे, ज्यामध्ये ग्राहक त्यांच्या घराची अंतर्गत सजावट, नमुन्यादाखल तयार करण्यात आलेल्या सदनिकेच्या अद्ययावत सजावटीप्रमाणे असावी अशी मागणी करु शकतात. आता काही प्रकल्पांमध्ये त्यांचा स्वतःचा, घराला जोडून असलेल्या गच्चीवर स्विमिंग पुल असतो व काही ठिकाणी तर सदनिकेलगत कारलिफ्टसह पार्किंगचेही दावे केले जातात. सर्वात वरच्या मजल्यावर आकाशातील बाग (स्काय गार्डन) व जिम ही देखील नवीन संकल्पना राहिलेली नाही, जिथे व्यायाम करताना तुम्हाला आजुबाजूचा नजारा पाहता येतो! केवळ काही श्रीमंत ग्राहकांसाठीच या सुविधा मर्यादित राहिलेल्या नाहीत तर कमी दरातील गृहयोजनांमध्येही डिझायनर बागा व मनोरंजनासाठी छोटे नाट्यगृह अशा सुविधा असतात. आजकाल प्रकल्पांमध्ये  ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी वेगळ्या जागेचा विचार करुन इतर सुविधांसोबत ती दिली जाते. त्यामुळेच प्रत्येक नव्या प्रकल्पासोबतकाहीतरी वेगळे देण्याचा प्रघात सुरुच आहे व ते नक्कीच ग्राहकाच्या फायद्याचे आहे, मात्र ग्राहकाने त्याला जे काहीतरी वेगळे दिले जाते त्यातून नेमक्या कशाची निवड करावी.

काहीतरी वेगळे देण्याच्या चढाओढीत आपले घर या मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष होते आहे का असा प्रश्न मला विचारायचा आहे. घर घेणा-या ग्राहकाला खरोखरच या काहीतरी वेगळ्या गोष्टींची गरज असते का? अगदी साध्या, सोप्या, खिशाला परवडणा-या घराचा विचार करायला काय हरकत आहे? आरामदायी सुविधा नसल्या तरी चालतील मात्र गृहसंकुलाबाहेर मूलभूत सुविधा असणे आवश्यक आहे, म्हणजे व्यवस्थित पाणी पुरवठा, सार्वजनिक वाहतूक व जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाशयोजना व खेळती हवा असलेले घर, ज्याच्या आजूबाजूला पुरेशी मोकळी जागा असेल. जवळपासच्या परिसरातल्या बांधकाम व्यवसायिकांनी एकत्र येऊन, सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु करण्याचा विचार करायला काय हरकत आहे, ज्याचा भविष्यकाळात अतिशय उपयोग होईल? त्याचप्रमाणे आपला दृष्टीकोन केवळ आपल्या प्रकल्पापुरता मर्यादित ठेवण्याऐवजी, प्रशासकीय संस्थेकडून स्थानिक बाग किंवा आरक्षित जागा घेऊन संपूर्ण परिसरासाठी ती विकसित का करु नये? त्याचप्रमाणे गृहसंकुलापर्यंत जाण्यासाठी चांगले पक्के रस्ते बांधण्याचाही विचार करावा, ज्यामुळे लोकांना त्यांच्या वाहनांच्या दुरुस्तीसाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत? हे सर्व करण्यासाठी आपल्याला सरकारवर अवलंबून का राहावे लागते आपली काहीतरी वेगळेची संकल्पना इथे का वापरु शकत नाही? आपला प्रकल्प त्याच्या वैशिष्ट्यांवरुन निसर्गास पूरक आहे किंवा नाही हे ठरविणारे गुणांकन अस्तित्वात आहे, मात्र गेल्या ३ वर्षात संपूर्ण पुणे क्षेत्रातून केवळ ६० प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली आहे व त्यापैकी केवळ काही प्रकल्पच गुणांकनाच्या या यंत्रणे अंतर्गत प्रमाणित आहेत. पीएमसीने सुरु केलेल्या तारांकन यंत्रणेचीही अशीच परिस्थिती आहे. असे असताना जे हजारो विकासक दररोज नवीन प्रकल्प सुरु करतात त्यांच्या प्रकल्पात हरित किंवा निसर्गास पूरक इमारती का उभारत नाहीत व त्यांना काहीतरी वेगळे नाव का देत नाहीत, कारण हे केवळ अशा प्रकल्पामध्ये राहणा-या काही रहिवशांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी असेल? आपण आरामदायी सुविधांची यादी देऊन उत्पादन महाग करण्याऐवजी उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न का करत नाही? आपण जर चांगल्या दर्जाच्या बांधकामासाठी सर्वात कमी प्रति चौरस फूट दर आकारत असू तर ते काहीतरी वेगळे होणार नाही का? खरोखर गरजू ग्राहकासाठी त्याला सरतेशेवटी किती पैसे द्यावे लागतात हेच सर्वात महत्वाचे असते! रिअल इस्टेटमध्ये अतिशय श्रीमंत किंवा अतिशय गरीबांसाठी फारशी अडचण कधीच नसते. कारण श्रीमंत व्यक्ती त्याला हव्या त्या दराने हवे तसे घर खरेदी करु शकते व गरीब लोक त्यांच्या खिशाला परवडते आहे म्हटल्यावर त्यांना काय मिळते आहे याची काळजी करत नाहीत! त्यामुळे मध्यमवर्ग व उच्च मध्यम वर्ग या काहीतरी वेगळेच्या कचाट्यात सापडतो!

ग्राहकानेही काहीतरी वेगळेच्या नावाखाली केल्या जाणा-या मार्केटिंगच्या क्लुप्त्यांकडे उघड्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे, घर घेताना एखाद्या विशिष्ट सुविधेची त्याला खरोखर गरज आहे का याचा विचार केला पाहिजे. काहीहीमोफत मिळत नसते त्यामुळेकाहीतरी वेगळेसाठी तुम्हाला काय किंमत मोजावी लागतेय याचा व्यवस्थित विचार करा! आधी आपले प्राधान्य ठरवा व त्यानंतर व्यवहार करा, चांगले घर मिळण्याचा मार्ग नक्कीच आहे असे मला वाटते.  महान मुष्ठीयोद्ध्याने म्हटल्याप्रमाणे शेवटी घराच्या चार भिंती व त्याचा परिसर हेच सर्वात महत्वाचे आहेत व त्यासाठी काही वेगळे करण्याची नाही तर ते साधे व सोपे असण्याची गरज आहे व तेच दीर्घकाळ टिकणार आहे! खरोखर वेगळे व त्यांच्या घरासाठी नेमके काय आवश्यक आहे हे ठरविण्याची क्षमता केवळ ग्राहकांमध्येच आहे!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com



No comments:

Post a Comment