“काही लोक पावसात ओले होण्याची मजा अनुभवतात; तर काही जण फक्त भिजतात.”
― रॉजर मिलर
रॉजर डीन मिलसर सिनिअर हे अमेरिकन गायक-गीतकार होते, जे देशी संगीताने प्रभावित नाविन्यपूर्ण गाण्यांसाठी ओळखले जातात. त्यांनी १९६० च्यापुढे नॅशव्हिला साउंड युगामध्ये अनेक लोकप्रिय देशी व पॉप गाणी दिली. वरील अवतरण पावसाविषयी त्यांचे सर्वात प्रसिद्ध अवतरणनांपैकी एक असावे. त्यामुळे आपल्याला (आपल्यापैकी बहुतेकांना) अगदी साध्या-सोप्या शब्दात जीवनाविषयीचा तसेच एकूणच निसर्गाविषयीचा दृष्टिकोन समजतो. आपण सगळे पावसाचे महत्त्व जाणतो तरीही पावासात बाहेर जायचे म्हटल्यावर बहुतेकांना त्रासदायक वाटते कारण तुम्ही ओले होता, अगदी थोडे लोक पावसात आनंदानी मजा घेंऊ शकतात व हा देखील निसर्गाचा एक भागच आहे म्हणून त्याचा आनंद उपभोगू शकता. मी हे अवतरण निवडण्याचे कारण म्हणजे मी ताडोबाला नुकतीच पावसाळ्यामध्ये भेट देऊन आलो. मी तुम्हाला आधीच सांगतो की मलाही पाऊस विशेष आवडत नाही, विशेषतः तुम्ही बाहेर फिरायला निघाल्यावर ओले व्हायला अजिबात नाही. जंगलांमध्ये पावसामुळे तर परिस्थिती आणखी अवघड होते (म्हणजे वैतागण्यासारखी), कारण जिप्सीवर ताडपद्रीचे आच्छादन घातलेले असताना तुमच्या हातात कॅमेरा धरून ठेवणे त्रासदायक असते, तुमच्या चष्म्यावर धुके साचलेले असते, अशावेळी तुम्हाला काही हालचाल दिसल्यास, अचूक कोन साधून, छायाचित्र काढताना अतिशय अवघड असते, त्यामुळे तुम्ही अजूनच वैतागता. पावसाळ्यामध्ये जंगलाला भेट देण्याविषयी नेमके हेच मला सांगावेसे वाटले, की अशी परिस्थिती असूनही तुम्ही जंगलाचा आनंद घेऊ शकता, कारण या काळात जंगल सर्वात सुंदर दिसते व तुम्हाला अनेक अद्भूत दृश्ये पाहायला मिळतात जी इतर मोसमात आपल्यापासून लपून राहिलेली असतात.
पावसाळ्यातील वन्यजिव पर्यटनाविषयी पहिला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे तुम्हाला पावसाळ्यामध्ये वाघ दिसत नाहीत व दुसरा म्हणजे मॉन्सूनमध्ये (पावसाळ्यामध्ये) सर्व अभयारण्ये बंद असतात. या दोन्ही गैरसमजुतीं पन्नास टक्केच खऱ्या आहेत व त्या कशा हे मी तुम्हाला समजावून सांगतो. पावसाळ्यामध्ये बहुतेक व्याघ्र प्रकल्प बंद असले तरी त्यांचे कोअर क्षेत्र बंद असते, मात्र त्यांचे बफर क्षेत्र खुले असते. सध्याच्या परिस्थितीमध्ये ताडोबा सारख्या बफर क्षेत्रामध्ये जास्त वाघ आहेत, या क्षेत्रामध्ये काही निर्बंधांसह मानवी (तसेच वाघांच्याही) हालचालींना परवानगी असते. बफऱ क्षेत्रांमध्ये अतिशय समृद्ध जैवविविधता असते, बहुतेक व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोठे बफर क्षेत्र आहे, ताडोबामध्ये बफर क्षेत्रात अठराहून अधिक प्रवेशद्वारे आहेत, म्हणूनच तुम्ही पावसाळ्यामध्ये जंगलाला भेट देऊ शकता. कोअर क्षेत्रात म्हणजे अभयारण्यांच्या मध्यवर्ती भागात, मुसळधार पावसामुळे रस्त्यांची परिस्थिती अतिशय वाईट असू शकते, बफर क्षेत्रात माणसांच्या हालचालीला परवानगी असल्यामुळे रस्त्याची परिस्थिती अधिक चांगली असते, म्हणूनच असे धोरण राबवले जाते व त्याचे प्राण्यांना एकांत मिळावा वगैरे गोष्टींशी काही घेणेदेणे नसते. अनेक वाघ कोअर क्षेत्रातून बफर मध्ये ये-जा करत असतात, ते नियमितपणे बफर क्षेत्रात येतात कारण या सीमारेषा माणसांसाठी आहेत, प्राण्यांसाठी नाही. थोडक्यात, तुम्ही पावसाळ्यातही अभयारण्यांना भेट देऊ शकता. दुसरा गैरसमज म्हणजे तुम्हाला पावसाळ्यामध्ये वाघ दिसत नाहीत, हे खरे असले तरी त्यात ही पन्नास टक्केच तथ्य आहे कारण वाघांना त्यांचे पोट भरण्यासाठी शिकार करावी लागते तसेच वाघांना त्यांच्या निर्धारित प्रदेश निश्चित करावा लागतो, त्यामुळे पावसाळ्यातही अशा हालचाली होत असताना तुम्हाला अधिक वेळा वाघ दृष्टीस पडतो. शिकार म्हणजे काय याची कल्पना आपण करू शकतो परंतु आपला प्रदेश निश्चित करणे म्हणजे जंगलाच्या विशिष्ट भागाची मालकी निश्चित करणे व हे वाघाचे मूलभूत वैशिष्ट्य आहे व ते अनेक प्रकारे केले जाते, त्यातीलच एक मार्ग म्हणजे विशिष्ट जागी (बहुतेकवेळा झाडांपाशी) लघवी करणे व प्रत्येक वाघाचा गंध वेगळा असतो यावरून कुणाचा भाग कोणता आहे हे इतर वाघांना समजते. पावसाळ्यामध्ये पावसामुळे लघवीच्या गंधाने होणारी ही प्रदेश-निश्चिती पुसली जाते व त्यामुळे वाघाला आणखी जास्त फिरावे लागते व त्याचा प्रदेश नियमितपणे निश्चित करावा लागतो. अशाप्रकारे तुम्हाला पावसाळ्यामध्ये वाघ दिसू शकतो. पावसाळ्यामध्ये हिरवाई अधिक गर्द व घनदाट असते, त्यामुळे वाघ जोपर्यंत रस्त्यावर किंवा कमी उंच गवतात येत नाही, तोपर्यंत तो दिसणे उन्हाळ्याच्या तुलनेत अवघड असते, म्हणूनच पावसाळ्यामध्ये वाघ दिसण्याची शक्यता इतर हंगामांपेक्षा कमी असते, परंतु तुमचे थोडे नशीब असेल व थोडे आजूबाजूला फिरल्यानंतर तुम्हाला वाघ हमखास पाहायला मिळतो.आता पावसाळ्यामध्ये वाघ दिसेल का नाही (आणखी काय) याविषयी तुमच्या शंका संपल्या असतील तर या लेखाच्या मुख्य भागाकडे आपण जाऊ, तो म्हणजे, ताडोबामध्ये या पावसाळी हंगामाची जादू, विशेषतः बफर क्षेत्रात जो जैवविविधतेने समृद्ध आहे. तुम्ही जंगलात प्रवेश करताक्षणी तुम्हाला सगळीकडे हिरवाई आणि तिच्या असंख्य छटा दिसतात. या हिरवाईच्या ताज्या गंधाने अवघा आसमंत भरलेला असतो व सगळीकडे रंगीबेरंगी विविध आकारांची फुलपाखरे बागडत असतात. हे दृश्य कदाचित तुम्हाला उन्हाळ्यामध्ये बघायला मिळणार नाही कारण वर्षाच्या या कालावधीमध्ये (मला असे वाटते) हा फुलपाखरांच्या उमलण्याच्या काळ असतो म्हणजे अळीतून फुलपाखरामध्ये रुपांतरित होण्याचा. तुम्हाला ताज्या रंगांमध्ये न्हायलेल्या पंखांनी बागडणारी फुलपाखरे सगळीकडे पाहायला मिळतात. आणखी एक दृश्य म्हणजे तुम्हाला पक्षी घरटे बांधताना दिसतात जे दृश्य तुम्हाला उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये दिसत नाही. पावसाळ्यात जंगलामध्ये तुमचे दोन फायदे होतात; एक म्हणजे, स्वर्गीय नर्तक किंवा ड्रॉगो किंवा सुतार पक्षी यासारखे अनेक पक्षी पाहायला मिळतात, जे सतत हालचाल करत असतात (म्हणजे उड्या मारत असतात किंवा उडत असतात), ज्यामुळे त्यांची छायाचित्र काढणे किंवा त्यांना सलग पाहणे अवघड होते. पावसाळ्यात तुम्हाला त्यांना घरट्यापाशी आळीपाळीने म्हणजे कधी नर व कधी मादी असे बसून राहिलेले पाहता येते व दुसरे म्हणजे तुम्हाला पक्षांच्या घरट्यांचे अद्भूतरम्य जग जाणून घेता येते. एक स्थापत्य अभियंता म्हणूनही (ते देखील एक बांधकाम व्यावसायिक) मला नेहमी इतर प्रजातींच्या (माणसांव्यतिरिक्त) अतिशय कमीत कमी संसाधनांमध्ये घर बांधण्याच्या क्षमतेचे कौतुक वाटते. या ताडोबाच्या पावसाळी सफारीमध्ये मला केवळ स्वर्गीय नर्तकाची छायाचित्रेच घेता आली नाहीत तर त्याच्या घराचा म्हणजेच घरट्याचाही अभ्यास करता आला. सर्वप्रथम, त्याच्या आकाराने माझे लक्ष वेधले, जो पक्ष्याच्या लांब शेपटीच्या तुलनेत बराच लहान होता, जे त्याचे वैशिष्ट्य आहे व त्यानंतर ते घरटे ज्याप्रकारे बांधण्यात आले आहे त्याकडे लक्ष वेधले गेले. हे घरटे पांढरट रंगाचे होते व त्यात पाणी शिरू शकत नसावे असे वाटले व त्यावर एक चकाकी होती. मी जेव्हा आमच्या गाईडला त्याविषयी विचारले (अलिझांझा बफर क्षेत्रातील अरविंद) तेव्हा त्याने सांगितले की ते पानांनी, लहान फांद्यांनी बनले होते व कोळ्याच्या जाळ्याच्या चिकट धाग्यांनी ते एकत्र जोडण्यात आले होते, त्यामुळे त्यावर एक चकाकी होती व त्यामध्ये पाणी शिरू शकत नव्हते. घरट्यावर बसलेल्या स्वर्गीय नर्तकाला पाहून तो मला म्हणाला, “मियाँ मूठभर, दाढी हाथभर” म्हणजेच एवढे लहानसे घरटे असूनही, त्याच्या मालकाची लांबलचक शेपटी आहे व या पक्ष्याचे शरीरही अतिशय लहान असते. हे किती आश्चर्यकारक आहे, कारण असे घरटे बांधण्यासाठी लागणारे सर्व साहित्य गोळा करण्यासाठी किती वेळ लागतो याचा विचार करा व त्यातही उन्हाळ्यातील उकाडा, पाऊस, वारा, तसेच इतर पक्षी, सापासारखे शत्रू, या सगळ्याला तोंड देत एक लहानसे घरटे बांधण्यासाठी या पक्ष्यांना किती प्रयत्न करावे लागत असतील. पावसाळ्यामध्ये वन्यजीवनाचे आणखी एक आकर्षण म्हणजे सरपटणारे प्राणी भरपूर पाहायला मिळतात, जे तुम्हाला एरवी क्वचितच दिसतात कारण उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे बहुतेक सरपटणारे प्राणी (साप, सरडे) त्यांच्या शरीराचे तापमान राखण्यासाठी जमीनीत खोलवर जातात व हिवाळ्यामध्ये उबदार राहण्यासाठी ते खाणे व दीर्घकाळ झोपणे पसंत करतात. पावसाळ्यामध्ये खाद्यपदार्थांचीही रेलचेल असते तसेच त्यांच्या घरातही पाणी शिरते (जमीनीतील भेगांमध्ये किंवा बिळांमध्ये), या दोन्ही कारणांमुळे सरपटणारे प्राणी त्यांच्या घरातून बाहेर येतात व त्यामुळे आपल्याला ते दिसतात. आम्ही सगळ्या आकाराच्या घोरपडी पाहिल्या, ज्यामध्ये अगदी पिल्लेही होती, ती झाडांवर चढून त्यांच्या सालींखाली असलेल्या किड्यांची शिकार करत होती. अनेक पर्यटक म्हणतील त्यात काय मोठेसे आणि सरडे व सापांमध्ये पाहण्यासारखे काय आहे, अनेक महिलांना तर हे प्राणी अगदी दृष्टीस पडलेले देखील आवडत नाहीत. परंतु सरपटणारे प्राणी हा निसर्गचक्रातील एक अतिशय महत्त्वाचा दुवा आहे जो कीटक व कृदंत प्राण्यांना खाऊन संतुलन राखतो. त्याचप्रमाणे, तुम्हाला शहरामध्ये वाघ दिसत नसेल तर तुम्हाला शहरामध्ये घोरपड तरी पाहायला मिळते का? याचे उत्तर नाही असेच आहे, बरोबर? किंबहुना पावसाळ्यामध्ये तुम्ही कितीतरी गोष्टींचे निरीक्षण करू शकता किंवा शिकू शकता ज्या एरवी विशिष्ट हंगामामुळे तुमच्यापासून एकतर लपून राहिलेल्या असतात किंवा वाघाचा शोध घेण्याच्या नादात आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पावसाळ्यामध्ये साप बाहेर पडण्याचे प्रमाण वाढल्याने साप चावण्याच्या घटनांमध्येही वाढ होते
कारण जे लोक शेतात काम करत असतात किंवा महिलांना भल्या पहाटे किंवा संध्याकाळी उशीरा नैसर्गिक विधींसाठी (ग्रामीण भारतामध्ये विशेषतः जंगलांभोवतीच्या भागांमध्ये ही पद्धत अजूनही दुर्दैवाने सुरू आहे) बाहेर जावे लागते तेव्हा त्यांना पावसाळ्यामध्ये साप चावण्याचे प्रकार अधिक होतात. माझ्या लेखांमधून मी वारंवार या गोष्टीचा उल्लेख करत राहणार आहे की जंगलांजवळच्या गावांमध्ये महिलांसाठीच्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था अतिशय निकृष्ट आहे किंवा त्यांचे व्यवस्थित व्यवस्थापन केले जात नाही. सरकारने बफर क्षेत्राभोवतालच्या गावांमध्ये सार्वजनिक शौचालये बांधली आहेत परंतु ती स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्याचा पुरवठा नाही, तसेच सांडपाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही, ज्या ठराविक काळाने स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी शौचालयाचे दरवाजे चोरून नेलेले आहेत किंवा तुटलेले आहेत त्यामुळे महिलांना ते वापरणे अशक्य होते व आपण यावर तोडगा काढलाच पाहिजे. आम्ही पुण्याच्या मध्यवर्ती भागात, कर्वेरस्त्यावरील नळ स्टॉप येथे एक सार्वजनिक शौचालय दत्तक घेतले आहे. आपण अशाप्रकारच्या उपाययोजना शोधल्या पाहिजेत. मी वन विभागाला त्यासाठी प्रस्ताव देणार आहे, ताडोबा बफर क्षेत्रात इतर कोणत्याही कंपन्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी असे मॉडेल राबवावे किंवा इतर काही उपाययोजना राबवाव्यात, असे माझे सर्व वाचकांना आवाहन आहे.
हा लेख लिहीत असताना, माझ्या वाचण्यात एक बातमी आली, ती वन विभागाच्या वन्यजीवन गुन्हे नियंत्रण शाखेने, व्याघ्र प्रकल्पामध्ये अवैध शिकाऱ्यांच्या नजरेत असलेल्या १३ व्याघ्र प्रकल्पांमध्ये अवैध शिकार होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला होता त्याविषयी होती, हे शिकारी मध्यप्रदेशातील बव्हेरिया टोळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका जमातीचे होते. त्यानंतर काही वन्यजीवप्रेमींच्या वॉट्सॲप ग्रूपवर मॉन्सूनच्या कालावधीमध्ये अभयारण्याचे प्रवेश शुल्क वाढविण्यात आल्याचे एक परिपत्रक आले आहे, यामुळे वन्यजीवप्रेमींसाठी तसेच ताडोबाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी वन्यजीव पर्यटन अधिक महाग होणार आहे. लोकहो, वनविभाग, तथाकथित वन्यजीवन संवर्धक, स्वयंसेवी संस्था, सरकारी यंत्रणा आणि माननीय पंतप्रधान श्री. मोदी, आपण सगळ्यांनी वन्यजीवन पर्यटनाविषयी अधिक व्यापक दृष्टिकोनातून बघण्याची वेळ आली आहे (म्हणजे ते स्वस्त झाले पाहिजे) व सर्व अभयारण्ये तसेच पर्यटन-रहित क्षेत्रे पर्यटकांसाठी खुली केली पाहिजेत, असे झाले तरच आपण सर्व वाघांवर (व इतर वन्य जीवनावर) नजर ठेवू शकू, वनविभागाला एकट्यानेच हे करणे कधीही शक्य नाही. त्याचप्रमाणे ही जंगलाशी संबंधित व आजूबाजूला राहणाऱ्या गाईड, रिसॉर्टमध्ये काम करणारे कर्मचारी व इतरही अनेक व्यक्तींपैकी प्रत्येकासाठी उपजीविकेची संधी असू शकते. हे खरेतर पर्यटक म्हणजे माणसाच्या रूपाने जंगलाचे डोळे, कान व नाक आहेत. ताडोबाच्या भोवतालच्या प्रदेशांमध्ये केवळ भाताचेच पीक होते व त्याच्या लागवडीपासून ते कापणीपर्यंतचा चार महिन्यांचा कालावधी वगळला तर उरलेले आठ महिने इथल्या लोकांना काम नसते. आपण त्यांचा वापर वन्य सहलींचे परवानाधारक आयोजक म्हणून करू शकतो, जे या अभयारण्यांच्या प्रवेशद्वाराबाहेरील वन्यजीवन लोकांना दाखवतील. यामुळे जंगलाच्या बाहेर होणाऱ्या सर्व अवैध कामांवर नजर ठेवण्यास मदत होईल तसेच सर्व जंगले पावसाळ्यातही खुली ठेवा. कारण अवैध शिकाऱ्यांना या हंगामात वाघ पाहण्यासाठी कुणीही पर्यटक येणार नाहीत हे माहिती असते, त्यामुळे ते या काळात त्यांच्या काळ्या कारवाया वाढवतात. जंगलांमध्ये आणखी एक बातमी (म्हणजे कुजबुज) ऐकण्यात आली ती म्हणजे वाघाच्या जिवंत बछड्यांचा व्यापार, ज्यांना अतिशय मागणी आहे व अनेक स्थानिकांनी खाजगीत सांगितले की वाघाच्या बछड्यांची चोरी होत आहे व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अतिशय चढ्या दराने त्यांची विक्री केली जात आहे (एक कोटी व त्याच्यापुढे) व ही बाब गंभीर आहे. या सगळ्या गोष्टी हाताळल्या जाऊ शकतात व आपण लवकर पावले उचलली पाहिजेत कारण एकूणच वन्यजीवन संवर्धनासाठी वेळ हातातून चालली आहे. त्याचप्रमाणे आपण जंगलाधील पावसाळ्यातील जादू हजारो पर्यटकांना दाखवू शकतो ज्यांनी ती कधीही अनुभवलेलीच नाही असेच मला वाघाचे बछडे (पावसामध्ये) व त्यांच्या आईच्या नात्याचे अतिशय सुरेख दृश्य पाहायला मिळाले व आई आसपास नसते तेव्हा तिचे बछडे किती आज्ञाधारकपणे तिच्या सूचनांचे पालन करतात हे आम्ही पाहिले. आम्ही बबली नावाच्या वाघीणीचे तीन वयात आलेले बछडे पाहिले, ती शिकारीसाठी गेली असावी व तिने बछड्यांना गवताच्या एका लहानशा पट्ट्यात ठेवले होते, ज्याच्या आजूबाजूला झुडुपे होती. आम्ही पाहिले की ती बछडी झुडुपांच्या मागे खेळत होती, परंतु दोन तासात एकदाही त्यांनी त्या झुडुपांची रेषा ओलांडली नाही व उघड्यावर आमच्यासमोर आली नाहीत, कारण त्यांच्या आईने त्यांना तसे सांगितले असावे, तुम्हाला जंगलामध्ये असेच जगावे लागते, जंगलाच्या नियमांचे पालन करून!
म्हणूनच लोकहो, आपण सर्व जंगले सर्वांसाठी खुली करण्यासाठी यंत्रणेवर दबाव आणला पाहिजे व तोपर्यंत ताडोबा बफर सारख्या जंगलांना भेट द्या जी पावसाळ्या मध्ये ही तुमचे स्वागत करतात जेणेकरून तुम्हाला आपल्या देशातील जंगलांमध्ये पावसाचा अनुभव घेता येईल, एवढे सांगून थांबतो!
संजय देशपांडे.
संजीवनी डेव्हलपर्स.
smd156812@gmail.com
पुण्यातील रिअल इस्टेटविषयी माझे विचार खालील यू ट्यूब दुव्यावर पाहा..
https://www.youtube.com/watch?v=g4xX7eopH5o&t=5s
No comments:
Post a Comment