Wednesday, 19 August 2020

लॉकडाउन संपल्यानंतर






 







काहीवेळा समस्येवर आपण करत असलेला उपायच एक समस्या होऊन बसतो”...

 या लॉकडाउनच्या मालिकेतील शेवटच्या सत्रामध्ये (किमान अशी आशा करूया) हे माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचे शब्द असू शकतात! खर सांगायचे तर या काळात नैराश्य शिगेला पोहोचले आहे त्याचे कारण भीती किंवा सध्या सुरू असलेल्या साथीच्या रोगाविरुद्ध युद्धातील पराभवाची शक्यता हे नाही तर आपले तथाकथित सेनापती (म्हणजे शासनकर्ते) ज्याप्रकारे हे युद्ध लढत आहेत ते अनुभवणे हे अतिशय निराशाजनक आहे! अर्थात मी त्यांच्यापैकी कुणालाही दोष देत नाही कारण त्यांच्यापैकी कुणालाही कधीच अशाप्रकारचे युद्ध लढण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे अशाप्रकारच्या युद्धात सैन्याचे नेतृत्व करणे त्यांच्या क्षमतेबाहेरचे होते पण तुमच्याकडे कदाचित युद्ध लढण्याचा अनुभवही नसेल (शिवाजी महाराजांकडेही तो नव्हता). पण जर तुमच्याकडे धाडस निग्रह असेल तर अगदी अशक्यही शक्य होऊ शकते,आपले सध्याचे सेनापती मात्र तसे अभिमानाने सांगू शकत नाहीत. मग एखाद्याने किमान प्रामाणिकपणे आपण सैन्याचे नेतृत्त्व करण्यास सक्षम नाही हे स्वीकारावे, मनाचा (आपल्या शासनकर्त्यांशी मला हृदयाचा संबंध जोडता येत नाही) मोठेपणा दाखवावा जे लोक तुम्हाला सैन्याचे नेतृत्व करण्यास मदत किंवा मार्गदर्शन करू शकतात त्यांना सहभागी करून घेण्याइतपत तरी खुला दृष्टिकोन असावा, परंतु तेदेखील होताना दिसत नाही. परिणामी लॉकडाउननंतर पुन्हा एक लॉकडॉउन त्यानंतर पुन्हा लॉकडाउन, नंतर पुन्हा एक लॉकडाउन असेच होत राहिले, एका विषाणूला तोंड देण्यासाठी आपल्याकडे एवढीच उपाययोजना होती. याउलट आपल्या शेजारील देशांपैकी काहींनी एकदाही लॉकडाउन करता त्यावर विजय मिळवला उर्वरित देश किमान शत्रूला तरी रोखू शकले तसेच आर्थिक नुकसान संतुलित ठेवू शकले.

मला आठवते आहे अनेक वर्षांपूर्वी इतिहास शिकत असताना ऐकले होते की रशियनांनीदग्धभू धोरण” (काही शब्द मनावर कायमचे कोरले जातात) स्वीकारले, म्हणजे दुसऱ्या जागतिक युद्धात जर्मन सैन्याच्या आक्रमणाला सामोरे जाताना स्वतःच्या पायाभूत सुविधा उध्वस्त करत माघार घेतली. याचे कारण असे होते की जेव्हा शत्रू तुमच्या प्रदेशात प्रवेश करतो तेव्हा त्याला तुमच्या पायाभूत सुविधांचा वापर करता येऊ नये उदाहरणार्थ प्यायचे पाणी, रस्ते, निवारा, अन्न पुरवठा इत्यादी. रशियनांनी माघार घेताना अशाप्रकारची प्रत्येक उपयोगी गोष्ट नष्ट करून टाकली होती. सरतेशेवटी जर्मनांना उपासमारी थंडीमुळे शरणागती पत्करावी लागली कारण त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तुंचा साठा संपला होता. सशक्त शत्रूला तोंड देण्याचे हे धोरण अतिशय प्रसिद्ध झाले नंतर अनेक युद्धांमध्ये वापरले गेले पण कोणत्याही युद्ध धोरणाला प्रतिहल्ल्याची प्रभावी तसेच अचूक अंमलबजावणीचीही गरज असते, तरच तुम्ही युद्ध जिंकू शकता हे आपले शासनकर्ते विसरतात. आपल्याकडे नेमके हेच झाले कारण कोरोना नावाच्या शत्रूविरुद्ध लॉकडाउन हे दग्धभू धोरण आहे, पण एकदा आपल्या क्षेत्रात त्याचा प्रवेश झाल्यानंतर तो बाहेरून आतमध्ये नव्हे तर आतून बाहेर पसरत होता हे आपले शासनकर्ते विसरलेव तिथेच अपयशी ठरले. लॉकडाउनचे धोरण चुकीचे होते असे नाही तर तुमच्या सैन्याला त्या धोरणाचा वापर का केला जातोय हे समजून सांगणे आवश्यक होते सैन्यही शिस्तबद्ध असले पाहिजे. या सर्व घटकांच्याअभावामुळे लॉकडाउन काही आठवड्यानंतर साफ अपयशी ठरले.

आता भोवताली परिस्थिती अशी आहे की (किमान पुण्यामध्ये तरी) प्रत्येकजण घाबरलेला किंवा गोंधळलेला आहे, त्याला भविष्याची आरोग्यच्या बाबतीत तसेच आर्थिकदृष्टीकोनातूनही काळजी वाटतेय. अनेक जण मान्य करणार नाहीत मी नकारात्मक बोलतोय असे त्यांना वाटेल.परंतु डोळे उघडा (खरेतर मन) सभोवती एक नजर टाका तुम्हाला जे दिसते त्याचे विश्लेषण करा स्वतःला विचारा सगळे काही आलेबल आहे का? आहे असे तुम्हाला वाटत असेल तर उत्तम म्हणजे तुम्ही एकतर साक्षात्कारी आहात (एखाद्या बौद्ध भिख्खुसारखे) किंवा तुम्ही मूर्ख आहात, मी जर तुमच्या बुद्धिमत्तेचा अपमान केला असेल माफ करा! माझ्या भोवताली मला जो काही अनुभव येतोय तसेच माझ्या मित्रांनी अगदी अलिकडेच जे काही अनुभव सांगितले त्याची एक झलक इथे देतोय...

दृश्य ... आम्ही संध्याकाळी गजबजलेल्या रस्त्यावरून गाडीने जात होतो आम्हाला माझ्या आवडत्या दुकानातून आईसक्रीम घ्यायचे होते. पण दुकानाबाहेर थोडीशी गर्दी पाहून मित्र म्हणाले, इथे फारच गर्दी आहे, इथे थांबायला नको, म्हणून मी माझा आईसक्रीम घ्यायचा बेत रद्द केला.

दृश्य ... उपनगरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारी माझी एक मैत्रीण घरी परतत होती तिच्या इमारतीच्या लॉबीमध्ये लिफ्टची वाट पाहात उभी होती. एक मध्यमवयीन माणूसही घाईने आला लिफ्टची वाट पाहात होता त्याचवेळी कामगार वर्गातील एक माणूस तिथे आला. लिफ्ट आली तशी तो कामगार लिफ्टमध्ये शिरला, त्यानंतर तो मध्यमवर्गीय माणूस लिफ्टमध्ये जायला कुचरत होता तिथेच थांबला. हे पाहून माझी मैत्रीणही लिफ्टमध्ये शिरली नाही त्या कामगाराला एकटेच वर जाऊ दिले.  हे दोघेही लिफ्ट परत खाली यायची वाट पाहात उभे राहिले.

दृश्य ... मी माझ्या फॅमिली डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी गेलो होतो. ते अतिशय नावाजलेले डॉक्टर आहेत एरवी कोणत्याही दिवशी त्यांची वेटिंग रूम पेशंट्नी भरलेली असते. त्या दिवशी पाऊस पडत होता एक वृद्ध जोडपे एकटेच वेटिंग रूमध्ये बसलेले होते किमान चार रुग्ण वेटिंग रूमध्ये बसण्याऐवजी दवाखान्याबाहेर छत्री उघडून पावसात उभे होते

 ही सगळी दृश्ये लोक कशाप्रकारे जगताहेत याची केवळ एक झलक (क्षणचित्रे) आहेत. त्याचवेळी अगदी दुसऱ्या टोकाचीही माणसे आहेत जी कशाचीच काळजी करत नाहीत.माझ्या भागात कधीही फेरफटका मारायला निघा मला अनेक चेहरे दिसतात ज्यांचे मास्क नसतात किंवा नाकाखाली ओढलेला असतो यातील बहुतेकजण ज्येष्ठ नागरिकच असतात. हातात कापडी पिशवी घेऊन काहीतरी किरकोळ सामान आणायला निघालेले असतात, पण रस्त्यावर फिरण्यामागचे मुख्य कारण थोडी ताजी हवा खाणे हेच असते. मी त्यांना दोष देत नाही कारण आता चार महिने उलटून गेले आहेत एक किंवा दोन बीएचके फ्लॅटमध्ये घरातल्या इतर सदस्यांना नकोसे होईपर्यंत राहणे अवघड आहे. तसेच मॉन्सूनमध्ये आपल्या शहरात अतिशय दमट वातावरण असते, अशावेळी सामान्यपणे श्वास घेणेही अवघड जाते, मास्क लावणे तर जवळपास अशक्यच असते. पण मग तुम्हाला मास्क नीट लावायचा नसेल तर तो असा विनोदी प्रकारे का लावायचा. तुम्ही यामुळे केवळ तुमचाच नाही तर इतरांचा जीवही धोक्यात घालत आहात, ही साधी वस्तुस्थिती आपल्यापैकी बहुतेक स्वीकारू शकत नाहीत. यामुळे आपल्या शहरातील रुग्णांची संख्या इतर शहरांपेक्षा वाढतेय.

हा झाला आपला वैयक्तिक आरोग्याविषयीचा दृष्टिकोन, आर्थिक किंवा कामाच्या आघाडीवर तर आणखी सावळा गोंधळ आहे.जेव्हा पहिल्यांदा लॉकडाउनला सुरुवात झाली तेव्हा लोक घाबरलेले होते पण त्यांनी त्याचे स्वागत केले. पण एकापाठोपाठ एक लॉकडाउनची मालिकाच सुरू झाली. आपल्या मायबाप सरकारला हजारो व्यवसायांचे त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांचे काय भवितव्य आहे याविषयी शून्य कल्पना होती. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे हा सगळा लॉकडाउनचा परिणाम आहे अशी जनतेची भावना आहे.हे खरोखरच युद्ध आहे मी पुन्हा एकदा सांगतो मी या गोंधळासाठी फक्त सरकारला दोष देऊ शकत नाही. पण मग आपण दोष तरी कुणाला द्यायचा, देवाला. त्यानेच आपल्याला या युद्धाला तोंड द्यायला भाग पाडले आहे, पण मग वैयक्तिक तसेच सामूहिक नुकसान कमी व्हावे यासाठी आपण अधिक नियोजनबद्धपणे लढणे अपेक्षित नाही का, हे मला आपल्यापैकी प्रत्येकाला विचारायचे आहे.या देशामध्ये तीन वर्ग आहेत अगदीहाताच्या बोटावर मोजता येईल एवढा२% उच्चभ्रू वर्ग सोडला तरमध्यम गरीब वर्गातील लोकांना केवळ आर्थिक फटकाच बसलेला नाही तर आरोग्याच्यादृष्टीने तसेच आर्थिकबाबतीत त्यांचे भविष्य कसे असेल याची त्यांना पुसटशीही कल्पना नाही. हे अतिशय भयंकर लक्षण आहे कारण यामुळे पूर्ण समाजाच्या मानसिकतेवर परिणाम होतोय. आता समाज जणू एखाद्या टाईम बाँबवर बसलाय अशी परिस्थिती आहे ज्याचा स्फोट कोणत्याही क्षणी होऊ शकतो. आपले शासनकर्ते मात्र केवळ तोपर्यंत काहीतरी चमत्कार होण्याची वाट पाहताहेत.म्हणूनच पहिल्या दोन महिन्यांनंतर लॉकडाउन केवळ कागदावरच राहिले तुम्ही ज्या सेवा सक्तिने बंद करू शकता त्यापुरतेच मर्यादित राहिले. ही साथ झपाट्याने पसरण्याचे खरे कारण म्हणजे झोपडपट्ट्यांची बेसुमार वाढ त्यामध्ये नाईलाजाने राहणाऱ्या लोकांची जीवनशैली, कारण आपण त्यांना सुरक्षित सामाजिक अंतर राखता येईल असे सुरक्षित घर देऊ शकत नाही, आणि त्याविषयी काहीच उपाय योजना देतांना दिसत नाहीत.

खरेतर अशावेळी नेत्यांनी जनतेशी सतत संवाद साधला पाहिजे, केवळ बोलून नव्हे तर कृतीतून सकारात्मक ऊर्जा निर्माण केली पाहिजे. विविध योजनांमधून सामान्य माणसाला विश्वास दिला पाहिजे की त्याला (किंवा तिला) सरकारने वाऱ्यावर सोडलेले नाही तर अजूनही आशेचा किरण आहे. कोणतीही आशा विश्वासाशिवाय निर्माण होऊ शकत नाही त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागते, म्हणजे लोकांना विश्वास वाटू लागतो. सध्या ही कृतीच होताना दिसत नाही, आपल्याकडे रुग्णांना दाखल करून घ्यायला पुरेशी रुग्णालये नाहीत खाजगी वैद्यकीय सेवांच्या दरांवर लक्ष ठेवले जात नाही. यामुळे सामान्य माणसाला आर्थिक मानसिक त्रास होतो. त्याचवेळी अर्थ मंत्रालय बँकांना किंवा वित्तीय संस्थांना स्पष्ट मार्गदर्शक सूचनाही देत नाही. सरकारने ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी जाहीर केले की अनुदानाच्या स्वरुपातील पैसा थेट व्यक्तींच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा होईल. त्याचप्रमाणे जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात मात्र सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यांच्या कर्जाच्या व्याजाची रक्कमही सरकार थेट बँकेत का जमा करत नाही.कामकाज चार महिने पूर्णपणे बंद राहिल्यामुळे झालेला प्रचंड तोटा, कर्जाची परतफेड लांबणीवर टाकून किंवा त्यासाठी आणखी वेळ देऊन भरून निघणार नाही. सरकारच्या लॉकडाउनच्या धोरणामध्ये अजूनही अस्पष्टता आहे. सध्याच्या कर्जाचे व्याजदर सुधारित (म्हणजे कमी) का केले जात नाहीत कर्जाचे केवळ परतफेडीच्या बाबतीतच नाही तर वित्तपुरवठा सुधारण्यादृष्टीने फेरनियोजन का केले जात नाही. ते केले जात असेल तर ते जनतेपर्यंत म्हणजेच लहान खऱ्या अर्थाने गरजू व्यावसायिक महिलांपर्यंत पोहोचतच नाहीये ही कटू वस्तुस्थिती मायबाप सरकारला समजली पाहिजे. ती स्वीकारा कृपया त्यावर काम करा.

त्यानंतर प्रिय मायबाप सरकार, कृपया संपूर्ण अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी पावले उचला. त्यासाठी तुम्ही आधी लोकांना आरोग्याच्या बाबतीत आर्थिक आघाडीवरही निर्धास्त केले पाहिजे. तर सर्वप्रथम लोकांना नेमकी भीती कशाची वाटते हे समजून घेऊ, ही साथ आहे विषाणू सगळीकडे आहे. पण याचा अर्थ आपण जगणे थांबवावे असा होत नाही. काहीजण तसे करू शकतात मात्र बहुतेकजण तसे करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे,  सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ तर नक्कीच नाही. सहा महिने आधीच उलटून गेले आहेत हे लॉकडाउन कदाचित आणखी वाढवण्याची गरज पडेल पण किमान या युद्धाला तोंड द्यायला एकच नियंत्रण संस्था तरी ठेवा. दररोज नवीन परिपत्रके निघतात, दररोज नवीन तर्क-वितर्क लढवले जातात, दररोज वेगवेगळ्या व्यक्ती नव्या घोषणा करतात, यामुळे लोक अधिक गोंधळतात शेवटी भीती निर्माण होते. लस जेव्हा तयार होईल तेव्हा येईल पण तोपर्यंत प्रत्येकाचे स्वतःचे मन या आजारापासून त्याचे किंवा तिचे सर्वोत्तम रक्षण करते, ही वस्तुस्थिती आहे. आपण त्या प्रत्येक मनाला बळकटी दिली पाहिजे. सेनापतीकडून (सेनापतींकडून) हेच अपेक्षित असते.

मी पुन्हा एकदा सांगतो कुणीही व्यावसायिक, उद्योजक, उत्पादक, व्यापारी, सेवा पुरवठादार किंवा एखादा वैयक्तिक व्यावसायिक अथवा संघटना, सरकारने त्यांना नफा कमवायला किंवा त्यांची उत्पादने अथवा सेवा विकायला मदत करावी अशी अपेक्षा करणार नाहीत. कारण आम्ही या व्यवसाया मध्ये आमच्या जोखमीवर आहोत आम्हा सगळ्यांना याची पुरेपूर कल्पना आहे. अपेक्षा फक्त एवढीच आहे की,आमच्यासाठी एखाद्या सैन्याच्या सेनापतीप्रमाणे असलेल्या सरकारने, साथीच्या रोगरुपी युद्धाला तोंड देण्यासाठीदग्धभूधोरण स्वीकारले आहे. परंतु त्याच वेळी सेनापतीने स्वतःचे सैन्य कसे जगेल याचाही विचार केला पाहिजे, नाहीतर युद्धात विजय मिळवला तरी विजय साजरा करण्यासाठी काही आनंद उरेल का, असा प्रश्न स्वतःला विचारा.

