Saturday 28 March 2020

शिस्त, समाज आणि लॉकडाऊन




























शिस्त शिकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही लहान असताना तुमचे पालक व शिक्षक जे शिकवतात त्याचे डोळे झाकून पालन करणे; सर्वात अवघड मार्ग म्हणजे शिस्तबद्धपणे वागण्याशिवाय दुसरा काही उपाय नसताना ती स्वीकारणे”...विन्स लोंबार्ड.

विन्स हे अमेरिकेच्या क्रीडा इतिहासातील एक सर्वोत्तम प्रशिक्षक व अतिशय शिस्तप्रिय होते. राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या ६व्या दिवशी मी पहाटे (मी सामान्यपणे सकाळी लवकरच उठतो) उठलो तेव्हा पोलीसांची गाडी ध्वनी क्षेपकाद्वारे एक घोषणा करत होती, सकाळचा फेरफटका मारायला/जॉगिंग करायला आलेल्यांनी परत घरी जावं नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ती घोषणा होती. माझ्यासाठी दिवसाची सुरूवात पहिल्यांदाच एवढी विचित्र झाली होती. एरवी कधी आपण यावर हसलो असतो, मात्र ही हसायची वेळ नाही. आपण सध्याच्या कोव्हिडविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाविषयी असंख्य विनोद/विडंबनं/व्यंगचित्र एकमेकांना पाठवत असलो तरीही आतून आपण सगळे धास्तावलेलो आहोत हे नक्की, आपण वरवर ते नाकारत असलो तरीही. भीती नक्कीच आहे, पण मला त्याची लाज वाटत नाही. किंबहुना ती आहे हे स्वीकारल्यानं त्यावर मी अधिक चांगल्याप्रकारे मात करून पुढची वाटचाल करू शकेन. मी खाली वाकून पाहिलं तेव्हा मला बऱ्याच स्त्रिया व पुरूष व्यायामाचा पोशाख घालून नदीला लागून असलेल्या १०० फूट रुंद रस्त्याच्या पदपथावर चालताना दिसले, काही जण शरीराला ताण देणारे व्यायामही करत होते. मग अचानक जाणीव झाली, अरेच्चा देशभर लॉकडाऊन लागू आहे. आपण एका विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, स्वतः सुरक्षित राहण्यासाठी घरात बसणे अपेक्षित आहे. इथे लोक मात्रहा नेहमीसारखाच दिवस असल्याप्रमाणे रस्त्यावर निघाले आहेत. हा त्यांचा भाबडेपणा किंवा शूरवीरपणा नाही, तर निव्वळ बिनडोक अडाणीपणा आहे.

आता माननीय पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूच्या दिवशी जेव्हा संध्याकाळी ५ वाजता टाळ्या व थाळ्या वाजवून वैद्यकीय व्यावसायिकांचे आभार मानून त्यांना पाठिंबा द्यायचं आवाहन केलं होतं तेव्हा रस्त्यावर मोर्चे काढणाऱ्या लोकांकडून आणखी काय अपेक्षा करता येईल.आपण बिनडोक अडाणी आहोत हे हजारो वेळा सिद्ध झालंय, मग ते लाल सिग्नल तोडणं असतो किंवा दुचाकीवर जाताना हेल्मेट नघालणं असो किंवा आपली चकचकीत एसयूव्ही १०० किमी/तास वेगानं चालवताना सीट बेल्ट वापरणं अपमानास्पद वाटणं असो किंवा अगदी किराणा सामान खरेदी करायला गेल्यावर रांगेत उभं न राहता धक्काबुक्की करणं असो. या देशामध्ये दैनंदिन जीवनाविषयीचा असा बिनडोक अडाणी दृष्टिकोन आपण केवळ पाहातच नाही तर त्याचा भागही होतो. लोकशाहीच्या नावाखाली असं करण्यात आपल्याला अभिमान वाटतो, अशावेळी पोलीसांकडे या पांढरपेशा नागरिकांना कायदेशीर कारवाईची धमकी देऊन रस्त्यावरून हुसकावून लावण्याशिवाय काय पर्याय असतो. कारण या नागरिकांना त्यांनी सार्वजनिक ठिकाणी व्यायाम न करता घरात बंद राहिलं पाहिजे हे चांगलं ठावूक आहे.

आपणा भारतीयांचा चलता है दृष्टिकोन टिकून राहण्यासाठी किंवा तो बळकट होण्यासाठी फक्त आपले शिकलेले नागरिक नाही तर ही यंत्रणा जिला आपण सरकार म्हणतो ती सुद्धा शंभर टक्के जबाबदार आहे. कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती सारखी आहे याचा भरवसा देण्यासाठी आपल्या न्यायदेवतेचे डोळे झाकलेले असतात, पण शासनकर्ते व अंमलबजावणी करणारे त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतात, हेच आपल्या अशा दृष्टिकोना मागचं मुख्य कारण आहे. याचं अगदी लहानसं उदाहरण आहे लाल सिग्नल तोडणे, वाहतूक पोलीस अनेकदा याकडे डोळेझाक करतात, मात्र जेव्हा हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू होते तेव्हा त्याच वाहनचालकाला बिनाहेल्मेट वाहनासाठी पकडतात. लोक प्रवेशबंदी असलेल्या रस्त्यांवर बिनधास्तपणे प्रवेश करतात व १०० पैकी ९० वेळा पकडले जात नाहीत आणि जेव्हा ते पकडले जातात तेव्हा काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 

आपण आपले घर सोडून सगळीकडे थुंकतो, आपण नद्यांमध्ये, रस्त्यावर आपल्याला हवा तसा कचरा फेकतो, रस्त्याच्या कडेला कुठेही सगळ्यांकडे पाठ करून लघवी करायला उभे राहतो आपल्याकडे कुणीही पाहात नाही असं आपल्याला वाटत असतं (आपल्याकडे सार्वजनिक शौचालये अतिशय कमी आहेत हे देखील त्याचे कारण आहे) वआपल्याकडे सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता तर अतिशय दयनीय असते, कोणतेही सार्वजनिक स्वच्छता गृह किंवा उद्यान किंवा ऐतिहासिक वास्तूला भेट द्या व तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का हे स्वतहाच पाहा. प्रत्येक गाव, शहर किंवा महानगरांमध्ये आधीपासूनच अरुंद असलेल्या रस्त्यांवर अगदी लहानसहान प्रसंगांसाठी (गल्लीतल्या एखाद्या भाईचा वाढदिवस) मोठमोठे मोर्चे, मिरवणुका काढल्या जातात व स्पिकर्सची भिंत उभारून कर्कश्श आवाजात संगीत लावलं जातं. या देशात सर्वोच्च न्यायालयानं यावर बंदी घालूनही, प्रत्येक गावात, शहरात व महानगरात असे प्रकार होत असतात व कायद्याची अंमलबजावणी करणारे त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यावर लोकांचीच मागणी असल्याने अशा मिरवणुका काढायला परवानगी द्यावी लागते, आम्ही काय करू शकतो अशी भूमिका घेतली जाते. आपल्याकडे घरे बांधण्यासाठी नियम व कायदे असतात ज्यातून गृहनिर्माण संकुल तयार होते. मात्र देशभरात हजारो लोक त्यांच्या मर्जीने कुणाच्याही परवानगीशिवाय घरे बांधतात व लाखो लोक ती खरेदी करतात व त्यात राहू लागतात. तर हेच सरकार माननीय न्यायालयाला लोकांच्या गरजेच्या नावाखाली ही अवैध बांधकामे वैध करायची परवानगी मागते. असं असूनही आपण नागरिकांमध्ये कायद्याचे पालन करायची वृत्ती असावी अशी अपेक्षा करतो, लोकहो आपण कुणाला मूर्ख बनवतोय? इथे तुम्ही काहीही केलं तरी, चालतं हो, भाऊ!”  या एका वाक्यानं सगळं खपवून घेतलं जातं.

पैसा, पद किंवा अगदी शारीरिक ताकदही नसलेल्या सामान्य माणसाने कधी कायद्याचे उल्लंघन केल्यास, प्रत्येक सरकारी यंत्रणा त्या व्यक्तीला पकडायला सज्ज असते. मात्र पैसा किंवा पद असलेल्या एखाद्या माणसाने कोणताही कायदा मोडल्यास त्याच्यावर किंवा तिच्यावर कारवाई होताना क्वचितच पाहायला मिळते.जेव्हा हजारो लोक कायदा मोडतात व बेशिस्तपणे वागतात तेव्हा ती सामान्य माणसं असूनही, लोकआग्रहामुळे कायदा त्यांना शिक्षा द्यायला धजावत नाही. त्यामुळे अशा समाजावर जेव्हा एखादी आपत्ती ओढवते, आपण शिस्तपालन करावं, घरात बंद राहावं अशी अपेक्षा केली जाते तेव्हा ते साध्य होईल अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो?

खरतर सध्या रस्त्यावर इतकी कमी वर्दळ आहे तसंच अनेक लोक अजूनही घरातच राहणं पसंत करताहेत हा एक चमत्कारच आहे, कारण हा देशच एक चमत्कार आहेकाही दशकांपूर्वी "अमर, अकबर, अँथनी" नावाच्या चित्रपटात, अमिताभ बच्चन चोरीचे सोने घेऊन पळणाऱ्या खलनायकाकडे पाहू एक संवाद म्हणतो, “ऐसा आदमी लाईफ में दोईच बार भागता है, ऑलिम्पिक का रेस हो या तो पोलीस का केस हो म्हणजे आपल्या देशात माणूस इतक्या वेगाने केवळ दोनदाच धावतो, एकतर त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला असेल तर किंवा पोलीस त्याच्या मागे लागले असतील तर.हा भारत आहे; आपल्याकडे कधीही विन्स लोंबार्ड यांच्यासारखे प्रशिक्षक नव्हते पण आपल्याकडे कुठल्याही देशाहून कित्येक पटींनी चांगले पालक व शिक्षक आहेत. पण आपल्याला सर्वात अवघड मार्गानेच शिस्त शिकायची असेल, तर असू देत; “तोपर्यंत जे चाललंय ते चालू द्या भाऊ, आपलाच देश आहे”!

संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलोपर्स
इमेल: smd156812@gmail.com


No comments:

Post a Comment