“कल्पना करा जर आपल्याकडे शिशिर ऋतूच नसता तर, वसंत ऋतुचे आगमन एवढे
आल्हाददायक वाटलेच नसते: जर आपल्याला कधीच संकटांना तोंड द्यावे लागले नाही, तर समृद्धीचा खरा आनंद आपण कधीच समजु शकणार नाही."... ॲनी ब्रॅडस्ट्रीट.
ॲनी ब्रॅडस्ट्रीट या उत्तर अमेरिकेतील सुरुवातीच्या काळातल्या अतिशय नामवंत कवयित्री होत्या व इंग्लडच्या उत्तर अमेरिकी वसाहतींमधील पहिल्या लेखिका होत्या ज्यांचे लेखन प्रकाशित झाले. त्या अमेरिकी साहित्यातील पहिल्या तत्वनिष्ठ व्यक्ती होत्या व त्यांनी विपुल कविता लेखन केले, तसेच त्यांचे बरेच वैयक्तिक लेखन मरणोत्तर प्रकाशित झाले. खरोखर, त्यांचे शब्द सभोवतालच्या अंधारामय वातावरणात प्रकाशच दाखवतात. मात्र नेहमीप्रमाणे रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती असे साहित्य कधी वाचत नाहीत किंवा समजावुन घेत नाहीत, कारण आपल्याला वाचनाची किंवा साहित्यची दखलच नाही किंवा इतर कोणत्याही अशा सांस्कृतिक गोष्टीची सवयच नसते. पण
मला नेहमी असे वाटते, की रिअल इस्टेटची (म्हणजे बांधकाम व्यावसायिकांची) समाजात एकूणच प्रतिमा फारशी चांगली नाही किंवा त्यांना आपल्या शासनकर्त्यांच्या, माध्यमांच्या किंवा सामान्य माणसाच्या नजरेत आदर मिळत नाही याचे कारण आयुष्यातील आजुबाजुला घडणाऱ्या अनेक लहानसहान गोष्टीं आहेत ज्याकडे रिअल इस्टेटमध्ये काम करणारे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. कारण आपली प्रतिमा शक्तिशाली, गडगंज श्रीमंत व पैशाच्या जोरावर काहीही करू शकतात अशी आहे. माफ
करा मित्रांनो, हे जरा फारच बोचणार वाक्य असेल पण
हेच सत्य आहे. तुमच्या मित्रमंडळींना किंवा तुमच्याभोवती असलेल्या कुणालाही विचारा, त्याने किंवा तिने मनमोकळे उत्तर द्यायचे धाडस केले, तर मी असे का म्हटले हे तुम्हाला समजेल! जाऊ दे, बांधकाम व्यावसायिकांवर किंवा रिअल इस्टेटवर टीका करणे हा माझा उद्देश नाही. तर रिअल इस्टेटची म्हणजेच घरांची व घर घेऊ इच्छणाऱ्या ग्राहकांची परिस्थिती काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, कारण ते रिअल इस्टेटचे ग्राहक आहेत. म्हणून मला वाटले आपण आधी कोणत्या परिस्थितीत आहोत किंवा आपल्या त्रुटी समजून घेणे महत्त्वाचे आहे व त्याच गोष्टींची खरी अडचण आहे नेहमी त्रास होतो. कारण आपण कधीही मोकळेपणानी आपल्या त्रुटी स्वीकारत नाही. आता आपण लॉकडाउनच्या
शेवटच्या टप्प्यात आहोत, अर्थात विषाणूची, साथीची भीती
अजूनही आहेच. परंतु लोकांनी आता विषाणूला स्वीकारले आहे व ही साथ आपल्यासोबतच असणार आहे याचा स्वीकार करून
हळूहळू आयुष्याची गाडी रुळावर येतेय (अर्थात तिचा वेग फारच मंद आहे).
म्हणून अर्थातच प्रत्येक
घटकाला (म्हणजे व्यवसायाला) आता एकच
गोष्ट जाणून घेण्यात रस आहे, ती म्हणजे माझ्या व्यवसायाचे भविष्य काय असेल व मी किंवा आपण गेल्या सहा महिन्यात झालेले नुकसान कसे भरून काढणार आहोत? खरे पाहता, रिअल इस्टेटसाठी लॉकडाउनची सुरुवात 20 मार्चपूर्वीच झाली होती, जर लॉकडाउन हा शब्द जाचक वाटत असेल तर आपण त्याला लॉकडाउन (मंदी) म्हणू शकतो. मी नेहमी सांगतो तसे ही परिस्थिती म्हणजे युद्धासारखी होती आणि आता आपण युद्धानंतरची परिस्थिती पाहात असताना, युद्धाने रिअल इस्टेटच्या (बांधकाम व्यावसायिक) व त्यांचे ग्राहक अशा दोन्ही बाजूंचे काय नुकसान केले आहे ते पाहू. कारण तरच आपण नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःला तयार करू शकू व त्यानंतरच आपण फायदा कमावण्याचा विचार करू शकतो व हे अगदी घराच्या ग्राहकांसाठीही खरे आहे. आता, घराचे ग्राहक विचारतील, मला घर खरेदी करून फायदा कसा कमवता येईल, मला माझी आयुष्यभराची कमाई यासाठी खर्च करावी लागणार आहे, त्यानंतर माझ्यासाठी काय फायदा राहील? ही केवळ बांधकाम व्यावसायिकांचीच नवीन क्लुप्ती दिसते, अशीही टिप्पणी फ्लॅट खरेदी करणारा एखादा
(खरेतर अनेक) पुणेकर करू शकतो आणि मी त्यांना दोष देत नाही. तर आता खरच घराच्या खरेदीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायची वेळ आली आहे; कारण मला तुम्हाला विचारावेसे
वाटते, आपण सोने का खरेदी करतो, जी आपल्या मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये अगदी महत्वाची गोष्ट आहे. सोने हे लग्नासाठी किंवा
एखाद्या आप्तकालीन परिस्थिती साठी असते व जेव्हा खरोखर
एखादी अशी परिस्थिती येते, तेव्हा बहुतेक लोक
सोने विकण्याऐवजी कर्ज घेतात ही वस्तुस्थिती आहे, म्हणूनच थोडक्यात आपण आपल्या मानसिक समाधानासाठी खरेतर सोने खरेदी करतो. त्यामुळे आपल्याला कोणतीही आणीबाणी आली त्याला तोंड देता येईल हे मानसिक बळ मिळते उदा. आजारपण, नोकरी गेली, लग्नाचा खर्च इत्यादी. आपण
कधीच असा विचार करत नाही की सोन्याचे दर गेल्या चार वर्षांपासून स्थिर आहेत
व मध्ये तर थोडे कमीही झाले होते.
अर्थात आता पुन्हा ते दर आकाशाला भिडले आहेत, केवळ पाच महिन्यांच्या काळात जवळपास
दुप्पट झाले आहेत व आपल्या सगळ्यांना त्याचे कारण माहिती आहे ती म्हणजे भोवतालची
अनिश्चितता. आता मला सांगा केवळ किंमत दुप्पट झाली म्हणून कोणत्या मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाने त्यांचे सोने विकले, मला खात्री आहे कुणीच विकले नसेल कारण हा सर्व नफा सोन्यातील गुंतवणूकदारांनी मिळवला असेल. रिअल
इस्टेटमध्येही अशीच परिस्थिती आहे, जे घर (म्हणजेच फ्लॅट/प्लॉट/दुकान/कार्यालय) विकण्यासाठी त्यात गुंतवणूक करतात ते त्यातून नफा मिळवतात, कारण कुणीही राहण्यासाठी घर खरेदी केले असेलतर तो किंवा ती ते विकण्याचा विचार कधीच करणार नाही, हे
सोन्याप्रमाणेच सत्य आहे.
आता मला सांगा, सध्या स्थितीतील जर तुम्हाला नोकरीची, व्यवसायाची किंवा उत्पन्नाची काळजी असेल मग ते पगारातून मिळणारे असेल, व्यापारातून किंवा व्यवसायातून अशावेळी तुमचे खरे बलस्थान काय, कारण ही वेळ तुमच्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठीच कठीण आहे. तुम्हाला भाड्याच्या घरात जास्त चिंता नब्बरत राहता येईल का जिथे नियमितपणे एक ठराविक रक्कम द्यावीच लागते का तुम्हाला स्वतःच्या घरात किंवा कार्यालयात जागा हवी जिथून तुम्हाला कुणीच कधीच काढू शकत नाही. शिवाय तुम्ही जर ते घर विकायचा निर्णय घेतला व तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर खरे पाहता तुम्हाला फारशी तडजोड न करता फायदेशीर व्यवहार करता येईल, याचा विचार करा. आता पुन्हा एकदा अनेक जण म्हणतील आम्हीचं का तडजोड करायची, घर विकतांनी पण ? मग तुम्ही सोने विकताना (विकलेच तर) घडणावळीचे पैसे किंवासोन्याच्या दागिन्यांची “वाढ-घट” स्वीकारत नाही का? इथेही तसेच आहे, एक चांगले घर किंवा कार्यालय घेताना तुमच्या अपेक्षेच्या तुलनेत तुम्हाला कदाचित थोडा तोटा होऊ शकतो. मात्र तुम्ही ज्या किमतीत खरेदी केले व ज्या किमतीला विकले याची तुलना केली तर तुमचा फायदाच झाला हे दिसून येईल. तसेच तुम्ही तुमच्या विक्रीतून जेव्हा दुसरे घर खरेदी करणार असता तेव्हा त्या विक्रेत्याशी वाटाघाटीही करू शकता, नाही का? तुमच्याकडे कोणतीही स्थावर
मालमत्ता असणे महत्त्वाचे आहे ज्यामुळे आयुष्यातील कोणत्याही विपरित परिस्थितीला
तुम्ही आरामात तोंड देऊ शकाल व यासाठी तुमचे स्वतःचे घर किंवा कामाचे ठिकाण याहून अधिक चांगला पर्याय असू शकत नाही.
मी हे बांधकाम व्यवसायिकांचा प्रतिनिधी म्हणून लिहीत नाहीये, मी स्वतः एक व्यावसायिक आहे तरीही मी जे काही लिहीले आहे ते डोळे झाकून स्वीकारू नका, तुम्ही स्वतःचे डोकेही वापरा, त्याचे विश्लेषण करा व तुम्हाला जे वाटते मित्रांशी बोला, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे कृती करा. मी
सोन्याचे उदाहरण जाणीवपूर्वक दिले कारण नाहीतर समभाग, म्युच्युअल फंड यासारखेही
पर्याय आहेत पण तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही. तुम्ही तुमच्याकडे असलेली समभाग
प्रमाणपत्रे, मुदत ठेवी किंवा बंधपत्रांमध्ये राहू शकत नाही, केवळ सोने व घराचा च तुम्ही वापर करू शकता. इथे पुन्हा एकदा घर सोन्यावर मात करते कारण सोन्याप्रमाणे कुणी तुमचे घर चोरू शकत नाही व म्हणूनच घर ही एक गरज तसेच सुरक्षित गुंतवणूक ठरते. घर
इतर कोणतीही वस्तू किंवा गुंतवणूकीपेक्षा नेहमी वेगळेच राहील कारण इथे तुम्ही
तुमच्या जवळच्या व्यक्ती ज्यांना आपण परिवार म्हणतो, त्यांच्याबरोबर आयुष्यातील सर्वोत्तम
क्षण जगलेले असता, इतर कोणतीही मूल्यवान गोष्ट, अगदी कोहिनूर हिराही तुम्हाला हे समाधान किंवा शांती देऊ शकतो का, हे स्वतःला विचारा.
फक्त स्वतःसाठी घर
निवडताना तुम्हाला हुशारीने
निवड करावी लागेल, त्यातून योग्य लोकेशन , जागा, सुविधा तसेच पुनर्विक्रीसाठी सुद्धा तुम्हाला पैशांचा पुरेपूर मोबदला मिळेल असे पाहा. रिअल
इस्टेटची (म्हणजे घराची) समस्या अशी आहे की, की त्यावर एम.आर.पी. म्हणजे बाजारातील
किरकोळ विक्री मूल्याचा टॅग लावलेला नसतो व
संपूर्ण जगभरात अशीच परिस्थिती आहे. कोणत्याही दोन घरांची
किंमत अगदी सारखी असू शकत नाही किंवा त्यांची तुलना करता येत नाही, कारण जमीनीचे दर, बांधकामचे दर,
स्थानिक कायदे व नियम असे अनेक घटक घराच्या बांधकामात समाविष्ट असतात ज्यांचा घराच्या मूल्य निर्धारणावर परिणाम होतो. तरीही तुम्ही सर्वसाधारण तुलना करू शकता व म्हणूनच बांधकाम व्यावसायिक काय दर सांगतोय यापेक्षाही तुम्ही घरासाठी किती पैसे मोजायला तयार आहात, एका चांगल्या घराचे तुमचे काय निकष आहेत याचा तुम्ही विचार करा असा सल्ला मी देईन. आणि
हो, भविष्याचा विचार करता चांगली पार्श्वभूमी असलेला विकासक फार महत्त्वाचा
ठरतो ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात, परंतु हेच लोक भाजी खरेदी करताना ती कुठून
आली असेल किंवा कुत्र्यासारखा पाळीव प्राणी आणताना ते कोणत्या प्रजातीचे आहे याचा
विचार करतात पण घराच्या बाबतीत हा विचार करत नाहीत.
म्हणूनच मित्रांनो, साथीचे हे संकट अंतिम टप्यात असले तरीही ते संपुष्टात आलेले नाही, आणि त्यामुळे झालेल्या जखमा
लवकर भरून निघणार नाहीत, त्याचे व्रण काही काळ राहतील पण आयुष्य थांबणार नाही ही
वस्तुस्थिती आहे. ॲनी ब्रॅडस्ट्रीट यांनी लिहील्याप्रमाणे, तुम्हाला शांती आणि समृद्धी अनुभवायची असेल तर त्यासाठी आधी थोडी आपत्ती सहन करणे आवश्यक आहे, आणि मग येणाऱ्या सुखी काळाचा आनंद घेण्यासाठी स्वतःच्या घराहून अधिक चांगले काय असू शकते, एवढाच विचार करा !
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment