योग्य आकाराची घरे निवडताना !
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरात शांतता मिळते, मग तो राजा असो किंवा रंक, घरात तो सर्वात आनंदी असतो. …
जोहान वुल्फगँग व्हॉन गॉथे.
जोहान वुल्फगँग व्हॉन गॉथे हे एक जर्मन कवी, नाटककार, कादंबरीकार, वैज्ञानिक, राजकीय नेते, नाट्य दिग्दर्शक, व समीक्षक होते. त्याच्या साहित्य संपदेमध्ये नाटके, कविता, ललित व अभिरूचीपूर्ण समीक्षा, तसेच वनस्पतीशास्त्र, शरीरशास्त्र व रंग याविषयांवरील ग्रंथांचाही समावेश होतो. एवढे गुण (म्हणजेच ज्ञान) असल्यामुळे गॉथे घराचे वर्णन इतक्या सोप्या शब्दात करू शकतात यात काहीच आश्चर्य नाही, कारण शेवटी केवळ माणसेच नाही तर प्रत्येक सजीवासाठी घरालाच प्राधान्य दिले जाते (व ती गरजही आहे). माणूस सर्वात बुद्धिमान प्रजाती आहे (अर्थात स्वघोषित), जो घरे बांधण्याची कला केवळ शिकलाच नाही तर त्यात सुधारणाही केली व त्यांचा वापर व्यावसायिकपणे करायला सुरुवात केली. कारण माणसांशिवाय इतर कुठलीही प्रजाती इतरांसाठी घरे बांधत नाही. काही प्रजातींची थोडी उदाहरणे आहेत ज्या इतर प्रजातींच्या घरांवर अतिक्रमण करतात किंवा त्यावर कब्जा मिळवतात परंतु एखाद्या वाघाने दुसऱ्या एखाद्या वाघाला किंवा बिबट्याला घर विकले कारण तो जास्त पैसे देत होता असे तुम्ही कधी ऐकले आहे का?
मी थोडे विषयांतर केल्याबद्दल मला माफ करा, हा लेख वन्यजीवन किंवा निसर्गाविषयी नाही, परंतु हा संदर्भ घरचा विषयाशी संबंधितच आहे म्हणजेच, रिअल इस्टेट किंवा आपल्या प्रथम गरजांविषयी आहे. माझ्या वाचण्यात नुकतीच एक बातमी आली, त्यामध्ये करोनाच्या साथीनंतर पुण्यामध्ये मोठ्या आकाराच्या घरांची मागणी वाढली असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्या बातमीवरूनच मला या लेखाची प्रेरणा मिळाली. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय मोठेसे, कुणाला मोठे घर नको असते, आपल्या सगळ्यांना आपल्याकडे जेवढे आहे त्यापेक्षा अधिक मोठे घर हवे असते, अगदी वाघांनाही जंगलामध्ये अधिक मोठे क्षेत्र (मोठे घर, पुन्हा वन्य जीवनाचा संदर्भ दिल्याबद्दल माफ करा) हवे असते व त्याची बातमी करण्यासारखे काय आहे. एक अभियंता + बांधकाम व्यावसायिक म्हणून, मला एक अतिशय वाईट सवय आहे ती म्हणजे कोणतीही अस्पष्टता (जी खरेतर रिअल इस्टेटचा अविभाज्य भाग आहे) न स्वीकारणे, त्यामुळेच “मोठी घरे” हा शब्द वाचल्यानंतर माझे कुतुहल वाढले; कारण मोठे किंवा लहान अशी व्याख्या तुम्ही कशी कराल? म्हणजे मला चौरस फुटांची भाषा समजते परंतु एवढ्या चौरस फूट आकाराच्या घरांना लहान म्हणायचे व तेवढ्या चौरस फूट आकाराच्या घरांना मोठे म्हणायचे याचे काही निश्चित मोजमाप नाही. म्हणजे मला खोल्यांच्या आकारातील फरक समजू शकतो, म्हणजे ३ बीएचके घर हे १ बीएचके घरापेक्षा मोठे असते, परंतु बातमी अशी होती की पूर्वीपेक्षा २ बीएचके किंवा ३ बीएचके नाही तर आकारणी मोठया घरांची मागणी अधिक वाढली आहे. हे वाचूनच माझ्या डोक्यात घरांसंदर्भातल्या (मला बांधकाम व्यवसाय हा शब्द अजिबात आवडत नाही, आपण घर हा व्यवसाय शब्द का वापरू शकत नाहीत, रिअल इस्टेटमध्ये कार्यालयांचाही समावेश होतो, ज्याला आपण कामाची ठिकाणे म्हणू शकतो) आणि या विचाराने माझ्या डोक्यात घर केलं, कारण ठराविक खोल्यांच्या घरांमध्ये खोल्यांचा आकार किती असावा म्हणजे तो योग्य मानला जाईल कारण मोठा व लहान याविषयीचा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, बरोबर? जी व्यक्ती आयुष्यभर लहान शहरात राहिली आहे, जिथे त्यांना स्वतःच्या बंगल्याची सवय आहे (माझ्या पालकांप्रमाणे), ते पुण्याला आल्यानंतर त्यांना माझा ४ बीएचकेचा डुप्लेक्सही लहान वाटला, कारण या घराला बाह्य जगाशी संवाद साधणारा एकच दरवाजा होता, तर खामगावला, त्यांच्या बंगल्याच्या प्रत्येक खोलीचे दार बाहेरच्या दिशेने उघडते. तसेच त्यांना माझ्या बेडरूमचा आकारही लहान वाटला कारण त्यामध्ये फक्त पलंग, कपाट व ड्रेसिंग टेबलच बसू शकते. बेडरूममध्ये खुर्च्या ठेवण्यासाठी जागा कुठे आहे, असा प्रश्न त्यांना मला विचारला. त्यांचे गावी जसे घर आहे तशी घरे पुण्यामध्ये का बांधू शकत नाही हे समजून सांगताना मला त्यांना चटई क्षेत्र निर्देशांक, विक्रीयोग्य क्षेत्र, पुणे महानगरपालिकेचे स्थानिक कायदे, तसेच खर्चाचा ताळेबंद व इतरही पैलू (म्हणजेच निर्बंध) समजून सांगावे लागले. त्याचशिवाय आणखी एक बातमी होती की पुण्यासारख्या इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात मोठ्या घरांच्या मागणीत सर्वाधिक वाढ झाली आहे, यामुळेच ग्राहकांसाठी तसेच बांधकाम व्यावसायिकांसाठी योग्य घराचे (म्हणजे किंमत तसेच ठिकाण व क्षेत्र) महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.
मी आज ती बातमी वाचत असताना माझ्या मनात या आठवणी अचानक उमटून गेल्या. खोल्यांच्या आकार किती असावा म्हणजे त्याला योग्य आकार म्हणता येईल हा या उद्योगामध्ये बऱ्याच काळापासून वादाचा मुद्दा आहे. कारण सर्व बांधकाम व्यावसायिकांना व ग्राहकांनाही फ्लॅटमध्ये मोठ्या खोल्याच हव्या असतात, परंतु बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या दराने सदनिकांची विक्री करायची असते व ग्राहकालाही त्याच्या खिशाला परवडेल अशी सदनिका हवी असते, नेमकी इथेच खोल्यांच्या योग्य आकाराची व्याख्या बदलायला लागते, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच मला विविध खोल्यांमध्ये त्यांच्या आकारावरून फरक करायचा नाही किंवा प्रकल्पाचे नियोजन चांगला आकार किंवा वाईट आकार असे करायचे नाही, तर योग्य आकाराची घरे हा त्यासाठी योग्य शब्द होईल. त्यासाठी बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्ही तुमचा गृहपाठ केला पाहिजे, म्हणजे बाजाराचा तसेच आजूबाजूच्या विकासकामांचा अभ्यास केला पाहिजे ( हा एक विनोदच आहे, हे मला माहिती आहे), म्हणजे तुम्हाला विशिष्ट ठिकाणी घराचा योग्य आकार काय असू शकतो हे समजेल. तुम्ही गोंधळात पडला असाल तर मी तुमचा गोंधळ दूर करतो, रिअल इस्टेट हे अतिशय स्थानिक उत्पादन आहे, त्यामुळे प्रत्येक गाव व शहरानुसार त्याचा आकार बदलू शकतो. परंतु पुण्यासारख्या शहरामध्ये प्रत्येक परिसरानुसार हा बदल होतो उदाहरणार्थ, एखाद्या उच्चभ्रू भागात जसे की प्रभात रस्त्यावरील (असे मानतात पुण्यात) २ बीएचके घर १२०० चौरस फूटांचे असू शकते ( शहराचे सर्व प्रभाग चांगलेच असतात) तर आंबेगाव व सुससारख्या उपनगरांमध्ये २ बीएचके सदनिका ८५० चौरस फूटांची असू शकते, त्या-त्या जागेनुसार दोन्ही घरे योग्य असू शकतात. याचे कारण म्हणजे संबंधित बाजाराच्या गरजा, खर्च करण्याची क्षमता तसेच जीवनशैली यानुसार योग्य किंवा अयोग्य हे ठरवावे लागते. प्रभात रोड सारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये २ बीएचके सदनिकेची मास्टर बेडरूम (Toilet Attached) १२ फूट x १५/१६ फूट असू शकते तर तेच उपनगरातील सदनिकांमध्ये ती १०’६ फूट x १३ फूट असेल व इतरही खोल्यांचा असाच आकार असू शकतो. कितीही कमी किमतीची सदनिका असली तरीही एका जोडप्यासाठी मास्टर बेडरूममध्ये क्विन साईज बेड (५ फूट x ६ फूट) बसला पाहिजे, ४ फूट रुंद व १५ फूट उंच कपाट व २’६” रुंद ड्रेसिंग टेबल असले पाहिजे व पलंगाच्याभोवती हालचाल करण्यासाठी किमान २ फूटांची जागा असली पाहिजे, तसेच खोलीला लागून असलेल्या टॉयलेटच्या दरवाजापाशी थोडी मोकळी जागा असली पाहिजे, अगदी स्वस्त दरातील सदनिकेसाठी किंवा एमआयजी (मध्यम उत्पन्न गटासाठी) हा योग्य आकार आहे. तसेच तुम्ही एखाद्या सर्व सुखसोयींनी युक्त उंची सदनिकेसाठी ही मोजमापे वाढवली तरीही १२ फूट रुंदी व १६ फूट लांबीपेक्षा अधिक मापाची बेडरूम (म्हणजेच पैसा) बांधकाम व्यावसायिकासाठी किंवा ग्राहकासाठी वायाच जाईल, तरीही त्याला चुकीचा आकार असे म्हणता येणार नाही कारण काही जणांना तो आवडू शकतो व त्यांना जे आवडले आहे ते परवडूही शकते !
याच निकषानुसार, आपण बैठकीची खोली/जेवणाच्या खोलीचा आकार ठरवू शकतो, कारण आजकाल बऱ्याच कुटुंबांना त्यांच्या बैठकीच्या खोलीमध्ये टीव्ही नको असतो तर आपापल्या बेडरूम मध्ये हवा असतो, ज्यामुळे तुम्ही बैठकीच्या खोलीचा आकार कमी करू शकता व तेवढे चौरस फूट जागा बेडरूममध्ये वापरू शकता, म्हणजे तिथे टीव्हीसुद्धा लावता येईल. परंतु माझ्या मते ही चुकीची रचना झाली, कारण बेडरूम ही झोपण्यासाठी असते, एखाद्याला हवाच असेल तर खोली मध्ये लहानसा टीव्ही लावता येईल (सामान्यपणे घरातील महिलावर्ग किंवा ज्येष्ठ सदस्यांसाठी) म्हणजे बैठकीच्या खोलीत पाहुणे असतील तर त्यांना आपल्या खोलीत तो पाहता येईल. परंतु, पुन्हा यासाठी, तुम्ही घरांसाठी ज्या ग्राहकवर्गावर लक्ष केंद्रित करताय त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला पाहिजे व त्यानंतर सदनिकांची रचना केली पाहिजे, यामुळे तुम्हाला सदनिकेचा योग्य आकार ठरवता येईल. घरातील अतिशय महत्त्वाच्या भागांविषही आपण अगदीच अनभिज्ञ असतो व ते म्हणजे टॉयलेट तसेच स्वयंपाकघर.आपल्याला असे वाटते टॉयलेट्सचा संख्या जेवढी अधिक किंवा टॉयलेटचा आकार जेवढा मोठा तेवढी सदनिका मोठी. बहुतेक ग्राहक मला बाथरूममध्ये बाथटब किंवा जकुझी बसविणार आहे असे विचारतात, हे दोन्ही पुरेशा आकाराचे बसवायचे असतील तर त्यासाठी किमान ६ फूट रुंद व ९ फूट लांब जागा लागते. बहुतेक ग्राहक बाथटब किंवा जकुझी केवळ महिन्यातून एकदाच वापरतात ज्यामुळे बाथरूमचा आकार चुकीचा होतो, कारण वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३५० दिवस ही जागा वापरलीच जात नाही. टॉयलेटचा अचूक आकार म्हणजे ३ फूट x ४ फूट अंघोळीसाठी जागा, २’६” x ४ फूट कमोड व २ फूट x ४ फूट वॉश बेसिनसाठी,बजेट दरातील सदनिकांच्या टॉयलेट लांबी ७ फूट व रुंदी ४’ ३” फूट असली पाहिजे व तुम्ही ती जास्तीत जास्त ५’ ६” x ८’ ६” पर्यंत वाढवू शकता, त्या पलिकडे काहीही म्हणजे जागेचा अपव्यय (मी ९०% घरांविषयी बोलतोय, त्याला १०% अपवाद नेहमीच असतो, म्हणजेच अति श्रीमंतांचा )! त्यानंतर आणखी एक वादाचा मुद्दा असतो तो म्हणजे बैठकीची खोली व जेवणाची जागा एकत्र करावी का किंवा स्वयंपाकघराची जागा व जेवणाची जागा एकत्र करावी का व माझे उत्तर त्यासाठीही असेच असेल, तुमच्या स्वतःच्या जीवनशैलीचा अभ्यास करा. स्वयंपाकघरातच डायनिंग टेबल ठेवले, जेथे गृहिणी स्वतः स्वयंपाक करत असेल तर हालचाल करण्यासाठी फार कमी जागा उरेल, तसेच जेवणासाठी नेहमी पाहुणे येत असतील तर गृहिणीला पाहुणे जेवत असताना तिथे काम करणेही प्रशस्त वाटणार नाही. परंतु घरकामासाठी कामवाली असेल व तुमच्याकडे जेवणासाठी फारसे पाहुणे येत नसतील तर तुम्ही स्वयंपाकघरात डायनिंग टेबल ठेवू शकता म्हणजे बैठकीची खोली स्वच्छ व आवरायला सोपी असेल. बांधकाम व्यावसायिकांसाठी तसेच घराच्या ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे चित्रांद्वारे सादरीकरण करताना दाखविण्यात आलेल्या फर्निचरच्या आराखड्यावर कधीही जाऊ नका, तर फर्निचर सदनिकेतील खोल्यांच्या आकारानुसार दाखवलेले असल्याची खात्री करा. म्हणजे जेवणासाठी ८’ x ६’ ची जागा असेल तर सादरीकरणाच्या आराखड्यामध्ये दाखविण्यात आल्याप्रमाणे तिथे सहा लोकांसाठी डायनिंग टेबल कसे बसू शकेल, असा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे, जो अनेक ग्राहक घर घेताना विचारत नाहीत व नंतर फार उशीर झालेला असतो. तसेच फर्निचर बसवताना आपण बहुतेकवेळा हवा खेळती राहण्याकडे (क्रॉस व्हेंटिलेशन) दुर्लक्ष करतो, जो योग्य आकाराच्या सदनिकांचा आणखी एक पैलू आहे, ज्याबाबत बांधकाम व्यावसायिक व घराचे ग्राहक दोघेही अनभिज्ञ असतात.
योग्य आकाराचे घर असण्यासोबतच, इमारतही योग्य आकाराची असली पाहिजे म्हणजेच, तुमच्या सदनिकेच्या बाहेरील भाग व इथेही आपले (म्हणजेच ग्राहकांचे तसेच बांधकाम व्यावसायिकांचेही) अज्ञान म्हणजे कळसच असतो कारण इमारतीच्या भोवती किती रिकामी जागा आहे किंवा वर गच्चीवर किती जागा सामाईक आहे (म्हणजे सामाईक ठेवणे अपेक्षित आहे), जिम किंवा क्लब हाउसचा आकार किती आहे, सामाईक पॅसेजची रुंदी किती आहे इत्यादींसारखे प्रश्न कुणीच विचारत नाही. कारण पार्किंगच्या जागेमध्ये कार वळविण्यापासून ते सामाईक पॅसेजमध्ये तुमचे फर्निचर हलविण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात जेव्हा तुम्ही योग्य आकाराच्या इमारतीमध्ये सदनिका खरेदी करता. कार वळविण्यासाठी पार्किंगच्या जागी किमान १४ फूट रुंद ड्राईव्हवे हवा व यांत्रिक पार्किंगसाठी तो १५ फूटही असू शकतो. तसेच पॅसेजची रुंदी किमान ५ फूट असली पाहिजे, तो किती अंतरासाठी आहे यानुसार त्याची लांबी वाढवता येईल व हे निवासी इमारतींसाठी आहे. तुम्ही विचार करत असाल की या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त आणखी कशासाठी योग्य आकार लागू होतो, तर तो लिफ्ट केबिनसाठीही लागू होतो कारण मी लिफ्ट केबिनमध्ये दाटीवाटीने उभे राहिलेले किंवा लिफ्टमध्ये चढण्यासाठी त्यांची पाळी येण्याची वाट पाहात असलेले लोक पाहिले आहेत, म्हणूनच हे आकार महत्त्वाचे आहेत व तुम्ही जोपर्यंत हे प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुमचा घराचा व्यवहार योग्य आहे किंवा चुकीचा आहे हे तुम्हाला समजणार नाही. तसेच एक लक्षात ठेवा योग्य आकाराच्या व्याख्येमध्ये खोलीच्या योग्य लांबी-रुंदीचा तसेच या खोल्यांच्या नियोजनाचाही समावेश होतो, कारण तरच तुम्ही तुमच्या फर्निचरच्या आराखड्यासाठी खोलीचा योग्यप्रकारे वापर करू शकाल, कारण १०० चौरस फूटांची खोली ही १०’ x १०’ असू शकते व १००’ x १’ देखील असू शकते, परंतु तुम्ही १००’x १’ ची खोली वापरू शकाल का नाही योग्य आकाराच्या घराचे काय महत्त्व आहे याचे उत्तर यातच आले !
एक अभियंता म्हणून मी नेहमी विचार करतो, की सदनिकेचा योग्य आकार ठरविणारी सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे घराचा ग्राहक (म्हणजे कुटुंब) परंतु ते होत नाही, कारण आपण भारतीय अगदी भाज्या (किंवा समभाग) खरेदी करायच्या असल्या तरीही भावनांच्या आधारे किंवा तर्काच्या आधारे खरेदी करतो व घरही “खरेदीच्या या नियमाला” अपवाद नाही. म्हणूनच घर घेणाऱ्या ग्राहकांनी त्यांच्या नेमक्या गरजा समजून घेण्याची वेळ आली आहे व तुमचा खिसा हा सुद्धा त्याचा एक महत्त्वाचा घटक असू शकतो, परंतु केवळ तुम्हीच स्वतःसाठी योग्य आकाराचे घर निवडू शकता. योग्य घर आकाराचे हे कधीही अपघाताने मिळत नाही, तर अभ्यास, माहिती, नियोजन व नाविन्यपूर्ण कल्पनांमधून मिळते जे व्यवहार करणाऱ्या दोन्ही बाजूंकडून झाले पाहिजे. चला तर मग तुमच्या गरजा काय आहेत ते ठरवा व तुमच्यासाठी योग्य आकाराचे घर निवडा!
संजय देशपांडे.
संजीवनी डेव्हलपर्स.
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment