तुमच्यामध्ये जीवनाला नवीन दिशा देण्याची जी क्षमता आहे तिला कधीच कमी लेखू नका... जर्मनी केंट
जर्मनी केंटही अमेरिकी वृत्तपत्र व टीव्ही पत्रकार आहे. केंट ही समाज माध्यमांची विचारवंत तज्ञ आहे. तिने दहा ललितेतर पुस्तके लिहीली आहेत, ज्यामध्ये द होप हँडबुक ही अतिशय लोकप्रिय ठरलेली मालिका व राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम खपाचे, समीक्षकांनी अतिशय कौतुक केलेले पुस्तक “यू आर वॉट यू ट्विट” लिहीले आहे. आता नवीन वर्ष सुरू झाले आहे (पाहता पाहता एक महिना संपलाही), रिअल इस्टेटच नाही तर आपल्यापैकी सर्वांनी जर्मनी यांच्या शब्दांमध्ये लपलेले तत्वज्ञान केवळ वाचू नये तर त्याप्रमाणे जगावे, कारण आता बाजारात कोरोनावरची लस आली आहे व कोरोनाविरोधात समूह रोगप्रतिकार क्षमता तयार होत आहे (अशी आशा तरी आहे). लॉकडाउन संपले आहे मात्र कोरोना संपलेला नाही, जागतिक महायुद्धानंतर बहुतेक युरोपीय देशांना त्याच्या जखमा भरून यायला अनेक दशके लागली, कोरोना विरुद्धच्याया युद्धाचे पडसादही आपल्या मनावर लॉकडाउन नंतरही अनेक वर्ष राहणार आहेत. यात किती नुकसान झाले याचा हिशेब केला जाईल व अंदाज लावला जाईल, एक गोष्ट मात्र नक्की की आपल्यापैकी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरुपात या लॉकडाउनचा फटका बसला आहे . तर मुद्द्याची गोष्ट अशी की केवळ काही कंपन्यांचा अपवाद वगळता (नेटफ्लिक्स, ॲमेझॉन इत्यादी) व्यावसायिक जगतातील प्रत्येक क्षेत्राचे काहीना काही नुकसान झाले आहे ज्यावर प्रत्येकाला उपाययोजना करायची आहे. रिअल इस्टेटही त्याला अपवाद नाही व असेही जगाला कोरोनाचा फटका बसण्यापूर्वी रिअल इस्टेटमध्ये मंदीच होती. मात्र आपण लॉकडाउनच्या सकारात्मक बाबीकडे पाहू किंवा आता कोरोनाचा फटका बसला
असला तरीही घर घेण्याचे निकष (आपण पुण्यावर लक्ष केंद्रित करू) आधीपासूनच बदलत होते. मी असे म्हणेन की लॉकडाउनने घर घेण्याचे निकष बदलण्याच्या प्रक्रियेला वेग आणण्यास मदत केली.
पुण्याविषयी बोलायचे तर संपूर्ण देशातूनच नाही तर अगदी जगातूनही (मला कुणीतरी सांगितले की शहरामध्ये दहा हजार फक्त कोरिअन नागरिक आहेत, ही संख्या मोठी आहे) स्थलांतर करणाऱ्यांचे हे अतिशय आवडते ठिकाण (शहर आहे) आहे, याचे कारण म्हणजे केवळ नोकऱ्या किंवा या शहरात मिळणारे ज्ञान नाही तर या शहरात रहिवाशांना एक चांगली जीवनशैलीही मिळते, तुम्ही जेव्हा घरासाठी सर्व जागांमधून एखाद्या जागेची निवड करता तेव्हा हा पैलू महत्त्वाचा असतो. पुण्यामध्ये जीवनशैलीच्या बाबतीत सांगायचे तर इथे खाण्यासाठी (व पिण्यासाठीही) शेकडो उपहार गृहे तसेच दुकाने आहेत, मल्टीप्लेक्ससहित शॉप्स,मॉल्स आहेत, नाट्यगृहे आहेत, त्याशिवाय गणेशोत्सव व सवाई गंधर्वसारखे सामाजिक सोहळे विसरून कसे चालेल ज्यामुळे वर्षभर नागरिकांचे मनोरंजन होत असते, एखाद्या व्यक्तीला एका शहरामध्ये पैसे कमावण्यासह हे सगळेही मिळत असेल तर आणखी काय हवे? म्हणूनच रिअल इस्टेट तसेच अनेक उद्योगांसाठी पुणे अतिशय आवडीचे ठिकाण होते हे मान्य आहे. जेव्हा व्यक्ती घराबाबत आनंदी असते तेव्हा त्याचे पडसाद कामाच्या आघाडीवरही दिसून येतात, असे प्रत्येक मनुष्यबळ व्यवस्थापकाला त्याच्या किंवा तिच्या एमबीएच्या प्रशिक्षणात शिकवण्यात आले असते, नाही का? म्हणूनच रिअल इस्टेट क्षेत्रही अतिशय आनंदी होते, कारण अधिक नोकऱ्या व अधिक महाविद्यालये म्हणजे अधिक स्थलांतरित व म्हणजेच अधिक घरांची गरज. सत्तर व ऐशींच्या सुरुवातीच्या दशकात सदनिका खरेदी केलेले सध्याच्या पिढीतील सदनिका ग्राहकही त्यांच्या घरांचा पुनर्विकास किंवा जागेत बदल करून अधिक चांगल्या घराच्या शोधात होते. यामुळेच पुण्यातील रिअल इस्टेट उद्योग त्याच्याशी संबंधित प्रत्येकासाठीच, अगदी सरकारसाठीही फायद्याचा व्यवसाय होता.
कोरोनाची भीती हळूहळू ओसरू लागली की लोक पुन्हा नव्याने सुरुवात करतील व त्यानंतर एक गोष्ट नक्की की घर घेण्याला प्राधान्य दिले जाईल. हा माझा व्यवसाय आहे म्हणून मी हे म्हणत नाही, तर बदलत्या काळाच्या ओघात हे होणे स्वाभाविक आहे. २०२० या वर्षाच्या मध्यावर सुरुवातीच्या काळातील वृत्तपत्राच्या काही मथळ्यांवर नजर टाका, शहरातून ज्यांनी पलायन केले ते भाड्याने राहात होते व कोरोनाविषयीचे भय शिगेला पोहोचले असताना ते मध्येच परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या भाड्याच्या घरात पुन्हा ताबा मिळणे अवघड झाले (संबंधित सोसायट्यांच्या व्यवस्थापनाच्या कृपेने), मला खात्री आहे की त्यावेळी त्यांनी दोन पैकी एक गोष्ट नक्कीच ठरवली असेल. एक म्हणजे शहरातून कायमचे निघून जाणे किंवा दुसरे म्हणजे स्वतःचे घर खरेदी करणे. बहुतेकजण दुसरा पर्याय निवडतील कारण पुण्यातून कायमचे निघून जाणे सोपा पर्याय नाही, विशेषतः तुम्ही ग्रामीण भारतातील एखाद्या लहानशा ठिकाणाहून आले असाल तर. तुम्हाला एकदा या जीवनशैलीची सवय झाली की त्याचे व्यसन अतिशय वाईट असते ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच भाड्याने राहणाऱ्या लोकांचाहा वर्ग रिअल इस्टेटसाठी नवीन सदनिका ग्राहक असतील. ते लॉक-डाऊनपूर्वी जिथे राहात होते तिथे त्यांना घर घेणे कदाचित परवडणार नाही (नाहीतर ते भाड्याने का राहिले असते) परंतु ते थोडेसे दुसरीकडे जावे लागले तरीही स्वतःचे घर घेतील.
त्यानंतर आता घरून काम करण्याची संस्कृती आली आहे जी अनेक कुटुंबांसाठी आयुष्य बदलून टाकणारी आहे, कारण तीन पिढीतील सर्व पाच किंवा सहा सदस्यांना एकाचवेळी एवढा वेळ एकत्र राहण्याची वेळ आली नव्हती व यामुळे अनेक कुटुंबांना अधिक सोयींसहथोडेसे मोठे घर घ्यायला भाग पाडले आहे. घरून काम करण्यासोबतच शाळा ऑनलाईन झाल्या, ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाची परवानगी नव्हती, त्यामुळे केवळ फक्त मोठ्या आकाराच्या खोल्यांचा नाही तर आणखी जादा खोलीची आवश्यकताही निर्माण झाली. एक बीएचके असलेले कुटुंब २ बीएचके घराच्या शोधात आहे, २ बीएचके असलेले कुटुंब ३ बीएचके घेण्याचा विचार करत आहे. कारण पती-पत्नी दोघेहीघरून काम करणार असतील व मुलांची शाळाही घरूनच चालणार असेल तर तुम्हाला निश्चितपणे अधिक खोल्या लागतील. यालाही स्वतःच्या मर्यादा असतील कारण वेतन कपात (बहुतेक ठिकाणी) झालेली आहे व नोकरीच्या सुरक्षिततेची चिंता आहेच परंतु आयुष्य यामुळे थांबणार नाही, बरोबर? म्हणूनच पर्यायांचा शोध घेत राहा व किती खोल्या आहेत याचा विचारू करून नवीन घर घ्या. केवळ स्विमिंग पूल किंवा क्लब हाऊस यासारख्या सोयींचा विचार करू नका कारण यापुढचा काही काळ या सुविधांचा फारसा उपयोग होणार नाही, तरीही त्यांच्या देखभालीचा खर्च असेल. त्याप्रमाणे आपल्याला खरोखरच आकाराने मोठ्या खोल्यांची गरज आहे का (म्हणजे मला म्हणायचे आहे की जास्त मोठ्या) कारण खोल्यांचा म्हणजे बेडरूम किंवा किचनचा आदर्श आकार किती असावा हा नेहमीच वादाचा विषय असतो. एखाद्या खोलीचा आकार किती असावा म्हणजे तो आदर्श मानला जाईल याची काही नेमकी व्याख्या नाही (ती पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक कायद्यांमध्ये आहे परंतु ती केवळ वापरण्यासाठी आहे), परंतु मला असे वाटते की घराच्या खोलीच्या आकाराचा विचार करता व्यक्तीचा दृष्टिकोन आदर्श काय हे ठरवतो किंवा त्याची व्याख्या करतो. म्हणूनच, तुम्हाला खोलीचा आकार किती हवाय हे जाणून घ्या कारण १०’६’’ रुंद व १४’ लांब आकाराची बेडरुम चांगली मानली जाते व १३’रुंद व १८’ लांब ही सुद्धा बेडरुमच असते. मी असे म्हणत नाही की अगदी लहान खोलीमध्ये राहा मात्र सर्व खोल्या एका फुटाने कमी केल्या तर तुम्हाला आणखी एक खोली जास्त मिळू शकते, जी काळाची गरज आहे असे मला वाटते.
त्याशिवाय जीवनातील सुखसोयींविषयी बोलायचे झाले, तर लॉकडाउनने आपल्याला दाखवून दिले आहे की जगण्यासाठी स्वतःची हाव पूर्ण करण्यापेक्षाही गरजा पूर्ण करणे महत्त्वाचे असते. तुम्ही चेहऱ्यावर नेहमी मास्क लावणार असाल तर तुम्ही कोणत्या ब्रँडची जीन्स घातली आहे किंवा किती महागाचे घड्याळ घातले आहे याची कुणालाही फिकीर नसते, बरोबर? म्हणूनच, विशिष्ट सुखसोयी बघण्याऐवजी, एखाद्या प्रकल्पामध्ये झाडांसह अधिक मोकळी जागा असेल, तसेच गच्चीवर ओपन जिम असेल, तसेच ती टाऊनशीप असली तर बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही सामाईक खोल्यांचा पर्याय असेल, व सामाईक कामाच्या जागा असतील तसेच वाय-फायही असेल तर या अतिशय चांगल्या व उपयोगी सुविधा ठरतील.
बांधकाम व्यावसायिकांपुढची आव्हाने यापुढे अधिक अवघड असतील हे मान्य आहे कारण प्रत्येकजण लॉकडाउनमुळे झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करेल व सरकारही त्याला अपवाद नाही व ते व्यावसायिकांच्या खिशातून जास्तीत जास्त काढून घेण्याचा प्रयत्न करेल (ते आणखी काय करू शकते). सध्या विविध शुल्कांमध्ये ५०% सवलत देऊ करण्यात आली आहे मात्र तिचा लाभ मिळवण्यासाठी विकासकांनी सदनिकांचे (घरांचे) मुद्रांक शुल्क भरावे अशी अट आहे, हे सरकारचा विचार करण्याचा दृष्टिकोन कसा आहे याचे उत्तम उदाहरण आहे. कारण सरकार जेव्हा बांधकाम व्यवसायाचा विषय येतो तेव्हा एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने काढून घेण्यात तरबेज आहे ! त्याचवेळी अधिक एफएसआय म्हणजे अधिक शुल्क, अधिक घरे व अधिक महसूल असेही सरकारला वाटते. त्यामुळे ते एफएसआयचा वर्षाव करेल मात्र त्यामुळे पुरवठा अधिक झाल्याने नफाही कमी होईल, उलाढालही कमी होऊन तिचा वेग मंदावेल हे लक्षात ठेवा, हे सर्व रिअल इस्टेटचे पैलू आहेत. आता मजुरीवरील वाढलेल्या खर्चाचीही समस्या आहे आपल्या प्रिय राज्याने (महाराष्ट्राने)लॉकडाउननंतर इतर राज्यांपेक्षा आपले दरवाजे उशीरा उघडले, तोपर्यंत मजुरांचे जथ्थे इतर महानगरांमध्ये कामाला लागले, त्यांनी फार काळ बेरोजगार राहावे अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. आता राज्यामध्ये रिअल इस्टेट उद्योगाला मजुरांची तीव्र टंचाई जाणवत आहे, विशेषतः कुशल मजुरांची. तसेच या उद्योगामध्ये घरून काम करणे शक्य नाही कारण आपण घर बांधत आहोत. विकासकांनी रिअल इस्टेटच्या या सर्व पैलूंचा विचार केला पाहिजे व घराच्या नव्या पिढीतील ग्राहकांना त्यांचे आदर्श घर कसे हवे आहे याचा विचार करून घर बांधण्याचा प्रयत्नकेला पाहिजे, बांधकाम व्यावसायिक म्हणून आपल्याला सर्वोत्तम घर काय वाटते याचा विचार करून नाही.
मी “घराचे नव्या पिढीतील ग्राहक” असा शब्द वापरा आहे, कारण ही नवीन पिढी लॉकडाउनमध्ये टिकून राहिली आहे, तिने लॉकडाउनला धीराने तोंड दिले आहे व त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. मला खात्री आहे की या प्रक्रियेमध्ये ती आधीपेक्षा अधिक शहाणी झाली आहे व हे शहाणपण ते यापुढे जे काही खरेदी करतील त्या प्रत्येक गोष्टीत दिसून येईल. एक लक्षात ठेवा घर ही सर्वात महागडी गरज असली तरी ती सर्वात महत्वाची गरज आहे आजची, मी रिअल इस्टेटमधल्या लोकांना आणखी काही सांगायला हवे का!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment