Sunday, 26 October 2014

तुमच्या शेजा-यांना जाणून घ्या!





















तुम्ही जर स्वतः एक चांगले शेजारी असाल तरच तुम्हाला चांगले शेजारी मिळतील...हॉवर्ड ई. कोच

हॉवर्ड ई. कोच हे अमेरिकी नाटककार व पटकथालेखक होते, १९५० च्या दशकात त्यांच्या नाटकातून त्यांनी साम्यवादाच्या विचारांचे समर्थन केल्याच्या आरोपावरून हॉलिवुड चित्रपट स्टुडिओच्या बड्या प्रस्थांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. स्वतःला कायम बरोबर  समजणा–या अमेरिकन्सनी कदाचित शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर वरील वाक्याचा चुकीचा अर्थ काढला असेल मात्र सध्या भारतातील सदनिका संस्कृतीला ते अतिशय चपखल लागू होते! माझ्या स्वतःच्या इमारतीमधील सदनिकेत नुकत्याच घडलेल्या एका लहानशा घटनेमुळे मला हे अवतरण आठवले. इतर कोणत्याही गृहसंकुलाप्रमाणे आमच्या इमारतीच्या स्वागत कक्षात सूचना फलक आहे, ज्यावर आमच्या गृहसंकुलाचे कार्यक्षम सचिव सर्वसाधरणपणे पाणी कपात, लिफ्टच्या दुरुस्तीच्या वेळा याविषयी सूचना लिहीतात. अलिकडेच कामावरुन परतताना व्यवस्थितपणे टंकलिखित केलेल्या एका पत्राने माझे लक्ष वेधून घेतले व ते वाचण्यासाठी मी क्षणभर थांबलो, कारण ते एखाद्या सूचनेपेक्षा काहीतरी वेगळे वाटत होते. ते माझ्या खालच्या मजल्यावर भाड्याने राहणा-या एका कुटुंबाने सर्व रहिवाशांना उद्देशून लिहीलेली लहानशी टीप वजा पत्र होते, हे कुटुंब नुकतेच ती जागा सोडून दुसरीकडे राहायला गेले होते. त्यांनी आमच्या इमारतीमध्ये जवळपास चार वर्षांच्या वास्तव्यात आलेल्या अविस्मरणीय अनुभवांविषयी लिहीले होते. आता ते दुसरीकडे राहायला जात असून त्यांना इथल्या लोकांची आठवण येईल व त्यांचे इथले वास्तव्य एक सुंदर अनुभव बनविण्यासाठी त्यांनी सर्व रहिवाशांचे आभार मानले होते! त्यांची ही कृती अगदी साधी तरीही अतिशय भावस्पर्शी होती, मी त्या पत्राचे मोबाईलमध्ये एक छायाचित्र घेतले, त्या गृहस्थांना पत्राविषयी संदेश पाठवावा असा मनात विचार आला, मात्र मग मला जाणवले की माझ्याकडे त्यांचा मोबाईल क्रमांकही नव्हता किंवा त्यांचा नवीन पत्ताही नव्हता! मी त्या कुटुंबातील सदस्यांना दिवसातून अनेकदा लिफ्टमध्ये, पार्किंगमध्ये, इमारतीच्या स्वागतकक्षात भेटलो असेन. आम्ही लिफ्टमधून खाली किंवा वर जाताना हवापाण्याच्या गप्पा मारल्या आहेत, स्मितहास्य केलं आहे, मात्र त्यांच्याकडून मी कधी त्यांचा साधा मोबाईल क्रमांकही घेतला नाही म्हणून मला अपराध्यासारखं वाटलं किंवा खरतर लाज वाटली; कारण एक शेजारी म्हणून मी त्यांच्याशी फारच परक्यासारखा वागलो होतो!त्या जाणीवेतूनच, मी हा लेख लिहीत आहे किंबहुना हाच या लेखाचा विषय आहे, की आपण आपल्या शेजा-यांना किती जाणतो? पुण्यात बालपण घालवलेल्यांना म्हणजे माझ्या पिढीतल्या लोकांना आठवत असेल की तेव्हांच्या “वाडा किंवा चाळ” संस्कृतीमुळे प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखत असे! कोणत्या घरात कुणाच्या मुलीचं लग्न कुठे जुळतंय, कोणत्या नवरा-बायकोंचं पटत नाही अशी कुठलीही गुपितं नसत आणि ma^ट्रीकला बसलेल्या मुलाचा निकाल आई-वडिलांपूर्वी अख्ख्या गल्लीला समजायचा! अगदी लहानशी गोष्ट एकमेकांना सांगितली जायची किंवा सार्वजनिक व्हायची, तेव्हाचं सामाजिक जीवनच तसं होतं. लोकांना बाहेरगावी जायची भीती वाटत नसे व घराच्या सुरक्षेसाठी कोणतेही सुरक्षा दरवाजे किंवा सीसी टीव्ही कॅमेरे लागत नसत. आपत्कालीन सुरक्षा अलार्म ठेवावा लागत नसे किंवा महत्वाच्या दूरध्वनी क्रमांकांची यादीही नसे व तो मोबाईल फोनचा काळ नव्हता त्यामुळे आपत्कालीन वेळेसचे क्रमांक स्पीड डायलिंगवर ठेवायचा प्रश्नच नव्हता! खाजगी सुरक्षा सेवा किंवा सुरक्षा रक्षक हे शब्दही ऐकीवात नव्हते; संपूर्ण मुहल्ला किंवा गल्लीची सुरक्षा एक गुरखा “जागते रहो” असे म्हणून करत असे.... ते देखील फक्त रात्री! भाडेकरुंनाही कुटुंबाचाच एक भाग म्हणून वागवले जात असे व अतिशय आपुलकीची व आदराची वागणूक दिली जात असे. गृहनिर्माण संस्था किंवा व्यवस्थापकीय समित्या स्थापन करायची गरज नव्हती; नागरिकांना एकत्र आणण्यासाठी कोणत्याही परिपत्रकाची गरज पडायची नाही व कोणताही सूचना फलकही आवश्यक नव्हता. तरीही एकूणच सामुदायिक सुरक्षेच्या दृष्टीने तो सर्वात सुरक्षित काळ होता, कारण प्रत्येक जण दुस-यावर नकळत लक्ष ठेवत असे! पुणे शहरच का लहान शहरातून आलेल्या आपल्या सर्वांचा आपल्या बालपणाविषयी असाच अनुभव असेल, कारण तेव्हा घर म्हणजे केवळ आपण राहात असलेल्या चार भिंतींपुरते मर्यादित नव्हते तर आपला संपूर्ण परिसरच आपले घर होते, व म्हणूनच हे शहर देशातील सर्वोच्च शहरांपैकी सर्वात सुरक्षित शहर होते आणि ही फार पूर्वीची गोष्ट नाहीये !अजिबात खाजगी जीवन नसल्याने कधी कधी शेजा-यांची थोडी कटकट वाटायची हे मान्य असले तरीही, आमच्यापैकी ज्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे ते अगदी छातीठोकपणे सांगू शकतील की त्यात एक धमाल होती व ते ख-या अर्थाने सामुदायिक जीवन होते! मात्र तेव्हा आयुष्याच्या संकल्पनाही वेगळ्या होत्या व वाटून घेणे हा जीवनाचा मुख्य उद्देश होता. वाटणे केवळ किराणा सामान किंवा लाकडी सामान यापुरते मर्यादित नव्हते तर भावनांचीही देवाणघेवाण व्हायची, जो जीवनाचा सर्वात महत्वाचा पैलू होता! समस्या ही कोणत्याही वैयक्तिक कुटुंबाची नसायची व आनंदही सगळेजण वाटून घेत. सण तसेच कोणतेही कौटुंबिक समारंभ एकत्र साजरे केले जात. कुटुंबातील एखाद्याचे आजारपण सर्वांसाठी चिंतेचा विषय होता व वयोवृद्ध तसेच लहान मुले ही संपूर्ण समाजाची जबाबदारी होती! कुणालाही त्याच्या संकटाला तोंड देण्यासाठी एकटे सोडले जात नसे; ती ख-या अर्थाने सोसायटी होती त्यासाठी कोणत्याही कायदेशीर नावाची गरज नव्हती!

आता आपल्या वर्तमानकाळाचा विचार करा, अलिकडेच पुणे पोलीसांच्या एका फलकाने माझे लक्ष वेधून घेतले, त्यावर एक मोठा डोळा रंगविण्यात आला होता व खाली मथळा होता “तुमची दृष्टी वापरा”, म्हणजेच सतर्क राहा व आजूबाजूला काहीही गैर होत असल्यासारखे वाटल्यास पोलीसांना कळवा. पोलीस दलाच्या सद्हेतूविषयी पूर्णपणे आदर राखत मला प्रश्न पडतो की सध्या लोकांची मी, माझे व माझे कुटुंब अशी मानसिकता असताना आपल्या आजूबाजूला काही चुकीचे घडते आहे याची किती जण दखल घेतील! आजूबाजूला पाहण्याकडे कुणाला वेळ आहे किंवा तसा कुणाचा दृष्टिकोन आहे? अशी परिस्थिती आहे की आपल्याला जगभरात घडणारे सर्वकाही केवळ एका क्लिकवर उपलब्ध होते मात्र आपल्या शेजारच्या सदनिकेमध्ये राहणा-या कुटुंबाचे नाव आपल्याला माहिती नसते! शेजारची सदनिकाच कशाला आपल्याला शेजारच्या खोलीत आपली मुले काय करताहेत हे देखील क्वचितच माहिती असते जी त्यांच्या स्वतःच्या व्हर्च्युअल विश्वास गुंग असतात! हे वाचायला कदाचित फारच नाट्यमय वाटेल मात्र हेच आधुनिक काळातील वास्तव आहे. नव्याने सुरु होणा-या प्रकल्पांच्या जाहिराती जरी पाहिल्या तरी त्यात उल्लेख केलेला असतो की पूर्णपणे स्वतंत्र तसेच तिन्ही बाजू खुली असलेली घरे, कुणालाही तुमच्या घरात डोकावून पाहता येणार नाही किंवा काहीजण तर त्याही पुढे जाऊन “अजिबात शेजार नसलेली घरे” सादर करत असल्याची घोषणा करतात! आपल्याकडे काचेच्या खिडक्या असलेल्या गगनचुंबी इमारती असतात व त्या आपल्याला क्षितीजाचे १८०-३६० अंशाचे दृश्य दाखवतात मात्र आपण आपल्या शेजारी कोण राहते हे पाहू शकत नाही! आपल्याला आपल्याशेजारी कोण राहते हे पाहता येत नसेल तर त्याच्या किंवा तिच्या गरजा किंवा भावना जाणून घेण्याचा प्रश्नच कुठे येतो, कारण त्याची काळजी कुणाला आहे? आपल्याकडे चकचकीत स्वागत कक्ष आहेत, प्रायव्हसी आहे, अंतर्गत सजावट आहे व जगाशी जोडणारी साधने आहेत, मात्र विचार करा तुम्हाला तुमच्या शेजा-यांशी जोडणारे कोणतेही साधन नाही! त्यासाठी केवळ आपल्याला स्वतःच्या दरवाजाबाहेर पाऊल टाकायचे आहे व शेजारील दरवाजाची बेल दाबून शेजा-यांना सुहास्य वदनाने अभिवादन करायचे आहे! दुर्दैवाने अनेकांना हे लहानसे पाऊल जागतिक सफरीच्या तिकीटापेक्षाही महाग असल्यासारखे वाटते. दुसरीकडे आपल्याला चोवीस तास सुरक्षा, सीसी टीव्ही, सुरक्षा दरवाजे, सुरक्षा कक्षाला जोडणारा इंटरकॉम, आपल्या शयनकक्षात विविध प्रकारच्या तिजो-या व सर्व प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान हवे असते, एकप्रकारे शेजार नसलेल्या घरासाठी आपण ही किंमतच मोजत असतो! अर्थात काही गृहनिर्माण संस्थांनी किंवा संकुलांनी वाडा संस्कृती जपून ठेवली आहे व ते एकत्र येऊन संमेलने करत असतात, मात्र आपल्या आजूबाजूला असलेल्या इमारतींच्या तुलनेत अशा इमारतींची संख्या किती आहे असा प्रश्न मला विचारावासा वाटतो?
बरेच जण म्हणतील की रिअल इस्टेटला त्यासंदर्भात काय करता येईल? इथे आपण लोकांच्याच गरजेला प्रतिसाद देत आहोत असे वाटत नाही का? आपण आज वाडे किंवा चाळी बांधून लोकांना त्यात राहायला सांगू शकत नाही! मी पुन्हा मागे जाऊन चाळ किंवा वाड्यात राहायला सांगत नाही कारण त्याचेही तोटे आहेत व आता काळ बदलला आहे; मात्र त्याचवेळी आपण जेव्हा बदलतो तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की सर्वकाही मागे सोडायचे व पुढे जायचे. इथे रिअल इस्टेटची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण आपण विकासक आहोत व आपण विकासकाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे! आपण सोसायट्या विकसित करतो त्यामुळे आपण जे बिरुद मिरवतो ते सार्थ ठरवायचे असेल तर त्यासाठी आपण सोसायटी या शब्दाचा खरा अर्थ जाणून घेतला पाहिजे! आपण जिला सोसायटी म्हणतो ती केवळ एक इमारतींचा समूह व त्यातील सोयी सुविधा एवढेच नसते तर त्या इमारतींमध्ये राहणा-या लोकांनी सोसायटी बनते! आपण नियोजन करताना व ज्यांना आपण सोयीने किंवा चुकीने सोसायटी म्हणून संबोधतो, त्या इमारती विकसित करताना या लोकांचा विचार केला पाहिजे! अजिबात खाजगी आयुष्य नसेल अशी इमारत बांधा असे कुणीच म्हणत नाही कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच स्वतःचे काही शांत व निवांत क्षण हवे असतात, मात्र त्याचा अर्थ तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता त्यांच्यापासून स्वतःला पूर्णपणे तोडणे असा होत नाही. माणूस हा सामाजिक प्राणी आहे व म्हणूनच स्वाभाविकपणे आपल्याला त्याची घरे इतर माणसांपासून लांब ठेवता येणार नाहीत! आपण स्वागत कक्षापासून ते जिन्यातल्या pa^सेज पासून मोकळ्या अंगणापर्यंत लोकांना एकत्र येता येईल अशा जागा जास्तीत जास्त उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत व सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना सोसायटीमध्ये राहण्याचा खरा उद्देश समजावून दिला पाहिजे. आपण कुणालाही एकटे राहायला सांगत नाही किंवा कुणाला पदपथावर राहायला सांगत नाही, मात्र दोन्हींचा योग्य समतोल साधला पाहिजे व तुमच्या ग्राहकांना तुमच्या प्रयत्नांची जाणीव करुन दिली पाहिजे. यालाच मी ग्राहकांना तुमच्या निर्मितीमागचे तत्वज्ञान समजावून सांगणे असे म्हणतो; कारण तुम्ही तुमच्या ग्राहकाशी चर्चा केल्याशिवाय व जीवनाच्या अशा पैलुंची ओळख करुन दिल्याशिवाय त्याला ती परंपरा कशी पुढे नेता येईल व तुम्ही तयार केलेल्या इमारतीमध्ये त्याप्रमाणे कसे राहता येईल ? आपल्या इमारतींमध्ये राहणा-या व्यक्तिला सामुदायिक जीवनाचे महत्व समजल्यानंतर, आपल्याला आज भेडसावणा-या अनेक समस्यांची आपोआप काळजी घेतली जाईल. या समस्या सुरक्षेच्या चिंतेपासून ते सोसायटीच्या मासिक देखभाल शुल्काच्या वादापर्यंतच्या आहेत, ज्या आजकालच्या तथाकथित सोसायट्यांसाठी नेहमीची मोठी डोकेदुखी होऊन बसल्या आहेत!
या आघाडीवर रिअल इस्टेटची भूमिका अतिशय निर्णायक असणार आहे, कारण आपण कोणत्या प्रकारची सोसायटी म्हणजेच समाज बनविणार आहोत हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे व त्यासाठी आपण लोकांना एकत्र आणणे आवश्यक आहे. असे झाले तरच चांगल्या समाजाची काही आशा आहे जिथे लोक ख-या अर्थाने समाधानाने  व शांततेने राहतील; कारण जीवनातील हे घटक पैशाने विकत घेता येत नाहीत तर आपल्यालाच ते वागणुकीने कमवावे लागतात !

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स



Friday, 24 October 2014

पारदर्शकता आणि रिअल इस्टेट !



















पारदर्शकता नसेल तर अविश्वास वाढतो व असुरक्षिततेची तीव्र भावना निर्माण होते …दलाई लामा

तिबेटी धर्मगुरुंची वेगळी ओळख करुन द्यायची गरज नाही कारण दलाई लामांना कोण ओळखत नाही! मला आश्चर्य याचं वाटतंय की मी त्यांचं अवतरण पहिल्यांदाच वापरतोय, अर्थात त्यांचे हे अवतरण रिअल इस्टेटसाठी नव्हते कारण त्यांना स्वतःसाठी कोणत्याही बिल्डरची आवश्यकता नाही तर संपूर्ण पृथ्वीच हे त्यांचे घर आहे, मात्र तरीही मी रिअल इस्टेटमधील पारदर्शकतेविषयी एक बातमी वाचली तेव्हा मला त्यांचे हे अवतरण या विषयासाठी अतिशय समर्पक वाटले! ही बातमी राज्य सरकार रिअल इस्टेटसाठीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार असल्याची होती, बांधकाम व्यावसायिक त्यांचे व्यवहार अधिक पारदर्शक कसे करतील व त्यांनी दिलेल्या आश्वासनासाठी त्यांना कसे जबाबदार धरायचे यासंदर्भातील ती बातमी होती हे वेगळे सांगायला नको. बातमी बहुचर्चित गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापन करण्याविषयी होती जिथे सर्व बांधकाम व्यवसायिकांना त्यांचे प्रकल्प नोंदवावे लागतील व या प्रकल्पांचे काही नियमांद्वारे नियमन केले जाईल किंवा त्यांचे नियमन केले जाईल अशी किमान अपेक्षा तरी आहे. कोणतेही सरकार बांधकाम व्यावसायिकांवरच बडगा का उगारते हा प्रश्न मला नेहमी सतावतो. नेहमीप्रमाणे बरेच जण म्हणतील की बांधकाम व्यावसायिकांचे कामच तसे असते नाही का? रिअल इस्टेट उद्योगाविषयी पुरेसा आदर बाळगून मला असे म्हणावेसे वाटते सध्या उद्योगावर विविध प्रकारच्या ना हरकत प्रमाणपत्रांचे प्रचंड ओझे आहे, मग ती सरकारी विभागांकडून घ्यायची असोत किंवा निमसरकारी विभागांकडून घ्यायची असोत. या नियामक प्राधिकरणामुळे खरोखर काही गुणात्मक सुधारणा होणार आहे किंवा केवळ ना हरकत प्रमाणपत्रामध्ये आणखी एकाची भर पडेल हे येणारा काळच सांगेल मात्र रिअल इस्टेट क्षेत्र अधिक पारदर्शक बनविण्याच्या बातमीने माझे लक्ष नक्कीच वेधून घेतले!

माझ्यासाठी आपल्या देशात पारदर्शकता हा केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठीचा शब्द झाला आहे! राजकारण्यांपासून ते सर्वोच्च कॉर्पोरेट अधिका-यांपर्यंत सर्वजण त्यांच्या मतदारांना किंवा ग्राहकांना थोडक्यात सामान्य माणसाला खात्री देण्यासाठी पारदर्शकता हा शब्द वापरतात! मात्र त्याचा खरा अर्थ काय होतो हे आपण सगळे जाणतो कारण एखादी विशिष्ट संस्था पारदर्शक व्यवसाय करतेय हे सांगायची काय गरज आहे? त्यांचा व्यवहार खरोखर पारदर्शक असेल तर त्यांच्या ग्राहकांना ते ठरवू दे!
पूर्वीपासून रिअल इस्टेटवर अपारदर्शक व्यवहारांसाठी ओरड होतेय व केवळ ग्राहकच का कंत्राटदार, विक्रेते किंवा अगदी चार्टड अकाउंटंट वगैरेंसारखे व्यावसायिकही बांधकाम व्यावसायिक किंवा विकासकांच्या अपारदर्शक व्यवहारांना दुजोरा देतील. कुणीही बांधकाम व्यावसायिकांवर विश्वास ठेवत नाही! या बेधडक विधानाला रिअल इस्टेट क्षेत्रातील अनेकजण आक्षेप घेतील मात्र आपल्याला सुधारणा करायच्या असतील तर आधी आपण आपल्यातील दोष मान्य करणे सुधारणे आवश्यक आहे! असे नसते तर प्रत्येक माध्यमाने तसेच सरकारी संस्थेने रिअल इस्टेटसाठी आणखी एक नियामक मंडळ स्थापन करण्याची जोरदार मागणी केली नसती! आपल्याकडे माहिती तंत्रज्ञानापासून ते ऑटोमोबाईल उद्योगापर्यंत असे शेकडो उद्योग आहेत ज्यांची अब्जावधी रुपयांची उलाढाल आहे, मात्र त्यांनी ग्राहकांसोबतच्या व्यवहारात पारदर्शकता आणावी अशी मागणी कुणीही करत नाही! अर्थात इतर उद्योगांमध्ये सर्व काही सुरळीत आहे असे नाही, मात्र कुठेतरी विकासक त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधण्यात कमी पडताहेत; किंवा किमान विकासकांच्या पहिल्या पिढीत तरी तसेच चित्र होते.

