अभ्यासाचे उद्दिष्ट तुम्हाला चांगली व्यक्ती व उपयोगी नागरिक बनवणे हेच असल्याचे
तुमच्या लक्षात राहील...जॉन ऍडम्स.
जॉन ऍडम्स हे अमेरिकेचे दुसरे अध्यक्ष होते, त्याआधी ते अमेरिकेचे पहिले उपाध्यक्षही होते. अशा उच्चपदस्थ व्यक्तिंची विधाने नेहमीच माझे लक्ष वेधून घेतात, कारण ते ज्या
पदावर आहेत तिथून ते इतिसाची दिशा बदलू शकतात किंवा स्वतः इतिहास घडवू शकतात! अमेरिकेचे अध्यक्षपद हे नक्कीच
असेच पद आहे व अशा पदावर असलेल्या व्यक्तिशिवाय इतर कोण नागरिकत्वाविषयी अधिक चांगल्याप्रकारे
लिहू शकेल? जगभरातल्या
लोकांना अमेरिकेचे मोठे कुतुहल व आकर्षण वाटते कारण या देशावर कधीही कुणाही राज्य केले
नाही किंवा या देशाने कुणावर कधीही राज्य केले नाही, मात्र तरीही त्यांची संस्कृती,
जीवनशैली, त्यांचा राष्ट्राबद्दलचा किंवा शहराबद्दलचा दृष्टीकोन हा अनेकांच्या अभ्यासाचा
विषय राहिला आहे!
माझे शहर या आपल्या आजच्या विषयासंदर्भात अमेरिकेच्या माजी अध्यक्षांच्या या विधानाचा
अतिशय सखोल विचार केला पाहिजे कारण आपल्यापैकी किती जणांना उपयोगी नागरिक होण्याचे
महत्व समजले आहे? अनेक जणांना नेहमीप्रमाणे आश्चर्य वाटेल की हा विषय कुठल्या दिशेने जातोय? मात्र वृत्तपत्राच्या
मुखपृष्ठावरील महानगरातील अव्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, सार्वजनिक परिवहनाचा गोंधळ
अशा बातम्यांच्या गर्दीत, एका लहानशा बातमीकडे किंबहुना पुणे मनपाने केलेल्या
आवाहनाकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले. सामान्य नागरिकांनी पुणे महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पापूर्वी आपल्या जवळपासच्या
किंवा परिसरातील कामासंदर्भात सूचना द्याव्यात यासाठीचे ते आवाहन होते. नेहमीप्रमाणे अनेकांच्या ते लक्षातही
आले नसेल मात्र हे मनपाने उचललेले अतिशय महत्वाचे पाऊल आहे व नागरिकांना असे आवाहन
करण्याचे हे जवळपास चौथे वर्ष आहे. आपण या शहरास आकार देण्याची जबाबदारी असलेल्या मनपासारख्या संघटनांवर टीका करण्यास
अतिशय उत्सुक असतो व त्यासाठी आपल्याला कुठलेही कारण चालते, मग ते ओंसडून वाहणा-या
कचराकुंड्या असोत किंवा रस्त्यावरील खड्डे असोत, जेव्हा मनपा आपले काम करण्यात अपयशी ठरते तेव्हा राजकारण्यांपासून ते माध्यमांपर्यंत समाजाचा
प्रत्येक घटक मनपावर आगपाखड करतो! मात्र त्याचवेळी आपण सोयीस्करपणे शहराबाबतची आपली भूमिका किंवा आपली जबाबदारी
विसरतो, तसे नसते तर मनपाच्या सदस्यांनी म्हणजेच नगरसेवकांनी स्वतः ही बातमी त्यांच्या
मतदारांना सांगितली असती किंवा तिचा प्रसार केला असता. नागरिकांच्या हक्कांची पूर्णपणे
जाणीव असलेली माध्यमे, मनपाच्या प्रत्येक अपयशासाठी आगपाखड करतात. हीच माध्यमे शहराच्या
गरजांशी संबंधित विविध कामांमध्ये लोकांना सहभागी होण्याच्या या स्वागतार्ह आवाहनास
स्वतःहून प्रसिद्धी देऊ शकली असती.
आपल्याला असे लोक भेटतात की ते जिथे राहतात, काम करतात त्या परिसरात अनेक गोष्टी
करणे आवश्यक आहे मात्र सरकार काही करत नसल्याची तक्रार करतात. मग पडझड झालेला पादपथ असो किंवा
दुर्गंधीयुक्त सार्वजनिक मुतारी किंवा विभाजक नसलेले रस्ते किंवा अतिशय रहदारी असलेल्या
रस्त्यावर गतिरोधकाची आवश्यकता किंवा रस्त्यावरील मार्गदर्शक फलक किंवा वृक्षारोपण,
सार्वजनिक बाग किंवा आपल्या घराच्या मागील बाजूस असलेला नाला किंवा तळे यासारख्या नैसर्गिक
जलाशयांची देशभाल अतिशय वाईट केली जाते, अशी असंख्य कामे असतात! मला आपल्या भारतीयांविषयी एक प्रश्न
पडतो की आपण आपल्या घराची किंवा कार्यालयाची सजावट व वातावरण अगदी काळजीपूर्वक चांगले
ठेवतो मात्र आपल्या कार्यालयाबाहेरील किंवा घराबाहेरील वातावरणाकडे आपण दुर्लक्ष का
करतो? आपण फक्त खांदे उडवतो आणि मी काय
करु शकतो असे म्हणतो. ते मनपाचे काम आहे, मी मालमत्ता कर व आयकर देत नाही का? आता सांगा, स्वतःला जबाबदार नागरिक
म्हणविण्यासाठी हे पुरेसे आहे का? आपण जेव्हा मनपाला सार्वजनिक संस्था म्हणतो तेव्हा आपण जनता आहोत हे विसरुन आपल्याला
चालणार नाही. जोपर्यंत आपण शहराबाबत आपली जबाबदारी पार पाडत नाही तोपर्यंत शहराला सुस्थितीत
ठेवण्याचे हे महाकाय काम एकटी मनपा करु शकत नाही!
त्याचवेळी मनपाही लोकांकडून अचानक आजूबाजूच्या परिसराविषयी त्यांची मते मागविण्याऐवजी
मालमत्ता कराच्या देयकांसोबत एक तपशीलवार अर्ज पाठवू शकते, ज्यामध्ये नागरिकांना सुचवता
येतील अशा कामांची यादी असेल. यामुळे दोन गोष्टींची खात्री केली जाईल एक म्हणजे कोणती कामे करणे आवश्यक आहे
याविषयी नागरिकांना स्पष्ट कल्पना मिळेल व दुसरे म्हणजे नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेला
कर देत असल्याने अशी कामे सुचविण्याचा त्यांचा अधिकार आहे असा संदेश दिला जाईल. अशाप्रकारे हा संपूर्ण उपक्रम अतिशय
सुनियोजित असेल व सर्व माहिती अर्थसंकल्पाच्या पुरेशी आधी योग्य त्या प्रारुपात संकलित
केली जाईल. केवळ बातमीच्या स्वरुपात प्रसिद्ध करुन ती जनतेपर्यंत पोहोचेलच असे नाही, कारण
लोकांना ही माहिती कशा स्वरुपात पाठवायची, कुणाला पाठवायची व आपल्या सूचनेचे काय केले
जाईल अशी माहिती देणारी प्रतिसाद यंत्रणा सध्या नाही.
जगातील सर्वोत्तम शहरे त्यातील समृद्ध इमारती किंवा मेट्रो अथवा सरकता जिना यासारख्या
प्रगत यंत्रणांमुळे राहण्यासाठी चांगली आहेत असे नाही; ती चांगली शहरे आहेत कारण या शहरांमधील नागरिक शहराला आपले मानतात व स्थानिक प्रशासकीय
संस्थांना शहराची देखभाल करण्यात मदत करतात. आपण शहरासाठी ओला कचरा व कोरडा कचरा वेगळा करण्यापासून
ते सिग्लन न तोडून वाहतुकीच्या शिस्तीचे पालन करण्यापर्यंत अनेक गोष्टी करु शकतो. प्रत्येकाने केलेल्या अशा लहान
लहान प्रयत्नांमधूनच एक चांगले शहर घडते!
यावर्षी आपण आपला ६८वा स्वातंत्र्य दिवस साजरा करु, मात्र खरेच स्वातंत्र्य
म्हणजे काय हे आपल्याला समजले आहे का! याचे कारण म्हणजे आपल्याला अजूनही आपल्या घराबाहेरचे व कार्यालयाबाहेरचे सर्वकाही
ही आपली जबाबदारी नाही असे आपल्याला वाटते! आपण त्याला सार्वजनिक मालमत्ता म्हणतो व सरकारने त्याची देखभाल करावी अशी अपेक्षा
करतो, मात्र सरकार म्हणजे आपणच हे सोयीस्करपणे विसरतो! आपल्याला आपले हक्क काय आहेत,
ज्या शहरात आपण राहतो त्यासाठीची आपली जबाबदारी काय आहे हे समजून सांगावे लागते व तरीही
आपण स्वतःला स्वतंत्र भारताचे अभिमानी नागरिक म्हणवतो! आपल्याला शहर चांगले बनविण्यासारख्या
साध्या गोष्टींमध्ये सहभागी होता येत नसेल तर आपण या देशासाठी आपण काय करणार? आपल्याला साधा आपल्या घरातील ओला
व कोरडा कचरा वेगळा करता येत नाही व सरकारने ते करावे व शहर स्वच्छ असावे अशी आपली
अपेक्षा असते! पाऊस कमी
पडल्याशिवाय आपण पाण्याची बचत करत नाही, हेच पाणी ज्या भागात कमी पाणी पुरवठा होतो
त्यांना जीवन देऊ शकते. एखाद्या सिग्नलवर वाहतूक पोलीस नसतील तर आपण तो पाळत नाही व त्यानंतर
वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने रस्त्यांवर कॅमेरे बसवावेत अशी आपली अपेक्षा असते! आपल्याला नेहमी असे वाटते की काहीतरी
चमत्कार घडेल व सगळे चांगले होईल मात्र आपण हे विसरतो की आपल्याला मिळालेले स्वातंत्र्यही
काही चमत्कार नव्हता, तर जनतेमुळेच ते मिळू शकले. त्याचप्रकारे वेगाने अधोगती होत असलेल्या आपल्या शहराला कुणीही मनपा किंवा एखादे
चांगले आयुक्त किंवा एक अधिकारी किंवा नेता वाचवू शकणार नाही, तर स्वतःला पुणेकर म्हणविणा-या
प्रत्येकाची ती जबाबदारी आहे!
मी वारंवार सांगतो त्याप्रमाणे हा इशारा विकसकांसाठीही आहे, कारण हे शहर चांगले असल्यामुळे
लोक चांगल्या भविष्यासाठी इथे घर घेऊन स्थायिक होण्याचा विचार करतात. त्यामुळे शहराला सर्वोत्तम स्थितीत ठेवणे ही आपलीही जबाबदारी आहे व हे केवळ आपल्या
हस्तीदंती मनो-यातून नाही तर सामान्य माणसाच्या
दृष्टीकोनातून झाले पाहिजे! विकसकांनी त्यांच्या ग्राहकांना वर नमूद केलेल्या बातम्यांसारख्या बातम्यांची जाणीव
करुन दिली पाहिजे व अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासंदर्भात मार्गदर्शन केले पाहिजे. लक्षात ठेवा आपण स्वतःला विकसक
म्हणतो तेव्हा आपण पूर्ण समाज विकसित करणे अपेक्षित आहे, केवळ आपल्याकडील काही हेक्टर
नाही! असे झाले नाही तर एक दिवस आपल्या शहराची परिस्थिती अशी होईल की आवाहन करण्यासारखे
काही उरणारच नाही व त्या दिवसासाठी आपणच जबाबदार असू!
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment