“तुमच्याकडून काही शिकण्यासाठी, जंगल मूकपणे तुमचे निरीक्षण करते व शांतपणे तुमचे म्हणणे ऐकते! तुम्हाला जंगलाकडून काही शिकायचे असेल, तर तुम्हीही जंगलाचे अनुकरण केले पाहिजे!” … मेहमत मुरात इल्दान.
पुन्हा एकदा, तुर्कस्तानचा हा माणूस माझ्या लेखाच्या पॉवर-प्लेमध्ये (माफ करा, हा आयपीएलमधला शब्द आहे, याचा अर्थ खेळाची सुरुवात असा होतो) माझ्या मदतीला आला. त्याच्या निसर्गाविषयीच्या तत्वज्ञानामुळे, विशेषतः जंगलाविषयीच्या तत्वज्ञानाविषयी मला अतिशय आश्चर्य वाटते कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा देश वन्यजीवनासाठी कधीही प्रसिद्ध नव्हता व नाही (म्हणजे खऱ्या अर्थाने नैसर्गिक वन्यजीवन) तरीही त्यांच्याकडे जंगलाविषयी अवतरणांचा खजिना आहे यातून त्यांच्या निसर्गाविषयीच्या या पैलूची समज दिसून येते. मे महिना हा भर उन्हाळ्याचा काळ, मध्य भारतातील जंगलांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम असतो केवळ तुमची धूळ (प्रचंड धूळ), तीव्र उष्मा, लांबचा प्रवास व अलिकडे दिवसातील कोणत्याही वेळी अचानक पडणाऱ्या पावसाच्या सरींसाठी (अक्षरशः) कोसळणाऱ्या तयारी असली पाहिजे. गेल्या वर्षापासून (गेल्या तीन/चार वर्षांपासून मे मध्ये) एप्रिल व मेच्या महिन्यांमध्येही आकाशात ढग दाटून येतात व विशेषतः दुपारच्या सफारीमध्येही पावसाच्या सरी पडतात ज्यामुळे वन्य प्राणी दिसण्याची शक्यता सर्वाधिक असते (अर्थात वाघ). हे इतक्या झपाट्याने होत आहे की निसर्ग चक्राचे स्वरूपच बदलल्यासारखे वाटते. दशकभरापूर्वी फेब्रुवारीपासून ते जूनपर्यंतचे जवळपास पाच महिने वन्यजीवन पाहण्यासाठी सर्वोत्तम असायचे. मात्र अलिकडच्या काळात जवळपास प्रत्येक महिन्यात पाऊस पडतो, यामुळे गाईड तसेच जिप्सी चालकांना वाघ शोधणे खरोखरच अवघड होते. वाघ दिसावा ही पर्यटकांची सतत मागणी असते (वन्य पर्यटनासाठी तुम्ही जेवढा पैसा खर्च करता त्यामुळे त्यात काही आश्चर्य नाही परंतु तो स्वतंत्र लेखाचा मुद्दा आहे), मात्र पावसामुळे अभयारण्यात सर्वत्र पाणी उपलब्ध असल्यामुळे वाघाला एखाद्या विशिष्ट पाणवठ्यावर उघड्यावर येण्याचे कारण नसते. अर्थात आत्तापर्यंतच्या अभ्यासातून वाघ काही विशिष्ट सवयी असलेला प्राणी आहे हे आम्हाला माहिती होते व त्याचे हेच वैशिष्ट्य त्याचा सर्वात मोठा शत्रूही आहे (शिकाऱ्यांना त्याच्या हालचालींचा अंदाज सहजपणे लावता येतो). तरीही त्यामुळे विस्तीर्ण पसरलेल्या जंगलामध्ये वाघ दिसण्यास मदत होते हेदेखील तितकेच खरे आहे व पर्यटकांसाठी चांगले आहे.
जंगलामध्ये उन्हाळ्याच्या काळातील दुसरा एक पैलू म्हणजे, तुम्ही उष्णता सहन करू शकत असाल व वाट पाहायची तुमची तयारी असेल तर, सर्व वन्य प्राण्यांची मूलभूत गरज असलेल्या (पक्ष्यांचीदेखील) तहानेमुळे तुम्हाला आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात. कारण उन्हाळ्याच्या काळात प्रत्येक वन्यप्राण्याला आजूबाजूला असलेल्या पाणवठ्याला एकदा किंवा दोनदा भेट द्यावी लागते. प्राणी ज्याप्रकारे पाणवठ्यावर येतात ते पाहणे अतिशय रोचक असते, कारण एखादा वाघ पाण्यातच बसलेला असू शकतो किंवा जवळपास पहुडलेला असू शकतो त्यामुळे हा सर्वात मोठा धोका आहे हे जंगलातील सर्व प्राण्यांना चांगलेच माहिती असते. पाणी पिण्याच्या वेळीच तुम्ही अगदी सहजपणे शिकाऱ्याचे सावज होता. विशेषतः, हरिण किंवा सांभर पाणवठ्यापर्यंत येण्यास अतिशय वेळ लावतात, अक्षरशः इंचा-इंचाने पुढे सरकत तिथे वाघ आहे का हे पाहतात व त्यानंतर पाणी पिण्यासाठी प्रत्यक्ष पाणवठ्याकडे जातात. म्हणूनच यावेळी मी नेहमीप्रमाणे एक सलग लेख न लिहीता, मी अनुभवलेल्या लहान लहान गोष्टी सांगत आहे. मी खरोखरच सांगतो की दर क्षणाला जंगलात दर तासाला एक नवीन गोष्ट अनुभवता येते, तुम्ही केवळ संयमाने, त्या गोष्टीशी एकरूप झाले पाहिजे, तुमचे निरीक्षण चांगले हवे. चलातर मग ते क्षण अनुभवायला …
--
उन्हाळा, तहान व ताडोबा !
आम्ही दिवसभर जंगलात होतो व ज्यांनी मे महिन्याच्या मध्यावर ताडोबाच्या कोअर भागाला भेट दिली आहे त्यांना तिथल्या उकाड्याची व त्यामुळे तुम्हाला किती थकल्यासारखे होते याची कल्पना असेल! आम्ही चौघे होतो, उन्हे उतरणीला लागली होती आणि तोपर्यंत आमच्या पाण्याच्या तब्बल ३० बाटल्या संपवून झाल्या होत्या. अशावेळी तुम्ही फक्त एकच गोष्ट करू शकता ती म्हणजे प्रत्येक पाणवठ्याला भेट देणे कारण रस्त्यावर कोणत्याही सजीवांची काहीच हालचाल नसते. अशा वेळी फेरफटका मारत असताना, आम्हाला अचानक दोन काळ्या वस्तू लयबद्धपणे चालचाल करताना दिसल्या, माझा माझ्या नशीबावर विश्वासच बसत नव्हता ती जवळपास वयात आलेली अस्वले होती, ताडोबामध्ये या काळात अस्वल दिसणे दुर्मिळ नसले तरीही दोन जवळपास वयात आलेली अस्वले एकत्र सहजपणे दिसत नाहीत. त्यामुळे मला केवळ एवढीच आशा होती की त्यांनी उघड्यावर यावे, कारण झुडुपातून त्यांची छायाचित्रे घेणे म्हणजे तुमचे शॉट वाया घालवण्यासारखे असते. अस्वल हा अतिशय लाजाळू प्राणी आहे व ही अस्वले पूर्ण वयात आलेलीही नव्हती तरीही तहानेने भीतीवर मात केली व बिचारे उघड्यावर असलेल्या एका लहान पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आले. तिथे अतिशय कमी पाणी होते परंतु त्यांना ते हवे च होते. जवळच्या दुसऱ्या मोठ्या तळ्यावर वाघाचा वावर नक्कीच असेल त्यामुळे तिथे जाण्याचा धोका पत्करू शकत नाहीत; यालाच वन्यजीवन म्हणतात कारण जेव्हा तुम्ही दुबळे असता तेव्हा तुमच्यासमोर जे काही असेल ते तुम्हाला स्वीकारावे लागते. मला एकाचवेळी दोन अस्वलांचे छायाचित्र काढता आल्यामुळे मी आनंदी होतो व त्यांना त्यांची तहान भागवता आली याचाही आनंद वाटत होता! ...
शांतपणे झोपा, तुमच्यावर लक्ष ठेवायला आई आहे!
तुम्ही घरी असा किंवा जंगलात, आई ही आई असते! एका ठिकाणी आम्हाला वाघाचे बछडे शांतपणे झोपलेले दिसले तर त्यांची आई (वाघाची मादी) जेवणानंतर तिचे बछडे झोपले असताना त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. ती जागी होती व नजर थेट माझ्या कॅमेऱ्यावर रोखलेली होती, जणू मला इशारा देत असावी, "माझे तुझ्याकडे लक्ष आहे, माझ्या बाळांना त्रास देऊ नकोस ती झोपली आहेत "! माणसांची असो किंवा प्राण्यांची आई ही आई असते, आपल्या बाळांना आरामात जगता यावे यासाठी स्वतः त्रास सहन करते!
(इथे अतिशय कमी प्रकाश होता कारण वाघीणीने तिच्या बछड्यांना सूर्यप्रकाशाचाही त्रास होऊ नये अशी जागा निवडली होती; या मालिकेतील आणखी छायाचित्रे लवकरच) ...
तुला आणखी किती जवळचा शॉट हवा आहे?
मध्य भारतातील जंगलांमध्ये केवळ भर उन्हाळ्यातच, पाणवठ्यावरच एखाद्या नर तुम्ही वाघाची हवी तशी छायाचित्रे घेऊ शकता (म्हणजे तो तुम्हाला त्याच्या इच्छेने छायाचित्रे घेऊ देतो), कारण तो तुमच्याकडे ढुंकूनही पाहात नाही याला अपवाद म्हणजे केवळ तुम्ही वाघ दिसल्याच्या उत्साहात फार गोंगाट केलात तर! त्यानंतरही, तो वाघ तुमच्याकडे वैतागून एक कटाक्ष टाकेल व दुपारची झोप पूर्ण करण्यासाठी जवळपासच्या झुडुपांमध्ये नाहीसा होईल. त्यानंतर त्याला निरव शांतता आहे असे जाणवले तरच केवळ तो पुन्हा पाणवठ्यावर येतो. आम्ही अजिबात गोंगाट न करण्याचा शहाणपणा दाखवला, त्यामुळे जोपर्यंत आम्ही आमचा कॅमेरा बाजूला ठेवत नाही तोपर्यंत त्याने आम्हाला त्याची छायाचित्रे काढू दिली, नंतर तो दुपारची झोप घेत असताना आम्ही कौतुकाने त्याला न्याहाळत होतो... त्या वाघाचे नाव होते, मोगली.
--जंगलाचा पहिला नियम, बळी तो कान पिळी…!
एका मोठ्या, सुळे असलेल्या नर रान डुकराची छायाचित्रे काढण्याची माझी बऱ्याच काळापासूनची इच्छा होती; या प्रजातीविषयी फारशी माहिती नसलेल्या अनेकांना माहिती नसते की रान डुकरांनाही सुळे असतात, ते हस्तिदंताएवढे लांब नसतात, परंतु त्यांना अन्नासाठी जमीनीमध्ये खणता येईल, तसेच वाघासारख्या शत्रूला प्रतिकार करता येईल एवढे लांब व बळकट असतात. परंतु रानडुक्कर पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येत नाही तोपर्यंत, फारसे कॅमेरास्नेही म्हणून ओळखले जात नाही, त्यामुळे माझ्या मनात ही सुप्त इच्छा बऱ्याच काळापासून होती. ताडोबाच्या या सफारीमध्ये, पहाटेच्या प्रसन्न वेळी एका चौकात आम्हाला रस्त्यावर लांबून एक मोठा काळा गोळा समोरून संथपणे चालत येताना दिसला. आधी मला ते अस्वलच आहे असे वाटले, नंतर मला जाणीव झाली की ते रान डुक्कर आहे. मी कॅमेऱ्याच्या लेन्सनी त्याला आणखी जवळून पाहिले तेव्हा मला जाणीव झाली की ते लंगडत चालले आहे व त्याचा पुढचा पाय मोडला असावा व तो त्याला फारसा वापरता येत नव्हता. म्हणूनच आमची वाहने जवळ आली तरीही तो रान डुकरे नेहमी पळून जातात तसा गेला नाही, त्याऐवजी त्या बिचाऱ्याने आमच्याकडे पाहिले व आपले धूड अतिशय संथपणे ओढत-ओढत, रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडुपांमध्ये दिसेनासा झाला. गाईड म्हणाला, “हा बिचारा वाघाच्या दृष्टीस पडला तर मरेल”, इतर वेळी वाघ एवढ्या मोठ्या रान डुकराच्या वाटेस जाण्याचे धाडस करणार नाही, कारण शिकारीदरम्यान वाघ स्वतःच गंभीर जखमी होऊ शकतो. परंतु या रान डुकराची स्थिती पाहता वाघ अगदी सहजपणे त्याची शिकार करू शकला असता.मी त्या लंगडणाऱ्या रान डुकरासाठी फक्त प्रार्थना करू शकत होतो, परंतु त्याच्या डोळ्यातील असाहाय्यपणा मला आजही पछाडतोय, जंगलातील आयुष्य हे असेच असते, इथे केवळ एकच नियम असतो, तो म्हणजे बळी तो कान पिळी, आणि येथे तुम्हाला स्वतःचे रक्षण स्वतःच करायचे असते!...
--
दोरी आणि वाघ…!!
आम्ही झाडांच्या सावलीत शांतपणे झोपलेल्या एका वाघाच्या कुटुंबाची पाणवठ्यापाशी वाट पाहत, तळपत्या उन्हात घामाने निथळत होतो, त्याचवेळी एक नुकताच वयात येत असलेला एक बछडा सावलीतून बाहेर आला व जवळच असलेल्या मोठ्या झाडाच्या दिशेने चालत गेला ज्याला एक नायलॉनची दोरी बांधलेली होती. बछड्याने कुतुहलाने (म्हणजे मला तसे वाटले) झाडाभोवती फेरी मारली व पूर्ण जोर लावून ती दोरी ओढू लागला. ते दृश्य अतिशय मजेदार होते, एका नायलॉनच्या दोरीशी खेळणारा एक वाघ, काही वेळाने आणखी एक वाघाचा बछडा तेथे आला व पहिल्या बछड्याच्या पंजातून दोरी घेऊन तेच करू लागला. भर जंगलात अशा ठिकाणी झाडाला दोरी कुणी बांधली असावी व ते बछडे तिच्याशी खेळण्यात एवढे कसे गुंगून गेले होते अशी उत्सुकता मला वाटत होती. जंगलामध्ये नेहमीच अशा असंख्य गोष्टी असतात व इथे काहीही विनाकारण होत नाही, त्यामुळे मी गाईडला त्या दोरीविषयी विचारले. त्याने सांगितले, साहेब, यांची आई (वाघीण) गेल्या महिन्यात जखमी झाली होती, वन विभागाला भीती वाटत होती की ती शिकार करू शकली नाही तर बछड्यांसोबत उपाशी मरेल, म्हणून त्यांनी एक गाय आणून या झाडाला इथे बांधून ठेवली होती, वाघीणीने त्या गायीची शिकार करून पोट भरले आणि बछड्यांनाही खाऊ घातले, त्या बछड्यांच्या ते लक्षात होते म्हणून ती दोरी ओढताहेत!.” खरच वाघांची स्मृती अतिशय तीक्ष्ण असते व बछड्यांना या दोरीला बांधलेल्या अन्नाची चव लक्षात असावी, म्हणूनच ते त्या दोरीमध्ये इतके गुंगून गेले होते. मला चांगली छायाचित्रे मिळाल्यामुळे आणि जंगलाविषयी आणखी एक मजेदार गोष्ट ऐकायला मिळाल्याने मी आनंदी होतो.
अशा अनेक गोष्टी होत्या ज्या मी सफारीमध्ये जगलो, परंतु मेहमत यांनी म्हटल्याप्रमाणे जंगल मूकपणे तुमचे निरीक्षण करत असते व प्रत्येक वळणावर तुम्हाला एक गोष्ट सांगत असते व एक निरीक्षक म्हणून तुम्हालाही त्याचा भाग बनवत असते; मला असे वाटते जंगलाकडून तुम्हाला यापेक्षा उत्तम भेट काय मिळू शकते व त्यासाठी तुम्ही जंगलामध्ये राहण्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे. मला असा वेळ देण्यासाठी व मला जंगलाच्या कितीतरी गोष्टींमध्ये सहभागी करून घेण्यासाठी मी देवाचे आभार मानले, यामुळेच मी कितीतरी अधिक चांगली व्यक्तीपण होऊ शकलो आहे. पुन्हा लवकरच परत येण्याचे व मी या जंगल नावाच्या गोष्टींच्या रचयित्याचे (केवळ गोष्ट सांगणारे नव्हे) उपकार फेडत राहीन असे आश्वासन देऊन, काँक्रीटच्या जंगलाच्या दिशेने माझा परतीचा प्रवास सुरू झाला.
--
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स.
Smd156812@gmail.com
पुण्यातील रिअल इस्टेटविषयी माझे विचार खालील यू ट्यूब दुव्यावर पाहा..
https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s
No comments:
Post a Comment