Monday, 24 August 2020

शोले, आजपर्यंत सांगण्यात आलेली सर्वोत्तम गोष्ट!





 








सुपरहिट होण्यासाठी तो चित्रपट कशाविषयी आहे हे महत्त्वाचे नसते, तर तो कसा बनवला आहे हे महत्त्वाचे असते”... रॉजर एबर्ट

रॉजर जोसेफ एबर्ट हे एक अमेरिकी चित्रपट समीक्षक, चित्रपट इतिहासकार, पत्रकार, पटकथालेखक व लेखक होतेते शिकागो सन-टाईम्ससाठी १९६७ पासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २०१३ पर्यंत चित्रपट समीक्षा लिहीत असत. १९७५ साली त्यांना चित्रपट समीक्षेसाठी पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले चित्रपट समीक्षक होतेत्यामुळेच आपण जेव्हा चित्रपटांविषयी बोलतो तेव्हा त्यांचे वरील शब्द अगदी चपखल बसतातआपला प्रिय भारत देश खरतर तीनच गोष्टींवर जगतो ते म्हणजे राजकारण, क्रिकेट व चित्रपट. चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर आपल्याकडे अधिकृतपणे तीस भाषा बोलल्या जातात व त्यातील बहुतेक भाषांमध्ये चित्रपट तयार होतात. मात्र त्यातही हिंदी अर्थातच बॉलिवुडचे स्थान सर्वोच्च आहे. हिंदी चित्रपटांचा इतिहास लिहायचा झाला तर एका चित्रपटाचे नाव घेतल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही, तो म्हणजे अर्थातच शोले!  ही थोडीशी नाट्यमय प्रस्तावना लिहीण्याचे कारण म्हणजे अलिकडेच म्हणजेच १५ ऑगस्टला आपल्या देशाने स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्याचदिवशी माझ्या कॉलेजच्या ग्रूपमधील कुणीतरी व्हाट्सअँपवर पोस्ट केले होते, “यार शोलेला ४५ वर्षे झाली!” म्हणजे शोले हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४५ वर्षे होऊन गेलीमी चित्रपटांचा निस्सीम चाहता आहे शोले प्रदर्शित झाला तेव्हा मी सहा वर्षांचा होतो. पण हा चित्रपट माझ्या लहानशा गावात पोहोचेपर्यंत वर्ष उलटून गेले होते व मी सात वर्षांचा झालो होतो. वॉट्सॲपच्या ग्रूपवर शोलेविषयीची चर्चा काही काळ सुरू राहिली. माझ्या मनाच्या कोपऱ्यात शोलेतील कितीतरी लक्षात राहिलेली दृश्ये तसेच त्याविषयीच्या सुरस कथांच्या आठवणी साठवलेल्या होत्या. या निमित्ताने त्या वर आल्या, म्हणूनच मी त्यातील काही लिहायच्या ठरवल्या.

"कितने आदमी थे?", "सरदार, मैने आपका नमक खाया है", "ये हाथ नही फासी का फंदा है गब्बर", " बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना", "चल धन्नो आज बसंती के इज्जत का सवाल है, "इतना सन्नाटा क्यों है भाई", "हम अंग्रेजों के जमाने के जेलर है", "हमारा नाम सुरमा भोपाली वैसे ही नही हैआणि "मुझे तो सारे पुलिसवाले शकल से एकजैसे ही दिखते है"... मला असे वाटते वयाची ४० ओलांडलेल्या प्रत्येकाला कदाचित शाळेच्या अभ्यासामधले इतिहासातील एकही वाक्य आठवणार नाही पण वरील संवादांवरून त्या पात्रांची नावे मात्र सहज आठवतील. यालाच आपण खऱ्या अर्थाने सुपरहिट असे म्हणतो. शोले या चित्रपटाची माझ्या पिढीवर अशीच जादू होती, जो ४५ वर्षांपूर्वी स्वातंत्र्यदिनाला म्हणजे १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला. 

मला विदर्भाच्या ग्रामीण भागात, खामगाव या लहानशा गावातील सात वर्षांचा लहानसा मुलगा मोहन सिनेमा हॉलच्या प्रदर्शन खिडकीसमोर उभा असल्याचे स्पष्ट आठवतेय. तो फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा किंवा अगदी टीव्हीचाही जमाना नव्हता. चित्रपट प्रत्यक्ष प्रदर्शित होण्याआधी काही दिवस चित्रपट गृहाबाहेर तिकीट खिडकीपाशी लहान कट-आउट (चित्रपटांची पोस्टर) लावली जायची आणि आम्ही डोळे मोठ्ठे करून त्याकडे पाहात बसायचो. शोलेविषयी अशा हजारो कथा आहेत, त्याचे ७० मिमीचे बजेट, तिकीटांचा काळाबाजार, सेटवरील धर्मेंद्र-हेमाचा रोमान्स इत्यादी, इत्यादी. पण मला एका गोष्टीचे नेहमी कुतुहल वाटते की शोले एवढा महान चित्रपट का ठरला?

या चित्रपटात तत्कालीन सर्वोच्च अभिनेत्याची रांगच होती त्यात केवळ एकच नाव फारसे प्रसिद्ध नव्हते ते म्हणजे अमजद खान, पण याच नावाला सर्वाधिक प्रसिद्धी मिळेल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. हे म्हणजे आयपीएलच्या अंतिम सामान्यात दोन्ही संघांमधून धोनी, विराट, बुमरा, रोहित इत्यादी मोठेमोठे खेळाडू खेळत असावेत आणि सामनावीर एकदा नवखा खेळाडूनी व्हावे असेच झाले. पण या भावनाप्रधान देशात चित्रपट असो, खेळ (अर्थातच क्रिकेट) किंवा राजकारण, नेहमी असेच होते. भारतामध्ये एक सामना, एक चित्रपट किंवा एक निवडणूक तुम्हाला सर्वोच्च स्थानी नेऊ शकते. शोलेमुळेही केवळ अमजद खानच नाही तर अनेकांचे असे झाले. एवढेच काय ज्या धन्नो घोडीचे चित्रपटातील काम केवळ काही मिनिटांचे होते तिचे नाव चाळीस वर्षांनंतरही लोकांना आठवते आहे याचा विचार करा. शोले म्हणूनच वेगळा आहे कारण चित्रपटात बच्चन, धमेंद्र, जया, हेमा मालिनी, संजीव कुमार, अमजद खान अशी सहा मुख्य पात्र होती तरीही लाखो लोकांना त्यातील लहानात लहान पात्र व त्याचे संवादही आठवतातविचार करा मॅक-मोहनने खलनायकाच्या साथीदाराचे काम केले आहे, आणि संपूर्ण चित्रपटातील त्याची भूमिका पाच मिनिटांपेक्षा मोठी नसेल. पण त्याच्या भूमिकेने त्याला आयुष्यभरासाठी सांभा” हे नाव दिले"अरे ओ सांभा, कितना इनाम रखे है सरकार हम पर?" हा संवाद तर सांभानेही म्हटलेला नाही, गब्बरसिंगने म्हटला आहे. ज्या पात्राला दोन ओळींपेक्षा जास्त संवाद नाहीत त्याच्या लोकप्रियतेवर तुम्ही अनेक दशके जगताशोले या नावाची  हीच ताकद आपण अजूनही पाहात आहोत.

मला कल्पना आहे की शोलेविषयी बरेच लिहीले गेले आहे, तरीही मला असे वाटते की अशा चित्रपटांचे केवळ सिनेमागृहात प्रदर्शनच होऊ नये तर त्यावर प्रत्येक दशकात चर्चा, वाचन व लेखन व्हावे. म्हणजे शोलेसारख्या महान चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी काय करावे लागते हे प्रत्येक पिढीला कळेल. मी माझ्या पुतणीला १०वीचा इतिहास शिकवत होतो व त्यामध्ये इतिहासाचे स्रोत असा एक धडा होता, ज्यामध्ये चित्रपट हे देखील इतिहासाचा स्रोत मानला जातात असा उल्लेख होता. शोले पाहिला तर तो एक चालता बोलता इतिहास आहे असे जाणवते, चित्रपटाचे कथानक मध्य भारतातील एका दुर्गम खेड्यातील आहे, त्या लहानशा गावात दरोडेखोर (डाकू), एका गावातून दुसऱ्या गावात सायकलवर जाणारा पोस्टमन, रेल्वेस्थानक, वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे, घोडा गाडी व गावचा आठवडी बाजार आहे. आजच्या आयफोन व सॅमसंगच्या पिढीला या देशात अशी ठिकाणे अस्तित्त्वात आहेत अशी कल्पनाही करवणार नाही. अशी गावे अजूनही आहेत पण त्याचा सांस्कृतिक पैलू केव्हाच नाहीसा झालाय. हा चित्रपट ज्याप्रकारे प्रदर्शित झाला, हजारो व लाखो लोकांनी जसा तो थिएटरमध्ये पुन्हा-पुन्हा पाहिला तो एक सुद्धा इतिहासचं आहे. कल्पना करा चित्रपटाचे एक तिकीट मिळावे यासाठी लोक २४ तास रांगेत उभे राहात असत हासुद्धा इतिहासच नाही का?. आता बुक-माय-शोच्या जमान्यात तुम्ही तुमच्या कारमध्ये बसून किंवा बेडरूममधून चित्रपटाची तिकीटे खरेदी करू शकता. आजकालच्या मुलांना मध्य भारतातील तळपत्या उन्हात लांबलचक रांगेत उभे राहून चित्रपटगृहात जाण्याची वाट पाहण्याचा थरार कसा समजणार? प्रत्येक पात्र जेव्हा पडद्यावर प्रवेश घेई तेव्हा स्वागतासाठी प्रेक्षकांकडून टाळ्या, शिट्ट्या आणि आरोळ्या ठोकल्या जात, गंमत म्हणजे एखादे पात्र संवाद बोलत असताना सर्व प्रेक्षकही त्याच्यासोबत संवाद म्हणत असत. मित्रहो तो अविस्मरणीय अनुभव होता, त्यात एक जल्लोष आणि अपूर्वाई होती. तो तेव्हासुद्धा इतिहासच होता आणि आपण तो जपला पाहिजे, म्हणूनच शोले महत्त्वाचा आहे. एवढेच नाही तर शोले प्रदर्शित झाल्यानंतरही पुढील तीन वर्षे गणपती मंडपांमध्येही शोलेच्या पात्रांचे संवाद ऐकु येत असत, यामुळे तुम्ही रस्त्यावरून चालत असतानाही चित्रपटगृहात बसल्यासारखे वाटेशोलेने जसे जनमानसाला झपाटून टाकले होते तसा इतर कुठल्या चित्रपटाचा प्रभाव झालेला माझ्या पिढीने पाहिला नाहीतेव्हाही बरेच चित्रपट अतिशय यशस्वी झाले, त्यातून अनेक तारे-तारका उदयाला आल्या, त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली, त्यांच्या फॅशनचेही असंख्य चाहते असत. परंतु इतका प्रदीर्घ काळ व व्यापक प्रभाव कुणाचाच नव्हता.

शोले एवढा लोकप्रिय का झाला याविषयीही खूप काही लिहीले गेले आहे व त्याचे श्रेय सलीम-जावेद या जोडीची पटकथा व संवाद, रमेश सिप्पी यांचे दिग्दर्शन, आरडी बर्मन यांनी दिलेले माउथ ऑर्गनचे पार्श्वसंगीत (जे ऐकून  आजही अंगावर रोमांच येतो), ते कॅमेरादिग्दर्शन ज्यामध्ये ग्रामीण भारताचे अतिशय सुरेख चित्रण आहे, तसेच प्रत्येक पात्र हे त्या-त्या अभिनेत्यासाठी अगदी चपखल आहे. त्या पात्रांनी निर्मात्यापासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केल्या, सगळे काही अचूक होते. पण गेल्या काही दशकांमधील लगान किंवा अगदी अलिकडच्या गली बॉयमध्येही हे सगळे घटक होते, पण तरीही शोले इतरांच्या तुलनेत अभूतपूर्व का होतामला असे वाटते तो ज्या काळात प्रदर्शित झाला तो काळ अगदी या कथेला  पुरक होता, इतर सर्व घटक म्हणजे अभिनय, पटकथा, संगीत दिग्दर्शन, पात्र निवड व कॅमेरा या सगळ्यांविषयी आदर राखत मला हे म्हणावेसे वाटते. आपल्याला स्वातंत्र्य मिळून जेमतेम तीस वर्षे झाली होती, संपूर्ण समाज व्यवस्थाही केवळ तीस वर्षाची तरुण होती. सगळीकडे अस्वस्थता किंवा एकप्रकारची गोंधळलेली अवस्था होती, अगदी कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीतही (अर्थात ती आजही आहे). पण तो काळ असा होता की खाकी गणवेश घातलेल्या शिपायाचा पण  लोकांना  धाकयुक्त आदर वाटे, चांगले व वाईट याच्या कल्पना अगदी साध्या  सरळ होत्या. या पार्श्वभूमीवर एक पोलीस अधिकारीज्याचा वाईट खलनायकाने छळ केलेला असतो, तो तुलनेने कमी वाईट माणसांची मदत घेऊन वाईट खलनायकाचा नायनाट करतो व गावकऱ्यांची (जे सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व करतात) सुटकाही करतो, लोकांना ही कल्पनाच अतिशय आवडलीतो काळ असा होता की १०० पैकी ८० चित्रपट समाजाचे स्वप्नरंजन करण्यासाठी काश्मीर सारखी निसर्गरम्य ठिकाणे दाखवत असतजेव्हा जनता मात्र आपल्या उदरनिर्वाहाच्या काळजीत बुडालेली होती. त्या काळात शोलेने त्यांच्या काळजाचा अचूक ठाव घेतला, ही सगळी पात्रे त्यांच्यातीलच कुणी आहेत असे त्यांना जाणवले. ते स्वतःमध्ये सुरमा भोपाली, विरू, जय, बसंती, जेलर व अगदी ठाकूरही पाहू शकले. सगळ्यांसाठी खलनायक एकच होता ते म्हणजे व्यवस्था (जी आजही आहे), मनातला राग, उद्वेग व्यक्त करण्यासाठी तेव्हा फेसबुक/ट्टिवटर व इन्स्टाग्रामसारखी माध्यमे नव्हती. तर केवळ चित्रपट पाहून व काही चांगली व तुलनेने कमी वाईट माणसे ताकतवान वाईट खलनायकाशी लढताना व त्याचा नायनाट करता पाहून त्यासाठी टाळ्या वाजवून भावनांना वाट करू दिली जात असे! या सगळ्याच्या जोडीला, भारतीयांच्या आवडीची भावनांची फोडणी दिलेली होती ज्यात प्रेम, वैर, देशभक्ती, मैत्रीसाठी त्यागअसे सगळे मसाले होतेकुणालाही याहून अधिक काय हवे असते मनोरंजनासाठी !

हे सगळे योग्य वेळी  योग्य प्रकारे  काळी घडून आले, म्हणूनच शोले हा भूतोना भविष्यती असा लोकप्रिय चित्रपट ठरला ज्याविषयी सर्वाधिक लिहीले किंवा बोलले गेले. तो तिकीट बारीवर यशस्वी ठरलाच पण काळही त्याला मात देऊ शकला नाही, म्हणूनच शोले महान आहे. आजही जेव्हा रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीत एखाद्या एफएम रेडिओ चॅनलवर एखाद्या जाहिरातीमध्ये गब्बरचा आवाज व संवाद वापरलेले असतात, तेव्हा तो कलाकार आवाजाची नक्कल करतोय याची जाणीव असते, तरीही अमजद खानाच्या खर्जातल्या पहाडी आवाजात जेव्हा कितने आदमी थे?” असे ऐकू येते तेव्हाती जाहिरात ऐकताना मी भोवतालची रहदारी विसरतो व काही क्षणांसाठी माझी कार टाईममशीन होते. मी पुन्हा त्या खामगावच्या कोंदट, दमटमाणसांनी  गच्च भरलेल्या चित्रपटगृहात पोहोचतो. माझ्या आजूबाजूला माणसे (पुरुषहो आमच्या येथे लेडीस   जेन्टस असे वेगळे सेकशन असतात) खच्चून भरलेली असतात तरीही मला ती जाणवत नाहीत किंवा त्या माणसांनाही मी जाणवत नाहीकारण सगळ्यांचे डोळे फक्त पडद्यावर खिळलेले असतात व कान ध्वनीयंत्रणेच्या दिशेने टवकारलेले असतात आणि त्यातून कितने आदमी थे?” हे शब्द घुमतात . प्रिय शोले, तुझे मनःपूर्वक आभार, तुझ्यामुळे मला माझ्याभोवती सुरू असलेल्या गदारोळातून काही ऐैतिहासिक क्षण अनुभवायला मिळतात आणि मला पुन्हा सात वर्षांचा लहान मुलगा होता येतेआजही !


संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स

smd156812@gmail.com




No comments:

Post a Comment