घर झालं, भावना हरवल्या !
घर खरेदी करणे हे एक शाश्वत व
अतिशय मोठे काम आहे …केनी
ग्विन
केनिथ कॅरोल “केनी” ग्विन हा एक अमेरिकन व्यावसायिक, शिक्षणतज्ञ व
राजकीय नेता होता. घर
खरेदी करण्याविषयीचे त्याचे विधान, तो केवळ एक व्यावसायिक किंवा राजकीय नेता
म्हणूनच नाही तर एक शिक्षणतज्ञ म्हणून किती विशेष होता हे दाखविते! खरच
कुणाही व्यक्तिसाठी घर खरेदी करणे ही अभिमानाची गोष्ट आहे व तुम्ही जेव्हा
त्याच्या मालकाला घराचा ताबा देता तेव्हा त्याला होणारा आनंद अनुभवण्यासारखा असतो!
बोलता बोलता , खरं तर
लिहिता लिहिता असं म्हणायला पाहिजे , सकाळ
वास्तूच्या टीम सोबत एक वर्ष झालपण , म्हणजे
अजून एक वर्ष अस मला म्हणायचंय , या
वर्षाचा आढावा घेताना जे जाणवेल तेच आज तुमच्याशी शेअर करतोय
अभियंता म्हणून मी अनेक घरे बांधली आहेत व
त्यांच्या मालकांना दिली आहेत, मात्र प्रत्येक वेळी एक नवीन घर असते, त्यामागची
गोष्ट नवीन असते व चेहरेही नवीन असतात! मात्र
प्रत्येक वेळी एक गोष्ट सारखी असते म्हणजे त्यामधील भावना. खरेतर
जेव्हा लोक त्यांच्या घरांचा ताबा घ्यायला येतात तेव्हा मी त्यांना फक्त घर
नावाच्या चार भिंती देतोय असे मला वाटत नाही तर सदनिका धारकांना या भावना सुपूर्त
करतोय असे वाटते. घराचा
ताबा देण्याच्या कार्यक्रमाला लोक एखाद्या लग्न किंवा कौटुंबिक सोहळ्याप्रमाणे
नवीन कपडे व दाग-दागिने घालून येतात, सोबत मित्रांचा लवाजमा असतो, मग घराची किल्ली
घेताना छायाचित्रे घेतली जातात! त्यावेळी
तुम्हाला जाणीव होते की तुम्ही घर नाही तर भावना देत आहात! या
देशातील बहुतेक लोक आयुष्यात एकदाच घर खरेदी करतात, त्यामुळे त्याचे भावनिक मूल्य
प्रचंड मोठे असते. एक
विकासक/बांधकाम व्यावसायिक म्हणून
ग्राहक जे घर खरेदी करणार आहेत त्यामागच्या त्यांच्या भावना समजावून घेणे अतिशय महत्वाचे
आहे.
दुर्दैवाने रिअल इस्टेटमध्ये ही भावना नाहीशी
होत चालली आहे, त्यामुळे प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, विश्वास, नैतिक मूल्ये,
नातेसंबंध व अशा आशयाचा कुठलाही शब्द आल्यास या उद्योगाकडे अविश्वासाच्या नजरेने
पाहिले जाते. कारण
सरते शेवटी जिथे या भावना अस्तित्वात असतात तिथेच हे शब्द वापरले जातात व माणसाचे
या शब्दांशिवाय अस्तित्व ते काय? मात्र
आजचे रिअल इस्टेट हे ऐषाराम,
शेजारी नसलेले घर, प्रायवसी , भविष्यातील घर यासारख्या शब्दांवर आधारित आहे, त्यामध्ये
भावनांचा लवलेशही नाही. किंबहुना बरेच
विकासक व एजंट्स घरांचा उल्लेख “माल” असा करतात. काहीजण
म्हणतील की त्यात काही चूक नाही कारण ती देखील एक ग्राहकोपयोगी वस्तूच आहे, त्याला
वेगळे स्थान देण्याची काय गरज आहे!
इथे मला मुन्नाभाई एमबीबीएस नावाच्या
सिनेमातील एक संवाद आठवतो की वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आपल्या
विद्यार्थ्यांना सांगत असतो की, “त्यांनी
आपल्या रुग्णांवर कधीही प्रेम करु नये”!
त्यामागचा तर्क असा की रुग्णामध्ये भावनिकदृष्ट्या गुंतल्यास तुम्ही त्याला
देत असलेल्या उपचारावर परिणाम होऊ शकतो. वैद्यकीय
व्यवसायाबद्दल तर मला माहिती नाही
मात्र हा विचार रिअल इस्टेटमध्ये मात्र नक्कीच स्वीकारण्यात आलाय, परिणामी या
व्यवसायात आपल्या उत्पादनावर व आपल्या ग्राहकांवर प्रेम करणा-या लोकांची संख्या
दिवसेंदिवस कमी होतेय, त्यामुळे रिअल इस्टेट उद्योगामध्ये विविध क्षेत्रात तणावाचे
संबंध निर्माण झाले आहेत! घर
बांधणीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तिला त्यातून किती पैसा
मिळेल यातच फक्त स्वारस्य असते, किंबहुना
तशीच प्रतिमा या व्यवसायाची तयार झालीये.
बांधकाम व्यावसायिक व घराच्या ग्राहकातील नाते
हरवले आहे किंवा अस्तित्वातच नाही. अनेक
बांधकाम व्यावसायिक प्रत्यक्ष वापरकर्त्यांना कधीच भेटलेले नाहीत, आता तर कंपनीचे
विक्री कर्मचारी देखील नसतात तर संपूर्ण प्रकल्पाचे मार्केटींगचे कंत्राटच दुस-या
कुणाला तरी दिलेले असते व त्यामुळे ग्राहक व प्रत्यक्ष बांधकाम व्यावसायिक तसेच
प्रकल्पाशी निगडित चमू यांच्यात कोणताही संवाद होत नाही. आता वेळ
घेऊन बांधकामाच्या ठिकाणी भेट दिली जाते व त्यांना केवळ प्रकल्प दाखविण्यासाठी व
माहिती देण्यासाठी एक स्वतंत्र चमू असतो. प्रकल्पाच्या
जाहिरातीपासून ते करारापर्यंत ग्राहक संबंध हाताळण्यासाठी तिसराच पक्ष असतो व
बहुतेक बांधकाम व्यावसायिकांना ही व्यवस्था अगदी सोयीची वाटते कारण त्यांना
घराच्या ग्राहकांना भेटावे लागत नाही व त्यांच्या घराविषयीच्या लहान-सहान
प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत नाहीत.
मी अशा अनेक बांधकाम व्यावसायिकांना ओळखतो जे एकाही ग्राहकाशी न बोलता एवढे
प्रकल्प पूर्ण केले, तेवढे प्रकल्प विकले असे अभिमानाने सांगतात! आता
याला व्यावसायिक यश म्हणायचे की भावनिक पातळीवरील अपयश हे मला कधीही समजलेले नाही? इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की बांधकाम
व्यावसायिकांसाठी त्यांनी किती चौरस फूट बांधकाम केले व त्या चौरस फूट क्षेत्रातून
त्यांची किती उलाढाल झाली एवढेच महत्वाचे असते का? आपण किती कुटुंबांना त्यांचे स्वप्नातील घर
प्रत्यक्ष साकार करण्याचा आनंद दिला व आपण या घरांचा ताबा देण्याच्या प्रक्रियेत
किती नाती तयार केली यातील आनंद अनुभवायचे विसरलो आहोत का? ग्राहकांना विशेष वागणूक देताना किंवा सर्व ऐषआराम
देताना किंवा त्या सर्व जबाबदा-यांपासून मोकळे होताना आपण घर बांधण्याच्या व खरेदी
करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेतील मानवी स्पर्श हरवत चाललो आहोत.
पूर्वी बंगल्यांच्या जमान्यात अनेक लोकांचे
बांधकाम व्यावसायिक सर्वेसर्वा असायचे म्हणजे ते वास्तुविशारद, कंत्राटदार व
अभियंता अशी सर्व कामे करायचे. घर
संयुक्त प्रयत्नांनी, सातत्याने संवाद करुन बांधले जायचे, सरते शेवटी त्यामध्ये
सहभागी सर्वांचे स्नेहसंमेलन व्हायचे व बंगल्याच्या मालकाच्या कुवतीप्रमाणे कामावरील
सर्व मजूरांना सुद्धा काही ना काही भेटवस्तू दिली जायची व वर्षानुवर्षे ही नाती
जपली जायची, त्यांना उजाळा दिला जायचा. मला अशा
अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या गोष्टी माहिती आहेत की त्यांच्या पूर्वजांनी
केलेल्या चांगल्या कामाचा फायदा त्यांच्या वारसांना झाला; तर मग
आता रिअल इस्टेटमधून या सर्व चांगल्या प्रथा कुठे हरवल्या आहेत?
दुसरीकडे यामध्ये ग्राहकांचाही तितकाच दोष आहे,
कारण एखादा चांगला बांधकाम व्यावसायिक जे काही करतो त्यातली केवळ भौतिक बाजू ते
पाहतात व त्यात काय मोठेसे आम्ही त्यासाठी बाजार भावाने पैसे मोजले आहेत, तर तशी
सेवा देणे ही बांधकाम व्यावसायिकाची जबाबदारी नाही का अशी त्यांची प्रतिक्रिया
असते? त्यांना
त्यांच्या घराचे नियोजन व अंमलबजावणीमागील मेहनत जाणून घेण्यात रस नसतो. जे लोक
केवळ वरवरच्या सोयीसुविधांना भुलतात व ऐषआरामाच्या सुविधांचा दिखावा करण्यात आनंदी
असतात, ते त्यापलिकडे कधीही विचार करत नाहीत, त्यांचा
विकासक समाजामध्ये काय चांगले काम करत आहे व तत्सम बाबींचे कौतुक करत नाहीत. आजकाल
मी ग्राहकांचे पाहिले आहे की त्याची घराबाबत किंवा बांधकाम प्रक्रियेबाबत काही
गैरसोय झाली, मग तो काही देखभालीचा मुद्दा असेल किंवा कायदेशीर मुद्दा असेल, तर ते
लगेच त्याविषयी प्रतिक्रिया देतात, मात्र विकासक किंवा त्याच्या चमूने केलेल्या
चांगल्या कामाचे क्वचितच कौतुक करतात किंवा त्याविषयी चांगले बोलतात. अर्थात
आपल्या संपूर्ण समाजालाही सर्व आघाड्यांवर अशीच सवय झाली आहे, कुणाही विषयी चांगले
बोलणे निषिद्ध झाले आहे! दुसरीकडे
कुणावरही टीका करणे हे आपले आवडते काम झाले आहे. आपले
शेजारी कोण आहेत याची आपण चौकशी करत नाही व आपण राहायला येण्यापूर्वी त्यांच्याशी
ओळख करुन घेत नाही, तर मग ज्या घरात आपण आपले संपूर्ण आयुष्य घालवणार आहोत त्याचे
कंत्राटदार किंवा पुरवठादारांविषयी जाणून घेणे तर फार दूरची बाब झाली! माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला फारफार तर दोन
किंवा तीन ग्राहक भेटले असतील, ज्यांनी ज्या प्रकल्पामध्ये घर आरक्षित केले आहे
तिथल्या बांधकाम मजूरांच्या राहण्याची सोय पाहण्यात स्वारस्य दाखवले! त्यामुळे
दिवाळीदरम्यान बांधकाम मजूरांना मिठाई देण्यासारख्या साध्या गोष्टींनी त्यांना मदत
करणे याचा विचारही आपण करु शकत नाही. शेवटी त्यांचे हातच तुमच्या घराच्या चार भिंती
उभारणार असतात, आपण त्यांना काही चांगले क्षण देऊ शकत नाही का? आपण वास्तुविशारदाला किंवा कंत्राटदाराला,
आपल्याला घर पाहून आनंद झाला, ते आवडले आहे व आपले स्वप्नातील घर प्रत्यक्ष साकार
करण्यासाठी कौतुकाचे किंवा आभाराचे चार शब्द लिहीण्याचीही तसदी घेत नाही! घराचा ताबा घेतल्यानंतरही असाच दृष्टीकोन असतो
व त्याचा परिणाम म्हणजे आजकालच्या इमारतींमधील तणावपूर्ण संबंध. सदस्यांमध्ये पार्किंगसारख्या लहानसहान
बाबींवरुन वादावादी होते मग त्याला हिंसक वळण मिळते किंवा प्रकरण न्यायालयात जाते,
असे वाद सामंजस्यांने परस्परांशी चर्चा करुन सहज सोडवता येऊ शकतात! मात्र त्यासाठीही मानवीय दृष्टीकोन व
नातेसंबंधांसारखे शब्द महत्वाचे आहेत. हे सर्व
सुरुवातीपासूनच रुजवणे आवश्यक आहे; जर
बांधकाम व्यावसायिक त्याविषयी फारसा उत्सुक नसेल किंवा त्याला त्याची जाणीव नसेल
तर ग्राहकाने तशी मागणी केली पाहिजे कारण शेवटी हा ग्राहकांचा जमाना आहे. म्हणूनच जर काही चुकीच्या पद्धती प्रचलित असतील
तर त्यासाठी कुठेतरी ग्राहकही स्वतः जबाबदार आहे!
दुर्दैवाने या सर्व प्रक्रियेमध्ये रिअल
इस्टेटमधून एक महत्वाची गोष्ट हरवत चालली आहे ती म्हणजे बांधकाम व्यावसायिक व
ग्राहक या दोन दुव्यांमधील संवाद! मी
जेव्हा बांधकाम व्यावसायिक म्हणतो तेव्हा घराच्या बांधकामात काम करणारा संपूर्ण
चमू असा अर्थ अभिप्रेत आहे; मग ते
बांधकामावरील मजूर असतील, विपणन
कर्मचारी असतील किंवा बाहेरील कामे हाताळणा-या संस्था असतील. यासाठी साध्या व सोप्या मार्गांनी बरेच काही
करता येईल, उदाहरणार्थ बांधकामाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात स्नेहसंमेलन आयोजित
करुन या दोन दुव्यांची भेट घडवून आणता येईल. नेहमी
काहीतरी वेगळे करण्याचीही गरज नाही, संकेतस्थळ
किंवा मेलद्वारे आपल्या कामाविषयी ग्राहकाला माहिती देता येईल. तुम्ही त्यांना रिअल इस्टेट उद्योगात चाललेल्या
घडामोडींची माहिती देऊ शकता. वाळूच्या
उपशावर काही काळ बंदी घालण्यात आली होती, यासारख्या बातम्या त्यांना सांगून
तुमच्या चमूला त्यामुळे कशाप्रकारे समस्यांना तोंड द्यावे लागले हे सांगा,
विकासकडून एखाद्या लहानशा पत्राद्वारे या बाबी कळवता येतील. शेवटी हा देखील एक प्रकारचा संवादच आहे व या
संवादातूनच ग्राहक व बांधकाम व्यावसायिकातील भावनिक नाते निर्माण होत असते. शेवटी
दोघांसाठीही हा व्यवसाय आहे हे मान्य केले तरीही त्यातील उत्पादन इतर
उत्पादनांप्रमाणे नाही, कोणतेही घर भाव-भावनांशिवाय कसे घडू शकेल!
रिअल इस्टेटच्या भावनिक संस्कृतीचे जतन
करण्याची जबाबदारी आपली आहे, कारण कोणतेही
चांगले संस्कार हे एखाद्या झाडाप्रमाणे आहेत, ते आधी
रुजवावे लागतात व मग आपल्या स्वतःच्या कृतींनी त्यांना वाढवावे लागते ! नवीन
अर्श सुरु होतंय , या नवीन
वर्षात या बदलाची फक्त अपेक्षा न करता निर्धार करत सरत्या वर्षाला निरोप देऊ आणि
नवीन वर्षाचे स्वागत करू !
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment