“काहीवेळा समस्येवर आपण करत असलेला उपायच एक समस्या होऊन बसतो”...
मला आठवते आहे अनेक वर्षांपूर्वी इतिहास शिकत असताना ऐकले होते की रशियनांनी “दग्धभू धोरण” (काही शब्द मनावर कायमचे कोरले जातात) स्वीकारले, म्हणजे दुसऱ्या जागतिक युद्धात जर्मन सैन्याच्या आक्रमणाला सामोरे जाताना स्वतःच्या पायाभूत सुविधा उध्वस्त करत माघार घेतली. याचे कारण असे होते की जेव्हा शत्रू तुमच्या प्रदेशात प्रवेश करतो तेव्हा त्याला तुमच्या पायाभूत सुविधांचा वापर करता येऊ नये उदाहरणार्थ प्यायचे पाणी, रस्ते, निवारा, अन्न पुरवठा इत्यादी. रशियनांनी माघार घेताना अशाप्रकारची प्रत्येक उपयोगी गोष्ट नष्ट करून टाकली होती. सरतेशेवटी जर्मनांना उपासमारी व थंडीमुळे शरणागती पत्करावी लागली कारण त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तुंचा साठा संपला होता. सशक्त शत्रूला तोंड देण्याचे हे धोरण अतिशय प्रसिद्ध झाले व नंतर अनेक युद्धांमध्ये वापरले गेले पण कोणत्याही युद्ध धोरणाला प्रतिहल्ल्याची व प्रभावी तसेच अचूक अंमलबजावणीचीही गरज असते, तरच तुम्ही युद्ध जिंकू शकता हे आपले शासनकर्ते विसरतात. आपल्याकडे नेमके हेच झाले कारण कोरोना नावाच्या शत्रूविरुद्ध लॉकडाउन हे दग्धभू धोरण आहे, पण एकदा आपल्या क्षेत्रात त्याचा प्रवेश झाल्यानंतर तो बाहेरून आतमध्ये नव्हे तर आतून बाहेर पसरत होता हे आपले शासनकर्ते विसरलेव तिथेच अपयशी ठरले. लॉकडाउनचे धोरण चुकीचे होते असे नाही तर तुमच्या सैन्याला त्या धोरणाचा वापर का केला जातोय हे समजून सांगणे आवश्यक होते व सैन्यही शिस्तबद्ध असले पाहिजे. या सर्व घटकांच्याअभावामुळे लॉकडाउन काही आठवड्यानंतर साफ अपयशी ठरले.
आता भोवताली परिस्थिती अशी आहे की (किमान पुण्यामध्ये तरी) प्रत्येकजण घाबरलेला किंवा गोंधळलेला आहे, त्याला भविष्याची आरोग्यच्या बाबतीत तसेच आर्थिकदृष्टीकोनातूनही काळजी वाटतेय. अनेक जण मान्य करणार नाहीत व मी नकारात्मक बोलतोय असे त्यांना वाटेल.परंतु डोळे उघडा (खरेतर मन) व सभोवती एक नजर टाका व तुम्हाला जे दिसते त्याचे विश्लेषण करा व स्वतःला विचारा सगळे काही आलेबल आहे का? आहे असे तुम्हाला वाटत असेल तर उत्तम म्हणजे तुम्ही एकतर साक्षात्कारी आहात (एखाद्या बौद्ध भिख्खुसारखे) किंवा तुम्ही मूर्ख आहात, मी जर तुमच्या बुद्धिमत्तेचा अपमान केला असेल माफ करा! माझ्या भोवताली मला जो काही अनुभव येतोय तसेच माझ्या मित्रांनी अगदी अलिकडेच जे काही अनुभव सांगितले त्याची एक झलक इथे देतोय...
दृश्य १... आम्ही संध्याकाळी गजबजलेल्या रस्त्यावरून गाडीने जात होतो व आम्हाला माझ्या आवडत्या दुकानातून आईसक्रीम घ्यायचे होते. पण दुकानाबाहेर थोडीशी गर्दी पाहून मित्र म्हणाले, इथे फारच गर्दी आहे, इथे थांबायला नको, म्हणून मी माझा आईसक्रीम घ्यायचा बेत रद्द केला.
दृश्य २... उपनगरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारी माझी एक मैत्रीण घरी परतत होती व तिच्या इमारतीच्या लॉबीमध्ये लिफ्टची वाट पाहात उभी होती. एक मध्यमवयीन माणूसही घाईने आला व लिफ्टची वाट पाहात होता व त्याचवेळी कामगार वर्गातील एक माणूस तिथे आला. लिफ्ट आली तशी तो कामगार लिफ्टमध्ये शिरला, त्यानंतर तो मध्यमवर्गीय माणूस लिफ्टमध्ये जायला कुचरत होता व तिथेच थांबला. हे पाहून माझी मैत्रीणही लिफ्टमध्ये शिरली नाही व त्या कामगाराला एकटेच वर जाऊ दिले. हे दोघेही लिफ्ट परत खाली यायची वाट पाहात उभे राहिले.
दृश्य ३... मी माझ्या फॅमिली डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी गेलो होतो. ते अतिशय नावाजलेले डॉक्टर आहेत व एरवी कोणत्याही दिवशी त्यांची वेटिंग रूम पेशंट्नी भरलेली असते. त्या दिवशी पाऊस पडत होता व एक वृद्ध जोडपे एकटेच वेटिंग रूमध्ये बसलेले होते व किमान चार रुग्ण वेटिंग रूमध्ये बसण्याऐवजी दवाखान्याबाहेर छत्री उघडून पावसात उभे होते.
हा झाला आपला वैयक्तिक आरोग्याविषयीचा दृष्टिकोन, आर्थिक किंवा कामाच्या आघाडीवर तर आणखी सावळा गोंधळ आहे.जेव्हा पहिल्यांदा लॉकडाउनला सुरुवात झाली तेव्हा लोक घाबरलेले होते पण त्यांनी त्याचे स्वागत केले. पण एकापाठोपाठ एक लॉकडाउनची मालिकाच सुरू झाली. आपल्या मायबाप सरकारला हजारो व्यवसायांचे व त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांचे काय भवितव्य आहे याविषयी शून्य कल्पना होती. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे व हा सगळा लॉकडाउनचा परिणाम आहे अशी जनतेची भावना आहे.हे खरोखरच युद्ध आहे व मी पुन्हा एकदा सांगतो मी या गोंधळासाठी फक्त सरकारला दोष देऊ शकत नाही. पण मग आपण दोष तरी कुणाला द्यायचा, देवाला. त्यानेच आपल्याला या युद्धाला तोंड द्यायला भाग पाडले आहे, पण मग वैयक्तिक तसेच सामूहिक नुकसान कमी व्हावे यासाठी आपण अधिक नियोजनबद्धपणे लढणे अपेक्षित नाही का, हे मला आपल्यापैकी प्रत्येकाला विचारायचे आहे.या देशामध्ये तीन वर्ग आहेत व अगदीहाताच्या बोटावर मोजता येईल एवढा२% उच्चभ्रू वर्ग सोडला तरमध्यम व गरीब वर्गातील लोकांना केवळ आर्थिक फटकाच बसलेला नाही तर आरोग्याच्यादृष्टीने तसेच आर्थिकबाबतीत त्यांचे भविष्य कसे असेल याची त्यांना पुसटशीही कल्पना नाही. हे अतिशय भयंकर लक्षण आहे कारण यामुळे पूर्ण समाजाच्या मानसिकतेवर परिणाम होतोय. आता समाज जणू एखाद्या टाईम बाँबवर बसलाय अशी परिस्थिती आहे ज्याचा स्फोट कोणत्याही क्षणी होऊ शकतो. आपले शासनकर्ते मात्र केवळ तोपर्यंत काहीतरी चमत्कार होण्याची वाट पाहताहेत.म्हणूनच पहिल्या दोन महिन्यांनंतर लॉकडाउन केवळ कागदावरच राहिले व तुम्ही ज्या सेवा सक्तिने बंद करू शकता त्यापुरतेच मर्यादित राहिले. ही साथ झपाट्याने पसरण्याचे खरे कारण म्हणजे झोपडपट्ट्यांची बेसुमार वाढ व त्यामध्ये नाईलाजाने राहणाऱ्या लोकांची जीवनशैली, कारण आपण त्यांना सुरक्षित सामाजिक अंतर राखता येईल असे सुरक्षित घर देऊ शकत नाही, आणि त्याविषयी काहीच उपाय योजना देतांना दिसत नाहीत.
खरेतर अशावेळी नेत्यांनी जनतेशी सतत संवाद साधला पाहिजे, केवळ बोलून नव्हे तर कृतीतून सकारात्मक ऊर्जा निर्माण केली पाहिजे. विविध योजनांमधून सामान्य माणसाला विश्वास दिला पाहिजे की त्याला (किंवा तिला) सरकारने वाऱ्यावर सोडलेले नाही तर अजूनही आशेचा किरण आहे. कोणतीही आशा विश्वासाशिवाय निर्माण होऊ शकत नाही व त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागते, म्हणजे लोकांना विश्वास वाटू लागतो. सध्या ही कृतीच होताना दिसत नाही, आपल्याकडे रुग्णांना दाखल करून घ्यायला पुरेशी रुग्णालये नाहीत व खाजगी वैद्यकीय सेवांच्या दरांवर लक्ष ठेवले जात नाही. यामुळे सामान्य माणसाला आर्थिक व मानसिक त्रास होतो. त्याचवेळी अर्थ मंत्रालय बँकांना किंवा वित्तीय संस्थांना स्पष्ट मार्गदर्शक सूचनाही देत नाही. सरकारने ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी जाहीर केले की अनुदानाच्या स्वरुपातील पैसा थेट व्यक्तींच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा होईल. त्याचप्रमाणे जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात मात्र सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यांच्या कर्जाच्या व्याजाची रक्कमही सरकार थेट बँकेत का जमा करत नाही.कामकाज चार महिने पूर्णपणे बंद राहिल्यामुळे झालेला प्रचंड तोटा, कर्जाची परतफेड लांबणीवर टाकून किंवा त्यासाठी आणखी वेळ देऊन भरून निघणार नाही. सरकारच्या लॉकडाउनच्या धोरणामध्ये अजूनही अस्पष्टता आहे. सध्याच्या कर्जाचे व्याजदर सुधारित (म्हणजे कमी) का केले जात नाहीत व कर्जाचे केवळ परतफेडीच्या बाबतीतच नाही तर वित्तपुरवठा सुधारण्यादृष्टीने फेरनियोजन का केले जात नाही. ते केले जात असेल तर ते जनतेपर्यंत म्हणजेच लहान व खऱ्या अर्थाने गरजू व्यावसायिक व महिलांपर्यंत पोहोचतच नाहीये ही कटू वस्तुस्थिती मायबाप सरकारला समजली पाहिजे. ती स्वीकारा व कृपया त्यावर काम करा.
त्यानंतर प्रिय मायबाप सरकार, कृपया संपूर्ण अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी पावले उचला. त्यासाठी तुम्ही आधी लोकांना आरोग्याच्या बाबतीत व आर्थिक आघाडीवरही निर्धास्त केले पाहिजे. तर सर्वप्रथम लोकांना नेमकी भीती कशाची वाटते हे समजून घेऊ, ही साथ आहे व विषाणू सगळीकडे आहे. पण याचा अर्थ आपण जगणे थांबवावे असा होत नाही. काहीजण तसे करू शकतात मात्र बहुतेकजण तसे करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे, सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ तर नक्कीच नाही. सहा महिने आधीच उलटून गेले आहेत व हे लॉकडाउन कदाचित आणखी वाढवण्याची गरज पडेल पण किमान या युद्धाला तोंड द्यायला एकच नियंत्रण संस्था तरी ठेवा. दररोज नवीन परिपत्रके निघतात, दररोज नवीन तर्क-वितर्क लढवले जातात, दररोज वेगवेगळ्या व्यक्ती नव्या घोषणा करतात, यामुळे लोक अधिक गोंधळतात व शेवटी भीती निर्माण होते. लस जेव्हा तयार होईल तेव्हा येईल पण तोपर्यंत प्रत्येकाचे स्वतःचे मन या आजारापासून त्याचे किंवा तिचे सर्वोत्तम रक्षण करते, ही वस्तुस्थिती आहे. आपण त्या प्रत्येक मनाला बळकटी दिली पाहिजे. सेनापतीकडून (सेनापतींकडून) हेच अपेक्षित असते.
मी पुन्हा एकदा सांगतो कुणीही व्यावसायिक, उद्योजक, उत्पादक, व्यापारी, सेवा पुरवठादार किंवा एखादा वैयक्तिक व्यावसायिक अथवा संघटना, सरकारने त्यांना नफा कमवायला किंवा त्यांची उत्पादने अथवा सेवा विकायला मदत करावी अशी अपेक्षा करणार नाहीत. कारण आम्ही या व्यवसाया मध्ये आमच्या जोखमीवर आहोत व आम्हा सगळ्यांना याची पुरेपूर कल्पना आहे. अपेक्षा फक्त एवढीच आहे की,आमच्यासाठी एखाद्या सैन्याच्या सेनापतीप्रमाणे असलेल्या सरकारने, साथीच्या रोगरुपी युद्धाला तोंड देण्यासाठी “दग्धभू” धोरण स्वीकारले आहे. परंतु त्याच वेळी सेनापतीने स्वतःचे सैन्य कसे जगेल याचाही विचार केला पाहिजे, नाहीतर युद्धात विजय मिळवला तरी विजय साजरा करण्यासाठी काही आनंद उरेल का, असा प्रश्न स्वतःला विचारा.
आणि हो , आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला काळजी घेणे व काळजीच्या भीतीखाली जगणे यातील फरकाची जाणीव ठेवली पाहिजे. कोणतेही सरकार आपली उपजीविका चालवू शकत नाही, हे आपले जीवन आहे व ते आपल्यालाच जगायचे आहे. कोणत्याही युद्धात, एक क्षण असा येतो की केवळ तुम्ही व तुमचे जीवन या विरुद्ध शत्रू अशी परिस्थिती असते; त्यावेळी तुम्ही काय करता यावरून तुम्ही युद्धामध्ये जय व पराजयच्या कोणत्या बाजूला असाल हे ठरते, हे लक्षात ठेवा.
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment