Wednesday, 15 July 2020

बांधकाम व्यवसायाची रुपेरी कडा





















“विपरित परिस्थिती मध्येही बहरणारे फूलच खरं म्हणजे अतिशय दुर्मिळ व सर्वात सुंदर असते.”... मुलान, वॉल्ट डिस्ने कंपनी.

तर मित्रांनो मुलान याच नावाने प्रदर्शित झालेल्या वॉल्ट डिस्नेच्या कंपनीच्या चित्रपटातील मुलान हे प्रमुख पात्र आहे, आता वॉल्ट डिस्ने कंपनी काय आहे हे कृपया विचारू नका! अनेकदा डिस्ने कंपनीवर त्यांचे चित्रपट प्रेमाच्या, एकोप्याच्या व शौर्याच्या जुन्या पुराण्या समीकरणावर आधारित असतात अशी टीका होते. त्याचप्रमाणे आपल्या बॉलिवुड चित्रपटांवर “विभक्त झालेल्या भावांचे” (हरवलेले व सापडलेले भाऊ) समीकरण वापरण्याची टीका होते. मात्र “हरवले व सापडले” समीकरणाची ब्लॉक बस्टर चित्रपट देण्याची क्षमता आता संपलेली आहे कारण ते केवळ काल्पनिक व उथळ पायावर आधारित होते ज्यामध्ये भावनांचा केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करण्यात आला होता. परंतु डिस्नेचे प्रेम, चांगुलपणा, एकोपा व शौर्याचे समीकरण मानवी जीवनातील खरी मूल्ये दाखवते. त्यामुळे हे समीकरण डिस्नेशी  कितीही वेळा वापरले असले तरीही सोन्याप्रमाणे तेही बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करत असते. मी म्हणूनच डिस्नेच्या पात्रांचा व त्यांच्या तत्त्वज्ञानाचा निस्सीम चाहता आहे. मात्र खरी गरज आता या भावनांची रिअल इस्टेट क्षेत्रला  आहे

खरतर इतर उद्योगांच्या उलट कोरोना-पूर्व काळामध्येही रिअल इस्टेटची परिस्थिती फारशी चांगली नव्हती ही वस्तुस्थिती आहे. आणि कोणतीही समस्या सोडविण्याचा पहिला नियम म्हणजे ती समस्या स्वीकारणे, नेमके याच कारणाने फक्त क्रेडाईचा मेंबर म्हणून नव्हे तर  मला लिहावेसे वाटले ते  तुमचा एक बांधकाम व्यावसायिक सहकारी म्हणून सुद्धा पण हे स्वतः जाऊन एका अर्थाने वरदानच होते कारण संपूर्ण देशभरात लॉकडाउन सुरू होण्या आधी केवळ रिअल इस्टेटमध्येच नाही तर एकूणच सगळीकडे फारशी उत्साहवर्धक परिस्थिती नव्हती. आपल्या सगळ्यांकडे व्यवहार ज्ञान आहे म्हणूनच आपण व्यावसायिक म्हणून जिथे आहोत तिथ पर्यंत पोहोचलो. मला एक सांगा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एक कार ताशी १२० किमी वेगाने व दुसरी ताशी ६० किमी वेगाने चालली असताना,एखादी म्हैस अचानक रस्त्यात  मध्ये आली (असे खरोखरच होऊ शकते) व दोन्ही कार म्हशीवर आदळल्या, तर कोणत्या कारचे जास्त नुकसान होईल? अर्थातच जी कार ताशी १२० किमी वेगाने प्रवास करत होती तिचे होईल, कारण ताशी ६० किमी वेगाने प्रवास करणारी कार जर चालक चांगला असला तर तो वेळीच गाडी थांबवू शकेल किंवा त्याने (किंवा ती, क्रेडाईच्या महिलासाठी तिने) म्हशीला धडक दिली तरीही वेग कमी असल्यामुळे अर्थातच कमी नुकसान होईल. आता हीच उपमा लॉकडाउनला लावून बघा आपली कार (रिअल इस्टेट) ताशी ६० किमीने चालली होती व सेवा उद्योग, आतिथ्य उद्योग, बँकिंग, ब्रोकिंग (शेअर्स), पर्यटन उद्योग व सिने उद्योग या सर्वांची गाडी भरधाव म्हणजे ताशी १२० किमी वेगाने चालली होती व आता त्यांची काय परिस्थिती झाली आहे ते पाहा. मी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या उद्देशाने तुम्हाला हे सांगत नाही, तर तुम्हाला केवळ वस्तुस्थिती सांगतोय. कारण सगळे काही संपलेले नाही किंबहुना तुम्ही रिअल इस्टेटमध्ये आहात किंवा अगदी हॉटेल उद्योगात आहात (बहुतेक बांधकाम व्यावसायिक हॉटेलीयरपण आहेत) म्हणून सुदैवी आहात, कारण तुमची गाडी संथ गतीने जात होती म्हणूनच तुम्हाला जीवघेणी इजा झाली नाही व काहीवेळ संथपणे जाणेच चांगले असते, विशेषतः लांब पल्ल्याच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर, आपलीही सध्या अशीच परिस्थिती आहे.

मित्रांनो, हे कोरोनाचे संकट कधीतरी संपेल मात्र ते शेवटचे असेल असे सांगता येत नाही, दुसरे काहीतरी संकट उद्भवू शकते. आणि असे होऊ शकते हे आपल्या संभाव्य ग्राहकांना समजले आहे व आपल्याला त्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे. आता लोक बिनधास्तपणे जगणार नाहीत व अनावश्यक गोष्टींवर खर्च करणार नाहीत, तर  पुन्हा एकदा ८० किंवा ९० च्या दशकात होती तशी परिस्थिती असेल त्यांना पैशाचा पुरेपूर मोबदला मिळावा अशी अपेक्षा असेल. याचा अर्थ लोक खर्चच करणार नाहीत असा नाही पण आत्तापर्यंत नवी पिढी उद्याचा दिवस उजाडणारच नाही अशाप्रकारे खर्च करायची, मात्र त्यांना आत्ता जो “जोरदार झटका” बसला आहे त्यामुळे उद्याचा दिवसही आहे व त्यासाठी विचार करावा लागेल याची त्यांना जाणीव झाली आहे. सध्याच्या निराशाजनक परिस्थितीत रिअल इस्टेटसाठी नेमकी हीच रुपेरी किनार आहे, कारण जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादे कुटुंब भविष्याचा विचार करते तेव्हा घर खरेदी करणे हा त्याचा अविभाज्य भाग असतो. एखादी लस टोचावी त्याप्रमाणे  आपल्या मध्यमवर्गीय/उच्च मध्यमवर्गीय रक्तामध्ये अगदी लहानपणापासून हेच भिनलेले आहे. जीवनशैली व स्व‍च्छंदी दृष्टीकोन नावाच्या विषाणूमुळे या लसीचा प्रभाव मध्ये नाहीसा झाला होता, मात्र सरतेशेवटी तिने या दोन्हींवर मात केली आहे. आत्तापर्यंत अशी मानसिकता होती की घराचे एवढे मोठे हप्ते कशासाठी भरायचे, आपण कायमचेच भाड्याच्याच घरात राहिलो तरी काय फरक पडतोय? लॉकडाउनमुळे आता या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे हे मी सविस्तर सांगायची गरज आहे का? कोणत्याही अडीअडचणीच्या काळात तुमचे स्वतःचे घरच  तुमच्यासोबत सुरक्षित निवारा म्हणून उभे राहते तसेच आर्थिक बाबतीत विचार केला तर तुमची स्थावर मालमत्ताही तयार होते. यामुळे तुम्हाला कोणत्याही संकटाला तोंड देता येईल असा आत्मविश्वास मिळतो, याची आपल्या संभाव्य ग्राहकांना जाणीव झालेली आहे, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकांनो ही संपूर्ण परिस्थिती अप्रत्यक्षपणे वरदानच आहे असा विचार करा, किमान माझातरी हाच तर्क आहे!

आपल्या जाहिरातींमध्ये जशी तारांकित चिन्हाद्वारे * (ते किती लहान असले तरीही) ठळक वैशिष्ट्ये दिलेली असतात, घरांच्या मागणीविषयी असलेले हे वरदानही तारांकितचं  * आहे. म्हणूनच आता तुम्हाला  ग्राहकांची “फसवणूक” करता येणार नाही, माझ्या बोलण्यामुळे कुणी दुखावले असेल तर मला सांगावेसे वाटते की याचा अर्थ तुमच्या ग्राहकांना जसे घर हवे आहे तसे बांधा, तुम्हाला जसे हवे आहे तसे नाही. बाजाराची गरज जाणून घ्या व त्यानुसार नियोजन करा. तुम्ही जे  प्रॉमिस केले आहे ते द्या किंबहुना जे देऊ शकाल तेच प्रॉमिस  करा. मी काही उंची सोयीसुविधा किंवा वैशिष्ट्यांविरुद्ध नाही पण तुम्ही जे काही देत आहात त्यातून पैशांचा पुरेपूर मोबदला मिळाला पाहिजे, अगदी उंची सोयीसुविधांना युक्त घरांच्या बाबतीतही. या साथीमुळे केवळ पुणेच नाही तर संपूर्ण देशावर व सर्व क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. आता पुण्यासारख्या ठिकाणी येणाऱ्या लोकांचा ओघ वाढेल. मी स्वतः विदर्भाचा (नागपूर) आहे व मला राज्यातल्या ग्रामीण भागांमधील परिस्थितीविषयी अतिशय वाईट वाटते. माझा इतर लहान शहरांना घाबरवण्याचा हेतू नाही. परंतु रोजगार व शिक्षण या बाबी नेहमीच रिअल इस्टेटचा कणा राहिल्या आहेत (व राहतील) व दुर्दैवाने पुणे वगळता मला इतर कोणत्याही शहरात दोन्ही गोष्टी 
दर्जेदार असल्याचे दिसत नाहीत. त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती पुण्याच्या दिशेने धाव घेतेय असे नाही, पण इतर शहरांमध्ये नोकरी व शिक्षण या दोन्हींचा विचार करता लोकांच्या अपेक्षा व उपलब्धता व दर्जा याचा ताळमेळ  बसत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे व स्वीकारले पाहिजे. मायबाप सरकारने काही अतिशय नाविन्यपूर्ण धोरण राबविल्याशिवाय, पुण्याकडे येणारा लोकांचा ओघ थांबणार नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. या संक्रमणाला वेळ लागू शकतो पण ते निश्चितपणे होईल व त्याचा पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला फायदा होईल. फक्त आपण त्यासाठी तयार असले पाहिजे, आता गरज  आहे फक्त आपलं अस्तित्व टिकवून धरण्याची . आणि हो या शिवाय घरून काम करण्याचा सोईमुळे  जशी घराची गरज वाढेल तसेच मुंबइहुन  पण पुण्याला एक मोठा वर्ग स्थलांतरित होऊ शकतो , तो सुद्धा आपला ग्राहक असेल!
मित्रांनो मला माहितीय कुणालातरी “धीर धरा”, ”प्रत्येक काळोखी रात्र संपतेच”, वगैरेसारखे तत्त्वज्ञान सांगणे अतिशय सोपे असते, पण ज्याला कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे असतात, कर्जावरील व्याज भरायचे असते, घरांचा ताबा द्यायचा असतो, विविध सरकारी प्राधिकरणांना तोंड द्यायचे असते, डोक्यावर रेरासारखी टांगती तलवार असते, त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी हे सगळे पाठिंबा देणारे शब्द समजून घेणे अतिशय कठीण असते, मात्र मित्रांनो दुसरा कोणताच पर्याय नाही. तुम्ही कंपनीचे मालक आहात मग ती कितीही लहान असो किंवा मोठी असो, तुम्ही स्वेच्छेने तुमच्या लहानशा सैन्याचे नेतृत्व स्वीकारले आहे व या युद्धामध्ये एक नेता आपली भीती चेहऱ्यावर दाखवू शकत नाही. माझे असे म्हणणे नाही की नेत्याला भीती वाटूच नये, तुम्हीही माणूसच आहात परंतु नेतृत्वपदी असल्यामुळे तुम्हाला तुमच्या भीतीसोबतच तुमच्या सैन्याला (चमूच्या) वाटणाऱ्या भीतीचा भारही उचलावा लागतो. पण तुमच्यामध्ये हा भार उचलण्याची क्षमता आहे म्हणूनच तुम्ही नेतृत्व करत आहात व तुमचा चमू तुमच्याकडे आशेने पाहतोय, तुम्ही त्यांच्यासाठी धीर धरला पाहिजे. तर्कशुद्ध विचार करा व शांत डोक्याने परिस्थितीचे विश्लेषण करा. प्रत्येकवेळी तुम्हाला वेगाने धावण्याची किंवा पोहण्याची गरज नसते, काहीवेळा तुम्हाला अंतिम रेषा दिसेपर्यंत सावकाश धावा किंवा नुसते तरंगत राहा.
या काळात तुमचे नातेसंबंध दृढ करण्याचा प्रयत्न करा, मग ते तुमचे कुटुंब, ग्राहक, विक्रेते, शेजारी किंवा तुमच्या माहितीतील कुणीही असो, त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांशी बोला, फ्लॅटची विक्री करण्यासाठी त्यांचा पुढाकार व त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे याची त्यांना जाणीव करून द्या. त्यामुळे त्यांना आत्मविश्वास वाटेल व तुम्हीच हे करू शकता. वर नमूद केलेल्या तुमच्या सर्व संपर्कांशी बोला, त्यांना पत्र पाठवा, ईमेल पाठवा, वॉट्सपवर संदेश पाठवा पण संपर्कात राहा. तुमच्या गरजा सांगा, तुमच्याकडे विक्रीसाठी काय उपलब्ध आहे हे सांगा, या काळात घर घेण्याचे महत्त्व  समजावून सांगा व हे सगळे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. मी म्हटल्याप्रमाणे, ग्राहकाला हा व्यवहार आपल्यासाठी चांगला आहे याची जाणीव होण्यासाठी, आधी तुम्हाला चांगला व्यवहार म्हणजे काय हे माहिती असले पाहिजे. कसेही करून फ्लॅट विकण्यासाठी जगबुडी होणार असल्यासारखे पळत सुटू नका. तसेच तुमच्यापैकी ज्यांची अजूनही नव्या जमीनी (पुनर्विकासासाठीच्या व मोक्याच्या जागा घेणाऱ्या  मित्रांनो) खरेदी करण्याची क्षमता आहे त्यांनी हा पृथ्वीवरील जमीनीचा शेवटचा तुकडा आहे अशाप्रकारे ऑफर देऊ नका कारण शेवट तुम्हाला त्या जमीनीतूनच तुमचे पैसे वसूल करायचे आहेत.


आणखी एक गोष्ट व ही थोडी वैयक्तिक आहे, स्वतःशी संवाद साधण्यासाठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करा. एखादा छंद जोपासा, यामुळे आपल्या विचारांना योग्य दिशा मिळते व संतुलितपणे विचार करता येतो. लक्षात ठेवा हे एक प्रकारच युद्ध आहे, मात्र प्रत्येक युद्धानंतर सुखरूप  वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचीच भरभराट होते. धीटपण  व भीत्रोपणा  यामध्ये अगदी पुसट रेषा आहे, त्या रेषेला शहाणपण म्हणतात कारण शहाण्या माणसाला पुढे कधी जायचे व माघार कधी घ्यायची हे माहिती असते. काही वेळी तो धीट असतो व काही वेळी त्याच्यावर भित्रेपणाचा शिक्का बसला तरी त्याची काही हरकत नसते. मी फार उपदेशाचा डोस पाजला असेल तर मित्रांनो माफ करा, मीदेखील तुमच्याहून वेगळा नाही, मलाही माझ्या कंपनीच्या भविष्याची काळजी, चिंता, भीती वाटते, पण माझ्या नाण्याची ही  एक बाजू आहे. दुसऱ्या बाजूला, मला आनंद वाटतो की मला रिअल इस्टेटचे उज्ज्वल भवितव्य दिसत आहे, मला जाणीव आहे की मला माझ्या तसेच माझ्या चमूच्या भीतीचा भारही उचलायचा आहे (इथे दुसरा पर्याय नाही) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या युद्धाचे फलित काहीही असो माझी आठवण लढवय्या म्हणून केली जावी असे मला वाटते. म्हणूनच बांधकाम व्यावसायिक मित्रांनो, तुमच्या सैन्याचे नेतृत्व करा व तुम्ही नेतृत्व करत असल्याचा अभिमान बाळगा.
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com





No comments:

Post a Comment