आणि हो , आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला काळजी घेणे काळजीच्या भीतीखाली जगणे यातील फरकाची जाणीव ठेवली पाहिजे. कोणतेही सरकार आपली उपजीविका चालवू शकत नाही, हे आपले जीवन आहे ते आपल्यालाच जगायचे आहे. कोणत्याही युद्धात, एक क्षण असा येतो की केवळ तुम्ही तुमचे जीवन या   विरुद्ध शत्रू अशी परिस्थिती असते; त्यावेळी तुम्ही काय करता यावरून तुम्ही युद्धामध्ये जय  पराजयच्या कोणत्या बाजूला असाल हे ठरते, हे लक्षात ठेवा.

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com

 

Wednesday, 15 July 2020

बांधकाम व्यवसायाची रुपेरी कडा





















“विपरित परिस्थिती मध्येही बहरणारे फूलच खरं म्हणजे अतिशय दुर्मिळ व सर्वात सुंदर असते.”... मुलान, वॉल्ट डिस्ने कंपनी.

तर मित्रांनो मुलान याच नावाने प्रदर्शित झालेल्या वॉल्ट डिस्नेच्या कंपनीच्या चित्रपटातील मुलान हे प्रमुख पात्र आहे, आता वॉल्ट डिस्ने कंपनी काय आहे हे कृपया विचारू नका! अनेकदा डिस्ने कंपनीवर त्यांचे चित्रपट प्रेमाच्या, एकोप्याच्या व शौर्याच्या जुन्या पुराण्या समीकरणावर आधारित असतात अशी टीका होते. त्याचप्रमाणे आपल्या बॉलिवुड चित्रपटांवर “विभक्त झालेल्या भावांचे” (हरवलेले व सापडलेले भाऊ) समीकरण वापरण्याची टीका होते. मात्र “हरवले व सापडले” समीकरणाची ब्लॉक बस्टर चित्रपट देण्याची क्षमता आता संपलेली आहे कारण ते केवळ काल्पनिक व उथळ पायावर आधारित होते ज्यामध्ये भावनांचा केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करण्यात आला होता. परंतु डिस्नेचे प्रेम, चांगुलपणा, एकोपा व शौर्याचे समीकरण मानवी जीवनातील खरी मूल्ये दाखवते. त्यामुळे हे समीकरण डिस्नेशी  कितीही वेळा वापरले असले तरीही सोन्याप्रमाणे तेही बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करत असते. मी म्हणूनच डिस्नेच्या पात्रांचा व त्यांच्या तत्त्वज्ञानाचा निस्सीम चाहता आहे. मात्र खरी गरज आता या भावनांची रिअल इस्टेट क्षेत्रला  आहे

खरतर इतर उद्योगांच्या उलट कोरोना-पूर्व काळामध्येही रिअल इस्टेटची परिस्थिती फारशी चांगली नव्हती ही वस्तुस्थिती आहे. आणि कोणतीही समस्या सोडविण्याचा पहिला नियम म्हणजे ती समस्या स्वीकारणे, नेमके याच कारणाने फक्त क्रेडाईचा मेंबर म्हणून नव्हे तर  मला लिहावेसे वाटले ते  तुमचा एक बांधकाम व्यावसायिक सहकारी म्हणून सुद्धा पण हे स्वतः जाऊन एका अर्थाने वरदानच होते कारण संपूर्ण देशभरात लॉकडाउन सुरू होण्या आधी केवळ रिअल इस्टेटमध्येच नाही तर एकूणच सगळीकडे फारशी उत्साहवर्धक परिस्थिती नव्हती. आपल्या सगळ्यांकडे व्यवहार ज्ञान आहे म्हणूनच आपण व्यावसायिक म्हणून जिथे आहोत तिथ पर्यंत पोहोचलो. मला एक सांगा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एक कार ताशी १२० किमी वेगाने व दुसरी ताशी ६० किमी वेगाने चालली असताना,एखादी म्हैस अचानक रस्त्यात  मध्ये आली (असे खरोखरच होऊ शकते) व दोन्ही कार म्हशीवर आदळल्या, तर कोणत्या कारचे जास्त नुकसान होईल? अर्थातच जी कार ताशी १२० किमी वेगाने प्रवास करत होती तिचे होईल, कारण ताशी ६० किमी वेगाने प्रवास करणारी कार जर चालक चांगला असला तर तो वेळीच गाडी थांबवू शकेल किंवा त्याने (किंवा ती, क्रेडाईच्या महिलासाठी तिने) म्हशीला धडक दिली तरीही वेग कमी असल्यामुळे अर्थातच कमी नुकसान होईल. आता हीच उपमा लॉकडाउनला लावून बघा आपली कार (रिअल इस्टेट) ताशी ६० किमीने चालली होती व सेवा उद्योग, आतिथ्य उद्योग, बँकिंग, ब्रोकिंग (शेअर्स), पर्यटन उद्योग व सिने उद्योग या सर्वांची गाडी भरधाव म्हणजे ताशी १२० किमी वेगाने चालली होती व आता त्यांची काय परिस्थिती झाली आहे ते पाहा. मी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या उद्देशाने तुम्हाला हे सांगत नाही, तर तुम्हाला केवळ वस्तुस्थिती सांगतोय. कारण सगळे काही संपलेले नाही किंबहुना तुम्ही रिअल इस्टेटमध्ये आहात किंवा अगदी हॉटेल उद्योगात आहात (बहुतेक बांधकाम व्यावसायिक हॉटेलीयरपण आहेत) म्हणून सुदैवी आहात, कारण तुमची गाडी संथ गतीने जात होती म्हणूनच तुम्हाला जीवघेणी इजा झाली नाही व काहीवेळ संथपणे जाणेच चांगले असते, विशेषतः लांब पल्ल्याच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर, आपलीही सध्या अशीच परिस्थिती आहे.

मित्रांनो, हे कोरोनाचे संकट कधीतरी संपेल मात्र ते शेवटचे असेल असे सांगता येत नाही, दुसरे काहीतरी संकट उद्भवू शकते. आणि असे होऊ शकते हे आपल्या संभाव्य ग्राहकांना समजले आहे व आपल्याला त्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे. आता लोक बिनधास्तपणे जगणार नाहीत व अनावश्यक गोष्टींवर खर्च करणार नाहीत, तर  पुन्हा एकदा ८० किंवा ९० च्या दशकात होती तशी परिस्थिती असेल त्यांना पैशाचा पुरेपूर मोबदला मिळावा अशी अपेक्षा असेल. याचा अर्थ लोक खर्चच करणार नाहीत असा नाही पण आत्तापर्यंत नवी पिढी उद्याचा दिवस उजाडणारच नाही अशाप्रकारे खर्च करायची, मात्र त्यांना आत्ता जो “जोरदार झटका” बसला आहे त्यामुळे उद्याचा दिवसही आहे व त्यासाठी विचार करावा लागेल याची त्यांना जाणीव झाली आहे. सध्याच्या निराशाजनक परिस्थितीत रिअल इस्टेटसाठी नेमकी हीच रुपेरी किनार आहे, कारण जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादे कुटुंब भविष्याचा विचार करते तेव्हा घर खरेदी करणे हा त्याचा अविभाज्य भाग असतो. एखादी लस टोचावी त्याप्रमाणे  आपल्या मध्यमवर्गीय/उच्च मध्यमवर्गीय रक्तामध्ये अगदी लहानपणापासून हेच भिनलेले आहे. जीवनशैली व स्व‍च्छंदी दृष्टीकोन नावाच्या विषाणूमुळे या लसीचा प्रभाव मध्ये नाहीसा झाला होता, मात्र सरतेशेवटी तिने या दोन्हींवर मात केली आहे. आत्तापर्यंत अशी मानसिकता होती की घराचे एवढे मोठे हप्ते कशासाठी भरायचे, आपण कायमचेच भाड्याच्याच घरात राहिलो तरी काय फरक पडतोय? लॉकडाउनमुळे आता या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे हे मी सविस्तर सांगायची गरज आहे का? कोणत्याही अडीअडचणीच्या काळात तुमचे स्वतःचे घरच  तुमच्यासोबत सुरक्षित निवारा म्हणून उभे राहते तसेच आर्थिक बाबतीत विचार केला तर तुमची स्थावर मालमत्ताही तयार होते. यामुळे तुम्हाला कोणत्याही संकटाला तोंड देता येईल असा आत्मविश्वास मिळतो, याची आपल्या संभाव्य ग्राहकांना जाणीव झालेली आहे, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकांनो ही संपूर्ण परिस्थिती अप्रत्यक्षपणे वरदानच आहे असा विचार करा, किमान माझातरी हाच तर्क आहे!

आपल्या जाहिरातींमध्ये जशी तारांकित चिन्हाद्वारे * (ते किती लहान असले तरीही) ठळक वैशिष्ट्ये दिलेली असतात, घरांच्या मागणीविषयी असलेले हे वरदानही तारांकितचं  * आहे. म्हणूनच आता तुम्हाला  ग्राहकांची “फसवणूक” करता येणार नाही, माझ्या बोलण्यामुळे कुणी दुखावले असेल तर मला सांगावेसे वाटते की याचा अर्थ तुमच्या ग्राहकांना जसे घर हवे आहे तसे बांधा, तुम्हाला जसे हवे आहे तसे नाही. बाजाराची गरज जाणून घ्या व त्यानुसार नियोजन करा. तुम्ही जे  प्रॉमिस केले आहे ते द्या किंबहुना जे देऊ शकाल तेच प्रॉमिस  करा. मी काही उंची सोयीसुविधा किंवा वैशिष्ट्यांविरुद्ध नाही पण तुम्ही जे काही देत आहात त्यातून पैशांचा पुरेपूर मोबदला मिळाला पाहिजे, अगदी उंची सोयीसुविधांना युक्त घरांच्या बाबतीतही. या साथीमुळे केवळ पुणेच नाही तर संपूर्ण देशावर व सर्व क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. आता पुण्यासारख्या ठिकाणी येणाऱ्या लोकांचा ओघ वाढेल. मी स्वतः विदर्भाचा (नागपूर) आहे व मला राज्यातल्या ग्रामीण भागांमधील परिस्थितीविषयी अतिशय वाईट वाटते. माझा इतर लहान शहरांना घाबरवण्याचा हेतू नाही. परंतु रोजगार व शिक्षण या बाबी नेहमीच रिअल इस्टेटचा कणा राहिल्या आहेत (व राहतील) व दुर्दैवाने पुणे वगळता मला इतर कोणत्याही शहरात दोन्ही गोष्टी 
दर्जेदार असल्याचे दिसत नाहीत. त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती पुण्याच्या दिशेने धाव घेतेय असे नाही, पण इतर शहरांमध्ये नोकरी व शिक्षण या दोन्हींचा विचार करता लोकांच्या अपेक्षा व उपलब्धता व दर्जा याचा ताळमेळ  बसत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे व स्वीकारले पाहिजे. मायबाप सरकारने काही अतिशय नाविन्यपूर्ण धोरण राबविल्याशिवाय, पुण्याकडे येणारा लोकांचा ओघ थांबणार नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. या संक्रमणाला वेळ लागू शकतो पण ते निश्चितपणे होईल व त्याचा पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला फायदा होईल. फक्त आपण त्यासाठी तयार असले पाहिजे, आता गरज  आहे फक्त आपलं अस्तित्व टिकवून धरण्याची . आणि हो या शिवाय घरून काम करण्याचा सोईमुळे  जशी घराची गरज वाढेल तसेच मुंबइहुन  पण पुण्याला एक मोठा वर्ग स्थलांतरित होऊ शकतो , तो सुद्धा आपला ग्राहक असेल!
मित्रांनो मला माहितीय कुणालातरी “धीर धरा”, ”प्रत्येक काळोखी रात्र संपतेच”, वगैरेसारखे तत्त्वज्ञान सांगणे अतिशय सोपे असते, पण ज्याला कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे असतात, कर्जावरील व्याज भरायचे असते, घरांचा ताबा द्यायचा असतो, विविध सरकारी प्राधिकरणांना तोंड द्यायचे असते, डोक्यावर रेरासारखी टांगती तलवार असते, त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी हे सगळे पाठिंबा देणारे शब्द समजून घेणे अतिशय कठीण असते, मात्र मित्रांनो दुसरा कोणताच पर्याय नाही. तुम्ही कंपनीचे मालक आहात मग ती कितीही लहान असो किंवा मोठी असो, तुम्ही स्वेच्छेने तुमच्या लहानशा सैन्याचे नेतृत्व स्वीकारले आहे व या युद्धामध्ये एक नेता आपली भीती चेहऱ्यावर दाखवू शकत नाही. माझे असे म्हणणे नाही की नेत्याला भीती वाटूच नये, तुम्हीही माणूसच आहात परंतु नेतृत्वपदी असल्यामुळे तुम्हाला तुमच्या भीतीसोबतच तुमच्या सैन्याला (चमूच्या) वाटणाऱ्या भीतीचा भारही उचलावा लागतो. पण तुमच्यामध्ये हा भार उचलण्याची क्षमता आहे म्हणूनच तुम्ही नेतृत्व करत आहात व तुमचा चमू तुमच्याकडे आशेने पाहतोय, तुम्ही त्यांच्यासाठी धीर धरला पाहिजे. तर्कशुद्ध विचार करा व शांत डोक्याने परिस्थितीचे विश्लेषण करा. प्रत्येकवेळी तुम्हाला वेगाने धावण्याची किंवा पोहण्याची गरज नसते, काहीवेळा तुम्हाला अंतिम रेषा दिसेपर्यंत सावकाश धावा किंवा नुसते तरंगत राहा.
या काळात तुमचे नातेसंबंध दृढ करण्याचा प्रयत्न करा, मग ते तुमचे कुटुंब, ग्राहक, विक्रेते, शेजारी किंवा तुमच्या माहितीतील कुणीही असो, त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांशी बोला, फ्लॅटची विक्री करण्यासाठी त्यांचा पुढाकार व त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे याची त्यांना जाणीव करून द्या. त्यामुळे त्यांना आत्मविश्वास वाटेल व तुम्हीच हे करू शकता. वर नमूद केलेल्या तुमच्या सर्व संपर्कांशी बोला, त्यांना पत्र पाठवा, ईमेल पाठवा, वॉट्सपवर संदेश पाठवा पण संपर्कात राहा. तुमच्या गरजा सांगा, तुमच्याकडे विक्रीसाठी काय उपलब्ध आहे हे सांगा, या काळात घर घेण्याचे महत्त्व  समजावून सांगा व हे सगळे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. मी म्हटल्याप्रमाणे, ग्राहकाला हा व्यवहार आपल्यासाठी चांगला आहे याची जाणीव होण्यासाठी, आधी तुम्हाला चांगला व्यवहार म्हणजे काय हे माहिती असले पाहिजे. कसेही करून फ्लॅट विकण्यासाठी जगबुडी होणार असल्यासारखे पळत सुटू नका. तसेच तुमच्यापैकी ज्यांची अजूनही नव्या जमीनी (पुनर्विकासासाठीच्या व मोक्याच्या जागा घेणाऱ्या  मित्रांनो) खरेदी करण्याची क्षमता आहे त्यांनी हा पृथ्वीवरील जमीनीचा शेवटचा तुकडा आहे अशाप्रकारे ऑफर देऊ नका कारण शेवट तुम्हाला त्या जमीनीतूनच तुमचे पैसे वसूल करायचे आहेत.


आणखी एक गोष्ट व ही थोडी वैयक्तिक आहे, स्वतःशी संवाद साधण्यासाठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करा. एखादा छंद जोपासा, यामुळे आपल्या विचारांना योग्य दिशा मिळते व संतुलितपणे विचार करता येतो. लक्षात ठेवा हे एक प्रकारच युद्ध आहे, मात्र प्रत्येक युद्धानंतर सुखरूप  वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचीच भरभराट होते. धीटपण  व भीत्रोपणा  यामध्ये अगदी पुसट रेषा आहे, त्या रेषेला शहाणपण म्हणतात कारण शहाण्या माणसाला पुढे कधी जायचे व माघार कधी घ्यायची हे माहिती असते. काही वेळी तो धीट असतो व काही वेळी त्याच्यावर भित्रेपणाचा शिक्का बसला तरी त्याची काही हरकत नसते. मी फार उपदेशाचा डोस पाजला असेल तर मित्रांनो माफ करा, मीदेखील तुमच्याहून वेगळा नाही, मलाही माझ्या कंपनीच्या भविष्याची काळजी, चिंता, भीती वाटते, पण माझ्या नाण्याची ही  एक बाजू आहे. दुसऱ्या बाजूला, मला आनंद वाटतो की मला रिअल इस्टेटचे उज्ज्वल भवितव्य दिसत आहे, मला जाणीव आहे की मला माझ्या तसेच माझ्या चमूच्या भीतीचा भारही उचलायचा आहे (इथे दुसरा पर्याय नाही) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या युद्धाचे फलित काहीही असो माझी आठवण लढवय्या म्हणून केली जावी असे मला वाटते. म्हणूनच बांधकाम व्यावसायिक मित्रांनो, तुमच्या सैन्याचे नेतृत्व करा व तुम्ही नेतृत्व करत असल्याचा अभिमान बाळगा.
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com