Monday 11 March 2024

 

ताडोबा नावाची सुसंस्कृतपणाची जंगल शाळा !









ताडोबा नावाची सुसंस्कृतपणाची जंगल शाळा !

तुम्ही जेव्हा केवळ जंगलामध्ये जाता तेव्हा तुम्हाला वन्य प्राणी किती सुसंस्कृत आहेत व आपण माणसे प्रत्यक्षात किती असंस्कृत आहोत हे समजते”…

         मी जेव्हा ताडोबामध्ये तळपत्या उन्हात, धुळ उडणाऱ्या रस्त्यांवर होतो तेव्हा माझ्या मनात हा विचार आला (म्हणजे पुन्हा एकदा आला). तुम्ही असा विचार करत असाल की आपल्या मानवजातीवर ही अचानक टीकेची झोड का, तर दरवेळी मी जेव्हा जंगलांना भेट देतो तेव्हा तिथे काहीतरी नवीन शिकायला मिळते. किंबहुना ते माहिती असते, परंतु मला ते दरवेळी नवीन प्रकारे समजले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही व हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकते, आपण केवळ ज्या जंगलाला भेट देत आहोत त्याच्याशी एकरूप व्हावे लागते. आपल्या काँक्रिटच्या जंगलात तुम्हाला केवळ घोटाळे, फसवणूक, रस्त्यावर हिंसक मारामाऱ्या, अंमली पदार्थ, महिलांवरील अत्याचार (अलिकडेच आलेल्या एका बातमीमध्ये झारखंडमध्ये आपल्या देशामध्ये पाहुण्या म्हणून आलेल्या एक आंतरराष्ट्रीय महिला पर्यटकावर बलात्कार करण्यात आला), त्याचशिवाय रस्त्यावरील अपघातामध्ये वन्य प्राण्यांचा मृत्यू, तसेच वन्यजीवांच्या अधिवासावर सतत सुरू असलेले अतिक्रमण याविषयी बातम्या येत असतात. परंतु कुणीही त्याविषयी एक अवाक्षरही बोलत नाही किंवा त्याविरुद्ध आवाज उठवत नाही; आपण याला शहाणपण किंवा सुसंस्कृतपणाचे लक्षण मानू शकतो का, तर याचे उत्तर नाहीअसेच आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण, इतर माणसे चुकीच्या गोष्टी करत असल्याचे ऐकतात, पाहतात, परंतु आपण त्या गोष्टीचा भाग नाही असे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व पुढे चालू लागतो. माणसाची ही कृती असंस्कृतपणाची आहे असे मी म्हणेन. जंगलामध्ये जेव्हा एखादे माकड किंवा सांबर हरिण किंवा चितळ, जे वाघाचे सावज असते त्यांना आजूबाजूला वाघ असल्याचे जाणवताच त्यांच्या विशिष्ट आवाजात इतर प्राण्यांना इशारा देऊन तिथे वाघ म्हणजे धोका असल्याचा कळवतात व त्यांचे प्राण वाचविण्यास मदत करतात. जोपर्यंत वाघ त्यांच्या नजरेसमोरून लांब जात नाही तोपर्यंत ते सावधानतेचे इशारे देत राहतात व खरेतर इथे वाघाची बाजूही चूक नसते कारण वन्यप्राण्यांची शिकार करूनच तो स्वतःचे पोट भरू शकतो. तरीही इतर वन्य प्राण्यांसाठी तो धोका असतो व ते त्याच्याविरुद्ध आवाज उठवतात. प्रत्यक्षात जेव्हा एखादे सांबर किंवा चितळ किंवा माकडाला वाघ आजूबाजूला असल्याचे जाणवते तेव्हा ते एकटे असतात, ते सहजपणे पलायन करून स्वतःचा जीव वाचवू शकतात. परंतु तरीही ते इतर प्राण्यांना इशारा देण्याचा धोका पत्करतात. याचे कारण म्हणजे त्यांना माहिती असते की आज त्यांना वाघ आधी दिसला आहे परंतु उद्या दुसऱ्या एखाद्या हरिणाला वाघ आधी दिसू शकतो व एकमेकांना सावधानतेचा इशारा देऊनच ते सुरक्षित राहू शकतात!

      लोकहो, दररोज आपल्या शहरातील रस्त्यांवर आपल्याला एखादे वाहन लाल सिग्नल तोडताना दिसते, काही गुंड रस्त्यांवर शाळकरी मुलींची छेड काढत असतात, कुणीतरी रस्त्यावर ड्रग्ज सारख्या चुकीच्या वस्तु विकत असतात किंवा परवानगी शिवाय झाडे कापण्यासारखी गैरकृत्ये करत असतात, परंतु आपण त्याविरुद्ध काहीही आवाज उठवित नाही वा इशारा देत नाही व केवळ आपल्या स्वतःच्या आरामाचा विचार करतो व विसरून जातो की उद्या कदाचित आपण अशा गैरकृत्यांचे बळी ठरू. त्यावेळी आपल्याला कुणीतरी आधी इशारा दिला असता तर आपण वाचलो असतो परंतु आज जर आपण अशा गैरकृत्यांविरुद्ध आवाज उठवला असता तरच ते शक्य झाले असते, बरोबर? मी अलिकडेच ताडोबाला जाऊन आलो, या दौऱ्यात मला या गोष्टीची जाणीव झाली. आम्ही एका पाणवठ्यावर भर दुपारच्या उन्हामध्ये वाट पाहात होतो, मध्य भारतातील उन्हाळ्याची सुरुवात होती. आश्चर्य म्हणजे या पाणवठ्याव्यतिरिक्त आजूबाजूच्या भागात कुठलाही पाणवठा नसूनही इथे एकही प्राणी नव्हता. याचाच अर्थ असा होता, की जवळपास कुठेतरी वाघ होता ज्याची जाणीव हरिण व माकडांना झाली असावी, त्यामुळेच ते पाणवठ्यापासून चार हात लांब होते. आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला व आम्हाला पाणवठ्याच्या बांधाच्या भिंतीमागून एका सांबर हरिणाचा अलार्म कॉल म्हणजेच इशारा ऐकू आल्याने आमच्या निर्णयाची खात्रीच झाली. सांबर हरिणाचा इशारा (धोका असल्याचे कळविण्यासाठी प्राणी करत असलेला एक विशिष्ट आवाज) आजूबाजूला हिंस्र प्राणी असल्याची खात्रीच असते, कारण ते जोपर्यंत वाघ किंवा बिबट्या प्रत्यक्ष पाहात नाही तोपर्यंत ते धोक्याचा इशारा देत नाही. परंतु यावेळी त्याने दोनदा इशारा दिला व त्यानंतर सर्व काही स्तब्ध होते. याचा अर्थ सांबर हरिणाने वाघ पाहिला परंतु तो झोपलेला असावा त्यामुळे सांबराने इशारा देणे थांबवले परंतु तो पाणवठ्यावर आला नाही व आम्ही वाट पाहायचे ठरवले. आम्ही जवळपास तासभर वाट पाहिली व ज्याप्रमाणे ताडोबाच्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची वाफ होऊन जाते, त्याप्रमाणे इतर जिप्सींचा संयम विरून गेला व बहुतेक वाहने दुसरीकडे शोध घेण्यासाठी (अर्थातच वाघाचा) इतस्ततः पांगली. परंतु आम्ही जंगलातील दुनियेच्या संस्कृतीवर (सांबराच्या इशाऱ्यावर) विश्वास ठेवायचा निर्णय घेतला व अचानक पाणवठ्याच्या बांधाच्या भिंतीवर वाघाचे डोके दिसू लागले, परंतु त्यावेळी कुणा प्राण्याने इशारा दिला नाही कारण तोपर्यंत सर्व हरिणे निघून गेली असावीत. त्यानंतर, वाघ एका तासाहून अधिक काळ पाण्यात निवांत पहुडला होता. इथेही तो जोपर्यंत पाणी पीत नाही व तीन ते चार वेळा जांभया देत नाही तोपर्यंत तो पाण्यातून उठणार नाही ही वाघाची सवय आहे व आम्ही ते होईपर्यंत वाट पाहिली. दीड तासानंतर वाघ पाणी प्यायला व त्याने जांभई दिली व तो पाण्यातून उठून बसला व पोहत आमच्या दिशेने येण्यास सुरूवात केली व अचानक आमच्या अवतीभोवती प्राण्यांचे इशारे देणारे आवाज ऐकू येऊ लागले, कारण आता धोक्याची हालचाल सुरू झाली होती, जंगलातील जीवनाचे एक अतिशय सुसंस्कृत दृश्य आम्ही अनुभवले!

     २०२४ या वर्षाची सुरुवात अशाप्रकारे झाली व जंगलामध्ये वर्षातील पहिल्या सहलीसाठी ताडोबापेक्षा दुसरी अधिक कोणती जागा चांगली होऊ शकली असती व आम्ही कोलारा प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. यातील सर्वोत्तम गोष्ट अशी होती की, गेल्या संपूर्ण वर्षभरात जंगलातील सहलींदरम्यान, प्रत्येक वेळी किमान एक दिवस तरी पाऊस पडला होता. यावेळी आकाश निरभ्र होते, परंतु जेव्हा मी ताडोबाला पोहोचलो तेव्ही तीन दिवस ते तसेच राहिले हा एक शुभशकून होता, हाहाहा. मी निसर्ग देवतेला दोष देत नाही व मला पावसातही जंगलात जायला आवडते. परंतु वरून झाकलेल्या जिप्सीमध्ये बसल्यावर, वन्यजीवनाचा आनंद घेणे थोडे अवघड होते, ही वस्तुस्थिती आहे. या सहलीतही नेहमीप्रमाणेच चढ-उतार होते, तसेच काही वेळा अगदी काही मिनिटे नशीबाने मेहेरबानी केल्यामुळे काही विशेष दृश्ये (जंगलामध्ये प्रत्येक मिनिट विशेष असतो) पाहायला मिळाली ज्यामध्ये ताडोबातील काळ्या बिबट्याचा समावेश होता. या सहलीतील आणखी काही अनुभवही आज सांगणार आहे

काळा रंगही तुमच्यासाठी नशीबवान असू शकतो...!!‍

सकाळच्या गारठ्यात, संपूर्ण जंगलात नीरव शांतता पसरलेली होती व तेवढ्यात बाजूच्या बांबूच्या वनातून एका सांबर हरिणाचा इशारा देणारा आवाज ऐकू आला, मला बाथरूमला जायचे होते म्हणून ताडोबा केंद्रात गेस्टरुमची सोय असल्याने आम्ही ज्या दिशेने हरिणाचा इशारा आला होता त्या मार्गाने तिकडे जायचे ठरवले व वळणावर आम्हाला एक काळा ठिपका रस्त्यावरून चालत येताना दिसला. तो ताडोबातील ब्लॅकी म्हणून ओळखला जाणारा काळा बिबट्या होता. इथे चालकाचा अनुभव महत्त्वाचा ठरतो, कारण त्याने उत्साहाच्या भरात थोडा वेग वाढवला त्यामुळे बिबट्यासारखा लाजाळू प्राणी लगेच सावध झाला व रस्त्यालगतच्या दाट झाडीत नाहीसा झाला, परंतु तरीही आम्ही त्याला पाहू शकलो ही अतिशय भाग्याची गोष्ट होती. जंगलामध्ये कधीही तुमच्यासमोर बिबट्या, कस्तुरी मांजर किंवा अस्वल असे प्राणी आले तर जिप्सी जिथे असेल तिथे थांबवा, लांबून छायाचित्रे घ्या व त्यानंतर हळूहळू थोडे जवळ जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे अशाप्रकारे तुम्हाला किमान काही छायाचित्रे तरी मिळतात. याचे कारण म्हणजे हे प्राणी वाघासारखे नसतात ज्याला तुमच्या आजूबाजूला असण्याने काही फरक पडत नाही व तो चालत राहतो, हे प्राणी वाहनांची चाहुल लागताच झुडपात लपुन बसतात. मी ताडोबामध्ये गेल्या तीन वर्षांपासून हा काळा बिबट्या असल्याचे ऐकून होतो व मी गेल्या तीन वर्षात जवळपास दहावेळा तरी ताडोबाला भेट दिली असेल, तरीही तो दिसण्यासाठी आजचा दिवस उजाडावा लागला, जंगलातील सगळे अशाचप्रकारे चालते!

वाघाच्या वेगवेगळी मनस्थिती !

    संध्याकाळ आधीच उलटून गेली होती व आम्ही नवेगाव प्रवेशद्वाराच्या समोर होतो व आमच्यासमोर वन विभागाचे एक वाहन होते, एक नुकताच वयात आलेला वाघ, निर्धास्तपणे रस्त्याच्या मधोमध बसला होता. रेंज वन अधिकाऱ्यांनी आमचे कॅमेरे पाहिले (व आमच्या चेहऱ्यावरची काळजी पाहिली) व त्यांची गाडी कडेला घेतली व आम्हाला उदारपणे पुढे जाऊ दिले. या दृश्यावर नजर ठेवून मी वाघ कॅमेऱ्याकडे बघत असल्याचे एक छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला परंतु वाघ त्याच्याच तंद्रीत होता. मी छायाचित्र काढत राहिलो व जेव्हा मी थांबण्याचा विचार केला व मागे वळलो, तेव्हा त्याने आमची इच्छा पूर्ण केली व थेट कॅमेऱ्यात पाहिले व मला हवे असलेले छायाचित्र घेता आले. त्याने कॅमेऱ्यामध्ये पाहण्यापूर्वी त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून एक नजर माझ्याकडे पाहिले तेव्हा ते दृश्य अतिशय अद्भूत होते, जणू काही तो मला जे छायाचित्र हवे होते त्यासाठी चिडवत असावा. वाघ हा असा असतो, आपल्या नव्हे तर त्याच्या स्वतःच्या नियमांप्रमाणे जगणारा...!

     या छायाचित्रांसह अशा कितीतरी गोष्टी मी परत घेऊन आलो. माझ्या सहलीनंतर वन्यजीवनाविषयी काही रोचक घटना मी अनुभवल्या ज्या मी इथे देत आहे. फेसबुकवर कुणीतरी पिलीभीत अभयारण्याच्या मुख्य रस्त्यावर एक वाघाने एका पाळीव बैलाची शिकार केल्याची बातमी दिलेली होती व लोकांनी त्याच्या अनैतिकतेविषयी व समाज माध्यमांवर अशाप्रकारे हिंसक घटना टाकणे व त्यांचे उदात्तीकरण करणे कसे गैर आहे याविषयी लिहीले होते. यावर माझे उत्तर खालीलप्रमाणे होते

   माणसांमुळेच वाघांचा अधिवास नष्ट होत चालल्यामुळे वाघ परिस्थितीशी कसे जुळवून घेत आहेत याचे हे उत्तम उदाहरण आहे. गाय किंवा म्हैस यांच्यासारखे पाळीव प्राणी वाघाचे वास्तविक अन्न नाहीत, परंतु त्या बिचाऱ्यांकडे उघड्यावर येण्यावाचून व पाळीव प्राण्यांची शिकार करण्यावाचून दुसऱ्या कोणताही पर्याय नसतो, त्यांच्या भवितव्याविषयी पूर्णपणे आदर राखून मला हे सांगावेसे वाटते. एक लक्षात ठेवा आपण माणसे वाघापेक्षाही अधिक हिंस्र असतो ज्यांच्यामुळे त्याला हे करावे लागले आहे. मी तुमच्या भावना समजू शकतो की अशा बातम्या बघणे अतिशय क्रूर आहे परंतु माणसे त्यापेक्षा कित्येक अधिक क्रूर असतात, तुम्ही इंटरनेटवर पाहा, तुम्हाला दिसेल की अपघातस्थळी बहुतेक लोक त्या दृश्याचे चित्रकरण करण्यात व रिल्स तयार करण्यात गुंतलेले असतात व इथे जी घटना घडली ती नैसर्गिक होती.

    तसेच पुण्यामध्ये जिममध्ये व्यायाम करताना देण्यात आलेल्या मध्यंतरामध्ये एका महिला सदस्याने सांगितले की तिला वाघ पाहायची इच्छा आहे परंतु तिने जंगलात न जाण्याचा निर्णय घेतला आहे कारण आम्ही प्राणी पाहण्यासाठी जंगलात जाऊन त्यांच्या जीवनात अडथळा आणत असल्याचे तिला वाटते. वन्यजीवनाविषयी तिला असलेली काळजी व तिच्या भावनांविषयी आदर राखत मी तिला माझ्यापरीने जास्तीत जास्त चांगल्यापद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला

       मी विदर्भाचा आहे, जेथे अजूनही माणूस रिक्षा ओढतो व तळपत्या उन्हात किंवा पावसात एक माणूस दुसऱ्या माणसाचे ओझे वाहतो हे पाहणे त्रासदायक असते. परंतु ते त्यांची उपजीविका कसे चालवतील कारण ते कोणत्याही प्रयत्नांशिवाय पैसे स्वीकारणारे भिकारी नसतात. मुंबई-पुण्याहून आमच्या घरी येणारे पाहुणे जेव्हा अशा माणसांद्वारे चालविल्या जाणाऱ्या रिक्षांमध्ये बसायला नकार देत तेव्हा मी त्यांना हेच समजून सांगत असे. त्याचप्रमाणे, जर आपल्याला वन्य प्राणी व जंगल सुरक्षित ठेवायचे असेल तर आपण या जंगलाभोवतालचे लोक जगू शकतील याची खात्री केली पाहिजे व याचा एकमेव मार्ग म्हणजे वन्यजीवन पर्यटन. एखाद्याने वाघ पाहिलाच नाही तर तो त्याच्यावर प्रेम कसा करेल व त्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न कसा करेल? आणखी एक घटक, आमच्या जंगलातील अस्तित्वामुळे एवढा अडथळा आला असता तर ताडोबामधील वाघांची संख्या कशी वाढतेय. म्हणजेच आपण काही नियमांचे पालन करून जंगलांना भेट देतो व सुरक्षित अंतर ठेवतो, जंगलाचे संरक्षण कऱणे तसेच त्यांच्या सान्निध्याचा आनंद घेणे हाच मार्ग आहे. सुदैवाने, तिला समजले व तिने मान्य केले !

    मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे, जंगल ही दिवसाचे चोवीस-तास व वर्षाचे तिनशे-पासष्ट दिवस सुरू असलेली शाळा आहे, आपल्याला या शाळेमध्ये आपले नाव कसे व कधी नोंदवायचे आहे व आपल्याला त्यातून काय शिकायचे आहे व या ज्ञानाचा वापर कसा करायचा आहे हे आपल्यावर अवलंबून आहे; याची जाणीव होऊन मी ताडोबा जंगलाचा निरोप घेतला, पुन्हा लवकर येण्याचे आश्वासन देऊन...!

 

 संजय देशपांडे

smd156812@gmail.com















No comments:

Post a Comment