“आपल्या सगळ्यांना वन्यजीवन नावाचा प्राणवायू हवा असतो...त्याचवेळी आपण वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला व शिकायलाही उत्सुक असतो, आपल्याला सर्व गोष्टी गूढ व अनपेक्षित पहाव्यात असे वाटते, जमीन व समुद्र नेहमी वन्य, अगम्य व अथांग असावा अशी आपली इच्छा असते. कारण आपण निसर्गाला जेवढे अनुभवू तेवढे कमीच असते.”... हेन्री डेव्हिड थोरो
हेन्री डेव्हिड थोरो हे अमेरिकी निसर्गतज्ञ, निबंधलेखक, कवी व तत्ववेत्ता होते. आपण वन्यजीवन आवर्जून अनुभवायची गरज का आहे हे सांगताना त्यांचे निसर्गतज्ञ व तत्ववेत्ता हे दोन्ही गुण आपल्या दिसून येतात. तुम्ही जेव्हा जंगलात असता तेव्हा तुम्ही तथाकथित विकसित शहरी जीवनात करिअर किंवा यशाच्या (तुम्ही कशाच्या मागे आहात याने काही फरक पडत नाही) मागे धावताना कशाला मुकत आहात याची तुम्हाला जाणीव होते! मी असे वन्यजीवन अनुभवण्यासाठी जेव्हा कोणत्याही जंगलाला भेट दिली तेव्हा त्याविषयी लेख लिहीताना असे शब्द माझ्या मदतीला धावून आले. जेव्हा जंगलातील माझे अविस्मरणीय अनुभव मांडताना माझे शब्द अपुरे पडतात तेव्हा थोरोंसारख्या अनेक जाणकारांचे शब्द माझ्या मदतीला धावून येतात याचा मला अतिशय आनंद वाटतो.
माझी नुकतीच झालेली ताडोबाची सफरही याला अपवाद नव्हती कारण माझ्यासोबत आंतरराष्ट्रीय कीर्तीचा छायाचित्रकार आणि माझा मित्र विक्रम पोतदार होता. ही सफरही अतिशय रोमांचक असणार होती कारण वर्षभराच्या लॉकडाउननंतर आम्ही बरेच दिवसांनी जंगलात जात होतो (म्हणजेच विशेषतः छायाचित्रे काढण्यासाठी व भटकंतीसाठी). त्यातही हे ठिकाण ताडोबा होते, जिथे प्रत्येक क्षणाला काहीना काही घडामोड होत असते, केवळ तुम्हाला संयम ठेवावा लागतो व भोवतालच्या हिरव्या पिवळ्या व करड्या रंगछटांमध्ये मिसळून जावे लागते. आमच्यासोबत अनिरुद्धी चाओजींसारखा आणखी एक उमदा मित्रही होता ज्याची नियुक्ती आता ताडोबात झालेली आहे व तो ताडोबा जंगलाभोवती ज्याला आपण बफऱ क्षेत्र म्हणतो, त्यात राहणाऱ्या लोकांच्या वेलफेअरसाठी व या ताडोबा जंगलाच्या ब्रँडिगसाठी काम करत आहे. तुमच्या शहरी जीवनातील सुखसोयी सोडून एखाद्या गोष्टीचे वेड घेऊन जंगलात जाऊन तिथल्या लोकांसोबत राहण्यासाठी वेडेपणाच हवा व त्यासाठी अनिरुद्धसारख्या लोकांचे आभार! खरंतर आमची सफर केवळ वन्यजीवनाविषयी नव्हती तर ताडोबाचा अविभाज्य भाग असलेल्या अशा अनेक लोकांविषयीही होती. ही सफर जवळपास महिना-दोन महिने आधी नियोजित करण्यात आली होती तरीही ज्या विदर्भ परिसरात ताडोबा येते त्यावरही लॉकडाउनची टांगती तलवार होती. तरीही आम्ही ९०० किलोमीटर लांब गाडी चालवत जाण्याचा पर्याय निवडला व शहरी वस्तीपासून दूर रस्त्याच्या कडेला असलेल्या लहान ढाब्यांवर थांबत, पुण्याहून सलग पंधरा तासांचा प्रवास केला. सुदैवाने रस्ते चांगल्या स्थितीत आहेत, जालना, सिंदखेडराजा, मेहकर व यवतमाळ बाह्यवळण मार्गाने आम्ही वरोरामार्गे थेट मोहार्लीपर्यंत म्हणजे ताडोबाच्या प्रवेशद्वारापर्यंत पुण्याहून पंधरा तासात पोहोचलो.
जंगलात जाण्याची सर्वोत्तम बाब म्हणजे, तुम्ही जेव्हा हिरव्या, पिवळ्या, करड्या (विशेषतः ताडोबाच्या बाबतीत) रंगछटांच्या सान्निध्यात असता, शेकडो झाडे, प्राणी व पक्षांचा गंध मिसळलेल्या शुद्ध हवेत श्वास घेत असता, तेव्हा तुमच्या इतक्या तासांच्या प्रवासाचा शीण क्षणार्धात विरून जातो व तुम्ही पुढील घडामोडींसाठी एकदम ताजेतवाने होता व जंगल ताडोबा आहे म्हटल्यावर अनेक घडामोडी घडणार असतात! आम्हाला आठ सफारी करायच्या होता (त्यात रात्र सफारीही होती), मात्र आम्ही थकलेलो नव्हतो तर दुसरा दिवस कधी एकदा उजाडतोय व आम्ही पहाटे ६ वाजता प्रवेशद्वारापाशी येतोय याची उत्सुकता होती. एक चांगला बदल झालाय तो म्हणजे प्रवेशद्वारापाशी तपासणी यंत्रणा बरीच सुरळीत झालीय ज्यामुळे पर्यटकांची ओळख पटविण्यासाठी बराच कमी वेळ लागतो. मात्र मला एक गोष्ट आत्तापर्यंत कधीच समजलेली नाही ती म्हणजे पर्यटकांच्या नावात बदल असेल तर त्यावरून एवढा गहजब करायची काय गरज आहे, कारण तुम्हाला कित्येक महिने आधी सफारीचे आरक्षण करावे लागते, त्यामुळे साहजिकच काही सदस्य ऐनवेळी सफारीला येऊ शकत नाहीत अशावेळी पैसे वाया जाण्याऐवजी (ताडोबाही आता अजिबात स्वस्त राहिलेले नाही), जर दुसरी एखादी व्यक्ती यायला तयार असेल तर त्याला ताडोबा उद्यानाच्या नियमांनुसार परवानगी नाही. लोकहो, यावर काहीतरी तोडगा काढायला हवा, कारण इथे तुम्ही अगदी ल़ॉकडाउनमुळे सफारीला येऊ शकला नाहीत तरीही पैसे परत मिळण्याचा किंवा तारखा बदलून मिळण्याचाही काही पर्याय नाही. उद्यानाचे व्यवस्थापन काही पर्यटक न आल्यामुळे अशा रिक्त झालेल्या वेळेमध्ये इतरांसाठी जिप्सी पाठवून पैसे कमवत असताना, ज्यांनी सफारी रद्द केली त्यांना पैसे परत द्यायला काय हरकत आहे किंवा त्यांना दुसरी उपलब्ध वेळ द्यायला काय हरकत आहे? आपल्याला जंगलाची प्रसिद्धी करायची आहे, अशावेळी आपले नियम पर्यटक-स्नेही नाहीत अशी आपली ओळख झाली तर हे साध्य होणार नाही असे मला वाटते. त्याचप्रमाणे हा काळ सगळ्यांसाठीच कठीण आहे, अशावेळी पैसे परत न मिळता सफारी रद्द झाल्यामुळे बहुतेक पर्यटकांच्या खिशाला कात्री बसते. मला अशी आशा वाटते की हे शब्द कुणा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतील व त्यावर काहीतरी तोडगा काढला जाईल.
या सफारीचा सर्वोत्तम भाग म्हणजे जंगलातील लोकांशी संवाद साधता आला, या लोकांमुळे आपल्याला या हिरवाईविषयी अनेक गोष्टी समजतात. या लोकांमध्ये गाईड, चालक, वन रक्षक, ढाबेवाले, रिसॉर्टवर काम करणारी मुले व तसेच अनिरुद्धसारख्या मित्रांचाही समावेश होता. आपण पर्यटक म्हणून या जंगलांना एकदा किंवा दोनदा भेट देतो मात्र हे लोक वर्षभर इथेच राहतात. त्यांच्याकडे वर्षानुवर्षे इथे राहिल्यामुळे जंगल, प्राणी, पक्षी व इथल्या लोकांविषयीही गोष्टींचा खजिनाच असतो. केवळ त्यांच्या गोष्टी ऐकून (अर्थात मी फार चांगला श्रोता
नाहीच ) तुम्ही जंगल अधिक चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकता. तसेच तुम्ही अनेक गोष्टी पाहू लागता ज्याकडे एरवी तुमचे लक्षही गेले नसते, जंगलामध्ये ऐकणे व वास घेणे या संवेदनांविषयही असेच म्हणता येईल. अशाच एका सफारीमध्ये आमचा गाईड मंगम जो अगरझरी गावात राहतो (बहुतेक गाईड व जिप्सी चालक जंगलाभोवतालच्या गावांमधील आहेत), आम्हाला त्याची जमात कशाप्रकारे जंगलाची पूजा करते हे सांगत होता. त्यांचा मुख्य देव बडा देव हा महुआच्या झाडावर राहतो ज्याला ते पवित्र मानतात व वाघालाही ते देव मानतात हे वेगळे सांगायला नको. त्यानंतर एका गाईडने एका प्रसिद्ध वाघाची गोष्ट सांगितली ज्याचे टोपणनाव बाघडोह होते (वन्यप्रेमींनो मला माफ करा, वाघाविषयी बोलताना मला त्याचा क्रमांक आठवणे अवघड आहे), त्याने एका अस्वलासोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेल्या सोनम नावाच्या वाघिणीला बरे व्हायला कशी मदत केली. बाघडोह हा सोनम वाघिणीचा पिताही आहे व त्याने एका मोठ्या देशी बैलाचीही शिकार केली कारण सोनमच्या डोक्याला गंभीर इजा झाली असल्यामुळे तिला जखम चाटताही येत नव्हती व शिकारही करता येत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये (इजा झाल्यावर) इजा झालेल्या वाघाचा मृत्यू अटळ असतो कारण तुम्ही वाघ असल्यामुळे, तुम्ही अडचणीत असल्यावर तुमच्या मदतीला कुणी येत नाही, हा वाघ असण्याचा एक शाप आहे. मात्र निसर्ग मोठा विलक्षण आहे व दुसरे कुणी नाही तर एक वाघच सोनमच्या मदतीला आला व तिच्या जखमा चाटून त्या भरून यायला मदत केली व तिच्यासाठी शिकार करून तिला दिली. हे खरे किंवा खोटे हे मला माहिती नाही परंतु जंगलात खरोखरच अशा आश्चर्यकारक गोष्टी ऐकायला मिळतात.
अशा गप्पागोष्टींमधूनच मला ताडोबाविषयी एक उल्लेखनीय बाब समजली ती म्हणजे बफर क्षेत्राचा विस्तार जवळ ११०० चौरस किलोमीटरचा आहे ज्यामध्ये सुमारे ७५ गावांचा समावेश होतो व दीड लाखांची (१,५०,०००) वस्ती आहे. या भागात जवळपास शंभरएक वाघ मुक्तपणे वावरत असतात, मात्र इथे २०१२ पासून एकही अवैध शिकार झालेली नाही (वाघाचा अपघाती किंवा मानवी हस्तक्षेपामुळे मृत्यू उदा. वीज प्रवाह सोडलेले कुंपण किंवा तारांमुळे विजेचा धक्का बसणे हे वगळता). त्याचवेळी वाघाच्या हल्ल्यामुळे दरवर्षी साधारण वीसएक माणसांचे मृत्यू होतात, तरीही कुणीही स्थानिक रहिवासी उघडपणे वाघाला शत्रू मानत नाही, हे ऐकून आश्चर्य वाटते ना? माणूस व प्राण्यांच्या सहजीवनाचे हे उत्तम उदाहरण आहे मात्र मला तुम्हाला आवर्जून सांगावावेसे वाटते की हे सोपे नाही तसेच एका रात्रीतही साध्य झालेले नाही. वन विभाग, स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक गावकऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे हे साध्य झाले आहे. म्हणूनच जगभरात सगळीकडे वन्यजीवन धोक्यात असताना, ताडोबामध्ये मात्र वाघांची संख्या वाढत आहे व हे निरोगी वनजीवनाचे लक्षण आहे. ही सुरुवात असली तरी, माणूस तसेच वाघ (म्हणजेच वन्यजीवन) या दोघांचीही लोकसंख्या वाढत जाईल तसेच त्यांच्यापुढील आव्हानेही वाढत जातील व आपण त्यासाठी सज्ज असले पाहिजे. काही वर्षांपूर्वीपर्यंत गावकरी शौचासाठी उघड्यावर जात असत त्यामुळे ताडोबाच्या जंगलात स्वच्छतेची मोठी समस्या होती, तसेच अशाच वेळी वाघ किंवा बिबटे गावकऱ्यांवर हल्ला करत असत. आता बहुतेक घरांमध्ये शौचालये बांधण्यात आल्याने ही समस्या बरीच कमी झाली असली तरीही पाणी व जैवकचऱ्यावर (मानवी विष्ठा) प्रक्रियेची समस्या अजूनही आहे यामुळे काही गावकरी अजूनही उघड्यावरच शौचाला जातात, मुधोळी गावही त्यापैकीच एक आहे. आपण या समस्येवर तोडगा काढला पाहिजे. त्याचप्रमाणे या भागात पैसा आल्यामुळे गावांमध्ये पाकिटबंद वस्तूही येऊ लागल्या आहेत त्यामुळे होणारा कचराही वाढू लागला आहे व निसर्गासाठी ही खूप मोठी समस्या आहे. आपण गावकऱ्यांना कोरड्या व ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण तसेच कचऱ्यावर प्रक्रियेचे तंत्रज्ञान याविषयी शिकवणे आवश्यक आहे. आपण आजूबाजूच्या शहरांमधील कचरा घेऊन जाणाऱ्या कंत्राटदारांची मदत घेऊ शकतो व तो त्यांना घेऊन जायला सांगू शकतो.
त्याचप्रमाणे आता बऱ्याच घरांमध्ये गॅसच्या शेगड्या आल्या आहेत, पूर्वी गावकऱ्यांना लाकूडफाटा गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागे त्यामुळे त्यांना (विशेषतः महिलांना) वाघाच्या संपर्कात येण्याचा धोका असे, मनुष्य व प्राण्यांमध्ये संघर्ष होण्याचे तेही एक मोठे कारण होते, मात्र आता त्यांना त्याची गरज पडत नाही. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे (ज्यासाठी मी वन विभागाला मदत करणार आहे) स्थानिक युवकांमध्ये कौशल्य विकास. आपल्याला त्यांना प्लंबिंग/विद्युत उपकरणांची दुरुस्ती, गवंडी काम यासारखी बांधकामाशी संबंधित कामे, सौर उर्जेच्या उपकरणांची दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन या सर्व बाबींचे प्रशिक्षण द्यावे लागेल, म्हणजे ते जंगलांवर केवळ गाईड किंवा जिप्सी चालक म्हणून अवलंबून नसतील तर त्यांना त्यांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी इतर व्यवसायांचाही आधार असेल. एक लक्षात ठेवा आपण जंगलाभोवती राहणाऱ्या लोकांशी वैर पत्करून किंवा केवळ त्यांना त्यांच्या जमीनींवरून हुसकावून लावून व त्या जमीनी जंगलासाठी वापरून जंगलांचे संरक्षण करू शकत नाही.
आपला असा समज असेल की केवळ माणूसच वन्यजीवनाचा शत्रू आहे, तर असे नाही ताडोबाला निसर्गाकडूनही धोका आहे. ताडोबाचे एक चतुर्थांश क्षेत्र बांबूच्या जंगलांनी व्यापलेले आहे व दर तीस वर्षांनी बांबूला पुष्प व फलधारणा होते व त्यानंतर तो मृत होतो. मृत होतो म्हणजे तो वाळतो व उन्मळून पडतो व उन्हाळ्यामध्ये पारा ४५ अंशांवर गेल्यानंतर हे वाळलेल्या बांबूंचे पट्टे नॅपलम बाँबसारखे असतात, ज्यांचा कधीही स्फोट होऊ शकतो. बांबूची बेटे दिसायला अतिशय सुंदर असतात तसेच ती ताडोबाचा जीवही आहेत मात्र ती ताडोबासाठी जीवघेणीही ठरू शकतात. बांबूच्या बऱ्याच बेटांची पुष्पधारणा होत असल्याने, ताडोबा व्यवस्थापन कामाला लागले आहे व जंगलात वणवा पेटू नये यासाठी दुसरी लागवड करण्याची तयारी करत आहे. यासाठी द्रोणद्वारे सर्वेक्षण तसेच तांत्रिक बाबी यासंदर्भात आपल्यापैकी प्रत्येक जण वन विभागाला मदत करू शकतो.
ताडोबातल्या सफारीविषयी सांगायचे तर इथे माझी (व प्रत्येकाचीच) इच्छा नेहमीच पूर्ण होते व ही सफारीही त्याला अपवाद नव्हती. घनदाट झाडी असलेल्या डोंगरांच्या पार्श्वभूमीवर विस्तीर्ण कुरणामध्ये मला एक नर वाघ पाहायला मिळाला व ताडोबामध्ये माझ्या अनेक इच्छांमधील या इच्छेची पूर्तता झाली. सकाळच्या सफारीमध्ये या गवताच्या पट्ट्यामध्ये आमच्या पुढे आणखी एक जिप्सी आम्हाला दिसली ज्यातील लोक आमच्याकडे पाहून हात हलवत होते, जंगलामध्ये याचा केवळ एकच अर्थ होतो की तिथे वाघ आहे! तो एकतर्फी मार्ग होता त्यामुळे ती जिप्सी वाघाच्या आणि
आमच्या मधे येऊ शकली नाही व पाश्चिमात्य काऊ-बॉय चित्रपटांप्रमाणे, समोरील लाल मातीच्या वाटेवर लांबवरून मला एक लहानसा ठिपका आमच्या दिशेने येत असलेला दिसला. हळूहळू तो ठिपका आकाराने मोठा होत गेला व त्याने धिप्पाड नर वाघाचा आकार घेतला. ते दृश्य पाहून माझ्या अंगावर आलेले शहारे मला आजही जाणवताहेत. ते दृश्य दीर्घकाळ माझ्या स्मरणात राहील! या मंत्रमुग्ध करणाऱ्या ताडोबाला पुन्हा भेट देण्याचे, पुन्हा एकदा अविस्मरणीय अनुभव घेण्याचे वचन देऊन, मी या बांबूच्या वनांचा, लाल मातीच्या वाटांचा निरोप घेतला...
खाली दिलेल्या लिंकवर मी काढलेली काही छायाचित्रे दिली आहेत, ती आवर्जून पाहा व तुम्हीही ती पाहून मंत्रमुग्ध झाल्यास आवर्जून शेअर करा...
https://www.flickr.com/photos/65629150@N06/albums/72157718447472402
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment