“सृजनशील असणे म्हणजे जीवनावर
प्रेम करणे. तुम्हाला जीवनाचे सौंदर्य वाढवावेसे वाटावे, तुम्हाला त्यामध्ये थोडे अधिक संगीत आणावेसे वाटावे, त्यात थोडेसे आणखी काव्य आणावेसे वाटावे, त्यात थोडेसे नृत्य आणावेसे वाटावे एवढे जीवनावर पुरेसे प्रेम करत असाल तरच
तुम्ही सृजनशील असू शकता.” … ओशो
तुम्ही या माणसाचा द्वेष करत असाल किंवा तुम्हाला तो
कदाचित अजिबात आवडत नसेल, परंतु हा माणूस जेव्हा विशेषतः जगण्याविषयी किंवा
एकंदरित आयुष्य जगण्याविषयी बोलतो तेव्हा त्याच्या तर्काशी आपण असहमत होऊ शकत नाही
(अर्थात बरेच जण हे उघडपणे मान्य करत नाहीत). जेव्हा मी डॉ. आर्किटेक्ट बालकृष्ण
म्हणजे बीव्ही दोशी यांना आदरांजली वाहणारा हा लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा
ओशोचे हे शब्द माझ्या मदतीला धावून आले. कारण मी बीव्हीडी सरांचे शब्दही वापरू
शकलो असतो (मी खरोखरच सांगतो त्यांची अनेक अवतरणे वापरण्यासारखी
आहेत) तरीही त्यांचा स्वभाव कसा होता हे माहिती असल्याने (त्यांना
भेटण्याची जी काही संधी मिळाली त्यातून) त्यांना दुसऱ्या कुणाचे विद्वत्तापूर्ण शब्द वापरले
असते तर अधिक आनंद झाला असता कारण त्यांनाही ते अतिशय आवडायचे. मी बीव्ही दोशी
सरांना (बीव्हीडी असे संक्षिप्त स्वरूप वापरेन) मिळालेले मानसन्मान किंवा
त्यांच्या कार्याविषयी लिहीण्यात फारसा वेळ घालवणार नाही,
ज्यांना हा लेख वाचण्यात रस असेल त्यांच्यापैकी
बहुतेकांना माझ्यापेक्षाही त्यांच्याविषयी जास्त माहिती असेल आणि ज्यांना
डॉ. बी. व्ही. दोशी कोण आहेत हे माहिती नसेल किंवा ते केवळ एक आर्किटेक्ट होते
एवढेच जाणतात त्यांच्यासाठी सांगतो,तुम्ही गूगलवर त्यांच्या कार्याविषयी वाचू शकता. कारण
काही नावे किंवा काही कामगिरी अशी असते की केवळ एखादी मूर्ख व्यक्तीच त्यांच्या
यशाचे मोजमाप, प्रमाण किंवा
पैसे किंवा तत्सम गोष्टींनी करू शकेल. अर्थात लाईक्स आणि रिट्वीटच्या आकड्यांवर यश
मोजणाऱ्या या युगात, तुम्ही आणखी
कशाची अपेक्षा करू शकता, त्यामुळे हरकत
नाही. तरीही काही पुरस्कारांचे
स्वतःचे वेगळे मोल असते कारण ते काळाच्या परीक्षेतही टिकून राहिलेले असतात व
म्हणूनच अशाच प्रकारची उत्तम कामगिरी करणाऱ्या इतर व्यक्तींकडून त्यांना आदराचे
स्थान मिळते. बालकृष्ण दोशींना मिळालेला असाच एक पुरस्कार म्हणजे
२०१८ चा प्रित्झकर पुरस्कार, जो
आर्किटेक्चर क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानला जातो. मी असे म्हणेन की बीव्हीडींना
हा पुरस्कार अंमळ उशीराच मिळाला, कारण
त्यांचे या क्षेत्रातील योगदान एवढं महान आहे
की त्यांना हा पुरस्कार जवळपास ३५ वर्षे आधी मिळायला
हवा होता.
असेही या देशामध्ये आर्किटेक्चर हा नेहमी केवळ एक
व्यवसाय मानला गेला व त्यातील व्यक्तींना कलेच्या भागासाठी कधीही आदर मिळाला नाहीव याचे मुख्य
कारण म्हणजे बहुतेक आर्किटेक्ट घरांची (म्हणजे सामान्य माणसासाठी) रचना करतात व
बांधकाम व्यावसायिकांशी संबंधित कशालाही केवळ एकाच गोष्टीमुळे ओळख मिळते व ते
म्हणजे पैसे कमावणे व त्यांना कधीही खरा आदर मिळत नाही. नेमक्या याच कारणामुळे श्री. बालकृष्ण दोशी
यांच्यासारख्यांच्या निर्मितींचा खऱ्या अर्थाने आदर केला गेला नाही, ते कोणत्याही
पाश्चिमात्य किंवा पौर्वात्य देशामध्ये असते तर ते आत्तापर्यंत अतिशय प्रसिद्ध
व्यक्ती झाले असते. परंतु बालकृष्ण
दोशी या सगळ्याच्या पलिकडचे होते, त्यांच्या सृजनशील विचारांविषयी पूर्णपणे आदर राखत
असे सांगावेसे वाटते की त्यांना चांगली व्यावसायिक जाणही होती. त्यांच्या मूळ
ठिकाणाचा म्हणजेच गुजरात हा प्रभाव असावा, कारण व्यवसाय तिथल्या बहुतेकांच्या रक्तातच आहे, त्यामुळे काही
हरकत नाही.आणि, कलाही विकाऊ
नसली तरीही याचा अर्थ असा होत नाही की ती मोफत किंवा फुकट मिळेल,
जो बहुतेक लोकांचा गैरसमज झालेला असतो. श्री बालकृष्ण
दोशी यांना त्यांच्या कलेचे मूल्य समजले होते व ते कधीही त्याबाबत तडजोड करत नसत.
यातून त्यांच्यातील कलाकाराची ताकद दिसून येते, कारण ज्या व्यवसायाला कायम व्यवस्थेपुढे गुडघे टेकावे लागतात (म्हणजे बांधकाम
व्यावसायिक, सरकार,
ग्राहक इत्यादी), त्यामध्ये ते त्यांच्या निर्मितीबाबत ठाम असत व हे
बहुतेक आर्किटेक्टसाठी जवळपास अशक्य असते, हे मी पाहिले आहे. यासंदर्भात मला साहीर लुधायान्वी यांची आठवण येते (ते
कवी व बॉलिवुडमधील गीतकार होते) जे गायक, संगीतकार यांच्यापेक्षा एक रुपया जास्त शुल्क त्याचा मोबदला म्हणून
आकारत असत. कारण
कोणतेही गीत लोकप्रिय होण्यासाठी त्यांचे शब्द सर्वात महत्त्वाचे असतात हे त्यांचे मत होते म्हणूनच
म्हणजे प्रत्येक गीतावरील मोबदल्याबाबत
त्यांच्या सहकलाकारांपेक्षा त्यांचे शुल्क नेहमीच
जास्त असे. श्री.बालकृष्ण दोशी त्यांच्या शुल्काबाबत फारसे आडून बसत नसत,
मात्र एका बाबतीत त्यांचे मत अगदी स्पष्ट होते ते
म्हणजे आर्किटेक्ट म्हणून त्यांनी रचलेली प्रत्येक इमारत ही त्यांची निर्मिती आहे
किंवा बाळ आहे व संबंधित रचनेविषयी कोणताही निर्णय घेण्याचा पहिला अधिकार त्यांचा
असेल व कोणताही आर्किटेक्ट असे करायला धजावणार नाही, यावरूनच ते त्यांच्या क्षेत्रात किती महान होते हे
दिसून येते.
मी स्वतः एक अभियंता आहे व बांधकामाच्या ठिकाणी
अभियंता, आर्किटेक्ट व इतर संबंधित व्यावसायिकांमध्ये नेमका बॉस कोण याबाबत कायम रस्सीखेच सुरू असते. श्री. बालकृष्ण दोशी यांना,
सुमारे २८ वर्षांपूर्वी भेटेपर्यंत (मी तेव्हा बराच तरूण होतो),
मला असे वाटायचे की माझ्या बांधकाम स्थळी मीच बॉस
आहे. परंतु बालकृष्ण दोशींना भेटल्यानंतर माझा दृष्टीकोन बदलला. जसे हे माझे
बांधकामा आहे, तसेच ते त्याच्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे
बांधकाम आहे तरीही अंतिम शब्द हा आर्किटेक्टचाच असला पाहिजे जो त्या वास्तूची (म्हणजे प्रकल्पाची किंवा बांधकामाची) रचना करतो, हे मला शिकायला
मिळाले. श्री. बालकृष्ण दोशींचा हा २४ जानेवारी च्या
सकाळी माझ्यावर झालेला परिणाम आहे व म्हणूनच मला त्यांना
आदरांजली वाहावी असे वाटले. “श्री. बालकृष्ण दोशी यांचे आज अहमदाबादमध्ये निधन
झाले”, असे मला काही सामाईक मित्रांकडून
वॉट्सॲप संदेश मिळाले.
माझा दोशी सरांसोबतचा प्रवास व त्यांच्याकडून जे काही शिकायला मिळाले यांचा जवळपास
२८ वर्षांतील आठवणींचा पटच डोळ्यांसमोर तरळला. “बांधकामाच्या ठिकाणाला वारंवार भेट द्या;
ते काय सांगते
आहे हे संयमाने ऐका”, असे ते बांधकाम स्थळाशी संबंधित तरुणांना आवर्जून
सांगत व या एका वाक्यातूनच त्यांचा वेगळेपणा तुम्हाला दिसून येतो.बहुतेक आर्किटेक्टना
त्यांचे काम किंवा बांधकाम स्थळाशी नाते हे त्यांच्या ड्राईंग्जमार्फतच असते,
प्रत्यक्ष फारसा संबंध नसतो असे वाटते. परंतु
बीव्हीडी वेगळे होते कारण त्यांना बांधकामस्थळी जायला अतिशय आवडायचे. म्हणूनच
त्यांनासिमेंट, काँक्रिट, स्टील, लाकूड, भिंती यासारख्या निर्जीव
गोष्टींची भाषा समजू शकत होती. या सगळ्या गोष्टी सजीव आहेत असा त्यांचा विश्वास
होता आणि तो असेल तरच तुम्ही खऱ्या अर्थाने रचना करू शकता व एक इमारत बांधू शकता
जी सजीव असेल, घराच्या बाबतीत
हे किती खरे आहे. या पार्श्वभूमीवर मी जेव्ही बालकृष्ण दोशी यांना सवाई गंधर्व
स्मारकाच्या बांधकामासाठी भेटलो तेव्हा त्यांनी केवळ संगीतवरील प्रेम व संगीत
क्षेत्रातील दिग्गज श्री. भीमसेन जोशी यांच्याबद्दल असलेल्या आदरापायी केवळ १
रुपया शुल्क घेऊन त्याची रचना करण्याचे मान्य केले. मी या कामासाठी अतिशय उत्साहात
होतो मात्र श्री बालकृष्ण
दोशी यांनी मला थंडपणे सांगितले की मी एका अशा अभियंत्यासोबत काम करणार नाही जो
बांधकाम व्यावसायिकांचा अभियंता आहे, कारण मला त्यांच्या इमारती बांधता येतील असा त्यांना विश्वास नाही. मला, उघडपणे तोंडावर
एवढा अपमान सहन करायची सवयच नव्हती, मी म्हणालो, आम्हाला एक संधी द्या व त्यानंतर ठरवा. तरीही,
ते मला त्यांच्या यशदा संकुलाच्या सुरू असलेल्या
बांधकाम स्थळी घेऊन गेले व त्यांना कशाप्रकारचे काम अपेक्षित आहे हे मला समजून
सांगितले. तसेच मला इशाराही दिला की ते कंत्राटदारांचे नुकसान करण्यासाठीही प्रसिद्ध आहेत,
कारण एखादे काम अचूक झाले नसेल,
म्हणजे त्यांनी जसे सांगितले आहे तसेच झाले नसेल तर
ते सरळ त्याला ते तोडायला लावत. आर्किटेक्ट बालकृष्ण दोशींसोबतच्या माझ्या या काही
सुरुवातीच्या आठवणी आहेत. ते म्हणजे आर्किटेक्चर, बांधकामाचीच नव्हे तर जीवनाचीही चालती बोलती शाळा
होते याची मला नंतर जाणीव झाली. आम्ही केवळ सवाई गंधर्व स्मारकाची इमारत पूर्णच
केली नाही तर आम्हाला त्यावर्षी सर्वोत्तम काँक्रिटच्या इमारतीचा पुरस्कारही
मिळाला व याचे श्रेय पूर्णपणे बालकृष्ण दोशी यांना जाते. आम्ही केवळ त्यांच्या
सूचनांचे पालन केले. त्या बांधकामातली गुंतागुंत तुम्हाला समजावी म्हणून सांगतो,
पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागात तोपर्यंत
ऑटोकॅडवर काम सुरू झालेले नव्हते व सर्व योजना कागदोपत्री सादर कराव्या लागत. त्या
इमारतीमधील रचना , अशी काही होती
की संबंधित अधिकारी गोंधळात पडले होते की एफएसआयच्या निकषांप्रमाणे याचे चटई
क्षेत्र कसे काढायचे कारण त्यातील काहीही सामान्य स्वरूपाचे नव्हते. विचार करा हि इमारत प्रत्यक्ष साकार करताना काय झाले असेल. परंतु
बालकृष्ण दोशींनी बांधकाम स्थळी ते सगळे अतिशय सोपे वाटावे अशाप्रकारे ते केले,
हाच त्यांचा मोठेपणा होता. त्यानंतर जवळपास सहा वर्षांनी मला पुन्हा एकदा बालकृष्ण दोशींच्या शाळेत
शिकण्याची संधी मिळाली व यावेळी ते एका बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्पासाठी होते
ते म्हणजे, डीएसके विश्व. त्यावेळी म्हणजे २००० साली,
जवळपास ५००० सदनिकांच्या प्रकल्पाचा विचार करणे
कल्पनेपलिकडचे होते. जेव्हा तो प्रकल्प बांधण्याचा निर्णय झाला तेव्हा श्री.
बालकृष्ण दोशी यांच्याशिवाय या कामासाठी दुसऱ्या कुणाचे नाव येऊ शकले असते. पुन्हा
एकदा, या प्रकल्पामध्ये मी बांधकामाचा प्रभारी होतो,
बालकृष्ण दोशींनी मला अहमदाबादमध्ये त्यांच्या “संगथ” नावाच्या आर्किटेक्चर विद्यालयात येऊन राहायला
सांगितले. तिथे मला इमारतींविषयी किती कमी माहिती आहे हे मी शिकलो. या
महिनाभराहून अधिक काळात (माझ्यासोबत माझे मित्र प्रकाश कुलकर्णी होते, जे स्वतः आज या
व्यवसायातील मोठे नाव आहेत) मला स्वतः बालकृष्ण देशमुखांकडून शिकण्याचे भाग्य
मिळाले व त्यामध्ये केवळ इमारतीच नव्हे तर आयुष्याविषयीच्या प्रत्येक गोष्टीचा
समावेश होतो. आम्ही त्यांनी रचना केलेल्या आयआयएम अहमदाबाद,
तसेच इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन यासारख्या इमारती
पाहिल्या, आम्ही त्यांच्या कामाविषयी बोललो. त्यांनी मला
सांगितले की आपण कोणत्याही इमारतीचे नियोजन करण्यापूर्वी जीवन समजून घेणे किती
महत्त्वाचे आहे, तरच आपण ज्या
उद्देशाने त्या बांधत आहोत त्यासाठी उपयोगी होतील अशा सर्वोत्तम इमारतींची रचना
करू शकू. त्याचसोबत आम्ही,
नियोजनाच्या प्रत्येक पैलूविषयी,
जागेचा वापर याविषयी बोललो व मला तुम्हाला सांगावेसे
वाटते की ते त्यांनी अतिशय नम्रपणे मान्य केले की त्यांना एफएसआय ही संकल्पना कधीच
समजली नाही. त्यामुळेच बांधकाम व्यावसायिकांमध्ये त्यांचे यशस्वी म्हणून नाव
नव्हते किंवा त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही तसेच डोळ्यांना आकर्षित करतील अशा
इमारतींची रचना करण्यावर त्यांचा विश्वास नव्हता.त्याऐवजी त्यांचे म्हणणे होते की, "तुम्हाला
असे काहीतरी का बांधायचे आहे की जे भोवतालापेक्षा वेगळे दिसेल व अशा गोष्टीला
तुम्ही घर कसे म्हणू शकता असा प्रश्न त्यांनी मला विचारला. मी माझ्या
वन्यजीवनाच्या अनुभवामुळे याच्याशी सहमत आहे, त्यांनी मला विचारले की तू जंगलात अशी झाडे पाहिली
आहेत का जी इतर झाडांपेक्षा वेगळी आहेत व पक्ष्यांनी त्यावर घरटे बांधले आहे,
तर असे कधीच होत नाही. कारणअसे झाले तर शिकारी
पक्ष्यांना अशी घरटी शोधणे सोपे जाईल. बालकृष्ण दोशी म्हणत की निसर्गामध्ये अशी कोणतीही
रचना केली जात नाही जी वेगळी उठून दिसेल. आपल्याला म्हणजे माणनांच इतरांपेक्षा
वेगळे दिसायचे असते व या प्रक्रियेमध्ये आपण सगळेकाही बिघडवून टाकतो,
म्हणजे अगदी आपल्या इमारतीही,
हे त्यांचे तत्वज्ञान होते.
डीएसके विश्वनंतर दुर्दैवाने मी बीव्हीडी नावाच्या
शाळेमध्ये फार काळ राहू शकलो नाही परंतु मी जे काही शिकलो ते माझ्यासोबत
कायमस्वरुपी राहिले व अगदी गेल्या महिन्यापर्यंत म्हणजे डिसेंबर २२ पर्यंत वॉट्सॲपवर होणारी
देवाणघेवाण किंवा कॉलद्वारे लांब राहूनही शिकण्याची ही प्रक्रिया सुरू होती. श्री
बालकृष्ण दोशी वेगळे होते, मात्र त्यांना
तसा उल्लेख केलेला आवडला नसता, कारण
ते अगदी साधे आहेत व पर्यावरणाचाच एक भाग आहेत असेच त्यांना वाटे. त्यांच्याकडून
केवळ नियोजन किंवा बांधकामा विषयीच
नाही तर तुम्ही स्वतःला कसे सादर करावे याविषयीही बरेच काही शिकण्यासारखे होते. हे
देखील महत्त्वाचे होते कारण काही वेळा ते फटकळपणे किंवा इतके सरळसोटपणे बोलत असत
की तो उद्धटपणा वाटावा. परंतु तो केवळ ज्ञान किंवा अनुभवामुळे आलेला नव्हता तर
त्यांच्या कामावरील प्रेमातून आलेला होता, हा सर्वात मोठा फरक आपण समजून घेतला पाहिजे. त्यांचे
त्यांच्या कामावर इतके प्रेम होते की अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी वेळप्रसंगी
नुकसानही होऊ देण्याची त्यांची तयारी असायची. मात्र त्याचवेळी या प्रक्रियेमध्ये
लोक दुखावले जाणार नाहीत याची काळजी घेण्याइतके व्यावसायिकही होते, यालाच मी
व्यवसाय व आवड यांचा समतोल साधणे असे म्हणतो. आजकालच्या जगात वेडगळ गोष्टी करून
इतरांपेक्षा वेगळे दिसण्याची धडपड करून लोक लाखो लाईक्स मिळवतात (इन्स्टा तपासून
पाहा), अशावेळी बालकृष्ण दोशींसारख्या व्यक्ती दुर्मिळ
प्रजातीच म्हटल्या पाहिजेत ज्यांना त्यांची निर्मिती कुणाच्याही नजरेत भरू नये असे
वाटते परंतु खरेतर निसर्गाची तीच गरज असते. आणि आपले काम तसेच जीवनाप्रती हाच दृष्टिकोन जिवंत ठेवणे
हीच बालकृष्ण देशमुखांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल! श्री.
बालकृष्ण दोशी तुम्ही तुमच्या जीवनाच्या शाळेत मला प्रवेश दिल्याबद्दल तुमचे आभार.
त्यामुळेच मी जी काही निर्मिती करतो (केवळ बांधकाम करत नाही) त्याचा मला अभिमान
वाटतो व मी जे निर्माण केले आहे ते सर्वोत्तम नसले तरी मी सर्वोत्तम निर्मिती
करायचा प्रयत्न केला म्हणून त्याबाबत ताठ मानेने ठाम राहू शकतो.आता देव नक्कीच
आनंदी असतील व विश्वकर्मा घाबरला असेल, कारण त्याच्या निर्मितीवर देखरेख करायला तुम्ही
स्वर्गात आहात !
संजय देशपांडे
संजीवनी
डेव्हलपर्स
ईमेल आयडी - smd156812@gmail.com
संपर्क : 91 - 9822037109
No comments:
Post a Comment