रिअल इस्टेटच्या सध्याच्या युगाविषयी बोलायचे झाल्यास परिस्थिती बरीच बदलली आहे व रिअल इस्टेटमधील लोकांनी या बदलांची दखल घेतली पाहिजे, जे प्रामुख्याने दोन आघाड्यांवर झाले आहेत. सर्वात पहिली म्हणजे हे माहितीचे युग आहे, लोकांना ते करत असलेल्या व्यवहाराविषयी माहिती घ्यायची सवय झाली आहे. दुसरे म्हणजे रिअल इस्टेटच्या ग्राहकांचा वयोगट अतिशय बदलला आहे आता सरासरी वयोगट पंचवीस ते पस्तीस आहे, ही माहिती युगातली तरुण पिढी आहे व आधुनिक युगातील माहिती देवाणघेवाणीच्या सर्व साधनांची त्यांना चांगली जाण आहे! आता ते दिवस गेले जेव्हा एखादे मध्यमवयीन जोडपे विकासकाच्या कार्यालयात येत असे व विकसक त्यांना घर विकून त्यांच्यावर उपकार करत आहे अशा भावनेने ते संकोचलेले असत, त्यांच्यासमोर जी कागदपत्रे येत त्यावर स्वाक्षरी करत व शेवटी त्यांच्या स्वप्नातील घराच्या किल्ल्या त्यांना मिळाल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडत ! आता ग्राहकांना त्यांच्या पैशांचे पुरेपूर मूल्य हवे असते, काहीवेळा ते थोडे त्रासदायकपणे वागतात मात्र या पिढीला सुरुवातीपासून तुमच्या बांधकाम व्यावसायिकावर विश्वास ठेवू नये हेच शिकविण्यात आले आहे. म्हणूनच बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात पहिले पाऊल टाकल्यापासून त्यांना व्यवहाराविषयी प्रत्येक तपशील हवा असतो व बांधकाम व्यावसायिक तो काय देणार आहे हे सांगण्यास नकार देत असेल तर व्यवहाराविषयी नकारात्मक मत तयार होते!
रिअल इस्टेट क्षेत्राने हे माहितीचे युग असल्याचे समजून घेतले पाहिजे व स्वीकारले पाहिजे! मी असे अनेक बांधकाम व्यावसायिक पाहिलेत जे खाजगीत असे म्हणतात की ग्राहकांना आवश्यकतेपेक्षा जास्त माहिती देऊ नये. माझे मत याबाबतीत थोडे वेगळे आहे; एकदा तुम्ही कुणालाही प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली की ते तुम्हाला तुमच्या इच्छेने थांबवता येत नाही, ते विद्यार्थ्याच्या इच्छेवर अवलंबून असते! माहिती द्यायला घाबरायची काय गरज आहे व विशेषतः या प्रक्रियेत तुम्हाला ग्राहक व त्यांचा विश्वास गमवावा लागत असेल तर त्याचा काय उपयोग आहे! इलेक्ट्रॉनिक साधने आपल्या सेवेला असल्यानंतर आपण शक्य तितक्या उघडपणे माहिती देऊ शकतो व आता माहिती देण्यासाठी फारसा खर्चही होत नाही. एका क्लिकमध्ये तुम्ही विविध तपशीलांच्या प्रत्येक रेखाचित्रांपासून ते तुमच्या प्रकल्पासाठी घेतलेल्या एनओसींचा तपशील ग्राहकाला पाठवू शकता! आपण व्यवहाराकडे ग्राहकाच्या नजरेतून पाहू, त्याच्यासाठी घर आयुष्यात एकदाच घ्यायचे असते व विकासकासाठी ती नेहमीची गोष्ट असते. मला तर असे वाटते की रिअल इस्टेट उद्योगाने ग्राहकाने बांधकामाविषयी मागितलेले किंवा न मागितलेले तपशीलही त्याला द्यावेत, कारण सध्या व्यवसायात टिकून राहण्याचा तो सर्वोत्तम मार्ग आहे. आपण आता बांधकाम स्थळाची व्हर्च्युअल सफरही घडवून आणू शकतो व वेबवर बांधकामाच्या प्रगतीविषयी माहितीही अपलोड करु शकतो कारण एकदा ग्राहकाने सदनिका आरक्षित केल्यानंतर त्याला त्याच्या बांधकामाची किती प्रगती झालीय हे जाणून घेण्यातच रस असतो. आपण त्यांना आपल्या कामाविषयीही समजावून सांगू शकतो कारण ग्राहकाला काय चांगले व काय वाईट आहे यातील फरक समजला नाही तर आपण चांगले आहोत हे त्यांना कसे समजावून सांगणार!
रिअल इस्टेटमधील अपारदर्शकतेचा आणखी एक कच्चा दुवा म्हणजे आवश्यक असलेले दस्तऐवज, विशेषतः प्रकल्पासाठी लागणा-या मंजु-या, यासाठी  गृहकर्ज देणा-या कंपन्यांचे विशेष आभार, कारण आता विकासक बहुतेक कायदेशीर दस्तऐवज देतात मात्र विविध विभागांकडून आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या एनओसींसारखे इतर दस्तऐवज, एमएसईबी मीटर तसेच मालकीहक्क दस्तऐवजही तितकेच महत्वाचे असून त्याविषयी बरीच जागरुकता निर्माण झाली पाहिजे. आपण ग्राहकांशी केल्या जाणा-या करारातच हे सर्व तपशील उपलब्ध करुन देऊ शकतो व प्रकल्पाच्या संकेतस्थळावर सर्व दस्तऐवज प्रकाशित करु शकतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळ सोडून सर्व काही आहे व हा वेळ स्वतःच्या घराची माहिती घेण्यात जात असेल तर ग्राहक अतिशय वैतागतो व नेमके हेच रिअल इस्टेट क्षेत्राने समजून घेतले पाहिजे. आपण वेळोवेळी प्रकल्पामध्ये सदनिका आरक्षित केलेल्या ग्राहकांसह कंत्राटदार, पुरवठादार व सल्लागारांचे संमेलन आयोजित करु शकतो! ग्राहकांना कळू दे त्यांचे घर कोण बांधतोय व त्यांना त्यांच्या कामाविषयी काय वाटते. तुम्ही ग्राहकांना प्रत्येकवेळी तुमच्या प्रकल्पाविषयीच माहिती दिली पाहिजे असे नाही, तुम्ही तुमच्या कंपनीच्या कामगिरीविषयी ग्राहकांना लिहू शकता किंवा रिअल इस्टेट संदर्भातील विशिष्ट कायद्यातील सुधारणेविषयी लिहू शकता किंवा वृत्तपत्रात प्रकाशित मालमत्तेच्या बाजार दराविषयी किंवा रिअल इस्टेटविषयी एखादे कात्रण ईमेलद्वारे पाठवता येऊ शकते!  ग्राहकांशी संवाद साधण्याचे असे कितीतरी मार्ग आहेत; या संवादामुळे त्याला विश्वास वाटेल की माझा बांधकाम व्यावसायिक माझ्याशी बोलतो किंवा माझ्या संपर्कात आहे! व्यवस्थापनामध्ये असे म्हणतात की जिथे संवाद आहे तिथे काम सुरळीतपणे चालते व हेच तत्व कोणत्याही नात्याला लागू होते; मग ते घरातील असो किंवा तुमच्या ग्राहकाशी!
शेवटी पारदर्शकता म्हणजे तरी काय तर व्यवहारात सहभागी लोकांशी मुक्त संवाद साधणे! हे दोन्ही बाजूंनी समजून घेतले पाहिजे कारण कोणतीही माहिती हे एक अस्त्र आहे व आपण ते कशासाठी वापरणार आहोत हे आपल्यावर अवलंबून आहे? एखादा सौदा किंवा व्यवहारासंदर्भातील माहितीची जेव्हा तो दोघांसाठीही फायदेशीर व्हावा यासाठी देवाणघेवाण केली जाते तेव्हा तो न्याय्य ठरतो. ग्राहकांनीही हा घटकही लक्षात घेतला पाहिजे. कारण शेवटी जो बांधकाम व्यावसायिक तुमचे घर बांधत आहे तो शत्रू आहे असे तुम्ही मानणार असाल तर त्याने काहीच साध्य होणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, “आपण समोरच्या व्यक्तिला जे देतो तेच आपल्याला परत मिळते”, आपण पारदर्शकतेची अपेक्षा करत असू तर आपणही ती दिली पाहिजे! बांधकाम व्यावसायिक पुरेसा मोकळा व पादर्शक असेल व ग्राहकांशी संवाद साधत असेल तर ग्राहकानेही त्याला त्याच आदराने व मोकळ्या मनाने वागवले पाहिजे. आपल्याकडे असलेल्या ज्ञान व माहितीचा वापर घराला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी केला पाहिजे, केवळ कामातील त्रुटी काढण्यासाठी नाही.
पारदर्शकतेचे हे साधे तत्व रिअल इस्टेटमध्ये सहभागी सर्व पक्षांनी अवलंबले तर कोणत्याही नियामक संस्थेची गरजच पडणार नाही व अशी संस्था असली तरी कुणालाही तिचा बागुलबुवा किंवा जाच वाटणार नाही व अशी परिस्थिती संपूर्ण रिअल इस्टेटच्या हिताची असेल असे मला वाटते!


संजय देशपांडे   
  
 smd156812@gmail.com


संजीवनी डेव्हलपर्स

Sunday, 19 October 2014

पुणे शहराच्या रक्षकांनो !



































प्रति,

पुणे शहराच्या रक्षकानों …

पुणे शहरातून राज्य विधानसभेवर निवडून गेलेल्या सर्व उमेदवारांसाठी मी जेव्हा काहीतरी लिहीण्याचा विचार केला तेव्हा तुम्हाला संबोधित करण्यासाठी माझ्या मनात पहिल्यांदा याच ओळी आल्या! ब-याच जणांना कदाचित “मोदी ब्रिगेड’, हा शब्द वापरायला आवडणार नाही, मात्र ज्याप्रकारे प्रचार मोहीम राबविण्यात आली त्यातून याला एक निश्चित उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणा-या माणसाची ब्रिगेड किंवा सैन्य असेच म्हणावे लागेल! विद्यमान आमदार तसेच नगरसेवकाच्या भूमिकेतून तुम्ही तुमच्या कार्यकाळात केलेल्या प्रयत्नांसाठी तुमचे अभिनंदन. इथे मला तुमच्याकडे अतिशय आशेने पाहणारा या शहराचा एक नागरिक म्हणून काहीतरी सांगावेसे वाटते व त्याच भावना खालील शब्दात लिहित आहे …….
“काहीवेळा अतिशय सुंदर गोष्टी अचानक आपल्या आयुष्यात येतात. आपल्याला त्या नेहमी समजतातच असे नाही, मात्र आम्हाला त्यावर विश्वास असला पाहिजे. मला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्न विचारावेसे वाटतात, मात्र काहीवेळा अगदी थोडासा विश्वास ठेवल्यानेही फायदा होतो.”...लॉरेन केट.

लॉरेन केट या तरुण वर्गासाठी  लेखन करणा-या, आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक विक्री होणा-या कादंबरीकारांपैकी एक आहेत. त्यांच्या पुस्तकांचा जवळपास तीस भाषांमध्ये अनुवाद झाला असून ती जगभरात वाचली जातात. नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत पुणे शहरात आपण जे पाहिले त्यावरुन मला त्यांचे हे प्रसिद्ध विधान आठवले. सत्तेत कोण येईल, आघाडी स्थापन होईल किंवा नाही यासारख्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील, मात्र पुणे शहराने इतिहास घडवला! विधानसभेच्या शहरातील सर्व आठही जागा एकाच पक्षाने जिंकल्या, ते देखील केंद्रात सत्तेत असलेल्याच पक्षाने व याच पक्षाची भूमिका महाराष्ट्रात सरकार स्थापनेमध्ये महत्वाची असणार आहे हे तथ्य आहे! मी नेहमीच म्हटलंय की मी कुणी राजकीय तज्ञ नाही व हा लेख राजकीय समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी नाही; तर मग तर मग या निकालांचे शहराच्या दृष्टीने काय वैशिष्ट्य आहे?
या निकालाचे वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल, १९९५ साली राज्यात सेना-भाजपाचे सरकार होते व केंद्रात भाजपाचे आघाडी सरकार होते. तेव्हाही शहरातील सर्व आमदार एकाच पक्षाचे नव्हते व नंतर राज्यामध्ये तसेच केंद्रात आघाड्यांचे सरकार होते, जोडतोडीचे राजकारण सुरु होते व शहराच्या राजकारणातही असेच चित्र होते. यावेळी शहराचे चित्रच पालटले आहे, कारण यापूर्वी कधीही आठ मतदारसंघांपैकी दोन किंवा तीनपेक्षा अधिक आमदार एकाच पक्षाचे नसायचे. बरेच जण म्हणतील त्यात काय मोठेसे, ही लोकशाही आहे व आपण आपल्याला हवे ते निवडण्यास स्वतंत्र आहोत! मात्र आपण तसे करण्याचा परिणाम पाहिला आहे; लोकशाहीतून शहराच्या विकासासाठी प्रत्येकवेळी योग्य परिणाम दिसेलच असे नाही व यापूर्वी आपण हे सिद्ध केले आहे! विविध पक्षांचे आमदार व सत्ताधारी पक्ष काहीतरी एक स्वतःचाच कार्यक्रम राबवत असल्याने, शहरातील आमदार कधीही शहराच्या समस्यांविषयी संघटित नव्हते व गेली जवळपास पंधरा वर्षे एकत्र येऊन कोणतीही समस्या सोडविण्यात अपयशी ठरले! ऐक्य ही यशाची किल्ली आहे व पुण्यामध्ये ही किल्लीच हरवली होती, मात्र योग्य उमेदवार न निवडण्यासाठी नागरिकच जबाबदार होते.याचा परिणाम असा झाला की आमदार कधीही शहराच्या विविध समस्यांवर एकजूट झाले नाहीत, विविध समस्यांविषयी त्यांच्या विविध भूमिका होत्या, याचे अतिशय प्रसिद्ध उदाहरण म्हणजे डोंगर माथा, डोंगर उतार किंवा बीडीपी म्हणजेच जैव विविधता उद्यान, ज्यामुळे शहराची संपूर्ण विकास योजना अनेक वर्षे रखडली आहे. याचे काय कारण आहे? बीडीपी आरक्षणाचे समर्थन किंवा विरोध करण्यासंदर्भात प्रत्येक पक्षाची स्वतःची कारणे होती किंबहुना हित किंवा अहंभाव होता व पक्षाचे आमदार या हिताचे किंवा अहंभावाचे प्रतिनिधित्व करत होते ज्यामुळे शहराच्या विकास योजनेचा म्हणजेच डीपीचा पूर्णपणे सावळा गोंधळ झाला! पक्षांच्या परस्परविरोधी हिताची कितीतरी उदाहरणे आहेत, उदाहरणार्थ एका पक्षाला बीआरटी हवी असते तर दुस-या पक्षाला नको असते. त्यानंतर कचरा डेपोच्या ठिकाणाविषयी तसेच कचरा टाकण्याच्या सुविधेविषयी समस्या आहे, सध्याचा कचरा डेपो फुरसुंगी गावात आहे, मात्र त्या भागातील आमदाराचे तिथे कचरा टाकू देण्याविषयी वेगळे मत आहे. खरेतर कोणत्याही आमदाराला कचरा डेपोसाठी त्याच्या मतदारसंघात जागा द्यायची इच्छा नाही कारण त्यामुळे दुस-या आमदाराला फायदा होईल मात्र तो स्वतः अडचणीत येऊ शकतो! आणखी एक प्रसिद्ध व तितकीच महत्वाची समस्या आहे पीएमसीच्या आधीच विस्तारलेल्या हद्दीत आणखी नवीन गावांचा समावेश करण्याची. इथेही राजकीय हिताचाच संघर्ष होता व ही समस्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यानंतर सर्वात प्रसिद्ध किंवा खरतर कुप्रसिद्ध मुद्दा आहे पीएमआरडीएचा म्हणजेच पुणे महानगर प्रादेशिक नियोजन प्राधिकरणाचा, ज्याच्या हाती संपूर्ण पुणे प्रदेशाचे भवितव्य आहे, मात्र निवडून आलेल्या आमदारांमध्ये एकजूट नसल्यामुळे व या महत्वाच्या विषयावरील विविध पक्षांच्या परस्परविरोधी हितामुळे सर्वच पक्षांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये हा महत्वाचा मुद्दा अगदी पिछाडीवर गेला आहे! कुणे एके काळी हे शहर संपूर्ण देशातील सर्वात सुरक्षित शहर मानले जायचे, मात्र जर्मन बेकरी बाँबस्फोट व जंगली महाराज मार्गावरील स्फोटांच्या मालिकेनंतर आपण तो दर्जाही गमावून बसलो आहोत. मात्र इथेही शहरातील पोलीस दलाचे सशक्तीकरण किंवा सीसी टीव्ही यासारख्या विषयांकडे दुर्लक्ष केले जात आहे व विविध पक्ष त्यावरुन केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात हे आपण पाहिले! मेट्रो व सार्वजनिक वाहतूक ते धरणातून पुरेसा  पाणी पुरवठा, असे असंख्य विषय आहेत ज्यावर आपल्या आमदारांनी संघटितपणे कृती केली पाहिजे, मात्र तसे झालेले नाही हे तथ्य आहे! या सर्व विषयांचा एक समान घटक आहे तो म्हणजे आमदारांमध्ये एकजूट नाही त्यामुळे राज्याच्या धोरणाच्या आघाडीवर हे शहर एखाद्या अनाथालयासारखे वाढले आहे!
गेल्या काही वर्षांमध्ये असे दिसून आले आहे की आमदारांनी शहरापेक्षाही त्यांच्या पक्षाला प्राधान्य दिले व तरीही ते चालून गेले कारण शहरातील परिस्थितीतच तशी होती असे या आमदारांच्या चांगल्या हेतूविषयी पूर्णपणे आदर बाळगून सांगावेसे वाटते. शहरातील सर्व आठ  आमदारांनी एक चमू म्हणून काम करणे अपेक्षित आहे जो लढवय्येंच्या टोळीसारखे असेल, व सत्तेत जे सरकार येईल त्यांच्याशी शहरांच्या समस्यांसाठी प्राणपणाने लढा देईल व नागरिकांच्या समस्या सोडवेल कारण ते शहराचे रक्षकच आहेत! किमान सामान्य माणसाची तरी अशीच अपेक्षा आहे, मात्र ही चमू आपापसातच भांडत असल्याचे आपण आत्तापर्यंत पाहिले आहे. आत्तापर्यंत तसे करण्यासाठी त्यांच्याकडे विविध कारणे होती, जसे की , “पक्षांच्या धोरणांमुळे मी अगतिक आहे किंवा माझा त्यास पाठिंबा आहे मात्र इतर आमदार त्यांच्या पक्षासाठी त्याला विरोध करताहेत!” नागरिकांनाही वैयक्तिक आमदारांची ही कारणे स्वीकारण्याशिवाय काही पर्याय नव्हता कारण ब-याच प्रकरणांमध्ये ती वस्तुस्थिती होती.
वरीलपैकी सर्व मुद्दे या शहरातील रिअल इस्टेटचे भविष्य निश्चित करण्यासाठी अतिशय महत्वाचे होते व महत्वाचे आहेत. शेवटी रिअल इस्टेट म्हणजे तरी काय तर या शहरातील लाखो नागरिकांना एक व्यवस्थित, साधे व परवडण्यासारखे घर उपलब्ध करुन देणे, ज्यांनी स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या आशेने एकाच चमूला निवडून आणले आहे!
यामुळे नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल केवळ विशेषच नाहीत तर अतिशय विशेष आहेत! कारण पहिल्यांदाच आपल्याकडे ख-या अर्थाने एक चमू आहे जो शहराच्या समस्यांसाठी एकजूट होऊन लढा देऊ शकत नसल्याची कारणे देऊ शकत नाही. आपण पुण्याच्या नागरिकांनी अतिशय शहाणपणाने मतदान केले आहे व हे सर्व आमदार राज्य सरकारमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे सैनिक आहेत, ते एकाच पक्षाचे असल्यामुळे शहराच्या समस्या सोडविताना पक्षाचा कार्यक्रम व हित यासारख्या गोष्टी अडथळा ठरणार नाहीत. किंबहुना त्यांचा मनात आता केवळ “विकास, विकास आणि विकास’ हाच कार्यक्रम असला पाहिजे. स्पायडरमॅन या प्रसिद्ध चित्रपटातील संवादाप्रमाणे “मोठ्या शक्तिसोबतच मोठ्या जबाबदा-याही येतात”, या शहराने एकाच चमूला लाखो मतांच्या स्वरुपात अतिशय मोठी ताकद दिली आहे. आता ही ताकद वापरुन जबाबदा-या पार पाडाव्यात अशी या शहराची अपेक्षा आहे व या अपेक्षा अतिशय कमी आहेत. कुणालाही मोफत घरे किंवा मोफत बस सेवा किंवा मोफत शिक्षण किंवा तत्सम सुविधा नको आहेत. तसेच कुणीही रात्रभर खुली राहणारी उद्याने किंवा उड्डाणपूल किंवा कचरारहित रस्ते व नळाला चोवीस तास पाणी अशी मागणी करत नाही. तर केवळ या निवडून आलेल्या चमूने शहराला भेडसावणा-या समस्या जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा व त्या सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत एवढीच या शहराची गरज आहे! म्हणतात ना “आप एक कदम आगे बढो हम दस कदम आगे बढने को तय्यार है” म्हणजेच तुम्ही उद्दिष्टाच्या दिशेने केवळ एक पाउल टाका, यामुळे लाखो लोकांना खात्री वाटेल की त्यांनी योग्य व्यक्तिवर विश्वास ठेवला आहे! मला असे वाटते की शहराची हीच अपेक्षा आहे व विश्वास अतिशय नाजूक असतो एकदा तो तुटला की भरुन न येणारे नुकसान होते! वर्षानुवर्षे या शहराला अनेक खोट्या आशा दाखवण्यात आल्या आणि या खोट्या आशांनी यंत्रणेवरील आपला विश्वास नष्ट झाला आहे; या शहराने भारताला एक अधिक चांगले राष्ट्र बनविण्याचे स्वप्न दाखविणा-या, विकासाची हाक देणा-या एका माणसाला उरलासुरला विश्वास एकवटून प्रतिसाद दिला आहे! लक्षात ठेवा एखाद्याचा विश्वास ही कुणाकडचीही सर्वात मोठी शक्ती असू शकते व आता तुमच्याकडे शक्ती असल्यामुळे; लोकांचा हा विश्वास तलवारीसारखा वापरणे व या शहराच्या विकासाच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. तसे झाले तर तो

ख-या अर्थाने विश्वास या शब्दाचा आदर व गौरव असेल! या लढाईमध्ये आमच्या शुभेच्छा नेहमी तुमच्या पाठीशी आहेत!मला मतदान करणा-या एका सामान्य माणसाच्या भूमिकेतून एवढेच सांगायचे होते, कारण पाच वर्षातून एकदा मत देणे हेच त्याच्या हाती असते! चला तर मग केवळ राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील सर्वोत्तम चमू होऊन शहराचा मान वाढवू व शहराचा अशाप्रकारे विकास करु की, आपल्याला कुठल्याही शहराशी तुलना करण्याची गरजच नाही झाली पाहिजे तर, लोकच आपल्याशी तुलना करतील!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स


(०९८२२० ३७१०९)