पारदर्शकता
नसेल तर अविश्वास वाढतो व असुरक्षिततेची तीव्र भावना निर्माण होते …दलाई लामा
तिबेटी धर्मगुरुंची वेगळी ओळख करुन द्यायची गरज नाही
कारण दलाई लामांना कोण ओळखत नाही! मला आश्चर्य याचं वाटतंय की मी त्यांचं अवतरण पहिल्यांदाच
वापरतोय, अर्थात त्यांचे हे अवतरण रिअल इस्टेटसाठी नव्हते कारण त्यांना स्वतःसाठी कोणत्याही बिल्डरची आवश्यकता
नाही तर संपूर्ण पृथ्वीच हे त्यांचे घर आहे, मात्र तरीही मी रिअल
इस्टेटमधील पारदर्शकतेविषयी एक बातमी वाचली तेव्हा मला त्यांचे हे अवतरण या
विषयासाठी अतिशय समर्पक वाटले! ही बातमी राज्य सरकार रिअल इस्टेटसाठीच्या नियमांमध्ये
सुधारणा करणार असल्याची होती, बांधकाम व्यावसायिक त्यांचे व्यवहार अधिक पारदर्शक
कसे करतील व त्यांनी दिलेल्या आश्वासनासाठी त्यांना कसे जबाबदार धरायचे
यासंदर्भातील ती बातमी होती हे वेगळे सांगायला नको. बातमी बहुचर्चित गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापन करण्याविषयी
होती जिथे सर्व बांधकाम व्यवसायिकांना त्यांचे प्रकल्प नोंदवावे लागतील व या
प्रकल्पांचे काही नियमांद्वारे नियमन केले जाईल किंवा त्यांचे नियमन केले जाईल अशी
किमान अपेक्षा तरी आहे. कोणतेही सरकार
बांधकाम व्यावसायिकांवरच बडगा का उगारते हा
प्रश्न मला नेहमी सतावतो. नेहमीप्रमाणे बरेच
जण म्हणतील की बांधकाम व्यावसायिकांचे कामच तसे असते नाही का? रिअल इस्टेट
उद्योगाविषयी पुरेसा आदर बाळगून मला असे म्हणावेसे वाटते सध्या उद्योगावर विविध
प्रकारच्या ना हरकत प्रमाणपत्रांचे प्रचंड ओझे आहे, मग ती सरकारी
विभागांकडून घ्यायची असोत किंवा निमसरकारी विभागांकडून घ्यायची असोत. या नियामक
प्राधिकरणामुळे खरोखर काही गुणात्मक सुधारणा होणार आहे किंवा केवळ ना हरकत प्रमाणपत्रामध्ये
आणखी एकाची भर पडेल हे येणारा काळच सांगेल मात्र रिअल इस्टेट क्षेत्र अधिक
पारदर्शक बनविण्याच्या बातमीने माझे लक्ष नक्कीच वेधून घेतले!
माझ्यासाठी आपल्या देशात पारदर्शकता हा केवळ
लोकप्रियता मिळविण्यासाठीचा शब्द झाला आहे! राजकारण्यांपासून ते
सर्वोच्च कॉर्पोरेट अधिका-यांपर्यंत सर्वजण त्यांच्या मतदारांना किंवा ग्राहकांना
थोडक्यात सामान्य माणसाला खात्री देण्यासाठी पारदर्शकता हा शब्द वापरतात! मात्र त्याचा खरा
अर्थ काय होतो हे आपण सगळे जाणतो कारण एखादी विशिष्ट संस्था पारदर्शक व्यवसाय
करतेय हे सांगायची काय गरज आहे? त्यांचा व्यवहार
खरोखर पारदर्शक असेल तर त्यांच्या ग्राहकांना ते ठरवू दे!
पूर्वीपासून रिअल इस्टेटवर अपारदर्शक व्यवहारांसाठी
ओरड होतेय व केवळ ग्राहकच का कंत्राटदार, विक्रेते किंवा अगदी चार्टड अकाउंटंट
वगैरेंसारखे व्यावसायिकही बांधकाम व्यावसायिक किंवा विकासकांच्या अपारदर्शक
व्यवहारांना दुजोरा देतील. कुणीही बांधकाम
व्यावसायिकांवर विश्वास ठेवत नाही! या बेधडक विधानाला
रिअल इस्टेट क्षेत्रातील अनेकजण आक्षेप घेतील मात्र आपल्याला सुधारणा करायच्या
असतील तर आधी आपण आपल्यातील दोष मान्य करणे
सुधारणे
आवश्यक आहे! असे नसते तर प्रत्येक माध्यमाने तसेच सरकारी
संस्थेने रिअल इस्टेटसाठी आणखी एक नियामक मंडळ स्थापन करण्याची जोरदार मागणी केली
नसती! आपल्याकडे माहिती तंत्रज्ञानापासून ते ऑटोमोबाईल
उद्योगापर्यंत असे शेकडो उद्योग आहेत ज्यांची अब्जावधी रुपयांची उलाढाल
आहे, मात्र त्यांनी ग्राहकांसोबतच्या व्यवहारात पारदर्शकता आणावी अशी मागणी कुणीही
करत नाही! अर्थात इतर उद्योगांमध्ये सर्व काही सुरळीत आहे
असे नाही, मात्र कुठेतरी विकासक त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधण्यात कमी पडताहेत; किंवा किमान विकासकांच्या
पहिल्या पिढीत तरी तसेच चित्र होते.
रिअल इस्टेटच्या सध्याच्या युगाविषयी बोलायचे
झाल्यास परिस्थिती बरीच बदलली आहे व रिअल इस्टेटमधील लोकांनी या बदलांची दखल घेतली
पाहिजे, जे प्रामुख्याने दोन आघाड्यांवर झाले आहेत. सर्वात
पहिली म्हणजे हे माहितीचे युग आहे, लोकांना ते करत असलेल्या व्यवहाराविषयी माहिती
घ्यायची सवय झाली आहे. दुसरे
म्हणजे रिअल इस्टेटच्या ग्राहकांचा वयोगट अतिशय बदलला आहे आता सरासरी वयोगट पंचवीस
ते पस्तीस आहे, ही माहिती युगातली तरुण पिढी आहे व आधुनिक युगातील माहिती
देवाणघेवाणीच्या सर्व साधनांची त्यांना चांगली जाण आहे! आता ते दिवस गेले जेव्हा एखादे मध्यमवयीन जोडपे विकासकाच्या कार्यालयात
येत असे व विकसक त्यांना घर विकून त्यांच्यावर उपकार
करत आहे अशा भावनेने ते संकोचलेले असत, त्यांच्यासमोर जी कागदपत्रे
येत त्यावर स्वाक्षरी करत व शेवटी त्यांच्या स्वप्नातील घराच्या किल्ल्या त्यांना
मिळाल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडत
! आता ग्राहकांना
त्यांच्या पैशांचे पुरेपूर मूल्य हवे असते, काहीवेळा ते थोडे त्रासदायकपणे वागतात
मात्र या पिढीला सुरुवातीपासून तुमच्या बांधकाम व्यावसायिकावर विश्वास ठेवू नये हेच
शिकविण्यात आले आहे. म्हणूनच बांधकाम
व्यावसायिकाच्या कार्यालयात पहिले पाऊल टाकल्यापासून त्यांना व्यवहाराविषयी
प्रत्येक तपशील हवा असतो व बांधकाम व्यावसायिक तो काय देणार आहे हे सांगण्यास नकार
देत असेल तर व्यवहाराविषयी नकारात्मक मत तयार होते!
रिअल
इस्टेट क्षेत्राने हे माहितीचे युग असल्याचे समजून घेतले पाहिजे व स्वीकारले
पाहिजे! मी असे अनेक बांधकाम व्यावसायिक पाहिलेत जे
खाजगीत असे म्हणतात की ग्राहकांना आवश्यकतेपेक्षा जास्त माहिती देऊ नये. माझे मत याबाबतीत थोडे वेगळे आहे; एकदा तुम्ही कुणालाही प्रशिक्षण द्यायला
सुरुवात केली की ते तुम्हाला तुमच्या इच्छेने थांबवता येत नाही, ते
विद्यार्थ्याच्या इच्छेवर अवलंबून असते! माहिती द्यायला
घाबरायची काय गरज आहे व विशेषतः या प्रक्रियेत तुम्हाला ग्राहक व त्यांचा विश्वास
गमवावा लागत असेल तर त्याचा काय उपयोग आहे! इलेक्ट्रॉनिक साधने
आपल्या सेवेला असल्यानंतर आपण शक्य तितक्या उघडपणे माहिती देऊ शकतो व आता माहिती
देण्यासाठी फारसा खर्चही होत नाही. एका क्लिकमध्ये
तुम्ही विविध तपशीलांच्या प्रत्येक रेखाचित्रांपासून ते तुमच्या प्रकल्पासाठी
घेतलेल्या एनओसींचा तपशील ग्राहकाला पाठवू शकता! आपण व्यवहाराकडे
ग्राहकाच्या नजरेतून पाहू, त्याच्यासाठी घर आयुष्यात एकदाच घ्यायचे असते व
विकासकासाठी ती नेहमीची गोष्ट असते. मला तर असे वाटते की रिअल इस्टेट उद्योगाने
ग्राहकाने बांधकामाविषयी मागितलेले किंवा न मागितलेले तपशीलही त्याला द्यावेत,
कारण सध्या व्यवसायात टिकून राहण्याचा तो सर्वोत्तम मार्ग आहे. आपण आता बांधकाम
स्थळाची व्हर्च्युअल सफरही घडवून आणू शकतो व वेबवर बांधकामाच्या प्रगतीविषयी
माहितीही अपलोड करु शकतो कारण एकदा ग्राहकाने सदनिका आरक्षित केल्यानंतर त्याला
त्याच्या बांधकामाची किती प्रगती झालीय हे जाणून घेण्यातच रस असतो. आपण त्यांना आपल्या
कामाविषयीही समजावून सांगू शकतो कारण ग्राहकाला काय चांगले व काय वाईट आहे यातील
फरक समजला नाही तर आपण चांगले आहोत हे त्यांना कसे समजावून सांगणार!
रिअल इस्टेटमधील अपारदर्शकतेचा आणखी एक कच्चा दुवा
म्हणजे आवश्यक असलेले दस्तऐवज, विशेषतः
प्रकल्पासाठी लागणा-या मंजु-या, यासाठी गृहकर्ज देणा-या
कंपन्यांचे विशेष आभार, कारण आता
विकासक बहुतेक कायदेशीर दस्तऐवज देतात मात्र विविध विभागांकडून आवश्यक असलेल्या
वेगवेगळ्या एनओसींसारखे इतर दस्तऐवज, एमएसईबी मीटर तसेच मालकीहक्क दस्तऐवजही
तितकेच महत्वाचे असून त्याविषयी बरीच जागरुकता निर्माण झाली पाहिजे. आपण ग्राहकांशी
केल्या जाणा-या करारातच हे सर्व तपशील उपलब्ध करुन देऊ शकतो व प्रकल्पाच्या
संकेतस्थळावर सर्व दस्तऐवज प्रकाशित करु शकतो. आजकालच्या
धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळ सोडून सर्व काही आहे व हा वेळ स्वतःच्या घराची
माहिती घेण्यात जात असेल तर ग्राहक अतिशय वैतागतो व नेमके हेच रिअल इस्टेट
क्षेत्राने समजून घेतले पाहिजे. आपण वेळोवेळी
प्रकल्पामध्ये सदनिका आरक्षित केलेल्या ग्राहकांसह कंत्राटदार, पुरवठादार व
सल्लागारांचे संमेलन आयोजित करु शकतो! ग्राहकांना कळू दे
त्यांचे घर कोण बांधतोय व त्यांना त्यांच्या कामाविषयी काय वाटते. तुम्ही ग्राहकांना
प्रत्येकवेळी तुमच्या प्रकल्पाविषयीच माहिती दिली पाहिजे असे नाही, तुम्ही तुमच्या
कंपनीच्या कामगिरीविषयी ग्राहकांना लिहू शकता किंवा रिअल इस्टेट संदर्भातील
विशिष्ट कायद्यातील सुधारणेविषयी लिहू शकता किंवा वृत्तपत्रात प्रकाशित
मालमत्तेच्या बाजार दराविषयी किंवा रिअल इस्टेटविषयी एखादे कात्रण ईमेलद्वारे
पाठवता येऊ शकते! ग्राहकांशी संवाद साधण्याचे असे कितीतरी मार्ग आहेत; या संवादामुळे त्याला विश्वास वाटेल की माझा
बांधकाम व्यावसायिक माझ्याशी बोलतो किंवा माझ्या संपर्कात आहे! व्यवस्थापनामध्ये असे म्हणतात की जिथे संवाद आहे
तिथे काम सुरळीतपणे चालते व हेच तत्व कोणत्याही नात्याला लागू होते; मग ते घरातील असो
किंवा तुमच्या ग्राहकाशी!
शेवटी
पारदर्शकता म्हणजे तरी काय तर व्यवहारात सहभागी लोकांशी मुक्त संवाद साधणे! हे दोन्ही बाजूंनी समजून घेतले पाहिजे कारण
कोणतीही माहिती हे एक अस्त्र आहे व आपण ते कशासाठी वापरणार आहोत हे आपल्यावर
अवलंबून आहे? एखादा सौदा किंवा व्यवहारासंदर्भातील माहितीची
जेव्हा तो दोघांसाठीही फायदेशीर व्हावा यासाठी देवाणघेवाण केली जाते तेव्हा तो
न्याय्य ठरतो. ग्राहकांनीही हा
घटकही लक्षात घेतला पाहिजे. कारण शेवटी जो
बांधकाम व्यावसायिक तुमचे घर बांधत आहे तो शत्रू आहे असे तुम्ही मानणार असाल तर
त्याने काहीच साध्य होणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, “आपण समोरच्या
व्यक्तिला जे देतो तेच आपल्याला परत मिळते”, आपण पारदर्शकतेची
अपेक्षा करत असू तर आपणही ती दिली पाहिजे! बांधकाम व्यावसायिक
पुरेसा मोकळा व पादर्शक असेल व ग्राहकांशी संवाद साधत असेल तर ग्राहकानेही त्याला
त्याच आदराने व मोकळ्या मनाने वागवले पाहिजे. आपल्याकडे असलेल्या ज्ञान व माहितीचा
वापर घराला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी केला पाहिजे, केवळ कामातील
त्रुटी काढण्यासाठी नाही.
पारदर्शकतेचे
हे साधे तत्व रिअल इस्टेटमध्ये सहभागी सर्व पक्षांनी अवलंबले तर कोणत्याही नियामक
संस्थेची गरजच पडणार नाही व अशी संस्था असली तरी कुणालाही तिचा बागुलबुवा किंवा
जाच वाटणार नाही व अशी परिस्थिती संपूर्ण रिअल इस्टेटच्या हिताची असेल असे मला
वाटते!
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment