“उंची, लांबी, वय यासारख्या आकडेवारीपेक्षाही मला जंगलाचे मंत्रमुग्ध करणारे सौंदर्य व सर्वत्र व्यापून राहिलेली निःशब्दता, नीरव शांतता, त्याचे थक्क करणारे व नतमस्तक व्हायला लावणारे रूप अधिक भावते.”... जॉर्ज मॅकडोनल्ड.
जॉर्ज मॅकडोनल्ड हे एक स्कॉटिश लेखक, कवी व ख्रिश्चन धर्मोपदेशक होते. ते आधुनिक काल्पनिक कथा व परिकथा साहित्याचे प्रणेते होते व अनेक समकालीन लेखकांचे मार्गदर्शक होते. मॅकडोनल्ड यांनी जंगलाचे ज्याप्रकारे वर्णन केले आहे ते पाहता कुणी परिकथा लेखकच जंगलांचे असे वर्णन करू शकेल यात शंका नाही. बहुतेक लोक जेव्हा जंगलांविषयी ऐकतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर हिरवीगार झाडे, झुडुपे, लता-वेली व सगळीकडे बहरलेली फुले, नीरव शांतता असे दृश्य डोळ्यासमोर येते. मात्र मला तुम्हाला सांगावेसे वाटते की सगळी जंगले सदाहरित, लतावेलींनी बहरलेली, धुक्याची चादर पांघरलेली, पाण्याची मुबलकता असलेली नसतात. काही जंगले पिवळी, करडी, अगदी काळीही असतात व तुम्हाला तिथे मैलोन मैल केवळ झुडपे किंवा गवताळ पट्टे दिसतात. मात्र तुम्ही विचार करता किंवा तुम्हाला माहिती असलेल्या इतर कोणत्याही जंगलाप्रमाणेच त्यातही खळखळते जीवन अस्तित्वात असते.
संपूर्ण मध्य भारताला निसर्ग देवतेचा वरदहस्त लाभलेला आहे, ज्यात अनेक गवताळ प्रदेश आहेत व दख्खनचे संपूर्ण पठार आहे जे पश्चिम घाटाच्या पायथ्यापासून ते देशाच्या अग्नेय बाजूपर्यंत पसरलेले आहे. पश्चिम घाटातील पर्वत रांगांमुळे यापैकी बहुतेक भाग हा पर्जन्य छायेच्या क्षेत्रात येतो. पर्जन्यछायेच्या प्रदेशामुळे म्हणजे अतिशय कमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रामुळे हे सर्व गवताळ प्रदेश तयार झाले आहेत. पुणे जिल्हा वन्यजीवनाच्या वसतिस्थानाच्या किंवा जंगलांच्या बाबतीत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण त्याच्या पश्चिमेला पश्चिम घाटातील घनदाट जंगल आहे, म्हणजे हिरवीगार झाडे-झुडुपे आहेत, नद्या, ओढे आहेत, जंगलांनी वेढलेले डोंगर आहेत, तर अग्नेयेला दुय्यम स्वरुपाचे गवताळ पट्टे आहेत जे विविध प्रकारच्या प्रजातींनी समृद्ध आहेत ज्या केवळ अशा वसतिस्थानांमध्येच जगू शकतात.
बहुतेक लोकांना (अगदी नियमितपणे जंगलात जाणाऱ्या लोकांनाही) गवताळ प्रदेशातील जंगले ही स्वतंत्र प्रकारची जंगले असतात हे माहिती नसते. या जंगलांमध्ये भारतीय लांडगा, बंगाल कोल्हा, वाळवीच्या वारुळातील लहान सरडा तसेच, बहिरी ससाणा, हॅरिअर, लहान पायांचा गरूड व इतरही अनेक पक्षी पाहायला मिळतात ज्यांना नामशेष होण्याचा धोका आहे. या प्रजातींना नामशेष होण्याचा धोका आहे कारण आपण (म्हणजेच माणसांनी) या गवताळ प्रदेशांवर आपल्या विविध गरजांसाठी केलेले अतिक्रमण. मग ते गुरे चारणे असो, घर बांधणे, शेती, उद्योग किंवा यापैकी कोणतीही कारणे नसली तर या गवताळ प्रदेशांबाबत असलेले अज्ञान यासाठी कारणीभूत ठरते. जेव्हा कधी “जंगल वाचवा” अशी घोषणा केली जाते तेव्हा त्याचा संदर्भ घनदाट झाडे, वेली, त्यामध्ये वाघ (बहुतेकवेळा) असा असतो व अशी वसतिस्थाने किंवा जमीनी किंवा प्रदेशांचे संवर्धन करण्यावरच पूर्णपणे लक्ष केंद्रित केले जाते. दुर्दैवाने (पूर्णपणे आदर राखून) वन विभागही (म्हणजे सरकारही) “जंगल वाचवा” मोहिमेच्या या चुकीच्या संकल्पनेला अपवाद नाही. म्हणूनच गवताळ प्रदेशातील जंगले लांडग्यांसारख्या प्रजातींसह अतिशय धोक्यात आली आहेत. आधीच वनविभागाकडे निधीचा अभाव असतो व त्यात व्याघ्र प्रकल्पातील संवेदनशील अशा कोअर क्षेत्रातील गावांचे स्थलांतर करणे ही सुद्धा एक मोठी समस्या असते. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील गवताळ प्रदेशातील जमीन अधिग्रहित करणे हे वन विभागासाठी जवळपास अशक्यप्राय काम आहे. त्याचशिवाय वन विभागाच्या निकृष्ट पायाभूत सुविधा तसेच इतर संबंधित विभागांचे वन्यजीवनाविषयी असलेले अज्ञान हा या संपूर्ण व्यवस्थेतील “कच्चा दुवा” आहे. या सर्व त्रुटी, ज्यातील काही खऱ्या आहेत तर काही जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या आहेत, गवताळ प्रदेशातील जंगलांच्या मुख्य शत्रू आहेत. हे गवताळ प्रदेश अनेक प्रजातींसह शेवटचा श्वास मोजत आहेत व केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण मध्य भारतात हीच परिस्थिती आहे.
मी यावर्षी मार्चमध्ये पुण्याजवळच्या पूर्व दक्षिण परिसरातील अशाच एका गवताळ पट्ट्याला भेट देण्याचा माझा अनुभव सांगतो. हा भाग पुण्यापासून केवळ ७० किलोमीटर अंतरावर आहे, तिथे घालवलेल्या सहा तासांमध्ये मला चक्क एक लांडगा दिसला जो अन्नासाठी भटकत होता. एक कोल्हा दिसला व एक कोल्हीण तिच्या पिल्लांसह दिसली, काही सरपटणारे प्राणी दिसले, माँटेग हॅरियर (ते बरेच दिसले), अखुड पायांचे गरूड व इतरही बरेच प्राणी व पक्षी दिसले. आम्हाला तिथे एका बंगाल कोल्ह्याची पिल्ले बिळात दिसली, तिथून जेमतेम १०० मीटरवर गाईगुरे चरत होती. मी तिथे एका लांडग्याची छायाचित्रे घेतली, तेथून केवळ ३०० मीटर अंतरावर एक जेसीबी यंत्र भूखंड बांधकामाला
तयार करण्यासाठी जमीन साफ करत होते. रात्री आम्ही त्या गवताळ प्रदेशाचा फेरफटका मारला कारण तिथे तरस भटकत असतात. मला तिथे एक रबराचा कारखाना दिसला, जो दिव्याच्या प्रकाशात उजळून निघाला होता, तो गेल्यावर्षीच सुरू झाल्याची माहिती टूर संचालकाने दिली. तिथून थोडेसे पुढे गवताळ प्रदेशाच्या जवळपास एक किलोमीटरच्या पट्ट्यात तारेचे कुंपण घालून, या संपूर्ण पट्ट्यातील जनावरांचा मार्ग रोखण्यात आला होता. या सर्व गवताळ पट्ट्यांवर खाजगी मालकी आहे हे मला समजते (स्वतः एक बांधकाम व्यावसायिक व स्थापत्य अभियंता असल्यामुळे) व कायदेशीरपणे सदर जमीनीच्या मालकांना त्यांना वारशाने मिळालेल्या जमीनींच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याचा अधिकार आहे. मात्र या जमीनी जितकी वर्षं त्यांच्या मालकीच्या आहेत तितकीच वर्षं (किंवा त्याहूनही अधिक वर्षं), त्यावर लांडगे, कोल्हे व तरसही राहात आहेत, बरोबर? बहुतेक लोक माझ्या तर्कावर हसतील व मला अतिरेकी वन्यजीवप्रेमी म्हणतील, मात्र यामुळे सत्य बदलणार नाही. माझे असे म्हणणे नाही की या जमीन मालकाचा तोटा करून हा गवताळ प्रदेश इतर प्राण्यांना द्या, मात्र आपण एखादा मधला मार्ग काढू शकत नाही का असे मला विचारावेसे वाटते, सरकार त्याचसाठी असते नाही का?
हे गवताळ प्रदेश वाचवण्याचा उपाय द्विस्तरीय किंवा त्रिस्तरीय आहे, एक म्हणजे हळूहळू अर्थसंकल्पातील तरतूद वाढवणे व हे गवताळ प्रदेश सर्व प्रजातींसाठी योग्य मोबदला देऊन अधिग्रहित करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. तो सोपा नाही परंतु आपण दीर्घकालीन उपाय म्हणून त्याचा विचार करू शकतो, तोपर्यंत या जागेवर
कारखाने तरी नको येऊ देऊ! . दुसरी गोष्ट म्हणजे, या गवताळ पट्ट्यांभोवती असलेल्या स्थानिकांना (तेथील जमीन मालकांसह) या भागांचे संरक्षक म्हणून सहभागी करून घ्या. त्यांना जाणीव करून द्या की हा एक उत्पन्नाचा उत्तम स्रोत होऊ शकतो. कारण वन्यजीव पर्यटन म्हणजे केवळ वाघ किंवा बिबट्याच नाही याची लोकांना एव्हाना जाणीव झालेली आहे व त्यांना अशा ठिकाणांना भेट द्यायला आवडते. ज्या पर्यटकांनी अशा गवताळ प्रदेशांना भेट दिली आहे त्यांना या प्रदेशांना असलेल्या धोक्याची जाणीव होईल व ते आपल्यापरीने योगदान देण्याचा प्रयत्न करतील. मग ते इथे पैसे खर्च करणे असो किंवा अशा भागांबाबात जागरुकता निर्माण करणे असो, अशा विविध मार्गांनी या भागाचे संवर्धन करतील. हे होईपर्यंत किमान काही कर्मचारी या गवताळ प्रदेशांमध्ये व त्याच्या आजूबाजूला तेथील वन्यजीवन सुरक्षित ठेवण्यासाठी तैनात करा, ज्यांच्यांवर पाळीव प्राणी व माणसांकडून हल्ला होण्याचा गंभीर धोका आहे. उदाहरणार्थ घोरपड व ससे अशा गवताळ पट्ट्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात त्यांची विक्री करण्यासाठी व खाण्यासाठी शिकार केली जाते, हे केवळ एक उदाहरण झाले. कुणीही लांडग्याची किंवा कोल्ह्याची विक्री किंवा खाण्यासाठी शिकार करत नाही हे मान्य असले तरीही मात्र तुम्ही सरसकट सगळ्या गवताला आग लावली (शेतातील जमीनीचा कस वाढविण्यासाठी तिची भाजवण करण्याची पद्धत आहे) किंवा , लांडगे व कोल्हे ज्या भक्ष्यावर जगतात त्या प्रत्येक प्रजातीला मारून टाकले, तर त्यांचे शेवटी काय होईल असे तुम्हाला वाटते?
मित्रांनो, जमिनीवरील गवताला आग
लावून काळ्या ठिक्कर पडलेल्या गवताळ प्रदेशात अन्नासाठी दाहीदिशा भटकणारा, माझ्या कॅमेऱ्याकडे पाहणारा एकाकी लांडगा,
व मागे उरलेसुरले गवतही उपटून टाकणारे जेसीबी यंत्र, हे दृश्य मला जागेपणीही पछाडते; तो लांडगा जणूकाही मला प्रश्न विचारत असतो “बघ माझ्या घराची तू काय दशा करून टाकली आहेस, मी तुझ्या घराची अशीच नासधूस केली तर तुला कसे वाटेल”! मी फक्त माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून त्या लांडग्याला एक आश्वासन दिले, “तू एकटा नाहीस, थोडीशी आशा बाळग, मी तुझ्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन”!
शेवटी आशेवरच जग जिवंत आहे ना !
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment