Sunday, 15 September 2013

सोयीसुविधांची आरक्षित जागा आणि टाकाऊ जागा



















एक शहर केवळ अपघाताने तयार होत नाही, तो सुसंगत दृष्टीकोन आणि उद्दिष्टांचा परिणाम असतो.”….लिऑन क्रायर

लिऑन क्रायर हा एक वास्तुविशारद, वास्तुविषयक सिद्धांतवादी आणि शहर नियोजक आहे. बांधकामातील आधुनिक विचारप्रणालीचा तो पहिला आणि सर्वात महत्वाचा टीकाकार आहे, प्रामुख्याने कार्यात्मक विभागवार रचना आणि उपनगरीकरणाची खात्री करणे, पारंपरिक युरोपीय शहराच्या नमुन्याच्या पुनर्बांधणीचा प्रचार करणे या मुद्यांवर त्याने भाष्य केले आहे. अमेरिका व युरोप या दोन्ही देशांमध्ये या संकल्पांनाचा नवीन शहरी विकासावर बराच प्रभाव होता. त्याने शहर या गुंतागुंतीच्या शब्दाची किती सोप्या पद्धतीने व्याख्या केली आहे ते पाहा! दुर्दैवाने आपल्या देशातील तथाकथित महानगरे शहरी नियोजनासंदर्भातील जगभरातील ज्ञानाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

मला माझ्या व्यवसायाबाबत एक गोष्ट आवडते ती म्हणजे अभियंता तसेच विकासक असल्याने, आजूबाजूला रिअल इस्टेटविषयी कितीही नकारात्मक टीका-टिप्पणी होत असली तरीही, या क्षेत्रात इतक्या गोष्टी घडत असतात की, त्या खुल्या मनाने पाहिल्यास मला कधीच कंटाळा येत नाही उलट कितीतरी नवीन विचार मनात येतात त्या अनुषंगाने ! अलिकडेच मी शहरी विकासाविषयी वर्तमानपत्रात दोन मथळे वाचले, एक शहराच्या विकासासाठी सिंगापूरचा नमूना अवलंबण्याविषयी होता, देशाच्या सन्माननीय शहरी विकास मंत्र्यांच्या संदर्भाने तो देण्यात आला होता, सिंगापूरने जे केले आहे ते आम्हीही करण्याचा प्रयत्न करु असे ते म्हणाले! अतिशय चांगले स्वप्न आहे मात्र एक स्वप्न व उद्दिष्ट यामध्ये फरक असतो! आपण केवळ स्वप्नच बघत राहतो व डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवत नाही हेच अशा विधानांबाबत माझे निरीक्षण आहे!

केंद्रीय मंत्रालयाच्या पातळीवर जे झाले ते आपल्या पुणे शहरापासून फार लांबचे आहे, म्हणून आता दुस-या बातमीवर लक्ष केंद्रित करु,  रस्त्यांवरील अतिक्रमण  हटविण्याच्या कारवाईत पुणे महानगरपालिका म्हणजेच मनपाने जप्त केलेले साहित्य ठेवण्यासाठी सोयीसुविधांची आरक्षित जागा वापरण्याविषयी ती बातमी होती. थोडक्यात त्यांना टाकाऊ सामानासाठीच्या जागा बनवायचे! ब-याच जणांना आश्चर्य वाटेल की या बातमीचे काय महत्व आहे व शहर नियोजनाशी तिचा काय संबंध आहे? त्यासाठी आपल्याला सोयीसुविधांसाठीची जागा ही संकल्पना समजून घ्यावी लागेल व त्यानंतर आपल्याला शहराच्या नियोजनाचे महत्व समजेल. सोयीसुविधांसाठीची जागा म्हणजे प्रत्यक्ष ठिकाणची, सार्वजनिक किंवा खाजगी, अंतर्गत किंवा बाह्य जागा जी सक्रिय किंवा अपत्यक्षपणे पायाभूत सुविधांसाठी वापरली जाते. सोप्या शब्दात सांगायचे तर मोठ्या निवासी, व्यावसायिक किंवा सार्वजनिक वापराच्या प्रकल्पांमध्ये, पायाभूत सुविधांसाठीच्या इमारती बांधण्यासाठी मर्यादित असलेली जागा. ही जागा अशा कामांसाठी वापरली जाते जी समाजासाठी किंवा आजूबाजूच्या परिसरासाठी उपयोगी ठरतील, उदाहरणार्थ टपाल कार्यालय, रुग्णालय, बाजार किंवा अग्निशमन दलाचे कार्यालय किंवा एखादी शाळा, ही यादी बरीच मोठी आहे. प्रत्येक शहरास त्याच्या दैनंदिन गरजांसाठी ब-याच सुविधांची गरज असते व जसे शहर वाढत जाते तशा या गरजाही वाढत जातात. आजकालच्या जीवनात जमीन ही अतिशय दुर्मिळ बाब आहे त्यामुळे जमीनीच्या उपलब्ध असलेल्या प्रत्येक तुकड्याचा योग्य वापर करणे अतिशय महत्वाचे आहे. हा पैलू विचारात घेऊन मनपाने विस्तारित सीमा ४०,००० चौ.फूट. पेक्षा अधिक असलेल्या जमीनीवरील कोणत्याही विकासासाठी अशा प्रकारच्या सोयीसुविधांसाठी १५% जमीन राखीव ठेवणे बंधनकारक केले आहे. ही जमीन विकासकास मनपाला हस्तांतरित करावी लागते, व तिने ही जमीन वर नमूद केलेल्या उद्देशाने वापरणे अपेक्षित आहे. एका दृष्टीने हा अतिशय चांगला विचार आहे मात्र दुसरीकडे हा विकासकावर अन्याय आहे, कारण यामुळे त्याला त्याच्या जमीनीचा काही भाग द्यावा लागतो, त्या भागासाठी टीडीआरही मिळत नाही तसेच एफएसआय वापरण्यासाठीची जागाही कमी होते, ज्यामुळे सरतेशेवटी उर्वरित जमीनीवर ताण पडतो. त्याशिवाय विकासकाला या जागेच्या भोवताली कुंपणासाठी भिंत बांधावी लागते व सदर जमीनीच्या मालकीसाठी ७/१२ वर पीएमसीच्या नावे नोंद करावी लागते! आता यातील विनोदाचा भाग असा की जुन्या किंवा सध्याच्या पीएमसी मर्यादेवर, जमीन सुमारे ३,००,००० चौ.फूट म्हणजेच ३ हेक्टर पेक्षा अधिक नाही तोपर्यंत, ही आवश्यकता नव्हती किंवा नाही! हे एका दृष्टीने योग्य आहे कारण जेव्हा विकास योजना तयार नव्हती तेव्हा ही कृती योग्य होती, ज्याद्वारे नव्या भागास सोयीसुविधांच्या हेतूने पुरेशी जागा मिळेल मात्र या नव्या भागासाठी विकास योजना तयार झाल्यानंतर जमीनीच्या प्रत्येक तुकड्यातून सोयीसुविधांसाठी जागा घेण्याची काय गरज आहे हे मला समजत नाही? विकास योजनेमध्ये शहराच्या पायाभूत सुविधांच्या गरजांसाठी आवश्यक असलेली सर्व आरक्षणे आहेत!

पण असो, सरकारसमोर काहीही युक्तिवाद करुन फायदा नाही त्यामुळे सोयीसुविधांसाठी १५% जागा  हि द्यावीच लागणार आहे, मात्र ही जागा ज्या कारणाने राखून ठेवण्यात आली आहे त्यासाठीच तिचा उपयोग होईल हे पाहण्याची जबाबदारी कुणाची आहे? विनोद म्हणजे सोयीसुविधांसाठीच्या अशा शेकडो जागा आधीपासूनच पीएमसीच्या ताब्यात आहेत, मात्र माझ्या माहितीत क्वचितच एखादी जागा असेल जी प्रत्यक्ष  कोठलीतरी सुविधांची इमारत बांधण्यासाठी वापरण्यात आली आहे.

आता आपण बातमी वाचतो की पीएमसी रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी केलेल्या अतिक्रमविरोधी कारवाईमध्ये जप्त केलेले साहित्य अशा जागांमध्ये टाकणार आहे! त्यात काही चुकीचे नाही कारण ती जागा पीएमसीच्या मालकीची आहे व पीएमसी ती वापरु शकते, मात्र राज्यकर्त्यांनी ती सार्वजनिक मालकीची आहे व हे विचारात घेऊनच तिचा काटेकोरपणे वापर केला पाहिजे असा विचार केला आहे का ? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हे साहित्य कशा प्रकारे टाकले जाते व कालांतराने ही डंप यार्ड (सामान टाकून देण्यासाठीचा जागा) किती घाणेरडी व अजागळ होतात! सोयीसुविधांसाठी जागा घेताना हाच उद्देश असतो का? अशा डंपिंग यार्डच्या परिसरातील नागरिकांना होणा-या त्रासाची जबाबदारी कोण घेईल? पीएमसीमधील कुणीही नेता अशा जागा ज्या हेतूने घेण्यात आल्या होत्या त्यासाठीच वापरल्या जाव्यात यासाठी आवाज का उठवत नाही? एकीकडे सरकार पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी पुरेसे पैसे नसल्याचे रडगाणे गाते व दुसरीकडे त्यांच्या ताब्यात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या जमीनी टाकाऊ सामान  ठेवण्यासाठी वापरल्या जाणार आहेत !

आपले राज्यकर्ते घाईघाईने आरक्षित जागा अशा निरुपयोगी कारणांसाठी वापरण्याचा निर्णय घेतात, त्यांना असा निर्णय घेण्याची शक्ती व अधिकार आहे हे मान्य असले तरी ही शक्ती व अधिकार जमीनीचा अनेक चांगल्या हेतूने वापर व्हावा यासाठी का उपयोगात आणत नाहीत? माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न येतो. सध्या शहरात अनेक पायाभूत सुविधा नाहीत उदाहरणार्थ पीएमपीएमएल बसचे पार्किंग, या बस सध्या रात्री रस्त्याच्या कडेने लावल्या जातात, तसेच संपूर्ण शहरात गरजूंसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधा, या शहराला अनेक गोष्टींची तातडीने गरज आहे.  पीएमसी सर्व सोयीसुविधांच्या जागांसाठी विकासाची प्रस्तावित योजना प्रसिद्ध करुन, त्या जागा संबंधित विकासकासोबत विकसित का करत नाही? ती अशा बांधकामासाठी त्या विकासकास प्रत्यक्ष किंवा टीडीआरच्या स्वरुपात भरपाई देऊ शकते. यामुळे किमान सोयीसुविधांच्या जागांचा खात्रीशीरपणे योग्य वापर केला जाईल व शहरास अतिशय आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधाही मिळतील!

या मुद्याचा रिअल इस्टेटच्या किमतींशीही अतिशय जवळचा संबंध आहे, कारण ज्याठिकाणी सर्व पायाभूत सुविधा विकसित आहेत तिथल्या घरांच्या किमती अतिशय जास्त असतात व आपण जर सोयीसुविधांसाठीच्या जागांचा व्यवस्थित वापर केला तर संपूर्ण शहरात चांगल्याप्रकारे वितरित, संतुलित सामाजिक पायाभूत सुविधा विकसित होऊ शकतील. यामुळे अखेरीस शहरातील व आजूबाजूची घरे सामान्य माणसाला परवडणारी व्हायला मदत होईल. यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून जागरुकता निर्माण होणे व आवाज उठवला जाणे आवश्यक आहे, म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांना तो ऐकावाच लागेल व सोयीसुविधांच्या जागेसाठी काहीतरी पावले वेगाने उचलावी लागतील! क्रायर याने म्हटल्याप्रमाणे एक चांगले शहर अपघाताने तयार होत नाही, तर ते सुनियोजित प्रयत्नांचा परिणाम असते व हे एक चांगले शहर बनविण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे, नाहीतर आपल्या प्रिय शहराचे नागरिक होण्याचा आपल्याला अधिकार नाही

लक्षात ठेवा आज सोयीसुविधांच्या जागेवर टाकाऊ सामान टाकले जात आहे, उद्या संपूर्ण शहर टाकाऊ सामान टाकण्याची जागा होईल व तेव्हा फार उशीर झालेला असेल व त्यासाठी आपणच दोषी असू!


संजय देशपांडे


https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif

संजीवनी डेव्हलपर्स

Thursday, 5 September 2013

गृह कर्ज !






















घर घेणे ही संपत्तीची कोनशिला आहे- त्यामुळे आर्थिक संपन्नता व भावनिक सुरक्षा दोन्हीही मिळते.... सुझे ऑर्मन

सुझॅन लिन सुझे ऑर्मन ही अमेरिकी लेखिका, आर्थिक सल्लागार, प्रेरणादायी व्याख्याने देणारी व टीव्हीवरील अर्थविषयक कार्यक्रमांची सूत्रसंचालिका आहे. लोक घर खरेदी का करतात व बँकांसाठी वित्तपुरवठ्यापैकी गृह कर्ज हा इतका जिव्हाळ्याचा विषय का आहे हे अतिशय नेमक्या शब्दात तिने मांडले आहे!
मी काही वित्त पुरवठा क्षेत्रातील तज्ञ नाही व माझी खात्री आहे की माझ्यासारख्या अनेकांना त्यातले फारसे काहीही समजत नाही, किंवा या देशातील विविध नोक-यांमध्ये तासंतास मेहनत करणारे लाखो लोक प्रामुख्याने केवळ दोनदाच वित्त पुरवठ्याविषयी विचार करतात, एक म्हणजे वाहन खरेदी करताना, दुसरे म्हणजे घर खरेदी करताना! आर्थिक मंदीच्या काळात, आता याचा नेमका अर्थ काय हे मला माहिती नाही मात्र सर्व माध्यमांमध्ये याचीच चर्चा होतेय म्हणून हा शब्द वापरला, वित्त पुरवठ्याविषयी दोन बातम्या नुकत्याच ठळकपणे वर्तमानपत्रात झळकल्या. एक वाहन खरेदी वित्त पुरवठ्याविषयी होती व दुसरी गृहकर्जाविषयी रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वांसाठीची होती! वाहन खरेदी हा आपला विषय नाही मात्र गृह कर्जाकडे आपल्याला दुर्लक्ष करुन चालणार नाही, अर्थात वाहन खरेदी वित्त पुरवठ्याचा एका अर्थाने घरांची योजना किंवा प्रकल्पांवर परिणाम होतोच मात्र तो पूर्णपणे वेगळा विषय आहे, त्यामुळे त्याविषयी नंतर कधीतरी बोलू!

गृह कर्जाच्या नव्या मार्गदर्शक तत्वांविषयी चर्चा करण्यापूर्वी रिअल इस्टेटमध्ये काय परिस्थिती आहे हे एका सामान्य माणसाच्या नजरेने समजून घेऊ. अगदी अलिकडच्या काळापर्यंत म्हणजे ८० च्या दशकाच्या शेवटापासून ते ९० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत गृह कर्जाच्या क्षेत्रात एचडीएफसी, एलआयसी हाउसिंग फायनान्स किंवा दिवाण हाउसिंग यासारखी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नावे होती. राष्ट्रीयकृत बँकांनी या क्षेत्राकडे फारसे लक्ष दिलेले नव्हते. तेव्हा देखील बांधकाम व्यावसायिकांना वित्त पुरवठा आजच्यासारखाच निषिद्ध होता! सदनिका खरेदी करण्यासाठी केला जाणारा वित्त पुरवठाही घराच्या एकूण किमतीच्या केवळ ६०% ते ७०% इतकाच असायचा. कर्जाचे प्रकरण मंजूर करुन घेणे हे माउंट एव्हरेस्ट चढण्याएवढे कठीण असायचे व कर्ज वितरित होणे हे माउंट एव्हरेस्टवरुन सुरक्षितपणे परतण्यासारखे असायचे! या संपूर्ण प्रक्रियेला महिने काही वेळा वर्षही लागायचे. कर्जासाठी पात्रतेचे निकष अतिशय कडक होते व केवळ सरकारी किंवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे कर्मचारीच हे निकष पूर्ण करु शकत असत, त्यामुळे रिअल इस्टेटचा ग्राहकवर्ग अतिशय मर्यादित होता

२००० सालच्या सुरवातीपासुन अर्थव्यवस्था बरीचशी खुली व्हायला सुरुवात झाली होती व प्रत्येक वित्त संस्थेला गृह कर्ज क्षेत्राचे महत्व व त्यातील प्रचंड क्षमता लक्षात आली होती. त्यामुळे स्टेट बँकेसारख्या राष्ट्रीयकृत बँकाही यात उतरल्या व बरोबरीने आयसीआयसीआयसारख्या व इतर खाजगी बँकाही यामध्ये उतरल्या. यामुळे या क्षेत्रात बराच निधी आला. मोबाईल क्षेत्रात जसे झाले तसेच या क्षेत्रातही झाले, त्याचा फायदा ग्राहकांना झाला. कारण स्पर्धेमुळे व्याजदर कमी झाले तसेच पात्रतेचे निकषही शिथील करण्यात आले. ग्राहकवर्ग वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती व प्रस्ताव दिले जातात. अशा सर्व योजनांमध्ये घर घेण्यासाठी गाहकांचे स्वतःचे योगदान ही सर्वात प्रमुख अडचण होती. ९० च्या दशकाच्या तुलनेत आता सदनिका खरेदी करणारी प्रामुख्याने नवीन पिढी होती व त्यांची बचतही तुलनेने कमी होती व अतिशय कमी जण घराच्या एकूण किमतीच्या ३०% ते ४०% रक्कम भरण्याचा निकष पूर्ण करु शकत होते. त्यामुळे हा निकष शिथील करण्यात आला व काही प्रकरणांमध्ये तो ५% च्याही खाली गेला, याचा अर्थ असा की तुम्हाला घराच्या एकूण किमतीच्या केवळ ५% रक्कम भरावी लागेल व उरलेली रक्कम वित्त संस्था कर्ज म्हणून देतील! अशाप्रकारच्या योजनांमुळे स्वाभाविकपणे गृहकर्ज सर्वात लोकप्रिय झाले, कारण आपल्या देशात अजूनही घर ही एक भावनिक बाब आहे, केवळ उपयोगी वस्तू नाही! दिलेल्या कर्जाच्या मोबदल्यात बँक अख्खे घर तारण ठेवते, मग कर्जाची रक्कम कितीही लहान असो! सातत्याने वाढती लोकसंख्या व मर्यादित जमीन यामुळे जमीनीचे दर वाढण्याचाच कल आहे व तो भविष्यातही कायम राहणार आहे. याचा अर्थ वित्त संस्थांकडे तारण असलेल्या मालमत्तेचे मूल्य वाढतच राहणार आहे, थोडक्यात एखाद्यासाठी हा अतिशय सुरक्षित सौदा असू शकतो! त्यानंतर आगाऊ रक्कम देण्यासारख्या योजना आल्या, म्हणजे तुमची बँक तुमच्या विकासकाला जवळपास सर्व पैसे आगाऊ देते व तुम्हाला कर्ज देण्यात आल्यानंतर लगेच ईएमआय (समान मासिक हप्ता) सुरु होतो. एरवी सामान्य प्रकरणात हा हप्ता भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सुरु झाला असता, त्यामुळे प्रकल्पाचा पूर्ण होण्याचा कालावधी दोन वर्षांचा असेल तर ग्राहकाला दोन वर्षे केवळ कर्जावरील व्याज भरावे लागले असते, जो एका अर्थाने त्याचा तोटा होता! माझ्यासारख्या वित्तीय पार्श्वभूमी नसलेल्या माणसासाठी ईएमआय म्हणजे सोप्या शब्दात कर्जाच्या मुद्दलाची परतफेड.  अशाप्रकारच्या योजना विकासकालाही प्रिय होत्या कारण त्याला सर्व पैसे आगाऊ वापरण्यासाठी मिळायचे. एक गोष्ट मला तेव्हा किंवा अगदी अजूनही समजलेले नाही की वित्तीय संस्था घराच्या ग्राहकास कर्जपुरवठा करण्यास उत्सुक असतात, तर मग त्या विकासकालाच वित्तपुरवठा का करत नाहीत? आजही कोणतीही बँक जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज देत नाही किंवा रिअल इस्टेट हे प्राधान्य असलेले क्षेत्र नाही. या उद्योगासाठी जमीन ही कच्च्या मालाप्रमाणे आहे, कोणत्याही प्रकल्पाच्या किमतीमधील मुख्य खर्च हा जमीनीचाच असतो. स्वाभाविकपणे बांधकाम व्यवसायिकास अतिशय चढ्या दराने बाहेरुन कर्ज घ्यावे लागते व हे टाळण्यासाठी त्याला आगाऊ गृह कर्जासारख्या योजनांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे हा तोडगा विकासक, ग्राहक व कर्ज पुरवठादार या सर्वांचाच फायद्याचा असल्यासारखा होता, शिवाय या स्कीममध्ये बरेचसे पैसे आगाऊ मिळत असल्याने विकसक सुद्धा घरांच्या किमतींवर चांगल्यापैकी सवलत देऊ शकत होते!

मात्र यामध्येच काही गोष्टींचा अतिरेक झाल्याने, नुकतीच काही मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आली.  गृह कर्जातील आगाऊ रक्कम देण्याच्या योजनेमध्ये काही गोष्टींचा विचार करण्यात आला नव्हता, त्या म्हणजे बांधकाम व्यावसायिकाच्या सदनिकांचे पुरेसे आरक्षण झाले नाही तर काय? याचा अर्थ असा की प्रकल्पासाठी पुरेसा निधी मिळणार नाही व त्यामुळे तो प्रकल्प वेळेत पूर्ण करु शकणार नाही? किंवा एखाद्या कायदेशीर समस्येमुळे प्रकल्पाच्या कामकाजात अडथळा आला तर काय किंवा बांधकाम व्यवसायिकाने त्याला आगाऊ मिळालेले पैसे त्याच प्रकल्पासाठी वापरले नाहीत व दुस-याच प्रकल्पासाठी वापरले व त्याच्या ग्राहकांना ज्या प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्यात आला आहे तो अडचणीत आला तर काय?

माझ्या मते याच कारणाने आरबीआयने आगाऊ वित्त पुरवठ्यासारख्या योजनांचे निकष कडक केले व सकृत दर्शनी त्यात काहीही चुकीचे नाही, मात्र नेहमीप्रमाणे आपण मुख्य समस्येकडे दुर्लक्ष करत नाही का? सर्वप्रथम आपण घर खरेदी करणा-यांना कर्ज पुरवठा का करत आहोत हे ठरविले पाहिजे, अर्थातच थोडेफार पैसे कमावणे हा त्यामागचा उद्देश आहे, मात्र केवळ तेच एक उद्दिष्ट नसावे. या देशातल्या लाखो लोकांसाठी घर ही एक जीवनावश्यक बाब आहे, मूलभूत गरज आहे व आपला जगण्याचा हक्क आहे. त्यामुळे जे खरोखर अतिशय गरजू आहेत त्यांना घर परवडावे हे उद्दिष्ट असावे व त्यानुसार धोरणे तयार केली पाहिजेत. सुरुवातीला गृह कर्ज केवळ श्रीमंतांनाच मिळायचे मात्र थोडी उदार धोरणे आल्यानंतर ते सामान्य माणसालाही परवडू लागले, त्यामुळेच अनेक लोक अलिकडच्या काळात घर घेऊ शकले. या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही व आपण जर विकासकांना जमीनीसाठी कर्ज पुरवठा करणार नसू व रिअल इस्टेट क्षेत्राला प्राधान्य देणार नसू तर घरे परवडणार कशी, घराचा ग्राहक वित्त पुरवठ्याची तरतूद कशी करणार आहे हा प्रश्न आपण आरबीआयला विचारायला हवा!

इथे आपण एखाद्या सुरक्षित उपायाचा विचार करु शकत नाही का किंवा विकासकाने प्रकल्प पूर्ण करण्याविषयी दिलेली आश्वासने किती पूर्ण केलेली आहेत याचा विचार करुन, त्याची पार्श्वभूमी तपासून व त्यानंतर बँकांना आगाऊ रक्कम देणा-या वित्तपुरवठा योजना तयार करायला सांगू शकत नाही का? त्याशिवाय आरबीआय रिअल इस्टेटचा प्राधान्य दिल्या जाणा-या वित्तीय क्षेत्रात का समाविष्ट करु शकत नाही व त्यानुसार धोरणे का तयार करत नाही, कारण घरे मोठ्या संख्येने आवश्यक असतात. असे झाल्यास विकासकाकडे स्वतःचा पुरेसा निधी असेल व त्याला अशा आगाऊ रक्कम देणा-या योजनांची गरजच पडणार नाही व पर्यायाने गृह कर्जाची समस्या सुटेल. अशी धोरणे तयार करणे ही काळाची गरज आहे व अशा प्रकल्पांसाठी देण्यात आलेला निधी केवळ त्याच प्रकल्पांसाठी व व्यवस्थितपणे वापरला जाईल हे पाहण्यासाठी योग्य नियंत्रण असणे आवश्यक आहे. मात्र सद्य निर्देश पाहता, जे सर्वजण कायदे व नियमांचे पालन करुन पूर्ण समर्पणाने व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे!  

मी नेहमी म्हटल्याप्रमाणे, सर्वजण कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी दोषी आहेत असे गृहित धरुन कोणताही नियम किंवा धोरण बनवले जाऊ नये, मात्र असा कायदा किंवा धोरण बनविण्यामागे आपले काय उद्दिष्ट आहे, आपल्याला कसा परिणाम हवा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. पुन्हा एकदा हे झालेले नाही व आधीच आजारपणाकडे वाटचाल करत असलेल्या रिअल इस्टेट उद्योगावर याचा अजुनच नकारात्मक परिणाम होणार आहे. एकीकडे या उद्योगाला स्थानिक तसेच राज्याच्या गृहनिर्माण व शहरी विकासाबाबतच्या धोरणांमधील त्रुटींना तोंड द्यावे लागत आहे; परवानगीची प्रक्रिया, त्यासाठी लागणारा वेळ प्रकल्पाच्या खर्चात भर घालतो व आता वित्त पुरवठा क्षेत्राकडूनही पाठिंबा मिळणार नसेल तर मग विशेषतः महानगरांमध्ये घरांची सतत वाढती मागणी आम्ही पूर्ण करु शकू अशी अपेक्षा कशी करता येईल? आरबीआयच्या नव्या गर्व्हनरनी नुकताच पदभार स्वीकारला आहे व रिअल इस्टेट क्षेत्राने आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, म्हणजे ते शहरी भारतातील या सर्वात महत्वाच्या क्षेत्राला नवी भरारी देऊ शकतील!

रिअल इस्टेट क्षेत्राचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे, नाहीतर सामान्य माणसाचे घराचे स्वप्न केवळ स्वप्नच राहील व त्यास आपण कारणीभूत होऊ!

https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif
संजय देशपांडे

Smd156812@gmail.com


संजीवनी डेव्हलपर्स

Sunday, 1 September 2013

जंगल नावाचे पुस्तक वाचताना !






















मी जेव्हा काही क्षण समुद्र किना-यावर किंवा डोंगरांवर किंवा एखाद्या शांत जंगलामध्ये घालवतो, तेव्हा यासाठीच पर्यावरणाचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते …. बिल ब्रॅडली

विल्यम वॉरेन बिल ब्रॅडली हा अमेरिकन हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट बास्केटबॉलपटू आहे, तो होड्सचा विद्यार्थी व तीन वेळा डेमोक्रॅटिक पक्षाचा न्यू जर्सीचा सिनेटरही होता. त्याने पर्यावरणाविषयी विशेषतः जंगलांविषयी घेतलेली भूमिका सर्वज्ञात आहे! त्याने म्हटल्याप्रमाणे मी देखील माझ्या स्वतःचे असे काही क्षण अनुभवण्यासाठी नेहमी जंगलात जातो. अशी प्रत्येक सफर जंगल नावाच्या पुस्तकाचे आणखी एक पान वाचण्यासारखी असते व त्याच्या पुढील पानावर काय असेल याची उत्सुकता आपल्याला कायमच असते! जंगलाची प्रत्येक सफर करताना मला असेच वाटते. मी अलिकडेच मध्यप्रदेश वनविभागास कान्हा व पेंच येथे काही तांत्रिक मुद्यासंदर्भात फ़ॊरेस्ट डीपार्टमेंटला मदत करण्यासाठी या जंगलांमध्ये गेलो होतो. पेंच येथील जंगलात गेम रेंजर श्री. तिवारी यांच्यासोबत एक फेरफटका मारत असताना एक अतिशय रोमांचक घटना घडली. आम्ही आरामात जंगलात फिरत होतो, तेव्हा जवळपास २०० चितळांचा (ठिपकेदार हरिण) एक कळप रस्त्यावर चरत होता व आम्हाला काही समजण्याच्या आत एक मोठी वाघीण अक्षरशः  कळपाच्या मधुन आली, मात्र तिने त्यांच्याकडे पाहिलेही नाही, ती आपल्याच नादात चालत सरळ आमच्या दिशेनी आली आणि जंगलात लुप्त झाली! क्षणभर आम्ही थक्क होऊन, मंत्रमुग्ध होऊन पाहात होतो, इतके की मी माझा कॅमेरा उचलून छायाचित्रे घेण्याचेही विसरुन गेलो! या अनुभवामुळे वाघ दिसण्याबाबतच्या माझ्या मतावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले, की जेव्हा तुम्हाला वाघ दिसण्याची अपेक्षा नसते तेव्हा तुम्हाला तो हमखास दिसतो!
उत्साहाच्या भरात मी शक्य तेवढी छायाचित्रे काढली व खोलीवर परतल्यानंतर मी काय छायाचित्रे काढली हे तपासले. त्यानंतर वाघीण चितळांच्या कळपास ओलांडून जातानाचे छायाचित्र मी घेतले होते, या छायाचित्राला पाहताच माझ्या मनात मथळा सुचला मी माझ्या गरजांसाठी जगते, हव्यासासाठी नाही वाघीणीचे पोट भरलेले होते त्यामुळे तिला उगाच हरिणांना मारण्यात रस नव्हता, इथेच निसर्गातील प्राणी मानवापेक्षा सरस ठरतात. आपण अन्न किंवा पैशामागे लागतो, आपल्यापैकी ब-याच जणांसाठी काहीही पुरेसे नसते व आपल्या सभोवतालाच्या निसर्गाचा -हास होण्याचे हेच मुख्य कारण आहे! आपल्याला जगण्यासाठी आपल्या हव्यास पूर्ण होणे आवश्यक असते तर वाघासारख्या हिंस्त्र श्वापदालाही जगण्यासाठी केवळ गरजा पूर्ण होणे आवश्यक असते! मी ही छायाचित्रे सँक्च्युरी एशियाच्या फेसबुक पेजवरपण टाकली व त्याला वेगवेगळ्या प्रतिक्रियांद्वारे प्रचंड प्रतिसाद मिळाला. फेसबुकवर किती लाईक किंवा डिसलाईक मिळाल्या यावरुन एखाद्या गोष्टीचे किंवा कृतीचे यश मोजणा-या व्यक्तिंपैकी मी नाही, मात्र सँक्च्युरी एशियाचे फेसबुक पेज केवळ वेळ घालविण्यासाठी किंवा मजा म्हणून तयार करण्यात आलेले नाही. वन्यजीवनातील काही सर्वोत्तम क्षण, वन्यजीवन संरक्षणाच्या क्षेत्रातील ज्येष्ठांशी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हे अतिशय चांगले व्यासपीठ आहे! अशा लोकांकडून तुमच्या छायाचित्रावर काही प्रतिक्रिया मिळणे म्हणजे तुमची छायाचित्रे खरोखरच गांभिर्याने काढण्यात आली आहेत याचीच पावती असते. यावेळी मी माझ्या सफारी विषयी नेहमीप्रमाणे लिहीण्याऐवजी, त्या छायाचित्रांवर देण्यात आलेल्या प्रतिक्रियांबाबत माझ्या टिप्पण्या एकत्र केल्या आहेत! माझ्या अशा प्रकारच्या पहिल्या टिपणीची (शेअर-अपची) सुरुवात पाहू...
मित्रांनो, नीरव, शांत पेंच जंगलात कामानंतर आरामात फेरफटका मारत आहे, बुरबुर पाऊस पडतोय, इथली ताजी हिरवीगार हवा व उबदार सूर्यप्रकाशही अनुभवतोय. वाघ पाहण्यासाठी वेडावलेल्या पर्यटकांच्या गोष्टी व जंगलातील कर्मचा-यांचे अनुभव ऐकतोय, आणि अचानक रस्त्यावर उभ्या असलेल्या सुमारे २०० चितळांच्या कळपातून एक मोठी वाघीण आली, इकडे तिकडे पाहता, सरळ आमच्या दिशेने चालत आली! त्यावेळी चितळही शांत होते, कोणीही धोक्याचा इशाराही दिला नाही! आम्ही सर्वच जण त्यामुळे एवढे आश्चर्यचकित झालो की मी काही वेळ कॅमेरा उचलून छायाचित्रे काढण्याचेच विसरलो. त्या जंगलाच्या राणीच्या चालीचा रुबाबच तसा होता! तुम्ही जेव्हा एका मोठ्या वाघीणीच्या साम्राज्यात, तिला इतक्या जवळून, तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहता तेव्हा तो मोहिनी घालणारा अनुभव असतो.... तुम्हाला असे वाटते की तिच्या शक्तिशाली हिरव्या डोळ्यांच्या जादूने तुम्हाला बांधून ठेवले आहे, ती तुम्हाला तिच्या रस्त्यातून बाजूला व्हायला सांगतेय व तुमच्याशी किंवा तुमच्या कॅमे-याशी तिला जराही घेणे देणे नाही! मी शेकडो वाघ पाहिले आहेत, व महान जिम कॉर्बेटने म्हटल्याप्रमाणे, मला त्यातील प्रत्येक वाघ आठवतो कारण प्रत्येक भेटीत काही तरी वेगळे पाहायला मिळते त्यामुळे ती अविस्मरणीय ठरते. जंगलाचा प्रत्येक पैलू विशेष असतो, अगदी एखादा लहानसा कीटक किंवा एखादे जंगली फूलही तेवढेच महत्वाचे असते, तरीही काही दृष्ये ही इतर दृष्यांपेक्षा वेगळी असतात, काही सर्वोत्तम असतात! ऑगस्टमध्ये गेल्या आठवड्यात पेंचच्या जंगलातील हा अनुभव होता, तिथे वनविभागाला मदत करायला गेलो होतो. गेम रेंज अधिकारी श्री. तिवारी यांचे काम खरोखर वाखणण्याजोगे आहे, ते अतिशय चांगले क्षेत्र अधिकारी आहेत, माहिती देण्याबाबत ते नेहमी उत्साही असत. अशी दृष्ये व घटना पुन्हा पुन्हा या जंगलात खेचून आणतात, ज्यामुळे त्या हिरव्या डोळ्यांची मोहिनी पुन्हा अनुभवता येईल, किमान माझ्याबाबतीत तरी असे घडते.
असे अनुभव सांगितल्याने जागरुकता निर्माण होते, ज्ञान मिळते असे मला वाटते, त्यामुळे कुणाचा तरी फायदा होतो, व सरतेशेवटी निसर्गाला त्याचा लाभ होतो, ही छायाचित्रे सर्वांना दाखविण्यामागचा उद्देश हाच आहे. वाघीण दिसायच्या थोड्याच वेळ आधी  मी आणि श्री. तिवारी चर्चा करत होतो की जंगल पर्यटनामधील विसंगती म्हणजे लोक जीवतोड करुन वाघ शोधत असतात मात्र त्या उत्साहात जंगलाचे सौंदर्य अनुभवायचे विसरुन जातात! मात्र हा दुर्मिळ प्राणी व त्याचे सौंदर्य यातच त्याचे उत्तर दडलेले आहे, तो सहजपणे दिसला असता तर त्यातली मजा निघून गेली असती हे देखील तितकेच खरे आहे! अशा दृष्यांमधूनच आपल्याला निसर्ग व त्याच्या वर्तनाविषयी अधिक माहिती समजते, खरं म्हणजे मला कॅमेरा काढायला क्षणभर उशीरच झाला होता. ती वाघीण अक्षरशः त्या चितळांना ओलांडून आली व तिने त्यांच्याकडे एकदाही पाहिले नाही! आमच्यासाठी ते अविश्वसनीय होते, मात्र चितळांना ते कदाचित माहिती असावे कारण त्यातल्या एकानेही धोक्याचा इशारा दिला नाही! मी इतक्यावर्षांपासून जंगलात जात आहे, मात्र दरवेळी काही तरी नवीनच अनुभव मिळतो व म्हणूनच कदाचित ती सर्वोत्तम शाळा आहे, प्रत्येक क्लासमध्ये काहीतरी नवीन शिकवणारी!
अगदी जंगलाचे अधिकारी सुद्धा म्हणाले की त्यांच्या इतक्या वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी वाघीण चितळांच्या कळपातून चालत येत आहे व तरीही चितळ आरामात असल्याचे दुर्मिळ दृश्य पाहिलेले नाही. मात्र अशाच प्रकारची अनेक दुर्मिळ दृश्ये त्यांना दररोज दिसतात, कारण जंगलात नेहमी असे काही ना काही घडतच असते!
 आमच्यासारख्या नेहमी जंगलात जाणा-या लोकांना मित्रमंडळी व कुटुंबियांकडून एक प्रश्न नेहमी विचारला जातो की, तिथे असे काय आहे ज्यामुळे तुम्ही वारंवार जाता?" त्याचे उत्तर या सर्वांपलिकडचे आहे! आम्ही दरवेळी काही तरी नवीन अनुभव घेऊन येतो व आम्ही जेव्हा जंगलात प्रवेश करतो तेव्हा काय घेऊन परत येणार आहोत हे माहिती नसते! माहिती नसलेले जाणून घेण्याची ही भावनाच आम्हाला जंगलात वारंवार यायला लावते, प्रत्येक वेळी वाघच असायला पाहिजे असे नाही, अगदी फुलपाखरु किंवा एखादे जंगली फूल पाहणे देखील रोमांचक अनुभव असू शकतो व ते जंगलासाठी तितकेच महत्वाचे आहेत. जंगलाविषयी वाटणा-या या जिव्हाळ्यातूनच असे अविस्मरणीय क्षण मिळतात व यातूनच जंगल टिकण्याची आशा निर्माण होते असे मला वाटते! केवळ जंगलात जाऊन त्याचे सौंदर्य न्याहाळणेच महत्वाचे नसते तर आपली त्याच्याबाबतीत व जंगलाच्या यंत्रणेचा भाग असलेल्या प्रत्येकाच्या बाबतीतली जबाबदारी त्याहून कित्येक पटींनी जास्त आहे. चला तर मग एकजूट होऊन काम करु व जंगलांमध्ये वाघ व इतर प्रजातींना सुरक्षित करु!
 मी दिलेल्या शब्दाला जागत, आमचा संजीवनी ग्रुप वन्यजीव संरक्षणातील आमची जबाबदारी पार पाडण्यासाठी नेहमी प्रयत्न करतो. नुकत्याच अशाच एका कार्यक्रमात कान्हातील शाळेत जाणा-या मुलांना शाळेचे दप्तर व पाण्याची बाटली असे जवळपास १५० संच वाटले. त्यापैकी बहुतेक मुले अभयारण्यात काम करणा-या स्थानिक वाटाड्यांची तसेच बैगा आदिवासींची होती. एका छोटेखानी समारंभात आम्ही ते संच कान्हा अभयारण्याच्या वाटाड्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींच्या हाती सुपूर्द केले. कान्हा अभयारण्याचे संचालक श्री. जसबीर चौहानही त्याप्रसंगी उपस्थित होते. मित्रांनो मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे, आम्ही किती समाजकार्य करत आहोत हे दाखविण्यासाठी मी ही माहिती येथे दिलेली नाही, मात्र यामुळे कुणाला तरी प्रेरणा मिळू शकते व या चांगल्या हेतूला थोडासा हातभार लागू शकतो म्हणुन हे शेअरिंग आहे ! आपण केवळ मौज म्हणून आपल्या मुलांसाठी आठवड्याच्या कोणत्याही दिवशी maa^लमध्ये जाऊन काहीही खरेदी करत असतो, तो केवळ आपला हव्यास असतो, ती आपली गरज नसते, कान्हासारख्या ठिकाणच्या लोकांच्या गरजा आपण विसरुन जातो. तिथे शाळेत  जाणा-या अनेक मुलांनी कधी दप्तरही पाहिलेले नाही! जंगलांचे संरक्षण करणे ही केवळ एखाद्या विभागाची किंवा व्यक्तिची जबाबदारी नाही, ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणती व्यक्ती कोणत्या क्षणी वन्यजीव संरक्षक बनेल काही सांगता येत नाही, कारण ती एक मनस्थिती आहे एखादे पद नाही!
मी फेसबुकवर टाकलेल्या छायाचित्रांचे तसेच आम्ही वन संरक्षणासाठी करत असलेल्या कामाचे जे कौतुक झाले त्याविषयी मी माझ्या मुलांना उद्देशून काही तरी लिहीले, या लेखाच्या शेवटी ते देत आहे
 प्रिय रोहित, रोहन, निखिल,
सँक्च्युरी-एशियासारख्या व्यासपीठावर एक साधेसे छायाचित्र प्रसिद्ध केले आणि माझ्यावर प्रतिक्रिया आणि कौतुकाचा वर्षाव होतोय! चित्र खरोखरच अतिशय चांगले आले हे मान्य असले तरीही ते मिळणे हे माझे  फक्त नशीबच होते, मी केवळ थोडी तत्परता दाखवली, कॅमेरा उचलला आणि ते दृश्य टिपले! सँक्च्युरी एशियाद्वारे घेतल्या जाणा-या वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत हे छायाचित्र पाठवावे असे त्यांचे म्हणणे आहे!
यातून मी शिकलो की तुमचा छंद हा तुमचा आनंदाचा ठेवाही असू शकतो! आपण जे करतो ते पूर्णपणे समर्पित होऊन केले पाहिजे. तसे केले तर आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. सर्वात शेवटचे म्हणजे मी हे सर्व कौतुकाच्या आशेने नाही तर माझ्या आनंदासाठी केले व त्यासोबत जे मिळाले तो केवळ बोनस होता. मी या छायाचित्राचा निर्माता आहे अशी हवा माझ्या डोक्यात जाऊ नये कारण मी केवळ पोस्टमनचे काम केले आहे, ज्याला चांगली बातमी इतरांना कळविण्याचे भाग्य मिळाले! विशेषतः तुमच्यापर्यंत हे विचार पोहोचावेत म्हणून हे लिहीत आहे, कारण एक दिवस तुम्हीही कदाचित अशा परिस्थितीत असाल, तेव्हा छायाचित्र काढणे नव्हे तर अशा ठिकाणांचे संरक्षण करणे हे तुमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे लक्षात ठेवा!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif