प्रिय मित्रांनो,
वर्तमानपत्रातल्या एका लहानशा बातमीने आज मला बुचकळ्यात
पाडले (आणि विशेषतः
तिच्या मथळ्याने, "बॉलिवुडला
साकडे" म्हणजे एखादी
व्यक्ती आजारी असल्यानंतर आपण देवाला प्रार्थना करतो त्याप्रमाणे) आणि मला पेन हातात घेऊन हा लेख लिहीण्यास उद्युक्त
केले! मला इथे
कुणाच्याही प्रयत्नांवर टीका करायची नाही, ही केवळ एक विचार प्रक्रिया आहे! ती बातमी
मुंबईच्या पोलीस आयुक्तांविषयी होती, त्यांनी सर्व माध्यमांना, तसेच बॉलिवुड, व दूरचित्रवाहिन्यांच्या
प्रतिनिधींना बोलवून पोलीस दलाची चांगली किंवा वास्तववादी बाजू दाखविण्याचे आवाहन करण्याचा
निर्णय घेतला आहे.!
या कृतीमागील पोलीस आयुक्तांच्या प्रामाणिक दृष्टीकोनाचे
मला कौतुक वाटते मात्र व्यक्तिशः
मला असे वाटते की पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी माध्यमांना साकडे घालण्यापेक्षाही
अधिक चांगला मार्ग आहे. विजेत्या व्यक्ती नेहमीच हा मार्ग अवलंबतात व तो म्हणजे तुमच्या
शब्दांऐवजी तुमची कृती बोलू द्या!
माध्यमांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये पोलीस दलाचे
जे चित्र रंगवले जाते त्याला किती महत्व द्यायचे याला एक मर्यादा आहे व आपण आपली प्रतिमा
एवढी उंचावली पाहिजे की कुणीही आपली चुकीची प्रतिमा रंगवण्याची हिम्मतच करणार नाही! कधी विचार
केला आहे का की चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये नेहमी बांधकाम व्यावसायिक, पोलीस आणि
राजकीय नेते वाईट असल्याचे का दाखवले जाते? याचे कारण
म्हणजे सर्वसामान्य लोकांची तीच भावना आहे व त्यामुळे होणारा त्रास त्यांनी अनुभवला
आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने कधीना कधी ह्या पिळवणुकीचा
अनुभव घेतलेला असतो, यंत्रणेमध्ये काही लोक चांगले असतात हे खरे आहे व हे वक्तव्य त्यांच्यावर
अन्याय करणारे असले तरी, केवळ मुठभर चांगले लोक संपूर्ण यंत्रणेसाठी पुरेसे पडत नाहीत,
मग ते रियल इस्टेट क्षेत्र असो किंवा पोलीस दल किंवा राजकारण!
आजूबाजूच्या कोणत्याही सामान्य माणसाकडे जा आणि
पोलीस ठाणे किंवा बांधकाम व्यावसायिकाविषयीचा त्याचा वैयक्तिक अनुभव विचारा आणि त्यावर
काय उत्तर मिळते हे स्वतःच पाहा. या पार्श्वभूमीवर
पोलीस आयुक्तांनी थोडासा वेगळा मार्ग दाखवला असता आणि त्यांच्या यंत्रणेतील सर्वात
तळाच्या व्यक्तिस म्हणजे “शिपायास” चांगल्या पायाभूत सुविधा देऊन त्यांचे मनोबल उंचावले
असते तर त्याचे अधिक कौतुक झाले असेत. आज कोणत्याही
पोलीस कॉलनीत किंवा पोलीस ठाण्यात जा आणि ते लोक कोणत्या परिस्थितीत राहतात किंवा काम
करतात हे पाहा व आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करतो याची तुलना करा! ब-याच पोलीस
चौक्यांमध्ये शौचालयांसारख्या अगदी मूलभूत बाबीही नाहीत! मुंबईवरील
हल्ल्यांना ४ वर्षे पूर्ण झाली आहेत, मात्र किती पोलिसांना बंदुका किंवा अगदी चांगली
हेल्मेट किंवा वाहने मिळाली? अगदी वरिष्ठांनाही
सरकारी मोबाईल सेवा वापरण्याची परवानगी नसते व ते संपर्कासाठी जुनी पुराणी वॉकी-टॉकी
यंत्रणा वापरतात हे खरे आहे. ते कदाचित
परिणामकारक असेल मात्र पोलीस दलाचे तथाकथित आधुनिकीकरण अजूनही केवळ कागदावरच आहे किंवा
राजकारण्यांच्या बोलण्यातच त्याचा उल्लेख होतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे व आपण
पाहिलेही आहे.
पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी केवळ टीव्ही/चित्रपट वगैरेंमधील माध्यम सम्राट लोकांना साकडे
घालण्याऐवजी, त्यांच्या कनिष्ठांना काम करण्यासाठी अधिक चांगल्या पायाभूत सुविधा मिळाव्यात
यासाठी पाय रोवून उभे का राहात नाहीत, एकजूट होऊन लढा का देत नाहीत किंवा आपल्या शासनकर्त्या
राजकारण्यांकडे मागणी का करत नाहीत? माध्यमे कशाप्रकारे काम करतात हे आपण जाणतो, म्हणून
ह्या घटनेमुळे पोलीस माध्यमांकडे प्रतिमा सुधारण्यासाठी याचना करत आहेत असा त्याचा
अर्थ काढला जाण्याची शक्यता जास्त आहे!
आपली प्रतिमा
ही आपल्या कृतीद्वारे तयार होत असते आणि तीच
सर्वोत्तम आणि खरी प्रतिमा असते, मग ती एखाद्या शासकीय विभागाची असो किंवा कोणत्याही उद्योगाची. अशा प्रकारची
संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करा जिचा अनुभव सामान्य माणूस घेऊ शकेल व तो स्वतः माध्यमांना
जाऊन सांगेल. यामुळे माध्यमांना
गुडघे टेकावे लागतील कारण माध्यमे लोकांना हवे तेच देतात. आणि सामान्य
माणूस मूर्ख नाही की पोलीस चांगले काम करत असूनही त्याची चुकीची प्रतिमा दाखवतील, तो
वायफळ गोष्टी स्वीकारणार नाही. समाजाने
पुन्हा-पुन्हा दाखवून दिले आहे की जे चित्रपट कोणत्याही विषयाची खोटी प्रतिमा दाखवतात,
त्यामध्ये किती मोठे तारे असले तरी ते चित्रपट आपतात. आपण पोलीस,
बांधकाम व्यावसायिक आणि राजकारणी संगनमताने चुकीच्या गोष्टी करत असल्याचे अनेक चित्रपटांमध्ये
पाहतो कारण लोक याच गोष्टी त्यांच्या आजू-बाजूला घडत असल्याचे पाहतात व त्याच त्यांना
चित्रपटात पाहायला आवडतात. ब-याच चित्रपटांमध्ये
चांगला पोलीस हा हिरो असतो व त्याला बहुतेक वेळा स्वतःच्या विभागाशी किंवा यंत्रणेशी
लढा द्यावा लागतो, हे देखील आपण प्रत्यक्ष घडताना पाहिले आहे. आपण “शूट आउट ऍट
लोखंडवालासारख्या” चित्रपटांमध्ये पोलीस दलाची असहाय्यता
पाहिली आहे व पोलीस दलानेही काम करताना मानवी हक्कांबाबत होणारी टीका वगैरेंसारख्या
अडचणी येत असल्याचे मान्य केले आहे. त्यानंतर “सिंघमसारख्या” चित्रपटाचेही
पोलीस दलाकडून कौतुक करण्यात आले, मात्र आपण प्रत्यक्ष जीवनात असे किती “सिंघम” पाहतो? असे सिंघम
असले तरीही त्यांचे काय होते हे देखील आपल्याला माहिती आहे. कोणे एके काळी पोलीस होणे ही अभिमानाची बाब होती,
अगदी रस्त्यावर गस्त घालणा-या शिपायालाही आजूबाजूच्या लोकांकडून आदर व सलाम मिळायचा; मात्र आज
पोलीस दलाविषयी वाटणारा तो आदर नाहीसा झाला आहे. ही भावना
टिकवून ठेवणे काळाची गरज आहे व ती पोलीस दलासोबत काम करणा-या प्रत्येक व्यक्तितून आली
पाहिजे. ही भावना
पोलीस दलात सर्व पातळ्यांवर काम करणा-यांच्या वर्तनातून दिसून आली पाहिजे. असे झाल्यास
आपल्याला कोणत्याही माध्यम सम्राटाला पोलीस दलाची चांगली प्रतिमा रंगवण्यासाठी आवाहन
करावे लागणार नाही!
चार तरुण अपघातात गाडीसकट नदीत बुडाल्याची एक बातमी नुकतीच आली होती, या दुर्घटनेतील
पीडितांना शोधण्यासाठी पोलीसांनी खूप प्रयत्न
केल्याचे नमूद केले गेले, मात्र
हे देखील खरे आहे की जेव्हा त्यांचे नातेवाईक ते तक्रार दाखल करण्यासाठी गेले तेव्हा कार्यक्षेत्रावरुन
दोन पोलीस ठाण्यांनी कुणी तक्रार दाखल करुन घ्यायची याबाबत एकमेकांवर जबाबदारी ढकलली. जेव्हा त्यापैकी
एका पालकाने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना संपर्क केला, तेव्हा सूत्रे वेगाने हालली
व यंत्रणा कामाला लागली! आणखी एक
बातमी अलिकडेच आली होती की एक मुलीने स्थानिक गुंडांकडून छेडछाड होत असल्यामुळे शरमेने
आत्महत्या केली. कारण स्थानिक पोलीसांनी
त्याबाबतची तक्रार दाखल करुन घ्यायला केवळ नकारच दिला नाही तर त्या गुंडांवर कोणतीही
कारवाई केली नाही! आता मुलीच्या
मृत्यूनंतर यंत्रणा कामाला लागली आहे व अगदी संबंधित पोलीस अधिकारीही गजाआड आहेत, मात्र
त्या मुलीचे काय जिचा नाहक जीव गेला?
आपण प्रत्येक वेळी नाकातोंडापर्यंत पाणी येईपर्यंत वाट का पाहतो आणि काहीतरी झाल्यानंतरच
आपल्याला का जाग येते? मग माध्यमांनी
आपले असे चित्र रंगवले तर त्यात गैर काय!
असे आवाहन एखाद्या राजकारण्याने किंवा एखाद्या खात्याच्या
मंत्र्याने केले असते तर मला एवढे वाईट वाटले नसते, कारण बहुतेक राजकारणी तसेच असतात, प्रत्येक
गोष्टीचे खापर प्रशासनावर फोडतात व आपण असाहाय्य असल्याची बतावणी करुन, कोणतेही काम
करण्याच्या इच्छाशक्तिचा अभाव असल्याचे झाकण्याचा प्रयत्न करतात. केवळ पोलीस
खात्याच्याच नाही तर रियल इस्टेटच्या प्रतिमेचीही माध्यमांनी हानी केली आहे. तर मग अशा
परिस्थितीत बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या प्रमुखांनी काय केले पाहिजे? माध्यमांकडे
जाऊन, बांधकाम
व्यावसायिकांची चुकीची प्रतिमा रंगवू नये असे आवाहन केले पाहिजे? विचार करा
विकासकांच्या किंवा तथाकथित बांधकाम व्यावसायिकांच्या या कृतीविषयी माध्यमांची तसेच
सामान्य माणसाची प्रतिक्रिया काय असेल! ते संपूर्ण
समाजाच्या चेष्टेचा विषय होतील आणि आपल्यापैकी प्रत्येक जण म्हणेल की आधी तुम्ही स्वतःचा
चेहरा आरशात पाहा आणि त्यानंतर इतर कुणाला तो व्यवस्थित करण्यास सांगा! बांधकाम
व्यावसायिकांविषयी चांगले लिहीण्याचे आवाहन करण्याऐवजी, जा आणि ग्राहकांना चांगली सेवा
द्या, चांगल्या इमारती बांधा असा सल्ला आपल्याला मिळेल! आता आत्मपरीक्षण
करण्याची वेळ आली आहे व त्यानंतर यंत्रणा तळापासून सुधारण्यासाठी पावले उचलण्याची गरज
आहे व त्यानंतरच अशा प्रकारचे आवाहन करणे अधिक योग्य होईल. किंबहुना
चित्रपटासारख्या माध्यमांना करण्यात आलेले आवाहन पोलीस दलाच्या सुधारणेमधील अडथळा ठरणा-या
घटकांविरुद्ध लढा देण्यास मदत म्हणून करायला हवे होते!
माझे अनेक चांगले मित्र पोलीस दलातील आहेत व मला
त्यांच्या कामाचा नेहमी अभिमान वाटतो त्यामुळेच सामान्य माणसांपेक्षा मी पोलीस खाते
थोडे अधिक जवळून पाहिले आहे, म्हणून मी हे अधिकाराने लिहू शकतो. एक मित्र
जे बोलतो ते कटू वाटले तरीही तोच तुम्हाला योग्य विचार करण्यास भाग पाडू शकतो. एक लक्षात ठेवणे आवश्यक आहे की व्यक्ती म्हणून आपण
कितीही चांगले असलो तरीही आपण ज्या वातावरणामध्ये राहतो त्याची आपली प्रतिमा घडविण्यात,
आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडविण्यात महत्वाची भूमिका असते! आज एक प्रामाणिक
पोलीस, समाजाचा कणा असलेल्या पोलीस खात्याची प्रतिमा सुधारण्यासाठी माध्यमांना आवाहन
करत आहे; या प्रयत्नांच्या
प्रामाणिकपणाविषयी मला पूर्ण आदर आहे, मात्र हे पोलीस दलाचे अपयश आहे की प्रसार माध्यमांचे यश हे समजण्यास मी असमर्थ
आहे!
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment