“निसर्गामध्ये प्रत्येकाची जगण्याची स्वतःची रीत असते, मात्र केवळ माणूसच इतर जीवांचे जगणे असह्य करतो”....
वरील शब्द अस्मादिकांचे म्हणजे माझेच आहेत (एवढे उपरोधिकआणखी कोण बोलू शकते), मी हे वैतागून बोलत नाहीये (सुदैवाने), तर मनुष्यप्राणी इतर प्रजातींशी ज्याप्रकारे वागतो ते पाहून मला आश्चर्य वाटते. मला अलिकडेच पुन्हा एकदा याचा अनुभव आला अर्थात यावेळी त्याचे कारण चुकीचे नव्हते, तुमची उत्सुकता आणखी न ताणता सांगतो की, पुण्याजवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यामध्ये अमूर ससाणा दिसला. पुणे हे इथल्या निसर्गासाठी तसेच वन्यजीव प्रेमींसाठी प्रसिद्ध आहे. आजकाल लोकांच्या हातात पैसा खेळू लागलाय, जीवनात स्थैर्य आहे त्यामुळे अनेक जण पक्षी निरीक्षक होऊ लागले आहेत, त्यात अनेक तरुणांचाही समावेश आहे. त्यात काहीच चूक नाही, किंबहुना मला असे वाटते की अद्ययावत कॅमेरे व इतर सामग्री खरेदी करण्यासाठी खर्ची घातलेले पैसे शेवटी निसर्गाच्या संवर्धनासाठीच जाणार आहेत. केवळ हातात पैसा असल्यामुळे, हे तथाकथित पक्षीनिरीक्षक व वन्यजीवप्रेमी अनेक ठिकाणांना भेट देऊ शकतात जिथे सामान्य माणसे किंवा पर्यटक जाण्याचा विचारही करू शकत नाहीत. जेव्हा अशी ठिकाणे जवळपास असतात व अमूर ससाण्यासारखा दुर्मिळ पक्षी पाहायला मिळणार असतो जो या भागात सहसा दिसत नाही, तेव्हा तो केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण मध्य भारतात चर्चेचा विषय ठरल्यास आश्चर्य नाही. एखाद्या पक्षाने आपल्या सावजावर झेप घ्यावी त्याप्रमाणे वन्यप्रेमींचे (पक्षी निरीक्षक) जथ्थे हा पक्षी पाहण्यासाठी लोणावळ्याला गर्दी करत आहेत. ज्यांना असे वाटत असेल की हा पक्षी व केस्ट्रेल नावाच्या आणखी एका शिकारी पक्ष्याच्या छायाचित्रांनी इंटरनेटला (फेसबुक/इन्स्टाग्राम) वेड लावले आहे त्यांना थोडीशी या पक्ष्याची माहिती सांगतो. अमूर ससाणा हा पक्षी चीन वसैबेरियाच्या सीमेवर (मंगोलिया) राहतो व दरवर्षी हिवाळ्यामध्ये जवळपास वीस हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून आफ्रिकेत पोहोचतो. या मार्गात तो भारतामध्ये नागालँडमध्ये थांबतो. अमूर ससाणा दरवर्षी एवढा मोठा प्रवास करतो म्हणूनच तो अतिशय विशेष ठरतो. इतर कोणताही शिकारी पक्षी दरवर्षी एवढा मोठा प्रवास करत नाही. दरवर्षी हजारो अमूर ससाणा भारतामध्ये नागालँडला भेट देतात. तुम्हाला हे पक्षी पाहायचे असतील तर तुम्हाला नागालँडला जावे लागेल जे पुणे किंवा मध्य भारतातून जवळपास तीन हजार किलोमीटर अंतरावर आहे. आता तुम्हाला कल्पना येईल की हे लोक लोणावळ्यामध्ये का गर्दी करत आहेत. कारण इथे येणे स्वस्त आहे व हा भाग गवताळ आहे. नागालँडमध्ये घनदाट जंगल आहे ज्यामुळे विशेषतः पक्ष्यांची छायाचित्रे घेणे अवघड होते.
आता, एखादा प्रश्न विचारेल की त्यात काय मोठेसे, एक साधा पक्षी तर आहे त्यासाठी मंगळावरून कुणीतरी आल्याप्रमाणे एवढा होहल्ला करायची काय गरज आहे? मी अशाप्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांना दोष देत नाही कारण जेव्हा निसर्ग व वन्यजीवनाचा प्रश्न येतो तेव्हा या देशामध्ये (अगदी जगामध्येही) केवळ दोनचवर्गवाऱ्या आहेत. एक म्हणजे ज्यांना वन्य जीवनाविषयी खरोखर काळजी आहे, ज्यांना त्यासाठी खरोखरच काहीतरी करायची इच्छा आहे व दुसरी म्हणजे ज्यांना त्याच्याशी काहीच घेणेदेणे नाही कारण ते अनभिज्ञ आहेत. त्यांना असे वाटते की वन्यजीवन संवर्धन हे केवळ श्रीमंत लोकांचे चोचले आहेत, त्यांना पोटापाण्याची काही चिंता नाही किंवा जे लोक वेडे आहेत (वैज्ञानिकांसारखे). मी या दुसऱ्या वर्गवारीतील लोकांना दोष देत नाही कारण ते आपल्या परीने बरोबर आहेत. स्वतःला वन्यजीवन प्रेमी म्हणवणाऱ्या व्यक्तींमध्येही दोन वर्गवाऱ्या आहेत, एक म्हणजे ज्यांना वन्यजीवन संवर्धनाविषयी खरोखरच काळजी वाटते व त्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे व दुसरी वर्गवारी नव्यानेच तयार झाली आहे, ती म्हणजे शहरातली सधन वर्गातील मंडळी ज्यांच्यासाठी हे सगळे नवीन आहे व त्यांना त्यांच्या तथाकथित यशस्वी शहरी जीवनापासून जरा विरंगुळा हवा आहे. जोपर्यंत त्यांच्या या छंदामुळे किंवा विरंगुळ्यामुळे वन्य जीवनाला फायदा होतोय तोपर्यंत त्यांनी समाज माध्यमांवर थोडीफार प्रसिद्धी मिळवली व स्वतःला वन्यजीव प्रेमी म्हणून अभिमानाने मिरवले तर काहीच हरकत नाही.
दुसऱ्या प्रकारच्या वन्यजीव प्रेमींच्या बाबतीतली अडचण अशी आहे की त्यांना वन्यजीवनाचे संवर्धन करण्यापेक्षाही त्याची छायाचित्रे काढून ती दाखविण्यात अधिक रस असतो. अर्थात यामुळे पर्यटन व संबंधित व्यवसायांना थोडीफार मदत होते, जंगलाच्या अवतीभोवती राहणाऱ्या लोकांनाही उत्पन्नाचे साधन मिळते, मात्र उत्तमोत्तम छायाचित्रे मिळविण्याच्या उत्साहात वन्यजीवनाला म्हणजे वन्यपशु-पक्ष्यांच्या निवासस्थानात अडथळा निर्माण होतो, मग तो वाघ असो किंवा अमूर ससाणा, मला मुख्य काळजी हीच आहे व हाच या लेखाचा विषय आहे. लोणावळ्यामध्ये डोंगररांगांमध्ये गवताळ पट्टे आहेत व धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा काही भागही येथे आहे जो टाटा समूहाच्या ताब्यात आहे, वन अथवा कोणत्याही सरकारी विभागाच्या नियंत्रणाखाली नाही. ज्याक्षणी येथे अमूर ससाणा दिसल्याची बातमी पसरली तेव्हापासून येथे दोन्ही वर्गवारीतील वन्यजीवप्रेमींनी गर्दी केली आहे. यामध्ये कुणाचाही ससाणा किंवा इतर पक्ष्यांना अपाय व्हावा असा हेतू नसतो मात्र आपण ज्याप्रकारे या जागांवर अतिक्रमण करतो त्यामुळे तिथे राहणाऱ्या पक्ष्यांना भविष्यकाळात त्रास होऊ शकतो. ही गवताळ जमीन असून इथे अनेक जंगली फुले व झुडुपे आहेत. उत्तमोत्तम छायाचित्र मिळावे म्हणून वाहनांची सतत ये-जा होत असते, यामुळे गवताचे नुकसान होते. जेवढे जास्त लोक तेवढा कचराही अधिक होतो. कचऱ्यामुळे कावळे, पतंग, भटकी कुत्री वाढतात. ज्यामुळे केवळ ससाणेच नाही तर त्यांचे सावजही धोक्यात येते. जी जागा त्यांनी सुरक्षित ठिकाण म्हणून निवडले असावे तिथूनच त्यांना घालवले जाते.यावर आळा घातला पाहिजे व त्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन केले पाहिजे हीच एकमेव काळजी आहे. आपल्या भागात ससाणा दिसला म्हणून त्याचे कौतुक करण्यात व त्याची छायाचित्रे काढून ती प्रसिद्ध करण्यात (व यातून स्वतःही थोडीफार प्रसिद्धी मिळविण्यात) गैर काहीच नाही. मात्र ससाणा तसेच इतरही पक्ष्यांनी इथे राहावे व दरवर्षी येथे भेट द्यावी असे आपल्याला वाटत असेल तर आपण त्यांना आरामात राहाता येईल अशी सोय करू शकतो, नाही का? स्थलांतरित पक्षी किंवा प्राणी हे आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसारखे असतात, जे आपल्याला अतिशय प्रिय असतात व त्यांनी वारंवार भेट द्यावी असे आपल्याला वाटते. मात्र आपण त्यांच्याशी चांगले वागलो तरच हे होईल, तरच त्यांना आपल्याला पुन्हा भेट द्यावीशी वाटेल एवढाच साधा तर्क आहे. या बाबतीत अमूर ससाणाच नाही तर इतर प्रजातींचे यजमान म्हणून आपण कुचकामी आहोत एवढेच मला सांगावेसे वाटते. हे केवळ सासणा, गवताळ पट्टे किंवा लोणावळ्यापुरते मर्यादित नाही, आपल्या राज्यामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत. मात्र आपल्या पाहुण्यांविषयी व एकप्रकारे निसर्गाविषयीच आपल्या निष्काळजी व अडाणी दुष्टिकोनामुळे या ठिकाणांचीअक्षरशः दयनीय अवस्था झालीय. आपल्याला पाहुण्यांना कसे वागवायचे व ते आपल्याकडे राहात असताना त्यांची काळजी कशी घ्यायची हे समजत नाही. अशाप्रकारे आपण एकतर त्यांना घालवून टाकतो किंवा ते नामशेष होण्यास कारणीभूत होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले पुणे शहर (किंवा ज्याला आपण स्मार्ट शहर म्हणतो) जेथे मुळा व मुठा नद्यांमुळे अनेक स्थलांतरित पक्षी पाहुणे म्हणून येत असत. मात्र आपण नद्या एवढ्या प्रदूषित केल्या की आता आपल्याकडे असे कुणीही पाहुणे येत नाहीत. यामध्ये कवडी पाटसारख्या (पुण्याचे पूर्व उपनगर) अनेक ठिकाणांचाही समावेश होतो. या ठिकाणीही पूर्वी अनेक पक्षी येत असत मात्र आता येथील पाणीही प्रदूषित झाल्यामुळे ते नाहीसे झाले आहेत. सुशोभीकरणाच्या नावाखाली आपण पाषाण तलावातील जैव विविधता बदलली, जे स्थलांतरित पक्षांचे नंदनवन होते मात्र आता ते ही जागा सोडून गेले आहेत. आपल्याकडे प्रत्येक गावात व शहरात अशी शेकडो ठिकाणे असतात जेथे जलाशय किंवा गवताळ भाग किंवा टेकड्यांवर विविध प्रकारचे पक्षी स्थलांतर करून येत असत. मात्र आपण या जागांचे व्यवस्थित संरक्षण केले नाही व आता हे सर्व सुंदर पाहुणे या जागा सोडून गेले आहेत.
मला असे वाटते आपण नेहमीप्रमाणे आरोप प्रत्यारोपांचा खेळ खेळण्याऐवजी; आपण अनेक प्रजातींचे निवास्थान असलेल्या या जमीनीच्या पट्ट्यांचे जे नुकसान केले आहे त्याची भरपाई आपल्याला कशी करता येईल यावर लक्षंकेंद्रित करू. अमूर ससाणा या भागात दिसणे तसेच त्याला मिळालेली प्रसिद्धी ही भोवतालच्या काळोखात आशेचा किरण घेऊन आली आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्याकडे अजूनही अशी ठिकाणी आहेत जी आपल्या निसर्गातील पाहुण्यांना आनंद देऊ शकतात, इथे येण्यास व आपल्यासोबत काही काळ राहण्यास ते उत्सुक आहेत. अशा जमीनी सुरक्षित ठेवणे हे कुणाचे काम आहे हे महत्त्वाचे नाही, ते वनविभागाचे असू शकते किंवा टाटाच्या कर्मचाऱ्यांचे असू शकते, वन्यजीवप्रेमींचे असू शकते किंवा सामान्य नागरिकांचे असू शकते, पक्ष्यांच्या दृष्टीने माणसेही एक प्रजातीच आहेत. विनोद म्हणजे पक्षी व इतर प्राणी माणसाला एक प्रजाती मानतात, मात्र आपल्यालाच ते समजत नाही व आपण आपसातच भेदभाव करत राहतो व भांडत राहतो. यामुळे आपले घर (म्हणजेपृथ्वी अस्ताव्यस्त झाली आहे) अमूर ससाण्यासारख्या आपल्या पाहुण्यांसाठी फारसे आकर्षक राहिलेले नाही. प्राण्यांकडे जे शहाणपण आहे ते कधीतरी आपल्यालाही मिळेल अशी आपण आशा करू; अस्तु, एवढ्यावरच माझे म्हणणे संपवतो!
मी माझ्या फ्लिकर खात्यावर अमूर ससाण्याच्या छायाचित्रांसोबत जे लिहून प्रकाशित केले होते व ज्यामुळे मला वरील लेखाची प्रेरणा मिळाली ते येथे देत आहे.
संजय देशपांडे
"तुम्ही पक्ष्यांचा किलबिलाट ऐकलात, तर दररोज त्यात एक गाणे असेल"...
क्योमॅकलिअर
क्यो या ‘बर्ड्स आर्ट लाईफ’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका आहेत: त्यांच्या वर्षभराच्या निरीक्षणातून हे पुस्तक साकार झाले आहे, म्हणूनच त्या पक्ष्यांविषयी इतक्या जिव्हाळ्याने लिहू शकतात! असो, अनेक जणांना आश्चर्य वाटेल की मी अचानक पक्षी निरीक्षण कसे सुरू केले किंवा मला पक्ष्यांमध्ये रस कसा वाटू लागला. तर याचे कारण सोपे आहे, पक्षीनिरीक्षण हादेखील वन्यजीवनाचाच एक पैलू आहे. कारण पक्ष्यांच्या किलबिलाटाशिवाय व त्यांनी दिलेल्या इशाऱ्यांशिवाय वन्यजीवन कसे पूर्ण होऊ शकेल. सर्व प्रकारचे पक्षी हे वन्यजीवनाचा एक भाग असतात. मात्र त्यांच्याकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वाघासारखा रुबाब नसतो किंवा हत्तीसारखी भव्यता नसते. तरीही पक्ष्यांशिवाय कोणतेही वसतिस्थान अपूर्ण आहे. म्हणूनच मी जेव्हा पक्ष्यांची छायाचित्रे काढायला सुरुवात केली तेव्हा ते माझ्यासाठी वन्यजीवनच होते. एखादा पक्षी शोधणे व त्याचे छायाचित्र काढणे अवघड असते, कारण ते अतिशय वेगवान असतात, ते लहान असतात (सस्तन प्राण्यांच्या तुलनेत) व ते उडू शकत असल्यामुळे कुठेही जाऊ शकतात. यामुळेच पक्षी निरीक्षण व त्यांची छायाचित्रे घेणे अतिशय रोचक असते. माझ्यासाठी पक्ष्यांची छायाचित्रे काढणे म्हणजे केवळ मोठ्या लेन्स घेऊन त्यांची जास्तीत जास्त जवळून छायाचित्रे काढणे नाही. तर त्यांचे निवासस्थान, ती जागा दाखवणेही तितकेच महत्त्वाचे आहे, तरच आपण त्या पक्ष्यांच्या गरजा जाणून घेऊन त्यांचे संवर्धन करू शकू.
पुण्याजवळ लोणावळ्यामध्येच अलिकडेच अमूर ससाण्यांचा एक थवा दिसून आला. ही दुर्मिळ बाब आहे कारण हा पक्षी तुम्हाला देशाच्या या भागामध्ये सहसा दिसून येत नाही. मंगोलियातून आफ्रिकेपर्यंतच्या प्रवासामध्ये त्यांनी कदाचित इथे थांबायचा विचार केला असावा व त्यांना हे ठिकाण आवडले असावे. कारण येथे डोंगरांच्या कुशीमध्ये गवताळ जमीन आहे व भुशी धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे जे अजूनही हिरवे आहे. आरती, अनुज व हेमांगीयांच्याद्वारे संचालित जंगल बेल्सद्वारे या ठिकाणी आमची सहल आयोजित करण्यात आली होती. त्याची छायाचित्रे येथे देत आहे व त्यातील बहुतेक मादी आहेत. त्या आकाराने मोठ्या असतात व नराहून अधिक धीट वाटतात. नर अमूर ससाण्याची आणखी छायाचित्रे लवकरच दाखवेन (अशी आशा करतो)! अधिक माहितीसाठी जेबीला पुढील पत्त्यावर संपर्क करा...
संजीवनी, जंगल बेल्स व वन्यजीवन संवर्धनाशी निगडित असल्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो... संजय देशपांडे
खाली दिलेल्या लिंकवर अमूर ससाण्याचे निसर्गातील काही क्षण पाहा व आवडल्यास इतरांनाही पाठवा...
https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72157717697861306
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment