पुणे प्रदेश, विकास योजना आणि भविष्य..!
“मला एक झाड कापण्यासाठी सहा तास द्या व मी त्यातले पहिले चार तास कुऱ्हाडीच्या पात्याला धार लावण्यात घालवेन.”
― अब्राहम लिंकन.
“एखाद्या योजनेशिवाय एक उद्दिष्ट ही केवळ एक इच्छा असते.”
― अँटनी डी सेंट - एक्झ्यूपेरी.
अँटनी मेरी जीन- डी सेंट - एक्झ्युपेरी, ज्यांना केवळ अँटोनी डी सेंट-एक्झ्युपेरी म्हणून ओळखले जाते, हे एक फ्रेंच लेखक, कवी, पत्रकार, व वैमानिक होते. सेंट-एक्झ्युपेरी हे प्रशिक्षित व्यावसायिक वैमानिक होते, म्हणूनच अँटोनी यांनी नियोजनाचे महत्त्व इतक्या कमी शब्दात मांडले आहे यात काहीच आश्चर्य नाही कारण एका वैमानिकाला वेळ वाया घालवणे परवडूच शकत नाही. पहिल्या अवतरणाच्या लेखकाची (लिंकन) ओळख करून देण्याची गरज नाही व मी त्यांचे हे अवतरण आधीसुद्धा वापरले आहे, दुर्दैवाने आपल्या यंत्रणेला (विशेषतः राज्यकर्ते) असं वाचण्यात किंवा त्यातून काही शिकण्यात रस नसतो, याच कारणाने वरील अवतरणे वापरली आहेत. तुम्ही अंदाज लावल्याप्रमाणे, एकतर हा लेख जंगलांविषयी नाही (म्हणजेच ताडोबाविषयी नाही) व दुसरे म्हणजे, या लेखाचे कारण म्हणजे वर्तमानपत्रातील बातम्या. २ एप्रिल रोजी जेव्हा संपूर्ण जगाला जेव्हा भूकंपाची अपेक्षा आहे (म्यानमार/थायलंडच्या भूकंपाविषयी पूर्णपणे सहानुभूती राखून), मी आर्थिक भूकंपाविषयी बोलत आहे, म्हणजेच अमेरिका त्यांच्या देशातील आंतरराष्ट्रीय व्यापारासाठीची पहिली कर यंत्रणा जाहीर करेल अशी अपेक्षा आहे, त्याआधी आणखी एक भूकंप झाला जो आर्थिक बाबतीत नव्हता तर पुणे प्रदेशातील शहरी भागासंदर्भात होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी (जे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे, म्हणजेच पुणे प्रदेशासाठी असलेल्या नियोजन प्राधिकरणाचे प्रमुख आहेत) घोषणा केली की पीएमआरडीएच्या विकास योजनेचा मसुदा (विकास योजना) जो प्रकाशित होण्याच्या मार्गावर होता किंवा ज्यावर जवळपास अखेरचा हात फिरवला जात होता, तो रद्द करण्यात आला, म्हणजे त्याला केराची टोपली दाखवण्यात आली, तो गेला, नामशेष झाला वगैरे वगैरे!
आता, बरेच जण म्हणतील की त्यात काय मोठेसे, कारण या आराखडाची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती म्हणजेच सर्वोच्च अधिकाऱ्यांनी अजून त्याला मंजुरी दिलेली नव्हती व त्यावर प्रक्रिया सुरू होती, मग आम्ही एक नवीन विकास योजना तयार करू. हे इतके सोपे असल्याचे व पुणे शहरावर किंवा प्रदेशावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही असे ज्यांना वाटते त्या सर्वांसाठी मी आनंदी आहे व त्यांच्यासाठी येशु ख्रिस्ताचे अखेरचे शब्द वापरेन (पुन्हा एकदा त्या समुदायाला दुखवण्याचा कोणताही हेतू नाही), “त्यांना माफ कर ते काय करत आहेत त्यांचे त्यांनाच माहिती नाही” (म्हणजेच सरकार)! कारण या टप्प्यावर जवळपास ६००० चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्राची जो संपूर्ण देशातील सर्वात वेगाने वाढणारा भाग आहे त्याची विकास योजना जर तुम्ही तब्बल आठ वर्षे त्यावर काम करून तुम्ही वगळत असाल किंवा रद्द करत असाल, तर अगदी देवही पुण्याचे भले करू शकणार नाही. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या विकास योजनेतील दोन गावे (फुरसुंगी व उरळीकांचन) वगळून आपण आधीच पुणे प्रदेशासाठी भरपूर गोंधळ घालून ठेवला आहे व या गावांचे (किंवा शहरांचे) भवितव्य अधांतरी आहे व आपण आता संपूर्ण पुणे प्रदेशाच्या भवितव्याच्या बाबतीत हेच करत आहोत. तुम्हाला असे वाचत असेल की मी या विषयासंदर्भात अतिशयोक्ती करतोय व तुम्हाला त्यामागचे कारण जाणून घ्यायचे असेल तर पुढे वाचा, नाहीतर एखाद्या वेड्या व्यक्तीच्या मूर्खपणाचे रील बघत बसा (मी वैतागल्याबद्दल माफ करा)! त्याचप्रमाणे मला एक गोष्ट स्पष्ट करायीच आहे, मी काही कुणी सरकारी अधिकारी नाही (हे अगदी खात्रीशीरपणे सांगतो नाहीतर मी इतक्या उपहासाने कसे लिहीले असते), त्याचप्रमाणे मी कुणी नागरी नियोजनकर्ता नाही किंवा या विषयावर माझे काही वेगळे शैक्षणिक प्रशिक्षण झालेले नाही, तर मी एक स्थापत्य अभियंता आहे व थोडीफार भटकंती केली आहे. या व काही इतर शहरांची वाढ तसेच ऱ्हास व इतर काही गोष्टीही पाहिल्या आहेत व माझ्यामध्ये थोडीफार विवेकबुद्धी अजूनही उरली आहे (असे मला तरी वाटते) जी नागरी नियोजनासाठी सर्वात महत्त्वाची आहे असे माझे मत आहे किंवा असे मला वाटते, म्हणूनच मी ही समस्या मांडत आहे!
ठीक आहे, तर आता तुम्ही पुढे वाचत आहात तर आधी आपण विकास योजना (डीपी) म्हणजे काय हे समजून घेऊ व त्यानंतरच तुम्हाला कोणतेही शहर, गाव, किंवा प्रदेशासाठी त्याचे महत्त्व समजेल. विकास योजना ज्याचेच संक्षिप्त नाव डीपी असे आहे हा कोणत्याही नागरी विकासासाठीचा “परवलीचा शब्द” आहे व सोप्या शब्दात सांगायचे झाले तर त्या संबंधित प्रदेशाच्या जमीनीचा वापर ते निश्चित करते. याचाच अर्थ असा होतो की तुम्ही डीपी तयार करेपर्यंत, तुम्ही कुठे काय बांधायचे हे ठरवू शकत नाही. मग ते काहीही असो निवासी इमारत किंवा एखादा पूल किंवा शाळा, काहीही, विकास योजना विशिष्ट भाग किंवा प्रदेशाच्या अशा सर्व गोष्टी ठरवते. आता तुम्हाला समजेल की समाजातील सर्व घटकांना डीपी इतका प्रिय व अतिशय महत्त्वाचा का आहे. आजच्या जगात जमीनीला सोन्याचे भाव आहे व विकास योजना त्या सोन्याची किल्ली आहे कारण तुमची जमीन सोने होईल किंवा राख हे त्या विकास योजनेवरून ठरेल.
इथे अनेक जण म्हणतील, हे कसे शक्य आहे कारण जमीन ही जमीन असते, ती कुणीही चोरू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही व मला मान्य आहे की, कुणीही तुमची जमीन चोरू शकत नाही. परंतु तिची क्षमता किंवा मूल्यांकन केवळ पेनाच्या एका फटकाऱ्याने खराब केले जाऊ शकते किंवा तिचे मूल्य वाढवले जाऊ शकते, जमीनीच्या एखाद्या तुकड्याच्या बाबतीत डीपी हे करू शकतो. उदाहरणार्थ तुमच्याकडे मोक्याच्या, झपाट्याने विकासित होत असलेल्या भागामध्ये जमीन आहे व अचानक त्या जमीनीवर उद्यानासाठी आरक्षण आले, तर तुम्हाला जमीनीसाठी रेडी रेकनर (कृपया अर्थासाठी गूगल करा) दराने किंवा त्यापेक्षा दुप्पट दराने कदाचित भरपाईही मिळेल. परंतु ती जमीन तुम्हाला हव्या त्या प्रकारे वापरण्यासाठी विकसित करून तुम्हाला जे पैसे मिळाले असते त्याच्या जवळपासही ती रक्कम असणार नाही व हे केवळ विकास योजनेमध्ये तुमच्या जमीनीवर केवळ उद्यान विकसित केले जाऊ शकते असे म्हणले आहे. त्याचवेळी तुमच्या जमीनीला लागून असलेल्या जमीनी सोन्याच्या खाणी झालेल्या असतात कारण त्यांच्या शेजारी उद्यान असते त्यामुळे तिथून अतिशय उत्तम दृश्य दिसते. आता विकास योजनेमुळे जमीनींचे काय होते याची तुम्हाला एक झलक मिळाली असेल व हा केवळ एकच पैलू नाही, तुमच्या जमीनीला लागून असलेली जमीन स्मशान भूमी, कचरा डेपो किंवा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी आरक्षित झाली तर तुमच्या जमीनीचे मूल्यांकन खराब होऊ शकते, एका दिवसात तुमची जमीन कवडीमोल होऊन जाते कारण स्मशानभूमी किंवा कचरा डेपोशेजारी राहायला कुणाला आवडेल, बरोबर? विकास योजनेमुळे जमीनीची अशी स्थिती होऊ शकते व त्यानंतर आपले रस्ते हे कोणत्याही जमीनीवरील टीडीआर वापरण्याची क्षमता ठरवतात व विकास योजनेमुळे जमीनीवर असे असंख्य परिणाम होतात. विचार करा जर हे वैयक्तिक जमीनधारकाच्या बाबतीत होत असेल तर शहराच्या किंवा प्रदेशाच्या भविष्याच्या बाबतीत त्यामुळे काय होऊ शकते कारण शहराला पायाभूत सुविधांची गरज असते व पायाभूत सुविधांसाठी आगाऊ नियोजन करावे लागते जे शहरासाठी विकास योजनेचे मुख्य काम असते.
आता, तुम्हाला जर डीपीची भूमिका समजली असेल तर पुणे महानगर प्रदेशाकडे वळू कारण तो आपल्या लेखाचा विषय आहे. तर, साधारण आठ वर्षांपूर्वी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली जे पुणे प्रदेशासाठी स्थापित करण्यात आलेले नियोजन प्राधिकरण आहे व तो एक अतिशय शहाणपणाचा निर्णय होता कारण पुणे शहर व पिंपरी चिंचवड (पीसीएमसी) यांना वाढीला मर्यादा येऊ लागली होती व लोकांनी या दोन शहरांच्या सीमेपलिकडे जमीनी पाहाला सुरुवात केली होती व हा विकास नियमित करण्यासाठी पीएमआरडीएची स्थापना करण्यात आली होती. परंतु कोणतेही नियोजन प्राधिकरण हे विकास योजनेशिवाय अपूर्ण असते कारण हे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रम न देता अभ्यास करायला सांगण्यासारखे आहे, जे पीएमआरडीएच्या बाबतीत वर्षानुवर्षे होत राहिले कारण आधी विकास योजनाच नव्हती व नंतर ती तयार होत होती. जवळपास ६००० चौरस किलोमीटरचे क्षेत्र त्यांच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे, पीएमआरडीएची विकास योजना तयार करणे हे एक अवघड काम होते (व वादग्रस्तही) कारण केवळ सध्याच्या विस्ताराचाच विचार करायचा नव्हता तर पुढील किमान २० वर्षांत होणाऱ्या वाढीचा व त्यानुसार लोकांच्या गरजांचा अंदाज बांधायचा होता, जे विकास योजनेचे काम होते. इथेही, पुणे महानगर प्रदेशाची विकास योजना असेल किंवा विलीन झालेल्या कही गावांची (जो स्वतंत्र लेखाचा विषय आहे), त्यासाठी लागणारा वेळ ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे कारण विकास योजना तयार करणे हे अतिदक्षता विभागातील रुग्णावर उपचार करण्यासारखे असते, तुम्ही ही योजना घाईघाईने तयार करू शकत नाही हे मान्य असले तरीही आपल्या शासनकर्त्यांच्या कृपेने रुग्ण केवळ काही दिवसच नाही तर वर्षे आयसीयूमध्ये राहतो. परंतु पुण्याचा नागरी इतिहास पाहा व तुम्हाला समजेल की कोणतीही विकास योजना कधीच निश्चित कालमर्यादेमध्ये पूर्ण झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा कामांसाठी वेळ लागतो हे मान्य आहे, परंतु पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकाराची विकास योजना तयार करण्यासाठी लागणारा नेमका वेळ कुणी मोजला आहे व ती योग्य प्रकारे व योग्य वेळेमध्ये तयार होईल हे पाहण्याची जबाबदारी कुणी घेतली आहे, तर त्याचे उत्तर आहे कुणीच नाही.
नेमका हाच मुद्दा मला ठळकपणे मांडायचा आहे, अनेक महिने व वर्षे निघून जातात व तुम्ही पुण्यासारख्या महत्त्वाच्या प्रदेशाचा डीपी योग्य मार्गावर आहे का याची देखरेख करण्याची तसदीही घेत नाही व अचानक तुम्ही तो रद्द करता, संपूर्ण प्रदेशाचे भवितव्य काय आहे, त्याची वाढ कशी होईल किंवा तुमच्या विकास योजनेचा विचार न करता इथे स्थलांतरित होणाऱ्या लोकांना कसा सामावून घेईल, याचा विचार आपण केला आहे का? सर्वात गमतीचा भाग म्हणजे विकास योजना रद्द करण्यामागचे कारण म्हणजे सरकारला असे वाटते किंवा ते असा विचार करते की या भागामध्ये रस्ते, पाणी, सांडपाण्याची व्यवस्था यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधा नसल्यामुळे इथे नवीन विकासासाठी परवानगी देण्यात अर्थ नाही (आता?)! परंतु सरकारला आधी विकास योजना तयार करून त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यापासून कुणी रोखले आहे किंवा आधी पीएमआरडीएला विकास योजना तयार करायला सांगायची व त्यानंतरच केवळ काम करायला सुरुवात करण्यापासून कुणी रोखले आहे, असा माझा प्रश्न आहे. तुम्ही एका प्रदेशाचा विकास करत आहात, पुणे व पीसीएमसी ही संपूर्ण देशाची शैक्षणिक व करिअरची केंद्रे आहेत, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लाखो लोक इथे स्थलांतर करत आहेत व त्यांनी केवळ इकडे यावे असे सरकारला वाटते, परंतु हे सगळे लोक कुठे राहतील, त्यांना पाणी कोण देईल, त्यांचे सांडपाणी कुठे जाईल, ते त्यांची वाहने कुठे लावतील, हे सगळे प्रश्न विकास योजनेने सोडवणे अपेक्षित आहे. आता तुम्ही विकास योजनाच रद्द केली आहे, परंतु त्यामुळे लोक पुणे प्रदेशामध्ये यायचे थांबणार नाहीत, त्याचे काय? सरकारला विकास योजनेचे महत्त्व समजलेच पाहिजे कारण वाढ ही नैसर्गिक असते परंतु विकास हा नियोजनाचा परिणाम असतो, नाहीतर कोणतीही वाढ केवळ सूज म्हणजेच अनारोग्यकारक ठरते. खरेतर, एखाद्या शहराचा विकास करणे हे एखाद्या लहान मुलाचे पोषण करण्यासारखे असते कारण काळासोबत ते वाढणारच आहे परंतु बाळाची वाढ निरोगी व्हावी असे आपल्याला वाटत असेल तर आपण बाळाला चांगले अन्न व योग्य संस्कार दिले पाहिजेत, नाहीतर बाळाची वाढ होईल परंतु चुकीच्या प्रकारे. बहुतेक गुन्हेगार हे योग्य संस्कार न दिल्यामुळे घडतात, जे पालकांचे काम असते. एक विकास योजना ही शहररूपी बालकावर योग्य संस्कार करण्यासाठी असते व ते मायबाप सरकारचे कर्तव्य आहे ज्यांनी शहरासाठी पालकाची भूमिका पार पाडणे अपेक्षित असते. जर ते हे करणार नसतील तर गुन्हेगारी तत्वांचा शिराकाव होतो यात काही नवल नाही जे आपण झोपडपट्ट्या व अवैध इमारतींच्या रूपाने आधीच सर्वत्र अनुभवत आहोत जी सर्व कायदेशीर वाढ किंवा विकासाला म्हणजेच रिअल इस्टेट उद्योगाला थेट धोका आहे. किमान आता तरी जुनी विकास योजना रद्द झाल्यामुळे, सरकारने पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणासाठी नवीन विकास योजना तयार करण्यासाठी एक कृती योजना व ती तयार करण्यासाठी कालमर्यादा जाहीर केली पाहिजे व तिची अंमलबजावणी केली पाहिजे कारण तरच लोकांना (जे शहाणे आहे त्यांना) असा विश्वास वाटेल की सरकारला पुणे प्रदेश नावाच्या त्यांच्या अपत्याची काळजी आहे!
विकास योजनेविषयीचा हा सर्व गोंधळ पाहिल्यानंतर, आदरणीय लोकमान्य टिळक (कृपया गूगल करा) आज जिवंत असते, तर त्यांनी ज्याप्रमाणे ब्रिटीश सरकारच्या कृतींविषयी त्यांच्या संपादकीयामध्ये, “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” असे खडसावले होते, पण आज त्यांनी लिहीले असते, “सरकारला डोके तरी आहे का?”. लोकमान्य टिळकांची आज प्रकर्षाने आठवण होतेय, एवढे सांगून निरोप घेतो!
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
www.sanjeevanideve.com