“एखादी व्यक्ती जंगलात गेली व तिने आपल्याला काहीच न दिसल्याची तक्रार केली तर ती व्यक्ती अंध, बहिरी व गंधज्ञान नसलेली आहे; थोडक्यात मूर्ख आहे …
मी वरील अवतरणाच्या लेखकाचे नाव सांगणार नाही कारण हे विधान ऐकून अनेकजण अतिशय नाराज होतील. परंतु मी या अवतरणाशी पूर्णपणे सहमत आहे, त्यामुळेच हे शब्द कितीही उद्धट वाटले तरीही त्यापासूनच लेखाची सुरुवात करायची असा निर्णय घेतला. मी लेखाची सुरुवात एखाद्या छानश्या, सुंदर अवतरणाने करू शकलो असतो कारण लेखाचा विषय माझ्या अगदी जिव्हाळ्याचा आहे म्हणजेच कान्हाचे जंगल. असे तर मी जी जंगले पाहिली आहेत ते प्रत्येकच मला आवडते, परंतु ज्याप्रमाणे आईला मुलांपैकी एक कुणीतरी अतिशय लाडके असते, त्याचप्रमाणे माझ्यासाठी कान्हा आहे. काही कारणामुळे कान्हाला निवांतपणे भेट देऊन बराच काळ होऊन गेला होता, किंबहुना सर्वाधिक काळ होऊन गेला होता. कारण मी कान्हाला २००० सालापासून नियमितपणे जातोय व तेसुद्धा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा जाणे होते, तरीही कोव्हिडपासून या प्रवासात जरा खंड पडला आहे. मी गेल्यावर्षी कान्हाला गेले होतो परंतु त्यावेळी केवळ चारच सफारी झाल्या होत्या व त्यापैकी तीन सफारींवर तर पावसामुळे पाणी पडले (मे महिन्यात). हे विचित्र असले तरीही, मी गेली आठ वर्षे कुठल्याही मोसमात कान्हामध्ये सहलीसाठी गेलो तरीही पाऊस व ढगांची सोबत कायम राहिली आहे, कदाचित हा जागतिक तापमान वाढीचाही परिणाम असावा. ही समस्या केवळ मलाच जाणवलेली नाही, तर मी आधीच्या लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे, संपूर्ण मध्य भारतातील वन्यजीवन पर्यटनाला पावसाच्या या बदललेल्या स्वरूपाचा व परिणामांचा (म्हणजेच दुष्परिणामांचा) फटका बसला आहे, कारण त्याचा परिणाम वाघ दिसण्यावर होतो. मी पावसामध्ये वाघ व बिबटे पाहिले आहेत. हवामान मात्र अचानक थंड झाल्यामुळे व ढगांमुळे हे शिकारी प्राणी निवांत होतात व दिवसा ज्या ठिकाणी विश्रांती घेत आहेत तिथेच झोपतात, नाहीतर उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे त्यांना पाणवठ्यावर येणे भाग पडले असते व ते दिसण्याची अधिक शक्यता निर्माण झाली असते, जे होत नाहीये.
म्हणूनच मी वरील अवतरण वापरले कारण माझा चालक, जो कान्हामध्ये अनेक वर्षांपासून राहतो आहे, सांगत होता, “साहेब, पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या आजकाल खूप कमी झाली आहे”. याचे कारण म्हणजे कान्हाहून नागपूरपर्यंतचे अंतर, त्यासाठी किमान पाच तास लागतात (म्हणजे सुरक्षित वेगाने), गो-एअरचे कामकाज थांबल्याने, पुण्याहून-नागपूरपर्यंत प्रवास करण्यासाठी केवळ एकाच विमानाचा पर्याय उपलब्ध आहे (तेसुद्धा अतिशय आडनिड वेळी आहे) व असे हवामान, कान्हा जंगलाचा विस्तार व हिरवीगार वृक्षराजी यामुळे वाघ दिसण्याची शक्यता कमी होते. त्याचशिवाय, ताडोबा नागपूरपासून गाडीने केवळ दोन तासांच्या अंतरावर आहे, जिथे वाघ दिसण्याची शक्यता अधिक आहे. समृद्धी महामार्गामुळे तर तुम्ही पुण्याहून ताडोबापर्यंत गाडीने सरळ दहा तासात पोहोचू शकता, यामुळे सहा जणांच्या गटासाठी ते सोपे तसेच स्वस्तही पडते. ही सगळी माझी तर्कसंगत कारणे आहेत परंतु कान्हाच्या अधिकाऱ्यांना जर त्यांच्या “आओ बाघ देखे” या घोषवाक्याला जागायचे असेल, तर त्यांनी सुद्धा याविषयी काहीतरी केले पाहिजे, कारण हवामान हे एक कारण झाले परंतु पर्यटनाविषयीचा जुना-पुराणा नकारात्मक दृष्टिकोन हे वाघ सहज न दिसण्याचे कारण आहे यामुळे पर्यटकांच्या जंगलाला भेट देण्याच्या इच्छेवर थेट परिणाम होतो. मला माहिती आहे की केवळ वाघ पाहण्यासाठी जंगलाला भेट देणे चुकीचे आहे परंतु सरकारही वन्यजीवन पर्यटनाला चालना देताना ते वाघ केंद्रित करते ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे केवळ पर्यटकांना का दोष द्यायचा, नाही का? त्याचशिवाय, वन्यजीवन पर्यटनाच्या केंद्रस्थानी वाघ असण्यात काहीच गैर नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. मला कल्पना आहे माझे हे मत ऐकून अनेक वन्यजीवन संवर्धक, तसेच वन अधिकारी, अस्सल वन्यजीवप्रेमी, ज्यांची संख्या अतिशय कमी आहे, त्यांच्या कपाळाला आठ्या पडतील व ते म्हणतील, “संजय तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती”! परंतु जवळपास दिडशे कोटी लोकसंख्येच्या या देशामध्ये जेमतेम ३५०० वाघ आहेत, जे काही लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात विखुरलेले आहेत, म्हणूनच वाघ विशेष आहेत व काहीतरी विशेष असेल तरच त्याविषयी आदर वाटतो (किंवा आदर व्यक्त करावासा वाटतो) ही मानवी प्रवृत्ती आहे. या शिवाय वाघ पाहण्यासाठी त्यांना जंगलाला भेट द्यावी लागते जी माझ्या मते वन्यजीवनास मदतच आहे.
कारण पर्यटकांनी वाघ पाहावेत असे आपल्याला वाटत असेल, तर आधी आपण वाघांचे घर वाचवले पाहिजे, तसेच त्या घराचे व्यवस्थापन अशाप्रकारे केले पाहिजे की वाघांकडे जगण्यासाठी पुरेशी जागा असेल, कारण एकप्रकारे वाघ जंगल वाचवतात व जंगल वाघांना वाचवते. तुम्ही गोंधळात पडला असाल तर मी समजून सांगतो, कोणत्याही जंगलात वाघांसारखे मांसाहारी प्राणी नसतील तर शाकाहारी प्राण्यांची संख्या अतिशय जास्त वाढेल व त्यामुळे आजूबाजूच्या मानवी वसाहतींसाठी (शेतांसाठी) ते डोकेदुखी होऊन बसतील आणि वाघांची भीती नसल्यामुळे माणूस शाकाहारी प्राणी तसेच जंगल संपवून टाकेल. जंगलामध्ये वाघ असल्यामुळे माणूस काही प्रमाणात अशा जंगलांपासून लांब राहतो, तसेच जंगलही वाघाला जगण्यासाठी व त्यांची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक असलेली जागा देऊन वाघांचे संरक्षण करते. यासाठी कान्हा हे वाघांसाठी वरदान असले तरी दुसरीकडे वाघ दिसण्याच्या संदर्भात पर्यटनासाठी तो एक शाप आहे. कारण वाघाला विश्रांती घेण्यासाठी अतिशय मोठी जागा उपलब्ध आहे त्यामुळे त्याला उघड्यावर येण्याची गरज पडत नाही. म्हणूनच केवळ वाघ पाहण्यासाठी हजारो रुपये खर्चून आलेल्या पर्यटकांना तो दिसत नाही. इथेच वन विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते, त्यांच्याविषयी पूर्णपणे आदर राखून असे सांगावेसे वाटते की कान्हा अभयारण्य कितीही सुंदर व निसर्गरम्य असले तरी बहुतेक पर्यटक फक्त विस्तीर्ण पसरलेले जंगल, हिरवागार परिसर, सोनेरी बारशिंगा व इतरही अनेक वन्यप्राणी बघायला येत नाहीत (माझ्यासारखे काही मात्र हे बघायला जातात) तर वाघ बघायला येतात व त्यानंतरच ते वरील बाबींचे कौतुक करू शकतात. म्हणूनच जंगलात नवीन पर्यटन मार्ग खुले करणे, तसेच नवीन बफर तयार करण्याचा व या भागातील गावांचे स्थलांतर करण्याचा विचार करून, वन विभाग सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांच्या निकषांचे उल्लंघन न करता (याविषयी चर्चा होऊ शकते मात्र ती पुढील वेळेस करू) पर्यटन क्षेत्रामध्ये वाघ दिसण्याची शक्यता वाढण्यासाठी नेहमी प्रयत्न करू शकतो, मात्र ते होताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपण रस्त्याच्या कडेला आणखी पाणवठे तयार करण्याचा विचार करू शकतो तसेच जेथे वाघ सातत्याने दिसत नाहीत असे काही मार्ग बंद करून, जेथे वाघ दिसतो आहे असे नवीन मार्ग तयार करू शकतो, म्हणजे अधिकाधिक पर्यटक जंगलाच्या राजाला खऱ्या स्वरूपात पाहू शकतात.
आणखी एक पैलू म्हणजे अभयारण्यांच्या वेळा व संपूर्ण मॉन्सूनमध्ये ती बंद ठेवणे, कारण कान्हासारख्या मोठ्या अभयारण्यामध्ये काही मार्ग व विभाग नक्कीच वर्षभर सुरू ठेवता येऊ शकतात. म्हणूनच अभयारण्य वर्षातील सर्व ३६५ दिवस खुले ठेवायला काय हरकत आहे, तुम्ही कधी डिस्नेचे थीम पार्क सुट्टीच्या दिवशी बंद असल्याचे ऐकले आहे का, काही राईड दुरुस्ती व देखभालीसाठी बंद ठेवल्या जाऊ शकतात, परंतु संपूर्ण पार्क वर्षभर खुले असते, कारण व्यवसाय कसा करायचा हे ते जाणतात. आता इथेही वन्यजीवप्रेमी व वन्यजीव संवर्धक म्हणतील की हा निसर्ग आहे, व्यवसाय नाही. त्यावर माझे उत्तर असे आहे की ते कायमस्वरूपी बंद करा कारण सर्व मोसमात निसर्ग सारखाच असतो, तर मग हिवाळा व उन्हाळ्यामध्ये ते उघडे ठेवण्याची काय गरज आहे, बरोबर? लोकहो आपण संवर्धनाविषयी बोलतोय व आपण सर्व पैलूंकडे खुल्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, त्याचे फायदे व तोट्यांचा अभ्यास केला पाहिजे, केवळ नकार देऊन झटपट एखाद्या निष्कर्षावर पोहोचू नये. कान्हासारख्या मोठ्या जंगलाच्या अवती-भोवती राहणाऱ्या लोकांची उपजीविका जंगलामुळे मिळणाऱ्या नोकऱ्यांवर, वन्यजीवन, पर्यटनाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांवर चालते व हे लोक जे कान्हा जंगलाचा खऱ्या अर्थाने भाग आहेत, तेच जंगलाचे संरक्षकही आहेत.म्हणूनच, जर वाघ दिसण्याचे प्रमाण वाढल्यामुळे जर या लोकांना अधिक चांगल्याप्रकारे आपली उपजीविका चालवता येणार असेल तर त्यामध्ये काय गैर आहे, असा माझा मुद्दा आहे.संपूर्ण जगात, वन्यजीवन संवर्धनासाठी सर्वोत्तम साधन म्हणून वन्यजीवन पर्यटनाचा वापर करण्यात आला आहे, दुर्दैवाने आपल्याच देशात ते निषिद्ध मानले जाते व परिणामी जे लोक खऱ्या अर्थाने जंगलाचे संरक्षक आहेत त्यांना असंख्य अडीअडचणींना तोंड द्यावे लागते, याचे एकमेव कारण म्हणजे वन्यजीवन संवर्धनाबाबत आपला दृष्टिकोन संतुलित नसतो, हाच माझ्या लेखाचा मुद्दा आहे. कान्हासारख्या जंगलांमध्ये केवळ वन्यजीवन पर्यटनाविषयीच नाही तर एकूणच जंगलाचे सौंदर्य व मह्त्त्व समजवण्याची प्रचंड क्षमता आहे, हे जंगल म्हणजे जणू इथल्या समृद्ध निसर्गाचे दर्शन घडविणारी एक खिडकीच आहे, केवळ ही खिडकी आपण योग्यप्रकारे प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
आता पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या दर्शनाविषयी बोलू (केवळ वाघांच्याच नव्हे), मे महिन्याची अखेर होती तरीही अवेळी पावसाच्या कृपेने (ही कृपाच म्हणावी का?), सदाहरित साल वृक्षांसोबतच गवतही हिरवे होते व या पार्श्वभूमीवर सोनेरी बारशिंगा पाहण्याचा अनुभव केवळ मी सांगण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतः घेतला पाहिजे. आम्हाला वाघ अनेकदा दिसले परंतु एक रोचक बाब म्हणजे (व चांगलीही) कान्हामध्ये अस्वल दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक पर्यटक हा मजेशीर प्राणी दिसण्याची गंभीर दखल घेत नाहीत परंतु जंगलामध्ये वाघ दिसण्यापेक्षाही अस्वल दिसणे दुर्मिळ आहे व यावेळी कान्हाने माझ्या इच्छांच्या यादीत आणखी एक इच्छा (जंगल तुम्हाला हावरट बनवते) पूर्ण करायला मदत केली व ती म्हणजे अस्वलाला पाहणे. तुम्हाला हसू येईल मात्र व दिवसाढवळ्या अस्वल उघड्या जागेवर झाडावर चढताना स्पष्टपणे दिसणेही अवघड असते, हे दृश्य काही तुम्हाला रोज दिसत नाही. परंतु यावेळी गवताळ कुरणांमध्ये सकाळच्या फेरफटक्याच्या वेळी मला अन्नाच्या शोधात असलेले अस्वल एका वडाच्या झाडापाशी येताना दिसले, त्याने अचानक झाडावर चढण्याचा प्रयत्न मध्येच केल्यामुळे मी अतिशय आनंदी होतो परंतु झाडाचा बुंधा फारच मोठा असल्याने अस्वलाने प्रयत्न सोडून दिला व ते खाली उतरले, हे दृश्य अतिशय मजेशीर होते. खरेतर, आपण अशा दृश्यांचे काय महत्त्व आहे आहे याविषयी पर्यटकांना जागरुक केले पाहिजे. गाईड असा प्रयत्न करतात, परंतु पर्यटकांचे सर्व लक्ष वाघावर केंद्रित झालेले असल्यामुळे आम्ही अस्वल पाहण्यात गुंगून गेलो असताना काही जिप्सी तिथे न थांबता निघून गेल्या, कारण त्यांना वाघ पाहायचा होता. एक क्षुल्लक काळा केसाळ प्राणी झाडावर चढताना पाहण्यात त्यांना त्यांचा वेळ घालवायचा नव्हता. इथे गाईडने पर्यटकांना अस्वलासारख्या प्राण्यांविषयी व त्यांचे काय महत्त्व आहे याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला तरीही, पर्यटकांमध्ये जागरुकता नसल्यामुळे त्यांना आधी वाघ पाहण्यातच रस असतो, इथेच वाघ दिसण्याचे महत्त्व समजू शकते. एकदा पर्यटकांना वाघ दिसल्यानंतर, तो किंवा ती वन्यजीवनाच्या इतर पैलूंविषयी अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात व मी ही मानसिकता समजू शकतो, मात्र वन विभागानेही ती समजून घेतली पाहिजे असा मुद्दा आहे.
आम्हाला नीलम नावाची एक वाघीण तिच्या पुढच्या पायाला इजा झालेली असतानाही तिच्या बछड्यांसाठी शिकारीसाठी निघाल्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले. मी हा ब्लॉग लिहीत असताना एक बातमी आली (फेसबुकवर) की दुसऱ्या एका वाघीणीशी झालेल्या झटापटीत नीलम गंभीर जखमी झाली. कान्हाचा विस्तार मोठा असूनही, वाघांच्या वाढत्या संख्येमुळे जागेची समस्या अतिशय मोठी आहे व वाघ जिवंत राहण्यासाठी क्षेत्रावरून त्यांच्यात होणारे वाद ही मोठी समस्या आहे, याविषयी आपण वेगाने पावले उचलली पाहिजेत. त्याचवेळी सावजाचे (हरिण) कमी सावज असलेल्या जागी स्थलांतर करणे तसेच आणखी पाणवठे तयार करणे आवश्यक आहे, म्हणजे वाघ सारख्या प्रमाणात विखुरले जातील, हे होणे आवश्यक आहे व ते वेगाने झाले पाहिजे.सांगण्यासारखी शेवटची बाब म्हणजे, आम्ही कान्हा जंगलातील गाईडना हिवाळी कपडे दिले, कारण साल वृक्षांच्या या जंगलात हिवाळा अतिशय तीव्र असतो. दरवर्षी हजारो पर्यटक आपल्या जंगलांना भेट देतात व निसर्गाच्या सानिध्यात ताजेतवाने होतात व आपल्या लाखो रुपयांच्या कॅमेऱ्याने घेतलेली छायाचित्रे समाजमाध्यमांवरची जागा भरून टाकतात. परंतु हे क्षण ज्यांच्यामुळे शक्य होतात त्या लोकांसाठी काही योगदान देण्याविषयी कुणीच काही बोलत नाही. एका गाईडने बोलून दाखवले की, “इथे पूर्ण दिवसाच्या सफारीवर लोक लाखो रुपये खर्च करतात. पण आमच्या गरजांविषयी फार कमी लोक विचार करतात”, आपल्याला कान्हासारखी जंगले टिकवायची असतील तर मित्रांनो हे लक्षात ठेवा व यावरूनच वाघांचे भवितव्य ठरणार आहे; एवढे बोलून निरोप घेतो …!
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स.
Smd156812@gmail.com
पुण्यातील रिअल इस्टेटविषयी माझे विचार खालील यू ट्यूब दुव्यावर पाहा..
https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s
No comments:
Post a Comment