“माणूस वन्यजीवनाची निर्मिती करू शकत नाही. ते एकदा
नष्ट झाले की कायमस्वरुपी नष्ट होते. माणूस पुन्हा पिरॅमिड बांधू शकतो, मात्र तो
पर्यावरणाची किंवा एखाद्या जिराफाची पुन्हा निर्मिती करू शकत नाही”... जॉय ऍडम्स.
संयुक्त राष्ट्रांच्या
आम सभेच्या (यूएनजीए) २० डिसेंबर २०१३ रोजी झालेल्या ६८व्या सत्रात ३ मार्च
संयुक्त राष्ट्र जागतिक वन्यजीवन दिवस म्हणून घोषित करण्यात आला. जगभरातील प्राणी
व वनस्पतींचे वैविध्यपूर्ण अस्तित्व साजरे करण्यासाठी व त्यांच्याविषयी जागरुकता
निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यासाठी ३ मार्च हा दिवस निवडण्यात
आला कारण १९७३ साली याच दिवशी वन्य प्राणी व वनस्पतींच्या नामशेष होत चाललेल्या
प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयीच्या ठरावावर (सीआयटीईएस) स्वाक्षऱ्या
करण्यात आल्या होत्या.
जागतिक वन्यजीवन दिवस २०२१ मध्ये “जंगले व उपजीविका: लोकांना व पृथ्वीला जगविणे” या
संकल्पनेंतर्गत साजरा केला जाईल.
गंमत म्हणजे याच
आठवड्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे जागतिक महिला दिन, जो ८
मार्च रोजी साजरा केला जातो. संपूर्ण मानवजातीसाठी व तिच्या भल्यासाठी वन्यजीवन
तसेच महिलावर्ग या दोन्हींचे संवर्धन अतिशय महत्वाचे
आहे हे मला तुम्हाला आवर्जून सांगावेसे वाटते. या वर्षीच्या वन्यजीवन दिनाची संकल्पना “जंगलामधील व
त्याभोवतालची माणसे” अशी आहे तर जागतिक महिला दिनाची संकल्पना महिलांचे नेतृत्व
अशी आहे. वन्यजीवन दिनाच्या संकल्पनेबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जंगले
टिकवायची असतील तर जंगलांभोवती राहणाऱ्या लोकांची किंवा जंगलातील वसाहतींची भूमिका
अतिशय महत्त्वाची असेल याची आपण दखल घेतली आहे. वन्यजीवनाप्रमाणेच, महिलांचेही संवर्धन झाले
पाहिजे (म्हणजेच महिलांना शांतपणे, अभिमानाने व सन्मानाने जगता आले पाहिजे), तसेच
या पुरुषप्रधान जगामध्ये त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे, जी अनेकदा
दिली जात नाही. आपल्याला उशीरा का होईना परंतु वन्यजीवन व महिलांचे महत्त्व समजले
आहे याचा मला आनंद वाटतो.
आता वन्यजीवनाविषयी,
तसेच जंगले व महिलांभोवती असलेल्या लोकांविषयी बोलायचे तर तुम्ही म्हणाल की
सकृतदर्शनी या दोन्हींचा काय संबंध आहे किंवा या दोन्हीमध्ये काय दुवा आहे? आपल्याला वन्यजीवन वाचवायचे असेल तर महिलांनी नेतृत्वाची भूमिका (दिली नाही
तर) घेतली पाहिजे. कारण असे म्हणतात तुम्ही केवळ एका
पुरुषाला एखादी गोष्ट शिकवली तर केवळ त्याचाच विकास होतो, मात्र एका महिलेला एखादी गोष्ट
शिकवली तर संपूर्ण कुटुंबाची भरभराट होते आणि अशा अनेक कुटुंबानी वन्यजीवनाचे संवर्धन करावे असे आपल्याला वाटत असेल तर
महिलांनी इतर व्यवसाय व उद्योगांप्रमाणेच वन्यजीवनाच्या क्षेत्रातही नेतृत्व
स्वीकारण्याची वेळ आली आहे .
नेमक्या याच विचारातून
आम्ही दिलेले एक छोटेसे योगदान मला इथे सांगावेसे वाटते (माफ करा माझ्या वैयक्तिक
कामगिरीचा उदोउदो करण्यासाठी हा ब्लॉग नाही मात्र ही काही माझी कामगिरी नाही तर एक
लहानसा प्रयत्न आहे). आम्ही
सहा वर्षांपूर्वी बीएनसीए या पुण्यातील आघाडीच्या वास्तुरचना महाविद्यालयात वनजा
नावाने निसर्ग क्लब सुरू केला. महिला वास्तुविशारदांना वन्यजीवन व त्याचे
समाजासाठी महत्त्व समजावे हा त्याचा हेतू होता. कारण या
महिला भविष्यात विविध प्रकल्पांचे आराखडे तयार करतील व त्यांना वन्यजीवनाचे
संवर्धन कसे करायचे हे माहिती असेल तर त्यांनी उद्योग, शाळा, रिसॉर्ट किंवा एखादी
वसाहत कशाचाही आराखडा तयार केला तरीही वन्यजीवन हा त्यांच्या प्रकल्पाच्या रचनेचा
अविभाज्य भाग असेल याची खात्री करतील, या विचारातून आम्ही हा क्लब सुरू केला होता.
मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की सहा वर्षानंतर नेतृत्व करणाऱ्या महिला
वास्तुविशारदांची संख्या वाढलीय व त्या वन्यजीवप्रेमीही आहेत, यामुळेच कोणत्याही
प्रकल्पाचे नियोजन करताना खूप फरक पडतो. त्यानंतर आम्ही जंगल बेल्स या केवळ
महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या वन्यजीवन उपक्रमाचाही एक भाग आहोत, ज्यामध्ये
शहरातील महिलांना वन्यजीवनाची माहिती करून दिली जाते व त्यांना आपल्या जीवनाचा जंगलरूपी
अतिशय सुंदर पैलू उलगडून दाखवला जातो.
महिलांनी वन्यजीवनाकडे
अधिक सजगपणे पाहायला सुरुवात केल्यानंतर जर एखाद्या वास्तुविशारद महिलेने (वनजाद्वारे)
जंगलातील व जंगलाभोवतालच्या लोकांसाठी प्रकल्पाचा आराखडा तयार केला तर त्या
निश्चितच त्यामध्ये वन्यजीवनाचा समावेश करतील. तसेच जंगल बेल्सद्वारे वन्यजीवनाची
ओळख झालेल्या महिला जंगलात जातील, तेथील लोकांना भेटतील व तेथील लोकांच्या
कल्याणाचा विचार करतील. या उपक्रमांमुळे परिणाम असा झाला की
लॉकडॉउनच्या काळात वन्य पर्यटनाला मोठा फटका बसला अशा वेळी अनेक महिलांनी जंगलात व भोवताली राहणाऱ्या
लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी जंगल व वन्य पर्यटनावर अवलंबून असलेले
गावकरी, गाईड व संबंधित लोकांसाठी जंगल बेल्समार्फत कपडे तसेच धान्य पाठवून आपले
योगदान दिले. मला असे वाटते यामुळे वन्यजीवन व महिला हे
दोन्ही घटक एकत्र आले. वन्यजीवन दिवस हा जंगलातील व जंगलाभोवतालच्या लोकांना
समर्पित असेल तर महिला दिन हा महिला नेतृत्वाला समर्पित आहे. वनजा, जंगल बेल्स
यासारखे उपक्रम वन्यजीवन व महिला या दोन्ही घटकांना एकत्र आणून दोघांच्या
भल्यासाठी सोहार्दाने काम करण्याची संधी देत आहेत!
वन्यजीवन व महिला या
दोन्ही घटकांना सारखाच तर्क लागू होतो. तुम्हाला वन्यजीवन जगवायचे असेल (वाढवायचे असेल
किंवा त्याचे संवर्धन करायचे असेल) तर तुम्ही काय कराल, याचे सोपे उत्तर आहे वन्यजीवनाला
वाढण्यासाठी जागा द्याल, बरोबर? आता तुम्हाला हे पुणे,
मुंबई, बंगलोर किंवा चेन्नईसारख्या महानगरांमध्ये तुमच्या आलिशान घरात किंवा
काचेच्या उत्तुंग इमारतींमधील कार्यालयात बसून करता येईल का ज्याला आपण आपल्या
यशाचे प्रतीक मानतो? तर मित्रांनो याचे उत्तर आहे अजिबात
नाही, वन्यजीवनासाठी जागा लागते, ती जागा समुद्र, तलाव,
नद्या, झरे, डोंगर, जंगले, टेकड्या, गवताळ जमिनी व इतरही अनेक स्वरुपात असू शकते. अशा जागांशेजारी राहणारे लोक त्यावर अतिक्रमण
करत आहेत, ही त्यांचीही जमीन आहे मात्र आपल्याला ती वन्यजीवन संवर्धनासाठी हवी
आहे. म्हणूनच आपण जेव्हा वन्यजीवन संवर्धन करतो तेव्हा या लोकांच्या (माणसांच्या)
सुखसोयी व उपजीविका पणाला लागलेल्या असतात व वन्यजीवन जगविण्यासाठी आपण त्यांना
तेथून सरळ हाकलून देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे महिलांना
शांतपणे व आनंदात जगता यावे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण काय केले पाहिजे? वन्यजीवनाप्रमाणेच आपण महिलांना त्यांच्या हक्काची जागा दिली पाहिजे व
आपण हे कसे करू शकू तर त्यांना नेतृत्व देऊन. यामुळे त्या स्वतःला शांतता व आनंद
मिळेल असा जीवनाचा मार्ग शोधताना नेतृत्व करू शकतील.
मला तुम्हाला एक गोष्ट
आवर्जून सांगाविशी वाटते ती म्हणजे जेव्हा मनुष्य व वन्यजीवन यामध्ये मोठा संघर्ष
होतो तेव्हा त्यात दोन्ही बाजूंनी सर्वाधिक महिलाच भरडल्या जातात. उदाहरणार्थ अस्वल, वाघ
किंवा हत्तींच्या हल्ल्यामुळे इजा झालेल्या किंवा ठार झालेल्या माणसांची प्रकरणे
पाहिली तर त्यामध्ये बहुसंख्य महिलाच आहेत असे दिसून येते, ज्या पुरुषांच्या नजरा
चुकवत (ज्या वन्य पशुंपेक्षाही जास्त घातक असतात) प्रातर्विधी उरकण्यासाठी किंवा
स्वयंपाकाकरता लाकूडफाटा गोळा करण्यासाठी किंवा घरापासून अतिशय लांब असलेल्या
शाळेत जाणाऱ्या मुलाला सोडण्यासाठी किंवा गवत कापण्यासाठी घनदाट जंगलात गेल्या
होत्या व तिथे वाघासारख्या हिंस्र श्वापदाच्या शिकार झाल्या, यामध्ये त्यांची काहीही चूक नव्हती. त्याचवेळी
एखाद्या प्राण्याचा अनैसर्गिक मृत्यू होतो (माणसांमुळे) त्यात बहुतेक वेळा प्राणी ही एखादी आईच असते जी आपल्या बछड्यांचे
माणसांपासून किंवा दुसऱ्या नर वाघापासून संरक्षण करत असते किंवा शिकार करणे अवघड
असते तेव्हा आपल्या बछड्यांना काहीतरी खाऊ घालण्यासाठी बाहेर पडलेली असते. एखादी
वाघीण किंवा हत्तीण अशावेळी मानवी वस्तीत शिरतात व परिणामी त्यांचा मृत्यू होतो.
मित्रांनो, विरोधाभास
म्हणजे आपण स्वतःला प्रगल्भ किंवा विकसित समाज म्हणवतो तरीही आपल्याला वन्यजीवन व
महिला दिन साजरा करावा लागतो ज्या आपल्या जीवनचक्राचा आधार आहेत. आपल्याला अजूनही
जंगलाभोवती राहणाऱ्या लोकांची उपजीविका किंवा महिलांचे नेतृत्व यासारख्या
संकल्पनांचा प्रस्ताव द्यावा लागतो. जंगले स्वतःच्या भल्यासाठी काही करू शकत नाहीत
मात्र महिला निश्चितच करू शकतात. त्यांनी दोन्ही आघाड्यांवर म्हणजे वैयक्तिक
जीवनात तसेच वन्य जीवन संवर्धनाच्या बाबतीतही आघाडी घेतली पाहिजे, ही काळाची गरज
आहे. महिलांनी नेतृत्व करावे
अशी संकल्पना आपल्याला सुचवावी का लागते व महिला पुरुषांपेक्षा अधिक चांगल्या
नेतृत्व करू शकता हे त्यांना सांगावे का लागते किंवा त्याची जाणीव का करून द्यावी
लागते. महिलांनो केवळ मागणी करत बसण्यापेक्षा आता स्वतः हातात नियंत्रण घेण्याची व
ही शक्ती स्वतःसाठीच तसेच वन्यजीवनासाठी वापरण्याची वेळ आली आहे. काळजी व
सहानुभूती हे महिलांमधील अंगभूत गुण आहेत, असे असताना त्या निरागस वन्यजीवनाला
अपाय कसा होऊ देतील? त्यांनी वन्यजीवनाच्या बाबतीत नेतृत्व केल्यावर, त्या एखादे झाड असो, वाघ
किंवा पक्षी (मात्र महिलांनो साप व इतर सरपटणारे प्राणीही वन्यजीवनाचाच भाग आहेत
ज्यांचा बऱ्याच महिलांना तिटकारा वाटतो किंवा त्यांना हे प्राणी आवडत नाहीत,
अर्थात हा विनोदाचा भाग झाला) तसेच जंगलात राहणाऱ्या लोकांचा कुटुंबातील
सदस्याप्रमाणे विचार करतील व तो खरा महिला तसेच वन्यजीवनासाठी निश्चितपणे सुवर्ण दिन असेल!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment