“आयुष्य सुंदर व्हावे यासाठी,तुम्ही स्वतःकर्तव्यदक्ष झाले पाहिजे” …, डॉ. पी. एस. जगदीश कुमार
पी. एस. जगदीशकुमार हे युनिव्हर्सिटी ऑफ डॉ. पीएसजेकुमार, जॅक्सनव्हिला, फ्लोरिडा, युनायटेड स्टेट्सचे संस्थापक व कुलगुरू आहेत. इतकी बुद्धिमान मंडळी अमेरिकेमध्येच स्थायिक होतात यात काहीच आश्चर्य नाही कारण पूर्णपणे आदराने (व दुःखाने) असे सांगावेसे वाटते की आपल्या देशामध्ये एखाद्या बुद्धिमान व्यक्तीच्या बुद्धीचे मोल त्याच्या बँक खात्यातील शिलकीवरून मोजले जाते. असो, मी डॉ. जगदीशकुमार यांच्या अवतरणाची मदत घेतली कारण याविषयी भारतीय व्यवसाय समुदायामध्ये (म्हणजे उद्योजकांमध्ये) क्वचितच चर्चा केली जाते, तरीही कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तो अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. होय, मी त्या जादुई शब्दाविषयी बोलतोय, जो आपल्यापैकी प्रत्येकाला (जे कर्मचारी आहेत) एप्रिल महिन्यात ऐकायचा असतो व काही लोकांना (गुप्तपणे) तो शब्द अजिबात आवडत नाही (मालकांशिवाय दुसरे कोण असू शकते) व तो शब्द म्हणजे पगारवाढ! असे पाहिले तर केवळ काही उद्योगच नव्हे तर संपूर्ण जगच बक्षिसावर चालते व पगारवाढ हा त्याचा एक पैलू झाला. तुम्ही अपेक्षेपेक्षा अधिक काही साध्य केल्यावर किंवा तुम्ही अपयशी ठरलात तरीही तुमच्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी बक्षिस दिले जाते. नोकरीरूपी नाण्याच्या संदर्भात नेहमीच दोन बाजू असतात. नाण्याच्या या दोन बाजू म्हणजे, कर्मचारी व मालक हे सांगायची गरज नाही व ते दोघेही बक्षिसाकडे आपापल्या नजरेतून पाहतील. कुणीही कर्मचारी तो किंवा ती कामाला न्याय देत नसल्याचा विचार करणार नाहीत व ते नेहमी त्याच्या किंवा तिच्या पगारापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करत आहेत असाच विचार करतील. तर मालक कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी कधीही समाधानी नसेल. पगारवाढरूपी बक्षिस मिळविण्याची त्यांची योग्यता नाही असाच विचार करेल. म्हणूनच आजकाल एक संघ राखून ठेवणे (केवळ कर्मचारीच नव्हे), सर्व उद्योगांसाठी दिवसेंदिवस एक समस्या होत चालली आहे, विशेषतः रिअल इस्टेटच्या संदर्भात जेथे कर्मचाऱ्यांचा दर्जा एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीएवढा अथवा माहिती तंत्रज्ञान कंपनीएवढा उत्तम नसतो. रिअल इस्टेटमधील मालकांनाही हे लागू होते, कारण या उद्योगामध्ये मालक होण्यासाठी विशिष्ट कौशल्ये किंवा ज्ञानाची (किंबहुना तो एक अडथळा असतो) गरज नसते (म्हणजेच मालक किंवा व्यावसायिक, म्हणजेच बांधकाम व्यावसायिक होण्यासाठी). परिणामी कर्मचारी व मालक या दोघांचाही दर्जा ही एक समस्या असते. इथे मी दर्जा हा शब्द व्यावसायिक किंवा ज्ञानाच्या संदर्भात तसेच इतर निकषांच्या संदर्भात वापरत आहे, इथे माणसाच्या चांगुलपणाशी किंवा वाईटपणाशी काही संबंध नाही.
तुम्हाला (म्हणजे रिअल इस्टेटशी संबंधित प्रत्येकाला) हे फारच जिव्हारी लागले असेल, तर केवळ स्थापत्य अभियांत्रिकीच नव्हे तर कोणत्याही विद्याशाखेतील गुणवान विद्यार्थ्यांना विचारा, त्याच्या किंवा तिच्या शिक्षणानंतर ते कोणती कंपनी किंवा उद्योगात जातील. जर दहा विद्यार्थ्यांपैकी तीन जणही म्हणाले की त्यांना त्यांचे पुढील करिअर क्षेत्र म्हणून रिअल इस्टेट उद्योगात जायचे आहे, तर मी माझे वरील विधान काढून टाकेन. हे त्रासदायक आहे परंतु वाईट आहे व अशी परिस्थिती का आहे, तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. परंतु सध्यातरी पगारवाढ व यासंदर्भात नाण्याच्या दोन्ही बाजूंकडून असलेल्या अपेक्षा याविषयावर लक्ष केंद्रित करू. मी सध्या जरी मालकाच्या भूमिकेत असलो तरीही माझ्या कारकिर्दीची निम्मी वर्षे मी कर्मचारी म्हणूनही काम केले आहे. म्हणूनच मी या विषयाचे (म्हणजेच संवेदनशील विषयाचे) विश्लेषण करू शकतो असे मला वाटते. अर्थात याचा अर्थ मी अगदी उत्कृष्ट कर्मचारी होतो किंवा अगदी सर्वोत्तम मालक आहे असा अर्थ होत नाही. कारण असे काहीही अस्तित्वात नसते, अर्थात तुम्ही स्वघोषित असाल तर मात्र गोष्ट वेगळी, हाहाहा! सर्वप्रथम मला असे वाटते की पहिला अडथळा हा रिअल इस्टेट क्षेत्रात रुजू होणाऱ्या व्यक्तीच्या मूलभूत गुणवत्तेचा (म्हणजेच दर्जाचा आहे) आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा व्यवसायाच्या स्वरुपाचा आहे, जेथे इतर कोणत्याही उद्योगाच्या तुलनेत यंत्रणा व यंत्रसामग्रीपेक्षाही माणसांवर जास्त अवलंबून राहावे लागते. यामुळे सर्व गोष्टी थोड्या त्रासदायक व बेभरवशाच्या होतात. इथेही तुम्ही (रिअल इस्टेटमधील व्यक्ती) माझ्याशी सहमत नसाल तर कुणाही व्यक्तीला (अगदी रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्याही) रिअल इस्टेटच्या कामकाजाविषयी विचारा, एखाद्या रिअल इस्टेट कंपनीविषयी त्याचा किंवा तिचा अनुभव विचारा व तुम्हाला काय उत्तर मिळते (म्हणजे मत) ते मला सांगा. दहापैकी तीन व्यक्तीही म्हणाल्या की रिअल इस्टेट कंपनीशी व्यवहार करताना त्यांचा अनुभव अतिशय आनंददायक होता तर मी हे वाक्यही या लेखातून काढून टाकेन. तर आता मुख्य विषयाबद्दल बोलू, म्हणजेच पगारवाढीबद्दल, रिअल इस्टेटमध्ये आपण ज्याला काम म्हणजेच कर्तव्य म्हणतो त्याविषयीची कर्मचारी तसेच मालकांचीही समज कमी आहे, त्यामुळेच बक्षिस तसेच पगारवाढ हा नेहमीच मतभेदाचा मुद्दा असतो. जो संघ ग्राहकांना व्यावसायिकदृष्ट्या समाधान देऊ शकत नाही, जो कामाविषयी व त्याच्या परिणामाविषयी एकमेकांच्या अपेक्षांची पूर्तता कसा करेल हा मुख्य मुद्दा रिअल इस्टेटमधील लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे. बहुतेक कंपन्यांमध्ये कामाची एक योग्य यंत्रणाच अस्तित्वात नाही व एखाद्या ठिकाणी यंत्रणा अस्तित्वात असेल तर त्या यंत्रणेचा योग्य तो वापर करण्याऐवजी तिचा काम टाळण्यासाठी किंवा जबाबदारी झटकण्यासाठीच वापर केला जातो. हे दोन्ही बाजूंनी घडत आहे हे कटू सत्य आहे. रिअल इस्टेटमधील लोकांनी कामाच्या म्हणजेच कर्तव्याच्या बाबतीत त्यांच्या दृष्टिकोनाविषयी थोडेसे आत्मपरीक्षण केले पाहिजे, हाच माझ्या लेखाचा उद्देश आहे. आता दशकभरापूर्वी जशी परिस्थिती होती तशी सोनेरी, उज्ज्वल (व पैसे मिळवून देणारी) परिस्थिती राहिलेली नाही, मागणीपेक्षाही पुरवठा जास्त आहे व आर्थिक ताळेबंद जुळवण्यासाठी झटापट करावी लागतेय, किमतींमध्ये फारशी वाढ होणार नाही व लोकांच्या अपेक्षा (म्हणजे ग्राहकांच्या व सरकारच्या) अपेक्षा वाढणार आहेत. तुम्हाला तुमच्याकडून कोणत्या कामाची अपेक्षा आहे हे समजले व त्यापेक्षाही अधिक चांगले काम केले तरच तुम्ही या सगळ्याला तोंड देऊ शकाल, हा माझा रिअल इस्टेटमधील संघांना इशारा आहे. याचा अर्थ असा होत नाही की सगळे काही वाईट आहे व रिअल इस्टेटमध्ये कुणीही समर्थ नाही (कर्मचारी तसेच मालक), परंतु माझ्या म्हणण्याचे तात्पर्य एवढेच आहे की परिस्थिती बदलल्यामुळे आगामी काळात आपली कौशल्ये पणाला लागणार आहे जे पूर्वी कधीच झाले नव्हते. त्याचप्रमाणे आपल्याला मिळणाऱ्या बक्षिसाचेही विश्लेषण करण्याच्या पद्धतींमध्येही बदल होणार आहे, आपण खरोखर कशासाठी पात्र आहोत याविषयी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, कारण हे केवळ सदनिकांची विक्री, महसूल किंवा नफा वाढवण्याविषयी नाही, हे होण्यासाठी आपण कोणती पावले उचलतो आहोत हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने आधी आपले काम व आपण ते करण्यामागचा हेतू समजून घेणे आवश्यक आहे, तरच आपल्याला परिणाम दिसून येईल, ज्यामध्ये अर्थातच नफा व उलाढालीचाही समावेश असेल.
मी याविषयी माझ्या संघाला एक पत्र लिहीले, ते येथे देत आहे कारण ते वाचनांही उपयोगी पटेल असे वाटले व शेवटी फक्त पुढील शब्द सांगावेसे वाटतात; कर्तव्याचे सर्वोत्तम बक्षिस म्हणजे आदर व सन्मान, जो कोणत्याही पैशाने खरेदी करता येत नाही...!
६ ५ २३
"कर्तव्य म्हणजे तुम्हाला ज्याला कुठल्यातरी पैसे मिळतात म्हणून तुम्ही करत असलेली एखादी कृती नव्हे, तुम्हाला स्वतःला अभिमान वाटावा म्हणून तुम्ही काहीतरी करता "...
प्रिय सहकाऱ्यांनो
मी तुम्हाला रोज सकाळी एक सुविचार पाठवतो व ते सुद्धा मला माझ्या संघाप्रती कर्तव्य वाटते, अर्थात तुम्ही तो वाचणे हे तुमचे स्वतःबद्दलचे कर्तव्य आहे, तुम्हाला तो समजला का किंवा तुम्ही त्यावर काही विचार केला का (या लेखाचा हा मुख्य विषय आहे) ही पुढची गोष्ट झाली. कर्तव्ये दोन प्रकारची असतात, एक म्हणजे तुमचे इतरांसाठीच्या भूमिकेतील कर्तव्य, मग ती मुलाची किंवा पत्नीची किंवा मित्राची किंवा कर्मचाऱ्याची असेल व दुसरे कर्तव्य म्हणजे तुमचे स्वतःबद्दलचे कर्तव्य व यशस्वी होण्यासाठी या दोन्ही कर्तव्यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. तुम्ही अलिकडे विचार करत असाल की तुमचा साहेब अतिशय गरम डोक्याचा असून, सतत नाराज असतो, मी तुम्हाला दोष देणार नाही कारण मी तुमचे विचार नियंत्रित करू शकत नाही, परंतु मला वर्षातील या पगाराच्या दिवशी (जो पगारवाढीसकट आहे) तुम्हाला एक गोष्ट सांगाविशी वाटते. माझी नाराजी नफा किंवा तोटा किंवा सदनिकांची विक्री किंवा खर्चात कपात यासाठी कधीच नसते (व नव्हती), तर ती केवळ तुम्हा लोकांच्याच नव्हे तर या संपूर्ण पिढीच्या दृष्टिकोनाविषयी आहे, माझी मुलेही त्याला अपवाद नाहीत. मी कुणालाही दोष देत नाही, फक्त विश्लेषण करतोय ! आपण सगळे आपल्या स्वतःबद्दलची कर्तव्ये अतिशय चांगल्याप्रकारे पार पाडतो म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करणे किंवा आपल्या वैयक्तिक हक्कांसाठी झगडणे, परंतु जेव्हा इतर भूमिकांमध्ये इतरांबद्दलची कर्तव्ये पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा आपण (म्हणजे तुमची पिढी) सपशेल कमी पडतो. मग डायरी ठेवणे असेल किंवा एखाद्या ईमेलला उत्तर द्यायचे असेल किंवा विविध बिलांचे पैसे भरायचे असतील किंवा वेळेची शिस्त पाळायची असेल किंवा संवादासाठी एखाद्या यंत्रणेचे पालन करायचे असेल (ही यादी खरोखरच मोठी आहे), आपल्यापैकी कुणालाही हे कर्तव्य पार पाडण्यात रस नसतो व परिणामी केवळ आपल्या कंपनीची उलाढालच कमी होत नाही तर संपूर्ण संघाची (म्हणजे तुमच्यापैकी बहुतेकांची) तसेच तुम्हा सातही जणांची व्यक्ती म्हणून वैयक्तिक वाढ खुंटते. मी नाराज आहे कारण या अपयशासाठी तुमचा संघ प्रमुख म्हणून मी स्वतःला दोष देतो. याचा अर्थ माझ्यात काहीच दोष नाहीत व माझे नेहमी बरोबरच असते असा अर्थ होत नाही, तुम्ही स्वतः तपासून पाहा, संघाचा सदस्य म्हणून तुम्ही किती वेळा चूक केली आहे व मी किती वेळा केली आहे व तरीही मी केलेल्या चुकीचा दोष मी तुमच्या माथी मारला आहे.
माझ्या या संपूर्ण लेखाचे कारण म्हणजे, बाहेरील जगात परिस्थिती झपाट्याने बदलतेय. तुमच्यापैकी कुणीच आयुष्यभर संजीवनीमध्येच राहण्याची शपथ घेतलेली नाही हे मान्य असले तरीही, तुम्ही जेवढा काळ इथे असाल तेव्हा तुमचे कर्तव्य समजून घेतले व ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तर मला आनंद होईल व तुम्ही आपल्या संघासाठी काम करत नसाल तर मी नाराज होईन, माझ्या कर्तव्याकडे पाहण्याचा माझा हाच दृष्टिकोन आहे. या काळात ज्यांना ग्राहकांच्या गरजा समजतील व ते त्यांची पूर्तता करतील, केवळ तेच टिकून राहतील व चांगल्याप्रकारे टिकून राहतील. उरलेले काही नष्ट होणार नाहीत परंतु श्री. बच्चन यांनी मि. नटवरलालमध्ये म्हटल्याप्रमाणे, “ये जिना भी कोई जिना है लल्लू”, सारखे आयुष्य असेल. तुम्हाला कसल्याही प्रकारचा अभिमान किंवा कल्पकता नसलेले आयुष्य जगायचे आहे किंवा असे आयुष्य जगायचे आहे जेथे यशाची खात्री नसेल पण तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न केला याचा अभिमान व आनंद असेल याची मात्र निश्चित खात्री आहे, आता हे तुमच्यावर अवलंबून आहे.
म्हणूनच सहकाऱ्यांनो, पुढे जाताना तुमच्या गरम डोक्याच्या साहेबाच्या शब्दांवर विचार करा व पुढे कसे जगायचे आहे याचा मार्ग निवडा, एवढे सांगून मनःपूर्वक शुभेच्छा देतो!
तुमचा साहेब व एक माणूसही !
संजय देशपांडे
संजीवनी डेव्हलपर्स.
Smd156812@gmail.com
पुण्यातील रिअल इस्टेटविषयी माझे विचार खालील यू ट्यूब दुव्यावर पाहा..
https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s
No comments:
Post a Comment