Monday 8 May 2023

सातपुडाचे जंगल,एक हिरवे बेट !
























तुम्ही वादळात पडलेलं घर पुन्हा बांधू शकता; कोसळलेला पूल पुन्हा उभारू शकता; रस्ता वाहून गेला असेल तर त्यात पुन्हा भराव टाकू शकता. परंतु एखाद्या झाडाच्या बाबतीत मात्र खेद व्यक्त करण्याशिवाय काहीच करता येत नाही.” …  लुईस डिक्स रिच

लुईस डिकनसन रिच या अमेरिकेच्या न्यू इंग्लंड प्रदेशातील विशेषतः मसॅच्यूसेट्स व माईन येथील लेखिका होत्या, त्या कादंबऱ्या व ललित लेखनासाठी ओळखल्या जातात. मी अमेरिकेच्या या भागांना भेट दिली आहे व आजही तेथे घनदाट जंगले आहेत. यामुळेच लुईन यांना जंगलांविषयी प्रेम व जिव्हाळा वाटतो यात काहीच आश्चर्य नाही. वरील अवतरणामध्ये त्यांनी आपल्याला त्यांच्या शब्दांमधून इशारा दिला आहे. जेव्हा लेखाचा विषय जंगलांशी संबंधित असतो तेव्हा त्याची सुरुवात करण्यासाठी लुईस यांचे वरील शब्द अगदी समर्पक आहेत. या जंगलांमध्येच माझी वन्यजीवनाशी ओळख झाली व अजूनही हे ठिकाण अथांग हिरव्या समुद्रासारखे आहे (सुदैवाने अजूनही आहे). मी अलिकडेच मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली त्याविषयी बोलत आहे व अनेकांना त्याविषयी फारसे माहिती नाही, निस्सीम वन्यजीवप्रेमीही या ठिकाणाला वारंवार भेट देतात व याचे कारण म्हणजे याचा विस्तार. हा व्याघ्र प्रकल्प जवळपास २२०० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात विस्तारलेला आहे व हा केवळ व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य भाग आहे. या प्रकल्पाच्या भोवतालीही सगळीकडे जंगल आहे व या जंगलामध्ये डोंगर, पर्वत, कडे, दऱ्या, घळई, जलस्रोत, नद्या, डबकी, तळी आहेत व घनदाट जंगलांच्या पट्ट्यांमुळे वाघ दिसणे जवळपास असते होते. दुर्दैवाने (किंवा सुदैवाने) वन्यजीवप्रेमांचाही सगळा भर वाघ पाहण्यावरच असतो (तरीही ते स्वतःला वन्यजीवप्रेमी म्हणवतात हा विनोदच म्हणावा लागेल). म्हणूनच सातपुडा समुद्रातील एका बेटाप्रमाणे आहे परंतु हे बेट वन्यजीवनाने समृद्ध आहे.

तुम्हाला कदाचित मी अतिशयोक्ती करतोय असे वाटत असेल कारण जेव्हा आपल्या देशातील जंगलांविषयी चर्चा होते तेव्हा कान्हा, रणथंबोर, कॉर्बेट, बांधवगढ, तसेच ताडोबा हीच नावे पुढे येतात. लोकहो, माफ करा हजारो जंगले किंवा अधिवासांचा किंवा त्यातील रहिवाश्यांचा अनादर करण्याचा माझा हेतू नाही. परंतु फेसबुकवर वन्यजीवनाचा कोणताही ग्रूप उघडा, त्यावरील छायाचित्रे व त्यांची ठिकाणे पाहा. याचे कारण म्हणजे, या ठिकाणी सहज जाता येते व इथे वाघ दिसण्याची सर्वाधिक शक्यता आहे. दुसरा एक पैलू म्हणजे आपण (म्हणजे अगदी सरकारही) कधीही वन्यजीवन किंवा जंगलांची प्रसिद्धी करत नाही तर एखाद्या प्रजातीची म्हणजे चित्ता किंवा बारशिंगा किंवा गेंड्याची प्रसिद्धी करतो, एखाद्या ठिकाणाची वा तेथील अधिवासाची नाही कधीच नाही. त्यामुळेच सातपुड्यामध्ये जे काही आहे त्यासाठी त्याला पुरेसे श्रेय मिळत नाही. परंतु एखाद्या मूर्खाला हिऱ्याची काळजी नसेल किंवा किंमत नसेल तर तो हिऱ्याचा नाही तर त्या मूर्खाचा दोष आहे, असे मी आमचा गाईड निकेश याला आमच्या पहिल्या सफारीत सांगीतले. तो मला म्हणाला, त्यांच्याकडे वाघ लवकर दिसत नसल्यामुळे कमी पर्यटक येतात परंतु त्यांचे जंगल अतिशय सुंदर आहे”! त्याचे शेवटचे वाक्य, “आमचे जंगल अतिशय सुंदर आहे”, हे सर्वात महत्त्वाचे व हृदयस्पर्शी होते. त्याने त्याचा उल्लेखआमचे जंगल असा केला व त्यामुळे मला अतिशय आनंद झाला. ज्या मुलाने सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील जंगलातच त्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याला इथल्या जंगलाच्या सौंदर्याविषयी सांगायची गरज नाही असे मी निकेशला म्हणालो. मी तरूणपणी अनेकदा मेळघाटाला भेट दिली आहे परंतु ते सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये महाराष्ट्राच्या बाजूला आहे. मध्यप्रदेशात ही जंगले सातपुडा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो

व तर महाराष्ट्रामध्ये त्याला मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणतात. पुण्या-मुंबईकडचे बहुतेक लोक तेथील जंगलांपेक्षाही कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंसाठी या भागाला ओळखतात, ही दुर्दैवी बाब आहे.

मेळघाटाच्या व्याघ्र प्रकल्पामध्येही, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या बाजूने प्रवेश करावा लागतो तेथेही वाघ कमी दिसतात कारण तिथला भूप्रदेश व विस्तारही सारखाच आहे. परंतु कमी शहरीकरणामुळे (तसेच कमी लोकसंख्या) मेळघाटाचा मध्यप्रदेशातील भाऊ सातपुडा व्याघ्र प्रकल्प अतिशय कमी मानवी हस्तक्षेप असलेला व शांत भाग आहे. तो बैतुल व नर्मदापूरम (पूर्वीचे होशंगाबाद) जिल्ह्यांमध्ये, नागपूरपासून साधारण २७० किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या तरूणपणी एवढे अंतर पार करणे म्हणजे दिव्यच असे. परंतु आता चौपदी महामार्ग झाल्यामुळे, तुम्ही नागपूरहून एवढे अंतर चार तासात पार करू शकता, जो माझ्यासाठी एक आश्चर्याचा धक्काच होतात. वर्षानुवर्षे अमरावतीहून मेळघाटातून बैतुलच्या दिशेने जाणारा मार्ग म्हणजे माझ्यासाठी स्वप्नवत प्रवास असायचा कारण हा संपूर्ण रस्ता मेळघाटाच्या जंगलातून जातो. परंतु मला आजपर्यंत कधीही बैतुलपर्यंत जाण्याचे व सातपुड्याच्या जंगलामध्ये प्रवेश करण्याचे भाग्य मिळाले नाही. परंतु यावेळी माझी इच्छांच्या यादीतील ही इच्छादेखील पूर्ण झाली, त्याचशिवाय आणखी एक इच्छाही पूर्ण झाली ती म्हणजे संध्याकाळच्या संधीप्रकाशात एक बिबट्या चालत येताना दिसला. सातपुडा पर्वत रांगा कदाचित मध्य भारतातील सर्वात जुन्या आहेत व तुम्ही नागपूरपासून सुरुवात करून कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या चिमणीतून निघणारा धूर पाहात पुढे जाता तिथून पुढे जंगलाची सुरुवात होते, तुम्ही सातपुड्याच्या कोअर भागात पोहोचेपर्यंत अखंड जंगल आहे व माझी खात्री आहे की पुढेही जंगलच असेल.  इथे उद्योग, शहरीकरण, माहिती तंत्रज्ञान, विमानतळ असे काहीही नाही हे एकादृष्टीने वरदान आहे, परंतु त्यामुळे इथे राहणाऱ्या माणसांचे जगणे खडतर होते. मला असे वाटते सातपुड्यासारख्या जंगलांच्या संवर्धनामध्ये हेच सर्वात मोठे आव्हान आहे. योगायोग म्हणजे, यावर्षी उन्हाळ्यातच सातपुडा व्याघ्र प्रकल्पाला माननीय पंतप्रधानांच्या हस्ते भारतातील सर्वोत्तम व्यवस्थापन असलेला दुसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प म्हणून गौरविण्यात आले. याच्या ठिकाणामुळे व विस्तारामुळे या जागेचे व्यवस्थापन करताना येणाऱ्या अडचणी हे त्याचे एक कारण असावे. सातपुडा जंगलांची दोन मुख्य प्रवेशद्वारे आहेत, चुरना व मडई व दोन्ही प्रवेशद्वारांदरम्यानचे अंतर तर जवळफास १०० किलोमीटर आहे, यावरून तुम्हाला सातपुड्याच्या जंगलाच्या विस्ताराची कल्पना येऊ शकेल. येथील बफर व कोअर क्षेत्रामध्ये काही गावे होती त्यांचे नुकतेच स्थलांतर करण्यात आले व या जमीनी पूर्ववत करण्याचे काम प्रगतीपथावर होते. ही अतिशय रोचक प्रक्रिया असते कारण या गावांमध्ये विटा/मातीपासून बांधलेली घरे, शाळेची इमारत, शेतजमीनी व बजरंगबलीचे लहानसे देऊळ होते (मध्य भारतातील प्रत्येक गावामध्ये ते आवर्जून असते). आता वनविभाग मंदिरे वगळता सर्व बांधकाम पाडून टाकेल. शेतजमीनींचा वापर कुरणे म्हणजे गवताळ पट्टे तयार करण्यासाठी केला जाईल यामुळे हिंस्र प्राण्यांना अधिक शिकार मिळण्यास मदत होईल व हा एक अतिशय सुंदर अधिवास तसेच जंगलाचा पट्टा तयार होईल. गाईडनी दिलेल्या माहितीनुसार या निर्जन गावांमध्ये आत्तापासूनच बऱ्याच वन्यप्राण्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत व हे चांगले लक्षण आहेवन्य प्राण्यांच्या वाढत्या संख्येसाठी जागा उपलब्ध करून देणे सर्व वनविभागांपुढे मोठे आव्हान असणार आहे. या महाकाय कामासाठी सातपुड्यासारख्या दुर्गम भागामध्ये करण्यात आलेल्या प्रयत्नांचे आपण कौतुक केले पाहिजे. या दुर्गम भागामुळे केवळ वन विभागाचेच नव्हे तर खाजगी सेवा पुरवठादारांचे कामही अवघडच होते जे अशा ठिकाणी पर्यटनासाठी सर्वात आवश्यक असतेमला चुरना येथे, माझा अनेक वर्षांपासूनचा तरूण मित्र चिन्मय देशपांडे भेटला, त्याने वन्यजीवन हेच त्याचे करिअर म्हणून निवडले आहे. तो सध्या चुरना प्रवेशद्वारापाशी बोरी रिसॉर्टचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्याच्या रिसॉर्टमध्ये जवळपास पन्नास स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला आहे. त्यांच्यामध्ये कौशल्य विकास घडवून आणणे हे अवघड काम आहे, सातपुड्यामध्ये वाघ शोधण्यापेक्षाही अवघड. परंतु आपल्याला अशा जागांची व लोकांची गरज असते, कारण तेव्हाच त्यांचे ज्ञान तसेच कौशल्याचा जंगलांच्या संवर्धनासाठी सकारात्मकपणे वापर केला जाऊ शकतो. एखाद्याला असे वाटेल की, या गावकऱ्यांचे स्थलांतर करणे, त्यांना पैसे देणे, तसेच स्थायिक होण्यासाठी पर्यायी जागा देणे अशी काय मोठी गोष्ट आहे. त्यांच्या जमीनीच्या बदल्यात एखादी ओसाड जमीन देऊन तिथे सर्व पायाभूत सुविधा द्यायला काय हरकत आहे, बरोबर? परंतु, तुम्ही हेच सूत्र पुणे किंवा मुंबईतील झोपडपट्ट्यांसाठी लावून बघा, तिथेही ते का यशस्वी होत नाहीयाचे उत्तर सोपे आहे, ते म्हणजे कोणत्याही बदलाला नकार देण्याची मानवी प्रवृत्ती व तुमच्या पिढ्यान् पिढ्या शेकडो वर्षांपासून जेथे राहात असतात तेथून हलणे सोपे नसते. त्याऐवजी, आपण त्यांना जंगलांसोबतच जगवू शकतो व त्यांना आजूबाजूच्या आस्थापनांमध्ये नोकरी मिळवून देऊ शकतो, असा तोडगा नेहमीच सगळ्यांचा फायद्याचा असतो.

सातपुड्यामध्ये एक गोष्ट करणे आवश्यक आहे ते म्हणजे गाईडना योग्य ट्रेनिंग प्रामुख्याने संभाषण कौशल्यांविषयी तसेच जंगलांविषयी त्यांना असलेले ज्ञान पर्यटकांच्या फायद्यासाठी वापरण्याविषयी. सातपुड्यासारख्या जंगलांमध्ये, तुम्हाला वाघाचे अस्तित्व सतत जाणवत असते परंतु तो दिसणे अवघड असते व वाघ न दिसल्याने पर्यटक वैतागू शकतात. अशावेळी गाईडची भूमिका महत्त्वाची असते, तो पर्यटकांना जंगलाविषयी गोष्टी तसेच माहिती सांगून गुंतवून ठेवू शकतो व जंगलाचे निखळ सौंदर्य दाखवून देऊ शकतो किंवा त्याचा आस्वाद कसा घ्यायचा हे सांगू शकतो. सातपुड्याच्या वनविभागाने स्वयंसेवी संस्था तसेच व्यावसायिक संस्थांच्या मदतीने यासंदर्भात काम केले पाहिजे व सरकारने ही गुंतवणूक आहे असा विचार करून खर्च केला पाहिजे. सर्वात शेवटाचा मुद्दा म्हणजे जंगलाशी निगडित काही रोचक गोष्टी असतात व सातपुडाही या नियमाला अपवाद नाही, किंबहुना त्यातील घनदाट हिरवाईमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. मी जंगलातील वेगळ्या घडामोडींविषयी नेहमीच प्रश्न विचारतो कारण त्यातून जंगलांविषयी आश्चर्यकारक गोष्टी समजतात असा माझा अनुभव आहे. मला बारादेवांविषयी अशीच एक गोष्ट समजली. कोअर क्षेत्रात एका वळणावर मला एक लहानसे देऊळ दिसले व तिथे एक वृद्ध आदिवासी त्या देवळावर दगड ठेवत होता. हे बारा देवांपैकी एक होते, फार पूर्वी बारा भाऊ जंगलाचे व या भागातील गावकऱ्यांचे रक्षण करत असत अशी दंतकथा आहे व त्यांच्या स्मरणार्थ सातपुड्याच्या जंगलामध्ये अशी बारा लहान देवळे बांधण्यात आली आहेत. एखाद्या गावकऱ्याची/आदिवासी व्यक्तीचा काही इच्छा असेल तर तो किंवा ती या बारापैकी प्रत्येक देवळाला भेट देतात व त्यावर एक लहान दगड ठेवतात त्यानंतर बारादेव त्यांची इच्छा पूर्ण करतात असे मानले जाते व आजही या भागात हे प्रचलित आहे, मी नुकतेच या विश्वासाचे उदाहरण पाहिले. गोष्टींविषयी बोलायचे झाले, तर मी जंगलाला दिलेल्या प्रत्येक भेटीमध्ये काही नवीन गोष्टीही तयार होतात, या भेटीची ही गोष्ट

 तोएकदृष्टिक्षेप!!

मी जंगलाला भेट देताना प्रत्येक वेळी एक सुप्त इच्छा असते, त्यापैकी काही अनेक दशकांपासून अपूर्ण राहिलेल्या आहेत

अशीच एक इच्छा म्हणजे बिबट्या रस्त्यावरून पुढे जात आहे व एका क्षणी तो थांबून मागे वळून माझ्या डोळ्यात पाहतो असे दृश्य पाहणे (म्हणजेच अनुभवणे)... मी जंगलांमध्ये जेवढा भटकतो तेवढी मला जाणीव होते की ही इच्छा पूर्ण होणे सोपे नाही कारण बिबट्या हा लाजाळू प्राणी आहे व आजूबाजूला वाघ असेल तर तो सहजपणे उघड्यावर कधीच येणार नाही. तरीही मला हेदेखील माहिती होते की जंगल तुम्हाला कधीही निराश करत नाही, केवळ तुम्ही संयम, सातत्य राखणे व प्रयत्नांसोबत तुमच्या ज्ञानाचाही वापर करणे आवश्यक असते व अचूक वेळी, अचूक ठिकाणी असण्यासाठी नशीबाचीही साथ लागते. सातपुड्याला नुकत्याच दिलेल्या भेटीमध्ये हे सगळे योग चुरना प्रवेशद्वारापाशी जुळून आले. मी म्हटल्याप्रमाणे सातपुड्यामध्ये जंगल अतिशय विस्तीर्ण आहे व वाघाचे क्षेत्र १०० चौरस किलोमीटरचेही असू शकते, यामुळे बिबट्यांनाही त्यांची स्वतःची भरपूर जागा मिळते व हा अधिवास त्यांच्यासाठी अतिशय योग्य आहे. उन्हाळ्याच्या एका संध्याकाळी सूर्य झपाट्याने मावळतीला जात होता, मी सफारीच्या सुरुवातीच आमच्या गाईडला म्हणालो होतो, सकाळी वाघाची हालचाल ज्या क्षेत्रात असेल, त्याऐवजी वेगळ्या क्षेत्रात जाऊ म्हणजे कदाचित बिबट्या दिसू शकेल. म्हणूनच, जेथे बिबट्या दिसण्याची शक्यता अधिक आहे अशा क्षेत्रात आम्ही फिरत होतो व एखाद्या पाणवठ्यावर जाताना किंवा तिथून येताना आम्हाला तो दिसू शकेल असे आम्हाला वाटले कारण या क्षेत्रात वाघ निश्चितपणे नव्हते, त्यामुळे येथे बिबट्या दिसण्याची रास्त शक्यता होती. आता हा निव्वळ नशीबाचा भाग असतो कारण या क्षेत्रातून बहुतेक जिप्सी निघून गेल्या होत्या. तसेच मेळघाटामध्ये उन्हाळ्यातील पिवळ्या करड्या पार्श्वभूमीवर बिबट्या दिसण्यासाठी आपल्यासोबत असलेल्या गाईडची बारिक नजर असणे आवश्यक असते व आमच्यासोबत निकेशच्या रूपाने ती होती. हा स्थानिक तरूण गाईड अचानक ओरडला, "साहेब, झुडुपांमध्ये बिबट्या आहे "! आता आम्हाला फक्त आमची जिप्सी सावकाश तेथून काढून बाजूला न्यायची होती व बिबट्याला रस्त्यावर येऊ द्यायचे होते, आम्ही तसेच केले. बिबट्याची तरूण मादी रस्त्यावर आली व चालत आमच्यापासून लांब गेली. धुळीने माखलेला रस्ता, मावळतीचा प्रकाश, बिबट्याच्या कातडीवरील ठिपके पाहून माझ्या हृदयाची धडधड वाढली होती कारण माझी आणखी एक इच्छा पूर्ण झाली होती. "मन में दूसरा लड्डू फटा" (माफ करा, याचा संदर्भ लक्षात येण्यासाठी कॅडबरीची जाहिरात पाहा), ती मागे वळून पाहील का, कारण तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता किंवा तिच्यापुढे गेले असतो तर ती पुन्हा जंगलात निघून गेली असते, त्यामुळे आम्ही केवळ एक अंतर राखून, तिच्या मागे जात राहीलो. तिला आम्ही तिथे असल्याची पूर्णपणे जाणीव होती परंतु आमचे वाहन वगळता तिथे पूर्णपणे एकांत असल्यामुळे ती आपल्याच गतीने चालली होती. पुढे एक तिठा होता (तीन रस्ते एक येणारी जागा) त्यामुळे कुठल्या दिशेने जायचे हे तिला ठरवायचे होते. त्याक्षणी, आपण कुठे जावे हे जणूकाही आम्हाला विचारत असावी अशा थाटात ती थांबली व तिने मागे वळून थेट माझ्या डोळ्यात पाहिले. एखादा डॉक्टर तिथे असता तर माझ्या हृदयाचे ठोके इतके वाढलेले पाहून त्याने मला सरळ रुग्णालयामध्ये भरती केले असते! मला एक छायाचित्र मिळाले कारण ती तेवढाच वेळ मला देणार हे माहित होत ,व मी छायाचित्र काढले. त्यानंतर मी माझा कॅमेरा बाजूला ठेवला व तिची चाल कौतुकाने न्याहाळत राहिलो. नंतर हृदयाचे ठोकेही पूर्ववत झाले व तीही रस्त्याला लागून असलेल्या जंगलात दिसेनाशी झाली. या सगळ्या नाट्यमय घडामोडी जेमतेम दहा मिनिटे सुरू असतील, परंतु मला वेळ कायमचा थांबला आहे असेच वाटत होते.

तिची ती माझ्याकडे पाहात असल्याची प्रतिमा, जणूकाही ती हसून चिडवत म्हणत असावी, झाली तुमची इच्छा पूर्ण!

सातपुड्यातून बाहेर पडताना, बिबट्याची मादी माझ्याकडे पाहात असल्याची प्रतिमा माझ्या मनावर कायमस्वरूपी कोरली गेली, मी तिला आश्वासन दिले, “लवकरच, पुन्हा भेटू”!

संजय देशपांडे 

संजीवनी डेव्हलपर्स.

 smd156812@gmail.com

पुण्यातील रिअल इस्टेटविषयी माझे विचार खालील यू ट्यूब दुव्यावर पाहा..

https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s

 

-

 

 

                                                               

 

 

 

 

  






















 

No comments:

Post a Comment