काही वेळा तुमची जबाबदारी समजून घेण्याची क्षमता हीच तुमचा सर्वात मोठा शाप असते. .............…चाणक्य.
नोव्हेंबरचा महिना असूनही मध्य भारतात ख-या अर्थाने थंडी सुरु झालेली नाही, ढगाळ वातावरण आहे, वारे वाहताहेत, कधी कधी थोडं पेंगुळलेलं
आणि उदास वातावरण अस काहीसं आहे ! मात्र जेव्हा तुम्ही कान्हातल्या साल आणि ताडोबातल्या सागवान वृक्षांसोबत
असता तेव्हा मात्र ही सगळी मरगळ निघून जाते! अचानक ढगांमधून तळपता सूर्य डोकावतो आणि तुम्हाला झाडीतुन वळण घेत जाणा-या लाल मातीच्या रस्त्यावर वाट
पाहताना तुमच्या जिप्सीच्या दिशेने चालत येणारी एक वाघीण दिसते, त्यानंतर काही वेळ फक्त कॅमे-याच्या शटरचं क्लिक क्लिक आणि तुमच्या हृदयाची धडधड ऐकू येत असते, क्षणभर वेळ जणु थांबते
आणि काही मिनिटात ती वाघीण तुमची जिप्सी ओलांडून घनदाट जंगात दिसेनाशी होते, मात्र तुमच्यापाशी तिच्या डौलेदार चालण्याच्या आयुष्यभरासाठीच्या आठवणी
उरलेल्या असतात! होय जंगलांमध्ये भटकंतीचा मोसम
आला आहे आणि मी सुद्धा त्याचा एक भाग असल्याचा मला आनंद आहे! मित्रांनो जंगलामध्ये असे असंख्य क्षण अनुभवायला मिळतात, तुम्ही फक्त तिथे
जाऊन ते क्षण पुरेपूर अनुभवायचे असतात! हो आणखी एक गोष्ट म्हणजे
जंगलाला एक आश्वासन देऊन परत यायचे असते की, मी या जंगलाचे देणे लागतो, ते
इतरांसाठी शक्य तितक्या चांगल्या स्वरुपात ठेवण्याची माझी जबाबदारी मी पार पाडेन,
अर्थात जंगल तुमच्याकडून असे आश्वासन किंवा काहीच कधीही मागत
नाही!
मला जंगलाला भेट देणं हा नेहमीच नवीन अनुभव वाटतो कारण त्यामुळे मला माझ्या शहरी जिवनाच्या धबडग्यातून जरा लांब
जायची संधी मिळते. या विषयासाठी मी वर दिलेलं
अवतरण वाचून बरेच जण बुचकळ्यात पडतील, कारण निसर्गाशी संबंधित काहीतरी देण्याऐवजी
मी एवढं तात्विक अवतरण का दिलं आहे, ते सुद्धा माझ्या तीन आदर्शांपैकी एक असलेल्या
चाणक्याचं! मात्र निसर्ग म्हणजे केवळ मौज व मजा नव्हे, विशेषतः तुम्ही जगभरातील
सर्वोच्च व्याघ्र प्रकल्पांपैकी असलेल्या
एका राष्ट्रीय अभयारण्याच्या संचालकपदी असाल तर अतिशय मोठी जबाबदारी आहे! मी कान्हा व्याघ्र प्रकल्प व
ताडोबा अंधारी वाघ अभयारण्याविषयी व त्यांच्या संबंधित संचालकांविषयी बोलतोय, ज्यांच्यासोबत या वेळेस मला सुदैवाने काही काळ घालवायला मिळाला! मला जंगलात केवळ वाघच
बघायला आवडतात असं नाही, मी ते अनेकदा पाहिलेत अर्थात दरवेळी तो पाहण्यातला थरार
वेगळाच असतो, मात्र तिथे जाऊन मला जंगलात व त्याच्या अवती भोवती राहणा-या माणसांना
भेटता येतं, झाडे व प्राण्यांइतकेच ते देखील या जंगलाचा अविभाज्य भाग आहेत! त्यांना भेटून तुम्हाला दरवेळी जंगलाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो
व त्यानंतर मला जंगल अधिकच आवडू लागतं!
म्हणूनच आपण जेव्हा एका जमीनीच्या तुकड्याचा त्यातील वनस्पती व सजीवांसह
जंगल म्हणून उल्लेख करतो तेव्हा आपण त्यात व आजूबाजूला राहणा-या गावक-यांचाही विचार केला पाहिजे, या जनजातीही जंगलाचा अविभाज्य भाग आहेत, गाईड, जिप्सी चालक, ढाबेवाले, हॉटेलचे व अभयारण्याच्या भोवती असलेल्या रिसॉर्टचे कर्मचारी, जंगलाला भेट
देणारे पर्यटक, जंगलात काम करणारे कामगार व जंगलाचे कर्मचारी; ही यादी अशी लांबलचक आहे! मात्र हे सर्व लोक जंगल
नावाच्या साखळीला जोडणारे दुवे आहेत. ज्याप्रमाणे अभयारण्यात
प्राण्यांच्या साखळीत वाघाचे स्थान सर्वोच्च असते त्याचप्रमाणे मानवी साखळीत
अभयारण्याच्या संचालकांचे स्थान सर्वोच्च असते! अनेक पर्यटकांनी जंगलाला
अनेकदा भेट दिली असली तरीही जंगलाचे संघटनात्मक कार्य कसे चालते याविषयी त्यांना
फारशी माहिती नसते. आपण जंगलात जातो तेव्हा
आपल्याला केवळ वाघ पाहण्यात व वेगवेगळी ठिकाणे पाहण्यात रस असतो, मात्र त्याशिवाय
आपण इतर काहीही जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे! पर्यटक वगळता (नियमितपणे जाणारे काही जाणतात) वर नमूद केलेल्या सर्वांसाठी
संचालक म्हणजे जणु जंगलातला राजा असतो व जंगल हे त्याचे राज्य असते. जेंव्हा संचालकांची गाडी
अभयारण्याच्या प्रवेशद्वारापाशी येते तेव्हाचे दृश्य, त्यांच्याभोवती असलेले वलय
पाहण्यासारखे असते; गाईडपासून सुरक्षारक्षकांपर्यंत, जंगलाशी संबंधित सर्वजण अगदी सावधान असतात, तुम्हाला त्यांच्या चेह-यावरील
हावभाव तसेच देहबोलीतूनही हे दिसून येईल, वाघ दिसल्यावर चितळ किंवा
लंगूर कसे वागतात त्यासारखेच हे दृश्य असते. मला माफ करा इथे मी त्यांच्या भीतीविषयी बोलत नाही तर आपापल्या विविध
भूमिकांमध्ये जंगलासाठी काम करणा-या या लोकांबद्दल, संचालक या पदाबद्दल जो आदर असतो त्याविषयी बोलतोय. अनेकांना अशाप्रकारचे पद
मिळाले तर अतिशय आनंद होईल, कारण अशा लोकांच्या आदेशाचे पालन करायला अनेक जण तयार
असतात, त्यांची ‘जी हुजुरी’ करतात, अशा अधिका-यांना कान्हा व ताडोबासारख्या वन्य जीवनाचे नंदनवन
मानल्या जाणा-या ठिकाणी कुठेही फिरण्याचा परवाना असतो ज्यासाठी लोक लाखो रुपये
खर्च करायला तयार असतात! संचालकांना जंगलातच राहण्यासाठी
राजेशाही आरामगृह असते, तिथून जंगलाचे सर्वोत्तम दृश्य दिसते, दिमतीला अनेक
नौकर-चाकर असतात! मात्र लक्षात ठेवा, कोणताही
मान-सन्मान मोफत मिळत नाहीत! या सर्व ऐषआरामाच्या पडद्यामागे
काटेरी खुर्ची असते. व्याघ्र प्रकल्पाच्या संचालकांनी
काय करणे अपेक्षित असते किंवा त्यांच्या काय जबाबदा-या असतात हे आपण पाहू? वर म्हटल्याप्रमाणे जंगल अनेक घटकांचे बनलेले असते व त्यामध्ये वाघापासून ते
मधमाशा खाणा-या लहानशा पक्षापर्यंत (बीइटर) प्रत्येक सजीवाचा समावेश होतो. इथे हजारो प्रकारची झाडे, वेली व गवत
असते, जलाशय असतात ज्यामध्ये जलचर पक्षी व माशांसारख्या अनेक प्रजाती राहातात. तसेच मी वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यामध्ये मानवी घटकांचाही समावेश होतो व संचालकांचे काम या साखळीतील प्रत्येक घटक आनंदी व शांततेने राहील हे
पाहण्याचे आहे, असे झाले तरच ही साखळी अखंड सुरु राहते! त्यांच्या कामाचा केवळ
विचार करुन बघा, जिप्सीमध्ये बसून जंगलात फेरफटका मारणे, आजूबाजूचे सौंदर्य
कॅमे-याने टिपणे सोपे आहे, मात्र ते सुरक्षित ठेवायची काळजी तुम्हाला करावी लागत
नाही कारण ती जबाबदारी अभयारण्याच्या संचालकांवर असते.
आता कुणीही टीका करेल की त्यात काय मोठेसे, त्यांच्या दिमतीला जबाबदारी पार
पाडण्यासाठी एवढी माणसे नाहीत का? अर्थातच आहेत, मात्र जंगल हे
देवाने तयार केलेले नैसर्गिक वसतीस्थान आहे व तेथे तुमच्या इच्छेने काहीही होत
नाही तर निसर्गाच्या इच्छेने होते! तिथे काहीही विपरित होऊ शकते
उदाहरणार्थ एखादा वाघ जंगलाच्या हद्दीतून शेजारच्या गावात जाऊ शकतो कारण त्याला
अभयारण्याची हद्द माहिती नसते, तो गावक-यांना मारु शकतो किंवा गावकरी त्याला मारु
शकतात. चितळ किंवा हरिणांचा कळप शेतक-यांचे उभे पीक खाऊन टाकू शकतो, यात शेतक-यांची
चूक एवढीच असते की त्यांचे शेत जंगलाला लागून आहे, अर्थातच अशावेळी त्याची जंगलाशी
तसेच प्राण्यांशी दोस्ती
होणेच शक्य नाही. एखाद्या वाघीणीची घट्ट झालेली रेडीओ कॉलर बदलायची असते, तिला त्या कॉलरमुळे जखम होण्यापूर्वी तुम्हाला तिला महाकाय जंगलात
शोधून काढायचे असते. संचालकांना वाघीण शिकारीसाठी
गेल्यानंतर तिचे बछडे सुरक्षित राहतील याची काळजी घ्यावी लागते. जंगलात अनेक वाहने
फिरत असतात, ती जंगलात कोणत्याही प्राण्याला धडकून गंभीर अपघात होऊ शकतो, ही सर्व
वाहने व्यवस्थित व सुरक्षित वेगाने चालवली जात आहेत का याची देखरेख करण्याचे काम
संचालकांचे असते. संचालकांना जंगलात वणवा लागणार
नाही याची खबरदारी घ्यावी लागते, वणव्यामुळे वनस्पती व सजीवांचे अतोनात नुकसान होत
असल्याने ते कुणाही वन्यजीव प्राण्यांसाठी दुःस्वप्न ठरते. आता टीका करणारे म्हणतील की त्यात संचालकांनी काळजी करण्यासारखे काय आहे
वर्षानुवर्षे ही जंगले,
त्यातील प्राण्यांसह टिकलेली नाहीत का? पुन्हा त्याचे उत्तर होय आहे
मात्र पूर्वी माणसाचा जंगलांमधील हस्तक्षेप किंबहुना अतिक्रमण इतक्या मोठ्या
प्रमाणावर नव्हते! माणूस व प्राण्यांमधील संघर्ष
हाताळणे हे अभयारण्याच्या संचालकांपुढचे सर्वात मोठे काम आहे व याचे कारण म्हणजे
जंगल कुणाच्या मालकीचे आहे हा प्रश्न? म्हणजेच, वर्षानुवर्षे जंगले
ज्या जमीनीवर शांतपणे उभी आहेत त्यावर कुणाची मालकी आहे, माणसांची की प्राण्यांची? जमीन मर्यादित आहे व मानवनिर्मित प्रदूषण तसेच आपल्या गरजा दिवसेंदिवस
वाढताहेत; स्वाभाविकपणे आपल्याला आपली शेते, कारखाने, मनोरंजन व इतरही ब-याच
गोष्टींसाठी आणखी जमीन आवश्यक आहे! तर मग आपण आपल्या गरजा व हाव
पूर्ण करण्यासाठी कुठे जातो; मनुष्यप्राण्यासाठी कोणताही
धोका निर्माण न करता वर्षानुवर्षे ज्यावर जंगल उभे आहे त्या वनजमीनीकडे जातो! जंगलात पूर्वी वाघाची बछडी असतील तर त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या
गोष्टी म्हणजे सावज तसेच पाणी वाघीणीला सहजपणे जवळपास उपलब्ध व्हायच्या, त्यामुळे
तिला नर वाघ किंवा कोल्हासारख्या इतर प्राण्यांची भीती असताना बछड्यांना एकटे
सोडून फार लांब जावे लागायचे नाही. वणवा पेटला तर नवीन जंगल
उगवण्यासाठी पुरेशी जमीन होती. जंगलाला लागून शेती नसायची
त्यामुळे मानवी वसाहतींमध्ये वाघ किंवा हरिणांचा कळप घुसण्याचा धोका नसायचा. माणसे वाघांना त्याच्या कातड्यांसाठी व नखांसाठी मारत नसत त्यामुळे
शिकारीचा धोका नव्हता. थोडक्यात आज कोणत्याही
अभयारण्याच्या संचालकांसमोरचे सर्वात मुख्य काम म्हणजे वनजमीनीवर व त्यातील
सजीवांवर मानवाद्वारे होणारे अतिक्रमण कमी करणे. कान्हा, ताडोबा व अशाच
इतरही जंगलांमधील व आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये मानव व प्राण्यांमधील संघर्षाची
टांगती तलवार आहे व तेथील संचालक हा संघर्ष सोडविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत
आहेत.
आणि हे काम सोपे नक्कीच नाही !
या प्रक्रियेमध्ये असंख्य समस्या आहेत कारण गावक-यांना वाटते की वनजमीनीवर
त्यांचा हक्क आहे व सरकारने देऊ केलेल्या जागांवर स्थलांतर करायला ते सहजपणे तयार
होत नाहीत. शेकडो चौरस किलोमीटरवर पसरलेल्या जंगलाचे रक्षण करण्याचे काम अतिशय अवघड
आहे व त्यासाठीचे मनुष्यबळ पुरेसे नाही. त्याशिवाय
कर्मचा-यांसाठीच्या पायभूत सुविधा अतिशय निकृष्ट आहेत, यामुळे अनेक वनरक्षकांना नैराश्य येते व त्यांचे मनोधैर्य उंचावणे हे
देखील संचालकांचे एक मोठे काम असते. मी वर म्हटल्याप्रमाणे एखाद्या
आठवड्यासाठी सर्व सुखसोयींसह जंगलात राहणे व त्यानंतर ते आवडणे सोपे आहे मात्र
तुम्ही एका वनरक्षकाच्या भूमिकेतून विचार करा जो घनदाट जंगलातील एखाद्या चौकीत,
बाहेरील जगापासून, त्याच्या कुटुंबासून दूर राहतो, काळोख्या रात्री, असह्य ऊन
किंवा मुसळधार पावसाचा सामना करत असतो. अशा परिस्थितीत त्याला
प्राण्यांच्या तसेच शिका-यांच्या हल्ल्याचा धोका असतो! वनरक्षक जखमी झाल्याच्या
तसेच जंगली अस्वलाच्या हल्ल्यात मारला गेल्याच्या किंवा शिका-यांनी मारल्याच्या
अनेक घटना आहेत. त्यांना केवळ आठवड्याभरासाठी
असे राहायचे नसते, सतत अशीच परिस्थिती असते, महिनोंमहिने किंवा कधी
वर्षानुवर्षे, अशा परिस्थितीत जंगल आवडेल का याचा विचार करुन पाहा! मला खात्री आहे बहुतेक लोकांना केवळ याचा विचार केला तरीही जंगल आवडणार
नाही व अशापरिस्थितीत संचालकांना वनसंरक्षणासाठी या लोकांना काम करायला लावायचे
असते.
यावर मग काय उपाय आहे? दुर्दैवाने यावर काहीही झटपट
तोडगा नाही मात्र आपण किमान जंगल कुणाचे आहे हे ठरवू शकतो व त्यानंतर प्रत्येकाला
त्याचा यथायोग्य हक्क देण्यासाठी एक योजना तयार करु शकतो. मला तरी असे वाटते की जंगल त्यातील झाडे, वाघ, हरिण व असंख्य प्रजातींचे
आहे व आपण त्यांच्या जगातील हस्तक्षेप शक्य तितका कमी केला पाहिजे. याचा अर्थ असा होत नाही की आपण जंगलात जाऊच नये, कारण आता जंगल आपोआप
टिकण्याचे दिवस गेले, माझ्यावर विश्वास ठेवा की जंगलाचे रक्षण केले नाही तर एका
वर्षात ते साफ होऊन जाईल एवढी माणसाची हाव प्रचंड आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने
अभयारण्याच्या संचालकांचे काम केले पाहिजे म्हणजेच त्यांच्यासारखा दृष्टिकोन ठेवला
पाहिजे. आपण पर्यटक म्हणून जंगलाला भेट देताना आपला जंगलाला किंवा तिथल्या एकूण
व्यवस्थेला उपद्रव होणार नाही व तिथल्या नियमांचे पालन करुन निसर्गाचे सौंदर्य
उपभोगू याची काळजी घेतली पाहिजे. केवळ वाघ दिसला की त्याचे छायाचित्र
घेण्याची घाई करु नका, तो तुम्हाला प्रत्यक्षात दिसला नाही तरीही त्याच्या
पाउलखुणा व त्याच्या आगमनापूर्वी इतर प्राण्यांनी दिलेले संकेत यातून त्याच्या
अस्तित्वाचा आनंद घ्या व अनुभवा. निसर्गाचा प्रत्येक बारीकसारिक तपशील
पाहा व साठवण्यास शिका. लक्षात ठेवा जंगलाचा अनुभव सर्व
ज्ञानेंद्रियांनी घ्यायचा असतो केवळ प्राणी पाहून नाही. हिरव्याकंच गवताचा दरवळ ते
जंगलातील विविध पक्षांचे आवाज, जंगलामध्ये तुमच्या आजूबाजूला असलेले चैतन्य अनुभवा. आपल्याला जंगलाला तसंच त्याची देखभाल करणा-या लोकांना म्हणजेच वनरक्षक
किंवा आजूबाजूचे गावकरी किंवा गाईड यांना कशाप्रकारे मदत करता येईल याचा विचार करा. त्यांना कोणत्याही प्रकारे मदत केली तर जंगलाचे अधिक चांगल्या प्रकारे
रक्षण करताना त्यांचे मनोधैर्य उंचावेल व तुम्ही असे केल्यास संचालकांच्या
खांद्यावरील थोडासा भार कमी होईल जे या जंगल नावाच्या स्वर्गाचे संरक्षक आहेत! मी स्वतः शहराचा रहिवासी असल्याने, अनेक जण मला प्रश्न विचारतात की
पुण्या-मुंबईत राहून आपण त्यांना काय मदत करु शकतो, व आपल्यापासून जंगले इतकी लांब
असताना आपण त्यांच्यासाठी काही का करावे? आपल्यापैकी कुणीही देवाला
पाहिलेलं नाही व सर्व धर्मांच्या मते तो स्वर्गात राहतो तरीही आपण त्याची
पूजा-प्रार्थना करतो, कारण कुठेतरी आपल्याला विश्वास असतो की ती आपल्याला सुखरुप
ठेवणारी एक शक्ती आहे. जंगलाचेही असेच आहे, कुठेही एखादे चांगले जंगल असेल तर तुम्ही त्याला एखादे वेळी भेट देऊ शकता व
एक नवचैतन्य घेऊन परत येऊ शकता, मला असे वाटते केवळ या एकाच कारणासाठी आपण केवळ
आपल्या जवळच्याच नाही तर आपल्यापासून लांब असलेल्या जंगलांच्या संरक्षणासाठीही
सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत!
चला तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अभयारण्याचे संचालक होऊ शकता, मात्र
त्यासाठी तुम्हा भारतीय वन सेवेत रुजू व्हायची गरज नाही; मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे वनरक्षक असणं म्हणजे केवळ एखादं पद नव्हे
तर तो तुमचा जंगलाविषयीचा दृष्टिकोन
आहे हे लक्षात ठेवा! तुम्हाला असे करता आले
तरच मी म्हणेन की तुम्हाला जंगल ख-या अर्थाने समजले आहे व तरच तुमचा जंगलावर खरा
अधिकार असेल कारण जंगल केवळ त्यांचेच असते जे जंगलाचे असतात!
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
संजीवनी
डेव्हलपर्स
No comments:
Post a Comment