Monday, 17 February 2025

घराची सुरक्षितता आणि आपली जबाबदारी!



























 


















घराची सुरक्षितता आणि आपली जबाबदारी!

“सुरक्षितता हा जीवनाविषयीचा दृष्टिकोन आहे केवळ एखादी यंत्रणा किंवा नियम नव्हे”… मी.

हे केवळ एक अवतरण किंवा केवळ काही शब्द नाहीत तर इमारतीची सुरक्षितता याविषयी जेव्हा मला बोलायचे होते किंवा माझे विचार मांडायचे होते जेव्हा माझ्या मनात आलेल्या या भावना होत्या. माझ्या घरापासून अगदी जवळच असलेल्या एका सोसायटीमध्ये तिच्या प्रवेशद्वारापाशीच एका रहिवाशाची गळ्यातील साखळी ओढण्याची घटना, संध्याकाळच्या वर्दळीच्या वेळी घडली. त्यानंतर त्या सोसायटीच्या वॉट्सॲप ग्रूपवर जोरदार चर्चा सुरू झाली. त्या सोसायटीमध्ये आमचीही एक लहान सदनिका आहे त्यामुळे मीदेखील त्या वॉट्सॲप ग्रूपचा सदस्य आहे. या सगळ्या चर्चेचा भर प्रामुख्याने अर्थातच सोसायटीची सुरक्षा व यंत्रणेवर होता. मी तेथील सदस्यांना सांगितले की मला या क्षेत्रातील थोडा अनुभव असल्यामुळे ज्या सदस्यांना इमारतीची सुरक्षितता याविषयावर जाणून घ्यायचे असेल त्यांच्यासाठी मी एक छोटेसे सादरीकरण देऊ शकतो व त्यानंतर पुढे काय पावले उचलायची हे त्यांनी  ठरवावे, मी जाणीवपूर्वक हे लिखाण पीपीटी स्लाईडच्याच स्वरूपात देत आहे व मुद्दे सविस्तरपणे सांगत आहे, जेणेकरून वाचकांना सर्व मुद्दे सखोलपणे समजून घेता  येतील. त्याचवेळी माझ्यासाठीही हा बरेच काही शिकवणारा किंवा नाविन्यपूर्ण अनुभव होता. माझ्या मते जवळपास पन्नास टक्के सुरक्षा ही प्रकल्पाचे नियोजन करतानाच साध्य करता येते व उर्वरित जेव्हा लोक या इमारतीमध्ये राहण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या घर वापरताना साध्य होते. त्यामुळे सुरक्षिततेविषयीचे हे सादरीकरण माझ्या चमूसाठी तसेच आमच्या प्रकल्पातील रहिवाशांसाठीही उपयोगी ठरेल असे मला वाटले. अलिकडे (कोरोनानंतर) काही कारणांनी गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे मग ते सायबर गुन्हे असोत किंवा साखळी खेचणे असो किंवा घरफोडी असो, मोठ्या लोकसंख्येकडे रोजगारच नाही किंवा त्यांना झटपट पैसा कमवण्यामध्ये रस आहे म्हणुन असेल. म्हणूनच तुम्ही कोणतेही वर्तमानपत्र उघडा, तुम्हाला शहरातील बातम्यांच्या पानावर घरफोडीच्या व तत्सम गुन्ह्यांच्या अनेक बातम्या वाचायला मिळतात ही वस्तुस्थिती आहे. अर्थात माझ्या लेखाचा तो विषय नाही व अनेकजण म्हणतील की पोलीस काय करत आहेत, त्याचे असे आहे की तुम्ही वाहन चालवत असताना हेल्मेट तुम्हीच घालणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे घर तुमचे असल्यामुळे त्याच्या सुरक्षिततेसाठी तुम्हीच काहीतरी खबरदारी घेणे आवश्यक आहे, त्यालाच सुरक्षितता असे म्हणतात.
१. सुरक्षा यंत्रणेचा उद्देश.
चोरी, दुर्घटना, नैसर्गिक आपत्ती, जीवास धोका, मालमत्तेचे नुकसान, वस्तुंचे नुकसान (कार/बाईक) व इतर. आपण एखादी यंत्रणा बसविण्याआधी त्याचा उद्देश काय आहे किंवा त्यातून आपल्याला काय साध्य करायचे आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. नाहीतर मराठीतल्या “आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी” या म्हणीसारखी परिस्थिती होते. म्हणजेच आपण पैसे खर्च करूनही आपल्या मनामध्ये जो उद्देश आहे त्यासाठी कुचकामी ठरणारी एखादी यंत्रणा बसवतो. ही वस्तुस्थिती सोसायटीतील लोकांनीच नव्हे तर अगदी इमारतीच्या/प्रकल्पाच्या नियोजनकर्त्यांनीही समजून घेतली पाहिजे.
२. निवासी सोसायटी.
आपण निवासी संकुलावर लक्ष केंद्रित करू कारण व्यावसायिक इमारतींमध्ये वापरकर्ते वेगळे असतात त्यामुळे त्यांच्या उपाययोजनाही वेगळ्या असतील. इथे पहिला उद्देश आहे चोरी रोखणे, आपल्या मौल्यवान वस्तुंचे संरक्षण करणे व रहिवाशांच्या जीवाचे व त्यानंतर आपल्या मौल्यवान वस्तुंचे संरक्षण करणे.
३. प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुधारणात्मक उपाययोजना.
सुरक्षा ही दोन प्रकारची असते, एक दुर्घटनेच्या आधीची व एक नंतरची. याचाच अर्थ असा होतो की आपण जशी एखादा आजार होऊ नये यासाठी लस घेतो, लसीमुळे आपल्याला कधीही संसर्ग होणार नाही याची खात्री केली जात नाही तर त्यामुळे त्या आजाराविरुद्ध आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते व जर आपल्याला तो आजार झाला तर आपल्याला आवश्यक ती औषधे घ्यावीच लागतात. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या उपाययोजना चोरीविरुद्ध एखाद्या लसीप्रमाणे असतात व त्याला प्रतिबंधात्मक उपाय असे म्हणतात, परंतु तरीही चोरी झाली तर आपण त्यासाठी नंतर काही उपाययोजना करू शकतो.
४. प्रतिबंधात्मक उपाययोजना.
सोसायटीचा आराखडा व नियोजनाचा अभ्यास करा. तुमचा जो उद्देश आहे त्या अनुषंगाने असलेल्या त्रुटींची नोंद करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही वाईट घटना टाळण्यासाठी व वाईट लोकांना त्यांची गाठ कुणाशी आहे हे समजण्यासाठी, सोसायटीने घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना त्यांना समजल्या पाहिजेत, कारण त्यामुळे गुन्हेगारांच्या मनामध्ये दहशत निर्माण होते. कोणतीही चोरी किंवा घरफोडी यासारखे गुन्हे योगायोगाने किंवा अपघाताने घडत नाहीत. त्या ठिकाणी चोराने त्याचा जीव पणाला लावलेला असतो व तो रिकाम्या हाताने परतू शकत नाही. तो किंवा ती (टोळी) सामान्यपणे लक्ष्याचा म्हणजे तुमच्या घराचा किंवा सोसायटीचा अभ्यास करतात व ते सुरक्षिततेच्या बाबतीत सर्वात कमकुवत असलेल्यावर घाव घालतात. सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजना ठळक अक्षरात दिसतील अशा जागी लावा. ज्याप्रमाणे एखाद्या बंगल्यावरची “कुत्र्यांपासून सावध राहा” ची पाटी तुम्हाला बंगल्यामध्ये शिरताना अधिक सावध करते, त्याचप्रमाणे तुम्हीही बेसावध नाही याची चोराला जाणीव करून देण्यासाठी सुरक्षिततेच्या कोणत्या उपायोजना आहेत हे पुरेसे दिसेल अशाप्रकारे लावा. दुर्दैवाने, वर उल्लेख केलेल्या सोसायटीमध्ये जिथे साखळी खेचण्याची घटना घडली तिथे सीसीटीव्ही होता परंतु तो आहे असे दाखवणारी पाटी नव्हती.
प्रवेशाच्या व बाहेर पडण्याच्या ठिकाणी व्यवस्थित तपासणी झाली पाहिजे. प्रत्येक प्रवेश व बाहेर पडण्याची तपासणी झाली पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे योग्य सुरक्षा कर्मचारी असले पाहिजेत तसेच त्यांच्याकडे शिट्टी, काठी, टॉर्च इत्यादी सामग्री असली पाहिजे. बहुतेक सोसायट्यांमधील हा सर्वात कमकुवत दुवा आहे विशेषतः एकेकट्या इमारतींमधील. तुम्ही जर पैसे वाचवण्यासाठी एखाद्या सुरक्षा रक्षकाला कमी पैशांवर ठेवले तर तो त्याच्या गरजा भागवण्यासाठी त्याचवेळी आणखी एखादी नोकरीही शोधेल (आयटीतील लोकांच्या मून वॉकिंगसारखी) ज्यामुळे सुरक्षा लक्षक म्हणून काम करताना तो कमी सावध असेल. दुसरे म्हणजे, जेव्हा गरज पडेल तेव्हा तो त्याचा जीव धोक्यात घालणार नाही, म्हणजे चोरांना किंवा गुंडांना तोंड देण्यासाठी. त्यामुळेच नेहमीच योग्य क्वालिटीची सुरक्षा सेवाच घ्या.एकच प्रवेश व एकच बाहेर जाण्याचा मार्ग ठेवा. नियोजनामध्ये हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण त्यामुळे सुरक्षा संघ आवारामध्ये कुणी प्रवेश केला व कोण बाहेर पडले यावर व्यवस्थित लक्ष ठेवू शकतात, ज्या अनेक इमारतींमध्ये विशेषतः ज्या प्रकल्पांमध्ये इमारतींची संख्या जास्त आहे तिथे पालन केले जात नाही, त्यांना केवळ त्यांच्या इमारतीपाशी किंवा विंगपाशी सोयीचा होईल असा प्रवेशाचा व बाहेर पडण्याचा मार्ग हवा असतो.
कुंपणाच्या भिंतींवर व प्रत्येक इमारतीच्या सुरक्षित प्रवेशावर खर्च करा. बांधकाम व्यावसायिकाने तुम्हाला सुरक्षित व व्यवस्थित कुंपणाची भिंत दिली नसली तरीही सोसायटी तिची उंची वाढवू शकते, कारण चोराला ती एखाद्या अडथळ्यासारखी वाटली पाहिजे.अधिकृत/वैध रहिवाशांनाच मुक्त प्रवेश हवा. कोणत्याही इमारतीमध्ये त्यातील खऱ्या रहिवाशांना किंवा वापरकर्त्यांनाच मुक्त प्रवेश हवा व तो देखील कार्ड किंवा काही ओळख देऊन देण्यात यावा.सर्व आगंतुकांची प्रवेशापाशी तपासणी केली जावी. हे अनेक लोकांना अतिशय वैतागवाणे किंवा गैरसोयीचे किंवा अपमानास्पद वाटते परंतु याच लोकांची मॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये तपासून घ्यायला काही हरकत नसते. सुरक्षितता ही भावनांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे हे आधी आपण स्वीकारले पाहिजे, तरच ती परिणामकारक होऊ शकेल.
प्रत्येक लॉबीमध्ये व प्रवेशापाशी आणीबाणीतील संपर्क क्रमांकांची पाटी असावी. स्थानिक पोलीस व असे सर्व आवश्यक क्रमांक ठळक अक्षरात लॉबीमध्ये तसेच सुरक्षा रक्षकाजवळही लावलेले असावेत. तसेच सुरक्षा रक्षकाचा कक्ष शौचालयापासून जवळ असावा म्हणजे तो तिकडे गेला असल्यास त्या वेळेतही प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकाविना नसावे व ते त्याच्या डोळ्यासमोर राहावे.
५. सुरक्षित प्रवेश लॉबी.
प्रत्येक इमारतीच्या प्रवेशासाठी एमएस ग्रील लावलेली प्रवेश लॉबी व हाताने लावता येईल अशा कुलुपाची व्यवस्था ही सर्वोत्तम व मूलभूत गोष्ट आहे. तुम्ही रात्री उशीरा कुलुप लावू शकता व रात्री उशीरा येणाऱ्या व्यक्तींसाठी त्याच्या किल्ल्या प्रत्येक सदनिकाधारकाला दिल्या जाऊ शकतात.
अंगठ्याच्या ठशाने उघडणारी यंत्रणा. हे कुलुप केवळ अधिकृत रहिवाशांच्या अंगठ्याच्या ठशानेच उघडते. परंतु समस्या अशी आहे की त्यामध्ये वृद्ध व्यक्तींच्या बोटाचा ठसा नीट उमटत नाही.
इंटरकॉमद्वारे खात्री करून प्रवेश. सर्वोत्तम व सर्वात परिणामकारक, इमारतीच्या आवारामध्ये येणाऱ्या कुणाही आगंतुकाला सुरक्षा रक्षकाने संबंधित सदनिका धारकाकडून इंटरकॉमवरून कॉल करून खात्री करून घेतल्यानंतरच प्रवेश दिला जातो. यासाठी थोडासा वेळ लागतो परंतु ही अतिशय प्रभावी यंत्रणा आहे.
प्रवेश ओळख पत्राद्वारे प्रवेश. पंचतारांकित हॉटेलमध्ये असतात त्याप्रमाणे सर्व रहिवाशांकडे त्यांचे मॅग्नेटिक कार्ड असते ज्याद्वारे त्यांना त्यांच्या इमारतीच्या लॉबीचा दरवाजा उघडता येतो.
सुरक्षा रक्षकासाठी आपत्कालीन परिस्थिती वाजवायचा गजर. सुरक्षा रक्षकाच्या जवळ आपत्कालीन परिस्थितीमध्ये वाजवायच्या गजराचे एक बटण असले पाहिजे, जेणेकरून अशी कोणतीही परिस्थिती आल्यास तो एका झटक्यात सोसायटीला इशारा देऊ शकतो.
आणखी एक गोष्ट म्हणजे, सोसायटीने सुरक्षा रक्षकाला एक स्वतंत्र मोबाईल त्यामध्ये सिमकार्ड घालून द्यावे, मग ते अगदी साधे मॉडेल असले तरी चालेल. या मोबाईलमध्ये सोसायटीतील महत्त्वाच्या व्यक्तींचे क्रमांक घातलेले असतील, म्हणजे त्यांना सुरक्षा रक्षकाशी संवाद साधण्यास मदत होईल.
६. मालमत्तेची म्हणजेच वाहनांची सुरक्षितता.
सोसायटीद्वारे जॅमर. दीर्घकाळ बाहेरगावी जाताना सोसायटी वाहनांना त्यांची कुलुपे लावू शकते व सदस्य अतिरिक्त सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलीसांच्या जॅमरप्रमाणे ती लॉक करू शकतात.
सोसायटीचे स्टिकर. प्रत्येक वाहनावर सोसायटीने दिलेले स्टिकर असले पाहिजेत, शक्य असल्यास त्या स्टिकरवर बारकोडही असावेत.
सर्व वाहनांमध्ये चोरीस-प्रतिबंध करणारे गजरही बसवले जावे म्हणजे चुकीच्या किल्लीने किंवा बळजबरीने एखादे वाहन उघडण्याचा किंवा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास समजू शकेल.
विशेषतः कारसाठी तिचा मागोवा घेणारी साधने अत्यावश्यक असतात. तसेच तुम्ही आता तुमच्या दुचाकींवरही ती आता लावून घेऊ शकता. त्याचप्रमाणे वाहनतळाच्या जागी या सर्व बाबी ठळक अक्षरात प्रदर्शित करण्यात याव्यात.
७. सुधारणात्मक उपाययोजना.
सीसीटीव्हीची सोय आजकाल सगळीकडेच असते परंतु कुणीही त्यातील दृश्ये किती परिणामकारक आहेत हे तपासण्याची तसदी घेत नाही. चांगल्या दर्जाचे रात्रीचीही दृश्ये व्यवस्थित दिसतील असे कॅमेरे व नियमितपणे देखभाल व यंत्रणेचे निकाल ही इथे चिंतेची बाब आहे.
प्रवेश/बाहेर पडण्याची योग्यप्रकारे व जाणीवपूर्वक केलेली नोंद आवश्यक आहे व शक्य असल्यास, ती सोसायटी कार्यालयाच्या संगणकावर करा. त्याचवेळी घरकामाच्या बायका/वाहन चालक/आगंतुक या सगळ्यांची माहिती तसेच स्थानिक पोलीसांकडून घेतेले चारित्र्य प्रमाणपत्र सांभाळून ठेवा.
 ८. रहिवाशांचा वैयक्तिक दृष्टिकोन
एखादी आपत्ती आल्यास सर्व रहिवाशांची तपशीलवार माहिती हा अतिशय महत्त्वाचा डेटा आहे व तो सोसायटीच्या संगणकांमध्ये संग्रहित करून ठेवला पाहिजे. जर सोसायटी लहान असेल तर आपण समितीच्या सदस्यांचा किंवा कार्यालयीन पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक पीसीचा/लॅपटॉपचाही यासाठी वापर करू शकतो.
नियमितपणे येणाऱ्या बाहेरील व्यक्ती, घरकाम करणाऱ्या बायका, वाहनचालक व स्थानिक पोलीसांकडून घेण्यात आलेले त्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र, ही प्रत्येक सदनिकाधारकाची जबाबदारी आहे.
तुमच्या शेजाऱ्यांविषयी माहिती असू द्या व आजूबाजूला कोणतीही अनियमित हालचाल होत असेल उदाहरणार्थ एखादी संशयास्पद व्यक्ती, सदनिकेचा दरवाजा तुटलेला किंवा उघडा असेल तर त्यावर लक्ष ठेवा. लहान गोष्टींमुळेही बराच फरक पडतो उदाहरणार्थ, रात्री येणाऱ्या आगंतुकांसाठी तुमच्या प्रवेशद्वाराबाहेर दिवा बसवून घ्या व त्याचे बटण घरात सदनिकेमध्ये ठेवा म्हणजे जर लॉबीतील दिवे बंद असतील तरीसुद्धा रात्री मुख्य दरवाजापाशी कोण उभे आहे हे तुम्हाला तपासता येईल. त्याचप्रमाणे दुहेरी कडी/कोयंडा असलेले सुरक्षा/सुरक्षितता प्रवेशद्वार लावा म्हणजे तुम्हाला कुणीही आतून लॉक करू शकणार नाही. शौचालयाच्या खिडक्यांना एमएस सुरक्षा ग्रिल असणे व ग्रिलचे डिझाईन योग्य असणे महत्त्वाचे आहे. तसेच ते मजबूतपणे उभे राहतील व सहजपणे हलवता येणार नाहीत अशाप्रकारे बसवले पाहिजेत.
ठराविक काळाने सुरक्षा यंत्रणेची उलट तपासणी करणेही आवश्यक आहे व त्यासाठी सर्वसाधारण सभेची बैठक घेऊन एक समिती स्थापन करा व त्यांना पुरेसे अधिकार द्या.
९. सुरक्षा यंत्रणेसाठी निधी
दोन प्रकारचे खर्च असतात, एक म्हणजे एकदाचं केला जाणारा व दुसरा म्हणजे नियमितपणे करावा लागणारा. एकदा करावा लागणारा खर्च म्हणजे बांधकाम व सीसीटीव्हीसारख्या यंत्रणांचा व तत्सम खर्च. नियमितपणे करावा लागणारा खर्च म्हणजे या सर्व यंत्रणांच्या देखभालीसाठी व तुम्ही नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षक वगैरे कर्मचाऱ्यांसाठीचा मासिक खर्च. तुम्ही नेहमी तज्ञांचा सल्ला घेऊ शकता, तसेच त्यांच्याकडून सुरक्षेचे लेखापरीक्षण करून घेऊ शकता व अगदी स्थानिक पोलीसांकडूनही मदत घेऊ शकता.
१०. मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे सुरक्षा हा एक दृष्टिकोन आहे व तो सतत बदलत जातो व तुम्ही एखाद्या चोरासाठी किंवा घरफोडी करणाऱ्यासाठी तुमच्या घरामध्ये किंवा सोसायटीमध्ये घुसणे किती अवघड करता हे तुमच्या दृष्टिकोनावरच अवलंबून असेल; एवढे सांगून मी तुमचे आभार मानतो व हे सादरीकरण संपवतो!

या सादरीकरणाची ध्वनीचित्रफित तुम्ही यूट्यूबच्या खाली दिलेल्या दुव्यावर पाहू शकता व इतरांना जाणीव करून देण्यासाठी तसेच सुधारणा करण्यासाठी कृपया तो आवर्जून शेअर करा…

https://www.youtube.com/watch?v=6aj3AAD1lmA&t=1s

संजय देशपांडे 
www.sanjeevanideve.com




No comments:

Post a Comment