Friday, 7 February 2025

ग्रासलँड्स, तरस, लांडगे आणि निसर्गाचा लढा !



































ग्रासलँड्स, तरस, लांडगे आणि निसर्गाचा लढा !

जेव्हा मानवता जंगलाविरुद्धचे युद्ध जिंकेल, तेव्हा तो विजय मानवतेचा सर्वात मोठा पराभव असेल!”―…  मेहमत मूरत इल्दान
मेहमत हे महान तुर्की नाटककार, कादंबरीकार व विचारवंत आहेत व त्यांच्या या विचारधनामुळे मला अलिकडचे अनेक लेख लिहीताना खुप मदत झाली आहे, विशेषतः जेव्हा विषय जंगल किंवा एकूणच निसर्ग व त्याचा माणसांसोबत म्हणजे आपल्यासोबत टिकून राहण्यासाठीचा संघर्ष असा असतो! खरेतर मेहमतसारख्या अनेक विचारवंताचे लेखन वाचल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली आहे जे त्यांनी वरील अवतरणामध्ये समजून सांगितले आहे. जंगलांची माणसांविरुद्धची लढाई किंवा संघर्ष कायम सुरू असला तरीही या लढाईमध्ये माणसे कधीही जिंकणार नाहीत. कारण ज्यादिवशी आपण शेवटचे झाड तोडू किंवा गवताचे शेवटचे पाते कापू, आपले आयुष्य केवळ काळे व पांढरे उरेल, किंबहुना केवळ काळेच उरेल, असे असले तरीही माणूस हा लढा कधीही सोडून देत नाही ही खरी समस्या आहे! म्हणूनच माझ्या अशा लेखांचा एकमेव उद्देश असतो, कुणीतरी, कुठेतरी हे वाचून समजून घेईल व जंगलांविरुद्धचा संघर्ष थांबवण्याच्या लढ्यात  सहभागी होईल, परंतु आत्तापर्यंत तरी अशा लोकांची संख्या अतिशय कमी आहे, त्यामुळे असो, मेहमत यांचे आभार मानू!

तर आता तुम्हाला तत्वज्ञानाचे हे डोस खूप जास्त झाले असतील तर, तुमच्यासाठी एक छान, उत्तम, भारी, आश्चर्यकारक बातमी आहे (म्हणजे थोडी वेगळी सुरुवात आहे) व ती जंगलांविषयी आहे जी तुम्हाला गवताळ कुरणांच्या स्वरूपात भेट देतात व ती आपल्या काँक्रिटच्या जंगलापासून म्हणजे पुण्यापासून जेमतेम १०० किलोमीटर लांब आहेत (रस्त्यावर वाहतुकीची कोंडी असल्यामुळे अगदी १०० किलोमीटरही १००० किलोमीटर असल्यासारखे वाटतात, उपरोधिकपणासाठी माफ करा) व यासाठी वन विभागाचे आभार मानलेच पाहिजेत की सीसीएफ एन. आर. प्रवीण, डीसीएफ महादेव मोहिते, आरएफओ सूर्यवंशी व गार्ड गणेश बागडे (वन विभागातून), आणि राजू पवार यांच्यासारख्या स्थानिकांनी जंगलाशीच हातमिळवणी करून त्याच्याविरुद्धची लढाई चक्क जिंकली आहे व त्याचा परिणाम अतिशय आश्चर्यकारक आहे. खरंतर पहिल्या नजरेत येथे तुम्हाला सगळीकडे फक्त पिवळे काळे वाळलेले गवत, काटेरी झुडुपे, मोठे-मोठे दगड असलेल्या निषपाणं  टेकड्या व या पार्श्वभूमीवर काही जंगली कडुनिंबाची झाडे दिसतात. तुम्ही पहाटे ३ वाजता उठून, छान मऊ उबदार अंथरूण सोडून, १०० किलोमीटरचा प्रवास करून इथे का आलात असा प्रश्न स्वतःलाच पडतो. मात्र आकाशामध्ये सूर्य उगवताच, तुम्हाला काळे व करडे पट्टेरी काहीतरी विचित्र प्रकारे चालताना दिसते, दूरवर कुठेतरी लांडग्यांची कुईकुई सुरू होते व तुम्हाला निरभ्र निळ्या आकाशात पंख पसरून मुक्तपणे विहार करणारे शिकारी पक्षी दिसू लागतात. पुण्याच्या गवताळ पट्ट्यांमध्ये तुमचे स्वागत आहे, असे वैशिष्ट्यपूर्ण भूदृश्य असलेला अधिवास महाराष्ट्रातील इतर जंगलांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. इथे तुम्हाला तरस, लांडगा, कोल्हा, चिंकारा असे प्राणी व अनेक पक्षी पाहायला मिळतात. इथल्या तरसाच्या कुटुंबाचेच उदाहरण घ्या, माझ्या ३० वर्षांपेक्षाही अधिक वन्यजीवनात, मला हा प्राण्याची जेमतेम एकदा किंवा दोनदा भेट झाली ती सुद्धा ओझरती. परंतु इथे कडबनवाडीमध्ये मला त्यांची निवांतपणे छायाचित्रे काढता आली, कारण त्यांचीही त्यासाठी मानसिक तयारी होती, हे दृश्य दुर्मिळ होते व तुम्हाला अजूनही अशा बऱ्याचशा गोष्टी येथे पाहायला मिळतील!!

हे सर्व काही दिवसात किंवा महिन्यात किंवा वर्षांमध्ये झाले नसले तरीही हा जवळपास सातत्याने एक दशकभर केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आहे त्यामुळे हे गवताळ प्रदेश केवळ टिकूनच राहिलेले नाही तर समृद्धही होत आहे. हा संपूर्ण परिसर पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेपासून ते पूर्वेला शेकडो किलोमीटर परिसरात पसरलेला आहे, जे कमी पर्जन्य छायेचे क्षेत्र आहे व खरेतर म्हणूनच येथील जीवसृष्टी, झाडे-झुडुपे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. असे तर मी जवळपास दीड दशकभरापासून या गवताळ कुरणांना भेट देत आलोय जेव्हा ती अस्तित्वात आहेत हे किंवा त्याचे महत्त्व फारसे कुणाला माहितीही नव्हते. परंतु कोव्हिडनंतर पर्यटनावर झालेल्या परिणामामुळे (चांगल्या अर्थाने) व या गवताळ पट्ट्यांमध्ये खऱ्या अर्थाने रस असलेल्या काही अधिकाऱ्यांमुळे हे पट्टे येथील वन्यजीवांना आवडू लागले आहे व त्यामुळे ते वन्यप्रेमींच्याही आवडीचे झाले आहेत. सकाळी जेव्हा मी इंदापूरच्या बाजूने कडबनवाडीच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो (बारामतीच्या बाजूने म्हणजे शिरसुफळ येथे दुसरे प्रवेशद्वार आहे), तेव्हा प्रवेशद्वारावर एसयूव्हीच्या (या रस्त्यांवर सामान्य गाड्या चालू शकत नाहीत) रांग पाहून खुप छान वाटले व प्रवेश तिकीटांची पूर्णपणे विक्री झाली होती. नंतर आम्ही एका पाणवठ्यावर वाट पाहात असताना, छायाचित्रकार त्यांच्या टेलिफोटो लेन्स रोखून बसलेले पाहून समाधान वाटले कारण हे दृश्य अगदी ताडोबा किंवा कान्हामधल्यासारखे वाटावे असे होते. या गवताळपट्ट्यांमध्ये आत्तापर्यंत याचीच कमतरता होती व यामुळेच त्यांचे संवर्धन अधिक चांगल्याप्रकारे होईल असे मला वाटले!

आधीसुद्धा तरस, लांडगे, खोकड, कोल्हे, चिंकारा तसेच अनेक शिकारी पक्षी जे तुम्हाला केवळ या अधिवासांमध्येच पाहता येतील ते इथले निवासी होतेच पण या भागात माणसांची सतत वर्दळ असल्यामुळे हे प्राणी लपून रहात. यापैकी बहुतेक प्राणी लाजाळू व निशाचर असतात (केवळ किंवा बहुतेकवेळा अंधारात किंवा रात्रीच फिरतात) त्यामुळे त्यांचे दिसणे नेहमीच दुर्मिळ असते परंतु आता सफारीची योग्य व्यवस्था असल्यामुळे, मार्ग आखून दिलेले असल्यामुळे तसेच या भागातील बऱ्याचशा पट्ट्यामध्ये माणसांना ये-जा करण्यास मनाई असल्यामुळे, हळूहळू प्राणी सरावताहेत व म्हणूनच मला तरसाची छायाचित्रे काढता आली, जी मी कधी काढू शकेन असा विचारही केला नव्हता! या गवताळ पट्ट्यांच्या आत व भोवताली होणारी खाजगी शेती ही एकप्रकारे वरदान असली तरीही एकप्रकारे शापसुद्धा आहे. वरदान यासाठी की जेव्हा उन्हाळ्यात गवत वाळते तेव्हा हिरव्या पिकामध्ये लांगडे व खोकड विश्रांती घेतात व या आसऱ्याचा वापर त्यांनी प्रजननासाठी केला. त्याचप्रमाणे चिंकारा उन्हाळा असेल किंवा भोवताली रखरखीत असेल तेव्हा हिरवी पाने खातात कारण हा भाग पर्जन्य छायेच्या क्षेत्रात येतो व यापैकी कोणतेही प्राणी केवळ तुम्ही कृत्रिम पाणवठे तयार केले म्हणून राहात नाहीत. त्याचवेळी, हा शाप आहे कारण या शेतजमीनी खाजगी आहेत व इथे माणसांची नेहमीच वर्दळ असते ज्यामुळे प्राण्यांना अडथळा येतो व ते पर्यटकांसाठी चांगले नाही. त्याचप्रमाणे इथल्या सीमा आखून घेतलेल्या नसल्यामुळे मालकी हक्कासाठी खाजगी शेतमालक व वनविभागामध्ये हमरातुमरी सुरू असते, ही आणखी एक समस्या आहे. मला असे वाटते आपण ज्याप्रमाणे व्याघ्र प्रकल्पामध्ये केले त्याचप्रमाणे या जमीनी अधिग्रहित करणे हा एकमेव उपाय असेल व त्यासाठी हे गवताळ पट्टे लांडग्यांचा प्रकल्प म्हणून घोषित करा. यात अडचण अशी आहे की विदर्भातील शेतकऱ्यांच्या उलट येथील शेतकरी सधन आहे व अतिशय सबळ राजकीय पाठिंबा असलेला आहे, त्यामुळे त्यांना समजवणे व त्यांना या गवताळ पट्ट्यांमधून हलवणे हे सोपे काम नाही, परंतु म्हणूनच सरकारने असे कठोर निर्णय घेणे अपेक्षित असते, बरोबर? या गवताळ पट्ट्यातील प्राण्यांना त्यांची जागा हवी आहे कारण ते इथे शेकडो वर्षांपासून आहेत आणि ते इतर कुठेही जगू शकत नाहीत, हे घर त्यांचेच आहे! 

या गवताळ पट्ट्यांमधील आणखी एक पैलू ज्यासंदर्भात अलिकडेच वन विभागाने सकारात्मकपणे केलेली अतिशय लक्षणीय कृती म्हणजे, वनजीवनाविषयी स्थानिकांना जागरुक करणे, हे सूत्र ताडोबामध्ये यशस्वी ठरले कारण एकदा स्थानिक वन्यजीवनावर प्रेम करू लागल्यावर, निम्मी लढाई तिथेच जिंकली जाते. म्हणूनच, पुढचे पाऊल म्हणजे इथल्या वन्य पर्यटनामध्ये व्यावसायिकता आणणे ज्यामध्ये योग्य वाहनांचा समावेश होतो (उदाहरणार्थ जिप्सी) कारण सुदैवाने इथे वाघासारखे मोठे हिंस्र प्राणी नसल्याने सुरक्षितता हा काही फार मोठा मुद्दा नाही व आपण थोडेफार प्रयोग करून पाहू शकतो. त्याचवेळी येथील सफारीचा मार्ग व वेळा वाढवा कारण जेव्हा एखादी व्यक्ती प्रवास करून इथे येण्यासाठी वेळ व पैसा खर्च करते तेव्हा तिला काही वेळ जंगलामध्ये घालवता आला पाहिजे तरच तिला जो काही पैसा तिने खर्च केला आहे त्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे निवासाचा, मी वर नमूद केलेले सर्व सस्तन प्राणी तुम्हाला सकाळी भल्या पहाटे व संध्याकाळी उशीरा पाहायला मिळतात, त्यामुळे तिथे राहण्यासाठी चांगली व्यवस्था हवी, जी सध्या दिसत नाही. आपण गवताळ पट्ट्यांच्या भोवती असलेल्या खाजगी जमीनी खरेतर रिसॉर्ट किंवा घरगुती निवासव्यवस्थेसाठी वापरू शकतो व वन विभाग त्यावर काम करत आहे!

अलिकडेच अशा आडबाजूच्या पण निसर्गरम्य ठिकाणी लग्नसोहळे आयोजित केले जात असल्याची व लोक हे लग्न सोहळे व कार्यक्रमांवर लक्षवधी रुपये खर्च करत असल्याची बातमी माझ्या वाचण्यात आली, हे गवताळ पट्टे कार्यक्रम, संमेलने, सोहळे व कॉर्पोरेट कार्यक्रमांसाठी अतिय उत्तम स्थळ होऊ शकतात अर्थात कुठेही वन्यजीवनाला कुठल्याही प्रकाराचा त्रास न होता!

 वन्यजीवन म्हणजे केवळ वाघ व हत्ती नव्हेत, त्याचा अर्थ तुमच्याभोवती असलेल्या जैवविविधतेचा आनंद घेता येणे. फक्त कल्पना करा, तुम्ही खुल्या आकाशाखाली बसलेला आहात, थंड वाऱ्याची झुळुक तुम्हाला स्पर्श करतेय, आकाश स्वच्छ आहे व तारे चमकत आहेत, भोवताली अंधार आहे कारण तुमची शहरी नजर कधीच मिट्ट काळोखाला सरावलेली नाही व लांबवर लांडग्यांच्या कळपाची आरोळी ऐकू येतेय व त्याच्या जोडीला रातकिड्यांचे पार्श्वसंगीत आहे व तसेच सोबत तरसांचे भयाण हास्यही आहे; लोकहो फक्त विचार करा, तुमच्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव असेल. यामुळे गवताळ पट्ट्यांमधील पर्यटनाला तसेच संपूर्ण वन्यजीवनाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल. अर्थात हे सगळे तिथल्या अधिवासाचा समतोल बिघडू न देता करायचे आहे व सहजीवन यालाच म्हणतात, एवढे बोलून निरोप घेतो!

खाली दिलेल्या दुव्यावर गवताळ पट्ट्याची डादू थोडी आणखी अनुभवा व आवर्जुन शेअर करा...

https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72177720323118163/

संजय देशपांडे 

www.sanjeevanideve.com  / www.junglebelles.in






















 



 

No comments:

Post a Comment