“नदीशिवाय मासा कसा जगेल? पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी झाडेच नसतील तर काय उपयोग? त्याचप्रमाणे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सशक्त यंत्रणा नसेल तर त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवण्याची खात्री कशी करता येईल? त्याला काहीच अर्थ उरणार नाही!” ... – जे इन्सली...
जे रॉबर्ट इन्सली हे अमेरिकी रायकीय नेते, वकील व अर्थतज्ञ आहेत ज्यांनी २०१३ पासून वॉशिंग्टनचे गव्हर्नर म्हणून कार्य केले. त्यांनी अधिवासांविषयी जे अगदी थोडक्या शब्दात जे सांगितले आहे (उपमांसह) त्यामुळेच मी वरील अवतरण वापरले, ते अमेरिकेतील एखाद्या राज्याचे गव्हर्नर होते म्हणून नव्हे. मला नेहमी प्रश्न पडतो की तेथील राजकीय नेत्यांची इतकी दूरदृष्टी व विचारांमध्ये स्पष्टता असूनही अमेरिकाच निसर्गाच्या (वन्य जीवनाच्या) विध्वंसाला एवढा हातभार का लावते. हा देश काही देशांना केवळ शस्त्रांच्या बाबतीत मदत करण्याऐवजी (मी नाव नमूद करणे आवश्यक आहे का) भारतासारख्या इतर देशांना त्यांच्या वन्यजीवन संवर्धनामध्ये मदत का करत नाहीत? असो, तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल, हा लेख केवळ आपल्या राज्यातल्याच नव्हे तर संपूर्ण मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीवनासाठी (विशेषतः वाघ) अतिशय विशेष असलेल्या ठिकाणांपैकी एकाविषयी आहे, म्हणूनच मला लेखासाठी हे अवतरण अतिशय योग्य वाटले. ज्यांना हे ठिकाण ओळखू आले नसेल (अनेकांना नक्कीच आले नसेल) त्यांच्यासाठी हे ठिकाण आहे उमरेड नावाचे गाव, जे आता यूकेडब्ल्यूएस म्हणजेच उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखले जाते, हा अधिवास वाघांसाठी केवळ वेगळाच नाही तर याचे ठिकाणही अतिशय मोक्याचे आहे (किंबहुना वैशिष्ट्यपूर्ण आहे). आत्तापर्यंत वन्यजीवप्रेमींना “कॉरिडॉर” हा शब्द माहिती झाला असेल, हा एक जमीनीचा पट्टा असतो जो अप्रत्यक्षपणे जंगलांना जोडतो व त्याद्वारे वन्य प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. आता ज्यांना वन्यजीवनाविषयी विशेष माहिती नाही (म्हणजेच फारशी फिकीर नाही), ते विचारतील, वन्य प्राणी स्थलांतरच का करतात? त्याचे उत्तर आहे, ज्या कारणांसाठी आपण माणसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतो त्याच कारणासाठी म्हणजेच, अधिक चांगले जीवन! केवळ एकच फरक असतो, माणसांच्या उलट, वन्य प्राण्यांना प्रवासासाठी विमानाने जायचे किंवा कारने अथवा रेल्वेने असा पर्याय निवडायची सोय नसते, त्यांच्यासाठी विमानतळे, रेल्वे मार्ग, तसेच समृद्धी महामार्गही नसतात जे त्यांना त्यांच्या नवीन घरी किंवा ठिकाणी वेगाने व सुरक्षितपणे घेऊन जातील, त्यामुळे त्यांना पायीच एवढे अंतर चालून जावे लागते. हे काम सोपे नसते कारण, त्यांचा पायी प्रवास आता फक्त जंगलातून होत नाही जिथे माणसांना काहीही अडथळा येणार नाही (म्हणजेच त्यांना स्वतःला काही अडथळा येणार नाही), कारण विचार करा एक वाघ एखाद्या गावातल्या बाजारपेठेतून, किंवा तुमच्या घराच्या परसदारातून जंगलाच्या दिशेने चालत जात असेल, तर लोकांची प्रतिक्रिया काय असेल. म्हणूनच, या प्राण्यांना एक असा रस्ता निवडावा लागतो जेथे त्यांना मार्गात थोडासा एकांत मिळू शकतो व अन्न व पाणी मिळू शकेल व याचसाठी उमरेड हे ठिकाण वन्यजीवनाच्या नकाशावर महत्त्वाचे ठरते.मध्य भारतातील ताडोबा, पेंच, मेळघाट, नागझिरा, बोर अशी सर्व महत्त्वाची जंगले तसेच इतरही अनेक असंरक्षित जंगलांनी वेढलेले उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य वन्य प्राण्यांचे वसतिस्थान असून अधिक चांगल्या जीवनासाठी या जंगलामध्ये ये-जा सुरू असते. याचे स्थान मध्यवर्ती आहे, तसेच अनेक बारमाही तळी असल्यामुळे पाणीही भरपूर आहे व याच्या आजूबाजूचा सर्व भाग जंगलाने वेढलेला आहे जे वन्य प्राण्यांना त्यांचा खाजगीपणा जपण्यासाठी आवश्यक असते. यामुळेच अनेक जंगलांमधील व अभयारण्यांमधील वाघ उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याला वारंवार भेट देतात, प्रामुख्याने ताडोबातून जे या पिवळ्या-काळ्या पट्टेरी प्राण्याचे महत्त्वाचे प्रजजन केंद्र आहे. जेव्हा क्षेत्रावरून झालेल्या वादातून एखाद्या वाघाला हुसकावून लावले जाते तेव्हा उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याचा परिसर अशा बाहेर हुसकावण्यात आलेल्या वाघांसाठी काही काळासाठी किंवा कायमस्वरूपीही उत्तम ठिकाण आहे *; इथे, * हे तारांकित चिन्ह ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये राहण्याकरता एच१बी व्हिसासाठी आवश्यक असतात त्याप्रमाणे अटी व शर्ती लागू असे दर्शवते. तुम्ही गोंधळात पडला असाल किंवा हे गमतीसाठी लिहीले आहे असे वाटत असेल तर अटी व शर्ती महणजे, उमरेड कऱ्हांडला वन्यजीवन अभयारण्यामधील सध्याचे वन्यजीव (म्हणजेच वाघ),जर त्यांनी नवीन वाघांना तिथे स्थायिक होण्याची परवानगी दिली तरच हे शक्य होऊ शकते, नाहीतर जंगलात प्रवास करत नव्याने आलेल्या वाघाला परत कायमस्वरूपी अधिवास शोधण्यासाठी जवळपासच्या कोणत्याही जंगलांपर्यंत प्रवास करावा लागतो . खरेतर हा अधिवास वैशिष्ट्यपूर्ण होताच व वन्यप्राण्यांना अनेक वर्षांपासून त्याविषयी माहिती होती.तरीही माणसांना उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याचे महत्त्व समजण्यासाठी (त्यांना त्याचे कौतुक वाटण्यासाठी) एका फेअरीची (परी) जादू कारणीभूत ठरली जिने साधारण तीन एक वर्षापूर्वी या अभयारण्याला जोरदारपणे (परी) वन्यजीवनाच्या नकाशावर आणून ठेवले. फेअरी हे वाघीणीचे नाव आहे व तिने एका वेळेस पाच बछड्यांना जन्म दिला व त्यांना वाढवले, यामध्ये नर वाघानेही साथ दिली. त्यांना पाहणे वन्यजीवन छायाचित्रकारांसाठी एक पर्वणी होती कारण एकाचवेळी सात वाघांचे छायाचित्र काढता येत असे, जे जंगलामध्ये सहसा होताना दिसत नाही. अशाप्रकारे उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याने लक्ष वेधण्यास व पर्यटकांचा ओघही वाढला. परंतु येथे केवळ लक्ष वेधणे व पर्यटकांपेक्षाही बरेच काही अधिक करण्याची गरज आहे, हाच माझ्या लेखाचा विषय आहे.कारण सध्यातरी हे फक्त अभयारण्य आहे, त्यामुळे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधीची नेहमीच चणचण भासते ज्यामध्ये वनरक्षकांची संख्या वाढवणे, अभयारण्यामध्ये चांगले रस्ते बांधणे तसेच वन कर्मचाऱ्यांना शूज, कपडे यासारख्या अत्यावश्यक गोष्टींसाठी व विश्रांती मिळण्यासाठीही पुरेशी मदत करणे यांचा समावेश होतो. उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याभोवतालची जमीन खनिजाने समृद्ध आहे व खाणकाम हा येथील प्रमुख उद्योग आहे. यामुळे उमरेड हे नागपूर विभागातील अतिशय वेगाने वाढणारे शहर झाले आहे. येथे भूखंड पाडणे, महामार्ग तयार करणे, खाणींमध्ये खोदकाम व इतर विकास कामे वन्य प्राण्यांसाठी कॉरिडॉर विकसित करण्यातील मुख्य अडथळा आहेत, जे नियंत्रित करणे आवश्यक आहे (मी थांबवा असा शब्द वापरलेला नाही). येथील लोकांना नोकऱ्या हव्या आहे व ही खनिजे अनेक माणसांचे आयुष्य सुखकर बनवू शकतात परंतु त्यासाठी वन्यजीवनाचे मूल्य मोजावे लागू नये, एवढेच मला सांगायचे होते.
आपण या गोष्टींचा समतोल साधू शकतो, परंतु त्यासाठी वेगाने पावले उचलली नाहीत तर फार उशीर होईल. आपण ज्याप्रकारे सुरक्षित व वेगवान प्रवासासाठी समृद्धी महामार्गाचे नियोजन व बांधकाम सुरू केले, त्याचप्रमाणे श्री. नितीनभाऊ गडकरी यांनी (जे नागपूरचेच आहेत) उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यापासून ते जवळपासच्या सर्व जंगलांना जोडणारे असे अनेक वन्यजीवन समृद्धी महामार्ग (कॉरिडॉर) बांधावेत. कृपया या कल्पनेचा विचार करावा व तुम्हाला नक्कीच हे करू शकता (म्हणजे तुम्ही केले पाहिजे) कारण वन विभागाकडे त्यांची अभयारण्ये किंवा उद्यानांबाहेर वन्यजीवनासाठी काही करण्याएवढा निधी नाही तसेच अधिकारही नाहीत व इतर कोणत्याही राजकीय नेत्यांना या कारणाने काही करावे असे वाटत नाही.
उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यामध्ये समतोल साधण्यातील महत्त्वाचा धोका म्हणजे, एकतर जंगलाचा संरक्षित भाग अतिशय लहान आहे व दुसरे म्हणजे विस्ताराला भौगोलिक मर्यादा आहेत कारण या जंगलाला बफर क्षेत्र नाही. या जंगलाच्या सर्व बाजूंनी शहरी वसाहती किंवा धरणाच्या पाण्यासारखे जलाशय आहेत. जंगलातील काही पट्टे त्याला अपवाद आहेत जे कॉरिडॉर आहेत व येथे स्थलांतर केलेले वाघ आधीपासूनच येथे असलेल्या वाघांना त्रास देत आहेत. सूर्या नावाच्या वाघापासून जन्मलेल्या बछड्यांना सध्या विविध जंगलातून येणाऱ्या नर वाघांकडून धोका आहे, यामुळे वाघिणींनाही त्रास होतो. ताडोबामध्येही असे प्रकार झाले आहेत, यामुळे वाघाच्या नवजात बछड्यांचे जीवनचक्र बिघडते व हे कोणत्याही जंगलातील वन्यजीवनाच्या भविष्यासाठी वाईट आहे. आपण लवकरात लवकर पावले उचलत नाही व स्थलांतर करणाऱ्या वाघांसाठी जागा तसेच कॉरिडॉर उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये बहुतेकवेळा वाघीणी छोट्या बछड्यांना वाघांपासून लांब दुसऱ्या भागांमध्ये घेऊन जातात व त्यामुळे माणूस व प्राण्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो किंवा बछड्यांना मानवी धोक्यांना तोंड द्यावे लागते उदाहरणार्थ विजेचा प्रवाह सोडलेले कुंपण किंवा एखाद्या उघड्या विहीरीमध्ये पडणे, यामुळे परिणामी शेवटी वाघाचा मृत्यू होतो. वन विभाग या सर्व गोष्टी स्वतःहून करू शकत नाही, त्यासाठी राजकीय नेत्यांचा भक्कम आधार मिळाला तर निश्चितपणे उपयोग होईल.अशा काही गोष्टींचा अपवाद वगळता, उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य हा एक सुखद अनभव आहे, मात्र गाईडना अधिक चांगल्याप्रकारे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे तसेच आणखी मार्गही खुले केले पाहिजेत म्हणजे वन्यजीवन आणखी चांगल्याप्रकारे पाहता येईल. मला प्रश्न पडतो की नवीन रस्ते खुले करण्यात किंवा तयार करण्यात वन विभागाला काय अडचण आहे, तसेच जंगलातील रस्त्यांची पुरेशी देखभाल का केली जात नाही, कारण यामुळे जंगलाचा आणखी भाग पर्यटकांच्या तसेच वन कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली येईल. वन विभागाचे बहुतेक ज्येष्ठ कर्मचारी एकीकडे वन्यजीवन संवर्धनामध्ये वन्यजीवन पर्यटनाचे महत्त्व स्वीकारतात त्याचवेळी दुसरीकडे प्रत्यक्षात त्यासाठी कोणतीही सकारात्मक पावले उचलली जात नाहीत, यामध्ये जंगलातील अधिक मार्ग उघडणे, पर्यटकांसाठी जंगलातील सर्व चौकींवर प्रसाधनगृहे उभारणे, गाईड तसेच सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देणे, त्यांना राज्यातील व देशातील इतर जंगलांची ओळख करून देणे अशा अनेक गोष्टी करता येतील.
प्रिय नितीन गडकरी साहेब व वन विभाग आपल्याला उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यासारखा समृद्ध ठेव्याचे वरदान लाभले आहे, आपल्या भावी पिढ्यांसाठी त्यामध्ये भर घालायची किंवा ते वाया घालवायचे याची निवड पूर्णपणे आपण करायची आहे व आपल्याला हातात वेळ अतिशय कमी आहे, एवढे बोलून निरोप घेतो (तुम्ही ही निसर्गाची धमकी सुध्दा समजू शकता !)
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स.
Smd156812@gmail.com
पुण्यातील रिअल इस्टेटविषयी माझे विचार खालील यू ट्यूब दुव्यावर पाहा..
https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s
No comments:
Post a Comment