मी लोकांना
विचारते की हरिणाचे शीर भिंतीवर का लावता. त्यावर हरिण हा अतिशय सुंदर प्राणी असल्यामुळे
असे करतो असे त्यांचे उत्तर असते. आता पाहा. मला माझी आई अतिशय सुंदर
वाटते मात्र माझ्याकडे तिची छायाचित्रे आहेत…! एलेन डीजेनेरस.
एलेन डीजेनेरेस ही एक अमेरिकी विनोदवीर, दूरचित्रवाणी सूत्रधार व अभिनेत्री
आहे. तिने तिच्या कामासाठी तेरा एमी अवॉर्डस
व समाजसेवेच्या प्रयत्नांसाठी इतर अनेक पारितोषिके मिळविली आहेत. तिच्या
दूरचित्रवाणीवरील कामासोबतच तिच्या अवतरणामधून प्राण्यांच्या संरक्षणाबाबत जागरुकता
निर्माण करण्याच्या तिच्या प्रयत्नांविषयी आपल्याला कल्पना येऊ शकते! खरं
तरं हा प्रश्नच आहे की वन संरक्षणाचे यश आपण
कसे मोजू शकतो? तर जानेवारीच्या दुस-या आठवड्यामध्ये
मला माझे मित्र श्री. जसबीर चौहान, जे
कान्हा पार्कचे संचालक आहेत यांच्याकडून संदेश मिळाला की कान्हा राष्ट्रीय अभयारण्यामधील
प्रगणनेसाठी मला काही दिवस काढता येतील का? मी म्हणालो, “नेकी और
पूछ पूछ!” म्हणजे मला जंगलासाठी यापेक्षा दुसरी आणखी चांगली संधी कोणती मिळू शकली असती? मला प्रगणनेमध्ये
काय मदत करता येईल याची खात्री नव्हती, मात्र तो एक अभूतपूर्व अनुभव असेल हे मला माहिती
होते! आता प्रगणना म्हणजे काय हे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की ज्याप्रमाणे
आपण माणसांची जनगणना करतो त्याप्रमाणे प्राण्यांची व जैवविविधतेची प्रगणना केली जाते ! ही जंगलामधील वनस्पती, जीव व प्राण्यांविषयी
माहिती गोळा करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये प्रामुख्याने वाघांची संख्या मोजली जाते
व ही चार वर्षातून एकदा केली जाते. ही सहा दिवसांची प्रक्रिया असते
व जंगलातील सर्व कर्मचारी या कामात सहभागी असतात व वन्यजीव संरक्षणाचा थोडाफार अनुभव
किंवा पार्श्वभूमी असलेल्या माझ्यासारख्या बाहेरील लोकांना वनविभाग त्यांना मदत करण्यासाठी
बोलावतो!
सहा दिवसांच्या
या प्रक्रियेमध्ये आम्हाला पहाटे ५.३० वाजता प्रत्येक सहभागीस नेमून दिलेल्या छावणीवर
हजर राहावे लागे! मला सौफ छावणी देण्यात आली होती व विमानांच्या वेळापत्रकामुळे माझा प्रगणनेचा
पहिला दिवस चुकला. मात्र रात्रभर प्रवास करुन केवळ २ तास झोपूनही मी पहाटे ५.३० वाजता
प्रवेशद्वारापाशी आकाशातील प्रकाशमान चंद्राची छायाचित्रे घेत होतो! मी जंगलात
शेकडोवेळा गेलोय मात्र ऐवढ्या पहाटे क्वचितच पोहोचलोय. काळ्याकुट्ट
अंधारात जिप्सीच्या दिव्यात केवळ समोरचा रस्ता स्पष्टपणे दिसत होता, व त्यावर वाघाच्या ताज्या पाउलखुणा
दिसत होत्या, मला चांगलीच भीती वाटली कारण मला याच रस्त्यावरुन चालत जायचे होते! अचानक ज्या
जंगलावर माझे प्रेम आहे ते मला हॉस्पिटलच्या आयसीयूसारखे वाटू लागले होते ज्यात गेल्यावर
तुम्हालाच आजारी असल्यासारखे वाटू लागते! मी विचार करु लागलो की प्रगणनेमध्ये सहभागी होण्यासारखी जोखमी घेणे शहाणपणाचे होते
का ? का
यातून बाहेर पडण्यासाठी श्री.चौहान यांना काय कारण सांगावे ? त्याचवेळी
मला दोन फॉरेस्ट गार्डस दिसले जे बहुतेक त्यांची ज्या छावणीवर नेमणूक झाली आहे तिथे
कामासाठी चालले असावेत! त्या बिचारा-यांकडे एखादी विजेरीही नव्हती व माझ्यासारखा त्यांच्याकडे बाहेर जाण्याचा
पर्यायही नव्हता! मी विचार केला की मी गेलो किंवा न गेलो तरीही असे सुरक्षा रक्षक दररोज या जंगलाचे
रक्षण करण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात घालत असतील ज्यावर माझे प्रेम आहे, मला ते आवडते
असे मी म्हणतो! मी त्यांना केवळ काही दिवस मदत करण्याच्या जबाबदारीतून माघार घेतली तर मला काय
नैतिक अधिकार उरेल, कि मला
जंगल आवडते म्हणण्याचा ! त्या क्षणाला मी माझा संपूर्ण
धीर एकवटला व सौफ छावणीच्या दिशेने निघालो!
तिथे उप
रेंज अधिकारी श्री. धनगड व वन रक्षक अशोक झरिया दोन वन मजूरांसह माझी वाट पाहात होते. सौफ छावणी
सौफच्या विस्तारलेल्या कुरणांदरम्यान वसली आहे जे आधी एक गाव होते. या कुरणांच्या
बाहेरील सीमेलगत जंगलाचा रस्ता आहे व त्यामागील भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे व
छावणीच्या मागील बाजूस नदी वाहते. ती भल्या पहाटेची वेळ होती व सगळीकडे
दाट धुके होते. पहिले तीन दिवस मांसभक्षक प्राण्यांच्या
प्रामुख्याने वाघाच्या खुणा शोधायच्या होत्या. आम्ही अग्नी रेषेपासून सुरुवात केली, जंगलातील या पट्ट्यातून झाडे झुडपे साफ केली
जातात ज्यामुळे वणवा आजूबाजूच्या भागात पसरत नाही. अशा प्रकारच्या
प्रगणनेमध्ये दररोज साधारणतः पंधरा किमी. पट्टा व्यापला
जातो, त्यामध्ये त्या-त्या छावणीच्या कार्यक्षेत्रात येणारी अग्नी रेषा, नाले, मोठी
नदी व पाऊलवाटांचा समावेश होतो, जेथून
सर्वसामान्यपणे वाघ येणेजाणे करतात. वाघांचे
पंजे मऊ असतात व म्हणूनच जंगलांच्या ज्या भागात झाडे-झुडुपे कमी असतील अशा मार्गांचा
वापर करतात; अशा ठिकाणी कमी पालापाचोळा असल्यामुळे त्यावरुन चालताना फारसा आवाज येत नाही, त्यामुळे
सावजाला वाघाच्या येण्याची चाहूल सहजपणे लागत नाही व पंजास ईजा पण होत नाही. प्रगणनेमध्ये
या पट्ट्यांमधील वाघांच्या हालचालींच्या खुणा शोधायच्या होत्या उदाहरणार्थ वाघाच्या
पंजाचे ठसे, वाघाची विष्ठा, अर्जुनासारख्या झाडावरील त्याच्या नखांच्या खुणा, शिकारीच्या
शोधात एखाद्या ठिकाणी बसलेला असताना जमीनीवरील ओरखडे किंवा गवतावरील खुणा. नर किंवा
मादी वाघास झाडावर खूण करायची सवय असते, याचे दोन हेतू असतात एक म्हणजे आपला प्रदेश
निश्चित करणे व दुसरा म्हणजे नखांना धार देणे. झाडावरील नखांच्या खुणेच्या उंचीद्वारे
तसेच पंजाच्या ठशांद्वारे तुम्ही वाघाच्या आकाराचेही अनुमान लावू शकता. विष्ठेचे
किती विघटन झाले आहे यावरुन तिची अंदाजे वेळही नोंदवली जाते.
प्रगणनेदरम्यान
आम्हाला ब-याचदा वाघाचे आवाजही ऐकू यायचे, एखादी मोठी डरकाळी असल्याशिवाय एखाद्या सामान्य
व्यक्तिला हा आवाज सांबर हरिणाप्रमाणे वाटू शकेल, आम्ही असे
आवाजही नोंदवले जे आमच्या आमच्या आजूबाजूला वाघाच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष पुरावा
होता! एक मनोरंजक बाब म्हणजे वाघाच्या विष्ठेचा अभ्यास करताना त्यामध्ये जे केस आढळतात
त्यातून त्याने कोणता प्राणी खाल्ला होता हे देखील आपल्याला दिसू शकते! एकदा आम्हाला
वाघाच्या विष्ठेमध्ये सांबराचे “खूर” म्हणजेच
नखाचा भाग दिसला. याशिवाय चित्ता व अस्वलाविषयीही अशाच प्रकारची माहिती आम्ही नोंदवत होतो. एका दिवसात
चालत-चालत सुमारे १२-१५ किमीचा टप्पा पूर्ण करत होतो व प्रगणनेचे पहिले तीन दिवस असे
सुरु होते. प्रगणनेच्या पाच दिवसात मी शिकलो की पायी चालत जाताना तुम्हाला क्वचितच वाघ दिसतो
कारण माणसांना पाहून तो बुजतो व माणूस दिसताच दाट झाडीमध्ये नाहीसा होतो! जंगलामध्ये
पायी फिरण्याची भीती हळूहळू कमी होत गेली व मोठ्या आतूरतेने दुस-या दिवसाची वाट पाहू
लागलो!
शेवटते तीन
दिवस संक्रमणाचे होते ज्यामध्ये आम्हाला चालत असताना दोन किमीवरील ठराविक रेषेवर दोन्ही
बाजूने प्रत्येक प्राण्याची हालचाल नोंदवायची होती. येथे आम्हाला
अगदी शांतपणे, लपून-छपून हालचाल करावी लागत होती ज्यामुळे प्राणी दूर जाणार नाहीत. आम्ही सांबर,
चितळ, मोर, जंगली डुक्कर, भेकरा तसेच बारशिंगा पाहिला! आम्ही तीन
तीनच्या गटाने कुरणांमध्ये तसेच दाट जंगलामध्ये सुरुवात करायचो. प्राण्याच्या
प्रत्येक ठिकाणी जीपीएसने खूण केली जायची व त्यांची संख्याही नोंदवली जायची. त्यानंतर
आम्हाला २०० मीटरच्या खांबापासून १५ मीटरच्या परिघातील प्राण्याची विष्ठा तपासायची
होती ज्यामध्ये ससे, रानडुक्कर तसेच जंगली मांजरीचाही समावेश होता! प्राण्यांसोबतच
झाडांचे, गवताचे तसेच झुडुपांचे प्रकार नोंदविण्यात आले. ही सर्व
माहिती आम्ही संक्रमण रेषेवर दर २०० मीटरवर नोंदवत होतो. मला यामुळे
कितीतरी झाडांची झुडपांची तसेच गवतांची सुद्धा नावे समजली व मी त्यांच्याकडे जास्त जाणीवपूर्वक
पाहू लागलो जी परिस्थिती आधी नव्हती. आम्ही हे तीन दिवस दोन्ही संक्रमण
रेषांवर करत होतो, कुरणे तसेच घनदाट झाडी असलेल्या जमीनीवर डाटा गोळा करत होतो. सर्व चमूंनी
गोळा केलेली ही माहिती एकत्र केली जाईल व त्यानंतर कार्यालयातील कर्मचारी, वाघासारख्या
प्राण्यांची तसेच झाडे व झुडुपांची अंदाजे संख्या तयार करतील.
मी मागे
वळून जेव्हा या पाच दिवसांकडे पाहतो तेव्हा हे केवळ वाघांना मोजण्याचे काम नव्हते तर
ते जंगल समजून घेणे होते व खरोखर वनविभागाचे लोक अतिशय थोडक्या संसाधनांमध्ये अतिशय
मोठे काम करत आहेत! या छावण्यांमधील सुरक्षारक्षकांचा बाह्य जगाशी अक्षरशः काहीही संपर्क नसतो, वीज
नाही, आधुनिक जगातील टीव्ही किंवा वर्तमानपत्रांसारख्या सुविधा तर नाहीतच! त्यांनी मला ओशाळत्या चेहऱ्याने बिन दुधाचा चहा दिल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का
बसला की त्यांना जंगलात दूधही मिळत नाही म्हणून
कोराच चहा पितात येथे ! इथले जीवन लष्करासारखे खडतर आहे, त्यामुळे अशा छावण्यांमधील कामाचा कालावधी दोन
वर्षांपेक्षा अधिक नसावा याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. सर्वात
शेवटच्या स्तरातील कर्मचा-यांच्या आधुनिकीकरणाची, त्यांना किमान चांगली विजेरी, कपडे
तसेच चांगले राहणीमान देण्याची वेळ आली आहे. आपण इथे उच्च क्षमतेचे इन्व्हर्टर
(परिवर्तक) देण्याचा विचार करु शकतो जो प्रवेश द्वारापाशी असलेल्या मुख्य छावणीतून
ठराविक काळाने प्रभारित करता येईल. चढण असलेल्या भागामध्ये चांगल्या
प्रकारच्या सायकली गस्तीसाठी वापरता येऊ शकतात, तसेच
कर्मचा-यांना चांगले सुरक्षा पादत्राणे देणे आवश्यक आहेत जे वजनाने हलके असतील व संरक्षकही
असतील. कितीतरी गोष्टी करता येतील व प्रगणनेमध्ये या बाबींचीही दखल घेतली जावी. वरिष्ठ
अधिका-यांनीही या छावण्यांमध्ये काही वेळा राहून तिथल्या कर्मचा-यांचे मनोधैर्य उंचावले
पाहिजे. सरतेशेवटी हे लोक जंगलाचा अविभाज्य भाग आहेत व त्यांचे संरक्षण करणेही तितकेच
महत्वाचे आहे!
सर्वात शेवटचे
म्हणजे मी जंगलातून तिथे काम कसे सुरु आहे याविषयी माझ्या मुलाला एक संदेश लिहीला होता, हा संपूर्ण
अनुभव मोजक्या शब्दात व माझ्या भावना मुलांपर्यंत पोचविण्याचा तो एक
प्रयत्न होता …
प्रिय रोहित,
पहाटेचे
६ वाजलेत व आकाशात चंद्र लख्ख दिसतोय! आम्ही आज सूर्योदयापूर्वीच सुरुवात
केली त्यावेळी सौफच्या कुरणावर धुक्याचे दाट आवरण होते, चितळ, सांबर, बारशिंगा व इतर
अनेक प्राणी नुकतेच झोपेतून उठले होते! कमरेपर्यंत उंचीचे गवत ओले होते! साजाच्या
झाडावर चित्रबलाक पक्षी अजूनही झोपेतच
होते व अशा निरव शांततेत कुठेतरी आत घनदाट जंगलात एक वाघ डरकाळी फोडत होता! हा केवळ
अनुभवण्याचा विषय आहे! मी आधी जंगले पाहिलेली नाहीत असे नाही मात्र यावेळी मी ते प्रत्यक्ष अनुभवत होतो व माझ्या आणि जंगलामध्ये कोणताही आडपडदा नव्हता व मी ते अधिक चांगल्या
प्रकारे जाणून घेत होतो; आपण जेव्हा शहरातील एखाद्या रस्त्यावरुन
चालत जाताना प्रत्येक तपशील मनात साठवतो तसेच हे होते. तुला सांगू, आता मला जंगल आधीपेक्षाही जास्त
आवडू लागले आहे!
नर बारशिंगा आमच्याकडे कसा कुतुहलाने पाहात होता हे मी अनुभवले आहे, बारशिंगा आमच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहात असताना आम्ही जेव्हा त्यांच्या अतिशय जवळ पोहोचलो तेव्हा तो कळप पळून गेला पण नर तसाच उभा होता ! वाघाच्या पंज्याचे ताजे ठसे पाहिल्यानंतर कसे वाटते हे आता मला माहिती आहे व वाघ केवळ काही पावले पुढे आहे हे मी सांगू शकतो, मात्र त्या परिस्थितीतही भीती वर मात करून तुम्हाला पुढे चालत राहावे लागते व आणखी खुणा शोधाव्या लागतात! जेव्हा आजूबाजूच्या झुडपातून वाघाची डरकाळी ऐकू येते मात्र तो दिसत नाही तेव्हा छातीत कसे धडधडते हे आता मला माहिती आहे; आपल्या पावलांना नदीच्या गोठवणा-या पाण्याचा स्पर्श कसा वाटतो हे आता मला माहिती आहे, असे असले तरीही सुरक्षा रक्षकांना त्यांचे काम करण्यासाठी दररोज दिवसंरात्र नदी ओलांडावी लागते! जंगलामधील घाणेरीच्या झुडुपांचा गंध आपल्या फुफ्फुसांमध्ये कसा भरुन राहतो व तिच्या फांद्यांमुळे शरीराच्या उघड्या भागावर कसे ओरखडे उठतात हे मी अनुभवले आहे. त्यामुळे होणारया वेदना केवळ खोलीत परतल्यावर अंघोळ करताना जाणवतात!
नर बारशिंगा आमच्याकडे कसा कुतुहलाने पाहात होता हे मी अनुभवले आहे, बारशिंगा आमच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहात असताना आम्ही जेव्हा त्यांच्या अतिशय जवळ पोहोचलो तेव्हा तो कळप पळून गेला पण नर तसाच उभा होता ! वाघाच्या पंज्याचे ताजे ठसे पाहिल्यानंतर कसे वाटते हे आता मला माहिती आहे व वाघ केवळ काही पावले पुढे आहे हे मी सांगू शकतो, मात्र त्या परिस्थितीतही भीती वर मात करून तुम्हाला पुढे चालत राहावे लागते व आणखी खुणा शोधाव्या लागतात! जेव्हा आजूबाजूच्या झुडपातून वाघाची डरकाळी ऐकू येते मात्र तो दिसत नाही तेव्हा छातीत कसे धडधडते हे आता मला माहिती आहे; आपल्या पावलांना नदीच्या गोठवणा-या पाण्याचा स्पर्श कसा वाटतो हे आता मला माहिती आहे, असे असले तरीही सुरक्षा रक्षकांना त्यांचे काम करण्यासाठी दररोज दिवसंरात्र नदी ओलांडावी लागते! जंगलामधील घाणेरीच्या झुडुपांचा गंध आपल्या फुफ्फुसांमध्ये कसा भरुन राहतो व तिच्या फांद्यांमुळे शरीराच्या उघड्या भागावर कसे ओरखडे उठतात हे मी अनुभवले आहे. त्यामुळे होणारया वेदना केवळ खोलीत परतल्यावर अंघोळ करताना जाणवतात!
जीवनातील
ऐषआराम मागे ठेवून जंगलाचे संरक्षण करताना अंधारात पाऊल ठेवण्यासाठी किती मोठे धैर्य
हवे हे मला जाणवले आहे! मी आपल्या काँक्रिटच्या जंगलामध्ये परतल्यानंतरही या जंगलांचे संरक्षण करण्याची
माझी जबाबदारी आहे हे मला समजले आहे!आता मी ख-या अर्थाने जंगलात जाऊन
आलो आहे जंगल मला अधिक चांगल्या प्रकारे समजू लागले आहे असे म्हणू शकतो!
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment