“शहरांमध्ये प्रत्येकाला काहीना काही देण्याची क्षमता असते, कारण सगळ्यांच्या प्रयत्नांमधून आणि सगळ्यांनी मिळून निर्मिती केली तरच शहरे निर्माण होतात.”...
“टीव्ही किंवा बेकायदेशीर औषधांनी नव्हे तर स्वयंचलित वाहनांनी अमेरिकी समुदायांचे प्रामुख्याने नुकसान केले आहे.”...
“एखाद्या शहरावर कोणताही तर्क लागू करता येत नाही; लोक ते निर्माण करतात व आपण योजना त्यांच्यासाठी बनवतो, इमारतींसाठी नाही.”......जेन जेकब.
वरील तिन्ही अवतरणे ही प्रस्तुत लेखाच्या विषयासाठी अतिशय योग्य आहेत, ती निवडताना हनुमानजी जसे संजीवनी वनस्पती (जीव वाचविणारी औषधी वन) शोधताना गोंधळात पडले व त्यांनी अख्खा द्रोणागिरी पर्वतच उचलून श्रीरामांकडे आणला, तशीच काहीशी माझी अवस्था झाली. जेन जेकब यांचे महानपण व नागरी नियोजनाविषयी त्यांची विचार करण्याची क्षमता यातच लपलेली आहे. आता तुमची उत्सुकता अधिक न ताणता सांगतो, या शहराला वाद अतिशय आवडतात, अगदी प्राणपणाने त्यासाठी लढा दिला जातो व आपण ज्या सातत्याने हे वाद निर्माण करतो (किंवा त्यांचा शोध लावतो असे म्हणूयात), ते पाहता मला या शहराविषयी नेहमी आश्चर्य वाटते. होय, मी आपल्या स्मार्ट पुणे शहराविषयी बोलतोय, या वादांच्या मालिकेमध्ये नव्याने भर पडलीये ती म्हणजे आपले अरुंद रस्ते, त्यांची रुंदी व त्यांचे रुंदीकरण यांची! आता तुम्ही म्हणाल की हा वादाचा विषय कसा होऊ शकतो, कारण प्रत्येक शहरात, गावात व देशात रस्ते असतात व ते त्यांचे रुंदीकरण होत असते (अर्थात आपल्या देशामध्ये रस्ते अरुंदही होत असतात), त्यामुळे त्यात काय एवढे मोठेसे? त्याचे असे आहे की हे पुणे आहे, या शहराशी किंवा त्यातल्या लोकांशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा इथे गहजब केला जातो व दुसरे म्हणजे केवळ रस्ते रुंदीकरणाचा मुद्दा नाही तर नागरी प्रश्नांविषयीच्या आपल्या दृष्टीकोनाचा आहे, यामुळे रस्ते रुंदीकरणासारख्या मुद्द्यांवरूनही गहजब होतो. जेव्हा स्मार्ट शहर योजनेचा बोलबाला होता (आता कुणाला ती आठवतेय का तरी) तेव्हा बहुतेक पुणेकरांनी शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येविषयी सर्वाधिक चिंता व्यक्त केली होती, जी थेट रस्त्याच्या रुंदीशी संबंधित आहे, जे एक मिथक आहे किंवा आपले शहर व त्याच्या समस्यांविषयी आपण किती अजाण (खरेतर अज्ञानी) आहोत याचे लक्षण आहे. सर्वप्रथम, मला सांगायचे आहे की, “रहदारीचे रस्त्यांच्या रुंदीशी काही घेणेदेणे नाही”; मी काही कुणी महान नागरी नियोजक नाही मात्र मी काही अतिशय उत्तम शहरांना भेट दिली आहे व काही महान लोकांनी नागरी नियोजनाच्यासंदर्भात केलेले काम पहिले आहे. मी गेल्या तीस वर्षांहून अधिक काळापासून या शहराचा रहिवासी आहे व त्यामुळे मी असे धाडसी विधान करू शकतो.
रहदारी किंवा रस्ते किंवा वाहने ही आपल्या शहराची समस्या नाही, रहदारीविषयीचा किंवा वाहतुकीविषयीचा दृष्टिकोन तसेच शहरात व शहराच्या बाहेर प्रवास करण्यासाठी शहरातील नागरिकांच्या खऱ्या गरजा काय आहेत याकडे “माय बाप” सरकारकडून सतत काणाडोळा (नाक, कान, मेंदूही) केला जातो ही खरी समस्या आहे. जगात आपल्यापेक्षाही मोठी व लोकसंख्येची घनता अधिक असलेली व रस्ते लहान असलेली शहरे आहेत, मात्र या शहराचा सर्वात “कच्चादुवा” म्हणजे सार्वजनिक वाहतूक. निकृष्ट सार्वजनिक वाहतुकीसोबतच वाहतूक नियंत्रण यंत्रणेसाठी, ज्यांना आपण वाहतूक पोलीस म्हणतो (जे खरेतर योग्य नाही) पुरेशा पायाभूत सुविधाही नाहीत. मी त्यांना दोष देत नाही किंबहुना जेव्हा मी पांढऱ्या गणवेशामध्ये धूर व धुळीने माखलेल्या वाहतूक पोलीसाला रस्त्यावर पुणेकरांना शांतपणे तोंड देताना पाहतो तेव्हा मला त्याची किंवा तिची दया येते, पुणेकर युद्धावर निघाल्यासारखेच वागत असतात (मी त्यांनाही दोष देत नाही). मात्र मला स्वतःला असे वाटते की त्यांचा हाच दृष्टिकोन वाहतूक नियमांच्या पालनात दिसून येतो, मग आपल्या वाहनांचे पार्किंग असो किंवा वाहन चालविणे असो किंवा आपण ज्या प्रकारे रस्त्यांचा वापर करतो ते असो. यामुळे वाहतूक पोलीस प्रवाशांच्या मनामध्ये पुरेशी भीती निर्माण करू शकत नाहीत व आपण रस्त्यांना दोष देतो. रस्त्याची किती रुंदी आदर्श मानता येईल हा वादाचा मुद्दा आहे व ६ मीटर रुंद रस्ते खरोखरच चांगले असतात का, ते पूर्वापार चालत आलेले आहेत व पूर्वी रस्ते रुंदीकरणावर तेवढाच टीडीआर तसेच एफएसआय मिळत होता, मला आत्तापर्यंत तसे करण्यात काही अडचण वाटली नाही. माझी ६ मीटर रस्त्याचे रुंदीकरण करून तो ९ मीटर करण्याला मनाई नाही, मी फक्त आपल्या सगळ्यांना काही प्रश्न विचारत आहे तसेच परिस्थितीचे विश्लेषण करायचा तसेच तोडगा शोधायचा प्रयत्न करत आहे.
सर्वप्रथम, जास्त ६ मीटर रुंद रस्त्याकडे तोंड असलेल्या इमारतींना अधिक एफएसआय किंवा टीडीआर दिल्यामुळे रस्त्यावर गोंधळ होईल तसेच वाहतुकीची कोंडी होईल असा निष्कर्ष आपण कसा काढू शकतो? या इमारतीमधील रहिवाशांना आपण त्यांची वाहने इमारतीला लागून असलेल्या रस्त्यावर लावण्याची परवानगी देणार आहोत का व असे नसल्यास या ६ मीटर रुंद रस्त्यांवर सध्या असलेल्या वाहतुकीच्या समस्यांवर आपले काय नियंत्रण आहे? आपल्याला एकीकडे परवडणारी (विनोद) घरे हवी आहेत व आपल्याला या परवडणाऱ्या घरांच्या मालकांच्या वाहनांच्या गर्दीने रस्ते गुदमरायला नको आहेत, बरोबर? आपण सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सशक्त करण्याविषयी का बोलत नाही ज्यामुळे अगदी १ बीएचके (म्हणजे लहान घर) सदनिका ग्राहकांनाही त्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार किंवा २ दुचाकी खरेदी करायची गरज नाही. त्याचप्रमाणे एक लक्षात ठेवा की, नागरी नियोजन म्हणजे केवळ काँक्रिटचे बांधकाम व रस्त्यावर धातूच्या रचना करणे नव्हे तर त्याचा संबंध लोकांशी असतो. या देशातल्या लोकांना आपल्या संपत्तीचा दिखावा करायला आवडतो, त्यामध्ये कार खरेदी करणे (म्हणजे तिची मालकी मिळवणे), ती सुद्धा मोठी कार खरेदी करणे हा अत्यावश्यक भाग असतो. तुम्ही कितीही कायदे केले किंवा सार्वजनिक वाहतूक सशक्त केली तरी लोक कार व दुचाकी खरेदी करतील जसे ते लग्नसोहळ्यात सजावट व आतषबाजीवर वारेमाप पैसा खर्च करतात.म्हणूनच मुद्दा केवळ रस्त्याची रुंदी वाढवण्याचा नाही तर आपण या लोकांना त्यांची काररूपी संपत्तीरस्त्यावर आणण्यापासून कसे रोखू शकू हा आहे. यासाठी सर्वप्रथम अतिशय उत्तम सार्वजनिक वाहतूक यंत्रणा दिली पाहिजे व दुसरे म्हणजे त्यांनी रस्त्यावर कार आणल्याच तरी त्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन (त्यांना नियमांची भीती वाटली पाहिजे) करायला लावले पाहिजे. त्यानंतर मग रस्त्याच्या रुंदीने फारसा फरक पडणार नाही असा माझा तर्क आहे.
त्याचवेळी केवळ वाहने व सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याविषयीच नाही तर आपल्याला रस्ते व पदपथाचा वापर कसा करायचा हे देखील माहिती असले पाहिजे. पुण्याच्या (खरेतर या देशातील कोणत्याही शहरातील) रस्त्यांच्या बाबतीत विरोधाभास म्हणजे ते रुंद असतील तर रहदारीव्यतिरिक्त इतर सर्व बाबींसाठी वापरले जातात व जेव्हा ते अरुंद असतात तेव्हा अगदी वाहनांसाठीही जागा नसते. म्हणूनच आपण वाहतुकीच्या गैर व्यवस्थापनाविषयी बोलत आहोत व त्याचे रस्त्याच्या रुंदीशी काहीही घेणे देणे नाही. आपल्याकडे अनेक वर्षे ६ मीटर व ९ मीटर रुंद रस्चे होते. आता आपल्याला ३० मीटर रुंद रस्ते आहेत ज्यावर रहदारीच्या वेळेत वाहतुकीची कोंडी होते. असे असताना या रस्त्यांसाठी आणखी एफएसआय का द्यायचा? आपण आपल्या रस्त्यांचा वापर कसा करतो याविषयी आपण कधी काळी केलेल्या अभ्यासांविषयी तथाकथित नियोजनकर्ते व सरकारला प्रश्न विचारण्याची वेळ आता झाली आहे. काही रस्ते रुंद केल्यानंतर किंवा अशा काही रुंद रस्त्यांवर थोडा टीडीआर देऊन त्यांना नेमका काय परिणाम अपेक्षित आहे असे त्यांना विचारले पाहिजे.
शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा, आपण ज्यांचे रुंदीकरण करणार आहोत त्या अरुंद व रुंद रस्त्यांच्या कडेने असलेल्या झाडांचे काय, आपण पहिल्यांदा रस्ते बांधायला सुरुवात केली तेव्हापासून ही झाडे आहेत. ती आपणहून बाजूला होऊ शकत नाहीत म्हणून आपल्याला ती तोडावी लागतील व नवीन झाडे उगवायला व आपल्याला त्यांची सावली व ऑक्सिजन मिळायला अनेक दशके लागतील. मात्र तोपर्यंत आपल्याला श्वासातून कशी हवा मिळेल, याचा विचार आपण केला आहे का? लोकहो, आपण केवळ कारचा विचार केला तर आपण रस्ते व उड्डाणपूल बांधू. आपण आता लोक, झाडे व पक्ष्यांचा विचार केला पाहिजे. कदाचित त्यानंतर आपण अशा एका शहराचे स्वप्न पाहू शकू ज्यामध्ये आपण केवळ ६ मीटर किंवा ९ मीटरच्या रस्त्याविषयी वादविवाद करणार नाही तर चांगले आयुष्य व वाईट आयुष्य याविषयी चर्चा करू.लोकहोतोपर्यंत भांडत राहा, जर तुम्हाला तोच स्मार्टपणा वाटत असेल!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment