“आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात, आपल्याला नेहमी एका पाठोपाठ एक अडचणींना तोंड द्यावे लागते, ज्यापैकी बहुतेकींवर आपले नियंत्रण नसते. मात्र आपण कशाप्रकारे प्रतिक्रिया देतो, आपण परिस्थितीनुरूप स्वतःमध्ये कसे बदल करतो, आपण कसा श्वास घेतो व आपण काय कृती करतो यावर आपले पूर्णपणे नियंत्रण असते”... डायमंड डल्लास पेज
डल्लास पेज, ज्यांना क्रीडा जगतात डायमंड डल्लास पेज या नावाने ओळखले जाते, ते एक अमेरिकी व्यावसायिक कुस्तीपटू, फिटनेस कोच, प्रेरणादायी वक्ता व अभिनेते आहेत. जेव्हा एक कुस्तीपटू प्रेरणादायी वक्ता होतो तेव्हा तोच अडचणींविषयी इतक्या सकारात्मकरित्या बोलू शकतो व त्यांचे वरील शब्द इतर कुणासाठी नाही तर रिअल इस्टेटसाठी अतिशय आवश्यक आहेत. २०२० हे वर्ष बहुतेकांसाठी वैयक्तिक तसेच व्यावसायिक पातळीवरही एखाद्या वाईट स्वप्नासारखे होते. मात्र गेल्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात भारतीय क्रिकेट संघाच्या म्हणजेच टीम इंडियाच्या बाबतीत एक घटना झाली जी मला इथे सांगाविशी वाटते. रिअल इस्टेटविषयी पुन्हा बोलण्याआधी मी माझ्या कार्यालयातल्या व माझ्या बांधकाम स्थळांवरील कर्मचाऱ्यांना उद्देशून एक संदेश लिहीला, तो इथे देत आहे…
संदेश १ (हा वॉट्सॲपवर पाठवलेला संदेश होता, त्यामुळे मी भाषा अनौपचारिक ठेवली होती)
प्रिय टीम संजीवनी,
तुम्ही सगळे मी पाठविलेली मिठाई कशासाठी मिळाले असा विचार करत असाल. आजचा दिवस खास आहे, आपण फ्लॅट विक्रीच्या बाबतीत फार उल्लेखनीय कामगिरी करत आहोत म्हणून नाही, तर भारताने ऑस्ट्रेलिया संघावर कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला म्हणून. विशेष या सामना बॉक्सिंग डे च्या दिवशी म्हणजे म्हणजेच नाताळाच्या दुसऱ्या दिवशी सुरू झाला व कसोटी सामन्यातील कामगिरी ही ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी नेहमीच अभिमानाची बाब असते!! लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे आधीच्या कसोटी सामान्यामध्ये भारताला अतिशय लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता ज्यामध्ये संघाने कसोटी सामन्यातल्या आत्ता पर्यंतच्या सर्वात कमी म्हणजे सर्व बाद जेमतेम ३६ धावा केल्या होत्या. या सामान्यात ते कप्तान विराट कोहलीशिवाय खेळले ज्याने मागील कसोटी सामन्यामध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. भारतीय संघावर कुणीही पैसे लावले नव्हते, मात्र एखाद्या सर्वसामान्य संघात व विजेत्यांमध्ये हाच फरक असतो. तुमच्या क्षमतेविषयी कोण काय म्हणत आहे यापेक्षाही शेवटी तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे महत्त्वाचे आहे. भारतानेही नेमके हेच केले, त्यांनी उद्दिष्टावर लक्ष्य केंद्रित केले, स्वतःवर विश्वास ठेवला व मैदानावर आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली.
मी अशा स्पर्धांमधूनही हेच शिकलो आहे; ऑस्ट्रेलियाने वाईट खेळ केला असे नाही तर भारतीय संघाने आपला सर्वोत्तम खेळ केला. आपणही यातून शिकले पाहिजे व वाईट काळ विसरून आपली सर्वोत्तम कामगिरी करायचा प्रयत्न केला पाहिजे, त्यानंतर विजय आपलाच असेल.
संदेश २
मी क्रिकेटमध्ये अलिकडच्या काळात पाहिलेला बरोबरीत संपलेला सर्वोत्तम सामना... तिसरी टेस्ट मॅच
कसोटी क्रिकेटचा हा सर्वोत्तम खेळ होता, हे केवळ बॅट व बॉलने खेळलेले युद्ध नव्हते तर दोन मनोवृत्तींचे युद्ध होते, आपली सर्वोत्तम कामगिरी दाखविण्यासाठीचे युद्ध होते. पुजाराने जवळपास २०० चेंडूत ७७ धावा केल्या, रिषभ पंतने ११२ चेंडूत ९७ धावा केल्या तर अश्विन व हनुमा विहारी यांच्या जोडीने ४१ षटके जागतिक क्रिकेटमधील काही सर्वोत्तम गोलंदाजांचा मारा झेलत खिंड लढवली. याआधीचा थोडासा काळ पाहिला तर त्या दोघांनाही दुखापती झाल्या होत्या व विहारीचा खेळ चांगला होत नव्हता, तो नवखा होता व संघातील आपले स्थान राखण्यासाठी धडपडत होता. अश्विनला तो गोलंदाज असल्यामुळे कुणी त्याचा विश्वासू फलंदाज म्हणून विचारही करत नव्हते. या जोडगोळीच्या खेळातून आक्रमकता, चिकाटी, निश्चय, संयम व धैर्य यांचा मिलाप दिसून आला, सध्याच्या भारतीय संघामध्ये नेमके हेच वैशिष्ट्य आहे व आपण केवळ त्याविषयी अभिमान न बाळगता त्यातून शिकले पाहिजे. आधीच्या कसोटी सामन्यामध्ये ऐतिहासिक विजय झाला होता, तर हा बरोबरीत सुटलेला ऐतिहासिक सामना होता असे म्हणावे लागेल याचे कारण म्हणजे काहीवेळा सामना जिंकण्यापेक्षाही सामना बरोबरीत सुटणे अधिक चांगले असते. मला नेहमीच कसोटी क्रिकेट आवडते कारण ते जीवनासारखेच आहे, त्याच्या प्रवासात तुम्हाला प्रत्येक पैलू अनुभवता येतो, तुमची सर्वांगाने कसोटी घेतली जाते व पाच दिवसांच्या प्रवासात दर दिवशी तुम्ही स्वतःला अधिक चांगल्याप्रकारे ओळखू लागता.
जिओ टीम इंडिया, असेच लढत राहा!!...
बहुतेक वाचकांना हा संदर्भ माहिती असेल कारण आपल्या देशामध्ये चित्रपट व क्रिकेट हे माणसाच्या जगण्यासाठी ऑक्सिजन व पाण्यासारखे आहेत. मात्र प्रत्येक नियमाला नेहमी काही अपवाद असतात म्हणूनच अशा लोकांसाठी पहिला संदेश भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २रा कसोटी सामना जिंकला तेव्हा लिहीला होता. पहिला सामना आपण क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येने हारलो होतो. दुसरा संदेश जेव्हा आपण तिसरा कसोटी सामना सर्व अडचणींवर मात करून बरोबरीत सोडवला तेव्हा लिहीला होता. तेव्हा कोणताही संघ जिंकला नाही तरी भारतीय संघाचा नैतिक विजय झाला होता!
आता तुम्ही म्हणाल की त्यात काय मोठेसे, तो एक खेळ होता व काही वेळा तुम्ही खेळात जिंकता व काही वेळा खेळात हरता, त्याचा रिअल इस्टेटशी किंवा उद्योगाशी किंवा आपल्या जीवनाशी काय संबंध? जेव्हा दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारत विजयी झाल्यानंतर मी मिठाई वाटली तेव्हा माझ्या संघाच्या (कार्यालयातील संघाच्या) मनातही हा प्रश्न नक्कीच आला असेल. मात्र त्यांनी काही विचारले नाही (मी अगदी एखाद्या सामान्य बॉससारखाच आहे, मात्र या देशामध्ये तुम्ही बॉसला प्रश्न विचारत नाही, मग तो घरातला असेल किंवा कार्यालयातला हे वेगळे सांगायची गरजच नाही). मात्र इतरही लोकांच्या मनात बरेच प्रश्न असतील व अनेक लोक रिअल इस्टेटमधील परिस्थिती व भारतीय संघाच्या कामगिरीमध्ये काय संबंध आहे याचा विचार करत असतील. मी सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की हा लेख केवळ रिअल इस्टेटला लागू होत नाही तर कोणताही व्यवसाय किंवा उद्योगाशी किंवा अगदी सामान्य जीवनाशीही संबंधित आहे. दुसरे म्हणजे भारतीय संघाची कामगिरी किंवा विजय किंवा सामना बरोबरीत सुटणे महत्त्वाचे नाही तर त्यांनी या दोन सामन्यांदरम्यान ज्याप्रकारचा खेळ दाखवला ते महत्त्वाचे आहे. एखादा सामना जिंकल्यामुळे अथवा बरोबरीत सोडवल्यामुळे तुम्ही सर्वोत्तम संघ आहात असे नाही किंवा त्यामुळे तुम्ही जगात सर्वोच्च स्थानी पोहोचता असेही नाही. परंतु कोणतेही युद्ध कधीही अंतिम नसते, मात्र आपण त्यातून जे काही शिकतो ते नक्कीच असते. मला नेमके हेच सांगायचे होते कारण भारतीय संघाप्रमाणेच रिअल इस्टेट नवीन वर्षात प्रवेश करत असताना भूतकाळ (म्हणजे अगदी अलिकडचा भूतकाळ) एखाद्या वाईट स्वप्नासारखा होता.रिअल इस्टेट विषयी धोरणांपासून ते घरांच्या मंदावलेल्या विक्रीपर्यंत सर्व आघाड्यांवर सगळ्या नकारात्मक गोष्टी घडत होत्या, नुसती अडथळ्यांची शर्यत सुरू होती. अनिश्चिततेमुळे संभाव्य खरेदीदारांमध्ये अस्वस्थता किंवा बेचैनी होती ज्यामुळे घरासारखी महाग गोष्ट खरेदी करताना त्यांच्या निर्णयातून हे दिसून येत होते. त्याचवेळी सध्याच्या ग्राहकांना प्रकल्प पूर्ण करून देण्यासाठी डोक्यावर रेराची टांगती तलवार होती, सुरु असलेल्या प्रकल्पांसाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज सतत वाढत होते. हे कमी होते म्हणून की काय संपूर्ण राज्यात सारखेच विकास नियंत्रण नियम लागू करणे (नेहमीप्रमाणे काही अपवाद वगळून) व गावांचे विलीनीकरण/वगळणे (मी पुण्याच्या रिअल इस्टेटविषयी बोलतोय) यासारख्या धोरणांच्या बाबतीत कोणतीही स्पष्टता नव्हती त्यामुळे तुमचे आराखडे मंजूर करून घ्यायचे का व कोणत्या प्राधिकरणाकडून मंजूर करून घ्यायचे हे माहिती नव्हते. अशा इतरही बऱ्य़ाच बाबी होत्या, या सगळ्याचा एकत्र परिणाम होऊन अगदी सशक्त (म्हणजे आर्थिकदृष्ट्या) विकासकही हताश झालेले होते.
या बरोबरीने अडचणीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया संघ ज्याप्रमाणे जलदगती गोलंदाजीच्या माऱ्याने प्रतिस्पर्धी संघाला हैराण करून सोडतो त्याप्रमाणे सरकारही ग्राहकांसाठी शून्य मुद्रांक शुल्क व बांधकाम व्यावसायिकांनी मुद्रांक शुल्क भरले तर त्यांना इतर शुल्कांमधून ५० टक्के सवलत मिळेल वगैरे अशी विचित्र धोरणे जाहीर करून बांधकाम व्यावसायिकांची परीक्षा पाहात होते. असो, धोरणे तयार करणाऱ्या मंडळामध्ये आपले परम हितचिंतक श्री. दीपक पारेख (माफ करा, त्यांचा हेतू व ज्ञानाविषयी पूर्णपणे आदर राखत मी हे बोलतोय) असताना तुम्ही आणखी काय अपेक्षा करू शकता. हेच सरकार विकासकांनी सामान्य माणसाला परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून द्यावीत अशी अपेक्षा करते. यात एक रोचक बाब म्हणजे जेव्हा रिअल इस्टेटसाठी काहीतरी चांगले करण्याची वेळ येते (म्हणजे मला म्हणायचे आहे की धोरणांच्या बाबतीत), तेव्हा श्री. पारेख व सर्व सन्माननीय मंडळी स्टील, सिमेंट यासारख्या अत्यावश्यक कच्च्या मालाच्या किंमती कमी करण्याविषयी किंवा रिअल इस्टेटला कमी दराने वित्त पुरवठा करण्याविषयी कधीच सूचना देत नाहीत किंवा प्रस्ताव देत नाहीत, असे का हा प्रश्न मला नेहमी पडतो. असो, तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल, हे कमी म्हणून की काय स्थानिक भाईंचे (नेत्यांचे) सातत्याने मागणी करणारे पंटर असतातच तसेच माहितीच्या अधिकाराच्या नावाखाली ब्लॅकमेल करणारेही असतात (त्याचा सदुपयोग करणाऱ्यांविषयी पूर्णपणे आदर राखत हे सांगतोय), ज्यांना बांधकाम स्थळावरील चुकीच्या गोष्टी उजेडात आणण्यापेक्षाही फक्त स्वतःचे खिसे भरण्यात रस असतो. त्यानंतर विविध ना हरकत प्रमाणपत्रांची कधीही न संपणारी मालिका असते व अनेक विभागांकडून (अर्थातच सरकारी) मंजुऱ्या घ्याव्या लागतात. ही संपूर्ण प्रक्रिया बांधकाम व्यावसायिकाचा संयमच नाही तर अंत पाहणारी असते. सगळ्यात शेवटी ग्राहक (हे नव्या युगातील ग्राहक आहेत) जे आपल्या मोफत वाय-फायचा वापर करायला सज्ज असतात व बांधकाम व्यावसायिकाने एखादी लहानशी गोष्ट त्यांना कळविण्यात काही चूक केली तर समाज माध्यमांवर हात धुवून त्याच्या मागे लागतात (अर्थात बांधकाम व्यावसायिकांनी त्रास दिल्याची अनेक खरी उदाहरणेही आहेत त्यांचा अपवाद वगळून). त्याशिवाय निकृष्ट पायाभूत सुविधा तसेच विजेचे मीटर बसविण्यास होणारा उशीर, पाणी पुरवठा व इतर गोष्टांसाठी ग्राहक व माध्यमे बांधकाम व्यावसायिकाला सुळावर चढवतात व खरी चूक सरकार नावाच्या यंत्रणेची असते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांनी नवीन वर्षात प्रवेश केला आहे जिथे त्यांच्याकडून प्रकल्पाचा ताबा देण्याविषयी त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करणे तसेच थोडेफार पैसे कमावणे अपेक्षित आहे ज्यासाठी तो किंवा ती रिअल इस्टेट व्यवसायामध्ये आलेले असतात; हे कथानक भारतीय संघाने ऑस्ट्रिलियामध्ये जी लढत दिली त्याच्याशी जुळत नाही का? भारतीय संघाचा खेळाविषयीचा दृष्टिकोन रिअल इस्टेटने (म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांनी) व्यवसायाच्या बाबतीत स्वीकारावा यासाठीच मी हे उदाहरण दिले आहे. सामना जिंकायचा प्रयत्न करा म्हणजेच चांगला पैसा कमवा (त्यात काहीच वाईट नाही) व त्याचवेळी व्यवसायात टिकून राहण्याइतपत कणखरपणा दाखवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही खेळपट्टीवर टिकून राहिलात तरच तुम्ही सामना जिंकू शकाल हा खेळाचा साधा नियम असतो. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने व्यवसायाचे काही मूलभूत नियम पाळले पाहिजेत जे आपल्यापैकी बहुतेक जण गेल्या काही दशकांमध्ये विसरून गेले आहेत. कोणत्याही जमीनीच्या व्यवहारासाठी तो पृथ्वीवरचा शेवटचा जमीनीचा तुकडा असल्याप्रमाणे घाई करू नका, तुमच्या नियंत्रणात किंवा क्षमतेबाहेर असलेल्या कशाचेही आश्वासन देऊ नका (विशेषतः रस्ते किंवा पाणी पुरवठा वगैरे), वर्तमानात राहून व्यवहार करा भविष्यात राहून नव्हे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेकाम करताना, एखादे उद्दिष्ट गाठताना तुमच्या ग्राहकांशी, विक्रेत्यांशी व कर्मचाऱ्यांशी पारदर्शकपणे वागा तसेच त्यांच्याशी आवर्जून संवाद साधा.
सुदैवाने आता कोव्हिड-१९ वरील लस बाजारात आली आहे यामुळे जनतेचे मनोधैर्य निश्चितच वाढले आहे. मात्र या लॉकडाउनमुळे व एकूणच परिस्तिथीमुळे लोकांवर शारीरिक व आर्थिक परिणामापेक्षा त्यांच्या मानसिकतेवर फार मोठा परिणाम झाला आहे. या परिणामाच्या जखमा भरून येतील मात्र त्याचे व्रण अपेक्षेपेक्षाही दीर्घकाळ राहतील. येथून पुढे खर्च केलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळणार असेल तरच कुठलीही वस्तू खरेदी केली जाईल व स्वतःचे घर घेण्यास प्राधान्य असेल मात्र ते पूर्णपणे गरजेवर आधारित असेल. म्हणूनच, आपण कोणतीही जमीन खरेदी करताना आपले बजेट तसेच घराचे संभाव्य ग्राहक विचारात घ्या, गेल्या काही काळात आपण हे करायला विसरलो आहोत किंबहुना आपल्याला त्याची कधी गरज पडली नाही. तसेच लॉकडाऊनने सरकारच्या खिशालासुध्दा (देशाच्या आर्थिक साठ्याला) झळ बसलीय व ते दोन प्रकारे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करेल. एक म्हणजे कर, शुल्क व अधिभारांच्या माध्यमांमधून बांधकाम व्यावसायिकांच्या खिशातून काढून घेणे व त्याचवेळी एफएसआय वाढवणे, म्हणजे विकासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. मात्र ही दुधारी तलवार आहे कारण बाजारातील पुरवठा वाढल्यावर घराच्या ग्राहकांसाठी आणखी पर्याय उपलब्ध होतील व नफा कमी असेल. माफ करा मी अर्थव्यवस्था किंवा वित्तपुरवठा या विषयांवर टिप्पणी करण्यासाठी कुणी वॉरन बफेट नाही. मात्र जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर असता व तुमच्यावर दोन्हीकडून मारा होत असतो तेव्हा तुम्ही भारतीय संघासाठी खेळताय किंवा तुमच्या स्वतःच्या व्यवसायाच्या संघासाठी याने काही फरक पडत नाही. तुम्ही ज्या संघासाठी खेळताय त्या संघाला वाचवणे व उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती करणे एवढेच महत्त्वाचे असते, नाही का?
घराच्या ग्राहकांसाठीही हा कसोटीचा काळ आहे कारण एकीकडे त्यांना त्यांच्या करिअरची काळजी घ्यायची आहे, त्यांच्या मुलांसाठी भविष्याचे नियोजन करायचे आहे, तसेच खर्च सतत वाढतच चालले आहेत व दुसरीकडे घर घेण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे, त्यांनी घर घ्यावे असे सगळ्यांना वाटते, अगदी सरकारलाही. एक लक्षात ठेवा जेव्हा कमी पर्याय असतात तेव्हा निवड करण्यापेक्षाही जेव्हा जास्त पर्याय असतात तेव्हा निवड करणे अवघड असते, कारण तुम्हाला आता शहाणपणाने निवड करावी लागेल. शेवटी मी इतिहासकार मायकेल वुड्स यांनी आपल्या देशाविषयी केलेली एक सुंदर टिप्पणी मला आठवतेय ती इथे सांगतो, “इतिहासामध्ये तलवारीच्या जोरावर अनेक साम्राज्ये निर्माण झालेली पाहता येतील, मात्र भारत हे एकमेव असे साम्राज्य आहे जे आत्मशक्तीच्या जोरावर उभे राहिले आहे”! भारतीय क्रिकेट संघाने या अवतरणाचे मूर्तिमंत उदाहरण दाखवून दिले आहे, आता रिअल इस्टेटनेही आपल्याला एका चांगल्या उद्दिष्टासाठी आत्मशक्तीच्या जोरावर कसे लढायचे हे माहिती असल्याचे दाखवून द्यावे व सगळ्यांसाठी उत्तम घराशिवाय आणखी चांगले उद्दिष्ट काय असू शकते?
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment