Wednesday, 13 February 2013

कान्हा, उतरणीला लागलेले वाघांचे साम्राज्य!


 

 

 

 

 

 

या लेखाचे शीर्षक पाहून अनेकांच्या भुवया उंचावतील, तर ब-याच जणांच्या कपाळाला आठ्या पडतील. मात्र मी वाघांचे निर्विवाद सामाज्र असलेल्या कान्हा अभयारण्याला नुकत्याच दिलेल्या भेटीत काय पाहिले, हे त्याचा निस्सीम चाहता म्हणून तुम्हाला सांगणार आहे. मी गेल्या १० वर्षात, ३० पेक्षा अधिक वेळा कान्हाला भेट दिली आहे. मला प्रत्येक भेटीतील अगदी बारिक-सारिक गोष्टीही आठवत आहेत, कारण प्रत्येकवेळी मला तिथे काहीतरी नवीन गवसले आहे, ज्यामुळे मला पुन्हा-पुन्हा तिथे जावसे वाटले. कान्हातील प्रत्येक दिवस उत्साहाने ओसंडून वाहत असतो आणि हे गूढ जंगल तुम्हाला सतत आश्चर्यचकित करते, दरवर्षी उंच-उंच होत जाणा-या साल वृक्षांच्या दाटीत, सतत काहीतरी होत असते.

या भेटीत माझ्या अनेक दिवसांपासूनच्या दोन इच्छा पूर्ण झाल्या. मी आमच्या मार्गदर्शकाला (गाईडला) अगदी सहजपणे बोलून गेलो की मी जिप्सीच्या फेरफटक्यात वाघाला स्वच्छ सूर्य प्रकाशात पाहिलेले नाही व माझ्याकडे तशी छायाचित्रे नाहीत. त्याशिवाय सर्वजण नेहमी कान्हामध्ये चित्ते झाडावर पाहिल्याचे बोलतात, मात्र मी प्रत्येकवेळी चित्ता जमीनीवरच पाहिला आहे! माझ्या या भेटीत माझ्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या; मी हिवाळ्यातल्या सूर्यप्रकाशात पहुडलेला एक हट्टाकट्टा वाघ व झाडावर चित्त्यांची जोडी पाहिले! माझ्यासारख्या जंगलावर निस्सीम प्रेम करणा-याची जंगलाकडून दुसरी काय अपेक्षा असू शकते? आता तुम्ही विचाराल हे सांगण्याची काय गरज आहे? मी वर्षाच्या जवळपास सर्व महिन्यात व मोसमात इथे भेट दिली आहे. मात्र यावेळेइतकी पर्यटकांची संख्या रोडावलेली कधीच नव्हती! अभयारण्याबाहेर स्वादिष्ट जेवण पुरवणारे ढाबे रिकामेच होते. तिथे केवळ स्थानिक चहा घेत, उन्हाळ्याविषयी गप्पा मारत होते व चांगला व्यवसाय होण्याची आशा व्यक्त करत होते. असे दृश्य कधीच नसायचे, अगदी शनिवारी-रविवारीही भेटीच्या वेळेत अभयारण्याबाहेर जिप्सी उपलब्ध असायच्या. प्रसिद्ध बर्मन व मोहन ढाब्यांवर अगदी गोठवणा-या दिवशीही सफारीच्या वेळेनंतर अल्पोपहार व चहासाठी गर्दी असायची, ती यावेळी नव्हती!

या अभयारण्याला जंगल प्रेमींमध्ये असलेले पहिल्या क्रमांकाचे स्थान ढळत असल्याची ही खूण आहे का? याचे उत्तर कदाचित होय असे आहे व या परिस्थितीसाठी बरीच कारणे आहेत. मी मार्गदर्शक, चालक व स्थानिकांना एकच प्रश्न विचारला की अभयारण्याचे संचालक, त्याची देखभाल करणारे व वन्यजीवनाचे संरक्षण करणारे कर्मचारी यांच्या प्रामाणिक प्रयत्नांनंतरही पर्यटकांची संख्या का रोडावती आहे. याची अनेक कारणे आहेत, हे अभयारण्य वर्षानुवर्षे तसेच हिरवे आहे यात शंका नाही मात्र १०० पर्यटकांपैकी ९० जणांना केवळ वाघच पाहायचा असतो हे सत्यही नाकारता येणार नाही! राहण्याचा खर्च, जिप्सीचे भाडे व अभयारण्याचे शुल्क या सगळ्याचा विचार करता, मर्यादित बजेट असेल तर सर्व पर्यटकांना २ किंवा ३ सफारींपेक्षा अधिक परवडत नाही. त्यांना तेवढ्या थोड्याशा वेळेत वाघ बघायचा असतो, हे खरेच अतिशय कठीण काम आहे, कारण हे अभयारण्य १६०० चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारले आहे! इथला टायगर शो बंद करण्यात आला आहे व ताडोबा, नागझिरा, मध्यप्रदेशातील पेंच व महाराष्ट्रातील पेंच याठिकाणी अधिक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे पुण्या व मुंबईतून येणारे अनेक पर्यटक या ठिकाणांची निवड करतात. मुख्य म्हणजे ही सर्व ठिकाणे मध्यवर्ती असलेल्या नागपूरहून, कान्हापेक्षा जवळ म्हणजे साधारण दोन तासांच्या अंतरावर आहेत. कान्हाला जाण्यासाठी ज्या प्रकारचा रस्ता आहे त्यामुळे नागपूरहून जवळपास ६ तास लागतात. त्यामुळे नागपूरहून तिथे जाण्यायेण्यासाठी दोन दिवस खर्च होतात व त्याशिवाये प्रवासाचा खर्च तर वेगळाच. नागपूरहून कान्हाला जाता-येता खाजगी टॅक्सी केली तर किमान ७००० रुपये लागतात. त्याशिवाय महाराष्ट्रातल्या अभयारण्यांचे प्रवेश शुल्क कान्हाच्या एक तृतीयांश आहे त्यामुळेच ते अधिक स्वस्त पर्याय ठरतात. ताडोबा व नागझिरा या अभयारण्यांचा विस्तार कमी असल्यामुळे व जंगल शुष्क असल्याने कान्हाच्या तुलनेत वाघ तसेच इतर प्राणी सहजपणे दिसतात. अभयारण्यामध्ये वाघाशिवायही पाहण्यासारखे बरेच काही असते मात्र आपण जंगल सफारींवरचा वाघ पाहिला हा शिक्का पुसू शकत नाही, त्यामुळेच या सफारींचे प्रमुख व एकमेव आकर्षण वाघच ठरते!

दुसरी बाब म्हणजे मार्ग व वाहनांच्या तसेच चालकांच्या आवर्तनाची पद्धत. सर्व स्थानिकांना समान संधीचा फायदा मिळावी यासाठी ही पद्धत चांगली आहे, कारण सर्वच स्थानिक उपजीविकेसाठी अभयारण्य व पर्यटकांवर अवलंबून असतात. मात्र जंगलामध्ये एक चांगला चालक मिळणे अतिशय महत्वाचे असते व नेहमी येणा-या पर्यटकाला त्याच्याशी चांगले सूत जमलेलाच चालक हवा असेल व त्याला नवीन चालक मिळाला तर ते अतिशय त्रासदायक होऊ शकते. कारण योग्य वेळी गाडी थांबवणे व प्राणी, पक्षांची अचूक छायाचित्रे टिपणे यासाठी चालकाशी समन्वय असणे महत्वाचे आहे. जे पर्यटक एकाचवेळी सहापेक्षा अधिक सफारी घेत आहेत त्यांच्यासाठी अभारण्याचे व्यवस्थापन स्वतंत्र धोरण का ठेवे शकत नाहीत किंवा त्यांना एक विभाग तसेच त्यांच्या इच्छेनुसार किंवा मागणीनुसार चालक का देऊ शकत नाही? हौशी पर्यटक व नेहमी येणारे व्यावसायिक पर्यटक यांना नेहमी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस असतो. म्हणून आपण विशेष ग्राहकांसाठी काही तिकीटे ठेवून त्यांचा दर अधिक ठेवू शकतो. अशी लवचिकता असेल तर सध्याच्या सफारीच्या व्यवस्थेमुळे येण्याचे टाळणारे व्यावसायिक पर्यटक अधिक प्रमाणात इथे येतील. त्याशिवाय चालकांची नोंदणी करणे तसेच त्यांना मार्गदर्शकाप्रमाणे प्रशिक्षण देण्याची अतिशय गरज आहे, ज्यामध्ये कॉल्स, चालवण्याची पद्धत व मार्गदर्शकासोबत काम करणे यांचा समावेश असेल. आरक्षणाचीही एक समस्या आहे. कान्हा, किसली, सारी व मुक्की या चारही विभागांमध्ये केवळ शंभर एवढ्या मर्यादित वाहनांनाच प्रवेश दिला जातो व त्यासाठी ९० दिवस आगाऊ ऑनलाईन आरक्षण करण्याची सुविधा आहे. यातले बहुतेक आरक्षण विदेशी पर्यटक व पर्यटन संस्थांनी घेतलेले असते त्यामुळे वैयक्तिक कुटुंबाला आरक्षण मिळणे अशक्य होते. भारतीय पर्यटक त्यांच्या सुट्टीचे आधीपासूनच नियोजन करण्यासाठी कधीच प्रसिद्ध नव्हते, ते कान्हा त्यांच्या सुट्टीसाठीच्या ठिकाणांमधून वगळले जाण्याचे मुख्य कारण आहे. म्हणूनच ३० दिवस आधीपर्यंत थोडे आरक्षण उपलब्ध असावे. मी ब-याचदा पाहिले आहे की विभागीय आरक्षण ऑनलाईन पूर्ण झाल्याचे दिसते, मात्र प्रत्यक्षात अभयारण्यात वाहनेच नसतात. याचे कारण म्हणजे एका सफारीसाठी १५०० रुपयांचे प्रवेश शुल्क सामान्य भारतीयासाठी फार जास्त वाटेल मात्र ते विदेशी पर्यटक किंवा मोठ्या पर्यटन संस्थांसाठी अगदी किरकोळ असते. त्यामुळे ते आधीपासून आरक्षण करतात मात्र प्रत्यक्षात येतच नाहीत कारण त्यांच्यासाठी आरक्षण रद्द केल्यामुळे होणारे नुकसान काहीच नसते.

त्याशिवाय महत्वाचे मार्ग अचानक बंद केल्यामुळे वाघ दिसणे अधिक दुर्मिळ व अवघड होत चालले आहे. त्याचवेळी पेंचसारख्या अभयारण्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या कक्षेत राहून नवीन मार्ग बनवण्यात आले आहेत त्यामुळे जंगल अधिक चांगल्याप्रकारे पाहता येते. कान्हाचा विस्तार एवढा व्यापक असताना त्यांनी बंद केलेले मार्ग केवळ उघडूच नयेत तर नवीनही तयार करावेत कारण लोक जास्तीत जास्त जंगल पाहता यावे म्हणून येतात व केवळ वर्षानुवर्षे जुने मार्ग पाहण्यासाठी नाही. सफारीच्या संपूर्ण मार्गावर मुतारीची सुविधा नाही त्यामुळे कुणालाही त्यासाठी केंद्रावर किंवा मुख्य दारापाशी यावे लागते. कान्हामध्ये हिवाळातल्या अतिशय थंड वातावरणात वृद्ध तसेच मुलांसाठी हे अतिशय गैरसोयीचे होते. जंगलातील चौकींमध्ये स्वच्छतेची समस्या असते मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने आपण तिथे पाणीरहित मुतारी बांधू शकतो. पर्यावरणाची हानी होणार नाही अशा पद्धतीने आपण त्या उभारु शकतो व त्यांचा अभयारण्याच्या कर्मचा-यांनाही उपयोग होईल. एखादी कॉर्पोरेट कंपनी त्या प्रायोजित करु शकते.

यावेळी मला प्रकर्षाने जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे तंबाखू किंवा गुटखा खाणा-या मार्गदर्शक व चालकांच्या संख्येत झालेली वाढ. इतक्या तरुण वयातली ही टक्केवारी अतिशय धोकादायक आहे. याची कारणे कोणतीही असू शकतात उदाहरणार्थ टोकाचे हवामान किंवा आडवेळेला काम करण्याचा ताण. वनविभागाने यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे कारण जंगलाचे संवर्धन म्हणजे जंगलाच्या परिसरातील लोकांचेही संवर्धन. विविध रिसॉर्टमध्ये काम करणारे मदतनीस किंवा काम करणा-या मुलांना काम करण्यासाठी अतिशय दयनीय परिस्थिती हे देखील असेच दुर्लक्षित विषय आहेत. ही बहुतेक स्थानिक मुले आहे व ती अतिशय थोड्या वेतनावर काम करतात. जवळपास दिवसभर काम केल्यामुळे ती शिकू शकत नाहीत त्यामुळे एक संपूर्ण पिढी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहत आहे. त्यांना मिळणारा पगार अतिशय तुटपुंजा असल्यामुळे ते आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी नाहीत व कडाक्याच्या थंडीपासून रक्षण करण्यासाठी शूज किंवा स्वेटर यासारख्या मूलभूत गोष्टीही खरेदी करु शकत नाहीत.

बरेच जण प्रश्न विचारतील वरील गोष्टींमध्ये एवढसे काय मोठे आहे, कान्हामध्ये पर्यटक गेले किंवा नाही तरी काय फरक पडतो व कान्हासारख्या दुर्गम भागात एक संपूर्ण पिढी गुटख्याच्या विळख्यात अडकत असली तरी काय फरक पडतो? कान्हासारखी ठिकाणे ही त्यातील जैववैविध्यामुळे केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय ठेवा आहेत. शहरी जगात ज्या प्रजातींना आसरा नाही अशा हजारो प्रजातींचे हे घर आहे. अधिकाधिक लोकांनी या ठिकाणाला भेट दिल्यावर त्यांना अशा ठिकाणांचे व निसर्गाच्या संवर्धनाचे महत्व समजेल. हा विषय शाळेच्या वर्गात किंवा पुस्तकांमध्ये शिकवला जाऊ शकत नाही.  आपल्याला ही ठिकाणे सामान्य माणसाच्या आवाक्यात आणावी लागणार आहेत. याचे कारण म्हणजे तो याबाबत जागरुक झाला तर वाघांसारख्या प्रजाती टिकून राहतील, नाहीतर एक दिवस असा येईल की आपण कान्हाविषयी केवळ पुस्तकांमधूनच वाचू! ही केवळ वनविभागाचीच जबाबदारी नाही तर या उद्देशाने थोडेफार काहीतरी करण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे. कान्हासारखा स्वर्ग आपल्या प्रत्येकालाच एक अविस्मरणीय अनुभव देतो. आपण त्याबदल्यात कान्हाला काय देत आहोत हे स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे?






संजय देशपांडे
Smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स

एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे
संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!
संजीवनीची सामाजिक बाजू!

शहराविषयीच्या तुमच्या काही तक्रारी असतील, तर खालील लिंकवर क्लिक करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx

www.sanjeevanideve.com

No comments:

Post a Comment