“एका स्रीचा सर्वात कट्टर व पराभूत करण्यास सर्वात कठीण शत्रू ही बहुतेकवेळा एक स्रीच असते व ती त्या स्री मध्येच वास्तव्य करत असते” …
हे काही एखादे अवतरण नाही तर एक विधान आहे किंवा एक विचार आहे, जो “बाईपण भारी देवा” नावाचा मराठी चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात आला. मला आज हा लेख लिहीताना अतिशय आनंद होतोय कारण तो एका मराठी चित्रपटाविषयी आहे. या चित्रपटाचा कथाविषय हा महाराष्ट्रातील परंपरेचा किंवा संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, तो म्हणजे मंगळागौर! अमराठी लोकांसाठी, तसेच सन २००० च्या पुढे शतकात जन्मलेल्या मुलांसाठी (ज्यांना अशा परंपरांविषयी माहितीच नसते किंवा तिच्याशी काहीही घेणेदेणे नसते) म्हणून सांगतो, मंगळागौर हा सण (अनेकांसाठी एक सोहळा ) प्रामुख्याने विवाहित महिला श्रावणातल्या मंगळवारी एकत्र येऊन साजरा करतात. यामध्ये लोकगीते (ज्यातून सासरकडच्या विविध नात्यांना कोपरखळी मारली जाते), खेळ, नाच, उखाणे म्हणजेच यमक जुळवून त्यात आपल्या नवऱ्याचे नाव गुंफायचे व इतरही बऱ्याच गोष्टी असतात.
पारंपरिकपणे मंगळागौरीमध्ये केवळ नवविवाहित व विवाहित महिलांनी सहभागी होणे अपेक्षित असते परंतु आपली संस्कृती उदारमतवादी आहे त्यामुळे विधवा तसेच कोणत्याही
जातीच्या, वयाच्या किंवा धर्माच्या महिलांनाही त्यामध्ये सहभागी करून घेते जे
योग्यच आहे. पूर्वीच्या काळी महिलांचा बाह्य जगाशी फारसा संपर्क नसे व त्यांना मोकळेपणाने जगण्याची संधी (विरंगुळ्याचे क्षण) मिळत नसे, अशावेळी त्यांना आनंदाचे काही क्षण मिळावेत व आपल्या आधुनिक कॉर्पोरेट संस्कृतीच्या शब्दात सांगायचे तर स्ट्रेस बस्टर म्हणजेच ताण कमी व्हावा ही त्यामागची मूळ संकल्पना होती. हा अस्सल मराठमोळा सण आहे व सर्व शहरांमध्ये, गावांमध्ये व खेडेगावांमध्येही साजरा करतात व स्थानिक संस्कृतीमध्ये तो खोलवर रुजलेला आहे.
आता मंगळागौरीविषयी तुम्हाला पुरेशी माहिती मिळाली असेल तर या सणाचा वापर चित्रपटामध्ये किती खुबीने करण्यात आला आहे ते पाहू. अर्थात, मंगळागौरीचा संदर्भ अलिकडच्याच एका लोकप्रिय, बिग बजेट चित्रपटात म्हणजेच बाजीराव मस्तानीमध्ये येऊन गेला आहे. ज्यामध्ये त्यावर रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण यांच्यासारखे मोठे कलाकार होते व एक आयटम साँग होते (मी त्यासाठी केवळ हाच शब्द वापरू शकतो, यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला माफ करा), ज्यामध्ये दोन नायिका “पिंगा गं बाई पिंगा” या लोकगीतावर ठुमकत होत्या, एवढेच मी त्याविषयी सांगू शकतो. बाईपण भारी देवा चे वेगळेपण काय आहे, तर हा असा चित्रपट आहे जो मंगळागौरीसारख्या सणांमागचा हेतू नेमका जाणतो, म्हणूनच हा शंभर टक्के “देशी” चित्रपट आहे, ज्यामध्ये आपल्या काही महिलांची गोष्ट महिलांसाठीच्या सणाभोवती गुंफण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये आपल्याला केवळ मंगळागौरीमागचे तत्वज्ञानच समजत नाही तर तो आपल्याला एकूणच समाजातील महिलांच्या भूमिकेविषयी विचार करायला भाग पाडतो. आणखी एक पाऊल पुढे जात, हा चित्रपट केवळ पुरुषांचेच नव्हे तर महिलांचेही डोळे उघडतो, माझ्यासाठी बाईपण भारी देवा चे हेच खरे यश आहे, म्हणूनच मी लेखासाठी हा विषय निवडला. मी काही चित्रपट समीक्षक नाही, किंबहुना माझे असे ठाम मत आहे की कोणत्याही प्रकारच्या कलाकृतीवर टीका टिप्पणी करण्याचा कुणालाही अधिकार नाही, कारण ती दुसऱ्या कुणाचीतरी निर्मिती असते. तिला चांगली किंवा वाईट ठरवणारे आपण कोण, नाही का? पण आपण त्या कलाकृतीतून काय संदेश देण्यात आला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, मग तो एखादा चित्रपट असो किंवा पुस्तक. ज्यांनी तो चित्रपट पाहिलेला नाही किंवा पुस्तक वाचलेले नाही त्यांना त्या कलाकृतीचा गाभा समजावा यासाठी त्यांच्यापर्यंत तो पोहोचवू शकतो, असे माझे वैयक्तिक मत आहे व मी आधीच स्पष्ट करत आहे.मी हा लेख तुम्ही बाईपण भारी देवा चे परीक्षण करावे असे सांगण्यासाठी लिहीत नाही तर मला त्यातून काय समजले हे तुम्हाला सांगण्यासाठी लिहीतो आहे.
एखाद्या हॉलिवुडपटाप्रमाणे बाईपण
भारी देवा ची सुरुवात भूतकाळापासून होते, त्यानंतर तो आपल्याला प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळख करून देतो. या प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजे सहा बहिणी आहेत, त्यातल्या सर्वात मोठ्या व सर्वात धाकट्या बहिणीमध्ये जवळपास वीस वर्षांचे अंतर आहे, ही बाब आजच्या पिढीला कदाचित हास्यास्पद वाटेल परंतु साधारण पन्नास-एक वर्षांपूर्वी ही अगदी सामान्य गोष्ट होती. म्हणूनच
दोन, सख्ख्या बहिणींमध्येही एका पिढीचे अंतर आहे म्हणजेच सर्वात तरूण बहीण आजच्या (२०२३) महिलेचे प्रतिधित्व करते, जी सहजपणे सर्व आधुनिक साधने व संवादाची माध्यमे हाताळते, तर तिच्यापेक्षा वयाने मोठ्या बहिणी हातात सगळ्यात उत्तम सेलफोन असूनही त्याचा वापर फक्त कॉल व मेसेज करण्यापुरताच करतात. मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे, बाईपण भारी देवा च्या गोष्टीची सुरुवात या बहिणींच्या जन्मापासून (म्हणजे वयाने सगळ्यात लहान बहिणीच्या) म्हणजेच साधारण चाळीस वर्षांपूर्वीपासून होते. आपल्याला त्यांच्या नात्यांमधले बंध उलगडत जातात व फळ्यावर रंगवलेल्या वंशवृक्षातून आज काय परिस्थिती आहे हे समजते. कॅमेरा पुन्हा आपल्याला वर्तमानकाळात घेऊन येतो (जसे आपण मिशन इम्पॉसिबल च्या चित्रपटांमध्ये अनुभवतो,आता एमआय म्हणजे काय हे मला विचारू नका). यातच त्याचे खरे सौंदर्य दिसून येते, कारण मंगळागौरींचा काळ कधीच मागे पडलाय आणि बहिणींमधले नातेबंधही विरळ झालेत. काळाच्या ओघात केवळ त्या वयानेच मोठ्या झालेल्या नाहीत तर एकमेकींपासून इतक्या लांब गेल्या आहेत की बँकेत एकत्र काम करणाऱ्या
त्यातील दोन बहिणी एकमेकींशी वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचाऱ्यांसारख्या वागतात, आपण सख्ख्या बहिणी आहोत याची जाणीवही त्यांना क्वचितच होते. इथे चित्रपट आपल्याला विशेषतः महिलांच्या नातेसंबंधांविषयी व त्यांच्या अवतीभोवती असलेल्या ताण-तणावांविषयी सांगायला सुरुवात करतो. या ताणतणावांचा त्यांच्यावर परिणाम झाल्यामुळे बहिणींसारख्या सुरेख नात्यातला ओलावाच त्या हरवून बसतात.
गोष्ट पुढे जाते तशी, आपल्याला सहाही बहिणींचा वर्तमानकाळ समजतो व त्यांच्या आयुष्यातली सद्यस्थिती समजते. त्या सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे त्यातली कुणीही आनंदी नाही किंवा तिच्या जिवाला शांतता नाही व इथेच हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक बाईला एकेका बहिणीचे पात्र आपलेसे वाटते. त्यातली एक निराश आहे कारण तिला मूल नाही व तिच्या वयाच्या इतर महिलांनी तरुणपणीच तिला एका अंतरात ठेवले आहे असे
तिला वाटत आहे. एक बहीण दुःखी आहे कारण तिच्या लग्न झालेल्या मुलीची तिच्यापेक्षा तिच्या सासुशीच जास्त जवळीक आहे. एका बहिणीचा पन्नाशीच्या वयात घटस्फोट होतोय, कारण ज्या नवऱ्याने तिच्या बहिणीऐवजी ती सुंदर असल्यामुळे तिला पसंत केले होते (पुन्हा एकदा भूतकाळ)तोच नवरा आता आणखी एक तरूण मुलगी त्याच्या आयुष्यात आल्यामुळे तिच्या प्रेमात पडला आहे. एका बहिणीचे लग्न श्रीमंत कुटुंबात झाले आहे परंतु ती काहीच करत नसल्याबद्दल व पतीचे पैसे उडवत असल्याबद्दल तिला सतत टोमणे मारले जातात, म्हणून ती स्वाभिमानासाठी आसुलेली आहे. पाचव्या बहिणीचे लग्न अतिशय परंपरावादी कुटुंबात झाले आहे, तिथे तिला तिच्या गाण्याच्या छंदावर पाणी सोडावे लागले आहे व ती नोकरी करतेय, तिची धाकटी बहिणीच तिची बॉस आहे. ती सतत नाराज असलेल्या व चिडचिड करणाऱ्या सासऱ्यांच्या धाकात जगतेय. सगळ्यात धाकटी बहीण काम करतेय, चांगल्या पदावर आहे पण तिचा नवरा बिनकामाचा आणि आळशी आहे. तो काहीही करत नाही, तरीही त्याच्या बायकोने त्याच्या आळसाला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा करतो.
आता तुम्ही म्हणाल त्यात काय मोठेसे (म्हणजे समस्या) कारण अशी अनेक पात्रे आपण रोजच पाहतो आणि बहिणींच्या नात्यातील बंध कधीच विरळ झाला आहे. त्याच्यामुळे आपापसातील अविश्वास, संवादाचा अभाव ही त्यामागची मुख्य कारणे आहेत. प्रश्न असा आहे की यात पुढाकार कोण घेईल व नात्यातील दरी भरून काढेल. इथेच मंगळागौरीच्या सणाचा संदर्भ येतो, त्यातली एक बहीण तिच्या विहिणीला हरवायला (स्वतः चा ईगो जपायला ) मंगळागौर स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवते. या स्पर्धेसाठी तिला संघ मिळत नाही म्हणून ती तिच्या बहिणींचा विचार करते व एकेक करून वेगवेगळ्या कारणाने का होईना त्या सगळ्या तिच्या संघात सहभागी होतात. या कारणाने जवळपास तीस वर्षांनी सगळ्या बहिणी पुन्हा एकत्र येतात. काळाच्या ओघात शरीराप्रमाणेच मनाचीही पडझड झालीय, जेव्हा या बहिणी एकत्र येतात तेव्हा त्यांना जाणीव होते की आपल्या आयुष्यात कशाची उणीव होती. त्यांनी आपल्याभोवती जी एक अदृश्य भिंत उभी करून ठेवली आहे ती एकेक करून गळून पडते व गोष्ट पुढे सरकत जाते.
बाईपण भारी देवा चा सर्वात उत्तम भाग म्हणजे पुरुषांच्या सहाय्यक पात्रांची निवडही अतिशय विचारपूर्वक केलेली आहे, सगळे पुरुष गोष्टीचा भाग असले तरीही बहुतेक वेळा ते पडद्याआड असतात. त्यांच्याविषयी जेव्हा या बायकांच्या मनात विचार येतो तेव्हा त्या किती ओझे घेऊन जगत असतात याची आपल्याला जाणीव होते किंवा ज्या पुरुषांशी त्यांचा संबंध आहे (किंवा ज्याच्यासोबत जगताहेत) त्यांच्याशी असलेल्या नात्याचे स्वरूप आपल्याला समजते. हळूहळू गोष्ट उलगडत जाते व आपली प्रत्येक बहिणीच्या पात्राच्या चेहऱ्यामागे असलेल्या खऱ्या बाईशी ओळख होते व या प्रक्रियेत तिची स्वतःशी अधिक चांगली ओळख होते. नेहमीप्रमाणे (मी आजूबाजूच्या अनेक महिलांच्या बाबीत हे घडताना पाहतो) प्रत्येक बहीण तिच्या आयुष्यात काही समस्या आहे ही वस्तुस्थितीच नाकारताना दाखवली आहे. आपल्या आयुष्यात सगळे काही व्यवस्थित व आलबेल आहे असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, प्रत्यक्षात मात्र तसे नसते. त्यामुळेच त्या सतत दुःखी असतात व तणावाखाली जगतात. या बहिणी मंगळागौर स्पर्धेचा सराव करण्यासाठी जशा वरचेवर भेटू लागतात, त्यांच्या नात्यातही हळूहळू मोकळेपणा येऊ लागतो, जो इतक्या वर्षात पूर्णपणे हरवून गेलेला असतो. त्यामुळे त्यांना स्वतःच्या समस्यांशी लढण्याचे धाडस व ताकद मिळते हाच बाईपण भारी देवा चा सर्वोत्तम भाग आहे.
विविध कौटुंबिक आघाड्यांवर लढताना, मुले, काम, भोवतालचे विवेकशून्य पुरुष किंवा तुमच्या स्वतःच्या भूतकाळाला तोंड देताना, तुम्हाला असे कुणीतरी हवे असते जे तुमची भीती, वेदना, सल, भूतकाळ ऐकून घेईल व यासाठी तुमच्या सख्ख्या बहिणीशिवाय अधिक चांगले दुसरे कोण असू शकते, कारण तीदेखील तुमच्याच भूतकाळाचाच भाग असते. म्हणूनच, या बहिणी एकमेकींना आपली ताकद बनवतात व त्यांच्या वर्तमानकाळाला तोंड द्यायला सुरुवात करतात, यात त्यांना त्यांचे बालपणीचे बंधच नव्हे तर मीपणही गवसते. वैशिष्ट्य म्हणजे यात दिग्दर्शकाची बुद्धिमत्ता संपूर्ण चित्रपटात जाणवत राहते, कारण मंगळागौर स्पर्धेचा निकाल जाहीर होणे व बहिणीचा संघ जिंकलेला दाखवणे आवश्यकच वाढले नाही. त्या बहिणी स्वतःची ओळख व आपल्या समस्यांशी लढण्याची क्षमता पुन्हा मिळवतात हाच खरा विजय आहे व तो कोणत्याही चषकापेक्षा किंवा बक्षिसाच्या रकमेपेक्षा अधिक मोलाचा आहे. बाईपण
भारी देवा पाहिल्यानंतर भारवून गेलेल्या महिलांना मला आणखी एक गोष्ट सांगाविशी वाटते, स्वतःची ओळख पुन्हा मिळवणे व तुमचे स्वतःचे आयुष्य जगता येणे म्हणजे तुमच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढणे किंवा तुमच्या कर्तव्यांची पूर्तता न करणे नव्हे. याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचा आनंद व जवाबदाऱ्यांचा ताण यांचा समतोल सहजपणे साधू शकता, यालाच तर जीवन म्हणतात !
या लेखाच्या सुरुवातीच्या विधानात मी एक स्री हीच दुसऱ्या स्री ची कट्टर शत्रू असते व तो शत्रू तिच्यातच असतो असे म्हटले होते, बाईपण भारी देवा ची आणखी एक बाजूही आहे. तुमच्यामध्येही एक स्री आहे जी तुमची सर्वोत्तम मैत्रीण होऊ शकते, कारण तुम्ही तुमच्यातल्या स्री ला कसे वागवताय, यावरूनच ती तुमची कट्टर शत्रू होते की घनिष्ट मैत्रीण होते हे ठरेल व “बाईपण भारी देवा” हा चित्रपट बाईपणाच्या याच अगदी मूलभूत तथ्याची तुम्हाला जाणीव करून देतो. म्हणूनच तुम्ही त्यातून काय घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे, एवढे सांगून निरोप घेतो!
संजय देशपांडे.
संजीवनी डेव्हलपर्स.
smd156812@gmail.com
No comments:
Post a Comment