Thursday, 29 June 2023

महेंद्रसिंग धोनी , न संपणारी गोष्ट !


















सर्वोत्तम नेता तोच असतो ज्याच्या अस्तित्वाची लोकांना फारशी जाणीवही नसते, जेव्हा त्याचे काम पूर्ण होते, त्याचे उद्दिष्ट पूर्ण होते, तेव्हा लोक म्हणतात: हे आम्हीच केले” … लाओ त्झू

मला माझ्या चुकासुद्धा परत करायला आवडतात …  एम.एस. धोनी

 

जडेजाने चेंडू लेग साईडला फटकावला व तो फाईन लेगवरील क्षेत्ररक्षकाला ओलांडून सीमारेषेच्या दोरीला स्पर्श करण्यापूर्वीच, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पिवळ्या रंगात न्हायलेल्या जनसागराने एकच जल्लोष केला, समालोचकही अतिशय उत्साहात जाहीर करत होतो, आयपीएल २०२३ चे (माफ करा टाटा आयपीएलचे) विजेते आहेत, चेन्नई सुपर किंग्ज! महेंद्र सिंह धोनीने विक्रमी पाचव्यांदा ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली ! खरेतर, संपूर्ण सामन्यात, शुभमन गिलला यष्टीचीत केले ते वगळता (त्याविषयी नंतर बोलेन), खेळाडू फलंदाज म्हणून धोनी अपयशी ठरला  होता व जडेजाच्या खेळीमुळे व उर्वरित खेळाडूंनी काही जोरदार फटके मारल्यामुळे विजय शक्य झाला, परंतु तरीही प्रत्येकाच्या तोंडी एकच जयघोष होता, एमएसडीहीच जादू आहे, कारण पुन्हा एकदा युद्धामध्ये शस्त्र नव्हे तर ती शस्त्रे कुणाच्या हातात असतात हे महत्त्वाचे असते हे सिद्ध झाले आहे. एमएसडीच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ज्यांच्या हातात ती शस्त्रे असतात त्या हातांमुळे नव्हे तर सेनापतीच्या बुद्धिमत्तेमुळे त्या हातांमध्ये ती शस्त्रे वापरण्याचे सामर्थ्य आल्याने युद्धात विजय होतो, म्हणूनच धोनी केवळ विशेष नाही तर अतिशय विशेष आहे.

मला माहिती आहे हा केवळ एक आयपीएल चषक आहे व करोडो भारतीय क्रिकेटच्या खेळावर प्रेम करत असतील, तर तितक्याच लोकांना हा खेळ अजिबात आवडत नाही किंवा हा खेळ पाहात नाहीत हेदेखील खरे आहे. परंतु ज्याप्रमाणे अनेक लोक राजकारणाचा (राजकीय पद्धतीचाही) तिरस्कार करतात परंतु त्यांना श्री. मोदींविषयी प्रेम व किंवा आदर वाटतो (दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या बाबतीतही असेच होते), धोनीच्या वैयक्तिक प्रतिमेचा (तुम्ही त्याला ब्रँड म्हणा) विचार केला तर त्याचेही असेच आहे, म्हणूनच धोनी विशेष आहे. आपण सगळे त्याची लोकप्रियता जाणतो व जे क्रिकेट पाहतात त्यांनी सीएसकेचे सर्व सामने पाहिले असतील व जे क्रिकेट पाहात नाहीत, त्याची आकडेवारी जाणून घेण्यात रस नाही त्यांच्यासाठी मी हा भाग वगळतो व थेट या लेखाचे प्रयोजन सांगतो. धोनी किती महान आहे किंवा त्याने केलेले विक्रम किंवा ज्या विक्रमांमध्ये तो सहभागी होता हे सांगण्यासाठी हा लेख नाही तर तो इतका विशेष व महान का आहे याविषयी आहे. अर्थात याविषयीही बरेच बोलले गेले आहे, बऱ्याच मंचांवर लिहीले गेले आहे. परंतु कोणत्याही यशोगाथेचे अनेक पैलू असतात व कोणत्या पैलूमुळे एखाद्याला एखादी गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे समजेल किंवा सहजपणे समजेल म्हणजे कुणीतरी, कुठेतरी या मार्गाने यशस्वी होऊ शकतो हे सांगता येत नाही, म्हणूनच हा लेखप्रपंच. मी चार गोष्टींचा निस्सीम चाहता आहे (किंवा प्रेक्षक) आहे ते म्हणजे, चित्रपट, सुपर हिरो, ॲनिमेशन व खेळ, त्यातही सांघिक खेळ अधिक, कारण वैयक्तिक खेळ रोचक असतात परंतु त्यांच्यासाठी नेतृत्वाची गरज नसते किंवा ते नेतृत्व निर्माण करत नाहीत. आपल्याला समाज म्हणून जेव्हा वाढायचे असते किंवा प्रगती हवी असते तेव्हा आपल्याला नेत्यांचीच गरज असते, म्हणूनच सांघिक खेळ महत्त्वाचे असतात कारण त्यातून आपल्याला नेतृत्व मिळते. टेनिसचेच उदाहरण घ्या, मला तो खेळ अतिशय आवडतो त्यामध्ये फेडरर, ज्योकोविच, नदाल यासारखे महान खेळाडू आहेत, बॅडमिंटनही आवडते ज्यामध्ये आपल्या सिंधू व सायना आहेत तसेच लिन डॅनसारखे महान खेळाडूही आहेत, त्यांचे लाखो चहाते आहेत व ते अतिशय उत्तम खेळाडू आहेत. तरीही ते त्यांच्या कोर्टवर जे काही करतात ते त्यांचे वैयक्तिक कौशल्य असते, परंतु क्रिकेटसारखा खेळ (तो केवळ दहा किंवा बारा देशांमध्ये खेळला जात असला तरीही) कोणत्याही सामन्यामध्ये एखाद्या सैन्याचे संचालन करण्याप्रमाणे असतो, यासाठी उत्तम नेतृत्वाची गरज असते तरच सैन्याचा विजय होऊ शकतो किंवा सातत्याने नेत्रदीपक कामगिरी करता येऊ शकते.

जर असे असेल तर मग आकडेवारीही महत्त्वाची आहे, मुंबई इंडियन्सनेही आयपीएल पाचवेळा जिंकली व धोनीच्या आधी, रोहित शर्मा जो सध्याच्या भारतीय संघाचा कप्तान आहे त्यानेही हे करून दाखवले आहे, तरीही धोनी महान आहे असे लोकांना का वाटते, म्हणूनच हा लेख लिहीत आहे. काही जणांची कामगिरी किंवा व्यक्तीमत्व तुम्ही आकडेवारी किंवा विक्रमांमध्ये बांधू शकत नाही, विशेषतः जेव्हा ते कप्तानाच्या भूमिकेत असतात, त्यामुळेच मी क्रिकेट पाहायला (खरेतर ऐकायला हा शब्द योग्य होईल कारण ७०/८०च्या दशकात आमच्याकडे टीव्ही नव्हता) सुरुवात केली, तो गावस्कर व कपील देवचा काळ होता. वैयक्तिक खेळाडू म्हणून ज्यांचे योगदान मोठे आहे अशा महान खेळाडूंची नावे तुम्ही पाहिली तर बेदींपासून कपील देवपर्यंत, ते तेंडुलकर व द्रविड, ते सध्याच्या विराट कोहलीपर्यंत, आपल्याकडे क्रिकेटमध्ये अशी अनेक नावे आहेत व लोकप्रियतेविषयी बोलायचे तर दोन दशकांहून अधिक काळ या देशासाठी तेंडुलकर हा देव आहे, गावस्करही होता, वैयक्तिक खेळाडू म्हणून आकडेवारीमध्ये या सगळ्या खेळाडूंपेक्षा मागे असूनही धोनी या सगळ्यांच्या वरचढ आहे (कुणालाही दुखवायचा हेतू नाही), म्हणूनच हा लेख. मी तुम्हाला अगदी या आयपीएलमधली धोनीची एखादी विशेष खेळी आठवतेय का असे विचारल्यावर तुम्हाला फारसे काही आठवणार नाही व तरीही हे आयपीएल धोनीचे आयपीएल म्हणून ओळखले जाईल हे नक्की. ही विशेष कामगिरी वर नाव नमूद केलेल्यांपैकी कुणालाही साध्य करणे शक्य झाले नाही. काही जण म्हणतील की हे समाज माध्यमांचे युग आहे व खेळाचे व्यावसायिक पैलूही असतात. काही बाबतीत ते खरे आहे परंतु गावस्करच्या रुपाने जाहिरांतीचा पैसा क्रिकेटमध्ये आला जेव्हा त्याने सियारामची जाहिरात केली व माझी पिढी कपील पाजींची, पामोलिव्ह दा जवाब नही ही शेव्हिंग क्रिमची जाहीरात कशी विसरू शकेल. त्यामुळे व्यवसाय हा बऱ्याच हा काळापासून भारतीय क्रिकेटचा अविभाज्य भाग राहिला आहे व केवळ त्या पैलूमुळे तुम्ही लोकांच्या विस्मरणात जाण्यापासून वाचू शकत नाही. किंबहुना जाहिरातींचे जग हे अतिशय निष्ठूर आहे, ते केवळ कामगिरीच्या मागे धावते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दोन वर्षांपूर्वीच निवृत्ती घेऊनही त्याची जादू कायम आहे, या जादूचे विश्लेषण करण्यासाठी, माझा हा लेख आहे.

आता पुन्हा आयपीएल २३ विषयी बोलू, अनेक जण आयपीएलचा तिरस्कार करतात तरीही ते जगभरात सर्वाधिक पैसे मिळवणारे लोकप्रिय साखळी सामने आहेत या वस्तुस्थितीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याने हजारो तरुण खेळाडूंना एका मोठ्या व्यासपीठावर येण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, जे पूर्वी शक्य नव्हते. फुटबॉलपासून टेनिसमध्ये अनेक खाजगी क्रीडास्पर्धा होतात ज्या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांपेक्षा अधिक लोकप्रिय असतात हे देखील तितकेच खरे आहे. धोनीच्याच कर्णधारपदाच्या कारकीर्दीत आपण टी२० व एक दिवसीय विश्वचषक जिंकला होता हे आपण कसे विसरू शकतो. तसेच लक्षात ठेवा की आजच्या युगातील महान फुटबॉलपटू मेस्सी ज्या वेगवेगळ्या क्लबसाठी खेळला त्यांना विविध स्पर्धा जिंकवून देऊन महान बनला, त्यानंतरच कारकीर्द संपत असताना त्याच्या देशाला विश्वचषक जिंकून देऊ शकला!  त्यामुळेच माझ्या मते तुम्ही कोणत्या संघाकडून खेळता हे महत्त्वाचे नसते कारण स्पर्धेच्या नावापेक्षाही खेळ महत्त्वाचा असतो. अर्थात देशाच्या झेंड्याखाली खेळताना मिळणारा लौकिक तसेच अभिमान महत्त्वाचा आहेच, हे पण लक्षात ठेवा. तुम्ही धोनीविषयी माझ्या विचारांशी सहमत असाल तर आपण पुढे जाऊ व खेळाडू व या आयपीएलमधील त्यांच्या कामगिरीवर एक नजर टाकू, कारण तुम्ही कितीही महान कप्तान असला तरीही, संघातील  खेळाडू चांगले खेळले नाहीत तर तुम्ही सामना जिंकू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. सर्वाधिक बळी घेणारे पहिले तीन खेळाडू गुजरात टायटन्सचे होते, ते गतवर्षीचे विजेतेही होते व या वर्षीचे उपविजेते. त्याचशिवाय सीएसकेचा कुणीही गोलंदाज सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये नाही. तसेच या आयपीएलच्या या सामान्यांमध्ये सीएसकेकडून पहिल्या पाच फलंदाजांमध्ये केवळ एकच नाव होते व तो देखील पाचव्या क्रमांकावर होता. सर्व संघांमध्ये सीएसकेच्या खेळाडूंचे सरासरी वय कमाल होते व त्याचशिवाय रविंद्र जडेजा वगळता जो दुखापतीमुळे जवळपास वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर होता, सीएसकेच्या संघातील कोणताही खेळाडू कोणत्याही राष्ट्रीय संघातून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत नव्हता. बेन स्टोक्स होता परंतु दुखापतीमुळे तो सध्या एकही सामना खेळू शकला नाही व धोनीही स्वतः गुडघ्याच्या इजेमुळे पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. या सगळ्या सांख्यिकीमुळे, धोनीचे अगदी निस्सीम चाहतेही सीएसकेला यावर्षी  जिंकायला काही संधी आहे असा विश्वास ठेवायला तयार नव्हते व हा संघ गेल्या वर्षी गुणसंख्येमध्ये चक्क तळाला होता. अशा परिस्थितीमध्ये केवळ धोनीच तुम्हाला तो चषक जिंकून देऊ शकतो. हा विश्वास, हाच फरक आहे!

सर्वप्रथम, धोनी इतर सर्व महान खेळाडूंपेक्षा अतिशय वेगळा आहे, आपल्या नैसर्गिक अंतःप्रेरणेचा वापर करण्याच्या बाबतीत केवळ कपील देवच त्याच्या श्रेणीत येऊ शकतो. परंतु कपील देवच्या वेगळा म्हणजे  धोनीकडे अतिशय थंडपणे आडाखे बांधणारे डोके आहे जे एखाद्या सैन्याच्या सेनापतीसारखे चालते व अतिशय निष्ठूरपणे तो त्याचा वापर करतो. कारण एकीकडे धोनीचा त्याच्या जुन्या सैनिकांवर विश्वास असला व त्यांच्याकडून उत्तम कामगिरी करून घेत असला, तरीही कुणाला कधी वापरायचे याविषयी त्याचे मत अगदी स्पष्ट असते. अगदी आपला सर्वोत्तम खेळाडू जडेजा यालाही तो बाजूला ठेवू शकतो, ज्यामुळे तो रागवला तरी, म्हणूनच धोनी विशेष आहे. धोनी जाणतो की त्याच्याकडे सचिन किंवा सेहवागसारखे महान खेळाडूचे उपजत कौशल्य नाही अथवा राहुल द्रविडसारखे तंत्र नाही. परंतु इतर भारतीय खेळाडूंकडे जे नाही ते त्याच्याकडे भरपूर आहे म्हणजे खेळासाठी आवश्यक असलेली चतुराई व आत्मविश्वास, जो त्याच्या नेतृत्वाचे लोखंड लोकांच्या अपेक्षांच्या आगीत तावून-सुलाखून निघाल्यावर विकसित झाला आहे. वारंवार पराभूत होऊनही आपला संघ बदलत नसल्यामुळे सीएसकेवर नेहमी टीका व्हायची. रागवला तरी समुद्रांच्या लाटांप्रमाणे असते ज्या वारंवार किनाऱ्यावर येऊन आदळत असतात, त्यांच्या सततच्या माऱ्यामुळे अगदी कणखर खडकही फुटतो! आपणही हेच पाहिले आहे, गुजरात टायटन्सने त्यांना सलग तीनवेळा पराभूत केले, तरीही धोनीने पात्रता फेरीत व अंतिम सामन्यातही त्याच्या संघात काही बदल केले नाहीत, यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये मोठा फरक पडतो. हा मोजून-मापून पत्करलेला धोका होता कारण आधीच प्रतिस्पर्धी संघाने मात केल्यामुळे खेळाडू त्यांचा बदला घेण्यासाठी उत्सुक होते व या प्रक्रियेत ते त्यांची सर्वोत्तम कामगिरी करून दाखवतील हे मानसशास्त्र माहिती असणे हेच धोनीचे वेगळेपण आहे. म्हणूनच या संघामध्ये कोणतीही मोठी नावे नाहीत व कुणीही विशेष कामगिरी केलेली नाही जी गुजरात टायटन्स व आरसीबीसारख्या संघांना लोळवू शकेलसीएसके मोठ्या गव्याच्या शिकारीसाठी निघालेल्या रान कुत्र्यांच्या कळपासारखी होती ज्यांचा शिकारी करायला अगदी वाघही घाबरतो, म्हणूनच धोनी विशेष आहे. या आयपीएलमध्ये त्याने विविध संघाना पराभूत करण्यासाठी याच चातुर्याचा वापर केला व त्याच्या संघानेही त्याला उत्तम प्रतिसाद दिला कारण त्याचा त्यांच्यावर भरवसा होता; प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक बळीचे, तसेच संघ कशाप्रकारे फलंदाजी करेल किंवा क्षेत्ररक्षण करेल याचे नियोजन या संघाच्या कर्णधाराने केले होते. मग ते प्रत्येक गोलंदाजाने घेतलेले एखाद-दोन बळी असतील किंवा झटपट केलेल्या वीस किंवा तीस धावा, उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्धी संघाची अक्षरशः धूळदाण उडवली, ज्यामुळे सरतेशेवटी त्या संघांना सपशेल शरणागती पत्करावी लागली.

त्याशिवाय धोनी समाजाच्या अशा वर्गातून आला आहे की लाखो भारतीयांना तो त्यांच्यातलाच वाटतो, सलीम-जावेद यांनी ७०च्या दशकात बिग बीच्या बाबतीत जे काही केले त्यासारखेच हे थोडेफार आहे. त्यांच्या कथांमध्ये एक तरूण, दिसायला अगदी सामान्य नायक होता जो तुम्हाला आपलासा वाटे व आपला राग व बुद्धिमत्तेच्या जोरावर संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध तो लढत असे, हे पाहायला लोकांना अतिशय आवडे व यामुळेच तो महानायक झाला. क्रिकेटचे जग वास्तव आहे परंतु पटकथा तशीच आहे, एक तरुण खेळामध्ये विशेष काही कौशल्य नसताना सरकारी नोकरी सोडून देतो व एक खेळ खेळण्याचा निर्णय घेतो जो लाखो लोक त्यांच्या बालपणी खेळले आहेत. तो तिथे केवळ टिकून राहात नाही तर एका मागून एका संघ पराभूत करतो, त्यासाठी तो देशाच्या विविध भागांमधून इतर सामान्य खेळाडूंना गोळा करतो, त्यांना स्वतः सुप्रसिद्ध खेळाडू होण्यासाठी मदत करतो, तरीही स्वतः मात्र प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहण्याचे चातुर्य त्याच्याकडे आहे, म्हणूनच धोनी अतिशय विशेष आहे. आयपीएल २३ चा चषक स्वीकारतानाही त्याने हे पुन्हा एकदा दाखवून दिले, त्याने अंतिम सामन्यात विजय साकार करणारा जडेजा व अंतिम सामन्यापूर्वी निवृत्तीची घोषणा करणारा रायडू यांना बोलावले व चषक स्वीकारायला लावला, किती कर्णधार असे करू शकतात, म्हणूनच धोनी विशेष ठरतो.

हे कोणतीही उपाधी किंवा संघाच्या पलिकडे जाणारे काहीतरी आहे व म्हणून धोनीचा संघ कोणत्याही मैदानावर खेळला तरीही तिथे त्यांना चाहत्यांचा पाठिंबा मिळत होता, हे दृश्य कोणत्याही खेळामध्ये दुर्मिळच असते. अंतिम सामान्याच्या समालोचनाच्या अखेरीस, समालोचक म्हणाला (मला अजूनही हिंदी समालोचन पाहायला व ऐकायला अतिशय आवडते), “टीमों के शहर होते हैं, एमएसडी का पूरा देश हैकोणत्याही खेळाडूचा या सारख्या क्षणांपेक्षा दुसरा मोठा गौरव काय असू शकतो व म्हणूनच कदाचित धोनीने पाणवलेल्या डोळ्यांनी (हे देखील दुर्मिळच), माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा खेळणे हीच माझी भेट असेल असे म्हणून आपल्या निवृत्तीची घोषणा करण्यास नकार दिला. सगळ्या सामान्यांमध्ये जेव्हा कॅमेरा प्रेक्षकांचे चित्रण करत होता तेव्हा चे एक दृश्य व्हायरल झाले ते म्हणजे, एका मुलीच्या हातात एक पोस्टर होते ज्यावर एमएसडी तुला माझे आयुष्य लाभो, पण तू पुढची वीस वर्षे खेळत राहा अशा शुभेच्छा दिलेल्या होत्याते वाचून माझ्याही डोळ्यात पाणी आले. कारण यापूर्वीही अनेक महान खेळाडू होऊन गेले आहेत व त्यांचे याहूनही अधिक चाहते होते परंतु फार कमी जणांना या प्रेमाचे व अपेक्षांचे ओझे फार काळ वागवता येते, जे  जपता पण येते धोनीने करून दाखवले आहे व म्हणूनच तो अतिशय विशेष आहे. काळ हा प्रत्येक सजीवाचा सर्वात मोठा व सर्वात कट्टर शत्रू आहे कारण काळागणिक तुमचे वय वाढत जाते, परंतु काळाच्या ओघात पराभूत होण्यापेक्षाही तुम्ही काळाविरुद्ध किती चिवटपणे झुंजलात, यावरून तुमची जीत ठरते व त्या बाबतीत धोनीने काळालाही मात दिली आहे. वैयक्तिकपणे सांगायचे तर, धोनीची इतकी प्रदीर्घ कसोटी घेतल्याबद्दल मी काळाचा सदैव ऋणी राहीन कारण माझ्यासाठी त्याची संपूर्ण गोष्ट एखाद्या शाळेसारखी आहे तिने मला मी माझ्या स्वतःच्या जीवनाचा किती वाईट कर्णधार आहे, परंतु मला अजूनही किती चांगले होण्याची संधी आहे हे शिकवले आहे. धोनीने उद्या खेळायचे थांबवले तरीही, त्याची गोष्ट अजरामर राहील व लाखोंना प्रेरणा देत राहील, म्हणूनच तो खूप खूप विशेष आहे!

 

 

संजय देशपांडे

Smd156812@gmail.com





No comments:

Post a Comment