Sunday, 2 June 2013

अमेरिकेची, माहित नसलेली बाजू !





















अमेरिका हे संधीचे दुसरे नाव आहे राल्फ वॉल्डू इमर्सन.
या महान लेखकानं कमीत कमी शब्दात अमेरिकेचं वर्णन केलं आहे, तिच्याविषयी कुणाचं काहीही मत असलं तरीही आपल्यापैकी बहुतेकांना तिच्याविषयी आकर्षण वाटतं हे देखील सत्य आहे. जगाच्या कानाकोप-यातून लोक त्यांचं भविष्य घडविण्यासाठी तिथे पोहोचले आहेत व अनेकांचे तसं करण्याची व तिथे पोहोचण्याची महत्वाकांक्षा आहे. प्रत्येकाची किमान या देशास भेट देण्याची व तो सर्वोच्च स्थानी कसा पोहोचला आहे हे पाहण्याची महत्वाकांक्षा असते, या देशाने जो विकास केला आहे त्याविषयी लोकांना उत्सुकता वाटते, आणि का नसावी डिन्सेलँडपासून, लास व्हेगासमधील कॅसिनो, हूवर डॅम ते एम्पायर स्टेट प्रत्येक रचना येत्या अनेक पिढ्यांसाठी पथदर्शी ठरल्या आहेत. या देशाला काही वेळा भेट देण्याचे व बराच काळ राहण्याचे भाग्य मला लाभले, मात्र यावेळची भेट अतिशय वेगळी होती. सर्वप्रथम यावेळी तिथे जायचं कारण म्हणजे माझ्या बायकोचं आजारपण. तो तिथे मुलांसोबत सहलीला गेली असताना तिला बफेलो सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. दुसरं म्हणजे मी जवळपास १५ वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलो होतो, तिसरं म्हणजे यावेळी मी बफेलोसारख्या तुलनेनं लहान शहरात सलग १५ दिवस राहिलो. चौथं म्हणजे आर्थिक दृष्ट्या विचार केला तर अमेरिकेचा पूर्वीसारखा दबदबा राहिलेला नाही ती सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे. 
या सर्व बाबींमुळे माझा दौरा अतिशय रोचक होता. अर्थात ज्या कारणासाठी मी तिथे गेलो होतो ते फार काही उत्साहवर्धक नसलं तरी खरं अमेरिकन जीवन जवळून पाहण्याची ही एक संधी असल्याचं मी मानलं. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे बफेलोमध्ये कॅसिनो, किंवा बोस्टन अथवा वॉशिंग्टनसारखी कोणतीही ऐतिहासिक वास्तू वा ठिकाण किंवा डिस्ने लँड किंवा युनिवर्सल स्टुडियोसारखी तथाकथित पर्यटक आकर्षणे नाहीत. नायगरा जवळ आहे मात्र तिथे शेकडो हॉटेल असल्यामुळे, नायगराला भेट देण्यासाठी क्वचितच कुणी बफेलोमध्ये राहतात. अमेरिकेतून कॅनडाला जाण्याच्या मार्गावरील हे एक वैशिष्टपूर्ण जुने शहर आहे. मैलोन् मैल शांत व निःस्तब्ध रस्ते, त्याच्या बाजूंनी व्हिक्टोरियन घरे व झाडे असं हे शहर अतिशय निसर्गसुंदर व टुमदार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात काही गगनचुंबी इमारती आहेत व प्रसिद्ध वास्तुविशारद सुलीव्हॅन यांनी अप्रतिमरित्या साकारलेली सिटी हॉलची इमारत शहराचे केंद्र आहे. इथे वेगवेगळ्या आकाराची व शैलीची अनेक गिरीजाघरे आहेत व महत्वाचे म्हणजे त्यांची अतिशय कष्टपूर्वक देखभाल केली जाते, यामुळे मला पुण्यातल्या वारसा वास्तुंची काय दशा आहे हे आठवल्याशिवाय राहावलं नाही.
माझा बराचसा वेळ रुग्णालयात जायचा व 3 अंश तापमानातील गोठवणा-या वा-यांमुळे सकाळी रस्त्यांवर  फिरायला जाणं अशक्य होतं त्यामुळे मी हॉटेलच्या जिममध्ये चालायचो, तिथूनच मला अमेरिकन समाजाच्या वागणुकीची चुणूक दिसून आली. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की अमेरिकेमध्ये अगदी अनोळखी माणसं स्वागत कक्षात किंवा लिफ्टमध्ये भेटली तरी अभिवादन करतात, सौजन्य म्हणून तुम्ही कसे आहात?” वगैरे प्रश्न हसून विचारतात. त्यादिवशीचं हवामान किंवा हातातील काम याविषयी हास्यविनोद करतात. या अतिशय सोप्या व लहान बाबी आहेत मात्र त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांचं वातावरण जिवंत राहतं. याच्या अगदी विरुद्ध वातावरण भारतात आहे, आपण लिफ्टमध्ये आपल्या शेजा-यांकडे पाहून हसतही नाही. मला अमेरिकेतल्या रुग्णालयातही त्यांच्या सौजन्याचा अनुभव आला, हिल्टन डबल ट्री हॉटेलमध्ये पोहोचल्यापासून सुखद अनुभवांची सुरुवात झाली. त्या हॉटेलच्या समोरच रस्ता ओलांडून बफेलो सिटी हॉस्पिटल आहे, जेव्हा मी हॉटेलमध्ये सांगितलं की मी बायको आजारी असल्यामुळे वैद्यकीय हेतूने आलो आहे तेव्हा आरक्षण करणा-या कारकुनानं लगेच माहिती दिली की खोलीच्या भाड्यात मला ६०% सवलत मिळेल व त्यानं रुग्णालयाकडून खात्री करुन न घेताच मला ते दिलं. त्याचवेळी व्यावसायिक दौ-यावर असलेल्या दुस-या एका ग्राहकास त्यानं नेहमीच्या दरानं खोली दिली व महत्वाची बाब म्हणजे कोणत्याही ग्राहकानं आक्षेप घेतला नाही व मी इथे वैद्यकीय हेतूने आलो आहे हे त्याला खोटेही वाटले नाही! हीच पारदर्शकता व स्वयंशिस्त मला पुढील पंधरा दिवस पाहायला मिळणार होती. एवढंच नाही तर तर दररोज मी हॉटेलवर परत आल्यानंतर स्वागतकक्षातील हॉटेलचा कर्मचारी माझ्याकडे बायकोची विचारपूस करे व तिच्यासाठी शुभेच्छा देई! मला इथे जाणवलेली पुढील बाब म्हणजे नागरी जाणीव, मी जिममध्ये दुस-या एकानं ट्रेडमिलवरुन उतरण्याची वाट पाहात होतो तेव्हा त्यानं ट्रेडमिलवरुन उतरल्यानंतर आधी नॅपकिननं त्यावरील घाम पुसून टाकला व नंतरचे मला ट्रेडमिल वापरु दिली! त्यावेळी मला माझ्या जिममधली घामानं भिजलेली साधनं व लोक ती वापरल्यानंतर तशीच सोडून देतात हे आठवलं. मला नेहमी आश्चर्य वाटतं की इथल्या सामान्य माणसाला अशा प्रकारे वागायला कुणी शिकवलं व हे सगळीकडे कसं दिसून येतं? आपण आपल्या समाजात अशा सवयी का रुजवू शकत नाही? खरतर हे करायला काही पैसे पडत नाहीत. आपण आपली सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवू शकत नाहीत व इथे लोक स्वच्छ ठिकाणे अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात! मला इथे फिरताना वर्तनाचे थोडे नवीन धडेही मिळाले; मी हॉटेलबाहेर माझ्या टॅक्सीची वाट पाहात एका कारला टेकून उभा होतो, द्वारपाल मला नम्रपणे विचारलंसर ही तुमची कार आहे का?” मी उत्तर दिलं नाही, ती माझी नाही, त्यावर त्यानं सुचवलंसर मग तुम्ही तिला टेकू नका कारण तिच्या मालकाला कदाचित तसं केलेलं आवडणार नाही!” आपल्याकडचे लोक इतरांच्या मालमत्तेची एवढी काळजी करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांवर ओरखाडे काढतात. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्यांची छायाचित्रं काढतानाही हे दिसून आलं. छायाचित्रं काढण्यापूर्वी तुम्ही त्याच्या मालकाची परवानगी घेणं अपेक्षित असतं. ज्यावर बहुतेक मालक खुशीनं राजी होतात मात्र छायाचित्रं घेण्यापूर्वी परवानगी घेणं महत्वाचं आहे. 
बफेलो रुग्णालय हे तर एक वेगळच जग आहे; १६ मजली भव्य इमारतीमध्ये हजारो खोल्या आहेत ज्यात जगभरातल्या रुग्णांवर उपचार केले जातात मात्र रुग्णालयांसारख्या मोठ्या सार्वजनिक ठिकाणी आढळणारा गोंधळ इथे दिसत नाही. तिथलं वातावरण, सजावट व रंग आश्चर्यकारकपणे आनंदी व उत्साही आहेत, याउलट आपल्याकडे रुग्णालयांमध्ये नेहमीसारखं उदास वातावरण असतं. रुग्णालयाच्या तळमजल्यावरच्या मुख्य स्वागत कक्षात मातीपासून बनवलेला म्हशीचा एक मोठा पुतळा  जो बफेलो शहराचे  प्रतिक आहे व तिथे येणा-या अनेकांनी तो रंगवला आहे, काहींनी त्यावर ईसीजीही काढले आहेत! प्रत्येक मजल्यावरील कक्षात एक फलक लावण्यात आला आहे ज्यावर रुग्ण व त्यांचे नातेवाईक रुग्णालयाविषयीचे त्यांचे अनुभव शब्दात किंवा चित्रांमधूनही व्यक्त करु शकतात. मी सुद्धा अश्विनीला ठेवण्यात आलेल्या अति दक्षता विभागाच्या सर्व   कर्मचा-यांना एक पत्र लिहीलं व तिच्या खोलीच्या बाहेर असलेल्या भिंतीवर लावलं, तिथल्या परिचारिकेनं केवळ स्वतःच ते पत्र वाचलं नाही तर इतरांनाही ते वाचायला लावलं व त्या सर्वांनी मी त्यांच्यासाठी वापरलेल्या उदार शब्दांसाठी आभार मानले! या सर्व अतिशय लहान गोष्टी आहेत मात्र त्यामुळे वातावरण अगदी घरासारखं, खेळीमेळीचं होतं, व एका रुग्णालयातून मला ही कल्पना मिळाली! इथली व्यवस्था अतिशय शिस्तबद्ध आहे, कारण प्रत्येक जण भेटीच्या वेळेचे नियम सकाळच्या कर्मचा-यांशी हुज्जत न घालता पाळतात, त्यामुळे त्यांचं काम सोपं होतं. इथे मला समजलं की अमेरिकेच्या कायद्यानुसार रुग्णालयास त्यांच्याकडे येणा-या प्रत्येक रुग्णाला दाखल करुन घ्यावच लागतं व एकदा दाखल केल्यानंतर रुग्ण त्यांच्या ताब्यात असतो. काय करायचं, रुग्णाला कधी सोडायचं याचा निर्णय डॉक्टर घेतात व मानवी जीवनाला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. रुग्णालयाच्या परिसरात प्रत्येक सार्वजनिक स्वच्छतालयात रुग्ण, पाहुणे व कर्मचारी यांच्यासाठी वेगळी सोय होती, यामुळे ज्यांना गरज आहे त्यांना उशीर होत नसे. लिफ्टसाठीही अशीच सोय होती व कुणीही एकमेकांच्या लिफ्ट वापरत नव्हते हे अधिक   महत्वाचे! आपण आपल्या इच्छेनुसार डॉक्टरांना भेटू शकत नाही तर त्यासाठी निश्चित वेळ आहे व ते देखील कॉन्फरन्स रुममध्ये, जिथे प्रभारी डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना भेटतात व रुग्णाच्या तब्येतीविषयीच्या त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतात. रुग्णास अतिशय कमी वेळ भेटता येतं, हे रुग्णाच्या भल्यासाठीच केलं जातं ज्यामुळे त्याला किंवा तिला पूर्णपणे विश्रांती मिळावी. मात्र आम्ही भारतातून आलो आहोत या कारणाखाली आम्हाला काही नियमांमधून सवलत मिळाली कारण आपल्याकडे रुग्णांना असं एकांतात राहायची सवय नाही, हे त्यांनी मान्य केलं. आणखी एक सुखद आश्चर्यकारक बाब म्हणजे उपचारादरम्यान आगाऊ पैसे वैगरे मागण्यात आले नाहीत. तिथल्या कर्मचा-यांनी अतिशय मदत केली व रुग्णालयातून सोडल्यानंतर निवासव्यवस्थेसारख्या बाबीत मदत करण्यासाठी स्वतंत्र चमू होता, त्यांनी आम्हाला एक अतिथी गृह शोधण्यास मदत केली जिथे अश्विनीच्या आहारानुसार जेवण बनवता येणार होतं. रुग्णालयातली एकच दुःखद बाब म्हणजे अगदी अति दक्षता विभागात असलेल्या रुग्णांनाही शनिवार-रविवार शिवाय कुणीही भेटायला येत नाही. कुणीही भेटायला न येता केवळ पडून राहिलेल्या रुग्णांना पाहून वाईट वाटतं. त्यांना विश्रांती मिळाली पाहिजे हे मान्य असलं तरीही मित्र, नातेवाईक अशा पाहुण्यांमुळे रुग्णांना मानसिक आधार व विश्वास मिळतो हे देखील खरे आहे. आम्ही सर्वजण सारखे अश्विनीच्या आजूबाजूला पाहून अति दक्षता विभागाच्या कर्मचा-यांना आश्चर्य वाटायचं, त्यांनी तिला बोलूनही दाखवलं की अशी काळजी करणारं कुटुंब असल्यामुळे ती अतिशय नशीबवान आहे. केवळ तिच्यासोबत राहाता यावं म्हणून आम्ही इतक्या लांबून आलो आहोत हे त्यांना माहिती होतं, जे त्यांच्यासाठी कल्पनेपलिकडचं होतं. 
मोकळ्या वेळात आसपास फिरताना,  ग्राहकांशिवाय रिकामे मॉल्स आर्थिक मंदीचं लक्षण होतं व विशेष म्हणजे भारतीयांचा स्मितहास्यानं आदर केला जातो, कारण आता त्यांना आपल्या क्रय शक्तिची जाणीव झाली आहे व अगदी महाग वस्तुंचेही संभाव्य ग्राहक म्हणून वागणूक दिली जाते. अगदी सुंदर बंगल्यापुढेही विक्रीसाठी किंवा भाड्याने देण्यासाठी असे फलक लावले होते, हे मंदीचं आणखी एक लक्षण होतं, मात्र तिथली मंदी भयाण नाही, गरीब व श्रीमंतांमधली दरी आपल्याइतकी रुंद नाही. ही मंदी लवकरच दूर होईल या आशेनं ते स्मितहास्यानं मंदीस सामोरे जात आहेत. आपल्यापेक्षा हे शहर खूप लवकर झोपतं त्यामुळे आमच्यासाठी रात्री १० नंतर जेवणासाठी उपहारगृह शोधणं अवघड व्हायचं. 
इथल्या संपूर्ण अनुभवानं मला आपलं दैनंदिन जीवन व त्यांचं दैनंदिन जीवन यांची तुलना करणं भाग पाडलं. आपल्या शेजारुन जाणा-या व्यक्तिला पाहून स्मित हास्य करण्यासाठी पैसे लागत नाहीत, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागत नाही, केवळ आपलं वातावरण अधिक चांगलं असावं हा दृष्टीकोन असायला लागतो. हा दृष्टीकोनच आपण दिवसें दिवस हरवत चालतो आहोत. सार्वजनिक ठिकाणच्या रिकाम्या पदपथावर लघवी करण्यास किंवा थुंकण्यास आपल्याला काहीच वाटत नाही, मग ते स्वच्छ ठेवण्याची बाब तर दूरच सोडा. एखादा देश किती श्रीमंत किंवा समृद्ध आहे हे जीडीपीवा "दर डोई"उत्पन्न  यासारख्या शब्दांमधून ठरत नाही तर त्या देशातील लोकांच्या वर्तनावरुनही ठरतं. सभ्यता म्हणजे दुसरं काही नाही तर आम्ही एकमेकांना व आपल्या परिसरास कसं वागवतो याचे मापदंड आहे. मी बफेलोहून परतल्यानंतर, व्यायाम झाल्यानंतर माझी ट्रेडमिल मी साफ करायचं ठरवलं आहे, किमान ती माझ्यातल्या सुधारणेची सुरुवात आहे. शेवटी जग पाहणं म्हणजे केवळ प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊन, तिथली छायाचित्रं काढून, तुम्ही तिथे गेला होता हे सिद्ध करण्यासाठी ती फेसबुकवर टाकणं नाही तर जगात फिरल्यामुळे आपल्या वर्तनात काय फरक पडला हे महत्वाचं आहे, त्यातूनच आपण नेमकं काय पाहिलं हे दिसून येतं! व इमर्सननं म्हटल्याप्रमाणे आपला देशही संधींचा देश बनवता येईल केवळ आपण त्याकडे तशा दृष्टीकोनातून पाहण्यास शिकलं पाहिजे!
संजय देशपांडे

Smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स


https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif


No comments:

Post a Comment